३१०

Submitted by मिलिंद महांगडे on 17 September, 2018 - 04:24

गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून सकाळी उतरताना मी कुर्ला स्टेशनात अक्षरशः फेकलो जातो . ट्रेन जर सजीव असती तर हे दृश्य ट्रेनला झालेली ओकारी असं काहीसं दिसलं असतं . ट्रेनमधून उतरल्यानंतर नेहमीचा कार्यक्रम , उतरताना आपल्याला ज्याने ज्याने मागून ढकलले , त्याच्याकडे रागाने पाहणे , मनातल्या मनात त्याला चार शिव्या देणे आणि पुढचा रस्ता धरणे ! तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर मी आमच्या नेहमीच्या ३१० नंबरच्या बसकडे वळतो . ३१० नंबरची बस कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन यादरम्यान असलेल्या बीकेसी मधून जाते . ३१० डबल-डेकर आहे , मुंबईत धावणाऱ्या फार कमी डबल डेकर बस पैकी एक आणि तितकीच गर्दीने भरलेली !
मी लांबूनच पाहतो , नागाच्या वेटोळ्यासारखी लांबच लांब रांग मला दिसते . याचा अर्थ , चार ३१० गेल्या नंतर आपल्याला पाचवी गाडी मिळणार ! ही गर्दी साली पाचवीलाच पुजलीय असं वाटायला लागतं . ही रांग इतकी वाढलेली असते की आपल्याला आज बस मिळणार आहे की नाही अशीही एक शंका मनात येऊन जाते .
बसमध्ये चढण्यासाठी इतर कुठल्याही बसला लागत नसतील अशा तीन वेगवेगळ्या रांगा ३१० ला लागतात . ह्या तिन्ही रांगांच्या ढंगा वेगळ्या आहेत . एक मुख्य रांग , जी केवळ बसणाऱ्यांची असते , ह्या रांगेतील लोक सावकारासारखे वाटतात मला , त्यांच्याच नादात निवांत चालणार , बस मध्ये चढण्याची त्यांना बिलकुल घाई नाही . बसणाऱ्यांचं भागलं की स्टँडिंग वाली दुसरी रांग आहे . ही रांग पहिल्या रांगेच्या अगदी उलट ! ह्यांना कधी एकदा गाडीत चढतोय असं होतं . तिकीट चेकर नसला की , पहिल्या रांगेचे लोक बसमध्ये चढत असतानाही स्टँडिंग लाईन वाले चढायचा प्रयत्न करतात आणि मग बाकीच्यांच्या शिव्या खातात . ह्या दोन रांगाव्यतिरिक्त तिसरी रांग तिकीटचेकरच्या मागे उभी आहे . वास्तविक पाहता तिला रांग म्हणणेच चुकीचे आहे . त्या तिकीट चेकरच्या मागे बसमध्ये लटकत जाणाऱ्या लोकांचा घोळका असतो . एकवेळ स्टँडिंग वाल्या लोकांना बसायला मिळेल , पण ह्या तिसऱ्या रांगेच्या लोकांना कधीच बसायला मिळत नाही .
३१० नंबरची बस मला एकूणच जीवनविषयक सूत्र सांगताना दिसते . म्हणजे बघा , कुर्ल्याच्या गर्दीवाल्या , आणि बारीक रस्त्यांवरून हळूहळू जाताना तिचं बालपण सरत जातं , त्यानंतर बीकेसीमध्ये शिरल्यानंतर ती तारुण्यात येते एमटीएनएल पासून ते कलानगर पर्यंत तारुण्याच्या जोशात ती सुसाट पळत असते मग बांद्रा स्टेशन जसे जवळ येईल तसतसे वार्धक्याकडे झुकल्यासारखी तिची चाल पुन्हा मंदावते.
" ३१० ची लाईन का ? " मी रांगेतल्या शेवटच्या माणसाला जाऊन विचारतो . कारण रांग वेटोळे घेऊन घेऊन खूप लांबलचक झालेली आहे . पण समोरच्याचं लक्ष नाही. " ३१० का लाईन है क्या ? "
" हां भाई . तिन्सो दसही है " त्याचा सूर वैतागलेला . मी त्याच्या मागे उभा राहतो . आता मी रांगेतला शेवटचा माणूस आहे . माझ्या पुढे अंदाजे पावणे दोनशे तरी माणसे रांगेत आहेत . बाजूला नुसताच उभा असलेला रिक्षावाला माझ्याकडे दयेने पाहतोय की काय असं मला वाटून जातं . त्याचवेळी कोणीतरी माझ्या मागे येऊन उभं राहतं .
" ३१० का लाईन है क्या ? " मागून आवाज . आता मी लक्ष देत नाही . " ३१० ची लाईन आहे का ? " त्याचा मराठीत प्रश्न .
" हो तीनशे दहाचीच लाईन आहे . " मी त्याला उत्तर देतो . ह्या वेळेत एक ३१० येऊन समोर उभी राहते . रांगेतले किती लोक चढले वगैरे गोष्टी मला काही लांबून दिसत नाहीत . रांग जशी पुढे सरकेल तसा मी सरकत जातो . एक ३१० येऊन गेली तरी रांग काही फारशी पुढे सरकलेली दिसत नाही. मी सहज मागे पाहतो , थोड्याच वेळात माझ्या मागे तेवढेच लोक उभे असलेले मला दिसतात . मला थोडंसं हायसं की काय म्हणतात ते वाटतं .
घरातून वेळेवर निघालं , नेहमीची ट्रेन पकडली , ट्रेन्स वेळेवर असल्या , बसची फ्रिक्वेन्सी ठीक असली आणि स्टेशन ते बस स्टॉपपर्यंत चालण्यासाठी साधारण जेवढा वेळ लागतो तेवढा जुळला तर ३१० च्या रांगेत नेहमीचेच चेहरे पुढे मागे उभे असलेले दिसतात . त्यात रेकलेल्या म्हशीसारखा आवाज असलेला भैया , मेंदी लावल्याने दाढी लाल झालेला म्हातारा , एक प्रेमी युगल , बघावं तेव्हा फोनवर चिकटलेली जाडी मुलगी , असे काही ठराविक चेहरे रांगेत मला जवळपास रोजच दिसतात . मला सगळ्यात जास्त गंमत वाटते ती त्या प्रेमी युगलाची . कितीही गर्दी असो , ऊन असो , पाऊस असो त्यांना काही फरक पडत नाही . लोक बेस्ट च्या नावाने बोंबाबोंब करतायत , गर्दीत एकमेकांवर डाफरतायत , उशीर होत असल्यामुळे चिडचिड करतायत , अशा भयंकर अनरोमँटिक ठिकाणी ते प्रेमी युगल प्रेमाच्या गोष्टी करत आपल्याच नादात गुंग आहे . बाकी दुनिया फाट्यावर !
" अरे ए बाबा , मधे कुठे घुसतो ? लाईन मागे आहे . " पुढचा कोणीतरी ओरडतो . घुसखोरी करणारा खजील होऊन रांगेच्या शेवटाकडे जाऊ लागतो .
" काय सालं एकही गाडी नाही ? सगळ्या ३१३ आणि ३३२ भेंचो . .... बघा , बघा ... गेली ३१३ , च्यायला तिकडं कुणी नाही तरी तिकडं गाड्या सोडतायत ... मारलं पायजे साल्यांना... लोकांची काय फिकीरच नाय ह्यांना .... काय ऊन आहे भेंss चो .... " मागच्याची अविरत बडबड चालू आहे . बस नको पण बडबड आवर अशी माझी अवस्था . चौथी बस तुडुंब भरून गेली आणि आता येणारी पाचवी बस मला मिळेल अशी आशा वाटू लागते . आणखी पंधरा मिनिटे उन्हात भाजून निघाल्यानंतर लांबून ३१० येताना दिसते . तुकाराम महाराजांना पुष्पक विमान दिसल्यावर झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद मला ३१० पाहिल्यावर होतो .
आली आली बाबा एकदाची ....
चलो , भाई चलो
ए , ए sss बिचमे किधर घुसता है ? ओ मास्तर तुम्ही लक्ष द्या जरा ...
चलो भाई , चलो जलदी , इसके बाद गाडी नही आयेगा ... जलदी चलो
थांबा .... थांबा .....
चढा .... चढा ..... लवकर ....
असे चित्र विचित्र आवाज रांगेतल्या माणसांचे येतात . काही लोक अगदी विमानात बसायच्या ऐटीत चढत आहेत . काही घाई नाही . त्याचा फायदा स्टँडिंगच्या लायनीत बसच्या दाराला धरून उभे राहणारे काही लोक घेतात . सुमडीत आत शिरतात . ते बघून मग मुख्य रांगेतले लोक धरणीकंप झाल्यासारखे जिवाच्या आकांताने ओरडतात. पण नुसतं ओरडण्यापलीकडे फारसं काही होत नाही . घुसखोरी करून आत चढलेला वरच्या मजल्यावर पोहोचला सुद्धा ! गाडीत चढण्यासाठी लोक घाई करतात . त्या लोंढ्याबरोबर मीही आत जातो . पुराचं पाणी गावात शिरावं तशी बसमध्ये माणसं शिरतात . आत शिरल्यावर मला नेहमी पडणारा प्रश्न , खाली बसू की वरच्या मजल्यावर जाऊ …? ते ठरेपर्यंत मागून सात - आठ लोक माझ्यापुढे निघून गेलेले असतात आणि मला विंडो सीट न मिळाल्याचं दुःख करत कुठेतरी बसावं लागतं . बस मधली काचेची खिडकी एक नमुना आहे . ती एका हाताने वर करू शकेल असा महामानव अजून जन्माला यायचाय . ती कधीच नीट वर जात नाही . वर करायचा प्रयत्न केला तर एक बाजूच वर जाते , एक खाली राहते , मग एखाद्या हट्टी मुलासारखी ती खिडकी मधेच अडकून बसते . वर एक विचित्र आकाराचं हुक असतं , तिथपर्यंत कसं बसं आपण त्या खिडकीला नेलं तरी त्या विचित्र हुकात काही ती स्वतःला अडकवून घेत नाही . त्यात दोन हात किंवा कधी कधी तीन हात ( शेजारच्याचा एक हात ) लागल्याशिवाय ती वर जात नाही . श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर वगैरे उचलला असेल , त्याला म्हणावं एका हाताने ती खिडकीची काच वर करून दाखव . मुंबईत नवखा आलेला एखादा भैया लेडीज सीट वर बसतो आणि मग त्याचा ध्रुवबाळ होतो . तोंड वाकडं करीत वरच्या दांड्याला लटकत उभं राहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही . बस गर्दीने तुडुंब भरली की कंडक्टर डबल बेल मारतो आणि आपली गाडी सुरू ... कंडक्टर ह्या माणसाचं मला कौतुक वाटतं . जिथं पाय ठेवायला जागा नसते त्या बस मधून सराईतपणे जो चालतो तो कंडक्टर ! " तिकीट ... तिकीट बोला, तिकीट " करत बसमध्ये त्याचा मुक्त विहार सुरू असतो . तो प्रवाश्यांवर अक्षरशः सत्ता गाजवत असतो , " चला पुढे चला , डबल लाईन करा .... " अशा ओर्डरी अधून मधून सोडत तिकिटे फाडत फिरत असतो .
बस मध्ये अफाट गर्दी आहे . फेवीकॉल ने चिकटवल्यासारखे सगळे एकमेकांना चिकटलेत. जरा धक्का लागला की एकमेकांवर डाफरतायत .... ड्रायवर ने मधेच जोरात ब्रेक लावला की मागचा पुढच्याच्या अंगावर जातोय , ट्रॅफिक मधून बस मुंगीच्या पावलांनी पुढे जातेय . घामाने सगळेच डबडबलेत , बसच्या इंजिनाच्या एकसुरी आवाजाने काही बसलेले प्रवासी पेंगायला लागलेत . त्यांचे भार बाजूच्या प्रवाशांवर पडतायत . काही लोक तो भार चुकवतायत तर काही , कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे गाणं म्हणत अंग चोरून बसलेत . बस रांगत रांगत एमटीएनएल पाशी येते आणि आता ती बिकेसी च्या प्रशस्त रस्त्यांवरून सुसाट धावू लागते . थंडगार वारा चेहऱ्यावर आल्याने आणि काही प्रवासी उतरून गेल्याने बाकीचे प्रवासी थोडे सुखावलेत . पण इथेही म्हणावं तसं सुख नाही . दोन दोन मिनिटाला गाडी सिग्नलवर थांबते आहे . रिक्षा , इतर दुचाकी , चारचाकी गाड्या आमच्या ३१० ला वाकुल्या दाखवून भुर्रर्रकन पुढे निघून जातायत . पण ड्रायवरला कुणाचं काही घेणं देणं नाही . तो त्याच्याच नादात , आणि बसच्या ताकदीप्रमाणे बस चालवतोय . रस्ते प्रशस्त असल्याने आता आपली गाडी सुसाट धावेल असं वाटतं पण गाडीच्या वेगात फार काही फरक पडत नाही. ट्रॅफिक कमी असल्याने बस फक्त न थांबता चालते तेवढंच काय ते !
" चला डायमंड , ... चला सिटी बँक वाले ..... " कंडक्टर ओरडतो .
पण आय सी आय सी आय बँकेचा स्टॉप येतो ... तेव्हा फक्त " आय सी आय " एवढंच ओरडतो . गर्दीने खच्चून भरलेली बस भारत नगर स्टॉप येईपर्यंत रिकामी होत जाते . माझा स्टॉप आरबीआय अर्ध्या पाऊण तासाने येतो . तो आला की मी उतरतो . डबल बेल मारून बस तिच्या पुढच्या प्रवासाला निघते .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलय.. डोळ्यासमोर उभं राहिलं.. पुरानी यादे ताजा हो गयी.. Happy
एकदा बेस्टच्या (२७१) प्रवासात जरा कमी गर्दीत माझा हात सुटून एका बाईला ठोसा बसला, तर हाताला दाढी लागली.. मी दचकून पाहिलं तर तृतीय पंथीय होता. मी घाबरले, त्याने निवांत प्रतिक्रिया दिली (त्याला काहीच फरक पडला नाहिये दाखवणारी) - हुश्श झाले..

छान लिहिलंय

पण > " काय सालं एकही गाडी नाही ? सगळ्या ३१३ आणि ३३२ भेंचो . .... बघा , बघा ... गेली ३१३ , च्यायला तिकडं कुणी नाही तरी तिकडं गाड्या सोडतायत ... > हे असं का होतं? कोणत्या मार्गासाठी किती बस, किती वेळाने हे कोण, कसं ठरवतं?

अर्रे मस्तच

मी ३११ आणि ३१३ ने जायचो त्यावेळी ३१० जास्त लवकर येते असे वाटायचे किंबहुना आपापली सोडून बाकी सगळ्या बसेस किती लगेचच येताहेत असे सगळ्यांनाच वाटत असावे.

किंबहुना आपापली सोडून बाकी सगळ्या बसेस किती लगेचच येताहेत असे सगळ्यांनाच वाटत असावे. >>> + ११११११

हे असं का होतं? कोणत्या मार्गासाठी किती बस, किती वेळाने हे कोण, कसं ठरवतं? >>> खास ह्या कामासाठी बेस्टचे कर्मचारी असतात

मी अजूनही बसनेच प्रवास करते पण वर जी काही मज्जा (कि सजा) आहे ती अंधेरी ला जॉब ला असताना ३ वर्षे भोगली आहे. मेट्रो बनण्याआधी बस रूट डायव्हर्ट केला होता पार पार्लेच्या कॉर्नरला HDFC बॅंकेहून वळून हायवेला जायची आणि पुन्हा अंधेरी हायवेला लागायची मग कधी उशीर झाला कि आम्ही स्टेशनपासून चालत हायवेला जाऊन ती चुकलेली बस ब्रिजखालून पकडायचो. संध्याकाळी seepz डेपो मधून बस पकडायचो आणि गुरुनानक स्कूल पर्यंत आलो कि उतरायचो आणि सरळ चालत स्टेशन कडे जायचो. खूप हाल झालेत म्हणून अंधेरी म्हंटले कि डोळ्यापुढे अंधेरा येतो.

छान लेख आहे.
तुमचे मुंबई लोकलवरचे सर्वच लिखाण अप्रतीम आहे..... लोकल डायरी तर जबरदस्त आहे. प्रितीलीपीवर वाचते.

अंधेरी म्हंटले कि डोळ्यापुढे अंधेरा येतो. + ११११
आता देखिल काही वेगळी परिस्थिती नाही.... फक्त काही ठिकाणी मेट्रो युज होते.
गेली ३ वर्षे अंधेरीत रहाते. Uhoh

खूप छान लिहिले आहे तुम्ही. मी आता पुण्याला असते पण मुंबई मध्ये असतानाचे दिवस आठवले कि काटा येतो माझ्या अंगावर. बसने नाही पण ट्रेन चा भयानक प्रवास मी खूप केलाय. मला समजत नाही की बरेच लोक ट्रेन आणि बस चे प्रवास कसे काय एन्जॉय करू शकतात.