रंगीबेरंगी पौष्टिक सलाड-पंजाब मीटस वेस्ट-mi_anu

Submitted by mi_anu on 17 September, 2018 - 00:22

हे नाव आपलं उगीच बरं का.
आता कोणत्याही पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा तर घरात इन्व्हेंटरी हवी.आमच्या घरातली इन्व्हेंटरी चंद्राच्या कलांप्रमाणे पौर्णिमा ते अमावस्या अशी बदलते.
सामान आणल्याचा दुसरा दिवस: धपाधप खोबरं कोथिंबीर पेरून भाज्या, डब्यात सॅलड, त्यात भरपूर ऑलिव्ह, ड्राय फ्रुट चा डबा 4.3० साठी(जो जास्त भूक लागल्याने सकाळी 11.30 लाच संपलेला असेल ☺️☺️).नाश्त्याला रेडी मिक्स वापरून 20 मिनिटे वाचवणे.
सामान आणल्याचा 29 वा दिवस: तूरडाळ संपली.मूग डाळीचे वरण.भाजी आणायला वेळ नाही.उशीर झाला.रात्री जेवायला दाणेकूट के एल एम दही भाकरी.छोले बनवताना कांदा टोमॅटो ग्रेव्ही नाही.दोन्ही संपले.

आता खाली सलाड मध्ये घातलेले पदार्थ पाहून तुम्हाला आमचे सामान आणल्याचा कितवा दिवस हा गेस मारता येईल.

प्रस्तावनेत पब्लिकला हमसाहमशी रडवून 'कळलं आता प्लिज मुद्द्यावर ये' स्टेज ला आणून झालं.आता रेशिपी चालू रस्ता बंद.

साहित्य
गट 1: उकडलेले छोले 1 छोटी वाटी
गट 2: पिवळी बेल पेपर अर्धी, टोमॅटो अर्धा
गट 3: सॅलड लिव्हज जी कोपऱ्यावरच्या दुकानात कमीत कमी शिळी मिळतील ती
गट 4: कापलेला अर्धा लिंबू, 1 चमचा गोडेतेल,रॉक सॉल्ट,ओरिगानो, एक असंच आणलेलं मिरी ओरीगानो चिली फ्लेक मिक्स(कारण वरच्या लायनीतलं नुसतं ओरीगानो जुनं झाल्याचा शोध लागला आहे)
गट 5: ऑलिव्ह ब्लॅक पिटेड(ही घेताना ही रिकामी आहेत हे काचेतून बघून घ्या.नाहीतर लसूण भरलेली पण मिळतात.)
IMG_20180917_072528.jpg
हे साहित्य.सकाळच्या घाईत फटाफट जरा बऱ्या डिशमध्ये(ही कोणीतरी पमी ने कोणत्यातरी फंक्शन ला दिलेल्या डिनर सेट मधली एकटीच उरलिय.बाकीच्या घाई आणि भांडण आणि मल्टी टास्किंग अश्या तीन लढायांत हुतात्मा झाल्या.) काढून एक फोटो.पिक्चर मध्ये सूट बूट वाल्या माणसाचा टॉप शॉट दाखवतात आणि खाली कॅमेरा गेल्यावर तो पट्ट्याची चड्डी घालून चिखल तुडवत असतो तसं या डिश आणि ओट्याच्या दुसऱ्या बाजूला ढकललेला डब्यांचा पसारा पाहिल्यास इथले बरेच सदस्य पुढचे काही दिवस झोपेतून किंचाळून उठतील.

हे आपले मसाले: (एक हिरवा वाला मेलाय. तो गडी बाद.)
IMG_20180917_072539.jpg

आता हे सगळं मिक्स करून घ्या.कोरडं वाटेल पण दही मी घालणार नाही.आमच्या शब्दकोशात ऑलिव्ह घातलेले सॅलड मिनिस्कर्ट वाले 'परदेशी स्लाड' आणि त्यात दही घातले की ती कॉटन चा पूर्ण बाह्या सलवार कुर्ता आणि अंगभर ओढणी घेतलेली' कोशिंबीर बनते.

हे फायनल प्रॉडक्ट
IMG_20180917_074824.jpg

चव: चांगली आहे हो!! मी थोडी घेऊन पाहिली.घरातल्या सर्वात चिकित्सक सदस्याला डब्यात दिली.हा दुर्दम्य आत्मविश्वास दर्शवतो की चव चांगलीच आहे.बाकी फोटो बिटो देऊन झाले, आता तुम्हाला काय दही तूप मीठ दाकू घालायचे ते घालून घ्या आवडीप्रमाणे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलय अनु. प्रस्तावना जास्त आवडली Proud
सॅलड पण छानच. ते काय ते टॉपिंग, सिझनिंग, घरगुती, वगैरे नीट करून ठेवा हो नक्की.

Pages