रंगीबेरंगी पौष्टिक सलाड-पंजाब मीटस वेस्ट-mi_anu

Submitted by mi_anu on 17 September, 2018 - 00:22

हे नाव आपलं उगीच बरं का.
आता कोणत्याही पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा तर घरात इन्व्हेंटरी हवी.आमच्या घरातली इन्व्हेंटरी चंद्राच्या कलांप्रमाणे पौर्णिमा ते अमावस्या अशी बदलते.
सामान आणल्याचा दुसरा दिवस: धपाधप खोबरं कोथिंबीर पेरून भाज्या, डब्यात सॅलड, त्यात भरपूर ऑलिव्ह, ड्राय फ्रुट चा डबा 4.3० साठी(जो जास्त भूक लागल्याने सकाळी 11.30 लाच संपलेला असेल ☺️☺️).नाश्त्याला रेडी मिक्स वापरून 20 मिनिटे वाचवणे.
सामान आणल्याचा 29 वा दिवस: तूरडाळ संपली.मूग डाळीचे वरण.भाजी आणायला वेळ नाही.उशीर झाला.रात्री जेवायला दाणेकूट के एल एम दही भाकरी.छोले बनवताना कांदा टोमॅटो ग्रेव्ही नाही.दोन्ही संपले.

आता खाली सलाड मध्ये घातलेले पदार्थ पाहून तुम्हाला आमचे सामान आणल्याचा कितवा दिवस हा गेस मारता येईल.

प्रस्तावनेत पब्लिकला हमसाहमशी रडवून 'कळलं आता प्लिज मुद्द्यावर ये' स्टेज ला आणून झालं.आता रेशिपी चालू रस्ता बंद.

साहित्य
गट 1: उकडलेले छोले 1 छोटी वाटी
गट 2: पिवळी बेल पेपर अर्धी, टोमॅटो अर्धा
गट 3: सॅलड लिव्हज जी कोपऱ्यावरच्या दुकानात कमीत कमी शिळी मिळतील ती
गट 4: कापलेला अर्धा लिंबू, 1 चमचा गोडेतेल,रॉक सॉल्ट,ओरिगानो, एक असंच आणलेलं मिरी ओरीगानो चिली फ्लेक मिक्स(कारण वरच्या लायनीतलं नुसतं ओरीगानो जुनं झाल्याचा शोध लागला आहे)
गट 5: ऑलिव्ह ब्लॅक पिटेड(ही घेताना ही रिकामी आहेत हे काचेतून बघून घ्या.नाहीतर लसूण भरलेली पण मिळतात.)
IMG_20180917_072528.jpg
हे साहित्य.सकाळच्या घाईत फटाफट जरा बऱ्या डिशमध्ये(ही कोणीतरी पमी ने कोणत्यातरी फंक्शन ला दिलेल्या डिनर सेट मधली एकटीच उरलिय.बाकीच्या घाई आणि भांडण आणि मल्टी टास्किंग अश्या तीन लढायांत हुतात्मा झाल्या.) काढून एक फोटो.पिक्चर मध्ये सूट बूट वाल्या माणसाचा टॉप शॉट दाखवतात आणि खाली कॅमेरा गेल्यावर तो पट्ट्याची चड्डी घालून चिखल तुडवत असतो तसं या डिश आणि ओट्याच्या दुसऱ्या बाजूला ढकललेला डब्यांचा पसारा पाहिल्यास इथले बरेच सदस्य पुढचे काही दिवस झोपेतून किंचाळून उठतील.

हे आपले मसाले: (एक हिरवा वाला मेलाय. तो गडी बाद.)
IMG_20180917_072539.jpg

आता हे सगळं मिक्स करून घ्या.कोरडं वाटेल पण दही मी घालणार नाही.आमच्या शब्दकोशात ऑलिव्ह घातलेले सॅलड मिनिस्कर्ट वाले 'परदेशी स्लाड' आणि त्यात दही घातले की ती कॉटन चा पूर्ण बाह्या सलवार कुर्ता आणि अंगभर ओढणी घेतलेली' कोशिंबीर बनते.

हे फायनल प्रॉडक्ट
IMG_20180917_074824.jpg

चव: चांगली आहे हो!! मी थोडी घेऊन पाहिली.घरातल्या सर्वात चिकित्सक सदस्याला डब्यात दिली.हा दुर्दम्य आत्मविश्वास दर्शवतो की चव चांगलीच आहे.बाकी फोटो बिटो देऊन झाले, आता तुम्हाला काय दही तूप मीठ दाकू घालायचे ते घालून घ्या आवडीप्रमाणे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! Lol
खास अनु टच!
पौर्णिमा ते अमावास्या Rofl
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, घरोघरी मातीच्या चुली वगैरे वाक्ये उगाच नाही लोकप्रिय झालेली Wink

Lol
मस्त लिहीलय.
ऑलिव्ह घातलेले सॅलड मिनिस्कर्ट वाले 'परदेशी स्लाड' आणि त्यात दही घातले की ती कॉटन चा पूर्ण बाह्या सलवार कुर्ता आणि अंगभर ओढणी घेतलेली' कोशिंबीर बनते. >>> अगदी अगदी Lol

Mast

D739324F-3B88-4BE9-B671-4689AD263D4A.jpeg

मी_अनु

झब्बू Happy

हे आमच्या घरात सगळ्यांचे आवडते सलाड....

तुमची रेसिपी आहे अल्मोस्ट तशीच. पण आम्ही काकडी टोमॅटो टाकतो आणि गोडंतेल वापरायच्या ऐवजी ऑलिव्ह्ज सोबत पडणारं व्हीनेगर चव आणतं

मी_अनु पाककृती नियम क्र ६. बाजारात मिळणारे सलाड ड्रेसिंग, टॉपिंग्स वापरता येणार नाहीत.

तुमच्या पाकक्रियेमधील टॉपिंग दुसरी टाकून पाककृती देता येईल का?

टॉपिंग म्हणजे काय?
ते मधले बाटल्यांच्या फोटोतले वापरलेले मसाला मिक्स? त्यात फक्त चिली फ्लेक, मिरपूड, ओरिगानो पावडरचे मिक्स आहे.
ते वापरायचे नसल्यास नुसते मीठ मिरपूड आणि चिली फ्लेक वेगवेगळे टाकून वापरता येईल.
ते काढू का?

मस्त. सलाड रंगीबेरंगी छान दिसतंय.
सामान आणल्याचा दुसरा दिवस,सामान आणल्याचा 29 वा दिवस >> Happy सेम सेम

खास अनु टच +९९९९
छोले माझे ही फेव्हरेट. पण त्याचे नाव काढले की आमच्याकडे अर्धम्हसाश्वेर चे चित्र दिसते. ( हे अर्धनारीनटेश्वर च्या चालीवर वाचावे.) अर्धांगाला मी अश्व असल्याचा भास होतो तर मला ती मारक्या म्हशी सारखी अंगावर येत असल्याचा भास होतो.
अर्थात मी आली अंगावर घेतली शिंगावर या हिमतीत छोल्यावर ताव मारतो. आता ही डिश मांडवली वर सुटू शकते. धन्यवाद अनु जी.

डॉ आरारा ☺️☺️☺️☺️
या न्यायाने मला परसदारी मिरीचे झाड,हौदात छोटे मिठागर, मुंबई हुन इंपोर्टेड समुद्राचे पाणी,काबुली चण्याचे शेत, ऑलिव्ह चे झाड, सॅलड व्हेज चे झुडूप, पिवळ्या भोंग्या मिरचीचे रोप, टोमॅटो चे रोप,ओरीगानो चे रोप इतका जामानिमा करून पुढच्या वर्षी एन्ट्री द्यावी लागेल ☺️☺️☺️
दिवे दिवे दिवे दिवे सगळ्यांना

ऑन सिरीयस नोट, मला नियम कळलेला आहे.
म्हणजे रेडिमेड बाजारात मिक्स करून मिळालेले, ज्यात घटक आणि प्रिझटव्हेटिव्ह ची पूर्ण माहिती आणि खात्री देता येणार नाही असे काही आपल्या स्पर्धा एन्ट्री च्या सॅलड ला नकोय.बरोबर ना?
म्हणजे पिकल्ड ऑलिव्ह नको.(ऑलिव्ह भारतात ताजे भाजी मार्केट मध्ये मिळणार नाहीत त्यामुळे व्हिनेगर मधले कॅंड नाईलाजाने नियमात बसवावे लागतील.पण मस्टर्ड ड्रेसिंग/मेयोनिज/आणि काहीही रेडिमेड स्ट्रिक्ट नोनो

बादवे. पिकल्ड ऑलिव्ह्स. हलापिन्यो इ. व्हिनेगरमधे नसतात. ती 'ब्राईन' असते, मिठाचे सौम्य द्रावण. हे संपृक्त नसते, म्हणून सौम्य म्हणायचे. यात सिरका उर्फ व्हिनेगर असू/नसू शकतो. झाकण उघडले की फ्रीजात ठेवावे नाहीतर बुरा लागतो.

माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार महाराष्ट्रात नसले तरी जैतुनका तेल, जैतुनका पेड, सिरका इ. उत्तर-पश्चिमेत नेटिव्ह आहेत.

तुम्ही घटकपदार्थांच्या क्याटेगरीजचे नंबर्स बदललेत म्हणून घोळ झाला आहे.

हे बघा संयोजकांनी काय म्हटलंयः
>>>
रंगीबेरंगी पौष्टिक सलाड पाककृती साठी नियम.
घटक क्र १:- उसळ/डाळ/ धान्य/सोयाबीन/मेथ्या
घटक क्र २:- पालेभाजी, कोथींबीर, पार्सली, कांद्याची पात, खाण्यायोग्य कोणतीही पाने.
घटक क्र ३:- फळभाजी/कंदभाजी
घटक क्र ४:- फळे/सुका मेवा/वाळवलेली फळे/ऑलिव्हज/खजुराचे तुकडे/लिंबू/तेलबीया(भाजलेले तीळ/ सुर्यफूल/ शेंगदाणे) खाण्यायोग्य कोणत्याही वनस्पतीच्या बीया
चवीसाठी /टॉपिंग्स (पर्यायी, न वापरल्यास उत्तम):- भारतीय पारंपारीक चटण्या, योगर्ट (साखर न वापरता), दही, वेगवेगळे पदार्थ/मसाले (मिरची, लसून, आलं, काळी मिरी, सुक्यामेव्याची पावडर, वापरुन बनवलेले टॉपिंग्स)
ंंं<<<

तुम्ही टोमॅटो पालेभाजीत घातलात आणि ऑलिव्ह्ज ड्रेसिंगसाठी वापरलेत!
देव बघतोय म्हटलं! Proud

आता गं बया
मोबाईल वरून लिहिते.फार जास्त परत परत स्विच मारून पोस्ट बघायचा/कॉपी पेस्ट चा उत्साह नसतो.त्यामुळे आठवणींवर अवलंबून अंदाजे मारल्या ना कॅटेगरी ☺️☺️☺️
अंगुर: नाम बदलनेसे आदमी थोडेही बदलता है?होती तो आपसेही!!

अनु , मस्तच लिखाण आणि रेसिपी ही सहीच

लंडन मुंबई विमानात हे गारेगार छोले सॅलड देतात . मस्तच लागत चवीला. त्यावर कोथिंबीरी सारखा शेपू शिवरलेला असतो . तो पण छान लागतो. परत करशील तेव्हा असला घरात आणि आवडत असेल तर शेपू थोडा घालून बघ.

Pages