व्यक्तिचित्रण स्पर्धा - हायझेनबर्ग - 'बोहेमियन राप्सडी'

Submitted by हायझेनबर्ग on 15 September, 2018 - 20:57

'ती आली, त्यांनी पाहिलं आणि ते हसले' फॉल सेमिस्टरपासून सुरू झालेल्या आमच्या फिलॉसॉफी क्लासचं हे एका वाक्यातलं वर्णन!

एव्हाना रंगीबेरंगी फॉल सीझन संपून पांढर्‍याफटक हिवाळ्याने माझ्या शहराला - इथकाला आणि आमच्या युनिवर्सिटीला कह्यात घेतले होते. जणू शरदाचे सप्तरंग शिशिराने अलगद आपल्या पांढर्‍या बर्फात गोठून ठेवावेत आणि मग मन भरले की ते वसंताच्या हवाली करून निघून जावे. मला नेहमी वाटे....आमच्या ईथकातला शरद ऋतू म्हणजे अगदी एखाद्या मुरलेल्या चित्रकारासाराखा... सुबक आकारांमध्ये मोजून मापून रंग भरणारा....आणि रंगांच्या छटा एवढ्या अगणित की बस्स! रंगांची ती ऊधळण पहातच रहावी.....शिशिर मात्र एखाद्या विक्षिप्त म्हातार्‍या चित्रकारासारखा....कॅनव्हासवर सफेद रंगाचा वॉश चढवायचा आणि रंग भरायची वेळ आली की ब्रँडीचा ग्लास घेऊन फायरप्लेसच्या बाजूला आरामखुर्चीवर पूर्ण दिवस डुलक्या काढत बसायचे....आणि वसंत.....तो एखाद्या तरूण, नवख्या चित्रकारासारखा.... चित्र रंगवणे राहिले बाजूलाच पण वेंधळेपणाने सगळे रंगच कॅनव्हासवर ईथे तिथे सांडून ठेवायचे. काहीका असेना, तिघेही चित्रकार मला अतिशय प्रिय होते.....आणि त्यांच्या एवढेच प्रिय होते माझे छोटेसे शहर - ईथका. मला जर कोणी ईथका बद्दल माझ्या भावना लिहायला सांगितल्या असत्या तर मी, होमरने ओडीसी मध्ये आपल्या मातृभूमीच्या - ईथकाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या ओडिसियसच्या भावना रंगवतांना जितके खंड लिहिले त्यापेक्षा कांकणभर जास्तच लिहिले असते.

शिशिराच्या विक्षिप्त म्हातार्‍याने ईथकावर बर्फाचा व्हाईटवॉश दिल्यानंतर जसा ईथकाने वॉर्डरोब बदलला तसा आमच्या क्लासने देखील. फॉलच्या महिन्यांपर्यंत रंगीबेरेंगी दिसणारा माझा पूर्ण क्लास अचानक रंग ऊडून काळ्या, करड्या रंगाच्या लोकरीच्या गुंडाळ्यांमधे गुरफटून बसल्यासारखा दिसू लागला. जिकडे पहावे तिकडे पांढर्‍या बर्फावर ऊबदार, काळ्या रंगांच्या लोकरीच्या गुंडाळ्या अचानक पाय फुटून ईकडेतिकडे फिरू लागल्यासारखे वाटू लागले. सर्वदूर पसरलेल्या बर्फाच्या थरांवर फुलणार्‍या रंगीबेरेंगी एस्कोबारियाच्या फुलांसारखी 'ती' सुद्धा त्या लोकरीच्या गुंडाळ्यांमधे कायम ऊठून दिसे. पण तेवढेच, एस्कोबारियाच्या वेगवेगळ्या रंगाच्या, विचित्र आकाराच्या नि रूढार्थाने ज्याला सुवास म्हणता येणार नाही अश्या विलक्षण वासाच्या फुलांसारखीच 'ती' सुद्धा....वेगळी, विचित्र आणि विलक्षण. 'ती' क्लासरूममध्ये आली की एक वाह्यात खसखस पिकलीच म्हणून समजा.... किंवा फिलॉसॉफीसारख्या घनगंभीर विषयाच्या वातावरणात कोणीतरी मजेशीर पण हिणकस शेरा मारला की समजावे 'ती' आली. खरं तर ती माझ्यासारखीच फिलॉसॉफीची ग्रॅज्युएट स्टुडंट आहे आणि माझ्या नावासारखेच तिला एक नाव सुद्धा आहे पण ह्यातला एकही तपशील महत्वाचा नाही. तिची ओळख पटण्यासाठी ह्यापैकी कुठल्याच माहितीची गरज नाही आणि ही माहिती तिच्याविषयी मत बनवायला ऊपयोगी तर त्याहूनही नाही. क्लासमधल्या सगळ्यांसाठी ती फक्त आहे, A peculiar case of Miss Kathereftis Spiegel a.k.a. Bohemian Rhapsody.

मी पहिल्यांदा 'कॅथरेफ्टिस स्पीगल' नाव ऐकले तेव्हा मला वाटले हे कसले विचित्र नाव? नाव ऐकता क्षणीच माझ्या डोळ्यांसमोर स्नोव्हाईटच्या गोष्टीतल्या तिच्या क्रूर,कुटिल, कारस्थानी सावत्र आईचा चेहरा आला. पहिले नाव ग्रीक आणि दुसरे जर्मन पण दोन्हींचा अर्थ एकच Mirror - आरसा. म्हणून तर 'Mirror mirror on the wall.....चटकन आठवले आणि पटकन तोंडातून 'who's the fairest of them all?' निघून गेले सुद्धा. ते ऐकून 'बोहेमियन राप्सडी' एकदम चमकलीच असावी कारण तिने कधी नव्हे ते मागे वळून माझ्याकडे बघितले, पण तेवढेच. त्यानंतर पुढचे अनेक महिने पुन्हा कधीही तिने मान मागे वळवली नाही, माझ्यासाठीही नाही की अजून कोणासाठीही नाही. मग कोणी कितीही हिणकस बोलले किंवा खिल्ली ऊडवली तरीही नाहीच. ह्याचा अर्थ बोहेमियन राप्सडी कुटिल, खत्रूड आहे असा नाही. ती जर काही असलीच तर ती आहे फ्रेडी मर्क्यूरीच्या बोहेमियन राप्सडी सारखीच....गूढ, रहस्यमय आणि अनाकलनीय.

कडाक्याच्या हिवाळ्यातही बिल्कूल न बदलणार्‍या तिच्या हिप्पी कपड्यांकडे बघून मला वाटे,
अरे देवा हिला थंडी कशी वाजत नाही? ही माणूस आहे की एल्फ?
तांबूस-सोनेरी केसांच्या दोन लांब मोकळ्या वेण्या, डोळ्यांना खोलवर लावलेले लायनर, डोक्यावर गोल हेडबँड, बोटभर लांब कानातले आणि गुडघ्यापर्यंत लांबीचे फुलाफुलांचे मिडी ड्रेस? ही नेहमीच बोहेमियातल्या हिप्पींसारखे कपडे का घालते?
आणि हे कसले अंगाखांद्यांवर एकसारखे टॅटूज?
दरवेळी बोहेमियन राप्सडीचा विचित्रपणा म्हणा की वेगळेपणा माझ्या मनात शंभर विचार जन्माला घालून जाई.

कायम बोहेमियातल्या हिप्पींसारखा अवतार आणि अंगावरच्या गोंदणातून राप्सडी कवितेत असते तसे मनातल्या भावनांचे ऊस्फूर्त प्रदर्शन. भावनांचे ऊस्फूर्त प्रदर्शन म्हणजे बोलणे, गाणे, संगीत, नाच.... थोडक्यात काहीतरी आवाजाचे प्रकरण असावे ना?....चूक! क्लासमध्ये आजवर कोणीही बोहेमियन राप्सडीच्या तोंडून निघालेला एक शब्दही ऐकलेला नाही. क्लासमध्ये अनेकांना खात्री आहे तिला बोलताच येत नाही. पण मला वाटते तिला नक्कीच बोलता येते परंतू तिला कोणाशीच बोलायची ईच्छा नाहीये. जरा बारकाईने लायनरच्या मागचे तिचे डोळे न्याहाळल्यास ईतर कोणाच्याही डोळ्यांपेक्षा ते मला जास्त बोलके वाटतात, फक्त त्यांची भाषा माझ्यासाठी अगम्य होती.... अजूनतरी.

राप्सडी कितीही वेगळी, विचित्र असली तरी तिच्या त्या हिप्पी अवतारामागचे आणि त्या बंद ओठांमागचे सौंदर्य काय वर्णू...तिला बघतांना, जणू सौंदर्याची ग्रीक देवता 'अ‍ॅफ्रोडाईट' किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधली 'लेडी गलाड्रिअल' पुढ्यात अवतरल्याचा भास मला सारखा होत राही. माझ्यासारख्या तरूणीलाही तिच्या सौंदर्याची भूरळ पडावी, हेवा वाटावा तर तिथे तरूणांची काय कथा? बरोबर? पुन्हा चूक! एकही तरूण राप्सडीच्या आसपास फिरकेल तर शपथ. सगळे चित्रविचित्र चेहरे करून तिच्या विचित्रपणावर हिणकस शेरे मारत राहतील नाहीतर मुद्दाम तिची वाट अडवून फिदीफिदी हसत बसतील. पण त्यांनी कितीही शेरे मारले तरी बोहेमियन राप्सडीच्या चेहर्‍यावर एकही वैतागाची रेष ऊमटणार नाही. जणू एखाद्या अदृष्य धाग्याने शिवलेल्या ओठांसारखेच तिचे कानही कोणीतरी शिसे ओतून बंद केलेले असावेत. विद्यार्थीच नाही पण आमच्या फिलॉसॉफीचे वयस्कर प्रोफेसरसुद्धा तिला क्लासमध्ये घडवून आणलेल्या चर्चांदरम्यान काहीही विचारण्याच्या फंदात पडत नसत.

बोहेमियन राप्सडी जेवढी विचित्र होती तेवढीच गूढ, चमत्कारिक आणि अनाकलनीय. म्हणूनच आम्हा सगळ्यांनाच तिच्याबद्दल एवढे प्रचंड कुतूहल वाटे की तिच्याविषयी कळणार्‍या माहितीचा एकनएक कण आपल्याला ऐकू यावा म्हणून आम्ही जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत राहू. पण नुसत्या अफवांशिवाय हातात काही पडत नसे. ती जशी आहे तशी ती का आहे? ह्याबद्दल प्रत्येकाची एक वेगळी थिअरी होती.. फिलॉसॉफीचे विद्यार्थी अर्धमुर्धे सायकॉलॉजिस्ट सुद्धा असतातच. कोणी म्हणे ती एका अब्जाधीशाची अतिगर्विष्ठ मुलगी आहे तर कोणी म्हणे तिला सोशल अँग्झायटी डिसऑर्डर आहे. कोणी म्हणे तिचा बुद्ध्यांक अतिशय कमी आहे तर कोणी म्हणे ती कायम ड्रग्ज घेते. ती ब्लॅक मॅजिक करते असे म्हणण्यापर्यंतही एक दोघींची मजल गेली होती. पण माझ्या मते राप्सडी ह्यापैकी कोणीही नव्हती. मला वाटे असे नुसते पोकळ अंदाजांचे ईमले बांधून तिच्या अगम्य व्यक्तीमत्वाच्या खोल डोहाचा तळ आपल्याला गाठता येणे शक्यच नाही. ती कोण आहे आणि काय आहे? हे समजून घ्यायचे असेल तर सर्वात आधी तिच्या अंगावरच्या टॅटूज चा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. ती एका शब्दानेही बोलत नसली तरी मनातल्या भावना बाहेरच्या जगाला न सांगता सुद्धा समजण्यासाठी तिने त्या कोरूनच ठेवल्या आहेत असे मला नेहमी वाटे. माझ्या मते त्या गोंदणाचा रहस्यभेद करणे हीच एकमेव किल्ली आहे तिच्या गूढ व्यक्तीमत्वाचे कोडे ऊलगडण्याची.

पण बोहेमियन राप्सडीसारखेच तिचे गोंदणही तितकेच गूढ आणि अनाकलनीय? एक काही धागादोरा मिळेल तर शपथ. मानेवर एक ऊभी आयताकृती, दोन्ही दंडांवर वर्तुळाकार आणि दोन्ही पोटर्‍यांवर लंबवर्तुळाकार आकाराच्या नुसत्याच डिझायनर चौकटी. विक्टोरियन काळातल्या चित्रांना किंवा तसबिरींना असतात ना अगदी तश्याच....पण साफ रिकाम्या. चौकटींच्या आत ना कसले चित्र ना कोणाची तसबीर. तिच्या सुंदर चेहर्‍यासारख्याच तिच्या गोंदणातल्या चौकटीही जिवंतपणाच्या कुठल्याही खुणांच्या अभावी नक्षीदार पण ऊदास वाटत. मला अनेकदा डोकं फुटेस्तोवर विचार करूनही त्या रिकाम्या चौकटींचा अर्थ काय असावा ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना येत नव्हती. कधी कधी मला माझीच लाज वाटे, मी तिच्याबद्दल एवढा विचार का करते? तिच्या बद्दल मला वाटणारे कुतूहल शमवण्याचे माझे प्रयत्न सौजन्याच्या कक्षा सोडून अट्टहासाकडे तर झुकत नाहीत ना? कधीमधी मागच्या बाकावरून तिला एकटक न्याहाळतांना तिने अचानक डोळ्यांच्या कोपरातून मला बघितले की काय असे वाटून अंगावर काटाही येत असे. पण एवढे सगळे असूनही तिच्याबद्दलचे प्रचंड कुतूहल मला काही केल्या स्वस्थ बसू देत नसे.

जसजसे दिवस जात होते तसे आजूबाजूला बोहेमियन राप्सडी असण्याची जणू सवयच होऊन गेली होती. एखादे दिवस ती दिसली नाही तर
तो पूर्ण दिवसभर चुकल्या चुकल्यासारखं वाटत राही. अजूनही कॉरिडोर मध्ये हीनकस शेरे नेमाने ऐकू येतच होते आणि क्लासरूममध्येही वरचेवर हशा पिकतच होता. पण ना राप्सडीच्या कपड्यांची हिप्पी स्टाईल बदलली ना कधी तिने तोंडातून एक ब्र सुद्धा काढला.

एकदा मात्र मी लेक्चरला ऊशीर होईल ह्या भितीने भराभर पेडल मारत नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्याने माझी सायकल दामटत असतांना युनिवर्सिटीच्या फारश्या वापरात नसलेल्या एका आडवाटेवर ऊभ्या निळ्या रंगाच्या एका आलिशान जॅग्वार मधून राप्सडीला ऊतरतांना पाहिले आणि गाडीतल्या कोणाशीतरी बोलतांना सुद्धा. काहीतरी प्रचंड आश्चर्यकारक पाहिल्यासारखे मी पेडल मारायचे विसरून विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या गाडीकडे आणि तोंड ऊघडून बोलणार्‍या राप्सडीकडे बघत गाडीच्या बाजुने सावकाश निघून गेले. गाडीसमोरून जातांना पहिल्यांदाच माझी राप्सडीशी नजरानजर झाली. मी पुढे गेल्याने ती माझ्या नजरेआड होऊनदेखील अजूनही माझा पाठलाग करणारी तिची नजर मला माझ्या सायकलच्या आरशात स्पष्ट दिसत होती. पण मागे वळून बघण्याची माझी आजिबात हिम्मत झाली नाही. मी मुकाट क्लासरूममध्ये माझ्या नेहमीच्या जागेवर कोणाशीही एका शब्दानेही न बोलता येऊन बसले. माझ्या मागोमाग काही क्षणातच दारातून आत येणार्‍या राप्सडीकडे मी बघितले तर ती कधी नव्हे ते थेट माझ्याकडेच बघतांना मला दिसली. अगदी माझ्या दोन बाकं पुढे भिंतीच्या बाजूला तिच्या नेहमीच्या जागेवर बसेपर्यंत ती माझ्याकडे डोळ्यांची पापणीही न हलवता एकटक बघत राहिली. शेवटी मीच तिचे ते बघणे असह्य होऊन नजर चोरत दुसरीकडे वळवली. एव्हाना प्रोफेसर येऊन त्यांनी नेहमीसारखा एक विषय घेऊन लेक्चर सुरूही केला होता, पण मी अजूनही समोर बसलेल्या राप्सडीच्या पाठमोर्‍या आकृतीकडे आणि मानेवरच्या गोंदणाकडे टक लाऊन बघत होते.
आधी सायकलच्या आरशातून दिसणारी आणि नंतर क्लासरूममध्ये शिरतांना माझ्यावर रोखलेली नजर आठवून मला एकदम कोणीतरी आपली चोरी पकडल्यासारखे का वाटत होते कोणास ठाऊक? पण दोन्ही वेळेस राप्सडीच्या नजरेत मला ना राग दिसला ना वैताग ना भिती... दिसले फक्त ज्यातला कुठलाही भाव आजिबात वाचता येणार नाही असे माझ्या आरपार बघणारे दोन अतिशय पारदर्शी डोळे. मला वाटले माझ्या कानांमध्ये कोणीतरी हळूच खुसफुसले, 'मला माहिती आहे तू माझ्याकडे बघते आहेस, पण तुला माहिती आहे का तुला काय दिसते आहे?'. केवळ दोनच क्षण..अगदी दोनच क्षण त्या पारदर्शी डोळ्यात मी बघितले असेन, पण त्या दोन क्षणातही मला प्रकर्षाने काहीतरी खूप ओळखीचे बघितल्यासारखे वाटून गेले,
'कदाचित, मीच दूरवरून माझ्या स्वतःकडे बघते आहे.....माझ्याच नजरेत माझी नजर स्थिरावली आहे.... आरशात दिसणार्‍या माझ्या स्वतःच्या डोळ्यांत मी माझ्याच डोळ्यांनी एकटक बघत आहे.... मला काय होते आहे ते न कळून खूपच अस्वस्थ वाटत होते.... सायकलचा आरसा....ती नजर...ते डोळे...ते गोंदण....काहीतरी गारूड पडले आहे...हा जादूटोणा आहे... बोहेमियन राप्सडी चेटकीण आहे... कॅथरेफ्टिस स्पीगल....मिरर.. मिरर......who is the fairest..... who... who?'
गरगरणारे डोके मी गच्च पकडले आणि....टॅssssडा! ... तत्क्षणी माझ्या चेहर्‍यावर एक मोठ्ठे स्मित पसरले....युरेका! युरेका!.....मला राप्सडीच्या गोंदणाचे कोडे एकदम सुटलेच.
ना त्या चित्रांच्या चौकटी होत्या ना तसबीरींच्या... ते आरसे होते... नक्षीदार चौकटींचे वर्तुळाकार, आयताकृती आरसे. जणू, बघणार्‍या प्रत्येकाने त्यात आपल्या स्वतःला बघायचे आणि स्वतःलाच विचारायचे, 'Mirror mirror on the wall, who's the fairest of them all?' जर आपल्याच आतून ऊत्तर आले 'You are, my dearest self' तरच आपण तिच्याशी बोलायला जायचे किंवा ती आपल्याशी बोलणार.
ह्यातला fairest चा अर्थ, सगळ्यात 'सुंदर किंवा गोरी' नसून 'प्रामाणिक किंवा न्याय्य' आहे हे समजायला मला चारपेक्षा जास्तं महिने लागले होते. मी who's the fairest of them all? पहिल्यांदा म्हणाले होते तेव्हा कधीही कोणाच्या शेर्‍यावर पापणी सुद्धा न हलवणार्‍या राप्सडीने चक्कं चमकून मागे वळून माझ्याकडे बघितले होते, हे सुद्धा मला स्पष्ट आठवले.
मला जणू एखाद्या चित्रमय कोड्याचे सगळे तुकडे बरोबर जागच्या जागी बसून त्यातून मिळालेल्या परवलीचा नेमका शब्दं वापरून गुहेचे बंद दार ऊघडण्याचा पहिला मंत्र मिळाल्यासारखेच वाटत होते. पण मिळालेले ते एक ऊत्तर आपल्या पोटी एक नवा प्रश्न जन्माला घेऊन आले,
'मौनाची भाषा गोंदणातून बोलण्यामागे राप्सडीच्या विचित्र वागण्याचे नेमके कारण काय असावे?'
आणि ह्या प्रश्नाचे ऊत्तर सापडल्याशिवाय मला आजिबात स्वस्थ बसवणार नव्हते. मी सध्या तरी राप्सडी आणि तिच्या गोंदणाबद्दल कोणापाशीच काही न बोलण्याचे ठरवले.

फिलॉसॉफी म्हणजे नक्की असते तरी काय? सोप्या भाषेत - मानवी ज्ञान, अस्तित्व आणि सत्यता ह्या तिघांची सांगड घालत 'मानवी आयुष्य' ह्या मोठ्या प्रश्नाच्या ऊत्तराचा तत्ववेत्त्यांनी मांडलेल्या प्रगल्भ विचारांच्या अभ्यासातून घेतलेला मागोवा. फिलॉसॉफीच्या अभ्यासाने मला - विचारमंथनांतून प्राप्त झालेल्या ज्ञानातून समाजमंथन करणारा मार्क्स दाखवला, फ्रेडरिक नीझ्चा सारखे, स्वतःलाच प्रश्नांच्या ऊल्कावर्षावाखाली ऊभे करत 'आपल्या अस्तित्वावर' खोलवर विचार करण्यास भाग पाडले आणि सॉक्रेटिससारखे न ऊकललेल्या प्रश्नांचा ऊत्सुकतेने ऊत्तर सापडेपर्यंत पाठलाग करण्यास शिकवले.
त्याच ऊत्सुकतेपोटी मी अनेकदा लेक्चर संपल्यावर राप्सडीचा त्या आडवाटेवर वाट बघत थांबलेल्या जॅग्वारपर्यंत लपतछपत पाठलाग केला. पण त्यादिवशी झाली तशी माझी आणि तिची नजरानजर पुन्हा कधी झाली नाही. राप्सडी राहते कुठे? हे मला नक्की माहित नव्हते पण आमच्या छोट्याश्या युनिवर्सिटी टाऊनच्या आसपास जॅग्वार बाळगू शकणार्‍या लोकांचे छोटेखानी अपस्केल नेबरहूड तसे एकच आहे ह्याची मला थोडी कल्पना होती. मी तिथूनच राप्सडीच्या घराचा शोध घ्यायला सुरूवात करण्याचे ठरवले. आडवाटेने पुढे जाऊन जॅग्वार कुठला रस्ता पकडते ह्याचा मला साधारण अंदाज होताच. बर्फाने आठवडाभर ओढ दिलेल्या एका रविवारी मी माझा हिवाळी सायकलिंग गीअर चढवून सायकल दामटत त्या अपस्केल नेबरहुडात फेरी मारायला निघाले. मला आतून खरे तर खूप विचित्र वाटत होते, ही कसली अजब ओढ? हेतूपुरस्सर पाठलाग करणे? आपण कुतूहल शमवण्यासाठी कोणाच्या तरी मागावर जात आहोत? माझेच मन मला खात होते. शेवटी 'हा शेवटचा प्रयत्न' म्हणत मी माझ्या मनाताला नैतिक-अनैतिकतेचा झगडा तूर्तास बाजूला ठेवला आणि सायकलला टांग मारली.

नेबरहुडातल्या एका टुमदार घराच्या ड्राईव-वे मध्ये पार्क केलेली ती निळी जॅग्वार शोधायला मला आजिबातच कष्ट पडले नाही. मागच्या काचेवर डाव्या कोपर्‍यात चिटकवलेले एका सोनेरी केसांच्या मॉडेलचे चंदेरी ड्रेसमधले चित्र मी झटकन ओळखले. युनिवर्सिटीजवळच्या आडवाटेवर ऊभी असतांना ते चित्र मी अनेकदा बघितले होते पण राप्सडी सोडून त्याबद्दल विचार करावा असे मला कधी वाटले नाही. ह्यावेळी मात्र घरासमोरून जातांना सावकाश पेडल मारत ते चित्र मी नीट निरखून पाहिले. चित्र बघून काहीतरी जुने, पुराणे पुसटसे आठवल्यासारखा भास होत राहिला. मला वाटले ते चित्र मी ह्याआधीही नक्कीच कुठेतरी बघितले होते, कुठल्यातरी मासिकात? कदाचित माझ्या लहानपणी? चित्राचा अजून विचार करू जाता मला माझी पुसटशी आठवण गडद होत चालल्याचेही ऊमगत होते, पण ही नेमकी कशाची आठवण आहे ते आजिबात लक्षात येत नव्हते. घरासमोरून दुसरी फेरी मारतांना मी मुद्दाम पाणी पिण्याच्या बहाण्याने ड्राईव-वे समोरच सायकल ऊभी करून गॉगल लावलेल्या डोळ्यांच्या कोपर्‍यातून ते टुमदार घर न्याहाळत होते. मला हे राप्सडीचेच घर आहे आणि ती ईथेच राहते असे खात्रीशीर माहित नव्हते पण ड्राईव-वे मध्ये ऊभी जॅग्वार नक्कीच तसे सुचवत होती. माझा मेंदू अजूनही काचेवरच्या चित्राच्या आठवणीत रंग भरण्यात गुंतला असतांनाच माझे लक्ष लिविंगरूमच्या मोठ्या खिडकीकडे गेले. खिडकीमागचा पडदा सरकवलेला होता आणि समोरच्या दर्शनी भिंतीचा एक मोठा तुकडा सहजच दिसत होता. भिंतीच्या त्या तुकड्यावर मला कोणाचे तरी एक मोठे पोट्रेट लावलेले दिसले. झटकन डोळ्यांवरचा गॉगल काढून ते पोट्रेट मी नीटच न्याहाळाले. जॅग्वारच्या काचेवर चिकटवलेल्या मॉडेलचेच लाईफ साईझ पोट्रेट होते. ते मोठे पोट्रेट नुसत्या डोळ्यांनी बघताक्षणीच मेंदूला अचानक साक्षात्कार होऊन जादूची कांडी फिरवल्यासारखे माझ्या आठवणीतल्या चित्रात सगळे रंग एकाच क्षणात भरल्या गेले. जणू गुहेचे बंद दार ऊघडण्याचा दुसरा मंत्रच मला मिळाला होता.
मी मोठ्या ऊत्साहाने झपाझप सायकल मारत माझ्या डॉर्मरूममध्ये आले आणि लगबगीनं टेबलावरचा लॅपटॉप खसकन पुढ्यात ओढून गूगल सर्च केले....... 'Mirror Woman + Superhero Comics'
दुसर्‍याच क्षणी एका कॉमिक्स बुकवरच्या चंदेरी कपड्यातल्या MIRЯOR WOMAN - 'मिरर वुमन' चे चित्र माझ्या स्क्रीनवर ऊमटले. तिचा चेहरा पाहून मी आश्चर्याचा धक्का बसल्यासारखी काहीच न सुचून कितीतरी वेळ वेड्यासारखी लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघत राहिले. हे कसे शक्य आहे? 'बोहेमियन राप्सडी मिरर वुमनची हुबेहुब कॉपी? तंतोतंत तोच चेहरा, तसेच लांब सोनेरी केस, सेम टू सेम अंगकाठी आणि अगदी तसेच पारदर्शक डोळे. मला विश्वासच बसेना, बावीशी-तेवीशीच्या राप्सडीची हुबेहुब छबी आठ वर्षे जुन्या कॉमिक बुकवर कशी असू शकते?'
डोक्यात पुन्हा राप्सडीबद्दलची सगळी माहिती, सगळ्या आठवणी फेर धरून नाचायला लागल्या. पण काही केल्या कुठलेच दुवे जुळेनात. पुढचे तीन तास मी 'मिरर वुमनच्या' कॉमिक बुकची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी पब्लिशरची वेबसाईट, सुपरहीरो विषयातल्या अभ्यासू लोकांचे ब्लॉग्ज, फॅन मंडळींचे आर्काईव्ज असा ईंटरनेटचा कोपरा न कोपरा धुंडाळून काढला पण मिरर वुमनच्या त्याच त्याच चित्रांशिवाय काहीही हाती लागले नाही. मेंदूवर बराच जोर टाकूनही मला साधे माझ्या लहानपणीच्या आठवणीतून मिरर वुमनची सुपरपावर काय होती साधे एवढे सुद्धा आठवत नव्हते. 'राप्सडी आणि आरशांचा असा काय जवळचा ऋणानुबंध आहे?' ह्याचा सतत विचार करून डोके भणाणून गेले होते.
शेवटी तो ताण असह्य होऊन मन रमवण्यासाठी मी पुन्हा माझी सायकल काढून डाऊनटाऊन मध्ये भटकायला निघाले. सिटी पार्कापर्यंत पोहोचलेच होते तोच माझी नजर 'ईथका पब्लिक लायब्ररी, १९२६' च्या भल्या मोठ्या, दगडी ईमारतीवर पडली. मी धावतपळतच तीन जिने चढून लायब्ररीतला 'यंग अ‍ॅडल्ट सेक्शन' गाठला. कॉमिक बुकचे एक आख्खे फडताळ धुंडाळल्यानंतर मला एकदाचे एका कोपर्‍यात पडलेले लाल निळ्या रंगातले एक बारकेसे कॉमिक बुक सापडले - Mirror Woman and The Mass Hypnotist. मी तिथेच फतकल मांडून आधाशासारखे ते वाचायला घेतले -

न्यूयॉर्कमध्ये आरसे बनवणार्‍या एका छोट्या फॅक्टरीमध्ये, गरीब बिचारी 'कॅथी स्प्रोल' दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सोडवण्यासाठी आणि आजारी आईच्या औषधांसाठी लागणारे पैसे जमवण्यासाठी दोन दोन शिफ्ट मध्ये काम करत असते. विनाकारण कॅथीचा दु:स्वास करणारी आणि तिला कायम पाण्यात पाहणारी एक पिवळ्या दातांची, लाल केसांची, जाडेली, खत्रूड अशी जर्मन फॅक्टरी वर्कर आणि तिचे टोळके कॅथीला त्रास देण्यासाठी कॅथीने मोठ्या मेहनतीने बनवलेला एक भला मोठा आरसा मुद्दाम धक्का देऊन पाडते. आरसा फुटल्याने चिडलेला फॅक्टरीचा मालक कॅथीला एकटीला रात्रीच्या तिसर्‍या शिफ्टमध्ये थांबून नवीन आरसा बनवण्याचे फर्मान सोडतो. नोकरीची नितांत गरज असलेली कॅथी निमुटपणे तिसर्‍या शिफ्टमध्ये एकटीने काम करण्यासाठी तयार होते. पण दिवसभर काम करून दमलेल्या कॅथीच्या हातून सिल्वर नायट्रेटची बादली भार न पेलवल्याने लवंडते आणि ती नखशिखांत सिल्वर नायट्रेटमध्ये न्हाऊन निघते. आरसा बनवून, झालेली सांडलवंड मोठ्या कष्टाने आवरून भल्या पहाटे घरी निघालेल्या कॅथीचा १४ व्या स्ट्रीटवरच्या अंधार्‍या गल्लीत, ड्रग्जच्या नशेत असलेला एक गुंड पाठलाग करतो. घाबरून पळणार्‍या कॅथीला गाठून शेवटी तिच्या समोरच तो गुंड हातात सुरा घेऊन ऊभा ठाकतो. कॅथीवर सुरा ऊगारून तो वार करणारच असतो, तेव्हा अभावितपणे भांबावून तो दोन पावलं मागे जातो आणि घाबरून आल्या पावली त्याच अंधार्‍या गल्लीत पळून जातो.
पळून जातांना कॅथीला त्याच्या डोळ्यातली भिती स्पष्ट दिसते. जिवंत वाचल्याच्या आनंदाबरोबरोबरच, 'आपल्याकडे असे भूत बघितल्यासारखे बघून हा गुंड का पळून गेला?' ह्याचे कॅथीला प्रचंड आश्चर्य वाटते. कुतुहलाने ती बाजूच्याच मेसी'ज दुकानाच्या काचेपलिकडे ठेवलेल्या भल्या मोठ्या आरश्यात स्वतःला बघते तेव्हा आरश्यात तिला तिचे स्वतःचे प्रतिबिंबच दिसत नाही. हा काय विचित्र प्रकार आहे ते न कळाल्याने कॅथी घरी जाऊन पुन्हा आरशात स्वतःला बघते तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब अगदी नेहमीसारखेच दिसते.
नंतर पुन्हा असे खूप घाबरवणारे दोन तीन प्रसंग घडून गेल्यानंतर कॅथीला, 'भितीमुळे आपल्या शरीरात झिरपलेले सिल्वर नायट्रेट सक्रिय होऊन आपले शरीर आरशासारखे चकचकीत होते आणि समोरच्याला त्याची स्वत:चीच चित्रविचित्र प्रतिमा त्यात दिसत राहते' असा साक्षात्कार होतो. मग कॅथी न्यूयॉर्कमधल्या एका छोटेखानी स्टुडिओत लोकांना मेडिटेशन आणि माईंड कंट्रोल शिकवणार्‍या योगी असीमानंदाच्या मदतीने, प्रचंड भिती, राग, अत्यानंद अश्या टोकाच्या भावना केवळ विचारातून मनात ऊत्पन्न करण्याची कला शिकून घेते आणि हवे तेव्हा स्वतःला आरश्यात बदलण्याची सुपरपावर आत्मसात करते.
एका रात्री कॅथीला एकटे गाठून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या फॅक्टरीमधल्या त्या जाड्या, जर्मन बाईला समोर प्रत्येकवेळी तिची स्वतःचीच खरीखुरी, चालतीबोलती प्रतिमा दिसत राहते. स्वतःवरचेच प्रेम तिला स्वतःच्याच प्रतिमेला ईजा करण्याची परवानगी देत नाही आणि कुठलीही हिंसा घडून न येता ती हतबल होते.
मग कॅथी आपले आरसे बनवण्याचे कसब वापरून हजारो लहान-मोठ्या, वेगवेगळ्या आकारांच्या, अनेक प्रतले असणार्‍या, दोन्ही बाजुंनी आत बाहेर दिसू शकणार्‍या आरशांच्या मण्यांपासून स्वतःसाठी एक कॉस्च्यूम बनवते. बघणार्‍याला तो साधा चकाकणारा चंदेरी स्पँडेक्स कॅटसूट वाटेल पण हजारो आरसे मोठ्या खुबीने एकत्र विणून कॅथीने बनवलेला तो 'मिरर वुमन' कॉस्च्युम. कुठल्याही कोनातून कॅथीकडे बघणार्‍याला त्याच्या स्वतःचेच प्रतिबिंब दाखवतो.
पुढे जाऊन ईतर कुठल्याही सुपरहीरो कॉमिक बुकमधल्या गोष्टीप्रमाणे कॅथी आणि योगी असीमानंद, रात्रीच्या कामाची शिफ्ट संपवून घरी जाणार्‍या एकट्या दुकट्या तरूणींना संमोहित करून, त्यांचे अपहरण करणार्‍या टॉर्चर चेंबर मध्ये डांबून ठेवणार्‍या हिप्नॉटिस्टच्या मागावर निघतात. डांबून ठेवलेल्या तरूणींना नुसत्या संमोहनातून भयानक शारिरिक वेदनादायक अनुभवातून जाण्यास भाग पाडणार्‍या 'मिस्टर बुल' नावाच्या हिप्नॉटिस्टशी कॅथी ऊर्फ मिरर वुमन लढा द्यायला त्याच्या टॉर्चर चेंबर मध्ये शिरते.
संमोहनाच्या अंमलाखाली वेदनेने विव्हळणार्‍या तरूणींना पाहून मिस्टर बुल असुरी आनंद मिळवत असतो आणि दिवसेंदिवस असा आनंद मिळवण्याची त्याची तहान वाढतच असते. सुरुवातीला संमोहनातून 'बोटाला सुरीने कापले आहे' असे भासवून बोट कापल्याच्या वेदनेने कण्हणार्‍या एका तरूणीला पाहून खूष होणार्‍या मिस्टर बुलच्या छळणुकीने पुढे 'तुम्हाला साप चावला आहे', 'तुम्ही बुडत आहात' अशी जिवाची भिती घालून अनेक तरूणींचे विव्हळणे तासनतास बघत राहण्यापर्यंत गेली होती. शेवटी प्रत्येक तरूणी बेशुद्ध पडत राही पण मिस्टर बुलची त्यांच्या वेदना बघून आनंद मिळवण्याची विकृती शमत नसे.
मिस्टर बुलच्या टॉर्चर चेंबर मध्ये शिरलेली मिरर-वुमन त्याला सगळ्या गरीब बिचार्‍या तरूणींना सोडून देऊन तिच्याशी सामना करण्याचे आव्हान देते. मिरर वुमनच्या आरशांमुळे पहिल्यांदा भांबावून मागे हटणारा मिस्टर बुल शेवटी चिडून त्याची संमोहन शक्ती मिरर वुमनवर वापरून तिला वेगवेगळ्या वेदनांनी टॉर्चर करायचा प्रयत्न करतो. पण प्रत्येकवेळी आरशात दिसणार्‍या त्याच्या स्वतःच्या प्रतिमेमुळे ती शक्ती त्याच्यावरच ऊलटून तो स्वतःच त्या वेदनांनी हैराण होत राहतो आणि शेवटी मिरर वुमन समोर आपली हार कबूल करतो.
एका मोठ्या दुष्ट शक्तीशी कुठलीही मारधाड, रक्तपात न करता केवळ आरसे आणि मनःशक्ती वापरून अहिंसात्मक लढा देणारी कॅथी सगळ्या न्यूयॉर्क वासियांसाठी सुपरहीरो 'मिरर वुमन' होते.

कुठलीही हिंसा, पाठलाग, ईमारतींची पडझड आणि अफलातून मारधाडीचे प्रसंग नसलेले ते कॉमिक बुक पुढचा भाग काढण्याएवढे कुठल्याही वयोगटातल्या वाचकांच्या पचनी पडले नसणारच ह्याची मला खात्री होती. मी माझ्या लहानपणी पहिल्यांदा ते वाचले तेव्हाही मला ते फारच कंटाळवाणे वाटले होते. चंदेरी कॉस्च्युम मधल्या मिरर वुमनची पुसटशी आठवण सोडून बाकी सगळे नाट्य चटकन विस्मृतीत सुद्धा गेले. प्रत्येक सुपरहीरो कॉमिक बुक एका साध्या सोप्या फिलॉसॉफीकल विचाराच्या बैठकीवरच बेतलेले असते, हे मला पक्के ठाऊक होते. मिरर वुमन कॉमिक सिरिज कदाचित व्यावसायिकदृष्ट्या फार यशस्वी झाली नसावी, पण आज मला त्यातली फिलॉसॉफी ईतर कुठल्याही सुपहीरोच्या फिलॉसॉफीपेक्षा प्रचंड भावली होती. वयात येणार्‍या मुलांना हिंसेच्या ऊदात्तीकरणापासून लांब ठेवणारा, आरश्याच्या प्रतिकातून, वाईट वागणार्‍या प्रवृत्तीला आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडणारा संदेश लेखकाने किती खोलवर विचार करून दिला असावा ऊमगून मला लेखकाच्या वैचारिक प्रगल्भतेबद्द्ल प्रचंड आदर वाटला.

सहज कुतूहल म्हणून मी कॉमिक बुकच्या मागच्या कवरवर लेखकाचे नाव पहावे म्हणून ते पलटले....., 'मिस. कॅथी स्पीगल'

नाव वाचून मला खरं तर धक्का वगैरे बसायला हवा होता पण तो बसण्याआधीच एक मोठा सुस्कारा सोडत मी कितीतरी वेळ शांत बसून राहिले. ज्या वयात मी ते कॉमिक बुक पहिल्यांदा वाचले त्यावेळी मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हतीकी ते एका माझ्याच वयाच्या मुलीने लिहिलेले आहे, जिला भविष्यात मी प्रत्यक्ष भेटणार आहे. राप्सडीविषयी मला पडलेल्या दुसर्‍या प्रश्नाचे ऊत्तर 'राप्सडीने असे वागण्याचे नेमके कारण काय असावे?' बहूतेक मला सापडले होते.
आईने ज्यावेळी हे पुस्तक माझ्या हातात दिले त्यावेळी मी हायस्कूलमध्ये एका विचित्र आणि अतिशय त्रासदायक परिस्थितीतून जात होते -Bullying - छळवणूक!.
'कोणी विनाकारण आपला तिरस्कार करते आहे आणि आपल्या छळवणुकीतून आनंद शोधू पहाते आहे' ह्या विचारांनी त्यावेळी बराच काळ सैरभैर झाल्याचेही मला आठवत होते. ज्यांना मित्र म्हणावे अशा आपल्याच आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींनी आपल्याला गुलामांसारखी तुच्छतेची वागणूक द्यावी, आपली हेटाळणी करावी ही भावना मनाला किती डागण्या देणारी असते हे मी अनुभवले होते. आपल्यासारख्याच मुलांच्या ग्रूपमध्ये आपल्याला थारा नाही, आपले अस्तित्व नाकारले जात आहे हा विचार मन आणि मेंदू असे काही पोखरून काढतो की आपण आपले अस्तित्व हरवून बसतो. छळवणुकीतून मिस्टर बुल सारखा असूरी आनंद मिळवण्यासाठी आपलेच समवयस्क किती टोकाला जाऊ शकतात हेदेखील मी स्वतः अनुभवले होते.

मला वाटते, राप्सडीने सुद्धा हायस्कूलमध्ये असतांना हे सगळे सहन केले असणार. तिच्या वेगळेपणामुळे ईतर मुला-मुलींकडून तिची नक्कीच छळवणूक झाली असावी. नकळत्या वयात तिरस्कार, अपमानाच्या नकारात्मक भावनांनी पोळलेली राप्सडी आता कळत्या वयातसुद्धा अजूनही जुन्या त्रासदायक आठवणीत होरपळत असावी. आयुष्याच्या सर्वात नाजूक, असुरक्षित टप्प्यावर मिळालेल्या कटू अनुभवांमुळे आपल्या क्लासमेट्सशी ती आजही जुळवून घेऊ शकत नाही. लहानपणी जिथे मैत्रीचे नाते फुलायला हवे होते तिथे हेटाळणी, दुस्वास, खिल्ली, अपमान, अवहेलना वाट्याला आल्याने कदाचित पुन्हा मैत्र जमवण्यासाठी, मित्रांवर विश्वास टाकण्यासाठी लागणार्‍या निरागस भावना ती कायमच्या हरवून बसली असावी किंवा स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी, फुलवण्यासाठी आता तिला कुठल्याही मैत्र-भावनेच्या आधाराची मानसिक गरज ऊरली नसावी. पण म्हणून तिच्या मनातल्या त्या निरागस भावना कायमच्या मेल्याच असे खचितच नसावे. त्या ऊस्फूर्त भावनांना वाट करून देण्यासाठीच जसे तिने मिरर वुमनला जन्माला घातले, तसेच अंगावर आरसे देखील गोंदवून घेतले. छळवणूक असह्य झाल्याने कधीतरी मौनाच्या कोषात गेलेल्या राप्सडीने व्यक्त होण्यासाठीच जसा कॉमिक बुकचा आधार घेतला असावा तसाच गोंदणाचा सुद्धा.

राप्सडीबद्दल, तिच्या भावनाविष्काराबद्दल, तिच्या बुद्धीमत्तेबद्दल, आपले वेगळेपण जाणण्याच्या आणि जपण्याच्या तिच्या प्रयत्नाबद्दल माझ्या मनात एकाचवेळी प्रचंड प्रेम, आदर आणि अभिमानाची भावना दाटून आली.
ऊद्या जेव्हा राप्सडी क्लासरूममध्ये येईल तेव्हा सगळ्यांसमोर तिला -
Mirror Mirror by the wall, I am the fairest of them all!...... Would you like to be my friend, Mirror Woman?
असे विचारायचे ठरवून मी शांतपणे माझी सायकल घेऊन डॉर्मकडे चालू लागले.

-- समाप्त

बीटल्स आणि 'हरे कृष्णा हरे राम' च्या आठवणी जिवंत असल्यास बोहेमियन हिप्पी मुली कशा राहतात ह्याचा अंदाज लावणे अवघड वाटू नये.
पण अशा मुलींना आजिबातच पाहिले नसल्यास 'हरे गूगल हरे बिंग' करून बघा Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! सुंदर लिहीलेय अगदी. सुरवातीच्या ऋतुंचे वर्णन तर निव्वळ अप्रतिमच!

जिकडे पहावे तिकडे पांढर्‍या बर्फावर ऊबदार, काळ्या रंगांच्या लोकरीच्या गुंडाळ्या अचानक पाय फुटून ईकडेतिकडे फिरू लागल्यासारखे वाटू लागले. >>भारी. चित्रकारही मस्तच!

मस्तच लिहिलय हायझेनबर्ग..
आज योगायोहाने एका बोहेमियन आर्टिस्टने इन्स्टावर फॉलो रिक्वेस्ट पाठवली तेव्हा तिचे प्रोफाईल बघीतले अन इकडे आली तर त्याच सही सही वर्णन वाचायला मिळालं.. छानच..

Is this the real life?
Is this just fantasy?
हाच प्रश्न पडला! वाचून उत्तर मिळाले Happy
नेहमीप्रमाणे हटके आयडिया आणि भारी स्टोरीटेलिंग.

Is this the real life? Is this just fantasy? >>> Well, isn't the real life full of fantasies? It's just that few fantasies are more real than others. Proud
पण हो! सगळी कथा आणि पात्र फिक्शनलच आहेत.. including Mirror Woman fantasy, a figment of my imagination जी कथावस्तु आहे पात्र नाही.

_/\_

वा !

छान लिहिलंय.
सुरुवातीचे ऋतूंचे मिंग्लिश वर्णन कंटाळवाणे झाले. पण पुढे नेटाने वाचले. अप्रतिम कथा आहे.

कथा म्हणुन छान आहे. व्यक्तिचित्रण म्हणवत नाहीये. (व्यक्तिचित्रण स्पर्धेत स्वतः लिहिणार्याने संपर्कात, सहवासात आलेल्या, असलेल्या खर्‍या व्यक्तींबद्दल लिहायचं आहे ना? नियम काय आहेत?)
पहिले दोन उतारे कंटाळ्वाणे आहेत. जड्बंबाळ आहेत.
सगळी कथाच जरा जड वाटतेय.

व्यक्तिचित्रण स्पर्धेत स्वतः लिहिणार्याने संपर्कात, सहवासात आलेल्या, असलेल्या खर्‍या व्यक्तींबद्दल लिहायचं आहे ना?>> ज्या व्यक्तीबद्दल लिहिले आहे ती खरी आणि संपर्कात आलेली असावी असे काही बंधन नसते.... नसावे.
नाही तर पु लं, नंदा प्रधान आणि इंदू वेलणकर बरोबर मोरेटॉर मध्ये डिनर ला गेले होते हे आपल्याला मोरेटॉरचे cctv फुटेज बघुन तपासावे लागेल. Proud

अर्थात हे माझे मत. संयोजकांनी स्पर्धेच्या वर्णनात अशा काही अटी घातलेल्या नाहीत. बघूया त्यांचे काय म्हणणे आहे ह्या बाबतीत.

आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांना अनेक धन्यवाद.

मी फक्त माबोवरच्या स्पर्धेच्या नियमांबद्दल बोलत होते. पु लं कशाला मधे.
नसेलही अशी काही अट. मी ही मला असं वाटतंय असंच लिहिलंय.

व्यक्तीचित्रणांतली व्यक्ती खरी आणि संपर्कातलीच हवी/नाही असा नियम असतो की नाही कल्पना नाही पण जर असेल तर ते व्यक्तीचित्रण जास्त अपील होतं.
हाब, तुझ्या व्यक्तीचित्रणातली व्यक्ती तशी नसल्यामुळे मला पर्सनली भावलं नाही. बाकी सस्मितशी सहमत. एक गोष्ट म्हणून ठीकच आहे.

व्यक्तीचित्रणातील व्यक्ती खरी की काल्पनिक असा काही नियम नक्कीच नाही.
पण ‘ती जर खरी असेल तर व्यक्तीचित्रण अपील होतं’ या सायो यांच्या मताशी सहमत.

मी फक्त माबोवरच्या स्पर्धेच्या नियमांबद्दल बोलत होते. पु लं कशाला मधे. >> ऑं Uhoh
सस्मित माफ करा पण, तुम्ही माबोवरच्या २०१८ गणेशोत्सोवाच्या व्यक्तिचित्रण स्पर्धेचा मसुदा वाचला आहे का? वाचला असतात तर हे म्हणाला नसता.
संयोजकच पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या व्यक्तिचित्रणाचा हवाला देऊन व्यक्तिचित्रण लिहा सांगत आहेत ना? मग 'पुलं कशाला मध्ये' हे कसे?

खर्‍या व्यक्तींबद्दल लिहायचं आहे ना? नियम काय आहेत? >> ह्यावरून मला तुम्हाला नियम (हो हो माबो स्पर्धेचेच) जाणून घेण्याची ईच्छा असेल असे वाटल्याने मी आधीची पोस्ट लिहिल्री.

मी ही मला असं वाटतंय असंच लिहिलंय.>>तुम्हाला व्यक्तिचित्रण म्हणून नाही आवड्ले.. जड वाटले ह्या तुमच्या मताचा खरोखर खूप आदर आहे, आणि प्रतिक्रियेचे स्वागतच आहे. विश्वास ठेवा माझी पोस्ट तुमच्या व्यक्तिचित्रणाबद्दलच्या मताबद्दल नव्हती तर फक्त तुमच्या नियमांबद्दलच्या प्रश्नांबद्दल होती.

असो.

मस्त लिहिलं आहे.. मला आवडलं व्यक्तीचित्रण..

मिरर वुमनची कन्सेप्ट भारी आहे... मार्व्हल किंवा डीसी कडे काम करायला सुरु कर तू ह्या नवीन सुपरहिरोला घेऊन..

प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद सायो.
वैयक्तिकरित्या न आवडण्याबद्दल किंवा अपील न होण्याबद्दल, तसे प्रामाणिकपणे सांगितल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांच्याच प्रतिक्रियेबद्दल अतिशय आदर आहे.

कदाचित माझ्या लिखाणाच्या/शैलीच्या कमतरतेमुळे तुम्हाला ही पात्रे विश्वसनीय वाटली नसतील हे नक्कीच शक्य आहे. बहुतेक माझे लेखन कुठेतरी कमी पडते आहे हे सुद्धा तुमच्या प्रतिक्रियांमुळे कळते आहे जे कळणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
त्यामुळे 'आवडले नाही/अपील झाले नाही/ कळाले नाही' अश्या प्रतिक्रियांही मला तेवढ्याच प्रिय आहेत जेवढ्या दुसर्‍या बाजुच्या आणि सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या तर आवडेल आणि आनंदच होईल.

कृपया गैरसमज नसावा.

हे खालचे फक्त 'व्यक्तिचित्रण' ह्या जनरल लेखनप्रकरासंबंधी.

व्यक्तीचित्रणांतली व्यक्ती खरी आणि संपर्कातलीच हवी/नाही असा नियम असतो की नाही कल्पना नाही पण जर असेल तर ते व्यक्तीचित्रण जास्त अपील होतं. >> 'व्यक्ती खरी' हे सापेक्ष आहे ना? कॅथरेफ्टिस स्पीगल सारख्या, अंगावर टॅटूज असणार्‍या, कायम विचित्र वेषभुषा करणार्‍या, किंवा अशा मुलीचे चित्रण करणार्‍या, बुलिंग विक्टिम्स असणार्या, किंवा सुपरहीरो कॉमिक्स लिहिणार्‍या मुली खर्‍या नसतात असे म्हणायचे आहे का?

पण आपल्या नेहमीच्या विश्वाबाहेर पण आपल्या परिघात न येणार्‍या लोकांचे विश्व असतेच ना?

मी ऊद्या Bronx च्या सबर्ब मधल्या घेटो मध्ये राहणार्‍या ड्र्ग पेडलरच्या अब्यूज्ड आणि मानसिक ताणतणावाने मनःस्वास्थ्य हरवून बसलेल्या प्रेयसीचे व्यक्तिचित्रण लिहिले ... किती लोक त्याच्याशी कनेक्ट करू शकतील? आपण कनेक्ट न करू शकल्याने त्या व्यक्ती खोट्या तर होत नाही. पुन्हा व्यक्तिचित्रणातले व्यक्तिविशेष एकाच व्यक्तीत असावे असेही काही नाही.
कॅथरेफ्टिस स्पीगल सारख्या, अंगावर टॅटूज असणार्‍या, कायम विचित्र वेषभुषा करणार्‍या, किंवा अशा मुलीचे चित्रण करणार्‍या, बुलिंग विक्टिम्स असणार्या, किंवा सुपरहीरो कॉमिक्स लिहिणार्‍या मुली अशा वेगवेगळ्या व्यक्ती असू शकतात.. त्यांचे व्यक्तीविशेष घेऊन एक फिक्शनल व्य्क्ती ऊभी करून तिचे चित्रण करण्यास व्यक्तिचित्रण का म्हणू नये?

>>पण आपल्या नेहमीच्या विश्वाबाहेर पण आपल्या परिघात न येणार्‍या लोकांचे विश्व असतेच ना?
मी ऊद्या Bronx च्या सबर्ब मधल्या घेटो मध्ये राहणार्‍या ड्र्ग पेडलरच्या अब्यूज्ड आणि मानसिक ताणतणावाने मनःस्वास्थ्य हरवून बसलेल्या प्रेयसीचे व्यक्तिचित्रण लिहिले ... किती लोक त्याच्याशी कनेक्ट करू शकतील? >> आपल्या परिघाबाहेरच्या लोकांचंही विश्व असतंच ना. आता तू भविष्यात समजा एखादा न्यूयॉर्कात रहाणार्‍या होमलेस माणसाच्या किंवा ब्राँक्समध्ये रहाणार्या ड्रग पेडलरच्या प्रेयसीच्या सहवासात आल्यावर त्यांचं व्यक्तीचित्रण लिहिलंस तर ते वाचायला नक्कीच आवडेल. कारण त्यांच्या आयुष्याचा, स्ट्रगलचा अंदाज येईल आणि अपील (इंटरेस्टींग) होईल. कनेक्शनबद्दल मी काही बोललेले नाही.
तुझं हे लिखाण एक फिक्शनल गोष्ट म्हणून ठिकच पण व्यक्तीचित्रण म्हणून भावलं नाही असा पहिल्या प्रतिसादाचा अर्थ होता.

पुन्हा एकवार वाचली. ही कथा / व्यक्तिचित्रण अनेक उंच- खोल पातळ्यांवर घडते असे वाटतेय. I kill giants चित्रपटाची आठवण करून दिली या लिखाणाने.

सहवासात आल्यावर त्यांचं व्यक्तीचित्रण लिहिलंस तर ते वाचायला नक्कीच आवडेल. >> कळाले नाही. पुन्हा तुम्ही व्यक्तिचित्रण लिहिण्यासाठी सहवासात येण्याचा म्हणजे चित्रणातील व्यक्ती खरी असण्याचाच मुद्दा अधोरेखीत करत आहात.
कारण त्यांच्या आयुष्याचा, स्ट्रगलचा अंदाज येईल आणि अपील (इंटरेस्टींग) होईल. >> कोणाला? ईथे वाचकाला असे गृहीत धरतो.
मी केलेल्या व्यक्तिचित्रणात आलेल्या आणि वर ऊल्लेख केलेल्या वेगवेगळ्या व्यक्तिविशेषांच्या व्यक्ति जशा मी बघितल्या आहेत तशाच तुम्हीही बघितल्या असतीलच. ते काही एकदम दुर्मिळ व्यक्तिविशेष नाहीत. त्यातले काय नेमके तुम्हाला खरे वाटले नाही? बुलिंग विक्टिम्सचे स्ट्रगल खरे नसते का?
कनेक्शनबद्दल मी काही बोललेले नाही.>> वाचकाला व्यक्तिचित्रण/पात्र अपील होण्यासाठी त्यात रंगवलेल्या पात्राशी, त्याच्या विचारांशी, परिस्थितीशी, स्ट्रगलशी कनेक्ट होता येणे/समजून घेता येणे जरूरी आहे असे मला आपले ऊगीच वाटते. तसे न होण्याच्या दोन शक्यता.
एक तर लेखक लिखाणात कमी पडला किंवा वाचकाला त्याच्या भावविश्वापलिकडे पात्रांच्या भावविश्वाशी स्वतःला जोडता आले नाही.
तिसरी शक्यता असेल तर समजून घ्यायला आवडेल.

व्यक्तिचित्रणाबाबत एक दर्दी वाचक म्हणून तुमच्या काय अपेक्षा असतात, तेही जमल्यास समजून घ्यायला आवडेल.?

पुन्हा ही जनरल माहिती/चर्चा आहे .. तुमच्या मतांबद्दल आक्षेप नाही.

मला असं वाटतंय की कॅथीपेक्षा निवेदक (निवेदिका) कल्पित असल्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.
- हे जनरल निरीक्षण/मत आहे. कोणाच्याही कुठल्याही लेखनावर वा मतप्रदर्शनावर जजमेन्ट नाही.

मला व्यक्तिशः हे वाचायला थोडं कंटाळवाणं झालं, आणि आरसा आत्मपरीक्षणाचं प्रतीक म्हणून वापरण्याची कल्पना छान असली तरी त्यात काही नाविन्य नाही.

Pages