व्यक्तिचित्रण स्पर्धा - हायझेनबर्ग - 'बोहेमियन राप्सडी'

Submitted by हायझेनबर्ग - एक... on 15 September, 2018 - 20:57

'ती आली, त्यांनी पाहिलं आणि ते हसले' फॉल सेमिस्टरपासून सुरू झालेल्या आमच्या फिलॉसॉफी क्लासचं हे एका वाक्यातलं वर्णन!

एव्हाना रंगीबेरंगी फॉल सीझन संपून पांढर्‍याफटक हिवाळ्याने माझ्या शहराला - इथकाला आणि आमच्या युनिवर्सिटीला कह्यात घेतले होते. जणू शरदाचे सप्तरंग शिशिराने अलगद आपल्या पांढर्‍या बर्फात गोठून ठेवावेत आणि मग मन भरले की ते वसंताच्या हवाली करून निघून जावे. मला नेहमी वाटे....आमच्या ईथकातला शरद ऋतू म्हणजे अगदी एखाद्या मुरलेल्या चित्रकारासाराखा... सुबक आकारांमध्ये मोजून मापून रंग भरणारा....आणि रंगांच्या छटा एवढ्या अगणित की बस्स! रंगांची ती ऊधळण पहातच रहावी.....शिशिर मात्र एखाद्या विक्षिप्त म्हातार्‍या चित्रकारासारखा....कॅनव्हासवर सफेद रंगाचा वॉश चढवायचा आणि रंग भरायची वेळ आली की ब्रँडीचा ग्लास घेऊन फायरप्लेसच्या बाजूला आरामखुर्चीवर पूर्ण दिवस डुलक्या काढत बसायचे....आणि वसंत.....तो एखाद्या तरूण, नवख्या चित्रकारासारखा.... चित्र रंगवणे राहिले बाजूलाच पण वेंधळेपणाने सगळे रंगच कॅनव्हासवर ईथे तिथे सांडून ठेवायचे. काहीका असेना, तिघेही चित्रकार मला अतिशय प्रिय होते.....आणि त्यांच्या एवढेच प्रिय होते माझे छोटेसे शहर - ईथका. मला जर कोणी ईथका बद्दल माझ्या भावना लिहायला सांगितल्या असत्या तर मी, होमरने ओडीसी मध्ये आपल्या मातृभूमीच्या - ईथकाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या ओडिसियसच्या भावना रंगवतांना जितके खंड लिहिले त्यापेक्षा कांकणभर जास्तच लिहिले असते.

शिशिराच्या विक्षिप्त म्हातार्‍याने ईथकावर बर्फाचा व्हाईटवॉश दिल्यानंतर जसा ईथकाने वॉर्डरोब बदलला तसा आमच्या क्लासने देखील. फॉलच्या महिन्यांपर्यंत रंगीबेरेंगी दिसणारा माझा पूर्ण क्लास अचानक रंग ऊडून काळ्या, करड्या रंगाच्या लोकरीच्या गुंडाळ्यांमधे गुरफटून बसल्यासारखा दिसू लागला. जिकडे पहावे तिकडे पांढर्‍या बर्फावर ऊबदार, काळ्या रंगांच्या लोकरीच्या गुंडाळ्या अचानक पाय फुटून ईकडेतिकडे फिरू लागल्यासारखे वाटू लागले. सर्वदूर पसरलेल्या बर्फाच्या थरांवर फुलणार्‍या रंगीबेरेंगी एस्कोबारियाच्या फुलांसारखी 'ती' सुद्धा त्या लोकरीच्या गुंडाळ्यांमधे कायम ऊठून दिसे. पण तेवढेच, एस्कोबारियाच्या वेगवेगळ्या रंगाच्या, विचित्र आकाराच्या नि रूढार्थाने ज्याला सुवास म्हणता येणार नाही अश्या विलक्षण वासाच्या फुलांसारखीच 'ती' सुद्धा....वेगळी, विचित्र आणि विलक्षण. 'ती' क्लासरूममध्ये आली की एक वाह्यात खसखस पिकलीच म्हणून समजा.... किंवा फिलॉसॉफीसारख्या घनगंभीर विषयाच्या वातावरणात कोणीतरी मजेशीर पण हिणकस शेरा मारला की समजावे 'ती' आली. खरं तर ती माझ्यासारखीच फिलॉसॉफीची ग्रॅज्युएट स्टुडंट आहे आणि माझ्या नावासारखेच तिला एक नाव सुद्धा आहे पण ह्यातला एकही तपशील महत्वाचा नाही. तिची ओळख पटण्यासाठी ह्यापैकी कुठल्याच माहितीची गरज नाही आणि ही माहिती तिच्याविषयी मत बनवायला ऊपयोगी तर त्याहूनही नाही. क्लासमधल्या सगळ्यांसाठी ती फक्त आहे, A peculiar case of Miss Kathereftis Spiegel a.k.a. Bohemian Rhapsody.

मी पहिल्यांदा 'कॅथरेफ्टिस स्पीगल' नाव ऐकले तेव्हा मला वाटले हे कसले विचित्र नाव? नाव ऐकता क्षणीच माझ्या डोळ्यांसमोर स्नोव्हाईटच्या गोष्टीतल्या तिच्या क्रूर,कुटिल, कारस्थानी सावत्र आईचा चेहरा आला. पहिले नाव ग्रीक आणि दुसरे जर्मन पण दोन्हींचा अर्थ एकच Mirror - आरसा. म्हणून तर 'Mirror mirror on the wall.....चटकन आठवले आणि पटकन तोंडातून 'who's the fairest of them all?' निघून गेले सुद्धा. ते ऐकून 'बोहेमियन राप्सडी' एकदम चमकलीच असावी कारण तिने कधी नव्हे ते मागे वळून माझ्याकडे बघितले, पण तेवढेच. त्यानंतर पुढचे अनेक महिने पुन्हा कधीही तिने मान मागे वळवली नाही, माझ्यासाठीही नाही की अजून कोणासाठीही नाही. मग कोणी कितीही हिणकस बोलले किंवा खिल्ली ऊडवली तरीही नाहीच. ह्याचा अर्थ बोहेमियन राप्सडी कुटिल, खत्रूड आहे असा नाही. ती जर काही असलीच तर ती आहे फ्रेडी मर्क्यूरीच्या बोहेमियन राप्सडी सारखीच....गूढ, रहस्यमय आणि अनाकलनीय.

कडाक्याच्या हिवाळ्यातही बिल्कूल न बदलणार्‍या तिच्या हिप्पी कपड्यांकडे बघून मला वाटे,
अरे देवा हिला थंडी कशी वाजत नाही? ही माणूस आहे की एल्फ?
तांबूस-सोनेरी केसांच्या दोन लांब मोकळ्या वेण्या, डोळ्यांना खोलवर लावलेले लायनर, डोक्यावर गोल हेडबँड, बोटभर लांब कानातले आणि गुडघ्यापर्यंत लांबीचे फुलाफुलांचे मिडी ड्रेस? ही नेहमीच बोहेमियातल्या हिप्पींसारखे कपडे का घालते?
आणि हे कसले अंगाखांद्यांवर एकसारखे टॅटूज?
दरवेळी बोहेमियन राप्सडीचा विचित्रपणा म्हणा की वेगळेपणा माझ्या मनात शंभर विचार जन्माला घालून जाई.

कायम बोहेमियातल्या हिप्पींसारखा अवतार आणि अंगावरच्या गोंदणातून राप्सडी कवितेत असते तसे मनातल्या भावनांचे ऊस्फूर्त प्रदर्शन. भावनांचे ऊस्फूर्त प्रदर्शन म्हणजे बोलणे, गाणे, संगीत, नाच.... थोडक्यात काहीतरी आवाजाचे प्रकरण असावे ना?....चूक! क्लासमध्ये आजवर कोणीही बोहेमियन राप्सडीच्या तोंडून निघालेला एक शब्दही ऐकलेला नाही. क्लासमध्ये अनेकांना खात्री आहे तिला बोलताच येत नाही. पण मला वाटते तिला नक्कीच बोलता येते परंतू तिला कोणाशीच बोलायची ईच्छा नाहीये. जरा बारकाईने लायनरच्या मागचे तिचे डोळे न्याहाळल्यास ईतर कोणाच्याही डोळ्यांपेक्षा ते मला जास्त बोलके वाटतात, फक्त त्यांची भाषा माझ्यासाठी अगम्य होती.... अजूनतरी.

राप्सडी कितीही वेगळी, विचित्र असली तरी तिच्या त्या हिप्पी अवतारामागचे आणि त्या बंद ओठांमागचे सौंदर्य काय वर्णू...तिला बघतांना, जणू सौंदर्याची ग्रीक देवता 'अ‍ॅफ्रोडाईट' किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधली 'लेडी गलाड्रिअल' पुढ्यात अवतरल्याचा भास मला सारखा होत राही. माझ्यासारख्या तरूणीलाही तिच्या सौंदर्याची भूरळ पडावी, हेवा वाटावा तर तिथे तरूणांची काय कथा? बरोबर? पुन्हा चूक! एकही तरूण राप्सडीच्या आसपास फिरकेल तर शपथ. सगळे चित्रविचित्र चेहरे करून तिच्या विचित्रपणावर हिणकस शेरे मारत राहतील नाहीतर मुद्दाम तिची वाट अडवून फिदीफिदी हसत बसतील. पण त्यांनी कितीही शेरे मारले तरी बोहेमियन राप्सडीच्या चेहर्‍यावर एकही वैतागाची रेष ऊमटणार नाही. जणू एखाद्या अदृष्य धाग्याने शिवलेल्या ओठांसारखेच तिचे कानही कोणीतरी शिसे ओतून बंद केलेले असावेत. विद्यार्थीच नाही पण आमच्या फिलॉसॉफीचे वयस्कर प्रोफेसरसुद्धा तिला क्लासमध्ये घडवून आणलेल्या चर्चांदरम्यान काहीही विचारण्याच्या फंदात पडत नसत.

बोहेमियन राप्सडी जेवढी विचित्र होती तेवढीच गूढ, चमत्कारिक आणि अनाकलनीय. म्हणूनच आम्हा सगळ्यांनाच तिच्याबद्दल एवढे प्रचंड कुतूहल वाटे की तिच्याविषयी कळणार्‍या माहितीचा एकनएक कण आपल्याला ऐकू यावा म्हणून आम्ही जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत राहू. पण नुसत्या अफवांशिवाय हातात काही पडत नसे. ती जशी आहे तशी ती का आहे? ह्याबद्दल प्रत्येकाची एक वेगळी थिअरी होती.. फिलॉसॉफीचे विद्यार्थी अर्धमुर्धे सायकॉलॉजिस्ट सुद्धा असतातच. कोणी म्हणे ती एका अब्जाधीशाची अतिगर्विष्ठ मुलगी आहे तर कोणी म्हणे तिला सोशल अँग्झायटी डिसऑर्डर आहे. कोणी म्हणे तिचा बुद्ध्यांक अतिशय कमी आहे तर कोणी म्हणे ती कायम ड्रग्ज घेते. ती ब्लॅक मॅजिक करते असे म्हणण्यापर्यंतही एक दोघींची मजल गेली होती. पण माझ्या मते राप्सडी ह्यापैकी कोणीही नव्हती. मला वाटे असे नुसते पोकळ अंदाजांचे ईमले बांधून तिच्या अगम्य व्यक्तीमत्वाच्या खोल डोहाचा तळ आपल्याला गाठता येणे शक्यच नाही. ती कोण आहे आणि काय आहे? हे समजून घ्यायचे असेल तर सर्वात आधी तिच्या अंगावरच्या टॅटूज चा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. ती एका शब्दानेही बोलत नसली तरी मनातल्या भावना बाहेरच्या जगाला न सांगता सुद्धा समजण्यासाठी तिने त्या कोरूनच ठेवल्या आहेत असे मला नेहमी वाटे. माझ्या मते त्या गोंदणाचा रहस्यभेद करणे हीच एकमेव किल्ली आहे तिच्या गूढ व्यक्तीमत्वाचे कोडे ऊलगडण्याची.

पण बोहेमियन राप्सडीसारखेच तिचे गोंदणही तितकेच गूढ आणि अनाकलनीय? एक काही धागादोरा मिळेल तर शपथ. मानेवर एक ऊभी आयताकृती, दोन्ही दंडांवर वर्तुळाकार आणि दोन्ही पोटर्‍यांवर लंबवर्तुळाकार आकाराच्या नुसत्याच डिझायनर चौकटी. विक्टोरियन काळातल्या चित्रांना किंवा तसबिरींना असतात ना अगदी तश्याच....पण साफ रिकाम्या. चौकटींच्या आत ना कसले चित्र ना कोणाची तसबीर. तिच्या सुंदर चेहर्‍यासारख्याच तिच्या गोंदणातल्या चौकटीही जिवंतपणाच्या कुठल्याही खुणांच्या अभावी नक्षीदार पण ऊदास वाटत. मला अनेकदा डोकं फुटेस्तोवर विचार करूनही त्या रिकाम्या चौकटींचा अर्थ काय असावा ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना येत नव्हती. कधी कधी मला माझीच लाज वाटे, मी तिच्याबद्दल एवढा विचार का करते? तिच्या बद्दल मला वाटणारे कुतूहल शमवण्याचे माझे प्रयत्न सौजन्याच्या कक्षा सोडून अट्टहासाकडे तर झुकत नाहीत ना? कधीमधी मागच्या बाकावरून तिला एकटक न्याहाळतांना तिने अचानक डोळ्यांच्या कोपरातून मला बघितले की काय असे वाटून अंगावर काटाही येत असे. पण एवढे सगळे असूनही तिच्याबद्दलचे प्रचंड कुतूहल मला काही केल्या स्वस्थ बसू देत नसे.

जसजसे दिवस जात होते तसे आजूबाजूला बोहेमियन राप्सडी असण्याची जणू सवयच होऊन गेली होती. एखादे दिवस ती दिसली नाही तर
तो पूर्ण दिवसभर चुकल्या चुकल्यासारखं वाटत राही. अजूनही कॉरिडोर मध्ये हीनकस शेरे नेमाने ऐकू येतच होते आणि क्लासरूममध्येही वरचेवर हशा पिकतच होता. पण ना राप्सडीच्या कपड्यांची हिप्पी स्टाईल बदलली ना कधी तिने तोंडातून एक ब्र सुद्धा काढला.

एकदा मात्र मी लेक्चरला ऊशीर होईल ह्या भितीने भराभर पेडल मारत नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्याने माझी सायकल दामटत असतांना युनिवर्सिटीच्या फारश्या वापरात नसलेल्या एका आडवाटेवर ऊभ्या निळ्या रंगाच्या एका आलिशान जॅग्वार मधून राप्सडीला ऊतरतांना पाहिले आणि गाडीतल्या कोणाशीतरी बोलतांना सुद्धा. काहीतरी प्रचंड आश्चर्यकारक पाहिल्यासारखे मी पेडल मारायचे विसरून विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या गाडीकडे आणि तोंड ऊघडून बोलणार्‍या राप्सडीकडे बघत गाडीच्या बाजुने सावकाश निघून गेले. गाडीसमोरून जातांना पहिल्यांदाच माझी राप्सडीशी नजरानजर झाली. मी पुढे गेल्याने ती माझ्या नजरेआड होऊनदेखील अजूनही माझा पाठलाग करणारी तिची नजर मला माझ्या सायकलच्या आरशात स्पष्ट दिसत होती. पण मागे वळून बघण्याची माझी आजिबात हिम्मत झाली नाही. मी मुकाट क्लासरूममध्ये माझ्या नेहमीच्या जागेवर कोणाशीही एका शब्दानेही न बोलता येऊन बसले. माझ्या मागोमाग काही क्षणातच दारातून आत येणार्‍या राप्सडीकडे मी बघितले तर ती कधी नव्हे ते थेट माझ्याकडेच बघतांना मला दिसली. अगदी माझ्या दोन बाकं पुढे भिंतीच्या बाजूला तिच्या नेहमीच्या जागेवर बसेपर्यंत ती माझ्याकडे डोळ्यांची पापणीही न हलवता एकटक बघत राहिली. शेवटी मीच तिचे ते बघणे असह्य होऊन नजर चोरत दुसरीकडे वळवली. एव्हाना प्रोफेसर येऊन त्यांनी नेहमीसारखा एक विषय घेऊन लेक्चर सुरूही केला होता, पण मी अजूनही समोर बसलेल्या राप्सडीच्या पाठमोर्‍या आकृतीकडे आणि मानेवरच्या गोंदणाकडे टक लाऊन बघत होते.
आधी सायकलच्या आरशातून दिसणारी आणि नंतर क्लासरूममध्ये शिरतांना माझ्यावर रोखलेली नजर आठवून मला एकदम कोणीतरी आपली चोरी पकडल्यासारखे का वाटत होते कोणास ठाऊक? पण दोन्ही वेळेस राप्सडीच्या नजरेत मला ना राग दिसला ना वैताग ना भिती... दिसले फक्त ज्यातला कुठलाही भाव आजिबात वाचता येणार नाही असे माझ्या आरपार बघणारे दोन अतिशय पारदर्शी डोळे. मला वाटले माझ्या कानांमध्ये कोणीतरी हळूच खुसफुसले, 'मला माहिती आहे तू माझ्याकडे बघते आहेस, पण तुला माहिती आहे का तुला काय दिसते आहे?'. केवळ दोनच क्षण..अगदी दोनच क्षण त्या पारदर्शी डोळ्यात मी बघितले असेन, पण त्या दोन क्षणातही मला प्रकर्षाने काहीतरी खूप ओळखीचे बघितल्यासारखे वाटून गेले,
'कदाचित, मीच दूरवरून माझ्या स्वतःकडे बघते आहे.....माझ्याच नजरेत माझी नजर स्थिरावली आहे.... आरशात दिसणार्‍या माझ्या स्वतःच्या डोळ्यांत मी माझ्याच डोळ्यांनी एकटक बघत आहे.... मला काय होते आहे ते न कळून खूपच अस्वस्थ वाटत होते.... सायकलचा आरसा....ती नजर...ते डोळे...ते गोंदण....काहीतरी गारूड पडले आहे...हा जादूटोणा आहे... बोहेमियन राप्सडी चेटकीण आहे... कॅथरेफ्टिस स्पीगल....मिरर.. मिरर......who is the fairest..... who... who?'
गरगरणारे डोके मी गच्च पकडले आणि....टॅssssडा! ... तत्क्षणी माझ्या चेहर्‍यावर एक मोठ्ठे स्मित पसरले....युरेका! युरेका!.....मला राप्सडीच्या गोंदणाचे कोडे एकदम सुटलेच.
ना त्या चित्रांच्या चौकटी होत्या ना तसबीरींच्या... ते आरसे होते... नक्षीदार चौकटींचे वर्तुळाकार, आयताकृती आरसे. जणू, बघणार्‍या प्रत्येकाने त्यात आपल्या स्वतःला बघायचे आणि स्वतःलाच विचारायचे, 'Mirror mirror on the wall, who's the fairest of them all?' जर आपल्याच आतून ऊत्तर आले 'You are, my dearest self' तरच आपण तिच्याशी बोलायला जायचे किंवा ती आपल्याशी बोलणार.
ह्यातला fairest चा अर्थ, सगळ्यात 'सुंदर किंवा गोरी' नसून 'प्रामाणिक किंवा न्याय्य' आहे हे समजायला मला चारपेक्षा जास्तं महिने लागले होते. मी who's the fairest of them all? पहिल्यांदा म्हणाले होते तेव्हा कधीही कोणाच्या शेर्‍यावर पापणी सुद्धा न हलवणार्‍या राप्सडीने चक्कं चमकून मागे वळून माझ्याकडे बघितले होते, हे सुद्धा मला स्पष्ट आठवले.
मला जणू एखाद्या चित्रमय कोड्याचे सगळे तुकडे बरोबर जागच्या जागी बसून त्यातून मिळालेल्या परवलीचा नेमका शब्दं वापरून गुहेचे बंद दार ऊघडण्याचा पहिला मंत्र मिळाल्यासारखेच वाटत होते. पण मिळालेले ते एक ऊत्तर आपल्या पोटी एक नवा प्रश्न जन्माला घेऊन आले,
'मौनाची भाषा गोंदणातून बोलण्यामागे राप्सडीच्या विचित्र वागण्याचे नेमके कारण काय असावे?'
आणि ह्या प्रश्नाचे ऊत्तर सापडल्याशिवाय मला आजिबात स्वस्थ बसवणार नव्हते. मी सध्या तरी राप्सडी आणि तिच्या गोंदणाबद्दल कोणापाशीच काही न बोलण्याचे ठरवले.

फिलॉसॉफी म्हणजे नक्की असते तरी काय? सोप्या भाषेत - मानवी ज्ञान, अस्तित्व आणि सत्यता ह्या तिघांची सांगड घालत 'मानवी आयुष्य' ह्या मोठ्या प्रश्नाच्या ऊत्तराचा तत्ववेत्त्यांनी मांडलेल्या प्रगल्भ विचारांच्या अभ्यासातून घेतलेला मागोवा. फिलॉसॉफीच्या अभ्यासाने मला - विचारमंथनांतून प्राप्त झालेल्या ज्ञानातून समाजमंथन करणारा मार्क्स दाखवला, फ्रेडरिक नीझ्चा सारखे, स्वतःलाच प्रश्नांच्या ऊल्कावर्षावाखाली ऊभे करत 'आपल्या अस्तित्वावर' खोलवर विचार करण्यास भाग पाडले आणि सॉक्रेटिससारखे न ऊकललेल्या प्रश्नांचा ऊत्सुकतेने ऊत्तर सापडेपर्यंत पाठलाग करण्यास शिकवले.
त्याच ऊत्सुकतेपोटी मी अनेकदा लेक्चर संपल्यावर राप्सडीचा त्या आडवाटेवर वाट बघत थांबलेल्या जॅग्वारपर्यंत लपतछपत पाठलाग केला. पण त्यादिवशी झाली तशी माझी आणि तिची नजरानजर पुन्हा कधी झाली नाही. राप्सडी राहते कुठे? हे मला नक्की माहित नव्हते पण आमच्या छोट्याश्या युनिवर्सिटी टाऊनच्या आसपास जॅग्वार बाळगू शकणार्‍या लोकांचे छोटेखानी अपस्केल नेबरहूड तसे एकच आहे ह्याची मला थोडी कल्पना होती. मी तिथूनच राप्सडीच्या घराचा शोध घ्यायला सुरूवात करण्याचे ठरवले. आडवाटेने पुढे जाऊन जॅग्वार कुठला रस्ता पकडते ह्याचा मला साधारण अंदाज होताच. बर्फाने आठवडाभर ओढ दिलेल्या एका रविवारी मी माझा हिवाळी सायकलिंग गीअर चढवून सायकल दामटत त्या अपस्केल नेबरहुडात फेरी मारायला निघाले. मला आतून खरे तर खूप विचित्र वाटत होते, ही कसली अजब ओढ? हेतूपुरस्सर पाठलाग करणे? आपण कुतूहल शमवण्यासाठी कोणाच्या तरी मागावर जात आहोत? माझेच मन मला खात होते. शेवटी 'हा शेवटचा प्रयत्न' म्हणत मी माझ्या मनाताला नैतिक-अनैतिकतेचा झगडा तूर्तास बाजूला ठेवला आणि सायकलला टांग मारली.

नेबरहुडातल्या एका टुमदार घराच्या ड्राईव-वे मध्ये पार्क केलेली ती निळी जॅग्वार शोधायला मला आजिबातच कष्ट पडले नाही. मागच्या काचेवर डाव्या कोपर्‍यात चिटकवलेले एका सोनेरी केसांच्या मॉडेलचे चंदेरी ड्रेसमधले चित्र मी झटकन ओळखले. युनिवर्सिटीजवळच्या आडवाटेवर ऊभी असतांना ते चित्र मी अनेकदा बघितले होते पण राप्सडी सोडून त्याबद्दल विचार करावा असे मला कधी वाटले नाही. ह्यावेळी मात्र घरासमोरून जातांना सावकाश पेडल मारत ते चित्र मी नीट निरखून पाहिले. चित्र बघून काहीतरी जुने, पुराणे पुसटसे आठवल्यासारखा भास होत राहिला. मला वाटले ते चित्र मी ह्याआधीही नक्कीच कुठेतरी बघितले होते, कुठल्यातरी मासिकात? कदाचित माझ्या लहानपणी? चित्राचा अजून विचार करू जाता मला माझी पुसटशी आठवण गडद होत चालल्याचेही ऊमगत होते, पण ही नेमकी कशाची आठवण आहे ते आजिबात लक्षात येत नव्हते. घरासमोरून दुसरी फेरी मारतांना मी मुद्दाम पाणी पिण्याच्या बहाण्याने ड्राईव-वे समोरच सायकल ऊभी करून गॉगल लावलेल्या डोळ्यांच्या कोपर्‍यातून ते टुमदार घर न्याहाळत होते. मला हे राप्सडीचेच घर आहे आणि ती ईथेच राहते असे खात्रीशीर माहित नव्हते पण ड्राईव-वे मध्ये ऊभी जॅग्वार नक्कीच तसे सुचवत होती. माझा मेंदू अजूनही काचेवरच्या चित्राच्या आठवणीत रंग भरण्यात गुंतला असतांनाच माझे लक्ष लिविंगरूमच्या मोठ्या खिडकीकडे गेले. खिडकीमागचा पडदा सरकवलेला होता आणि समोरच्या दर्शनी भिंतीचा एक मोठा तुकडा सहजच दिसत होता. भिंतीच्या त्या तुकड्यावर मला कोणाचे तरी एक मोठे पोट्रेट लावलेले दिसले. झटकन डोळ्यांवरचा गॉगल काढून ते पोट्रेट मी नीटच न्याहाळाले. जॅग्वारच्या काचेवर चिकटवलेल्या मॉडेलचेच लाईफ साईझ पोट्रेट होते. ते मोठे पोट्रेट नुसत्या डोळ्यांनी बघताक्षणीच मेंदूला अचानक साक्षात्कार होऊन जादूची कांडी फिरवल्यासारखे माझ्या आठवणीतल्या चित्रात सगळे रंग एकाच क्षणात भरल्या गेले. जणू गुहेचे बंद दार ऊघडण्याचा दुसरा मंत्रच मला मिळाला होता.
मी मोठ्या ऊत्साहाने झपाझप सायकल मारत माझ्या डॉर्मरूममध्ये आले आणि लगबगीनं टेबलावरचा लॅपटॉप खसकन पुढ्यात ओढून गूगल सर्च केले....... 'Mirror Woman + Superhero Comics'
दुसर्‍याच क्षणी एका कॉमिक्स बुकवरच्या चंदेरी कपड्यातल्या MIRЯOR WOMAN - 'मिरर वुमन' चे चित्र माझ्या स्क्रीनवर ऊमटले. तिचा चेहरा पाहून मी आश्चर्याचा धक्का बसल्यासारखी काहीच न सुचून कितीतरी वेळ वेड्यासारखी लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघत राहिले. हे कसे शक्य आहे? 'बोहेमियन राप्सडी मिरर वुमनची हुबेहुब कॉपी? तंतोतंत तोच चेहरा, तसेच लांब सोनेरी केस, सेम टू सेम अंगकाठी आणि अगदी तसेच पारदर्शक डोळे. मला विश्वासच बसेना, बावीशी-तेवीशीच्या राप्सडीची हुबेहुब छबी आठ वर्षे जुन्या कॉमिक बुकवर कशी असू शकते?'
डोक्यात पुन्हा राप्सडीबद्दलची सगळी माहिती, सगळ्या आठवणी फेर धरून नाचायला लागल्या. पण काही केल्या कुठलेच दुवे जुळेनात. पुढचे तीन तास मी 'मिरर वुमनच्या' कॉमिक बुकची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी पब्लिशरची वेबसाईट, सुपरहीरो विषयातल्या अभ्यासू लोकांचे ब्लॉग्ज, फॅन मंडळींचे आर्काईव्ज असा ईंटरनेटचा कोपरा न कोपरा धुंडाळून काढला पण मिरर वुमनच्या त्याच त्याच चित्रांशिवाय काहीही हाती लागले नाही. मेंदूवर बराच जोर टाकूनही मला साधे माझ्या लहानपणीच्या आठवणीतून मिरर वुमनची सुपरपावर काय होती साधे एवढे सुद्धा आठवत नव्हते. 'राप्सडी आणि आरशांचा असा काय जवळचा ऋणानुबंध आहे?' ह्याचा सतत विचार करून डोके भणाणून गेले होते.
शेवटी तो ताण असह्य होऊन मन रमवण्यासाठी मी पुन्हा माझी सायकल काढून डाऊनटाऊन मध्ये भटकायला निघाले. सिटी पार्कापर्यंत पोहोचलेच होते तोच माझी नजर 'ईथका पब्लिक लायब्ररी, १९२६' च्या भल्या मोठ्या, दगडी ईमारतीवर पडली. मी धावतपळतच तीन जिने चढून लायब्ररीतला 'यंग अ‍ॅडल्ट सेक्शन' गाठला. कॉमिक बुकचे एक आख्खे फडताळ धुंडाळल्यानंतर मला एकदाचे एका कोपर्‍यात पडलेले लाल निळ्या रंगातले एक बारकेसे कॉमिक बुक सापडले - Mirror Woman and The Mass Hypnotist. मी तिथेच फतकल मांडून आधाशासारखे ते वाचायला घेतले -

न्यूयॉर्कमध्ये आरसे बनवणार्‍या एका छोट्या फॅक्टरीमध्ये, गरीब बिचारी 'कॅथी स्प्रोल' दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सोडवण्यासाठी आणि आजारी आईच्या औषधांसाठी लागणारे पैसे जमवण्यासाठी दोन दोन शिफ्ट मध्ये काम करत असते. विनाकारण कॅथीचा दु:स्वास करणारी आणि तिला कायम पाण्यात पाहणारी एक पिवळ्या दातांची, लाल केसांची, जाडेली, खत्रूड अशी जर्मन फॅक्टरी वर्कर आणि तिचे टोळके कॅथीला त्रास देण्यासाठी कॅथीने मोठ्या मेहनतीने बनवलेला एक भला मोठा आरसा मुद्दाम धक्का देऊन पाडते. आरसा फुटल्याने चिडलेला फॅक्टरीचा मालक कॅथीला एकटीला रात्रीच्या तिसर्‍या शिफ्टमध्ये थांबून नवीन आरसा बनवण्याचे फर्मान सोडतो. नोकरीची नितांत गरज असलेली कॅथी निमुटपणे तिसर्‍या शिफ्टमध्ये एकटीने काम करण्यासाठी तयार होते. पण दिवसभर काम करून दमलेल्या कॅथीच्या हातून सिल्वर नायट्रेटची बादली भार न पेलवल्याने लवंडते आणि ती नखशिखांत सिल्वर नायट्रेटमध्ये न्हाऊन निघते. आरसा बनवून, झालेली सांडलवंड मोठ्या कष्टाने आवरून भल्या पहाटे घरी निघालेल्या कॅथीचा १४ व्या स्ट्रीटवरच्या अंधार्‍या गल्लीत, ड्रग्जच्या नशेत असलेला एक गुंड पाठलाग करतो. घाबरून पळणार्‍या कॅथीला गाठून शेवटी तिच्या समोरच तो गुंड हातात सुरा घेऊन ऊभा ठाकतो. कॅथीवर सुरा ऊगारून तो वार करणारच असतो, तेव्हा अभावितपणे भांबावून तो दोन पावलं मागे जातो आणि घाबरून आल्या पावली त्याच अंधार्‍या गल्लीत पळून जातो.
पळून जातांना कॅथीला त्याच्या डोळ्यातली भिती स्पष्ट दिसते. जिवंत वाचल्याच्या आनंदाबरोबरोबरच, 'आपल्याकडे असे भूत बघितल्यासारखे बघून हा गुंड का पळून गेला?' ह्याचे कॅथीला प्रचंड आश्चर्य वाटते. कुतुहलाने ती बाजूच्याच मेसी'ज दुकानाच्या काचेपलिकडे ठेवलेल्या भल्या मोठ्या आरश्यात स्वतःला बघते तेव्हा आरश्यात तिला तिचे स्वतःचे प्रतिबिंबच दिसत नाही. हा काय विचित्र प्रकार आहे ते न कळाल्याने कॅथी घरी जाऊन पुन्हा आरशात स्वतःला बघते तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब अगदी नेहमीसारखेच दिसते.
नंतर पुन्हा असे खूप घाबरवणारे दोन तीन प्रसंग घडून गेल्यानंतर कॅथीला, 'भितीमुळे आपल्या शरीरात झिरपलेले सिल्वर नायट्रेट सक्रिय होऊन आपले शरीर आरशासारखे चकचकीत होते आणि समोरच्याला त्याची स्वत:चीच चित्रविचित्र प्रतिमा त्यात दिसत राहते' असा साक्षात्कार होतो. मग कॅथी न्यूयॉर्कमधल्या एका छोटेखानी स्टुडिओत लोकांना मेडिटेशन आणि माईंड कंट्रोल शिकवणार्‍या योगी असीमानंदाच्या मदतीने, प्रचंड भिती, राग, अत्यानंद अश्या टोकाच्या भावना केवळ विचारातून मनात ऊत्पन्न करण्याची कला शिकून घेते आणि हवे तेव्हा स्वतःला आरश्यात बदलण्याची सुपरपावर आत्मसात करते.
एका रात्री कॅथीला एकटे गाठून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या फॅक्टरीमधल्या त्या जाड्या, जर्मन बाईला समोर प्रत्येकवेळी तिची स्वतःचीच खरीखुरी, चालतीबोलती प्रतिमा दिसत राहते. स्वतःवरचेच प्रेम तिला स्वतःच्याच प्रतिमेला ईजा करण्याची परवानगी देत नाही आणि कुठलीही हिंसा घडून न येता ती हतबल होते.
मग कॅथी आपले आरसे बनवण्याचे कसब वापरून हजारो लहान-मोठ्या, वेगवेगळ्या आकारांच्या, अनेक प्रतले असणार्‍या, दोन्ही बाजुंनी आत बाहेर दिसू शकणार्‍या आरशांच्या मण्यांपासून स्वतःसाठी एक कॉस्च्यूम बनवते. बघणार्‍याला तो साधा चकाकणारा चंदेरी स्पँडेक्स कॅटसूट वाटेल पण हजारो आरसे मोठ्या खुबीने एकत्र विणून कॅथीने बनवलेला तो 'मिरर वुमन' कॉस्च्युम. कुठल्याही कोनातून कॅथीकडे बघणार्‍याला त्याच्या स्वतःचेच प्रतिबिंब दाखवतो.
पुढे जाऊन ईतर कुठल्याही सुपरहीरो कॉमिक बुकमधल्या गोष्टीप्रमाणे कॅथी आणि योगी असीमानंद, रात्रीच्या कामाची शिफ्ट संपवून घरी जाणार्‍या एकट्या दुकट्या तरूणींना संमोहित करून, त्यांचे अपहरण करणार्‍या टॉर्चर चेंबर मध्ये डांबून ठेवणार्‍या हिप्नॉटिस्टच्या मागावर निघतात. डांबून ठेवलेल्या तरूणींना नुसत्या संमोहनातून भयानक शारिरिक वेदनादायक अनुभवातून जाण्यास भाग पाडणार्‍या 'मिस्टर बुल' नावाच्या हिप्नॉटिस्टशी कॅथी ऊर्फ मिरर वुमन लढा द्यायला त्याच्या टॉर्चर चेंबर मध्ये शिरते.
संमोहनाच्या अंमलाखाली वेदनेने विव्हळणार्‍या तरूणींना पाहून मिस्टर बुल असुरी आनंद मिळवत असतो आणि दिवसेंदिवस असा आनंद मिळवण्याची त्याची तहान वाढतच असते. सुरुवातीला संमोहनातून 'बोटाला सुरीने कापले आहे' असे भासवून बोट कापल्याच्या वेदनेने कण्हणार्‍या एका तरूणीला पाहून खूष होणार्‍या मिस्टर बुलच्या छळणुकीने पुढे 'तुम्हाला साप चावला आहे', 'तुम्ही बुडत आहात' अशी जिवाची भिती घालून अनेक तरूणींचे विव्हळणे तासनतास बघत राहण्यापर्यंत गेली होती. शेवटी प्रत्येक तरूणी बेशुद्ध पडत राही पण मिस्टर बुलची त्यांच्या वेदना बघून आनंद मिळवण्याची विकृती शमत नसे.
मिस्टर बुलच्या टॉर्चर चेंबर मध्ये शिरलेली मिरर-वुमन त्याला सगळ्या गरीब बिचार्‍या तरूणींना सोडून देऊन तिच्याशी सामना करण्याचे आव्हान देते. मिरर वुमनच्या आरशांमुळे पहिल्यांदा भांबावून मागे हटणारा मिस्टर बुल शेवटी चिडून त्याची संमोहन शक्ती मिरर वुमनवर वापरून तिला वेगवेगळ्या वेदनांनी टॉर्चर करायचा प्रयत्न करतो. पण प्रत्येकवेळी आरशात दिसणार्‍या त्याच्या स्वतःच्या प्रतिमेमुळे ती शक्ती त्याच्यावरच ऊलटून तो स्वतःच त्या वेदनांनी हैराण होत राहतो आणि शेवटी मिरर वुमन समोर आपली हार कबूल करतो.
एका मोठ्या दुष्ट शक्तीशी कुठलीही मारधाड, रक्तपात न करता केवळ आरसे आणि मनःशक्ती वापरून अहिंसात्मक लढा देणारी कॅथी सगळ्या न्यूयॉर्क वासियांसाठी सुपरहीरो 'मिरर वुमन' होते.

कुठलीही हिंसा, पाठलाग, ईमारतींची पडझड आणि अफलातून मारधाडीचे प्रसंग नसलेले ते कॉमिक बुक पुढचा भाग काढण्याएवढे कुठल्याही वयोगटातल्या वाचकांच्या पचनी पडले नसणारच ह्याची मला खात्री होती. मी माझ्या लहानपणी पहिल्यांदा ते वाचले तेव्हाही मला ते फारच कंटाळवाणे वाटले होते. चंदेरी कॉस्च्युम मधल्या मिरर वुमनची पुसटशी आठवण सोडून बाकी सगळे नाट्य चटकन विस्मृतीत सुद्धा गेले. प्रत्येक सुपरहीरो कॉमिक बुक एका साध्या सोप्या फिलॉसॉफीकल विचाराच्या बैठकीवरच बेतलेले असते, हे मला पक्के ठाऊक होते. मिरर वुमन कॉमिक सिरिज कदाचित व्यावसायिकदृष्ट्या फार यशस्वी झाली नसावी, पण आज मला त्यातली फिलॉसॉफी ईतर कुठल्याही सुपहीरोच्या फिलॉसॉफीपेक्षा प्रचंड भावली होती. वयात येणार्‍या मुलांना हिंसेच्या ऊदात्तीकरणापासून लांब ठेवणारा, आरश्याच्या प्रतिकातून, वाईट वागणार्‍या प्रवृत्तीला आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडणारा संदेश लेखकाने किती खोलवर विचार करून दिला असावा ऊमगून मला लेखकाच्या वैचारिक प्रगल्भतेबद्द्ल प्रचंड आदर वाटला.

सहज कुतूहल म्हणून मी कॉमिक बुकच्या मागच्या कवरवर लेखकाचे नाव पहावे म्हणून ते पलटले....., 'मिस. कॅथी स्पीगल'

नाव वाचून मला खरं तर धक्का वगैरे बसायला हवा होता पण तो बसण्याआधीच एक मोठा सुस्कारा सोडत मी कितीतरी वेळ शांत बसून राहिले. ज्या वयात मी ते कॉमिक बुक पहिल्यांदा वाचले त्यावेळी मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हतीकी ते एका माझ्याच वयाच्या मुलीने लिहिलेले आहे, जिला भविष्यात मी प्रत्यक्ष भेटणार आहे. राप्सडीविषयी मला पडलेल्या दुसर्‍या प्रश्नाचे ऊत्तर 'राप्सडीने असे वागण्याचे नेमके कारण काय असावे?' बहूतेक मला सापडले होते.
आईने ज्यावेळी हे पुस्तक माझ्या हातात दिले त्यावेळी मी हायस्कूलमध्ये एका विचित्र आणि अतिशय त्रासदायक परिस्थितीतून जात होते -Bullying - छळवणूक!.
'कोणी विनाकारण आपला तिरस्कार करते आहे आणि आपल्या छळवणुकीतून आनंद शोधू पहाते आहे' ह्या विचारांनी त्यावेळी बराच काळ सैरभैर झाल्याचेही मला आठवत होते. ज्यांना मित्र म्हणावे अशा आपल्याच आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींनी आपल्याला गुलामांसारखी तुच्छतेची वागणूक द्यावी, आपली हेटाळणी करावी ही भावना मनाला किती डागण्या देणारी असते हे मी अनुभवले होते. आपल्यासारख्याच मुलांच्या ग्रूपमध्ये आपल्याला थारा नाही, आपले अस्तित्व नाकारले जात आहे हा विचार मन आणि मेंदू असे काही पोखरून काढतो की आपण आपले अस्तित्व हरवून बसतो. छळवणुकीतून मिस्टर बुल सारखा असूरी आनंद मिळवण्यासाठी आपलेच समवयस्क किती टोकाला जाऊ शकतात हेदेखील मी स्वतः अनुभवले होते.

मला वाटते, राप्सडीने सुद्धा हायस्कूलमध्ये असतांना हे सगळे सहन केले असणार. तिच्या वेगळेपणामुळे ईतर मुला-मुलींकडून तिची नक्कीच छळवणूक झाली असावी. नकळत्या वयात तिरस्कार, अपमानाच्या नकारात्मक भावनांनी पोळलेली राप्सडी आता कळत्या वयातसुद्धा अजूनही जुन्या त्रासदायक आठवणीत होरपळत असावी. आयुष्याच्या सर्वात नाजूक, असुरक्षित टप्प्यावर मिळालेल्या कटू अनुभवांमुळे आपल्या क्लासमेट्सशी ती आजही जुळवून घेऊ शकत नाही. लहानपणी जिथे मैत्रीचे नाते फुलायला हवे होते तिथे हेटाळणी, दुस्वास, खिल्ली, अपमान, अवहेलना वाट्याला आल्याने कदाचित पुन्हा मैत्र जमवण्यासाठी, मित्रांवर विश्वास टाकण्यासाठी लागणार्‍या निरागस भावना ती कायमच्या हरवून बसली असावी किंवा स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी, फुलवण्यासाठी आता तिला कुठल्याही मैत्र-भावनेच्या आधाराची मानसिक गरज ऊरली नसावी. पण म्हणून तिच्या मनातल्या त्या निरागस भावना कायमच्या मेल्याच असे खचितच नसावे. त्या ऊस्फूर्त भावनांना वाट करून देण्यासाठीच जसे तिने मिरर वुमनला जन्माला घातले, तसेच अंगावर आरसे देखील गोंदवून घेतले. छळवणूक असह्य झाल्याने कधीतरी मौनाच्या कोषात गेलेल्या राप्सडीने व्यक्त होण्यासाठीच जसा कॉमिक बुकचा आधार घेतला असावा तसाच गोंदणाचा सुद्धा.

राप्सडीबद्दल, तिच्या भावनाविष्काराबद्दल, तिच्या बुद्धीमत्तेबद्दल, आपले वेगळेपण जाणण्याच्या आणि जपण्याच्या तिच्या प्रयत्नाबद्दल माझ्या मनात एकाचवेळी प्रचंड प्रेम, आदर आणि अभिमानाची भावना दाटून आली.
ऊद्या जेव्हा राप्सडी क्लासरूममध्ये येईल तेव्हा सगळ्यांसमोर तिला -
Mirror Mirror by the wall, I am the fairest of them all!...... Would you like to be my friend, Mirror Woman?
असे विचारायचे ठरवून मी शांतपणे माझी सायकल घेऊन डॉर्मकडे चालू लागले.

-- समाप्त

बीटल्स आणि 'हरे कृष्णा हरे राम' च्या आठवणी जिवंत असल्यास बोहेमियन हिप्पी मुली कशा राहतात ह्याचा अंदाज लावणे अवघड वाटू नये.
पण अशा मुलींना आजिबातच पाहिले नसल्यास 'हरे गूगल हरे बिंग' करून बघा Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती सही पकडे.
एक मुलगा एका मुलीचा obsessively पाठलाग करतो आहे (अमेरिका असली तरी) हे 'धडधडीत स्टॉकिंग' वाटणारे नोशन टाळण्यासाठीच निवेदिकेचा ऊपद्व्याप केला/ करावा लागला.

पण पूर्वीचे लेखन 'मेल आयडी' ने केले आहे (आणि आता 'निवेदिका कसे') ह्या पूर्वग्रहामुळे वाचकांना वाटणारे अपील कमी होईल असे वाटले नव्हते/ ध्यानात आले नव्हते.

एक तर लेखक लिखाणात कमी पडला किंवा वाचकाला त्याच्या भावविश्वापलिकडे पात्रांच्या भावविश्वाशी स्वतःला जोडता आले नाही.>>>व्यक्तीचित्र वाचत असताना वाचक एक तर त्या पात्राच्या भावविश्वाशी जोडला जातो किंवा लेखक ज्या आत्मियतेने त्या पात्राविषयी लिहितो त्या आत्मियतेशी जोडला जातो. या दोन पैकी एक किंवा दोन्हीही वाचकाला भावते. त्यामुळे वाचकाची प्रतिक्रिया एक तर 'किती सुंदर लिहिलय' अशी असते किंवा 'लिखाण अगदी आतुन आल्यासारखे वाटते' अशी असते. जर वाचक पात्राच्या भावविश्वाबरोबर जोडला नाही गेला तर हरकत नाही पण तो जर लेखक ज्या आत्मियतेने लिहितो त्या आत्मियतेबरोबर जोडला नाही गेला तर नक्कीच लेखक कमी पडला असे म्हणता येईल. आणि ही आत्मियता लेखका मधे तेव्हाच येते जेंव्हा रंगवत असलेले पात्रातले काही गुणदोष, सवयी, स्वभाव, रहाणीमान त्याने प्रत्यक्षात कुठे तरी पाहीलेले असते. कोणतेही जमुन आलेले व्यक्तीचित्र हे पुर्णपणे काल्पनीक असुच शकत नाही शक्यतो. व्यक्तीचित्रणच नाही तर लेखक जे काही लिहितो ते क्वचितच शंभर टक्के काल्पनीक असते. निदान मला तरी असे वाटते.

वा! अमेझिंग. हायझेनबर्ग नेवर डिसअपॉईंट्स
कॉमिक बुक मधून व्यक्त होणारी मुलगी, बुलिंग करणार्‍यांसाठी आरशाचे प्रतिक - खुप खोलवर विचार करून केलेले लिखान असते तुमचे
प्रत्येकवेळी खास लॉगीन करून प्रातिक्रिया देण्यासारखे
मर्डर मिस्ट्री असो की मुस्लिम मौहोल किंवा व्यक्तीचित्रणाची ही अमेझिंग कन्सेप्ट, तुमच्या लिखाणाचं नाणं खणखणीत आहे तुम्हाला कुणाच्या अप्रुवलची गरज पडु नये.
लिहित रहा.

मला असं वाटतंय की कॅथीपेक्षा निवेदक (निवेदिका) कल्पित असल्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.>. येस्स स्वाती टू द पॉइंट.
म्हणजे हाब कुणा दुसर्‍याची कथा सांगत आहेत हेच वाटतंय.

मला हे खुपच बोर वाटले.
माझ्या माहितीनुसार, व्यक्तिचित्रण हे त्या व्यक्तीच्या सहवासातून, त्याच्या व्यक्त होण्यातून आणि त्यातून आपल्याला भभवलेले व आपण टिपलेले क्षण असतात. त्या व्यक्तीच्या कोषात शिरण्याचा एक प्रयत्न असतो. लेखक प्रेरीत होवून व्यक्त केलेला प्रकार असतो त्या “क्षणातून”. अर्थातच लेखकाच्या नजरेतूनच.

हा प्रकार खूपच आभासी वाटला जरी निरिक्षण खरी वाटली असे लिहिले असली तरी. हे फक्त आणि फक्त नोंदवलेले निरिक्षण वाटले. त्यातून अनुभवहिन असा प्रकार वाटला. (जरी लेखकाने सांगितले नसते की हि आभासी व्यक्ती आहे तरी ते जाणवलेच).

खूपच अलंकारीक उपमा देवून केलेले लेखन मला बोजड वाटते. त्यातला गाभा लुप्त होतो. सुरुवात उगीच ओढून ताणून वाटली त्यामुळे.
इतक्या उपमा देवून लिहिलेला सुरुवातीचा भाग हा अट्टाहास वाटला लेख शुशोभित करण्याचा...प्रेमाच्या वेलीवर फुल टाईप किंवा हिरवा शालु नेसलेली धरती टाईप उपमा..

एकंदरित लिखाण आवडले, निलु निरंजना गवाणकर नावाच्या लेखिकेने तिच्या जगभरातल्या भटकंती आणि वास्तव्यातल्या अनुभवांवर लिहिलेले एक पुस्तक आहे त्याची आठवण झाली.(त्या पुस्तकात लेखिकेबरोबर मास्टर्स करायला एक मुलगी असते अत्यंत घुमी एक्कल्कोंडी; ती तिच्या पुर्वायुष्यातल्या नकोशा आठवणी घटना गोष्टी यावर मात करून ( तिच्या आई वडीलांचा घटस्फोट, आईची अनेक लग्ने ड्र्ग्ज/सेक्स अब्युस वगैरे) पदवी मिळवते त्याबद्दल एक भाग आहे)

माझ्यामते 'एक व्यक्तीचित्रण' म्हणून लिहिताना लिखाण जरा संपादित करायला हवे होते असे वाटते. सुरुवातीचा ऋतूंबद्दलच्या ओळी, कॉमिक्स मधली गोष्ट अशा काही गोष्टी जरुरीपेक्षा जास्त फुटेज खाताहेत. संपादनाची सुरुवात व्यक्तिचित्रण स्पर्धा - हायझेनबर्ग - 'बोहेमियन राप्सडी' इथपासूनच त्याची सुरुवात व्हावी. 'बोहेमियन राप्सडी' ही व्यक्ती होती? असं झालं मला. गूगल करायला लागलं. काही गोष्टीं बाबत अजूनही अंदाजच बांधतोय.

व्यक्तीचित्रण म्हणून न भावण्याचे कारण अनोळखी शब्द , प्रदेश, त्यांचा विशिष्ट संदर्भ असू शकतात. मला गावाचे नाव इथक का इथका इथपासून ते हे गाव कुठल्या देशात असावे ह्याबाबत काही अंदाजच बांधता आला नाही. काही संदर्भ निसटताहेत असे वाटले. एकंदरित जनरल लिखाण म्हणून चांगले वाटले तरी व्यक्ती डोळ्यासमोर उभी रहायला आणि तिच्याबरोबर कनेक्ट व्ह्यायला अवघड जातंय.

मला दोनदा वाचायला लागले (हा माबुदो) Happy

हे सर्व लिहून झाल्यावर म्हणतोय, Proud लोकानुयय करू नकोस तुझी म्हणून जी उपजत, शैली आहे ती बदलू नकोस.

कथा म्हणुन छान आहे. व्यक्तिचित्रण म्हणवत नाहीये. (व्यक्तिचित्रण स्पर्धेत स्वतः लिहिणार्याने संपर्कात, सहवासात आलेल्या, असलेल्या खर्‍या व्यक्तींबद्दल लिहायचं आहे ना? नियम काय आहेत?)
पहिले दोन उतारे कंटाळ्वाणे आहेत. जड्बंबाळ आहेत.
सगळी कथाच जरा जड वाटतेय.

>> 'सत्यकथे'च्या संपादकांचे सहाय्यक म्हणून होतात काय कधी....?

'सत्यकथे'च्या संपादकांचे सहाय्यक म्हणून होतात काय कधी....?>> >>>> नाही. कधी होण्याची शक्यताही नाही. Happy

आवर्जून तपशीलवार प्रतिसाद देणार्‍या सगळ्या वाचकांना अनेक धन्यवाद.

अवांतर माहिती.

हे फॉल सीझन मधले ईथका

आणि हे हिवाळ्यातले ईथका

ज्या युनिवर्सिटीच्या संदर्भाने लिहिले होते ती ही फॉल सीझन मधली प्रसिद्ध कॉर्नेल युनिवर्सिटी.

अशाच एक फॉल सीझनमध्ये आणि पुन्हा हिवाळ्यात अपस्टेट न्यूयॉर्क मधल्या ईथका शहरातल्या कॉर्नेल मध्ये शिकणार्‍या एका मैत्रिणीला भेटायला आणि युनिर्सिटी व शहर फिरायला गेलो होतो. तेव्हा तिच्याच क्लास मधल्या अशाच एका 'विचित्र' कॅथीचे दिसण्या वागण्यबद्दल ऐकलेले दोन ओळींचे माहितीपर वर्णन. अर्थात सुपरेहीरो कॉमिक वगैरे माझी अ‍ॅडिशन जे मला कदाचित नीट करायला जमले नसावे.

होमरच्या ओडीसीचा हीरो ओडेसियस (युलिसिस) ट्रोजन वॉर संपवून ईथकाकडे जायला निघतो त्याच्या दशकभराच्या प्रवासाचे वर्णन म्हणजेच ओडीसी. होमरच्या ओडीसीमुळे ग्रीस मधले ईथका खूप प्रसिद्ध आहेच आणि ग्रीक बेटांवर ते नेमके कुठे आहे ह्यावर द्वारकेसारखे काहीतरी थिअरी अधून मधून प्रसिद्ध होत असते. लॉर्ड ऑफ द रिंग मधली साम्राज्ये आणि शहरे रोहान, गॉंडोर, मॉर्डोर, रिवेंडल, मिनास टिरिथ किंवा गेम ऑफ थ्रोन्स मधली किंगडम्स तसेच ओडीसी मधले ईथका. आणि त्यावरूनच न्यूयॉर्क स्टेटमधल्या ह्या सुंदर युनिवर्सिटी टाऊनला/शहराला नाव पडले आहे.

व्यक्तीचित्रणात उल्लेख असलेल्या कुठल्याही बाबीशी रिलेट होता आलं नाही कारण माझं विश्व फारच वेगळं आहे ह्या सगळ्यापेक्षा.

पण तरिही तुझ्या शैलीने खिळवून ठेवलं शेवटपर्यंत. सुरूवातीला एक मुलगा कथन करतोय असंच समजून चालले होते. मग मध्येच कुठेतरी उमगलं की हे एका मुलीने केलेलं व्यक्तीचित्रण आहे. "अरेच्च्या"! ह्याशिवाय काही वाटलं नाही अर्थात कुठे रसभंग झाला नाही.

आतापर्यंत जी व्यक्तीचित्रणं वाचली होती त्यापेक्षा खूप वेगळं काहितरी वाचायला मिळालं. Happy

सशल +१
आणि मला आधी निर्माण केलेल्या गूढतेच्या मानाने त्या गूढाची उकल सोपी ( सोयीस्कर? ) वाटली. निवेदिकेने ते अप्रसिद्ध पुस्तक वाचलेलं असतं हा योगायोग वाटला. एरवीही ती मुलगी कुतूहल निर्माण करणारी होतीच, पुस्तक वाचलेलं नसतं तरीही.

सुरेख लिहलय Happy
मस्त वाटलं वाचून !

मला अधी निवेदक मुलगा आहे असेच वाटलेले Happy
पण परत स्त्रिलिंगी उल्लेख वाचून विचारात पडले. मग वाटले, हायझेनबर्ग मुलगी असेल Lol

मिरर वुमन तिची आई असेल, तिचा काही भूतकाळ असेल असे वाटलेले, तिच असेल असे मनात पण आले नाही Happy

मला आवडले हे व्यक्तिचित्रण। राप्सडी वगैरे कोण आहे ते गुगल केल्यावर कळले। पण एकूणच शेवटपर्यंत वाचले आणि वाटलं तिची मैत्री झालेली बघायला मिळेल आणि ती ओप्पन होईल सगळ्यांशी etc etc। anyway तुमची शैली छान आहे हा.ब. लिहीत रहा।

वेगळा (वेगळ्या विषयावर्/व्यक्तिरेखेवर लिहिलेला) लेख आहे. ठीक ठीक वाटला !

एरवी तुमचं लिखाण खूप आवडतं !

लोकानुयय करू नकोस तुझी म्हणून जी उपजत, शैली आहे ती बदलू नकोस >> +१. हे व्यक्तिचित्रण आहे का वगैरे सगळे बाजूला ठेवून जे काही लिहिलेलेस ते आवडले.

हायझेनबर्ग - 'बोहेमियन राप्सडी' हे शीर्षक वाचून तू एक 'बोहेमियन राप्सडी' आहेस कि काय असे वाटले होते आधी Happy BTW स्त्री लेखिका म्हणून 'हायजेबर्ग'ला अनुरुप आय्डि हवाच असेल तर Sau Lan Wu घेऊ शकतोस Wink

हे व्यक्तिचित्रण आहे का वगैरे सगळे बाजूला ठेवून. >> प्रतिक्रियेसाठी धन्यवाद असामी.
लोकानुयय करत नाही, ह्या आधीच्या कुठल्याच लेखनात कधी केला नाही आणि आताही करण्याची गरज वाटत नाही.
लेखनाचा दर्जा जोखणे हे वाचकांचे काम आहे आणि ते त्यांनीच करावे. माझे प्रतिसाद माझ्या लेखनाच्या दर्जाच्या डिफेन्समध्ये कधीच नसतात आणि त्याबाबतची टीका झेलण्यासही मी सदैव तयार आहे.
पण मी हे लिहिल्यापासून विचार करत आहे की ( माझ्या स्वतःच्या लिखाणाच्या प्रेमातून बाहेर पडून ) वाचकांना हे व्यक्तिचित्रण का वाटू नये?....

कॅथी कशी दिसते ह्याचा अंदाज आला का?
कॅथी कशी राहते ह्याचा अंदाज आला का?
कॅथीचे वागणे कसे आहे त्याच्या अंदाज आला का?
कॅथीच्या बोलण्या न बोलण्याचा अंदाज आला का?
तिचे दिसणे जसे आहे तसे का आहे ते कळाले का?
तिचे वागणे जसे आहे तसे का आहे कळाले का?
तिच्या विचित्र वागण्यामगची पटू शकतील अशी कारणं काय असू शकतात त्याची ऊत्तरं मिळाली का?

कॅथीच्या पुर्वायुष्यात घडून गेलेले प्रसंग, व्यक्त होण्यासाठी तिने लहानपणी (कॉमिक बुक) आणि आत्ता (टॅटूज) सारखी माध्यमे वापरणे, आरसे वगैरे संदर्भ वापरण्यामागची तिची विचारसरणी, काही ऊणीवांमुळे सोशल नॉर्म्स पाळू न शकणे पण तरीही सोशल प्रेशरला दबून न जाता/ भीक न घालता ' स्वतःचे वेगळेपण' जपण्याची धडपड,
आणि हे सगळे संवादांच्या अभावात सुद्धा लहान सहान क्लूजच्या पाठपुराव्यातून समजून घेऊन कॅथीला, तिच्या व्यक्तीमत्वाला वाचकांसमोर मांडण्याचे निवेदिकेचे प्रयत्न...

ह्या सगळ्या किंवा ह्यातल्या बहुतांश प्रश्नांची ऊत्तरं हो असल्यास मला तरी ती एखादे व्यक्तिचित्र रेखाटायला पुरेशी असवीत असे वाटते.. व्यक्तीशी रिलेट करता आले नाही, निवेदक मुलगी आहे हे ऊशीरा समोर आल्याने होणारे कन्फ्यूजन हे नक्कीच समजू शकतो.

बोहेमियन राप्सडीच का? तर सोशली अ‍ॅक्सप्टेड मार्गांनी व्यक्त न होऊ शकणार्‍यांसाठी , स्वतःचे वेगळे अस्तित्व जपू पाहणार्‍यांसाठी फ्रेडी मर्क्युरीची बोहेमियन राप्सडी ४० दशकांपासूनचे एक आयकॉनिक सिंबल आहे, यशाच्या बाबतीत अगदी बीटल्सच्याही वरताण. ह्या अनाकलनीय गाण्याच्या अर्थाबद्दलच्या शंभर थिअरीज आहेत. पण ना कधी फ्रेडी ने त्याचा अर्थ सांगितला ना कन्फर्म केला. हे 'स्वतःला आहे तसे गुणदोषासहित अ‍ॅक्सेप्ट करण्याचे धाडस दाखवणार्‍या प्रत्येकाचे गाणे' आहे ज्यात साहित्य, धर्म आणि कला, फिलॉसॉफी सगळेच अंतर्भूत आहे.

असो.. ही काही लेखन आवडावे म्हणून दिलेली कारणे नव्हेत ... just thinking out loud.

हा. ब. हे व्यक्ति चित्रण च आहे. लेख खूप छान आहे. वेगळ्या प्रकारे मांडणी केली आहे. तुमचे लेखन नेहमीच आवडते.

छान लिहिले आहे.soft bullying मुळे suffer झलेल्य cases जव्ळुन पाहिल्या आहेत. त्यामुले जास्त आवदले.

हाब,

मी आधी म्हटले होते तसे हे व्यक्तीचित्रण नक्कीच आहे. तुझी अवांतर माहिती आणि just thinking out loud हे दोन्ही प्रतिसाद वाचले.
त्यामुळे बराच उलगडा झाला आहे. आता कॅथी हाती लागायला / समजायला अजून मदत नक्की होईल

आणि हो लोकानुनय (लोकानुयय नव्हे ती माझी चूक) करणार नाहीस ही खात्री होती पण लोकांकडून फीडबॅक मागवल्यामुळे नकळतपणे लोकांना स्पूनफीड लागते तर करुया असे वाटूच शकते म्हणून सांगीतले.

नीट समजत नाहीये आणि समजायला हवे मात्र आहे असा आगळा आनंद देणारे हे लिखाण; लिहित रहा.

कॅथी कशी दिसते ह्याचा अंदाज आला का?
हो.

कॅथी कशी राहते ह्याचा अंदाज आला का?

हो.

कॅथीचे वागणे कसे आहे त्याच्या अंदाज आला का?

हो.

कॅथीच्या बोलण्या न बोलण्याचा अंदाज आला का?

हो.

तिचे दिसणे जसे आहे तसे का आहे ते कळाले का?
तिचे वागणे जसे आहे तसे का आहे कळाले का?

दोन्ही हो, पण हे (मिरर वुमनची स्टोरी)
फक्त फिक्शनल नव्हे तर बिझार सुद्धा वाटते.
व्यक्तीचित्रण न वाटण्याचे हे कारण असू शकते.

तिच्या विचित्र वागण्यामगची पटू शकतील अशी कारणं काय असू शकतात त्याची ऊत्तरं मिळाली का?

हो.

या लेखातील गुढ धुसरतेतून साकारलेलं कॅथीचं ठसठशीत चित्रण वाचणारयाला काही काळ असेना छान संमोहित करण्यात यशस्वी झालंय .

मस्त लिहीलेय.
मला आरसे वरुन नारायण धारप यांच्या मोहीनीचक्र कथेची आठवण झाली. (अर्थात फक्त संकल्पना ती.बाकी एकदम वेगवेगळं.)
बुलीईंग च्या अनुभवातून माणूस अंतर्बाह्य बदलतो हे खरे.

मस्त लिहिलं आहेस. ऋतूंचं वर्णन जरा जास्त पोएटिक झालं, पण वर्गात कॅथरेफ्टिस स्पीगल आली आणि गोष्टीने वेग घेतला.

निवेदिकाच का, इथकाच का, बोहेमियन राप्सडीच का- तू सेटिंगबाबत इतका विचार करतोस हेच मला फ़ार आवडतं. लेखनातली मला एखादी गोष्ट समजली नाही, तरी त्यामागे तुझा लेखक म्हणून नक्कीच काही विचार असणार इतका विश्वास आता तुझ्या शैलीवर बसला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ऍन्गल्समधून विचार करायला लावणारं हे लेखन आहे, ज्यातून उलट कॅथीचं व्यक्तीमत्व खुलतच जातंय. मस्त. मजा आली. थॅन्क्यू!

व्यक्तीचित्रणाचा एक पक्का सरधोपट ढाचा असतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे इथे नायीका समोर येते ते आवडले , निवेदन् करणारी स्त्री आहे ते केवळ स्टॉकिंग सारखे वाटू नये म्हणून आहे लक्षत आल्यावर एकंदरीत कंडीशनिंगबद्दल गंमत वाटली. मात्र तरी तो सगळा कॉमिक्सचा भाग वगैरे यातून मला बांधून ठेवायला कमी पडली. खूप विस्ताराने स्पष्टीकरण , कॉमिक्सची कथा येते तिथे माझे लक्ष उडाले. तुमच्या लेखनात मी एक सहजता अपेक्षित केली होती ती इथे नव्हती. आत्ता आता उलगड्ली वाटताना हातातून निसटली वाटणे याऐवजी ठरवून आलेला योगायोग, स्पष्टीकरण मला तितकस भावलं नाही. पण थोडं वेगळं म्हणून मजाही आली. मला काय सांगायचे आहे ते मलाच सुसंगत मांडता येत नाहीये.

Pages