मायबोली गणेशोत्सव २०१८ - पाककृती स्पर्धा

Submitted by संयोजक on 5 September, 2018 - 23:44

D3042045-B78D-476E-811F-309AE1B28C75.jpeg

नमस्कार मायबोलीकरहो!

गणेशोत्सव आला की मायबोलीवर सर्वात जास्त उत्सुकता असते ती पाककृती स्पर्धेची! दरवर्षी शक्कल लढवून संयोजक नवनवे नियम बनवून मायबोलीकरांसमोर आव्हान ठेवतात आणि सगळी कल्पनाशक्ती आणि कौशल्य पणाला लावून अनेक मायबोलीकर उत्साहाने सहभागी होऊन भरभरुन प्रतिसाद देतात. अनेक प्रश्नोत्तरे, नवनवीन पाककृती, पदार्थांचे रंगीत सजवलेले फोटो आणि शेवटी मतदानाद्वारे स्पर्धेचा निकाल! पाककृती स्पर्धेचे नियम ठरवण्यापासून ते विजेता घोषित होईपर्यंत सगळ्यांसाठीच ती एक मोहीम झालेली असते. यंदाही आम्ही प्रयत्न केलाय थोडी अवघड, थोडी सोपी अशी पाककृती स्पर्धा आयोजित करण्याचा! चला तर मग, बघूया काय आहेत यंदाचे नियम!

विषय क्रमांक १ - "रंगीबेरंगी पौष्टिक सलाड"

संतुलित आहाराचे महत्त्व कोणाला वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतीय आहारात ताटाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या पदार्थांमुळे साधला जाणारा समतोल फार पूर्वीपासून सर्वश्रुत आहे. पण आजकालच्या धावपळीच्या जीवन शैलीत संपूर्ण संतुलित आहारासाठी ईतके वेगवेगळे पदार्थ बनवणे प्रत्येकवेळी शक्य होईलच असे नाही. यावर एक आगळावेगळा उपाय म्हणजे "वन डिश मिल"
आपण या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ज्यात सर्व पौष्टिक, झटपट तयार होणार्‍या, चविष्ट अशा वन डिश मिल्सच्या धर्तीवर सलाड्सच्या पाककृती करू या.

रंगीबेरंगी पौष्टिक सलाड पाककृती साठी नियम.
घटक क्र १:- उसळ/डाळ/ धान्य/सोयाबीन/मेथ्या
घटक क्र २:- पालेभाजी, कोथींबीर, पार्सली, कांद्याची पात, खाण्यायोग्य कोणतीही पाने.
घटक क्र ३:- फळभाजी/कंदभाजी
घटक क्र ४:- फळे/सुका मेवा/वाळवलेली फळे/ऑलिव्हज/खजुराचे तुकडे/लिंबू/तेलबीया(भाजलेले तीळ/ सुर्यफूल/ शेंगदाणे) खाण्यायोग्य कोणत्याही वनस्पतीच्या बीया
चवीसाठी /टॉपिंग्स (पर्यायी, न वापरल्यास उत्तम):- भारतीय पारंपारीक चटण्या, योगर्ट (साखर न वापरता), दही, वेगवेगळे पदार्थ/मसाले (मिरची, लसून, आलं, काळी मिरी, सुक्यामेव्याची पावडर, वापरुन बनवलेले टॉपिंग्स)

१. सलाड मधे वापरले जाणारे घटक कच्चे, भाजलेले किंवा उकडलेले असावेत. ईतर कोणत्याही पद्धतीने शिजवलेले पदार्थ चालणार नाहीत.
२. प्रत्येक घटक क्र. मधील किमान एक तरी पदार्थ वापरला जायला हवा. पहिले ३ घटक साधरणतः समप्रमाणात हवेत.
३. घटक क्रमांक १ ते ३ मध्ये उकडताना/ भाजताना मीठ वापरू नये. टॉपिंग मधे चालू शकेल.
४. टॉपिंग मधील चटण्यांमध्ये गोडतेल/ तूप वापरल्यास उत्तम.
५. सलाड मध्ये पांढरा/लाल/ हिरवा/ नारंगी/जांभळा/पिवळा/काळा/तपकिरी यातील कमीत कमी ३ रंग दिसायला हवेत.
६. बाजारात मिळणारे सलाड ड्रेसिंग, टॉपिंग्स वापरता येणार नाहीत.
७. सलाड वर घरगूती ड्रेसिंग, टॉपिंग वापरले तर त्याचे सर्व घटक आणि प्रमाणासोबत त्याची पाककृती देणे बंधनकारक आहे.
८. सलाड चविष्ट असणे बंधनकारक आहे.

विषय क्र २ - "एकादशी दुप्पट खाशी"

उपास करण्याची जशी कारणे अनेक, तसेच काय खावे, काय खाऊ नये ह्या नियमावलीच्या आवृत्याही अनेक!
त्यामुळे फास्ट फूड ही संकल्पना जातीच्या खवय्यांसाठी आणि त्यांना खिलवणाऱ्यांसाठी उदयास आली. फास्ट फूड म्हणजे उपासाचे विविध पदार्थ बनवून /खाऊन लोक उपास साजरे करत असतात.
तर मंडळी, अशाच खवय्यांसाठी मायबोली गणेशोत्सवात घेऊन आलो आहोत, 'एकादशी दुप्पट खाशी ' स्पर्धा!!
उपासाचे (साबुदाणा आणि वरई वगळून) गोड किंवा तिखट असे पदार्थ बनवायचे आहेत.

उपासाला चालणारे घटक :
घटक १: धान्य/पीठे: शिंगाडा, राजगिरा, शेंगदाणे , राजगिरा लाही
घटक २: सगळी फळे
घटक ३: भाज्या /कंद : बटाटे, काकडी, राजगिऱ्याचा पाला, रताळी
घटक ४: चवीचा मालमसाला: पांढरे मीठ, काळे मीठ, सैंधव, जिरे, हिरव्या किंवा लाल मिरच्या, गूळ, साखर , मध , दूध , दही, तूप , तेल , लाल तिखटाची पूड, मिरेपूड , मिरे , कोथिंबीर (काही जण उपासाला खातात कोथिंबीर, काही जण नाही खात, ठरवा तुम्हीच काय करायचं ते , नियमानुसार चालेल )

एकादशी दुप्पट खाशीसाठी नियमः
१. वरील यादीमधील कोणते विशिष्ट घटक वापरावेत ह्यावर कुठलेही बंधन नाही, यादीबाहेरील घटक वापरू नये.
२. घटक क्र २ वापरल्यास ते कच्चेच वापरावेत, शिजवू नये.
३. बाजारात तयार मिळणारी भाजणी वगैरे वापरू नये.
४. सोबतीला आमटी ,चटणी इत्यादी असेल तर त्याची कृतीसुद्धा वरील नियमांत बसणारी असावी आणि सर्व घटक ,प्रमाणासोबत पाककृती देणे बंधनकारक आहे.

दोन्ही पाककृतीसाठी नियम:-

१. प्रवेशिका पाठवण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १३ सप्टेंबर २०१८ ला खुला करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०१८' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१८ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे "रंगीबेरंगी पौष्टिक सलाड"/ "एकादशी दुप्पट खाशीसाठी" - <<< पदार्थाचे नाव >>> - <<< आयडी >>>"
५. प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
६. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती इथे मिळेल.
६.१ लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
६.२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.
७. पाककृती शाकाहारी असावी आणि अल्कोहोलाचा वापर नसावा.
८. एक आयडी एका विषयाच्या कितीही प्रवेशिका देऊ शकेल.
९. स्पर्धेचा निकाल मतदानाद्वारे काढला जाईल.
१०. 'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही विनंती.
११. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून १३ सप्टेंबर २०१८ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत २३ सप्टेंबर २०१८ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
१२. पाककृती पूर्वप्रकाशित नसावी.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त स्पर्धा संयोजक.
कृपया शुद्धलेखन आणि मुशो परत एकदा तपासाल का?
दोन्ही स्पर्धांकरता जे नियम समान आहेत ते दोनवेळा देण्याऐवजी एकदाच द्या की (नियम क्र. ८ पासून पुढले)!

छानच!!!
सलाड चविष्ट असणे बंधनकारक आहे.>>>हा नियम केलात ते बरे केले Happy

पहिली स्पर्धा अगदीच फुस्स्स आहे. कुठल्याही सलॅड शॉपच्या मेनुमधून पर्म्युटेशन/काँबिनेशन्स करून किमान शंभर रेसिपीज सहज बनतील!

मस्त स्पर्धा!
सॅलड स्पर्धेचा आठवा नियम पाळला जातोय हे कसे तपासणार? Wink ह. घ्या

छान स्पर्धा,

उपासाच्या पदार्थात खोबरे/शहाळे चालेल का?

वरचं पोस्टर सुंदर आहे. आत्ता लक्ष गेलं.

<फास्ट फूड म्हणजे उपासाचे विविध पदार्थ बनवून /खाऊन लोक उपास साजरे करत असतात.> हे असंच म्हणायचंय की तिरक्या अक्षरांत लिहायचं राहिलंय?

उपासाला चालणार्‍या पदार्थांत दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ असतात ना? ते नाही का समाविष्ट करता येणार वरच्या यादीत? (झाले प्रश्न सुरू Wink )

सिम्बा,

सलाडमधे फोडणी चालणार नाही. चटण्या करताना वापरलेले गोडंतेल आणि तूप चालू शकेल.

सिम्बा,
उपासाच्या पदार्थात खोबरे/शहाळे चालेल का?>> हो चालेल, कारण नारळ/शहाळे हे फळ आहे

मस्त कल्पना दोन्ही .

भरपूर प्रवेशिका येऊन रंगतदार होऊ दे स्पर्धा !

सलाड चविष्ट असणे बंधनकारक आहे.>>>हा नियम केलात ते बरे केले ☺

पोस्टर मस्त! दरवर्षी प्रमाणे स्पर्धा चविष्ठ, रंगीष्ठ होईलच.. सर्व सुगरणी, बल्लवाचार्यांना शुभेच्छा!

उपासाला चालणार्‍या पदार्थांत दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ असतात ना? ते नाही का समाविष्ट करता येणार वरच्या यादीत?>>>>> हेच विचारायचे होते .

दुध, दही, ताक, पनीर चालेल ना ?

आत्ता परत वाचले नियम तर दूध , दही दिसतेय त्यात. पण ताक आणि पनीर चे काय?

पोस्टर सुरेखच आहे .
स्पर्धेत नाविन्य काहीच नाही (हेमावैम) , बाकी सृजनशीलता सुगरणींना दाखवावी लागणार Happy

काहीही नाविन्य नाही. आणि सलाड म्हणून बनवणे हे काही खूप कौशल्याचे काम वाटत नाही ( हे वापरास दिलेल्या घटकांवरून आणि पर्यांयावरून).
नेटवरून रेसीपी उचलून ‘अ’ नावाचा जिन्नसचे नाव ‘आ‘ करून लिहून पदार्थ लिहून द्यायचा आणि सांगायचे माझी रेसीपी आहे असे प्रकार खूप पाहिलेत इथे. Wink
आणि हेच लोक बोंबलतात, नेट वरून घेतलीय तर सोर्स लिहित नाहीत(स्वतः तेच करतात तरी सुद्धा). Wink

ते सुका मेवा वापर इतका तोच तोच पणा आणणारा घटक आहे. खजूरचे लाडू, सुका मेवा रोल वगैरे इतक्यांदा रिपिट होते गेल्या बर्‍याच स्पर्धेच्या रेसीपीत.

सलाड चवीष्ट हे कोणाच्या नजरेतून( जिभेवरून वाचा)? खायला करून पहायला लोकं तयार असतील आणी वोट करतील तर ठिक.

आमच्याकडे उपवासाला भेंडी चालते, भोपळा चालतो. मिरे, मिरेपुड चालत नाही. टोमॅटो हे फळ आहे Wink

यादी बाहेरील घटक वापरु नयेत ही मात्र हिटलरशाही आहे ( ह. घ्या)

स्पर्धा फार अवघड वाटत नाहीये यावर्षी पण बरंय, बर्याच प्रवेशिका येतील

कोणत्याही खाण्यायोग्य बिया, आणि धान्य हे रिपितेशन नाहीये का?

कोणतेही कडधान्य , कॉर्न, हे घक्र 1 आणि घक्र 4 मध्ये कुठेही मोडू शकते

पत्ता गोबी आपण पालेभाजी या प्रकरात धरला आहे.

खाण्यायोग्य बिया यामधे कच्च्या खाल्ल्या जाणार्‍या उदा. सुर्यफुल, भोपळा अशा बिया अपेक्षित आहेत. तसे पाहता बरीच धान्ये, कडधान्ये, सुका मेवा बिया या प्रकारात मोडू शकेल. बर्‍याचशा ह्या कच्च्या बिया चविष्ट असतात आणि सलाड मधे चव आणू शकतात म्हणून त्या घटक ४ मधे सुद्धा दिल्या आहेत.

Pages