यात्रा

Submitted by हरिहर. on 31 August, 2018 - 06:42

आमचा सगळा पट्टा तसा सधन. पावसावर होणारी शेती अगदीच नावाला किंवा मग गरजेपुरती. म्हणजे बाजरी, ज्वारी यासाठी. आमच्या वरच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण जास्त. त्यामुळे तेथे मात्र भातशेतीच प्रमुख. हा भाग म्हणजे माळशेज घाटाचा परिसर. साधारण घाटाच्या अलीकडील, म्हणजे कोळेवाडी, मढ, करंजाळे वगैरे. पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या कुशीत वसलेली गावे. भात खावा तर याच भागातला. आजी सांगायची “भाताच्या पेजेत वात वळून लावली तर दिवा पेटायचा आणि भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा.” अर्थात पिढ्या दर पिढ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा घसरत गेला. तरी आजही पानात मढचा भात नाही पडला तर घास गिळत नाही हे खरे. माझ्या आजीचे माहेर मढ. म्हणजे वडीलांचे आजोळ. आताच्या काळात कोण इतकी जुनी नाती सांभाळत बसणार आहे? पण या तांदळाच्या मोहाने मी मढबरोबरचं माझं नातं अगदी घट्ट ठेवलय. एकवेळ मी माझ्या आजोळी जाणार नाही पण वडीलांच्या आजोळी जायची टाळाटाळ करणार नाही. अहो, हातसडीचा तांदूळ म्हणजे काय हे माहीत नसलेल्या या काळात माझ्या घरी वर्षभराचा हातसडीचा तांबुस गुलाबी तांदूळ मढहून घरपोच होतो. मढहुन जुन्नरला उजव्या हाताला ठेवत खाली उतरले की कोळेवाडी, डिंगोरे करत मग ओतुर लागते. हेच माझे गाव. गावाचा प्रमुख व्यवसार म्हणजे शेती. माझे गावही ओतुर आणि आजोळही. कारण आई याच गावातली. अर्थात मामाचे घर गावापासून चार साडेचार किलोमिटर दुर मळ्यात होते. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायचे म्हणजे चालतच जायचे. रस्ता जरा दुरुन जायचा. पण आम्ही कधी रस्ते वापरलेले आठवत नाही. आमच्या शेताच्या बांधावरुन चालायला सुरवात केली की मग या शेताचा बांध, त्या शेताचा बांध असं करत करत तासाभरात रमत गमत, चिखलाने पाय, कपडे बरबटत आम्ही मामाच्या विहिरीवरच पोहचायचो. विहिर अगदी चिरेबंदी बांधलेली होती. तेथे हातपाय धुवून मग मामाच्या घरी. कधी कधी तर विहिरवर हातपाय धुवून तेथेच विहिरीत लोंबकळणारी सुगरनींची घरटी काढत रमायचो. मामाचे केंव्हा तरी लक्ष गेले की मग आमची वरात घरी जाई. मिठ मिरची आणि भाकरीचा तुकडा उतरुन टाकला की मगच आजी घरात घ्यायची. मग चार दिवस नविनच आलेली मामी फक्त आमच्याच सरबराईत असायची. मामी गोरीपान नसली तरी छान होती. ती आम्हा लहान मुलांना अहो जाहो करायची. कारट्या, गाढवा असल्या हाका ऐकायची सवय असलेल्या आम्हाला ते तर भारीच वाटायचं. माझा चुलत भाऊ तर अगदी लहान होता. तोही हट्ट करुन आमच्याबरोबर यायचा. भिती वाटते म्हणून शी करायला मामीला सोबत घेऊन जायचा. मामीच्या एका हातात तांब्या आणि दुसऱ्या हाताचे बोट धरुन भाऊ. शी झाली की शर्ट वर करुन पोटाजवळ धरुन मामी समोर वाकून उभा रहायचा.
त्यावेळेसही मामी त्याला अहो जाहो करत म्हणे “अहो निट उभे रहा पाहू. शर्ट वर धरा अजुन”
आमची तर हसुन हसुन मुरकुंडी वळत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचे वेगवेगळे प्लॅन असत. पण त्या यादीत मात्र मामाकडे जाणे नसायचे. दिवाळीलाही एखाद दिवस आम्ही मामाकडे जाऊन यायचो. पण श्रावण महिना सुरु झाला की कधी एकदा मामाकडे जातो असे व्हायचे. आमच्या भागातल्या बहुतेक गावांच्या यात्रा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे असायच्या. किंवा त्याच्या आगेमागे असायच्या. या यात्राही साधारण तिन दिवस चालत. पण उन्हाळ्यातच. पण आमच्या गावची यात्रा मात्र श्रावण महिन्यात यायची. श्रावणात जितके सोमवार असतील तितके दिवस यात्रा. बरेचदा चार दिवस, तर कधी कधी पाच दिवस. म्हणजे दर सोमवारी यात्रा भरे. मग आमची यात्रेची तयारी सुरु व्हायची. श्रावण सुरु व्हायच्या आधी पावसाचा अंदाज घेवून मामाकडे जायचे. मग मामा आम्हा सगळ्यांना त्याच्या शिंप्याकडे घेऊन जाई. शर्ट आणि चड्डीची मापे दिली जात. मग दुपारपर्यंत मामा आम्हाला घरी सोडीत असे. नंतर पहिल्या सोमवारची वाट पहाणे एवढेच काम असे. अधुन मधून शिंप्याकडे चक्कर मारुन “बटन लावायची राहीली आहेत फक्त” हे ऐकून यायचे. मला आठवत नाही तेंव्हापासुन ते अगदी बारावीपर्यंत आमचा हाच शिंपी होता. आणि इतके वर्षे ‘आमची त्याच्याकडची चक्कर’ आणि त्याचे ‘ठरलेले उत्तर’ काही बदलले नाही कधी. अगदी मापे दिल्यानंतर तासाभरातच जरी विचारले “भरतकाका, कपडे?” तरी काका म्हणनार “झालेच, फक्त बटने लावायची आहेत.”
कपड्यांचे काम उरकले की वडील आम्हाला ‘बापुसाहेबा’कडे पाठवायचे. बापुसाहेब म्हणजे आमचा फॅमीली डॉक्टरसारखा फॅमीली न्हावी. त्याच्या दुकानात दोन खुर्च्या आणि दोन मोठे आरसे असत. आडव्या फळीवर त्याची हत्यारे असत. भिंतीवर एक चामड्याचा जाड पट्टा टांगलेला असे. तो एका हातात धरुन दुसऱ्या हाताने बापु वस्तरा वर खाली फिरवत च्यटक फटॅक असे मजेशीर आवाज काढे बराच वेळ मग गिऱ्हाईकाची दाढी करायला घेई. आमची कटींग मात्र खाली मांडी घालूनच करी. आरसा नाही नी काही नाही. त्याच्या समोर मांडी घालून बसलो की मान त्याच्या ताब्यात द्यायच्या अगोदर मी त्याला सांगायचो “हे इथले केस मोठेच ठेव, इकडचे जरा जरा बारीक कर, भांग इकडून पडला पाहीजे” वगैरे. बापु अगदी लक्षपुर्वक ऐकुन घेई. मग एकदा त्याच्या मशीनचे कट कट सुरु झाले की संपेपर्यंत मान वर करायची सोय नसे. थ्रीडी साउंड सारखा त्याच्या हत्यारांचा आवाज डोक्याच्या वेगवेगळ्या भागातुन येत राही. अचानक गाफील असताना बापु एकदम भुस्स भुस्स करीत पाण्याचा फवारा उडवी आणि श्वास अडकल्यासारखे होई. खसा खसा डोके स्वच्छ पुसुन बापु एखादी लाकडी पेटी झटकावी तसे माझ्या अंगावरचे केस झटकी. मग मी बापुची कलाकारी पहायला आरशासमोर उभा राही. आणि दरवेळे प्रमाणे बापुने आमचा पार भोपू केलेला असे. वडीलांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे काम झालेले असे. मग आम्ही भावंडे नाराज होवून घरी यायचो. अर्थात ही नाराजी सकाळपर्यंतही टिकत नसे हा भाग वेगळा. कपडे, केस या गोष्टी झाल्या की आमची श्रावणाची तयारी होई. श्रावणात आम्ही मुले फारच आज्ञाधारक, शिस्तीचे वगैरे व्हायचो. आईनी सांगितलेली कामे त्वरीत करायची. अभ्यास वेळेवर करायचा. मस्ती कमी कराची. अश्या विविध मार्गाने आम्ही आईपर्यंत ‘आम्ही शहाण्यासारखे वागतो’ हे पोहचवायचो. कारण ‘यात्रेत खाऊ आणि खेळणी’ यासाठी किती पैसे मिळणार ते या शहाणपणावरच अवलंबून असे.

हळूवारपणे श्रावण येई. पहिल्या सोमवारी असणाऱ्या यात्रेत आम्हा मुलांना फारसा रस नसायचा. कारण पहिल्या सोमवारी घरातली सगळी मोठी माणसे पहाटेच उठून दर्शनाला जाऊन येत. मग दिवसभर दर्शनासाठी रांगच लागे. यात्रेतली खेळण्याची दुकाने, पाळणे, मिठाईची दुकाने यांची मांडामांड पहिल्या सोमवारी सुरु होई. त्यांनाही पहिल्या सोमवारी फारसी गिऱ्हाईके नसतच. पहिल्या दिवशी फक्त पेढ्यांची आणि बत्ताश्यांची दुकाने लागत. अधुन मधून अबिर-गुलाल, हळद-कुंकू यांची चमकदार रंगाची दुकाने असत. त्या रंगांच्या पार्श्वभुमीवर तुळशी आणि बेलपानांची दुकाने खुप खुलून दिसत. श्रावणातल्या सरींचा आणि उन्हाचा खेळ सुरु असे. शंकराचे मंदिर आणि केशव चैत्यन्यांची समाधी मांडवी नदी काठी आहे. गावापासुन जरा दुर. आजुबाजूला शेती. त्यामुळे या यात्रेसाठी बरेचजण आपल्या शेताचा काही भाग न पेरता तसाच ठेवत. यात्रेकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांपैकी एक रस्ता आमच्या शेतातूनच जाई. पण आजोबा इतरांसारखे शेत मोकळे न ठेवता त्यात मेथी, कोथिंबीर, गाजर या सारखे काही ना काही लावत असत. अर्थात हे यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी असे. ज्याला जे हवं ते त्याने घेऊन जावे हा हेतू असे. दुसऱ्या सोमवारी मात्र सकाळी सकाळी वडील आम्हाला यात्रेसाठी थोडे थोडे पैसे देत. अर्थात कित्येकदा हे पैसे खर्चही होत नसत. एकदा आम्हा मित्रांची टोळी यात्रेत घुसली की खावू वगैरे घ्यायचे भानच रहात नसे. कारण यात्रेसाठी येणारे पाहुणे खुप खावू घेवूनच येत. यात्रेत गेल्यावर पहिल्यांदा दर्शन घेतले की मग आम्ही उंडारायला मोकळे. दिवस कसा जाई हे समजतही नसे. सुर्य अस्ताला गेलेलाही ढगांमुळे कळत नसे. यात्रेतले पेट्रोमॅक्स लागायला सुरवात झाली की पावले घराकडे वळत. आम्हा भावंडांना अंगणात रांगेत उभं करुन आई कडकडीत पाण्याने आंघोळ घाली. अर्थात यात श्रावणाचा किंवा सोमवारच्या उपवासाचा काही भाग नसे. आम्ही चिखलाने इतके बरबटलेलो असायचो की अंघोळीशिवाय घरात पाऊल टाकणेच शक्य नसे. मात्र कढत पाण्याने अंघोळ केली की मग मात्र दिवसभर न जाणवलेली भुक जाणवे. आजोबांनी केळीची पाने आणलेली असत. या महिन्यात बाबांना बेलाची पाने आणि आईला वेगवेगळ्या व्रतांसाठी ‘पत्री’ आणायचे काम आम्हा मुलांकडेच असे पण केळीची पाने आणायचे काम फक्त आजोबाच करत. तेही महिनाभर. केळीच्या बागेतून निवडून पाने आणत जी तशीही कापायचीच असत. एकवेळ पत्रावळीवर उपास सोडतील पण केळीची चांगली आणि कोवळी पाने कधी तोडत नसत. आम्ही म्हणायचो “आपले आजोबा जरा विचित्रच आहेत नै?” मग सगळ्यांची पंगत बसे. आजोबा नैवेद्य दाखवत. एक नैवेद्याचे पान गोठ्यात जाई. एक पान शेतातल्या विहिरीला जाई आणि मग पंगत सुरु होई. आई सुगरणच होती पण श्रावणाच्या महिन्यात तिच्या हाताला काय सुंदर चव येई! मग आमची अंथरुने पडत आणि निजानिज होई. कित्येकदा अती भटकण्यामूळे पाय असह्य दुखत. अशा वेळी आई माझे पाय चुरुन देत असे. आई पाय दाबत असतानाच आम्ही मुलं पुढच्या सोमवारची स्वप्ने पहात झोपी जात असू.

आम्ही जसजसे मोठे होत गेलो तसतशी यात्रेतली आमची आकर्षणे बदलत गेली. यात्रा तिच होती, तशीच होती पण आमची जाण वाढली आणि आवडीनिवडी बदलायला लागल्या. नववी दहावीला असताना आम्हाला यात्रेतले पाळणे न दिसता कुस्तीचे आखाडे दिसायला लागले.
आजोबा थकले होते. ते म्हणायचे “तो जटाधारी गाभाऱ्यात नाही बसला तुमच्या शिवामुठींची आरास पहायला. तो बसलाय आखाड्यात. एका मुठीतुन दुसऱ्या मुठीत जाणारी लाल माती पहात. त्याचं दर्शन घ्यायचे असेल उतरा आखाड्यात.”
त्यामुळे सहावीपासुनच आम्ही यात्रा पहायला जाताना चड्डीच्या आत लंगोट कसुनच जायचो. यात्रेत भटकून होईपर्यंत दुपार व्हायची आणि आखाडा मानसांनी फुलायला लागायचा. आमची पावलेही तिकडे वळायची. पहिले दोन तास आमच्या सारख्या पहिलवानांच्या कुस्त्या व्हायच्या. अर्थात बक्षीस असायचे दहा रेवड्यांचे. त्या कुस्त्यांना नावच मुळी ‘रेवड्यांच्या कुस्त्या’ असे. आम्ही चड्डी शर्ट काढून आखाड्यात उतरायचो. या आखाड्यात मात्र आजोबांचा दरारा काही कामी येत नसे. येथे खरी कुस्ती होई. ‘रावबा पाटलाचा नातू’ म्हणून आमची गय केली जात नसे, लाडही केले जात नसत. पहिल्या काही कुस्त्या मी हरत असे. पण ‘जोपर्यंत समोरच्याला आभाळ दाखवत नाही तो पर्यंत आखाडा सोडणार नाही’ ही खुमखूमी असल्यामुळे पाय रोवून दुसरी जोड शोधत असे. तास दोन तास प्रयत्न केले की मग कुठे कुणाला तरी आस्मान दाखवण्यात यश येई आणि हातात दहा रेवड्या पडत. मला आजही आठवते, दहा रेवड्या आणि भगवा पटका हे बक्षीस असले तरी मी कधी पटका बांधून घेतला नाही. रेवड्या शर्टमधे बांधून एका बगलेत दाबायच्या तर दुसऱ्या बगलेत पटक्याची घडी दाबायची. आणि नुसत्या लंगोटावर शेताच्या बांधावरुन उड्या मारत, ओरडत घरी यायचे. बाकी भावंडे आणि मित्र जयजयकार करायला असायचीच. आमचा गदारोळ ऐकून आजोबा बाहेर येत. त्यांच्या हातावर पटका ठेवायचा आणि त्यावर रेवड्या ठेवायच्या. आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं. मग आजोबा पटक्याची घडी मोडून मला चांगला घट्टमुट्ट फेटा बांधायचे. वर छान तुरा काढून द्यायचे, पाठीवरचा पटक्याचा शेव खांद्यावरुन पुढे काढायचे. बाबांना, आईला दाखवले की अंगणातल्या अंघोळीच्या दगडावर बसायचे. आई पटक्याला सांभाळत मानेपासून खाली अंघोळ घाली. पदर भिजवून त्याने तोंड स्वच्छ पुसून देई. खास यावेळेसाठी राखून ठेवलेला ड्रेस काढून देई. ते नविन कपडे घालून, थोडंस दुध वगैरे पिवून आम्ही सगळी मुलं मग परत मावळत्या उन्हात बाहेरुन आलेल्या पहिलवानांच्या कुस्त्या पहायला परत यात्रेकडे निघायचो. पुढे कॉलेजला गेल्यावर मात्र हा कुस्त्यांचा आखाडा फक्त पहाण्यापुरता उरला. त्यात उतरायची धुंदी कमी कमी होत जावून शेवटी संपली. आता नामांकित पहिलवानांच्याही कुस्त्या पहायला जाण्यात रस राहीला नाही. आजोबाही राहीले नव्हते. रात्रीची जेवणे उरकून नवू दहा वाजता आमची पावले यात्रेकडे वळू लागली. आज कोण आलंय? याची चौकशी व्हायची. आवडता गायक असेल तर फर्माईशी आठवून ठेवायच्या. त्या हट्टाने गायला लावायच्या. पहाटेच्या भैरवीनंतरच आम्ही घराकडे परतायचो. रात्रभर रंगलेल्या भजनातल्या काही काही जागा अगदी डोक्यात बसलेल्या असायच्या. त्या मनातल्या मनात घोळवतच अंगणात पावूल पडायचं. एव्हाना आई उठलेली असे. ती सडा घालायचे काम थांबवून विचारी “एवढ्या वेळ थांबतं का रे कुणी भजनाला! अंघोळ कर आणि मग झोप हवं तितकं.”

पोटामागे शहरात आलो. मित्रही कुठे कुठे व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने पांगले. काही गावीच राहीले. आता वर्षातुन दोन तिन वेळा सगळे एकत्र येतो. त्यातल्या त्यात यात्रेला आवर्जुन. मग दहा अकरा वाजता सगळे मिळून दर्शनाला जातो. दर्शन झाले की तसेच मंदिराच्या पलिकडील बाजूला उतरुन नदिकाठी निवांत जागा पाहून बसतो आणि यात्रेजवळच बसुन यात्रेच्याच आठवणी काढत रहातो.

किती वर्षे झाली, मी यात्रेला जावूनही यात्रा पाहिलीच नाही. यावेळी नेमकी रविवारी नारळीपौर्णीमा आली. मग फोनाफोनी करुन सगळ्या भावांना कल्पना दिली. दुपारपर्यंत एक एक करत सगळे जमा झालो. मुलांनी एकच कल्ला केला. राख्या बांधल्या गेल्या. नारळीभाताची पंगत झाली. रात्री ढगातून चंद्र कधी दिसत होता, कधी नाहीसा होत होता. अंगणात चटया टाकल्या. सगळ्या पोरांना गोळा केलं आणि ‘आमच्या लहानपणीची यात्रा’ कशी होती ते तास दिड तास भान हरपुन सांगत बसलो. आश्चर्य म्हणजे मुलांनी सगळं डोळे मोठे करीत ऐकलं. आयपॅड, मोबाईल गेमची कुणी आठवणही नाही काढली. "आम्हालाही यात्रा पहायची आहे!” चा गजर झाला. मला बरं वाटलं. ‘आपल्याला वाटतं तेव्हढी काही मुलं गावाला दुरावली नाहीत अजुन’ हे पाहून भरुनही आलं. सकाळी भरपुर खिचडी आणि दह्याचा नाष्टा करुन आमची मिरवणूक यात्रा पहायला घरातुन बाहेर पडली. आणि या पोरांच्या नादाने मी परत एकदा ती लहानपणीची आमची यात्रा डोळे भरुन पाहिली. तिच गोडीशेवेची दुकाने, अबिर गुलालाची ताटे, तेच लाकडी बैल आणी बैलगाड्यांचे स्टॉल्स, प्रसादाचे पेढे आणि बर्फीची ताटे, उत्साहानी ओसंडणारी रंगीबेरंगी माणसे, गृहपोयोगी वस्तुंच्या दुकानांच्या जरा सुधारीत आवृत्या. दर्शन झालं, केशव चैत्यन्यांच्या समाधीवर सगळ्या पोरांनी मनोभावे डोकं टेकवलं. समाधीच्या आवारात बसुन ‘तुकाराम महाराजांचे सद्गुरु केशव चैत्यन्य आहेत’ हे सांगुन त्यांची छोटीसी कथा मुलांना ऐकवली. तोपर्यंत आखाडा माणसांनी फुलला होता. त्या गर्दीत प्रत्येकाला आळीपाळीने खाद्यावर घेवून दंगल दाखवली. हायजेन अनहायजेनचा विचार न करता मुलांना रेवडी, गुडीशेव खावू घातली. गेले दहा वर्ष एक काका यात्रेला न चुकता हजेरी लावतात. ते स्टिलच्या ताटावर वेळू ठेवून त्यातून आवाज काढतात आणि त्या तालावर कबिराची भजने म्हणतात. आम्ही त्यांना कबिरकाकाच म्हणतो. मुलांना त्यांची भजने ऐकवली. वेळूतुन आवाज काढून पाहीला मुलांनी. नविन काहीतरी पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हळू हळू यात्रेतल्या पाळण्यांवरची रोषणाई चमकू लागली तसे आम्ही घराकडे वळालो. सगळ्या बच्चेकंपनीला अंघोळी घातल्या. केळीच्या पानावर पंगत बसली. हसत खेळत पोरांची जेवणं उरकली. सगळ्यांची झोपायची सोय करुन मग आम्ही सगळे जेवायला बसलो. गप्पा मारत, आईच्या चौकशीला उत्तरे देत देत जेवणं उरकली. झोपायच्या अगोदर मुलांकडे एक चक्कर टाकली. दहा वाजले असावेत. सगळे गाढ झोपले होते. दिवसभरात एकदाही शहराची आठवण न आलेली पिल्लं मस्त एकमेकांच्या अंगावर हात पाय टाकून झोपली होती. झोपेतही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होतं. या सगळ्या मुलांमध्ये मला माझंच बालपण दिसत होतं

यात्रेत प्रवेश करतानाच ही हळदी कुंकवाची, गुलालाची दुकाने दिसतात.
1_0.jpg
सगळीकडेच खेळण्यांची दुकाने दिसतात पण यात्रेत सगळ्यात जास्त आवाज असतो बासऱ्यांचा आणि 'पिपाण्यांचा'
2_0.jpg
आम्ही लहानपणी जी लाकडी खेळणी खेळलो त्या खेळण्यांचे स्टॉल्स आयपॅडच्या जमान्यातही दिसतात. हिच यात्रांची खरी ओळख आहे असं मला तरी वाटतं.
3.jpg
हे आपलं सहज जाता जाता क्लिक केलं होतं.
4.JPG
आणि हे ही. प्लॅस्टीकच्या वस्तु आता जास्त दिसायला लागल्या आहेत यात्रेतही.
7.jpg
पुर्वीची चव राहिली नसली तरी ही शेव मात्र अनेक यात्रेत दिसतेच. जणू या शेवे शिवाय यात्रा होणारच नाही.
5.jpg
हा चिमुरडा हार विकताना दिसला... (या वयात आम्ही मस्ती करायचो)
12.jpg
हा पाळणा लहान मुलांचे प्रमुख आकर्षण. (मी मात्र आजवर कुठल्याही छोट्या मोठ्या पाळण्यात बसलो नाही.)
8_0.jpg
आणि कुस्तीचा आखाडा नाही ती खरी यात्राच नाही.
10.jpg
हा कुस्तीच्या आखाड्याचा पॅनोरमा.
9.jpg
"चला घरी." आमच्या शेतातून घराकडे परतनारे भाविक.
11_0.jpg
ही आमची मांडवी नदी.
IMG_5253.jpg

फोटो खुप आहेत. आमच्या 'मांडवी' नदीचेही फोटो टाकायचे राहीलेच. असो. काढा कधीतरी वेळ आणि या आमच्या यात्रेला. आमची यात्राच नाही तर संपुर्ण जुन्नर तालूकाच अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात तर त्याच्या सौदर्याला अगदी भरते येते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान वर्णन.. मी लहान असतानाच्या खूप आठवणि ताज्या केल्यात शाली तुम्ही. धन्यवाद. हेच विरंगुळ्याचे क्षण असायचे तेव्हाचे.
विजेरी पाळणा, ती लाल शेव, रेवड्या, पिपाण्या, प्लास्टीकच्या बाहुल्या, २ रू. ची कानातली सगळे काही आठवले.

"भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा." वरून च वाटले, ओतूर चा
"इन्द्रायणी" असणार! वडील ओतूर ला होते काही वर्ष..तेव्हा खूप खाल्ला.. तूपकट आणि सुवास असलेला

द्राक्शे सुध्धा खूप खाल्ली त्या काळात.. यात्रे बद्दल माहीत नव्हते, आत्ता कळले तुमच्याकडून !

खूप ओघवतं वर्णन ... सुंदर फोटो... मी ही अश्या कुठल्याही यात्रेला गेले नाही.. तुम्ही छान सफर घडवलीत.. धन्यवाद!

खूप ओघवतं वर्णन ... सुंदर फोटो... मी ही अश्या कुठल्याही यात्रेला गेले नाही.. तुम्ही छान सफर घडवलीत.. धन्यवाद!>>>>+१.
किती समृद्ध बालपण गेलंय आणि पुढच्या पिढीपर्यंतही त्याचा वारसा पोहोचवलात हे मस्त.
बाकी केशव चैतन्यांची कथा एका धाग्यावर टाका की.

शाली, माझे गाव ओतुरपासून पाच सहा किमी असेल. आमच्या गावात यात्रा भरत नाही त्यामुळे ओतुरची यात्रा हिच आमची यात्रा. तुम्ही वर लिहिलेले प्रत्येक वाक्य रिलेट झाले कारण मिही हिच यात्रा पाहात मोठा झालो. दरवर्षीप्रमाणे यावेळेसही यात्रेला गेलो होतो. खुप सुंदर लिहिला आहे लेख. तुम्हाला भेटायला आवडेल.
कृपया मेल चेक करा.

मस्त लेख आणि मस्त आठवणी. मुंबईत जन्माला येऊन तिथेच मोठी झालेल्या माझ्यासारखीला हे सगळं खूप नवलाईचं वाटतं. एखादे वर्षी ही यात्रा पहायला मिळावी अशी इच्छा आहे. 'कायनात' कधी कृपा करते पाहू. Happy

Khup Chan lihita tumhi. Anil avchat pan Otur che aahet. Tyani pan tandlachya pindi baddal lihilel vachal Aahe. Yatra mastch...

अतिशय सुन्दर शालि,
आमच्याहि हुबेहुब आठवनिन्ना शब्दात उतरविल्या बद्दल .
परन्तु आपल जुन्नर ग्रुप मात्र ओसाड दिसतोय , बरेच दिवस कोनि तिकडे भ र कट लेलेहि दिसत नाहि .
मी स्वतः गायब तर ईतरान्ना काय म्हनु.
परन्तु तुमच्या सार ख्या कुशल लेखकान् च्या मदतिन चालु राहिला तर फारच उत्तम .

Pages