तर्क द लॉजिक (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 26 August, 2018 - 15:37

(सूचना जोर गरम:
ही नवीन, स्वतंत्र कथा आहे, या कथेचा काथ्याकूट सिरीजशी काहीही संबंध नाही, काथ्याकूटच्या पुढच्या भागाचं लेखन सुरु आहे, लवकरच पोस्ट करेन)
................................................................................................................................

"कथा कशी आहे?"
"चांगली आहे..."
"छापून येईल ना...?"
"ना.......ही"
का??
"तुमच्या कथेत लॉजिक नाही" संपादक मला म्हणाले.
"लॉजिक नाही??" असं म्हणत मी खुर्चीतून उठलो, तसे माझ्यासमोर बसलेले संपादक महाशय दचकले, शेजारच्या आयताकृती, पारदर्शक काचेच्या फिशटॅंक मधले मासे फिरायचे थांबले, माझ्याकडे बघू लागले. तुम्ही काय बघताय? गुमान फिरा..

मी "ठसका" नावाच्या मासिकाच्या कार्यालयात होतो, मासिकाची टॅगलाईन होती "वाचून लागेल..." पण मला इथे ऊन लागत होतं, या कार्यालयाला छप्पर नव्हतं, भिंती नव्हत्या, कार्यालय गच्चीवर होतं, संपादकांना बंदिस्त गोष्टी आवडत नसत.
"चिल्ल.. ज्यूस घ्या" लस्सीचा ग्लास पुढे सरकवत संपादक मला म्हणाले.
चिल? ज्यूसला का मला म्हणाले ?
"सॉरी.. आय एम ऑन डाएट" मी म्हणालो.
मला या ज्यूसमध्ये रस नव्हता.
"सुगरफ्री ऐ.."
"मला नकोय.."
"काय राव, तुम्ही टेन्शन घेऊ नका"
"मग काय करू?" मी विचारले
"लॉजिक शोधा, लॉजिक मिळालं ना, कथेत मॅजिक येईल" संपादक म्हणाले.

कथेत लॉजिक नाही? कथा रापचिक असूनही किती ही झिक झिक??
मी शब्द मांडून, विचारांशी भांडून, झोपेला आडवून, पाठीचा कणा मोडून, पालथं पडून, मग टेबलवर चढून, अवघडून, थोडंसं रडून, भावनांशी लढून, सूर्यास्त बघून, रात्र जागवून, सूर्योदय पाहून, कॉफी पिऊन, कथा लिहून काढली होती, "वाचाल तर नाचाल" या मथळ्याखाली, संपादकाला ई-मेल धाडला, संपादक कथा वाचून फार नाही पण ठार वेडा झाला. पौंर्णिमेला कथा पाठवली, अमावास्येला संपादकाने फोन केला, मग भेटायला बोलावले आणि कथेत लॉजिक नाही? का? मनातला राग, डोक्यातली आग काढून कथा लिहिली आणि तुम्ही कथेत लॉजिक मागता? असे का वागता? कथेत तर्क नाही अशी तक्रार करता? तुम्ही कितीही तक्रार केली तरी मी माघार घेणार नव्हतो.

"लॉजिक कुठं मिळेल?" मी विचारले.
"लॉजिकवाडीला. तिकडे लॉजिक मिळेल, तुम्हाला तिथेच जावं लागेल" संपादक ज्यूस पीत म्हणाले.

मी लॉजिकवाडीचं नाव ऐकून होतो. ज्या लोकांना लॉजिक मिळत नसे ते लॉजिकवाडीला जात असतं, तिथे जाऊन स्वतःसाठी लॉजिक, लॉजिकसाठी स्वतःला शोधत असत. तिथे काहींना लॉजिक तर काहींना अपयश, सल्ले, मतं, खंत, अभिप्राय मिळत असे. मी कधी तिथे गेलो नाही, कारण माझ्या एकंदरीत आयुष्यात खूप लॉजिक होतं पण दुर्दैव!! हे लॉजिक माझ्या कथेत उतरलं पण तरलं नाही. लॉजिकवरून झिकझिक झाली असती म्हणून मी तिथून सटकलो, संपादकाला टाटा करून, बाहेरची वाट धरली.

मी संपादकाच्या कार्यालयाबाहेर आलो, का पाहिजे लॉजिक? लॉजिक नसेल तर काय बिघडतं? लॉजिकवाडीतं कसं शोधू? तिथे कोणाला भेटू? काय करू? मी चिडलो होतो, धुमसत होतो, मनात आस ठेवून, रस्ता क्रॉस केला, रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर चढलो. खूप ऊन होतं, मन सुन्न होतं, डोळ्यात पाणी अन वेळ आणीबाणीची होती, घामाच्या धारा, रागाचा पारा वाढला होता, मी रस्त्याच्या डिव्हायडर उभा राहिलो, शांतपणे आजूबाजूला मग आवेशात आकाशाकडे बघितले, दोन्ही हात पसरले, वर बघत ओरडू लागलो...
"कुणी.....लॉजिक देता का? लॉजिक?
एका लेखकाला कुणी लॉजिक देतं काSSS?
हा लेखक...लिहून..वाचून..."

"अबे काय करतो??"
माझी ती ट्रॅजिक परिस्थिती बघून कोणीतरी ओरडले.

मी मागे बघितले, एक ट्रॅफिक पोलीस माझ्याकडे बघून ओरडला. तो माझ्या दिशेने धावत येऊ लागला!! ते बघून मी पण डिव्हायडरवरून धावू लागलो, माझे आदिदासचे शूज फारच लूज होते, त्यामुळे नीट धावता आले नाही, तरी धावत होतो, पण मी का पळतोय? हा पोलीस का मागे लागलाय? मुंबई असो वा पूना, नाही लावला चुना तर कसला गुन्हा?
मी धावत पटकन रस्त्यावर उडी मारली, विचारांची अन गाड्यांची गर्दी चुकवत मी रस्ता क्रॉस केला, वळू मागे लागल्याप्रमाणे पळू लागलो, रस्त्याच्या डाव्या बाजूने पळताना उजव्या गुडघ्यातून कळ आली, तो पोलीस सुद्धा चपळ निघाला, माझं नशीब अन खड्डे आडवे आले, मी जसा धडपडलो तसा त्या पोलिसाने पकडले!!

मी धडपडलो, पण स्वाभिमान अजूनही ताठ उभा होता, मी घुश्यात विचारले "काहून मला कानूनने पकडले?"
"डिव्हायडर उभं राहून नटसम्राट, नटसम्राट का खेळत होता?" पोलिसाने विचारले,
"बिकॉज आय एम सॅड"
"स्याड हायसं का म्याड हायसं? काय झालं?" पोलिसाने विचारले.
"माझ्या कथेला..." डोळे भरून आले होते, "माझ्या कथेला लॉजिक नाही"
"इथं आयुष्यात लॉजिक नाय, तुला कथेत लॉजिक पाहिजे?" पोलीस मामा इज ऑन फायर.
"क्या डायलॉग! तुम्ही पण लेखक?" मी डोळे पुसत विचारले.
"नाय, मी कवीये" ट्रॅफिक पोलीस मला म्हणाला.
"बस्स का सर, होऊन द्या ना चारोळी"
"इथे नको, मी ड्युटीवर हाय"
"सर, ड्युटीवर तर टी घेता ना?" असं म्हणत मी त्या ट्रॅफिक पोलिस कम कवीला, चहाला घेऊन गेलो. चहाच्या टपरीच नाव होतं "तिन्हीसांजा" तिथे चहा, बिस्किट्स बरोबर सांजा खात, आम्ही गप्पा मारू लागलो. कवी पोलीस, त्याच्या शब्दांमधून मला ओलीस ठेऊ लागला, पावती न फाडता शब्द जोडू लागला..

"कितीवेळा...कितीवेळा.."
"वाSSSS"
"कितीवेळा...कितीवेळा.. मी ती पावती फाडायची"
"आहा..."
"कितीवेळा.. कितीवेळा..
मी ती पावती फाडायची,
सांग ना सखे, मला भेटायला
खरचं तू का सिग्नल तोडायची?"

"स्स्स्स....खरवडलंत सर, तुमच्या काव्याला तर नख आहे" मी चित्कारलो.
"या नखाचं वाघ नखं करायचंय, माझं एफबी पेज लाईक कर ना"
"लाईक काय शेअर करतो ना" असं म्हणून मी त्यांचं "सिग्नल कवी" नावाचं फेसबुक पेज शेअर करत असताना विचारले.. "असं कधी झालंय का? की तुमच्या कवितेला लॉजिकच नाही??"
"माह्या सगळ्या कवितेला लॉजिक असतं"
"पण कधीतरी नसेल ना?" मी पटकन विचारलं
"हां...एकदा असं झालं होतं"
"मग काय केलं?" मी मोठ्या आशेने आणि आवाजात विचारले.
"लॉजिकवाडीला गेलो होतो, तिथं मिळालं" पोलीस दादा म्हणाले.
"माझा संपादक पण म्हणतोय, लॉजिकवाडीला जा, कथेसाठी लॉजिक आण"
"पण लॉजिकसाठी काही इलॉजिकल करू नकोस" पोलिसाने समज दिली.
"इलॉजिकल नाही, काहीतरी मॅजिकल करावं लागेल" मी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा गॉगल घालत म्हणालो, आमच्या मैत्रीचं रोप लावत, मी पोलिसाचा निरोप घेतला.

लॉजिकवाडीला जाण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं, म्हणून मी रिक्षा थांबवली.
"चल लॉजिकवाडीला"
"डबल भाडं होईल" रिक्षावाला म्हणाला.
"का?"
"लॉजिकवाडीवरून रिटर्नच भाडं मिळत नाही" रिक्षावाल्याने उत्तर दिले
"यात काय लॉजिक आहे?"
"ते लॉजिकवाडीलाच कळेल" असं म्हणून रिक्षावाला भुर्रकन उडून गेला.

मग मी बस स्टॉपवर आलो, बसची वाट बघत बसलो, दीड तासानंतर कळालं की पूर्वीच्या काळी हा बस स्टॉप होता, आता फक्त आडोसा आहे, म्हणून मी पुढे चालत गेलो, एक ट्रॅफिकजॅम शोधून काढला, त्या जॅममध्ये एक बस उभी होती, त्या बसने मला मेन बसस्टॅन्डवर सोडलं, तिथून लॉजिकवाडीला जाणारी बस पकडली, कुठल्यातरी शतकात, दस्तुरखुद्द सॉक्रेटिस यांनी इथे लॉजिकची शिकवणी घेतली होती, सरळ सोपं तर्क कसं शोधून काढावं किंवा असावं हे सांगितलं. चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवल्या, पाच शिष्य जोडले, जास्त शिष्य सुद्धा झाले असतील, पण लॉजिकवाडीचा इतिहास मला माहित नाही आणि मला माहित असलेलं इतिहास असेलच असं नाही.

जेव्हा मी लॉजिकवाडीला आलो, तेव्हा कंटाळा आल्यासारखा, पाऊस पडून गेला होता, शाळेला उशिरा झाल्यासारखा वारा पळत होता, वर्गातल्या फळ्यासारखे रंग आकाशाने पांघरून घेतले होते, घंटानादाप्रमाणे, ढग गडगड होते. मातीचा सुगंध कागदावरच्या शाईसारखा सगळीकडे अलगद पसरत होता. मी लॉजिकवाडीच्या कमानीकडे बघितले, त्यावर 'लॉजिकवाडीमध्ये आपले स्वागत असो' असे लिहले होते, मी आजूबाजूला बघितले, मला पुढे कुठे जावे कळेना, खूप गर्दी होती, एवढ्या लोकांना लॉजिक पाहिजे? अरे पण का? लॉजिक नसेल तर काय होतं? आता कोणाला विचारावं बरं? लोकं हातात कागद, मनात गदगद घेऊन लॉजिक शोधत होते. काही अर्धमेले तर काही गोंधळलेले दिसत होते. एकजण विचारत तर दुसरा विचारात होता. तिथं डिझेल, पेट्रोलच्या गाड्या नाही तर विचारांचा गाडा जात येत होता. मी तर हबकलो होतो, 'हा बघ, तो बघ' असं करत होतो.

मग समोरून एक जोडपं येत होतं, मी त्या जोडप्याला हात जोडत थांबवलं, ते जोडपं घाबरत थांबलं.
मी त्या मुलाला विचारलं "कथेला लॉजिक कुठे मिळेल?"
"हिकडून सरळ जा, युटूर्न घ्या, तिथे कोणाला पण विचारा" तो मुलगा मला म्हणाला.
"तुम्हाला लॉजिक मिळालं?"
"हे काय माझं लॉजिक" तो मुलगा त्याच्या मैत्रिणीकडे बघत म्हणाला, त्याचं हे लॉजिक ऐकून ती पोरगी लाजली!!
"ऑSSS" म्हणून मी पुढं निघालो, युटूर्न घेतला, एक मोठा चौक आला, हाय का आता? कुठं जायचं?

परत आसपास बघितलं, एक माणूस मोबाईलवर फूटपाथवर बसून "टेम्पल रन" खेळत होता.
मी त्याला विचारलं, "कथेला लॉजिक कुठं मिळेल?"
गेम खेळत, माझ्याकडे न बघत तो म्हणाला "भावड्या, मी पण तेच शोधतोय"
मी दचकलोच!! आता काय बोलणार?
"तुमच्या कथेला लॉजिक नाही?"
"माझ्या कादंबरीला लॉजिक नाही" तो माझ्याकडे न बघत म्हणाला
सर्रकन अंगावर काटा आला, मी दचकलो!! स्नायू जखडले!! मी कथेचं दुःख कुरवाळत होतो, पण हा त्याची भळभळती जखम घेऊन टेम्पल रन खेळत होता. मी माज करत होतो, पण आता लाज वाटू लागली, मी त्या लॉजिकलेस लेखकाला काही म्हणालो नाही, गुपचूप तिथून निघालो.

मी पुढे गेलो, रस्त्यात एक दाढी वाढवलेला तरुण हातात गिटार घेऊन "माझिया पोस्टला लाईक्स मिळेना" नावाचं गाणं गात होता, काहीजण त्याचा आणि त्याच्याबरोबर व्हिडिओ काढत होते, त्याचा बहुतेक सुरेल आवाज ऐकू लागलो, हा तरुण खूप पोस्ट्स करायचा, पण त्याला लाईक्सच मिळत नसतं, त्याचं हे दुःख तो गाण्यातून मांडत होता. "माझ्याच पोस्टला लाईक्स का नाहीत?" ह्या दुःखाचं लॉजिक त्याला मिळत नव्हते.
तेवढ्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आरडाओरडा ऐकू आला, मी तिकडे बघितले तर, तिथे दोघे जण मारामारी करत होते, मग बाकीचे लोक गाणं ऐकत मारामारी बघू लागले, "ही मारामारी का?" असा प्रश्न गर्दीतून आला, "एकमेकांचं लॉजिक पटलं नाही" असं उत्तर मिळालं, "लॉजिक पटलं नाही म्हणून मारायचं?" असं परत कोणीतरी विचारलं, त्यावर "मग करणार काय?" असं कोणीतरी म्हटलं, एक दोन मिनिटं मारामारी तशीच सुरु होती, त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले, केस उपटले, पण त्यातला एक जण कसातरी पळून गेला, दुसरा त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत गेला, तशी गर्दी पांगली.

मी पुढे निघालो, काय करावे ते कळेना, मी काहींना विचारलं तर काहींनी बाजूला सारलं, लोकांची लॉजिकवरची मतं ऐकून दमत होतो, घामा बरोबर कंटाळा आला होता, भूक लागली होती, म्हणून एका चहाच्या टपरीवर आलो. मी चहा आणि मनाने आस्वाद घेतला. जिथे लोकं हाणामारी करत होती, तिथे हा चहावाला चहा मारी देत होता, मी त्याला चहा पीत विचारले.
"कथेसाठी लॉजिक कुठं मिळेल?".
"कथेचं लॉजिक मिळेल...पण....." एवढं बोलून तो थांबला, तो चहा आणि आसवे गाळू लागला, मी त्याला विचारले ""पण.... काय?"
"पण...प्रेमाचं लॉजिक नाय मिळणार"
दाजीच्या गावात!! फुल्ल सेंटी केलं!! त्याच्या मनावरचे आघात, माझ्या आतपर्यंत घुसले, मारीचं बिस्कीट चहात पडलं, ते विरघळलं, असलं कसलं बिस्कीट? मी त्याच्या खांद्यावर हात टाकत, त्याचा विश्वास उचलून घेतला. चहावाल्याला त्याच्या प्रेमाच्या गोष्टीबद्दल, प्रेमाने विचारले, तसा तो मन आणि स्टोव्ह पेटवतं, त्याची लव्हस्टोरी सांगू लागला.

ती जेव्हा खड्ड्यात पडली, तेव्हा हा चहावाला तिला बघत प्रेमात पडला, याने तिला खड्ड्यातून बाहेर काढले, तिने याला स्वतःच्या मनात ढकलले. असं काळीज फाडून, बागेत दडून त्यांनी प्रेम केलं, पण एकदा बागेत पोलिसांची धाड पडली, बागेतसुद्धा धाडी पडायला लागल्या? अरेरे.. हे दोघे घाबरले, कसेतरी झाडावर चढून बसले, पोलीस निघून गेले, पण तिचा तोल गेला, ती खाली पडली, तिचा अँकल....
"हा अंकल कुठून आला?" मी विचारले.
"अंकल नाही...अँकल"
"काय झालं अँकलला?
"अँकल कलला"
"काय कल्ला?"
"अँकल क..ल..ला"
"म्हणजे?"
"फ्रॅक्चर झाला"
"मग?"
"मग काय.. ब्रेकअप झालं" चहावाला म्हणाला.
"का?"
"तिने मला दोष दिला, कारण झाडावर चढायची आयडिया माझी होती" तो चहावाला अश्रू अडवत मला म्हणाला.
"तुम्ही परत भेटला नाहीत?" मी विचारले.
"जेव्हा शेवटी भेटलो, तेव्हा ती म्हणाली..."
"काय??"
"ती म्हणाली आता मला विसरून जा" असं म्हणत तो चहावाला आकाशाकडे बघत बोलू लागला..
"विसरून जा? असं कसं विसरून जाऊ? सांग ना? चहात चहा पावडर टाकायला आपण कधी विसरतो का?"
मी 'हो' म्हणणार होतो.

या चहावाल्याला गर्लफ्रेंडने डच्चू दिला, याने तो डच्चू मनापासून जपून ठेवला, कुरवाळला, हा येडा झाला, "प्रेमाचं लॉजिक काय?" हे शोधत तो इथंपर्यंत आला, पण प्रेमाचं लॉजिक मिळाल नाही, पण लॉजिकवाडीतून प्रेम मिळालं, परी मिळाली नाही म्हणून चहाची टपरी टाकली.
"ते कथेसाठी लॉजिक कुठं मिळेल?" मी परत विचारलं
"एक दुकान ऐ" चहावाला म्हणाला
"कुठलं?"
"लॉजिक लो"
"कुठला लो? हिंदी का इंग्लिश?
"ते माहित नाही" चहात साधारण किलोभर साखर टाकत तो म्हणाला.

त्या चहावाल्याने "लॉजिक लो" दुकानाबद्दल सांगितले, तिथे कथेला लॉजिक मिळेल असं म्हणाला, पण चहावाल्याला त्या दुकानाचा पत्ता माहित नव्हता, चहा पत्ती सोडून त्याला काही माहित नसावं. माझ्या मनात माश्यांसारखी आशा घोंघावू लागली, पण माझं शरीर द अंग थकलं होतं, मन दाटून आलं होतं, या उन्हात आईसक्रीम चाटून पुसून खावं असं वाटतं होतं.

मी दिसेल त्याला "लॉजिक लो" दुकानाचा पत्ता विचारू लागलो, पहिला म्हणाला असं काही दुकानचं नाही, दुसरा म्हणाला हे दुकान दुसऱ्या शहरात आहे, तिसरा म्हणाला हे दुकान अजून सुरु व्हायचं आहे, चौथा म्हणाला हे दुकान बंद होऊन बरीच वर्ष झाली, पाचवा म्हणाला ते दुकान चांगलं नाही, जाऊ नका. सहाव्याला मराठी, हिंदी येत नव्हते, सातव्याला फार घाई होती, कशाची ते माहित नाही, आठव्याने आठवायला फार वेळ घेतला, नववा तिथे नवीन होता, पण दहाव्याने मात्र पत्ता सांगितला!!

मी त्या पत्त्यावर पोहचलो, तिथे एक मोठा चौक होता, या चौकातच कुठेतरी 'लॉजिक लो' हे दुकाने होते, या चौकात दुकानांची गर्दी होती, दुकानांमध्ये सुद्धा बरीच गर्दी होती, साधारण सोळा मिनिटांमध्ये, साडे आठ फेऱ्या मारून, पावणे चार सुस्कारे सोडून झाल्यावर मला "लॉजिक लॉ" नावाचं दुकान दिसले. लॉजिक लॉ? लॉजिक लो होतं ना? का लोकांनीच लॉचा लो केला? लो चा नंतर लेलो होईल, असा विचार करत मी थेट त्या लॉजिक लॉ नावाच्या दुकानामध्ये शिरलो, दुकानं छोटंच होतं, दुकानदार आरामात टीव्ही बघत बसला होता "कळून कळून किती कळणार? कुणा ना कळे माझी कळकळ" असं गाणं नाही तर या नावाची सिरीयल दुकानदार बघत होता.

"कथेला लॉजिक हवंय" मी दुकानदाराला म्हणालो, तसं दुकानदाराने टीव्ही बंद केला, मी माझ्या फॅब्लेट मध्ये त्याला कथा वाचायला दिली, तो दुकानदार शांतपणे बसून कथा वाचू लागला, मी दुकानात बघितले, दुकानाच्या एका भिंतीवर "लॉजिक.... फ्री वाय फाय सारखं असतं, कधी कुठेही मिळू शकतं" असं लिहिलं होतं. मग तू कशाला दुकान टाकलंय? दुकानदाराकडे कथा वाचत असताना, मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले अन माझा संताप, संताप झाला.
मी रागावलो "जाऊ दे... द्या इकडे"
"काय झालं?" त्याने विचारले.
"माझ्या गंभीर कथेला हसताय??"
"ही गंभीर कथा?" त्याने विचारले.
"हो...."
"ओह, सॉरी मला वाटलं..."
"काय वाटलं??"
"काही नाही...सॉरी" असं म्हणून दुकानदार कथा परत वाचू लागला, आता तो हसला नाही, मला बरं वाटलं, हा माझ्या गंभीर कथेला कसा काय हसला? हा विनोदी कथा वाचताना गंभीर तर होतं नसेल ना? काय माहित? दुकानदाराने कथा पूर्ण वाचली, तो माझ्याकडे बघत म्हणाला "कथा चांगली आहे पण..."
"पण काय?"
"कथेतल्या नायकाच्या शर्टचं बटन..."
"त्याचं काय?"
"नायकाच्या शर्टच्या बटनचं वर्णन दोन पानं?" दुकानदार म्हणाला.
"वाचताना शर्टचं बटन असं डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे" मी माझा उजवा पंजा डोळ्यासमोर घेत म्हणालो.
"पण बाकीच्या शर्टचं काय?"
"मग काय करू?"
"पहिलं ते शर्टचं बटन काढून टाका, आय मीन वर्णनं काढून टाका" दुकानदार म्हणाला.
"एवढं चांगलं वर्णन काढून टाकू?" मी वैतागलो.
"कथेतलं वर्णनं हे पिझ्झावरच्या चीज सारखं असतं" दुकानदार हातवारे करत सांगू लागला.
"म्हणजे?"
"चीज जास्त झालं की पिझ्झाची चव निघून जाते"
ओहो.. दुकानदार तर फूडी निघाला.
"पण या कथेत मी असं अंतर्मनाचा ठाव घेऊन शब्द विणून..." मी म्हणालो.
"थांबा..थांबा.."
"काय झालं?"
"तुम्ही कथेत असल्यासारखं बोलता" दुकानदार म्हणाला.
"म्हणजे?"
"इट्स अ रिअल लाईफ..नॉर्मल बोला, या कथेत सुद्धा सोपी भाषा वापरा" दुकानदाराने सुचवले.
"ओके पण कथेत लॉजिक आहे ना?" मी विचारले
"ह्म्म्म...." असा आवाज काढत दुकानदार विचार करू लागला.
अरे आता काय गाऊन सांगणार आहेस का?
"ही कथा परत लिहून काढा" त्याने सुचवले.
"परत लिहू? मग लॉजिक मिळेल?" मी विचारले
"हो.."
"पण लॉजिक मिळालं नाही तर?"
"नक्की मिळेल" चारशे चोपन्न रुपयाची पावती फाडत तो म्हणाला, वरचे चोपन्न रुपये? आपला तो नेहमीचा टॅक्स.

मी त्याला पैसे दिले, त्याचं लॉजिक पटलं नव्हतं, इलाज नव्हता, माघारी फिरलो, कथा परत लिहावी का? परत लिहिल्यावर संपादकाला लॉजिक मिळेल का? असा विचार करत घरी पोहचलो, लॅपटॉप उघडून, परत एकदा कथा वाचली, मी शर्टचं आणि शर्टच्या बटनाचं वर्णन काढून टाकलं, थोडे फार बदल केले, मी लॅपटॉप स्क्रीनकडे टक लावून बघत होतो, माझ्या डोक्यात एकच विचार होता.

कथा परत लिहू का?

परत लिहू का?

हा विचार स्वप्नील करत होता, त्याची ही कथा लिहून झाली होती, त्याने परत एकदा स्वतः लिहिलेली कथा वाचली, कथेत योग्य ते बदल केले, वाक्यरचना बदलली, शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. "परत लिहू का?" हा विचार करत, त्याने कथेची फाईल लॅपटॉपवर सेव्ह केली, खूप वेळ बसल्यामुळे त्याची पाठ अवघडली होती, अंगाला आळोखे पिळोखे देऊन, पाणी पिऊन त्याने त्याच्या केबिनमधल्या पंख्याचा वेग वाढवला.

"सर येऊ का?" मी विचारले, तसे स्वप्नीलने माझ्याकडे बघितले, मी स्वप्निलच्या केबिन बाहेर उभा होतो.
"या या.. बसा" स्वप्नील त्याच्या खुर्चीत बसत म्हणाला.
मी स्वप्नीलच्या समोरच्या खुर्चीत बसत विचारले "कथा वाचली?"
"येस्स.."
"लॉजिकल आहे ना?"
"हो.. मला कथा आवडली" स्वप्नील म्हणाला.
"छापून येईल?" मी विचारले
"पुढच्या महिन्याच्या अंकात तुमची कथा छापून देऊ" स्वप्नील म्हणाला.
"थँक यु व्हेरी मच"

"ज्यूस घेणार ना?" स्वप्नीलने विचारले.
"येस्स.." मी म्हणालो, स्वप्नीलने फोन करून दोन शुगर फ्री ज्यूस मागवले.
"काल तुमच्यामुळे मला एक कथानक सुचलं" स्वप्नील म्हणाला.
"अरे वा..."
"जसं सुचलं तसं पटपट टाईप केलं" स्वप्नील म्हणाला.
"कथा पूर्ण लिहून झाली?"
"हो.. हे काय आत्ताच पूर्ण केली" स्वप्नील उत्साहित होतं म्हणाला.
"कशावर आहे?" मी विचारले.
"कथेला लॉजिक शोधणाऱ्या लेखकाची गोष्ट आहे" स्वप्नील म्हणाला.
"इंटरेस्टिंग... मग शेवटी लॉजिक मिळतं का?" मी उत्सुकतेने विचारले.
"त्यासाठी कथा वाचायला लागेल" स्वप्नील द संपादक स्मितहास्य करत म्हणाला.

समाप्त द एन्ड

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा मी लॉजिकवाडीला आलो, तेव्हा कंटाळा आल्यासारखा, पाऊस पडून गेला होता, शाळेला उशिरा झाल्यासारखा वारा पळत होता, वर्गातल्या फळ्यासारखे रंग आकाशाने पांघरून घेतले होते, घंटानादाप्रमाणे, ढग गडगड होते. मातीचा सुगंध कागदावरच्या शाईसारखा सगळीकडे अलगद पसरत होता<<<<

काय उपमा! काय उपमा! बरोब्बर ब्रेकफास्टच्या वेळेसच वाचला. आता चहा घ्यावाच लागेल. Proud

भारी जमलीय!

सर्वांना कथा आवडत आहे, हे बघून छान वाटलं, आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद Happy

@सस्मित
हो, प्रतिलिपी वर पोस्ट केली होती, तेव्हा सुमारे पाचशे ते सहाशे शब्दांची कथा होती, ती कथा परत वाचल्यावर मजा येत नव्हती, म्हणून कथेत बरेच बदल केले, शेवट पूर्ण बदलला, आता अडीच हजार शब्दांची कथा आहे.

या कथेला एका साच्यात बांधता येत नाही, या कथेत काहीही कधीही घडू शकतं, कथा कुठे ही जाऊ शकते, कुठे ही संपू शकते, त्यामुळे ही कथा लिहायला फार मजा येत होती.
आधी या कथेत दोन कथानके होती, पाहिलं कथानक म्हणजे लॉजिक शोधणारा लेखक आणि दुसरं कथानक म्हणजे कथेचा शेवट शोधणारा संपादक स्वप्नील आणि या दोन्ही कथानकाचा शेवट करणारा तिसराच लेखक अशी कथेची मूळ संकल्पना होती, ही कथा लिहून सुद्धा काढली होती, ती सुमारे साडे चार पाच हजार शब्दांची झाली होती, पण एका कथेत दोन कथानके असल्यामुळे, मला दोन विभिन्न शैलींमध्ये लिहायचं होतं, लॉजिक शोधणारा लेखक मध्ये कोट्यामय शैली, तर शेवट शोधणाऱ्या संपादकांमध्ये रहस्यमय शैली असं काहीसं करायचं होतं, पण ते लिहायला फारच वेळ लागत होता, म्हणून मग असा शेवट केला.

छान झाली आहे. Happy
काही काही भाग वाचताना 'गोदूची वाट'ची आठवण झाली.

चै, काही ठिकाणी तं आहे ते खटकतंय वाचताना.
<<>>><ज्या लोकांना लॉजिक मिळत नसे ते लॉजिकवाडीला जातं असतं,
लॉजिकसाठी स्वतःला शोधत असतं.
लॉजिकवाडीतं कसं शोधू>>> >>>वै.

@ सस्मित
धन्यवाद, योग्य ते बदल केले आहेत

@ पराग
मनापासून धन्यवाद Happy
मी जे काही थोडं फार लिहायला शिकलो, ते सर्व पु. लं. मुळेच शक्य झालं आहे.

जाई. आसा.उमानु, त्रीज्या
मनापासून धन्यवाद Happy

वा मजा आली वाचताना! चारोळी भारीये!
बरं झालं काथ्याकूट चा खुलासा वरती लिहीलात.. आता त्या कथेचे कोणतेही अपूर्णांकवाले भाग न काढता एक झकास अंतिम भाग येऊ द्या!

आवडली. फक्त दुकानाचा पत्ता ज्यांना विचारला त्यातला पाचवा मुद्दाम गायब आहे का नजरचुकीने हरवला? Happy

अक्षय दुधाळ, मयुरी चवाथे-शिंदे, anjali_kool, Namokar, अथेना, कोमल १२३४५६, समाधानी, टकमक टोक,
मनापासून धन्यवाद, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया नेहमीच मला स्फूर्ती देतात Happy

@स्वप्ना_राज
हो, नजर चुकीमुळेच झालं होतं, कथेत आता योग्य तो बदल केला आहे, धन्यवाद Happy

@जिज्ञासा
काथ्याकूटचा शेवट लिहायला सुरुवात केली आहे, लवकरात लवकर पोस्ट करायचा प्रयत्न करेल Happy

Pages