मा. ल. क. - ९

Submitted by हरिहर. on 23 August, 2018 - 00:17

एका राजात असावे ते सगळे गुण होते त्या अफाट पसरलेल्या राज्याच्या महाराजांमध्ये. शौर्याच्या आणि रणनितीच्या बळावर त्यांनी आपल्या राज्याच्या सिमा बऱ्याच विस्तारल्या होत्या. युध्दामुळे अनेक प्रांत फिरलेल्या राजाने जे जे चांगले दिसले ते ते आपल्या राज्यात आणले होते. वेगवेगळ्या स्थापत्य शैलीचा अभ्यास करुन अनेक भव्य इमारती राजधानीत उभारल्या होत्या. ग्रंथालये, मंदिरे, उद्याने यांनी सगळी राजधानी अगदी देखणी बनवली होती. प्रासादात अनेक देशोदेशीच्या नामवंत चित्रकारांच्या कलाकृती लावल्या होत्या. राजाचा आवडता छंद मात्र तत्वज्ञान. या छंदामुळे राज्यात अनेक विद्वानांना राजाश्रय मिळाला होता. दरबारामध्ये या विद्वानांच्या चर्चा घडत. कधी कुट प्रश्नांवर चर्चा होत. धर्माच्या विविध अंगांचे बारकाईने विवेचन होई. धर्मग्रंथावर सखोल टिका होई. अर्थात स्वतः राजाही या सर्व विषयात पारंगत असल्याने चर्चेचा अथवा वादंगाचा विषय योग्य दिशेने चाललाय की नाही हे त्याला त्वरीत कळे. हळू हळू राजाचे वय वाढले. तो वार्धक्याकडे झुकू लागला. तसतसे त्याने राज्याचा कारभार राजपुत्राकडे सोपवला. राजपुत्रही राजकारभाराच्या बाबतीत पित्यापेक्षा काकणभर सरसच असल्याने राजाला त्याचा अभिमानच होता. राजा जसजसा वार्धक्याकडे झुकू लागला, तसतशी त्याची वृत्ती निवृत्तीकडे वळू लागली. त्यातच निमित्त झाले राज्यात नविनच आलेल्या वृध्द विद्वानाचे. या विद्वानाला प्रथेप्रमाणे चर्चेचे आमंत्रन दिले गेले. राजदरबार भरला. राज्याचे सर्व विद्वान चर्चा ऐकायला जमले.
नविन आलेल्या विद्वानाने आसनावर बसत राजाला विचारले “राजन, आपली किर्ती मी ऐकून आहे. आपल्याला माझ्याकडून नक्की काय अपेक्षीत आहे?”
राजाने सांगीतले “धर्मचर्चा. धर्माचा हेतू काय आहे मानसाच्या जीवनात? ज्ञानप्राप्ती कशी होईल? ज्ञानप्राप्तीनंतर काय?”
विद्वान म्हणाला “हे पहा राजन, विद्वानांच्या चर्चा आणि वाद ऐकून धर्म कळतो हा फार मोठा गैरसमज आहे. विद्वान म्हणून आयुष्यभर तोऱ्यात जगल्यावर मला कळाले की ‘विद्वान म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत, तिथे नसलेले काळे मांजर शोधणारा आंधळा आहे फक्त’ दुसरे काही नाही. त्याच्या हाताला त्या आंधळ्याप्रमाणे काहीच लागत नाही.”
पण राजाला हे काही पटले नाही. त्याने विचारले “जर धर्म आणि धर्मग्रंथ निरुपयोगी असतील तर मग ईश्वराला कसे जाणायचे?”
वृध्द विद्वान उत्तरला “ईश्वराला जाणन्या अगोदर स्वतःला जाणले पाहीजे. स्वतःला जाणने म्हणजेच ईश्वराला जाणने आहे म्हटले तरी वावगे होणार नाही. जे ज्ञान स्वतःची स्वतःलाच ओळख करुन देत नाही ते ज्ञानच नाही. व्यर्थ भार आहे तो. चर्चेने ईश्वर दुर जातो.”
राजाला हेही पटले नाही. तो म्हणाला “पण पंडीतजी…”
पण त्याला मध्येच थांबवत विद्वान म्हणाला “बस् राजन. यापेक्षा मी तुम्हाला जास्त काही सांगू शकणार नाही. स्वतःचे प्रतिबिंब पहायचे असेल तर पाण्यावरचे शेवाळ दुर केले पाहीजे इतकेच सांगेन.”

विद्वानाने राजधानी सोडली त्याला आता काही महिने होऊन गेले होते. राजाला त्या विद्वानाचे विचार पटले नव्हते. तरीही त्याच्या स्वतःच्या विचारांना जरा हादरा बसला होताच. वृध्द विद्वान गेल्यापासून राजाने अनेक पंडीत, विद्वान, धर्ममार्थंड, साधू, सन्यासी यांच्याबरोबर चर्चा केल्या होत्या, वाद ऐकले होते. पण कोणीही त्याला समाधानकारक ऊत्तर देऊ शकले नाही. राजाच्या चित्तातला क्षोभ कमी झाला नाही.

पावसाचे दिवस होते. मुसळधार पाऊस राजधानीला अविरत भिजवत होता. एक दिवस राजाला समजले की राजधानी बाहेरच्या डोंगराच्या पायथ्याशी कुणी साधू आला आहे. तपस्येचे तेज डोळ्यात दिसते. मितभाषी आहे. परमार्थातला अधिकारी असावा. राजाने दुत पाठवला.
काही तासातच दुत निरोप घेवून परत आला “प्रश्न राजाला पडला आहे. आवश्यकता त्याला आहे. त्यामुळे त्याने लवाजम्याशिवाय यावे.”
हे ऐकून राजाला राग आला. पण पडलेले प्रश्नही त्याला स्वस्थ बसू देईनात. दुसऱ्या दिवशी राजा एकटाच घोड्यावर बसुन राजधानी बाहेर गेला. मुसळधार पाऊस पडत होता. डोंगराच्या पायथ्यालाच छोटीसी कुटी बांधून साधू रहात होता. राजाने दुरच घोडा उभा केला आणि कुटीकडे निघाला. राजाने कुटीच्या दारातून पाहीले. साधूने ध्यान लावलेले होते. राजाने कुटीत प्रवेश केला. हात जोडून साधूपुढे उभा राहीला. साधूने डोळे उघडून पाहीले. मंद स्मित करत राजाला म्हणाला “राजन, आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळतील. पण माझी अट आहे.”
राजाने त्वरीत सांगीतले “जी काही अट असेल ती न ऐकताच मी मान्य करतो. फक्त मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे.”
साधूने सांगीतले “राजन, बाहेर जावून अंगणात उभे रहा. मान वर करुन आकाशाकडे एक टक पहात रहा अर्धा तास. मग मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देईन.”
राजा बाहेर गेला. मुसळधार पाऊस पडत होता. राजाने भर पावसात आकाशाकडे तोंड केले आणि टक लावून कोसळणाऱ्या पावसाकडे पहायला सुरवात केली. पाच मिनिट झाली. दहा मिनिट झाली. पंधरा मिनिट झाली.
राजाचे विचारचक्र सुरु होते “आपण या यत्कश्चीत साधूकडे कशाला आलो? व्यवस्थित समजावून सांगायचे राहीले बाजूला, या साधूने तर आपल्यासारख्या सम्राटाला पावसात उभे केले. तेही अशा विचित्र अवस्थेत. काय तर म्हणे आकाशाकडे तोंड करुन उभे रहा. मुर्खपणा आहे हा सगळा. साधूचा काही दोष नाही. आपणच मुर्ख आहोत. आपल्यालाच अक्कल नाही.” राजाचा संयम संपला. तो रागाने कुटीत शिरला. साधूसमोर राहून राजा संतापाने म्हणाला “माझ्या सारखा अज्ञानी आणि बेअक्कल दुसरा कोणी नसेल या पृथ्वीवर…”
साधूने त्याला मध्येच थांबवले आणि म्हणाला “राजन, जे ज्ञान प्राप्त करायला अनेक योग्यांना कैक वर्ष तपस्या करावी लागते ते ज्ञान तुला फक्त पंधरा मिनिटातच झाले आहे.”
राजाने प्रश्नांकीत नजरेने साधूकडे पाहीले.
साधू म्हणाला “राजन, ‘मी अज्ञानी आहे’ हे समजने हिच ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे."

(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ....

Pages