मा. ल. क. - ९

Submitted by हरिहर. on 23 August, 2018 - 00:17

एका राजात असावे ते सगळे गुण होते त्या अफाट पसरलेल्या राज्याच्या महाराजांमध्ये. शौर्याच्या आणि रणनितीच्या बळावर त्यांनी आपल्या राज्याच्या सिमा बऱ्याच विस्तारल्या होत्या. युध्दामुळे अनेक प्रांत फिरलेल्या राजाने जे जे चांगले दिसले ते ते आपल्या राज्यात आणले होते. वेगवेगळ्या स्थापत्य शैलीचा अभ्यास करुन अनेक भव्य इमारती राजधानीत उभारल्या होत्या. ग्रंथालये, मंदिरे, उद्याने यांनी सगळी राजधानी अगदी देखणी बनवली होती. प्रासादात अनेक देशोदेशीच्या नामवंत चित्रकारांच्या कलाकृती लावल्या होत्या. राजाचा आवडता छंद मात्र तत्वज्ञान. या छंदामुळे राज्यात अनेक विद्वानांना राजाश्रय मिळाला होता. दरबारामध्ये या विद्वानांच्या चर्चा घडत. कधी कुट प्रश्नांवर चर्चा होत. धर्माच्या विविध अंगांचे बारकाईने विवेचन होई. धर्मग्रंथावर सखोल टिका होई. अर्थात स्वतः राजाही या सर्व विषयात पारंगत असल्याने चर्चेचा अथवा वादंगाचा विषय योग्य दिशेने चाललाय की नाही हे त्याला त्वरीत कळे. हळू हळू राजाचे वय वाढले. तो वार्धक्याकडे झुकू लागला. तसतसे त्याने राज्याचा कारभार राजपुत्राकडे सोपवला. राजपुत्रही राजकारभाराच्या बाबतीत पित्यापेक्षा काकणभर सरसच असल्याने राजाला त्याचा अभिमानच होता. राजा जसजसा वार्धक्याकडे झुकू लागला, तसतशी त्याची वृत्ती निवृत्तीकडे वळू लागली. त्यातच निमित्त झाले राज्यात नविनच आलेल्या वृध्द विद्वानाचे. या विद्वानाला प्रथेप्रमाणे चर्चेचे आमंत्रन दिले गेले. राजदरबार भरला. राज्याचे सर्व विद्वान चर्चा ऐकायला जमले.
नविन आलेल्या विद्वानाने आसनावर बसत राजाला विचारले “राजन, आपली किर्ती मी ऐकून आहे. आपल्याला माझ्याकडून नक्की काय अपेक्षीत आहे?”
राजाने सांगीतले “धर्मचर्चा. धर्माचा हेतू काय आहे मानसाच्या जीवनात? ज्ञानप्राप्ती कशी होईल? ज्ञानप्राप्तीनंतर काय?”
विद्वान म्हणाला “हे पहा राजन, विद्वानांच्या चर्चा आणि वाद ऐकून धर्म कळतो हा फार मोठा गैरसमज आहे. विद्वान म्हणून आयुष्यभर तोऱ्यात जगल्यावर मला कळाले की ‘विद्वान म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत, तिथे नसलेले काळे मांजर शोधणारा आंधळा आहे फक्त’ दुसरे काही नाही. त्याच्या हाताला त्या आंधळ्याप्रमाणे काहीच लागत नाही.”
पण राजाला हे काही पटले नाही. त्याने विचारले “जर धर्म आणि धर्मग्रंथ निरुपयोगी असतील तर मग ईश्वराला कसे जाणायचे?”
वृध्द विद्वान उत्तरला “ईश्वराला जाणन्या अगोदर स्वतःला जाणले पाहीजे. स्वतःला जाणने म्हणजेच ईश्वराला जाणने आहे म्हटले तरी वावगे होणार नाही. जे ज्ञान स्वतःची स्वतःलाच ओळख करुन देत नाही ते ज्ञानच नाही. व्यर्थ भार आहे तो. चर्चेने ईश्वर दुर जातो.”
राजाला हेही पटले नाही. तो म्हणाला “पण पंडीतजी…”
पण त्याला मध्येच थांबवत विद्वान म्हणाला “बस् राजन. यापेक्षा मी तुम्हाला जास्त काही सांगू शकणार नाही. स्वतःचे प्रतिबिंब पहायचे असेल तर पाण्यावरचे शेवाळ दुर केले पाहीजे इतकेच सांगेन.”

विद्वानाने राजधानी सोडली त्याला आता काही महिने होऊन गेले होते. राजाला त्या विद्वानाचे विचार पटले नव्हते. तरीही त्याच्या स्वतःच्या विचारांना जरा हादरा बसला होताच. वृध्द विद्वान गेल्यापासून राजाने अनेक पंडीत, विद्वान, धर्ममार्थंड, साधू, सन्यासी यांच्याबरोबर चर्चा केल्या होत्या, वाद ऐकले होते. पण कोणीही त्याला समाधानकारक ऊत्तर देऊ शकले नाही. राजाच्या चित्तातला क्षोभ कमी झाला नाही.

पावसाचे दिवस होते. मुसळधार पाऊस राजधानीला अविरत भिजवत होता. एक दिवस राजाला समजले की राजधानी बाहेरच्या डोंगराच्या पायथ्याशी कुणी साधू आला आहे. तपस्येचे तेज डोळ्यात दिसते. मितभाषी आहे. परमार्थातला अधिकारी असावा. राजाने दुत पाठवला.
काही तासातच दुत निरोप घेवून परत आला “प्रश्न राजाला पडला आहे. आवश्यकता त्याला आहे. त्यामुळे त्याने लवाजम्याशिवाय यावे.”
हे ऐकून राजाला राग आला. पण पडलेले प्रश्नही त्याला स्वस्थ बसू देईनात. दुसऱ्या दिवशी राजा एकटाच घोड्यावर बसुन राजधानी बाहेर गेला. मुसळधार पाऊस पडत होता. डोंगराच्या पायथ्यालाच छोटीसी कुटी बांधून साधू रहात होता. राजाने दुरच घोडा उभा केला आणि कुटीकडे निघाला. राजाने कुटीच्या दारातून पाहीले. साधूने ध्यान लावलेले होते. राजाने कुटीत प्रवेश केला. हात जोडून साधूपुढे उभा राहीला. साधूने डोळे उघडून पाहीले. मंद स्मित करत राजाला म्हणाला “राजन, आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळतील. पण माझी अट आहे.”
राजाने त्वरीत सांगीतले “जी काही अट असेल ती न ऐकताच मी मान्य करतो. फक्त मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे.”
साधूने सांगीतले “राजन, बाहेर जावून अंगणात उभे रहा. मान वर करुन आकाशाकडे एक टक पहात रहा अर्धा तास. मग मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देईन.”
राजा बाहेर गेला. मुसळधार पाऊस पडत होता. राजाने भर पावसात आकाशाकडे तोंड केले आणि टक लावून कोसळणाऱ्या पावसाकडे पहायला सुरवात केली. पाच मिनिट झाली. दहा मिनिट झाली. पंधरा मिनिट झाली.
राजाचे विचारचक्र सुरु होते “आपण या यत्कश्चीत साधूकडे कशाला आलो? व्यवस्थित समजावून सांगायचे राहीले बाजूला, या साधूने तर आपल्यासारख्या सम्राटाला पावसात उभे केले. तेही अशा विचित्र अवस्थेत. काय तर म्हणे आकाशाकडे तोंड करुन उभे रहा. मुर्खपणा आहे हा सगळा. साधूचा काही दोष नाही. आपणच मुर्ख आहोत. आपल्यालाच अक्कल नाही.” राजाचा संयम संपला. तो रागाने कुटीत शिरला. साधूसमोर राहून राजा संतापाने म्हणाला “माझ्या सारखा अज्ञानी आणि बेअक्कल दुसरा कोणी नसेल या पृथ्वीवर…”
साधूने त्याला मध्येच थांबवले आणि म्हणाला “राजन, जे ज्ञान प्राप्त करायला अनेक योग्यांना कैक वर्ष तपस्या करावी लागते ते ज्ञान तुला फक्त पंधरा मिनिटातच झाले आहे.”
राजाने प्रश्नांकीत नजरेने साधूकडे पाहीले.
साधू म्हणाला “राजन, ‘मी अज्ञानी आहे’ हे समजने हिच ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे."

(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त.

जुन्या मायबोलीवर एकजण (आशीष चासकर का?) झेन कथा द्यायचे त्याची आठवण झाली मला.
शाली, तुम्हाला इन्टरेस्ट असेल तर ही साइट (अर्थातच अशा आणखीही असतील, ही एक वानगी) नक्की बघा. Happy

‘विद्वान म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत, तिथे नसलेले काळे मांजर शोधणारा आंधळा आहे फक्त’ दुसरे काही नाही. त्याच्या हाताला त्या आंधळ्याप्रमाणे काहीच लागत नाही.”
-- हे छानच !

‘मी अज्ञानी आहे’ हे समजने हिच ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे."
हे अजुनचं छान !!!

छान

छानच शाली....
"विद्वान म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत, तिथे नसलेले काळे मांजर शोधणारा आंधळा आहे फक्त’ दुसरे काही नाही. त्याच्या हाताला त्या आंधळ्याप्रमाणे काहीच लागत नाही.”>>>>>
मस्तच हे Happy ... येवु दे पुढील मा ल क लवकर

स्वाती_आंबोळे, लिंक पाहिली. छानच आहेत सर्व झेन कथा. धन्यवाद!
माझे आजोबा फार छान गोष्टी सांगायचे. त्या गोष्टींचा फार मोठा खजीना आहे माझ्याकडे. जसजशा आठवतात कथा, तशा येथे देत आहे. मित्राच्या आईकडूनही खुप गोष्टी ऐकल्या आहेत. हादिसमधल्या आणि सुफी संताच्या. खासकरुन राबीया, बाबा बुल्लेहशाह वगैरे यांच्या. असो.
प्रतिसादासाठी आणि सुरेख लिंक दिल्यासाठी खुप आभार!

मला अशा तर्हेच्या कथा भंपक वाटतात.
साधूचा "आपण स्वतः विद्वान आहोत" पासून "आपण अज्ञानी आहोत" हा वैचारिक भेद मनात निश्पन्न होण्याचे कारण कथेत नाही. वस्तुतः ही नंतरची स्थिती खूप ज्ञान मिळवल्यानंतर येते.
धमक नसलेल्या मणसाने अहिंसेचा पुरस्कार करणे आणि कुणालाही सहज नेस्तनाबूत करू शकेल अशी ताकद असलेल्या माणसाने अहिंसेचा पुरस्कार करणे यात फार मूल्भूत फरक आहे. त्यामागे मोठा प्रवास , त्यातून आलेले अनुभव याचे मोठे ज्ञान उभे असते. तसा तो कथेतून उध्रुत होत नाही.
दुसरे खटकते ते म्हणजे राजाला पावसात उभे करण्याने तो "आपण मूर्ख आहोत या निर्णयाप्रत येणे" बालिश वाटते. काही अर्था-अर्थीही संबंध नाहीये याचा. एखादा राजा २ दिवस पावसात उभा राहिल्याने तो विद्वान ठरणार आहे ? आणखीनच बालिश....
साधूने आपण श्रेष्ठ सिध्द करण्यासाठी सम्राटाला उगाचच काहीतरी कर्म करायला सांगणे हेही बालिशच !

असो. मी कदाचित हे समजायला पुरेसा प्रगल्भ नसेन !

अहो पशुपत, तुम्ही अगदी शब्दशः अर्थ घेतलेला दिसतोय. अगदी सहज जाता जाता वाचाव्यात अशा कथा आहेत या. अगदी चिकित्साच करायची म्हटले तर वरील कथेतील जवळ जवळ प्रत्येक वाक्यात खोट काढता येईल हो. आनंदासाठी वाचायची. मला ही कथा जेंव्हा ऐकवली गेली तेंव्हा काही विशिष्ट असे माझ्या मनावर ठसवण्यासाठी सांगितली गेली नाही. आणि मीही येथे काही ठोस मांडण्यासाठी येथे या कथा सांगत नाही. छान आनंद घ्यावा म्हणून देत आहे. सगळ्याच कथा, सगळ्यांनाच कशा आवडतील? काही अशा, काही तशा असायच्याच! असो. आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

शाली जी ,
महत्वाचा Disclaimer टाकायला विसरलो , त्या बद्दल दिलगिरी !
माझा प्रतिसाद लिहिण्या मागे तुमचा अनादर करणे हा हेतू बिलकूल नाही, उलट साहित्य , संगीत यांची उत्तम जाण तुम्हाला आहे आणि ती तुमच्या स्वतःच्या लिखाणात नेहमी उठून दिसते , त्यामुळे तुमच्या बद्दल नितांत आदरच आहे मझ्या मनात. त्यामुळे माझ्या या कथेबद्दलच्या मतावर तुमची काय मते आहेत , भूमिका आहे हे ऐकणे मला जास्त महत्वाचे वाटले.
गैरसमज नसावा.
अनवधानाने तुम्हाला दुखावले असल्यास पुन्हा एकदा दिलगिरी....

पशुपत, तुम्ही अगोदरचा आणि वरील, दोन्ही प्रतिसाद फारच विचार करुन दिलेत बुवा. अहो मला तरी तुमच्या प्रतिसादात कुठेही अनादर वगैरे केल्यासारखे वाटले नाही. दिलगिरी व्यक्त करायची खरच काही आवश्यकता नाही. लेखन आवडले, नाही आवडले हे मात्र नक्की सांगत जा.
पुन्हा एकदा धन्यवाद! Happy

शाब्दिक पसार्याचा वापर करून>>> अगदी सहमत. अहो ती खोडच आहे माझ्या लेखनाला. मी काहीही कंटेट नसलेली दहा पाने सहज लिहू शकतो. अर्थात या सवयीमुळे माझ्याच लेखांचे अनेकदा नुकसान होते . मी अगदी वहावत जातो लिहिताना. शब्द फुकट मिळाल्यासारखे वापरतो खुपदा. यात नक्की सुधारणा करायचा प्रयत्न करेन, करतोय.

तुमचे शब्दांकन उत्तम आहे .
कथा मौखिक मार्गाने आलेली आहे. त्याचा गाभा , त्यातला विचार यांचे मूळ दुसर्या कुण्या माणसाच्या ठाई आहे. खरे तर माझे प्रतिसाद त्या मूळ कथाकारा कडे निर्देश करतात....

आटपाट नगर होतं, त्यात एक राजा सुखाने राज्य करत होता. राजाला तत्वज्ञानाची आवड होती. एके दिवशी एक वृद्ध विद्वान राजदरबारी आला. त्याने विद्वान वगैरे अंधश्रद्धा आहेत असे राजाला सांगितले. राजा या उत्तराने बेचैन झाला, जंगलात राहणाऱ्या साधूला भेटायला गेला, जंगलातल्या साधूने उत्तर देण्याऐवजी राजाला पावसात आकाश बघायला उभे केले. आपण एवढे मोठे राजे, या साधूच्या संगण्यावरून पावसात मूर्खासारखे उभे आहोत म्हणून राजा चिडून झोपडीत शिरला, आणि स्वतःला मूर्ख म्हणू लागला.

अजिंक्यराव पाटील, आपण अज्ञानी आहोत हे समजने म्हणजेच ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी.
ज्याला कळालं की 'आपल्याला काहीच कळत नाही' त्यालाच काहीतरी महत्वाचं कळालं. Happy

कथेबद्दल विषयच नाही ना दादा, शाब्दिक पसारा नसता तर कथा कशी अळणी झाली असती अशी कल्पना करून लिहिलं मी ते. मला तरी अशी कथा वाचायला आवडणार नाही. कथा ऐकावी* तर ती तुमच्यासारख्या कथेकऱ्याकडूनच.
* ऐकावी मुद्दाम म्हणतोय, खरं तर तुमचं लिखाण वाचणं म्हणजे ऐकणं किंवा अनुभवणंच असतं!
पुण्यात आलोय कायमचा, तर लवकरच भेटू!

ओह! प्रतिसाद समजुन घेताना माझा सारखा गोंधळ होतोय दोन दिवस. काये, आमची यात्रा सुरू आहे सध्या. त्यामुळे पुर्ण लक्ष धमाल करण्याकडेच आहे. Happy असो.
आपण भेटू नक्की. मलाही आवडेल.

Pages