आय ॲम कन्फ्युज्ड

Submitted by मंगला मराठे on 13 August, 2018 - 22:51

लग्नाचा क्लास – २
आय ॲम कन्फ्युज्ड ले. मंगला मराठे
आज लग्नाच्या बाबतीत सर्वात जास्त गोंधळ मुलांच्या मनात आहे. त्यातही शहरी शिक्षित मुलगे जास्त गोंधळलेले आहेत. शहरी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गात सगळ्याच नात्यांचे स्वरूप बदलले आहे असे दिसते. नाती व्यक्त करण्याच्या पद्धती, संभाषणाच्या पद्धती, पोशाख, सणसमारंभ साजरे करण्याच्या पद्धती अशा गोष्टीतच बदल झाले आहेत. नात्यांचा गाभा बदललेला नाही. त्यामुळे जुनं चांगलं की नवं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात सतत भुणभुणत असतो. हाच प्रश्न उपवर मुलांना गोंधळात टाकतो. आपल्याला नेमकं काय हवय हे त्यांना ठरवता येत नाही. मग सगळ्यात काहीतरी खोट काढतात किंवा कुठल्यातरी एखाद्याच गोष्टीच्या आहारी जाऊन ( क्रेझी) निर्णय घेऊन टाकतात. पालकांना वाटत मुलांना लग्न संसार नकोय, जबाबदारी नको फक्त मजा करायला स्वच्छंदी जगायला हव. पण वास्तव तसं नाही. उलट मुलं जास्त विचार करतायत. कारण सहजीवनाच्या कल्पना आता खूप विस्तारल्या आहेत. एकेकाळी मुलबाळ झाली घर नांदत राहिलं की संसार झाला अस वाटायचं. ‘नवरा म्हणजे कुंकवाला धनी’ आणि ‘घरातलं बघायला म्हणून बायको हवी’ इतका सीमित अर्थ सहजीवनाला होता. आजचे सहजीवन म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक बाबतीत साथसाथ असे आहे. त्यामुळे मुलांना सगळे मुद्दे महत्वाचे वाटतात तेव्हढ्याच शंकाही त्यांच्या मनात उभ्या राहतात. याबाबतीत मुलांशी संवाद साधला तर मुलांच्या मनातली खळबळ स्पष्टपणे दिसते.
मुलं काय काय शंका बोलून दाखवतात बघा आणि अनेक बाबतीत त्याची दुसरी बाजूही त्यांना माहित असते ते ती स्पष्ट सांगू शकतात. पण ती पचवायला कठीण वाटते. म्हणून हा गोंधळ होतो. -----
“ पूर्वी मुलींचे आईवडील स्थळ शोधायचे आणि मुलाच्या घरी जायचे. आताही त्यांचे फोन येतात. पण शिवाय माझे आईबाबा पण कुठल्या कुठल्या मंडळांमधून, नेटवरून मुलींची स्थळ शोधतात आणि स्वत: फोन करतात. हे आपल्यालाच गरज असल्यासारख नाही का होत? कमीपणा घेतल्यासारख नाही का होत? ------
पण खरतर आपल्याला पण लग्न करायचच आहे. मग त्यात स्वत: विचारायला काय झाल? हे समानतेचे युग आहे.”
“ फॉर्मवरच्या एव्हढ्याशा माहितीवरून आयुष्याचा जोडीदार कसा निवडणार?”
“मुलगी कशी, पाहिल्याबरोबर क्लिक झाली पाहिजे. पण ते पाहिल्यावर . त्याआधीच किती चाळण्या लागतायत. जात, वय, उंची, राहण्याची जागा, आणि असच आणखी काही. या गोष्टींचा आणि एकमेकांशी पटण्याचा संबंध काय?-----
पण बघितलेल्या बर. उगीच भलती उडी मारण्याची रिस्क नको.”
“बायको सुंदर असली पाहिजे. म्हणजे मित्रांसमोर आपल्याला मस्त वाटेल. पण सुंदर आहे म्हणून अॅटीट्युड दाखवत राहिली तर? सुंदर पण निर्बुद्ध किंवा खडूस असली तर ? अस म्हणतात की ‘मनं जुळली की रंग रूप काही जाणवत नाही. मग ‘आपलं माणूस ते आपलं माणूस’ हे खर असेल का? पण त्यासाठी मुळात बघितल्यावर आवडली पाहिजे न. पण मग आईबाबा फॉर्म भरताना गोरी पाहिजे , इतकी उंच पाहिजे , इतकी शिकलेली पाहिजे अशा अटी कां घालतात?”
“ माणसाचा स्वभाव महत्वाचा हे खर. पण तो बघायचा कसा? माझ्या बायकोने कस वागायला हवं – मुख्य म्हणजे कुणाशी न भांडणारी कुणाची तक्रार न करणारी हवी. माझ मध्ये सँडविच नको. माझे आईबाबा किती छान आहेत. ते काही त्रास देणार नाहीत. उलट लाडच करतील . –
पण तिला ते पटतील का? ते माझे आईबाबा आहेत म्हणून मला आवडतात. तिला तितकेच आवडतील याची काय गॅरंटी? सगळ्यांशी गोड वागणारी असावी असे वाटत. पण हे कस शक्य आहे. आपल तरी सगळ्यांशी कुठे सख्य असतं? “
“ समजूतदार म्हणजे खालमानेने सगळ्यांचे सगळे ऐकणारी मुलगी, टिपिकल घरेलू. अशी मुलगी बायको म्हणून चालेल का आपल्याला? बायको कशी तेज पाहिजे. स्मार्ट पाहिजे. -- --- अशा मुली घरात कशा वागत असतील? ऑफिसमध्ये बघतो ना. सगळ जग त्यांना कचरा वाटत. अशी मुलगी निवडली तर आपला पण कचरा करेल काय?”
“मला शिकलेली, नोकरी करणारी, जगात स्मार्टली वावरणारी माझ्याच सारखी माझ्या समकक्ष मुलगी हवी. ----- पण समकक्ष म्हणजे प्रत्येक क्षणी समकक्ष. मग नवरा म्हणून माझ महत्व काय राहणार?”
“ मुली हल्ली खूप अटी घालतात. इतकी वर्षानुवर्षे मुली सासरी येतायत त्याचं काय वाईट झालं तर ह्याचं होणार. किती शंका कुशंका काढत बसतात. थोडा विश्वास नको का ठेवायला. जास्त शिकल्या तर जास्तच विचार करायला लागल्या. जरा भाव मिळायला लागला तर सगळ्या गोष्टी घासून बघायला लागल्या. --- ------- पण त्यांच्या बाजूने बघितलं तर बरोबर वाटत. नवीन घरात नवीन माणसात यायचं तर त्यांना रिस्क तर वाटणारच. काय नेमके बरोबर तेच कळत नाही . आपण डबल स्टँडर्ड वापरतो का? ऑफिसमधे पण आपण थोडसं असच करतो. ज्या बायका स्वत: काही विचार करीत नाहीत सारखी आमची मदत मागतात त्यांना आम्ही "कितीही शिकल्या तरी ह्या अशाच वागणार." असे म्हणतो आणि ज्या स्वत: विचार करतात स्वत: काही करतात त्यांना आगावू म्हणतो. तेच इथे होत. बोलणारी मुलगी असली तर ती डॉमिनेट करणारी वाटते. कमी बोलणारी असली तर बावळट वाटते.”
“पूर्वी वधुपरिक्षा मुलींसाठी परिक्षा असायची आता मुलांसाठीही कठीण परिक्षा झालीय. सुंदर पाहिजे पण रूपवर्गिता नको. स्मार्ट पाहिजे पण फटाकडी नको. एकूण काय आपल्याला बहुदुधी आणि आखुडशिंगी गाय हवी. खरे म्हणजे बिन शिंगांची हवी. हे गुलबकावलीचे फूल कुठून मिळायला बसलंय? आपल्याला त्यातल्या काही पाकळ्याच मिळणार आहेत. त्यातरी नेमक्या कशा निवडायच्या. एखादा क्लास - लग्नाचा क्लास असता तर बर झाल असत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती”
----------------
सगळीच मुलं अशी गोंधळलेली आहेत. त्यांना कुटुंबाचे पारंपारिक उतरंडीचे स्वरूप जे आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजलेले आहे, सवयीचे आहे तेही हवेसे वाटते. कारण त्यात ते वरच्या पायरीवर आहेत. त्यांना मैत्रीच्या पायावरचे आधुनिक नाते असावे असे वाटते कारण आजचे वातावरण तसे आहे. पण त्यासाठी उतरंड सोडायचे धाडस त्यांना होत नाही. आपण एकदा चालवून घेतलं तर ती कायम तीच अपेक्षा करेल. आणि आपले सगळे घर तिच्या ताब्यात जाईल . लोक आपल्याला बावळट म्हणतील. अशी भीती वाटून काही मुलगे सुरवातीलाच खूप ताठर वागतात. शिवाय घरातली आपली सध्याची नाती ही ती येणाऱ्या एका मुलीमुळे बदलता नयेत हा दबाव मुलांवर असतो. त्यामुळे त्यांना प्रत्येक स्थळात काही खटकते काही आवडते. निवडीचे निकष ठरविता येत नाहीत.
त्यासाठी प्रथम स्वत:ला नीट ओळखायला हवे. आपले ( आणि आपल्या कुटुंबाचे ) गुणदोष, विचारसरणी, आवडीनिवडी नेमकेपणाने माहित हव्या. तर आपल्याला अनुरूप जोडीदार निवडता येईल. आपल्या प्राथमिकता आपण ठरविल्या पाहिजेत. आपल्याला कोणत्या गोष्टी आग्रहाने हव्याच आहेत; कोणत्या नसल्या तर चालतील किंवा असल्या तर चालतील आणि कोणत्या गोष्टी अजिबात चालणार नाहीत याचे स्पष्ट गणित मांडायला हवे.. एखादे नाणे बघताना कसे एक बाजू आपण बघतो त्यावेळी दुसरी बाजू आपोआप आपल्या हाताला टेकलेली असते. एखादी गोष्ट आपण हवी म्हणतो तेव्हा त्याच्या अनुषंगाने येणारी दुसरी गोष्ट आपल्याकडे आपल्याकडे आपोआप येते. ती दुसरी बाजू आपल्याला झेपणार की नाही याचा विचार करायला पाहिजे. आपल्याला हवी ती एकच बाजू आपण घेऊ शकत नाही. उदाहरणच द्यायचं झाल तर कर्तृत्ववान मुलगी असली तर तिच्याकडे निर्णयक्षमताही असणार. ती पावलो पावली मदतीसाठी वाट बघणार नाही. त्यात आपल्याला अपमान झाला असे वाटेल का? किंवा उलट, सतत मदत आणि आधार मागणारी मुलगी असेल तर आपल्याला अडकल्यासारख, सतत जबाबदारीच ओझ असल्यासारख वाटेल का? असे प्रत्येक बाबतीत बघायला हवे. सिनेमात आपण समोरच्या पात्रात स्वत:ला बघतो. तसेच इथे आपल्या भोवतालच्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्वत:लं ठेवून बघायचे. आपल्याला काय सुखकर वाटत ते आपल्यासाठी आपले निकष असतात. जग ही सर्वात मोठी शाळा आहे म्हणतात ते याचसाठी. पालकांशी, सामुपादेशाकांशी संवाद साधायला हवा. हाच आपल्यासाठी लग्नाचा क्लास असतो. मनातल्या सगळ्या शंका दूर करणारा.
मुळात आपण आणि आपल कुटुंब हे परिपूर्ण, आदर्श नाही. आयुष्यात नव्याने येणारी व्यक्तीही परिपूर्ण असणार नाही. आपले गुणदोष, जबाबदाऱ्या तिचे गुणदोष, जबाबदाऱ्या सगळ जमेत धरून आपल्याला संसार करायचा आहे. त्यासाठी तडजोड प्रत्येकाला करावी लागते. मात्र ही तडजोड डोळसपणे करावी आणि आपल्याला झेपणारी असावी . त्यासाठी एकमेकांशी बोलून एकमेकांचा परिचय करून घेऊन जोडीदाराची निवड करावी. लग्न हे जिगसॉ पझल सारखे असते. आपल्याला आपल्या शेजारी सहज बसणारा तुकडा शोधायचा असतो. मग चित्र निकोप नितळ बनते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न हे जिगसॉ पझल सारखे असते. आपल्याला आपल्या शेजारी सहज बसणारा तुकडा शोधायचा असतो. मग चित्र निकोप नितळ बनते.>>>>> खरंच. छान आहे. असाच गोंधळ अनुभवायला मिळतोय.