फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम, ऐ सनम - रफी पुण्यस्मरण

Submitted by अतुल ठाकुर on 30 July, 2018 - 23:19

rafi.jpg

एखादी शोभिवंत सागवानी वस्तु किंवा हस्तीदंत ज्याप्रमाणे काळ जावा तसे जास्त शोभिवंत होत जावे, जास्त दुर्मिळ वाटावे तसे रफीसाहेबांच्या आवाजाचे झाले आहे. आज या सुरांच्या बादशहाला जाऊन तब्बल अडतीस वर्षे झाली. पण जसजसे त्याची गाणी ऐकत जावे नवनवे काहीतरी गवसत जाते. एखादी नवीनच जागा मनाला भिडते. या आवाजाची गोडी काळागणिक वाढतच चालली आहे. आज रफीला अभिवादन करताना त्याने गायिलेली प्रेयसीची आठवण करणारी काही गाणी निवडली आहेत. आमच्या काव्यशास्त्रात प्रतिभावंतानी विरहात देखिल शृंगार पाहिला आहे. कालिदासाच्या यक्षाला तर मेघ अचेतन आहे याचेदेखिल भान राहिले नाही इतका तो या विप्रलम्भ म्हणवल्या जाणार्‍या शृंगाराच्या भावनेने भरून गेला होता. जुन्या हिन्दी चित्रपटात जेव्हा अशी परिस्थिती असते आणि कमाल अमरोही,गुलजार, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी यांच्यासारखी नामी मंडळी गीत लिहितात तेव्हा त्याचे सोने होणार हे ठरलेले असतेच. त्यातून जेव्हा कसलेली मंडळी संगीत देतात आणि त्यात रफीचा स्वर प्राण भरतो तेव्हा त्याच सोन्याला स्वर्गीय सुगंधच प्राप्त झाल्यासारखे होते. मूळात मी निवडलेल्या गण्यांना दु:खाची किनार नाही. प्रेयसी दूर आहे. तिची आठवण येते आहे. आणि काही सुचत नाही. रफीसाहेबांचा आवाज अशावेळी कॅलिडोस्कोपप्रमाणे भावनांच्या छटा बदलत जातो. सर्वप्रथम मखमली स्वर म्हणजे काय याचा प्रत्यय देणारे "शंकर हुसेन" चित्रपटातील "कहीं एक मासूम नाजुक सी लडकी" हे गाणे मी निवडले आहे.

जुबांसे कभी उफ निकलती तो होगी, बदन धीमे धीमे सुलगता तो होगा,कहीं के कहीं पाओ पडते तो होंगे जमीं पर दुपट्टा लटकता तो होगा,कभी सुबहा को शाम कहती तो होगी, कभी रात को दिन बताती तो होगी...अशासारखे कमाल अमरोहींचे शब्द आणि खय्यामची सिग्नेचर धून म्हणता येईल अशी संथ चाल. अशा चाली खय्यामच बांधु जाणे. त्यात रफीने लावलेला प्रियकराचा हळवा स्वर. आवाज तर रेशमाच्या लड्या उलगडल्यासारखा मृदु मुलायम लागला आहे. आपल्या विरहात प्रेयसी काय करीत असेल याचे चित्र रंगवणारे हे गाणे ऐकताना प्रियकराची अवस्थाही अवघड झालेली आहे हे कंवलजीतसारख्या अतिशय गुणी कलावंताने गाण्यात दाखवून दिले आहे. सिनेमात फारसा न स्विकारलेला हा कलावंत पुढे बुनियादसारख्या मालिकेत चमकला. पण मला वाटते माणसाचे भाग्य असावे तर असे. रफीच्या निवडक गाण्यांची यादी करायला सांगितली तर अनेक रसिक या गाण्याला आपल्या यादीत स्थान देतील अशी माझी समजूत आहे. आणि जर ते गाणे कुणी पाहिल तर कंवलजीतही लोकांच्या लक्षात राहिल. यानंतरचं गाणं आहे तरण्याबांड हँडसम फिरोज खानचे. हॉलिवूडमध्ये असता तर गडी वेस्टर्नपटात चमकला असता. "उंचे लोग" चित्रपटात खानसाहेब रफिचे "जाग दिले दिवाना" सारखे नितांत सुंदर गाणे गावून गेले आहेत.

दो दिलके कुछ लेके पयाम आयी है, चाहत के कुछ लेके सलाम आयी है,दरपे तेरे सुबहा खडी हुई है दिदारकी, जाग दिले दिवाना रुत जागी वस्ले यार की...मजरूह सुलतानपुरीचे हे गीत आणि त्यातील प्रेयसीच्या गोड आठवणी जागवणारे शब्द.फिरोजखान तर गाण्याचा स्वतःच आनंद घेतल्यासारखा हे गाणे म्हणताना पडद्यावर दिलखुलास वावरताना दिसतो. संगीतकार चित्रगुप्तने मोजक्याच हिन्दी चित्रपटांना संगीत दिलं आहे. पण त्याची गाणी अगदी अस्सल बावनकशी आहेत. त्यातलंच हे एक. रफीसाहेबांचे सुरुवातीचे गुणगुणणे अगदी आवर्जून ऐकण्याजोगे. प्रेयसीची आठवण करताना आपोआपच स्वप्नाळू होत गेलेला स्वर लागला आहे. प्रिय माणसाच्या तरल आठवणींमध्ये रमताना स्वरसुद्धा तसाच ठेवणे, गीतामधील काही शब्द वेगळ्या प्रकारे उच्चारून त्यातून विलक्षण परिणाम साधणे हे रफीसाहेबांच्या गाण्यात पहावे. या गाण्यात देखील "जाग दिले दिवाना" म्हणताना त्यांनी काही ठिकाणी ही किमया केली आहे. प्रेयसीशी हलक्या आवाजात कानगोष्टी कराव्यात, कुजबुजावे अशा तर्‍हेने काही वेळा रफी "जाग दिले दिवाना" म्हणतो ते मस्त वाटते. हे गाणे देखील रफीप्रेमी आपल्या यादीत नक्की घेतील असे वाटते. पुढचे गाणे पाहताना आपले जानीसाहेब पडद्यावर दिसतात. मात्र ते गाणे म्हणत नाहीत. जुना देखणा राजबिंडा राजकुमार आणि "लाल पत्थर" मधील "उनके खयाल आये तो आते चले गये" हे ते गाणे.

गाण्याच्या सुरुवातीला राजकुमार स्वतः तबला वाजवताना दाखवला आहे. अमिर उमराव माणुस आणि त्यात कलावंत रसिक. अशावेळी हेमा मालिनीसारखी अप्सरा जर मनात भरली असेल तर तो " होशो हवास पे मेरे बिजलीसी गिर पडी, मस्ती भरी नजरसे पिलाते चले गये" असे म्हणेल त्यात नवल ते काय? हसरत जयपुरींच्या शब्दांना शास्त्रीय संगीताचा बाज चढवला आहे शंकर जयकिशन यांनी. या गाण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे खुद्द रफिचा जो आदर्श होता त्या जी एम दुर्राणीने हे गाणे रफीच्या आवाजात पडद्यावर पेश केले आहे. रफीची शास्त्रीय गाण्यातली सहजता येथे दिसून येते. यात ताना, आलापी नाहीत मात्र रफीने " उनके खयाल आये तो आते चले गये" या ओळीतल्या निरनिराळ्या शब्दांवर केलेले चमत्कार मात्र आहेत. पुन्हा खास शब्दांवर रफीसाहेब विशेष ठसा उमटवतात तो आहेच. राजकुमारला मद्याच्या प्याल्यामध्ये हेमामालिनी दिसते आणि त्यावेळी "मस्ती भरी नजरसे पिलाते चले गये" मध्ये "पिलाते" वर रफीसाहेब किंचितकाल रेंगाळून मदहोशी किती परिणामकारकरित्या दाखवतात ते खास ऐकण्याजोगे.

शेवटचे गाणे बहुतेकांना माहित असलेले आहे. १९७१ सालच्या "सिमा" चित्रपटातले "जब भी ये दिल उदास होता है". त्यावेळचा दाढी नसलेला मर्दानी कबीर बेदी आणि सीमी गरेवालसारखी रती. अस्सल रती मदनाचा जोडा म्हणता येईल.गुलजारच्या नेहेमीप्रमाणेच आकर्षित करणार्‍या आणि विचार करायला लावणार्‍या शब्दांना साज चढवला आहे पुन्हा शंकर जयकिशन यांनीच. हे गाणं मला चिमटीत न गवसणारं वाटतं. मी अनेकदा त्याबद्दल विचार केला आहे. रफीच्या आवाजाचा जोरकसपणा प्रामुख्याने यात दिसून येतो. रफीचा येथे लागलेला पहाडी आवाज आणि पार्श्वभूमिपण पहाडीच. त्यात पहाडासारखा बलदंड कबीर बेदी. पडद्यावर गाणे कुणीच गात नाही. कधी कधी असं वाटतं पुराणातल्या आकाशवाणीचा आवाजदेखिल असाच धीरगंभीर असेल. त्यासाठी तर रफीसाहेबांनी हा खास आवाज लावलेला नसेल? प्रेयसीचे विचार मनात येताहेत. पण ते गंभीर माणसाच्या मनात. कुणी चॉकलेट हिरो नाही तेथे. अशावेळी निसर्गाच्या सानिध्यात पर्वतराजींमध्ये जेव्हा हा तालवृक्षासारखा उंच माणुस हात मागे बांधून फिरतो तेव्हा त्याचे विचार व्यक्त करायला असाच आवाज हवा जो येथे रफीचा आहे.

आज अडतीस वर्षानंतर जाणवतं आहे कि माझे रफी व्यसन वाढतच चालले आहे. व्यसनमुक्तीवर लिहिणारा मी, हे व्यसन मात्र कधीही सुटणार नाही याची मला खात्री आहे. लेखाचे नाव " फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम" या "रुस्तम सोहराब" मधील गाण्यातून घेतले आहे. सज्जद हुसेन नावाच्या अवलियाने संगीत दिलेले हे गाणे. यातही प्रेमनाथला आपली प्रियाच आठवत असते आणि तो अल्ला कसम घेऊन म्हणतो "हम न भूलेंगे तुम्हे". कधी कधी वाटतं आमच्या सारख्या रफीच्या चाहत्यांनीदेखील याच सुरात आळवणी करावी, म्हणावं देवाशप्पथ रफीसाहेब आम्हीही तुम्हाला विसरणार नाही. हम न भूलेंगे तुम्हे अल्ला कसम. पण मग जाणवतं हे म्हणण्याची गरज नाही. फिर तुम्हारी याद आयी म्हणण्यासाठी मूळात आम्ही रफीसाहेबांना कधी विसरलोच नाही हेच खरे.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे. म्हणून वर आणत आहे.>>>

धन्यवाद पाटील, वाचायचे राहून गेले. आज निवांत एकेक गाणे ऐकत वाचते.

Pages