दुधी ची सुकी भाजी - दाक्षिणात्य चवीची

Submitted by योकु on 25 July, 2018 - 09:57
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- अर्धा किलो दुधी (कोवळा पाहून घ्यावा, जून असेल तर शिजायला वेळ लागतो आणि खूप बिया असतात)
- एक मध्यम मोठा बटाटा (भाजी जरा मिळून येण्याकरता)
- तिखटपणानुसार हिरवी मिरची (कमी घेतली तरी चालेल पण वगळू नका)
- कढिलिंबाची १०/१२ ताजी हिरवीगार पानं
- आवडत असेल तर थोडं लाल तिखट
- मोहोरी आणि जिरं पाव-पाव चमचा
- मीठ
- हळद
- थोडी साखर
- एम-टी-आर ची सांबार पावडर (कुठल्याही ब्रँडचा सांबार मसालाही चालेल)
- बारीक चिरलेली कोथिंबीर, वरून घालण्याकरता

क्रमवार पाककृती: 

- दुधी आणि बटाटा सोलून बाईट-साईज च्या चौकोनी फोडी करून घ्याव्या
- तिखटपणानुसार हिरवी मिरची मोडून किंवा बारीक चिरून घ्यावी
- लोखंडी कढई तापत ठेवावी आणि जरासं तेल घालावं
- यात क्रमानी मोहोरी; ती तडतडली की जिरं; ते जरा फुललं की हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घालावी; यावर हळद घालून चिरलेली भाजी घालावी आणि व्यवस्थित परतून घ्यावं.
- तेल मसाला नीट माखला भाजीला की वर झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी
- नंतर मीठ, साखर आणि वापरणार असाल तर लाल तिखट घालून परतून भाजी पूर्ण शिजवावी
- सर्वांत शेवटी मोठा चमचाभर सांबार पावडर घालून नीट हलवून आच बंद करून टाकावी आणि झाकण घालून भाजी मुरू द्यावी १० मिनिटं तरी.
- मस्त लाल रंग आलेली तरीही मधून मधून दुधीच्या हिरव्या फोडी दिसणारी भाजी तयार!
- वरून कोथिंबीर घालून सजवावी आणि वाढून घेऊन तूप लावलेल्या फुलक्यांबरोबर चापावी Happy

हा मारकांकरता फटू (यात कोथिंबीर नाही, विसरलो घालायला पण त्याचे मारकं कापायचे न्हायीत)
IMG_0082.JPG

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे, तीन/तीन लोकांकरता पुरावी
अधिक टिपा: 

- सांबार मसाला/पावडरीत मिरची असतेच सो वरून हिरवी मिरची, लाल तिखट घालतांना जरा जपून
- ही भाजी जरा झणझणीतच चांगली लागते
- पाणी अजिबात वापरायचं नाहीय, तेल-वाफेवरच भाजी शिजते चांगली
- साखर वापरून गोडूस चव आणायची नाहीय, जस्ट दुधीचा जरा अंगचा कडसर पणा लपेल एवढीच साखर वापरायचीय
- आवडत असेल तर थोडं ओलं खोबरं ही वापरता येईल यात

माहितीचा स्रोत: 
फ्रीज आवरतांना सांबार पावडर सापडली, ती सांबार करायला नक्कीच पुरली नसती, तर या भाजीत ढकलली आणि अफलातून चव साधली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages