कोल्हापुरातील बावड्याची मिसळ:- एक अनुभूती

Submitted by राजेश्री on 12 July, 2018 - 13:37

कोल्हापुरातील बावड्याची मिसळ :- एक अनुभूती

IMG_20180630_163036.jpg

मिसळ हा शब्द क्रियापद म्हणून वापरला ना तर उत्तर येईल काय काय मिसळू कोल्हापुरात आसल तर म्हणायचं "मिसळायला लागतंय"आमी कोल्हापुरात येऊन जाऊन होतो तवा "यायला लागतंय" हा शब्द सारखा कानावर पडत असायचा,कुणाला बोलायवायच म्हंटल तर,कुठल्या सभेला जायचं असेल तर,कुठला मोर्चा असेल तर यायला लागतंय हे आहेच.मराठा महामोर्चाच्या वेळा तर कोल्हापुरात सगळीकडे डिजिटल लावलेली त्यावर लिहिलेलं असायचं,"भावा यायला लागतंय" त्याचा परिणाम हा की " यायला लागतंय" हा शब्द माझ्या तोंडात कायमचा बसलाच आणि त्याआधीचा "भावा" हा शब्द ,कोल्हापूरकर झाल्यावर बघल तेला माझ्या तोंडातून भावा भावा हा शब्द जायला लागला.त्याचा पुढे जाऊन परिणाम असा झाला की माझा फेसबुक वरील मित्रगण माझ्या भावा या शब्दामूळे आधी "ही दोस्ती तुटायची नाय" आस म्हणायचा पण भावपण न परवडल्याने ती दोस्ती तोडून पसार झाला.आमी कशाला काय म्हणाय जातोय तवा जाईना का तिकडं,आमास्नी काय करायचंय .सांगायचा मूळ मुद्दा हा हुता की मिसळीत काय मिसळतात त्याला महत्व असत.हे मिसळण प्रांत,शहरच काय तर हॉटेलनिहायही वेगळं असू शकत बर का.
महाराष्ट्रात सांगली, कोल्हापुर, पुणे, ठाणे, नाशिक,या सगळ्या ठिकाणच्या मिसळीला स्वत:चा असा स्वाद आणि रंग आहे.वडापाव हा जसा पटकन हाताशी येणारा आणि छोट्या छोट्या भुकेला बाय करायला उपयोगी पडणारा पदार्थ आहे तस मात्र मिसळीच नसतंय बर का.मिसळ खायची हे घरातून निघतानाच ठरवावे लागते.मिसळ खायला जाऊया म्हंटल आणि वडापाव खाऊन आलं ते चालत असतंय.पण वडापाव खाऊया अस ठरताना अचानक मिसळ खायचं ठरलं तर मनाची पूर्वतयारी नसलं तरी ते थोडं जड जात आसतंय.मिसळ म्हंटल की,चटकदारपणा येतोच पण त्या मागून जो काही झणझणीतपणा येतो ना तो ऊभ्या ऊभ्या खाताना नाय सहन करता येत.या झणझणीतपणामुळे कपाळाला सुटणारा दरदरीत घाम आणि नाकातून वाहू पाहणार पाणी निपटायला रुमाल नाय तर मिनी टॉवेल घेऊन एका जाग्याला 'बसायला लागतंय'
देशोदेशीची झालंस तर अगदी ठिकठिकाणची मिसळ ही नवी लेखनमाला मी लिहीन कारण मिसळ म्हंटल की काय मिसळतात यावरच त्या मिसळीचा स्वाद अवलंबून असतोय.मग या स्वादानुसार,चवीनुसार तर "लिवायला लागतंय"
तर आज आपण कोल्हापुरातील बावड्याच्या मिसळीबद्दल बोलत होतो.. खरतर मिसळीचे कोल्हापुरी आणि पुणेरी असे दोनच प्रकार सांगता येतील.जातिवंत खवय्यांची व्याख्या करायची तर त्याला कोल्हापूर सोडून इतर ठिकाणी कोल्हापुरी मिसळ म्हणून जे काही दिल आहे त्याचा स्वादभेद स्पष्ट करता आला पाहिजे. कोल्हापुरात मिसळीसाठी अनेक ठिकाण प्रसिद्ध आहेत प्रत्येक ठिकाणच्या मिसळीचा डौल न्यारा कोल्हापुरी मिसळीची ही परंपरा कोल्हापुरी फेटय़ाइतकीच प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी मिसळीची नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण अनेकांना त्यात म्हणावे तसे यश आलेले नाही. मिसळीची परंपरा जपणारी, तिची मूळ चव बिघडू न देता अधिक रंग आणणारी पारंपरिक घराणीही कोल्हापुरात आपला दर्जा टिकवून आहेत. कसबा-बावडा हे कोल्हापूरचं उपनगर. तिथला छत्रपतींचा नवा राजवाडा हा जसा सर्वाच्या परिचयाचा आणि श्रद्धेचा तशीच बावडय़ाची मिसळही जातिवंत खवय्या मंडळींच्या आकर्षणाचा विषय. छोटेखानी हॉटेलात मिळणा-या इथल्या मिसळीनं कसबा-बावडा या उपनगराची ख्याती अख्खा महाराष्ट्रात पोहोचविली आहे.
तर मग मंडळी कोल्हापूरच्या बावड्याच्या मिसळीत काय मिसळल असतय बघा, मटकीच्या मोडाची उसळ किंवा पांढरा वाटाणा, मटार यांचा चवदार आणि झणझणीत रस्सा, त्यात चिवडा, फरसाण, हवाच असेल तर भज्यांचा चुरा, त्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरव्यागार कोथिंबिरीचा साज असते.एक साजूकशी लिंबाची फोड असतेय.सोबत मग झणझणीत रश्याने पोळलेल्या जिभेला मलमपट्टी म्हणून मऊसूत पाव किंवा ताजा ताजा ब्रेड पण दिला जातो.जास्तच गारवा हवा असेल तर ताज ताज दही देखील असत.हा सगळा साज देण्याची पद्धत पण साधीच बरका.मुळात जेवढं साधं हॉटेल तेवढी फक्कड चव अस आसतंय गणित.बावड्यात पोहचल्यावर बावडा मिसळ अशी पाटी दिसण्यापूर्वी दर शुक्रवारी बंद राहील अशी मोठी शाईने काढलेली अक्षरे दिसतात ना ती बावडा मिसळ बरका.आपल्या सोयीने जी हॉटेल चालतात ना तीच हॉटेल एकदम बेष्ट असतात बघा.बावड्याच्या या छोटेखानी हॉटेल किंवा मिसळ टपरीची आणखी एक खासियत अशी की,या मिसळीची लोकप्रियता इतकी की ही मिसळ बावड्यामध्ये जाऊन चाखलेल्या मंडळींमध्ये हिंदी,मराठी स्टार आहेत,स्टार क्रिकेटपटू आहेत, धुरंधर राजकारणी आहेत,समाजसुधारक आहेत,अगदी लता मंगेशकर आणि सर्व मंगेशकर भगिनी तर आहेतच इतर प्रसिद्ध संगीतकार वर्गही आहे.सांगायच झालं तर उभ्या महाराष्ट्रात जेवढी मंडळी सेलिब्रेटी म्हणून ज्ञात होती आहेत त्या समद्यानी त्या फक्कड मिसळीची चव चाखली आहे बर का.बावड्याच्या हॉटेलात मिसळ खायला जाताना नम्र होऊन खाली वाकूनच जायला लागतंय नायतर तुळवीला कपाळ थडाकलंच बघा.आत गेल की साध्या टेबल खुर्चीवर जाऊन बसल की मग चोहोबाजुनी लावलेल्या फोटोवरून आपल्याला सेलिब्रेटी मध्ये बसून ही मिसळ खातोय असा फील येतो शिवाय ही मिसळ कशी प्रिय होती याचा अंदाज येतो.विशीच्या आसपास वय असणारा तेंडुलकर,विनोद कांबळीचा फोटो देखील इथेच पाहायला मिळेल.आणखी लय फोटू हायती तुम्ही जाऊन बघू शकताय.(हे लगिर झालं जी च्या राहुल्याच्या टोन मध्ये वाचा... मजा येईल)
तुम्ही तिथं गेला कनाय तुम्हालाही सेलिब्रेटी सारखच आदरातिथ्यही मिळेल मग तुम्हाला विचारलं जाईल कशी मिसळ हवी तिखट की मध्यम हवा तर सेमी तिखट असाही तुम्ही ऑपशन निवडू शकता.पण तुम्हाला सांगतो तिखाटजाळ मिसळ खाण्यात जो आनंद असतोय ना तो कशात नसतोय.हा तिखटपण पचवणं ही देखील एक प्रकारची अचिव्हमेंट असतेय.म्हणून मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच असायला हवी. तिखटपण झेपत नाही, म्हणून मग दही, पापड इत्यादीशी सलगी करायला हरकत नाही. कदाचित यामुळेच या मिसळीतून दही मिसळ, फराळी मिसळ, उपवासाची मिसळ असे मिसळीचे प्रकार पुढे आले असतील.
बावड्यात मिसळ खायला जायला वेळ काळ पाळायची आवश्यकता नाहीच पण तेवढं हॉटेल मात्र उघड आसल पाहिजे बघा.मिसळीची चव ही मिसळ खाऊन झाल्यावर जिभेवर रेंगाळत राहते तिथेच मिळणारा धारोष्ण दुधाचा चहा पिला की मग मिसळ खायच्या आनंदाचं एक सर्कल पूर्ण होतंय बघा.जेंव्हा केंव्हा मी या हॉटेलात मिसळ खायला जाते तेंव्हा तेंव्हा तिथं माझाबी मिसळ खातानाचा फोटू असावा असं वाटत आसतंय.झालासतर हे बावडा मिसळ पुराण वाचून कुणी बावड्याला मिसळ खायला जाणार आसल तर तिथल्या मिसळ मालकाला माझा फोटू 'लावायला लागतूय'आस सांगणार आसाल तर माझी काही ना नाही.

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
IMG_20180630_163036.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलं आहे. मिसळ पण मस्त दिसतेय. कोल्हापुरात खाल्लेली आहे मिसळ अनेकदा. पण ही खूप जास्त तिखट असावी असे रंगावरून वाटतेय.

मस्तच राजेश्री.
तिथे ब्रेड स्लाइस देतात का मिसळीसोबत?

लय भारी....इतके दिवस अंबाबाईच्या दर्शनासाठी जात होतो आता स्पेशल मिसळ खायला जायला लागतंय

छान लिहलंय. मिसळ खायला जायचं तर बेत करूनच जायला लागतंय हे अगदी मनातलं लिहलंय.
हल्ली बऱ्याच ठिकाणी ब्रेड स्लाईसच देतात. अमच्याकडे तो त्रिकोणी स्लाइस मिळतो.

सध्या पथ्यावर असल्याने लेख वाचला नाहिये (तोंडाला उगिच पाणी सुटेल म्हणून)
पण मिसळीचा फोटो सर्व काही बोलून गेला, अत्याचारी फोटो.

वैसे मी कोल्हापुरची असूनही बावडा मिसळ ४ वर्षापुर्वी पहिल्यांदा खाल्ली.
तेव्हा माबोवरचे आमचे खास मित्र निवांत पोपट(अविनाश चव्हाण) आमच्या सोबत होते.
ते आता या जगात नाहित. त्यामुळे ही मिसळ आणि त्यांची आठवण सदैव मनात राहिल.

मस्त लिहिलय. आता कोपुत कधी जाणे होईल माहित नाही. पण आवर्जुन चाखु ही मिसळ.

फडतरे मिसळ खाल्ली होती २ वर्शापुर्वी. तिथेही असेच ब्रेड स्लाईस दिले होते.

जाळ दिसतेय ही. एकदा मी अशीच देवदर्शन करून बाहेर आल्यावर उजवी कडच्या छोट्याश्या दुकानात्/हाटलात खाल्ली मिसळ. चव मस्तच पण तिखट झ्येपलं नाय ब्वा. उद्यमनगरची फेमस म्हणून गेल्ते पण ती काय एवढी ग्रेट नाय वाटली. आता गेले की हिचा नं.

माझी कोल्हापूर यात्रा बासुंदी, पेढे यावर जास्ती जोर देणारी. Wink

मिसळ या पदार्थावर इतके भरभरुन लिहिलेलं पाहिले कि कुणितरी राजेंद्र कुमारच्या अभिनयाविषयी 'देवाघरचे देणे' टाईप लेख लिहिल्यासारखे वाटते. मिसळ हा हॉटेलात मिळणारा आद्य फ्युजन पदार्थ असावा.

मिसळ आणि सोबत ब्रेड? आपला पास!
मिसळ पाव. >>>>>>>>> +१

साधारण १५-१६ वर्षापूर्वी आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलेलो तेव्हा एका हॉटेलात बाबांनी सगळ्यांसाठी मिसळपाव मागवलेले. पहिल्या डिशमधे ब्रेड बघूनच मी माझी अॉर्डर कॕन्सल केली. आज इतक्या वर्षानंतरही मी मिसळ आणि ब्रेड एकत्र बघू शकत नाही.

दोनच दिवसांपूर्वी कोल्हापुरात मिसळ खावून आलो. अनेक ठिकाणी चांगली मिळते. बावडा मिसळ त्यात खूपच प्रसिद्ध. पण विशेष म्हणजे अजूनही खायचा योग आला नाही. पण परवा शाहूपुरीत वहिनी उद्योग येथे मिसळ खाल्ली. ओके होती. (हे ठिकाण खरेतर "वहिनीची बाकरवडी" साठी प्रसिद्ध आहे. लाजवाब! कोल्हापूरला गेलो कि इथून खरेदी असतेच असते). बाकी कोल्हापूरात वडा आणि मिसळ बरोबर हा जो ब्रेड देतात (तिथे स्लाईस शब्द आहे त्यासाठी) तो मला तरी खूपच आवडतो. वडापाव हा कोल्हापूरात खाल्ला कि इतर कुठे खायचीच इच्छाच होत नाही.

छान लिहिलंय.

पण < मिसळ या पदार्थावर इतके भरभरुन लिहिलेलं पाहिले कि कुणितरी राजेंद्र कुमारच्या अभिनयाविषयी 'देवाघरचे देणे' टाईप लेख लिहिल्यासारखे वाटते. >>> +१

< बाकी कोल्हापूरात वडा आणि मिसळ बरोबर हा जो ब्रेड देतात (तिथे स्लाईस शब्द आहे त्यासाठी) तो मला तरी खूपच आवडतो. >>> वडापाव मागितला कि ब्रेड स्लाईसमध्ये वडा घालून देतात??

Pages