तुझ्याविण ना मला पर्याय दुसरा पावसा

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 July, 2018 - 03:46

तुझ्यासाठी तिथे व्याकूळ नजरा पावसा
इथे का मारतो आहेस चकरा पावसा ?

भरवश्यावर तुझ्या निर्धास्त केली पेरणी
बळीचा बनवला आहेस बकरा पावसा

तुझ्या येण्यामुळे येते कुणाची आठवण
नको देऊ असा आनंद दुखरा पावसा

तुला झिरपायचे असल्यास संततधार ये
कधी कोसळ तुझा सोडून नखरा पावसा

तिला किंवा तिला भिजवायचे आॅप्शन तुला
तुझ्याविण ना मला पर्याय दुसरा पावसा

कधी डोळयात मुरलेला, कधी ओठांमधे
सहजतेने तरी म्हणतोस विसरा पावसा ?

प्रतिक्षेने तुझ्या कोमेजली आहे धरा
तिच्या वेणीत जा माळून गजरा पावसा

महानगरात माणुसकी भयानक तुंबली
मनांचा व्हायचा नाहीच निचरा पावसा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users