ढेमश्यांची सोपी भाजी

Submitted by योकु on 9 July, 2018 - 14:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अश्याच कुठल्यातरी गृपवर ढेमश्यांची काही(तरीच) कृती पाहीली तर मला आम्ही नेहेमी करतो ती ही साध्या भाजीची कृती आठवली. ती ही कृती.
फोटो नाहीत कारण केली नाहीत. भरल्या ढेमश्यांचीही एक फर्मास कृती नंतर देण्यात यीलच...

- एक पावभर ढेमशी ( अती जून आणि फार मोट्ठी नकोत. यात बियाच फार निघतील)
- अंदाजे अर्धी वाटी चण्याची डाळ
- फोडणीचं साहित्य - हळद, हिंग, लाल तिखट, मीठ, लहानसा गुळाचा खडा आणि आवडत असेल तर पाव लहान चमचा गोडा मसाला
- हिरवी मिरची एखादी आणि कढीपत्त्याचा स्वाद आवडत असेल तर एक टहाळं ते ही घ्यावं

क्रमवार पाककृती: 

- चण्याची डाळ तासभर तरी भिजत घालावी (हा वेळ कृतीत नाही)
- ढेमशी धूवून, पुसून नंतर मध्यम चौकोनी चिरावी
- ही भाजी डायरेक्ट कुकर मध्ये केलेली मस्त होते
- तर लहान कुकर तापवावा आणि त्यात जरा तेल घालून मोहोरी, हिंग, हळद, हातानीच मोडून एखादी हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घालून फोडणी करावी
- यात आता चण्याची डाळ घालून जरा परतावं आणि मग ढेमशी घालून पुन्हा जरा परतावं. भाजीला तेल नीट माखलं की मग मीठ, गूळ (वापरणार असलात तर गोडा मसाला) आणि अर्धी ते पाऊण वाटी कढत पाणी घालून एकदा ढवळावं. नंतर कुकर बंद करून २ शिट्या + २/४ मिनिटं अगदी बारीक आचेवर ठेवावा.
- प्रेशर निवलं की गरमागरम वाढून घ्यावी, वर कोथिंबीर भुरभुरावी बारीक चिरलेली सोबत तुपाचा हात लावलेले फुलके घ्यावेत आणि ओरपावी. परब्रह्म Happy

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे. दोन लोकांना एकावेळेला पुरेल
अधिक टिपा: 

- काही विशेष नाहीत टीपा.
- तिखटा ऐवजी लसूण + खोबर्‍याची चटणी असेल तर ती घालूनसुद्धा ही भाजी लई भारी होते.
- बायडी कधी कधी हे करते - लसूण, सुक्या खोबर्‍याचा लहानसा तुकडा, जिरं, चमचाभर लाल तिखट मिक्सरमधून वाटून मग फोडणीत जरा परतायचं, बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच. या पद्धतीनं केली तर एक वेगळी चव येते आणि मस्त खमंग लागते.
- या दोन्हींपैकी काही वापरणार असाल तर गोडा मसाला आणि लाल तिखट न घालता हेच वापरायचं.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या साबा अशाच पद्धतीने करतात. चविष्ट होते त्यांच्या हातची भाजी.
इथे घरी नाही आणली जात फारशी कारण इथे ती जून, मोठ्या बिया असलेलीच ढेमशी जास्त पाहिली आहेत.

छान लिहीलय, तुमच्या पाक्रु मस्त असतात.

फोटो टाका एखादा असेल जुना तर, कारण मला ढेमशी म्हणजे काय माहित नाही.

बघायला आवडली तर मम्मीला सांगेन करायला

यांना हिंदीत मोठं गोडुलं नाव आहे - दिलपसंद Happy
या फोटोत दिलेल्या साईज ची ढेमशी असतील तर भरली ढेमशी होतात शक्यतो... ती कोरणं, मसाला भाजून भरणं ही लिच्चड कामं पुरतात खरी पण खूपच फर्मास भाजी होते.
घाईच्या वेळेस वरच्या पद्धतीनं मात्र...

माझी बायको ढेमश्यांची साधी तसेच विशेष मसाला (त्यात बहुतेक खोबरे, शेंगदाण्याचा कूट असतो) भाजी करते, दोन्ही मस्त करते, मसाला वाली तर जबरीच.
तिला ही पण पाकृ दाखवतो.

अर्रे साधारण अशीच भाजी आम्ही दोडक्याची करतो. फक्त कुकरमध्ये न शिजवता अगदी थोडं कढत पाणी घालून कढईतच करतो. मस्त होते एकदम.