भरली वांगी

Submitted by तृप्ती आवटी on 3 July, 2018 - 10:53
bharali wangi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वांगी छोटी जांभळी - ८
कांदे - २ मध्यम
टोमॅटो - २
लसूण - ७-८ पाकळ्या
कडिपत्ता - १ पान
कोथिंबीर
चिंचेचा कोळ - २ चमचे
कोरड्या मसाल्यासाठी साहित्य:-
दाणे - १ चमचा
तीळ - १ चमचा
खसखस - १ चमचा
खवलेला नारळ - ३ चमचे
मेथी - अर्धा चमचा
मिरं - १०-१२ दाणे
जिरं - १ चमचा
धणे - १ चमचा
हळद - पाव चमचा
तयार मसाले :-
सांबार मसाला - १ चमचा
तिखट - १ चमचा
फोडणीसाठी साहित्य :-
हिंग
मोहरी
सढळ हातानं तेल

क्रमवार पाककृती: 

कोरड्या मसाल्यासाठी मोजून घेतलेलं साहित्य वेगवेगळं मंद आचेवर भाजून घ्यावं. भाजलेले सगळे मसाले एकत्र करून त्यात तिखट, हळद, धणे, अर्धा सांबार मसाला, थोडं मीठ घालून वाटून घ्यावं. वाटलेला मसाला भुरभुरीत वाटल्यास तेलाचा अथवा पाण्याचा हात लावावा.

धुवून कोरड्या केलेल्या वांग्यांना देठाच्या उलट बाजूनं अर्ध्या लांबी एवढ्या दोन खाचा देऊन त्यात मसाला भरावा. देठं काढू नयेत, तशीच ठेवावीत.

तेल कडकडीत गरम करून त्यात हिंग, हळद, मोहरीची फोडणी करावी. कडिपत्ता घालून मग त्यात बारीक चिरलेला कांदा, बाssssरीक चिरलेला लसूण घालावा. कांदा जरा शिजला की चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी, चवीप्रमाणे मीठ घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यावं. या पायरीवर आंच थोडी वाढवली आणि भराभरा हलवत परतलं की मस्त खरपूस चव येते भाजीला. आता त्यात मसाला भरलेली वांगी घालून सगळ्या वांग्यांना कांदा-टोमॅटोची पेस्ट लागेल अशा बेतानं हलक्या हातानं हलवून घ्यावं. झाकण घालून मंद आचेवर वांगी शिजू द्यावीत. वांगी अर्धी शिजली की थोड्याशा उकळलेल्या पाण्यात चिंचेचा कोळ आणि उरलेला सांबार मसाला मिसळून ते पाणी घालावं. अगदी अंगाशी रस्सा होइल इतपतच पाणी घालायचं आहे. कोरड्या मसाल्यातला काही उरला असेल तर तो पण घालावा. पुन्हा एकदा हलक्या हातानं हलवून कढई/पातेल्यावर झाकण घालून भाजी शिजवावी. भाजी शिजल्यावर वरून कोथिंबीर घालावी. ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर मस्त लागतात भरली वांगी.

वाढणी/प्रमाण: 
दोन मोठ्या माणसांसाठी पुरेल भाजी
अधिक टिपा: 

चमच्याचं प्रमाण टेबल स्पून नुसार आहे.
मला कोथिंबीर भाजीतच शिजलेली आवडते म्हणून मी आधीच घालते कोथिंबीर.

माहितीचा स्रोत: 
सौदिन्डियन मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचूनच अहाहा झालं. फोटो अगदी लाळगाळू.एक शंका, ती हिरवट काटेरी वांगी चालतील का? ती ह्या जांभळ्या वांग्यांपेक्षा मोठी असतात ना?

सुरेख...! Happy

सांबार मसाला घालून करून पाहायला हवी आता... पुढल्या आठवड्यात आठवणीनं वांगी आणून करून पाहील.

हिरवट काटेरी वांगी >>> रस्सा भाजीत चांगली लागतात का ती वांगी? तशी लहानच असतात त्यामुळे मसाला भरायला बरी पडतील.

योकु, धनि- करा आणि रिपोर्ट द्या Happy

मस्त... करुन बघणार.
ते लोकं बर्याच भाज्यांमधे सांबार मसाला टाकतात. एकदा चिकन मधे टाकायला लाल तिखट आणि धणेजिरे पावडर शिवाय दुसरा कुठला ही मसाला नव्हता ( एरवी गरम मसाला तरी असतोच) म्हणुन १ चमचा लाल तिखट, १ चमचा धणेजिरे आणि १/२ चमचा सांबार मसाला टाकला. मस्त झाले होते चिकण.

मस्तच! पण गुळ राहीलाच. भरल्या वांग्यात गुळ हवाच. सांबार मसाला आणि टोमॅटो घालून कधी केले नाही. करुन पहायला हवे.
भरल्या वांग्यांसाठी हिरवट काटेरी वांगी जास्त चवदार लागतात. अर्थात ज्याची त्याची आवड आहे.

वॉ s व ! काय दिसतायत वांगी ! पण इथे मिळणाऱ्या वांग्यांमध्ये इतक्या s s असंख्य बिया असतात ... कि मग हिरमोड च होतो ..

हिरवी वांगी बसकट गोल असली की हमखास खूप बिया असतात. उभट, अंड्यासारखा शेप असलेली घेतली तर चांगली निघतात असा माझा ताळा आहे.

>> उभट, अंड्यासारखा शेप असलेली
+१
काटेरी (देठापाशी) वांगी जास्त चांगली असतात असाही माझा अनुभव आहे. तसंच आकाराच्या मानाने वजनाला हलकी असलेली जास्त चांगली.

मस्त.

मस्त झाली होती भाजी एकदम. खाताना अगदी रेस्टॉरंट मधली भाजी आहे असे वाटत होते. तश्शीच चव आली होती. हिरव्या पेक्षा लहान जांभळी वांगी असतील तर जास्ती चांगली लागेल बहुतेक.

अमित अरे जेवताना हात डोक्यावर ठेवत जाऊ नकोस म्हणजे नाही जाणार डोक्यात बिया.

धनि, लगेच भाजी करून रिपोर्ट दिल्याबद्दल धन्यवाद Happy

शाली, गूळ हवाच असं काही नाही. भरली वांगी वेगवेगळ्या प्रकारे करतात की. कांदा/खोबरं भाजून त्या वाटणात काळा मसाला घालून केलेली भरली वांगी गुळाच्या चवीनं अगदीच कशीतरीच लागतील.

फोटोत आहे ती भाजी आणि रेसिपी मैत्रिणीनं दिली. आता तिच्या सासुबाई आल्यात, त्यांनी केलेली हीच भाजी खतरनाक 'मार डाला' भारी झाली होती. त्यांनी काही सिक्रेट घटकपदार्थ किंवा एखाद दोन स्टेप्स सुनेला सांगितलेल्या नाहीत अशी शंका आहे Proud

मस्त मस्त, अशीच करते मी, पण गरम मसाला घालून. आता साम्बर मसाला घालून करून पाहीन.
वान्गे निवड टिप्स साठी पण धन्यवाद!

आज आणली आहेत वांगी, आता करणार ही भाजी.
कांदा/खोबरं भाजून त्या वाटणात काळा मसाला घालून केलेली भरली वांगी >>> हो नेहमी अशीच करते मी ( हो, गूळ पण घालतेच Happy

व्हेज मधे सगळ्यात आवडती वांगी... कुठलीही भाजी बनवा छानच लागते.. मग भरीत असो, डाळ वांगे, सोले वांगे, आलु वांगे, मसाला वांगे, सुकी भाजी, रस्सा भाजी, मिक्स वेज कि काहीही.. सगळच चुम्मा लागत..
फोटो अति अति लाळगाळू आहे..
आता खावे लागतील..

सुरेख झालेली.
आयत्यावेळी टोमॅटो नसल्याचं समजलं. मग टोमॅटो आंबटपणा साठी असतील समजून चिंच दुप्पट घातली, पण त्यामुळे आंबटचव जरा पुढेच आली. पण ते ही छान लागत होतं. वांगी कमी आणि मसाला जास्त झाला. तो खायला ही भारी लागत होता. आता उरलेली आज रात्री खायला मिळणार आठवुन पाणी सुटलं तोंडाला. Happy

सिंडी, डोक्याला हात लावायची वेळ आणली नाही Proud