जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!

Submitted by निनाद on 1 July, 2018 - 19:09

साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो.

हं लिही,
स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम.
जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!
हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते.
मुगाची डाळ एक किलो
गुळ अर्धा किलो
शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको. नाहीतर आई परत करायला येईल म्हणावं!
खोबरे पाव किलो - वास अजिबात नको.
असे सगळे सांगत सांगत यादी तयार होत असे.
यादी व्यवस्थित खिशात ठेव. सुरेशला सांग की सगळे व्यवस्थित दे, नाहीतर आई येईल. अशा सगळ्या धमक्या माझ्याकडून वदवल्या जात.
शेवटी मी न रहावून विचारेच, आई बिस्किट?
बरं लिही एक पारले!

तोवर पाटावर बसून यादी लिहिल्याने घातलेली मांडी दुखायला लागत असे. कारण आईची यादी ही प्रत्येक जिन्नस किती शिल्लक आहे हे पाहत पाहत चाले.

मग तेल.
तेलाची आमच्याकडे एक किटली होती. आई तेल संपत आले की उरलेले तेल एका बुटल्यात काढून ठेवत असे आणि मग धुवून वाळवलेली किटली माझ्या हाती येत असे.

सगळी यादी एकदा वदवून सुचना पाठ झाल्या आहे की नाहीत हे पाहून मग आमची स्वारी बाहेर पडे. पैसे वगैरे मिळत नसत. आई ते परस्पर सुरेशला देत असे.

घराबाहेर दादांची त्यांनी त्यांच्या तरुणपणात वापरलेली एक हिरव्या रंगाची सायकल उभीच असे. ही सायकल आजच्या दिवशी मला मिळे.
मग हँडलला पांढर्‍या तिन-चार पिशव्या एकाबाजूला आणि चकचक करणारी धुतलेली किटली दुसर्‍या बाजूला अडकवून मी सायकल घेऊन निघे.
शाहू पथावरून पुढे गेले की साठेबाईंचे घर. त्यासमोर डॉ बर्जेंचा पांढरा रंग दिलेला सुरेख टुमदार बंगला. मग निळ्या रंगात रंगवलेले भंडारी भुवन लागे. पुढे उजव्या बाजूला वळून गेले वास्को हॉटेल लागत असे. त्या चौकात एक खुप छान छोटीशी बाग होती. त्या बागेला उगाच एक फेरी मी मारत असे.

मग एक छोटा रस्ता घेऊन मी सुरेशकडे पोहोचत असे. एका बाजुला सायकल लावून किटली आणि पिशव्या घेऊन दुकानाबाहेर मी उभा रहात असे. दुकानात बहुदा अजुनही गर्दी असेच. पण मला पाहिले की तो हात लांब करून यादी हातातून घेत असे. मी आई ने दिलेल्या सगळ्या सुचना घडाघडा म्हणून दाखवे. त्याकडे त्याचे बहुदा लक्ष नसेच. कारण तो पटापट वर्तमानपत्राचे कागद फाडून मोहोरी बांधण्यात गढलेला असे.
या पुड्या कागदात बांधल्यावर त्यावर तो ज्यावेगाने दोरा गुंडाळून गाठ मारत असे ते अगदी मी पाहात बसे.
एक मोठा दोर्‍याचा बिंडा छताला अडकवलेला असे आणि त्यातून दणादण दोरा काढून भराभर पुड्या बांधल्या जात. जर दोन किलो पेक्षा मोठी मागणी असेल तर धान्य सरळ पिशवीमध्येच ओतले जायचे. महिन्याचे दोन किलो तेल किटली मध्ये ओतले जायचे. हे तेल पण एका मोठ्या पिंपातून काढून किटलीत यायचे.
गुळाच्या भेल्या असत. त्या फोडायला एक पहार आणि पाच किलोचे माप असे. योग्य तेव्हढा गुळ फोडून कागदात बांधला जायचा.

दोरा बांधलेल्या या पुड्या पिशव्यात भरून मी त्या सायकल च्या हँडल अडकवायचो. एका बाजूला तेल भरलेली किटली असायची. आता जड झालेली सायकल हातात घेऊन हळूहळू चालत घरी याचो. पिशवी मध्ये मेणकागदाच्या पॅकेजिंग मधला बिस्किटाचा पुडा अगदी अलगदपणे वर ठेवलेला असायचा.

घरी आल्यावर सगळे किराणामालाचे सामान डब्यात भरले जायचे. काही पितळी डबे होते, काही पारले बिस्किटांचे होते. सगळे जिन्नस जागच्या जागी जात. मग कागदांचा एक छोटा ढीग व्हायचा. त्यावरच्या बातम्या वाचून झाल्या की परत रद्दीमध्ये जायचा. दोर्‍यांचा एक मोठा गुंडाळा असे त्याला सगळे दोरे बांधून ठेऊन दिले जायचे. हेच दोरे मला पतंग उडवताना मिळायचे.

आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की

यात प्लास्टिक कुठे होते?
कुठे आवश्यक होते?
अचानक कसे इतके प्लॅस्टिक आवश्यक झाले आणि आपण इतके यात गुरफटून बसलो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की

यात प्लास्टिक कुठे होते?
कुठे आवश्यक होते?
अचानक कसे इतके प्लॅस्टिक आवश्यक झाले आणि आपण इतके यात गुरफटून बसलो?
<<

यातलं पहिलं वाक्य येई पर्यंत मस्त चित्रदर्शी लिखाण वाचून आठवणींत रमलो होतो.

कमला आज्जींच्या दवाखान्यात जाताना सोबत बाटली न्यायची असे. त्या बाटलीला कागदाचा "डोस" चिकटवून त्यात संगमरवरी खलात तयार करून दिलेलं 'मिस्ट. एस्क्पेक्टोरंट' नामक खोकल्याचं औषध देणारा राम काका आठवला.

मेणकागदात बांधून दिलेलं मलम आठवलं.

मग तसंच चमच्यातलं पाणी वातीच्या स्टोव्हवर उकळून त्यात पावडर घालून तयार केलेली कॉलर्‍याची इंजेक्शनं टोचणार्‍या 'सिस्स्टरबाया' गल्लीत यायच्या ते आठवलं.

त्यानंतर उठणारी इंजेक्शनाचं गळवं आठवली. त्याची नंतर शिकलेली काँप्लिकेशन्स आठवली.

मग डिस्पोजेबल सिरिंजेस, प्लॅस्टिकचे हार्ट व्हॉल्व्स, टायटॅनियमचे स्टेण्ट्स टाकण्यासाठी धमनीतून घातलेल्या प्लॅस्टिकच्या नळ्या, अन अशी अनेक प्लॅस्टिकं आठवली.

हाताखाली टंकतानाचा प्लास्टिकचा कीबोर्ड दिसला.

अंगावरच्या कपड्यातल्या धाग्यांतला पॉलिस्टर दिसला.

कारची इंटेरियर्स दिसली.

एलीडी बल्ब्स, ट्यूब्ज दिसल्या. विमानं दिसली. फोन दिसले. चश्म्यातल्या अ‍ॅक्रिलिकच्या प्रोग्रेसिव्ह काचा दिसल्या, डोळ्यातल्या प्लॅस्टिकच्या काँटॅक्ट लेन्स दिसल्या पायातले बिनचामड्याचे स्पोर्ट्स शूज दिसले, जेवतानाचे टपरवेअर दिसले.

विजेच्या तारांवरचे प्लॅस्टिकचे फायर रिटार्डंट आवरण दिसले.

गटारीतले, बेजबाबदारपणे रस्त्यावर सोडून दिलेल्या गुरांच्या पोटातले प्लॅस्टिकही दिसले.

रस्त्यावर कचरा गोळा करणार्‍या गरीबाच्या पाठीवरच्या थैलीतले प्लॅस्टिक दिसले, अन लॅमिनेट करून जपून ठेवलेल्या डीग्र्यांवरचे प्लॅस्टिकही दिसले.

प्लॅस्टिकला पर्याय म्हणून बडवलेल्या ढोलांचे चामड्याऐवजीचे प्लॅस्टिक दिसले, तसेच पेपर कप्स अन केळीच्या सोपटाच्या पत्रावळींवरचे 'पॉली कोटिंग' ही दिसले!

अ‍ॅल्युमिनियम फॉइल च्या पर्यायातून धातूचा कचरा दिसला,

'फक्त यंदा थर्माकोलला माफी दिली' म्हणून गालात हसणारा बाप्पा दिसला,
अन लेख छान असला, तरी शेवटाचा प्रचारकी कडवटपणाही दिसला...

आरारांना अगदी अगदी झालं.
लेख आवडलेला पण शेवटच्या काही ओळी वाचुन काल पासून प्रतिसाद टंकुन दोन/ तीनदा डिलिट केलेला.
भारताची १९७० ची लोकसंख्या आणि आजची जवळ जवळ तिप्पट आहे, क्रुड ऑईलचा खप, औद्योगिकरणाचे फायदे इ.इ. मिळाल्यावर तेव्हा कुठे प्लास्टिक होते हा टोन मला पटत नाही.
प्लास्टिक बेजवाबदारपणे वापरणे याला संपूर्ण विरोध आहेच, पण तेव्हा कुठे लागत होते! असं तर्कट आलं की मला तेव्हा कुठेचे आणखी फाटे सुचतात.

जौद्या अमितवा.

त्यांनी टायटलातच लिहिलंय,

"त्याला सांग, काड्या नकोत"

Rofl

यातलं पहिलं वाक्य येई पर्यंत मस्त चित्रदर्शी लिखाण वाचून आठवणींत रमलो होतो.>>>>>>>> +1
>>>>>>>"त्याला सांग, काड्या नकोत">>>> Lol

प्लॅस्टिकबंदीबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. No comments.
पण ' पूर्वी अमुक सोय नव्हती, तमुक सुविधा नव्हती, तसं प्लॅस्टिकही नव्हतं. मग आता अमुक सोय आहे, तमुक सुविधा आहे, मग प्लॅस्टिकही स्वीकारा' हे मात्र मला पटत नाही. ( तांत्रिक/ वैज्ञानिक प्रगतीचे फायदे ' सिलेक्टिव्हली' घ्यायचे , उदा. 'कम्प्यूटरवर जन्मकुंडली काढून मिळेल' ! यात जो अंतर्गत विरोधाभास आहे, तसा प्लॅस्टिकच्या अनावश्यक वापराला विरोध करण्यात आहे असं मला वाटत नाही)

आ.रा.रांनी ज्या वैद्यकीय डिस्पोजेबल वस्तूंचा उल्लेख केला आहे, त्यांचे फायदे अमाप आहेत. त्याबद्दल काही म्हणायचंच नाहीये.
पण, मुलांच्या वाढदिवसाच्या पार्ट्यांना स्टायरोफोमच्या डिस्पोजेबल प्लेट्स वापरण्याचे फायदे जास्त आहेत की तोटे? त्याऐवजी biodegradable प्लेट्स का नाही वापरायच्या? आता बंगळुरात तरी rented cutlery सुद्धा हळूहळू सुरू झाली आहे.

कीबोर्ड, फोन यातलं प्लॅस्टिक वर्षानुवर्षे वापरलं जातं. एका वापरात त्याचा कचरा होत नाही. पण ५-१० रुपयांमध्ये मिळणार्या चिप्सच्या पाकिटांच्या कचर्याचं काय? चहासाठीच्या प्लॅस्टिकच्या पेल्यांचं काय? प्लॅस्टिकबंदी सोडा, आपण आपल्या पातळीवर अशा प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर कमी करू शकतो ना?

' आर या पार' असलंच पाहिजे असं कुठाय?

आता बंगळुरात तरी rented cutlery सुद्धा हळूहळू सुरू झाली आहे >> "बिछायत" ह्या व्यवसायाला कसला झाकप्याक नाव दिला Proud Proud

बिछायत म्हणजे मंडपाचं सामान भाड्याने मिळतं तेच का?
Rented cutlery मधे ( स्टीलची) ताटं वाट्या चमचे इत्यादी सामान भाड्याने मिळतं . ते तुम्ही न धुताही परत देऊ शकता. कारण डिस्पोजेबल ला पर्याय हवा तर तितकीच सोयही हवी.

आपल्याकडे असायचे की असे 'वस्तूभांडार'.... लग्न कार्यासाठी वस्तू/भांडी भाड्याने मिळायची.... आताश्या तितकेसे दिसत नाहीत

कोथरुडात आहेत हो अजून माझ्या बघण्यातच 3 आहेत,
गावात गेलात तर अजून मिळतील
गाद्या, उशा, पांघरूण, चादरी, ताट वाटी भांडे चमचे, कॉफी चे मोठे थर्मास, मोठी पातेली, टेबल फॅन, वाढायची भांडी, डाव

पण भांडी किमान विसळून देणे अपेक्षित असते हो...

छान लिहीले आहे.

अगदी आतपाव, छटाक वगैरे मापांत रोजच्या रोज तेल, मसाला वगैरे गोष्टी नेणारे सुद्धा स्वतःच्या घरून बाटल्या घेउन येत. बाकी कोरडे पदार्थ कागदाच्या पुड्यात बांधून दिले जात. प्लास्टिक इतके नव्हते. महिन्याच्या सामानाची ऑर्डर अनेकदा दिलेली आहे आणि ते आलेले मोजून घेतले आहे. इतके प्लास्टिक असलेले कधीच आठवत नाही त्यात.

तेथून इथपर्यंत कसे आलो हा प्रश्न सहज पडण्यासारखा आहे. त्याला राजकीय लेबले लावायची गरज नाही. बंदी आली. त्याला विरोध असणे, समर्थन असणे, यातले काहीही असले तरी जे आता वापरणे बंद करायला हवे आहे ते सगळीकडे दिसू लागले व त्यातून असे विचार आले, तर ते साहजिक आहे.

असे कागदात वस्तू बांधून देणे आजच्या काळात केरळात पहायला मिळते. फळं, तसेच एकदा बनियन, रुमाल घेतले ते सुद्धा कागदात गुंडाळून बांधून दिले.

बिछायत म्हणजे मंडपाचं सामान भाड्याने मिळतं तेच का? >> हो, त्या सहित

"कोथरुडात आहेत हो अजून माझ्या बघण्यातच 3 आहेत,
गावात गेलात तर अजून मिळतील
गाद्या, उशा, पांघरूण, चादरी, ताट वाटी भांडे चमचे, कॉफी चे मोठे थर्मास, मोठी पातेली, टेबल फॅन, वाढायची भांडी, डाव

पण भांडी किमान विसळून देणे अपेक्षित असते हो...

Submitted by सिम्बा on 5 July, 2018 - 23:39"

हे सुद्धा आणि अजून बऱ्याच वस्तू मिळतात

Rented cutlery मधे ( स्टीलची) ताटं वाट्या चमचे इत्यादी सामान भाड्याने मिळतं . ते तुम्ही न धुताही परत देऊ शकता. कारण डिस्पोजेबल ला पर्याय हवा तर तितकीच सोयही हवी. >> पैसा पैसा पैसा काहीही करू शकतो. कुठलीही भांडी कुंडी न धुता परत करणे हे मनाला नाही पटत. असो तो ज्याचा त्याचा विषय. आजकाल सोय महत्वाची झालीय Sad

मस्त लेख आहे.. कागदाच्या पुड्या, पुडीचा दोरा, तेल, तूप या साठीचे डबे, अगदी सर्वच आठवले.
खरे आहे बघता बघ्ता सोय म्हणून घरात आलेली दुधाची प्लास्टिक ची पिशवी आता हाय पाय पसरून वेग वेगया रूपाने आपल्या दैनंदीन वापराचा भाग कधी झाले हे कळलेच नाही. अगदीच काही 'डीस्पोजेबल' सुविधा सोडल्यास प्लास्टीक ची खरच गरज नाही.
पावसाळा, नाले सफाई, असे ज्वलंत विषय दर वर्षी निघाले की अचानक प्लास्टीक चं भूत पुन्हा फेर धरून नाचायला लागतं.. यावेळी मात्र प्लास्टीक बंदी चं भूत आल्याने नव्याने चर्चांना ऊधाण आले आहे.
एक मात्र लिहावेसे वाटते. आपण भारतीय मुळात कुठलाही बदल स्विकारण्यात खूपच कमी पडतो. मूळ मुद्दा बाजूला राहून राजकारण, पर्यावरण, पालिका सुव्यवस्था, बेरोजगार, ईत्यादी अनेक फाटे फोडत असे सर्व बदल फाट्यावर मारले जातात. असो. मोठा विषय आहे ईथे नकोच.

कुठलीही भांडी कुंडी न धुता परत करणे हे मनाला नाही पटत. असो तो ज्याचा त्याचा विषय. आजकाल सोय महत्वाची झालीय>> exactly
' स्टीलच्या ताटं- वाट्या वाटल्यास न धुता परत करा, पण स्टायरोफोमच्या ताटल्या वापरू नका' अशी भूमिका असावी यामागे.

ते तुम्ही न धुताही परत देऊ शकता. ---- नाही नाही, घासूनच द्यायची आहे. ते लोक नंतर disinfectant नी धुणार आहेत. एक dinner प्लेट, 2 वाट्या, एक ग्लास, एकेक काटा-चमचा. मोठी पातेली आणि serving spoons नाहीत काही. मग त्याला cutlery कसं म्हणता येईल! माझी मोलकरीण धड स्वच्छ भांडी घासत नाही, डेफिनेटली तिची पण घासत नसणार, disinfect झाल्याशी कारण खरकटे का असेना!

रच्याकने, प्लॅस्टीक आता मिठातून मानवी शरीरात प्रवेश करतंय... रंगामुळे ओळखता येत नाही आणि तसंच ते पॅकेजिंग मधे येतंय...
ही संबधीत माहीतीची लिंक

https://www.thebetterindia.com/56612/dinnerware-rent-pooja-dixit-shalini...
राजसी, तुम्ही हे ट्राय केले का? २ वर्षांपूर्वीचा लेख आहे. त्यामुळे अजून चालू आहे की नाही ते माहीत नाही. मी हिंदूंमध्येच वाचलं होतं हल्लीच, पण ते आत्ता सापडत नाहीये.
अजून एक लेख आहे त्यात बरीच नावं आहेत पण ती सगळी भांडी धुवून परत करण्याची आहेत Lol

https://www.thehindu.com/news/cities/bangalore/plate-banks-try-to-reduce...

सापडलं आत्ता.
https://www.thehindu.com/life-and-style/waste-not/article23501012.ece

नाही, आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये enterprising बायका आहेत, ग्रीन टीम मधल्या. त्यांच्या स्टार्टअप असतात आणि मग ग्रीन टीम मध्ये volunteer करतात. इतरांना शहाणपणा शिकवतात. एकिची hygiene cup स्टार्टअप, एकीची reusable steel cutlery स्टार्टअप, एकीची कापडी पिशव्या स्टार्टअप, आता लवकरच कोणाची तरी पताका startup येईल कारण गेल्याच महिन्यात एकीला say no to birthday balloons म्हणून bullying करुन झालंय.

Pages