जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!

Submitted by निनाद on 1 July, 2018 - 19:09

साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो.

हं लिही,
स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम.
जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!
हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते.
मुगाची डाळ एक किलो
गुळ अर्धा किलो
शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको. नाहीतर आई परत करायला येईल म्हणावं!
खोबरे पाव किलो - वास अजिबात नको.
असे सगळे सांगत सांगत यादी तयार होत असे.
यादी व्यवस्थित खिशात ठेव. सुरेशला सांग की सगळे व्यवस्थित दे, नाहीतर आई येईल. अशा सगळ्या धमक्या माझ्याकडून वदवल्या जात.
शेवटी मी न रहावून विचारेच, आई बिस्किट?
बरं लिही एक पारले!

तोवर पाटावर बसून यादी लिहिल्याने घातलेली मांडी दुखायला लागत असे. कारण आईची यादी ही प्रत्येक जिन्नस किती शिल्लक आहे हे पाहत पाहत चाले.

मग तेल.
तेलाची आमच्याकडे एक किटली होती. आई तेल संपत आले की उरलेले तेल एका बुटल्यात काढून ठेवत असे आणि मग धुवून वाळवलेली किटली माझ्या हाती येत असे.

सगळी यादी एकदा वदवून सुचना पाठ झाल्या आहे की नाहीत हे पाहून मग आमची स्वारी बाहेर पडे. पैसे वगैरे मिळत नसत. आई ते परस्पर सुरेशला देत असे.

घराबाहेर दादांची त्यांनी त्यांच्या तरुणपणात वापरलेली एक हिरव्या रंगाची सायकल उभीच असे. ही सायकल आजच्या दिवशी मला मिळे.
मग हँडलला पांढर्‍या तिन-चार पिशव्या एकाबाजूला आणि चकचक करणारी धुतलेली किटली दुसर्‍या बाजूला अडकवून मी सायकल घेऊन निघे.
शाहू पथावरून पुढे गेले की साठेबाईंचे घर. त्यासमोर डॉ बर्जेंचा पांढरा रंग दिलेला सुरेख टुमदार बंगला. मग निळ्या रंगात रंगवलेले भंडारी भुवन लागे. पुढे उजव्या बाजूला वळून गेले वास्को हॉटेल लागत असे. त्या चौकात एक खुप छान छोटीशी बाग होती. त्या बागेला उगाच एक फेरी मी मारत असे.

मग एक छोटा रस्ता घेऊन मी सुरेशकडे पोहोचत असे. एका बाजुला सायकल लावून किटली आणि पिशव्या घेऊन दुकानाबाहेर मी उभा रहात असे. दुकानात बहुदा अजुनही गर्दी असेच. पण मला पाहिले की तो हात लांब करून यादी हातातून घेत असे. मी आई ने दिलेल्या सगळ्या सुचना घडाघडा म्हणून दाखवे. त्याकडे त्याचे बहुदा लक्ष नसेच. कारण तो पटापट वर्तमानपत्राचे कागद फाडून मोहोरी बांधण्यात गढलेला असे.
या पुड्या कागदात बांधल्यावर त्यावर तो ज्यावेगाने दोरा गुंडाळून गाठ मारत असे ते अगदी मी पाहात बसे.
एक मोठा दोर्‍याचा बिंडा छताला अडकवलेला असे आणि त्यातून दणादण दोरा काढून भराभर पुड्या बांधल्या जात. जर दोन किलो पेक्षा मोठी मागणी असेल तर धान्य सरळ पिशवीमध्येच ओतले जायचे. महिन्याचे दोन किलो तेल किटली मध्ये ओतले जायचे. हे तेल पण एका मोठ्या पिंपातून काढून किटलीत यायचे.
गुळाच्या भेल्या असत. त्या फोडायला एक पहार आणि पाच किलोचे माप असे. योग्य तेव्हढा गुळ फोडून कागदात बांधला जायचा.

दोरा बांधलेल्या या पुड्या पिशव्यात भरून मी त्या सायकल च्या हँडल अडकवायचो. एका बाजूला तेल भरलेली किटली असायची. आता जड झालेली सायकल हातात घेऊन हळूहळू चालत घरी याचो. पिशवी मध्ये मेणकागदाच्या पॅकेजिंग मधला बिस्किटाचा पुडा अगदी अलगदपणे वर ठेवलेला असायचा.

घरी आल्यावर सगळे किराणामालाचे सामान डब्यात भरले जायचे. काही पितळी डबे होते, काही पारले बिस्किटांचे होते. सगळे जिन्नस जागच्या जागी जात. मग कागदांचा एक छोटा ढीग व्हायचा. त्यावरच्या बातम्या वाचून झाल्या की परत रद्दीमध्ये जायचा. दोर्‍यांचा एक मोठा गुंडाळा असे त्याला सगळे दोरे बांधून ठेऊन दिले जायचे. हेच दोरे मला पतंग उडवताना मिळायचे.

आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की

यात प्लास्टिक कुठे होते?
कुठे आवश्यक होते?
अचानक कसे इतके प्लॅस्टिक आवश्यक झाले आणि आपण इतके यात गुरफटून बसलो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मारतहळ्ळी- व्हाईटफील्ड परिसर का?----नाही हो, मार्थाहल्ली-whitefield चा वेगळा प्रॉब्लेम. Underground ड्रीनेज सिस्टीम नाही, सरकारने पुरवलेली आणि BBMप म्हणे तुमचे सांडपाणी कॉम्प्लेक्स मध्ये internally वापरा. बिल्डर नि लावलेले STP फक्त त्यांनी project handover करेपर्यंत शहण्यासारखे चालतं. हे सगळे नियम gated communities ना. बाकी आजुबाजुच्या slum एरिया, personal homes ना नाही. ते लोक घरातून पाईप काढतात आणि रस्त्यावर. अरे हो! अश्या एरियात घराचे gated community8- 9k per. Sq.ft

Pages