'संजू'च्या निमित्ताने

Submitted by रसप on 27 June, 2018 - 00:56

जेव्हा 'संजू' चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हाच वाटलं होतं की टिपिकल संस्कारी पोलिसांकडून आज ना उद्या उलटसुलट प्रतिक्रिया येतील. तश्या आल्या आहेत आणि त्यांवर जिकडे तिकडे चर्चासुद्धा सुरु आहे.
अगदी अपेक्षित आर्ग्युमेंट्स केली जात आहेत. उदाहरणार्थ - असल्या फालतू माणसावर चित्रपट बनवावासं वाटणं, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. आपल्याकडचे प्रेक्षकच मूर्ख आहेत. ते असल्या नालायक माणसांना डोक्यावर घेतात. हॉलीवूडमध्ये अम्क्यावर चित्रपट बनतो, तमक्यावर बनतो आणि आपण कुणावर बनवतो ? 'संजय दत्त!' वगैरे

220px-Sanju_-_Theatrical_poster.jpg

इथे एक गोष्ट लक्षात आधी घ्यायला हवी.
संजय दत्तवर एक चित्रपट येतो आहे, त्याला काही 'भारतरत्न' दिलं जात नाहीय. आणि चित्रपट हा कशावरही येऊ शकतो, कुणावरही काढला जाऊ शकतो. बायोपिक आहे तो. एखाद्या पिसाळलेल्या जनावरापासून एखाद्या हलकट माणसापर्यंत कुणाही सजीवाच्या आयुष्याला एक 'कहाणी' म्हणून दाखवलं जाऊ शकतं. कारण मुळात, कुठलाही चित्रपट बनवण्यासाठी प्राथमिक गरज असते 'कहाणी'चीच. (अपवाद - सल्लूपट) प्रत्येक आयुष्य, मग ते एखाद्या संताचं असो वा गुन्हेगाराचं, एक कहाणी असते. ती सांगितली जाऊ शकते. मग तो अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असो किंवा कुणी सेलिब्रिटी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, कहाणी वेगळी.

दुसरं म्हणजे, ह्यापूर्वीही अनेक ह्याहीपेक्षा अट्टल आणि भयंकर गुन्हेगारांवर चित्रपट येऊन गेलेले आहेत. त्यात काही नवीनही नाही आणि नैतिक/ अनैतिक तर अजिबातच नाही. 'अ‍ॅण्टी हीरो' असलेलेही असंख्य चित्रपट येऊन गेलेले आहेत. १९४३ सालच्या 'ग्यान मुखर्जी' दिग्दर्शित 'किस्मत' चित्रपटाने सर्वप्रथम भारतीय चित्रपटाला अ‍ॅण्टी हीरो दाखवला होता. त्यानंतर १९७५ च्या यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' पर्यंत चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा अनेकदा लहान-मोठा गुन्हेगार असल्याचं दाखवलं आहे. अर्थात हे सगळे खूप गोड-गोजिरे, गोंडस चित्रपट होते. 'दीवार' मधला अमिताभचा विजय वर्मा एक un-apologetic गुन्हेगार असला तरी त्याला कठीण परिस्थितीने गुन्हेगार बनवल्याचं दाखवलं होतं. मात्र तरी तो 'हाजी मस्तान'वर आधारलेला असल्याचं लपलं नाहीच. शोले, शान सारख्या ब्लॉकबस्टर्समधूनही गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगत दाखवलं गेलं. राम गोपाल वर्माच्या 'सत्या'ने १९९८ साली खऱ्या अर्थाने गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगत समोर आणलं. आपल्याकडचा पहिला 'निओ नॉयर' माझ्या मते 'सत्या'च. किस्मत, दीवार आणि सत्या, हे तीन चित्रपट 'गुन्हेगार' चित्रीकरणातले मैलाचे दगड आहेत. 'सत्या'नंतर भडक बिनधास्तपणे अनेकदा गुन्हेगारांची कहाणी चित्रपटांतून दाखवली गेली आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर - १ आणि २' सारख्या चित्रपटांतून इतके रक्ताचे पाट वाहिले आहेत जितका आमच्या मराठवाड्यात पाऊसही होत नाही ! राजेश खन्नापासून शाहरुख खानपर्यंत प्रत्येक सुपरस्टारने 'अ‍ॅण्टी हीरो' रंगवला आहे. ते एक आव्हानात्मक काम आहे.

Picture1_2.jpg

मात्र 'चरित्रपट' ह्या बाबतीत आपल्याकडचा चित्रपट आजही खूप बचावात्मक आहे. अनेक अनुकरणीय व्यक्तींच्या चरित्रपटांतही त्या त्या व्यक्तीचे अवगुण सफाईने झाकले, टाळले गेले आहेत. इथे मला एक उल्लेख करावासा वाटतो.

काही दिवसांपूर्वी, मी 'हंसल मेहता' दिग्दर्शित 'ओमेर्ता' पाहिला. हा चित्रपट तर 'ओमर शेख' वर आहे. जो एक कन्व्हीक्टेड दहशतवादी आहे. माझ्या मते बायोपिक कसा असावा ह्याबाबतचा 'ओमेर्ता' हा आपल्याकडचा मापदंड असायला हवा. दिग्दर्शकाने फक्त एक कहाणी सांगितली आहे. कुठल्याही ठिकाणी कोणतंही स्टेटमेंट नाही. पूर्णपणे न्युट्रल. मला स्वत:ला 'संजू'बाबत 'ओमेर्ता' सारखी अपेक्षा नाही. कारण दोघांचं 'प्लेईंग ग्राउंड'च वेगळं आहे. 'संजू' हा स्पष्टपणे एक व्यावसायिक चित्रपट आहे. त्यात संजय दत्तची कहाणी सहानुभूती ठेवून दाखवली असल्याचीच शक्यता जास्त आहे.

But as I said, चित्रपटातून गुन्हेगार, गुन्हेगारीचं उदात्तीकरण नवीन नाही आणि गुन्हेगारावर चरित्रपट काढणंही नवीन नाही. चुकीचं तर अजिबातच नाही. चित्रपट हे एक 'स्टोरी टेलिंग' आहे. कुठलीही कहाणी, कुणाचीही कहाणी ही सांगता आली पाहिजे आणि सांगितली गेलीही पाहिजे. तो संजय दत्त असो वा ओमर शेख, पानसिंग तोमर असो वा मिल्खा सिंग आणि टाटा-बिर्ला-अंबानी असो वा रणजित पराडकर, त्या त्या कहाणीला फक्त 'कहाणी' म्हणूनच पाहायला हवं. पिढ्यांवर संस्कार करणे हे चित्रपटांचं काम नसून ते पालकांचं काम आहे. ज्या पिढीच्या लोकांनी संस्कारांचा कैवार घेतला आहे, त्यांच्याच मुशीतून संजय दत्त आणि सलमान खानसारखे लोक घडले आहेत. असे चित्रपट बनतात, तसे चित्रपट बनतात वगैरे कारणांसाठी कुठल्याही पिढीवर नेम साधणं किंवा सरसकट एखाद्या समाजाला दूषणं देणं, हाच खरं तर दुटप्पीपणा आहे, दांभिकपणा आहे. हिंदी चित्रपट बदलतो आहे. धाडसी होतो आहे. त्याचा प्रेक्षकही हळूहळू करत बदलत चालला आहे. परिस्थितीला दोष देण्याचं उदात्तीकरण तरी 'संजू'च्या ट्रेलर्समधून दिसत नाहीय, जे गेल्या ७५ वर्षांतल्या चित्रपटांत सर्रास दिसून आलं आहे.

एक कलाकृती म्हणून कुठल्याही चित्रपटाकडे तटस्थपणे पाहण्याची सवय जोपर्यंत एक प्रेक्षकम्हणून आपल्या नजरेला आणि बुद्धीला होत नाही, तोपर्यंत 'चांगले चित्रपट बनत नाहीत' असं रडगाणं गाण्याचा अधिकारही आपल्याला मिळायला नको, खरं तर.

टीप - 'संजू'चं पहिल्या दिवशीच्याच तिकीटाचं बुकिंग केलेलं आहे.

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2018/06/blog-post.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ok,
स्वत: चा आब सांभाळण्यासाठी माझी माघार,
मूळ प्रतिसाद ४ तासाहून जुना असल्याने मी संपादित करू शकत नाहीये, वेमा ना तो संपादित करायला विनंती करतो

Pages