क्षण वेचताना-1

Submitted by व्यक्त अव्यक्त on 21 June, 2018 - 13:01

क्षण
घड्याळाची टिकटिक वाजते आहे न माझ्या हातातून निसटणार्या वेळेची मला आठवण करून देत आहे. टिक टिक म्हणता म्हणता मुठीत घट्ट धरून ठेवलेला तो क्षण टिकता टिकत नाही, न आयुष्य पुढे सरकत राहतं.अश्याच छोट्या छोट्या क्षणांनी ते घडत राहतं, आकार घेत राहतं.
किती छोट्या छोट्या तुकड्यानी बनलेलं हे आपलं जगणं, क्षणांच्या कुपितून दरवळणाऱ्या आठवणींवर तर तग धरून असतं.
पहाट फुटल्यावर पक्ष्यांची चाललेली लगबग, दूर झाडीतून रेंगाळणारा धूर, उन्हाच्या काहिलीत मनाला गारवा देणारी हिरवीगार पालवी, काळोख रेशमी आकाशातून तरारून येणारे थेंब हे सारे क्षण आपल्या आसपास बहरलेले असतात. त्यातून येणारा बिनपैश्यांचा अमोल आनंद आपल्या वाट्याला आला असताना आपण विकतचे आनंदी क्षण मिळवण्यासाठी धडपडत असतो. अनुभूतीचा प्रत्येक क्षण विलक्षण असतो, आपल्या अंतचक्षूंची कवाडे सताड उघडी पाहिजेत. काळोख कोंडल्या मनाला थोडासा अश्या अनवट क्षणांचा उजेड ही पाहिजेच.
काही वेळा आपण क्षणांत जगणं सोडून जगण्याचा परीघ वाढवतो.आपल्या आशा, आकांक्षा, अपेक्षा मग हळूहळू वाढत उंच-उंच जातात. जाणिवा रुंदवतात. क्षणांच्या कक्षांतून बाहेर पडून आपल्या दृष्टीचा विस्तार दुणावल्यावर भूत भविष्य वर्तमान असे अनेक पदर आपल्याला दिसू लागतात. या सगळ्यात आपल्या मनाचा एक कप्पा विसाव्याचा म्हणून अलगद राखून ठेवला जातो. जपून ठेवलेल्या क्षणांची ती तिजोरी माणूस कधीही हरवत नाही. नेहमीच्या दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात दिवस काढून हवाबदल कसा करून येतो तसं विचार बदल करण्यासाठी तो ती क्षणांची तिजोरी उघडून बसतो.बालपणी चोरून खाल्लेल्या आंबट चिंच कैऱ्यांची चव क्षणभर जिभेवर रेंगाळते. नवीन शाळा सुरू झाल्यावर विकत आणलेल्या नव्या कोऱ्या दप्तर पुस्तकांचा वास नाकात घमघमतो. आई आज्जीच्या सुती पातळाचा मायाळू स्पर्श हळुवार रेंगाळून जातो.
क्षणांच्या आठवणी रुजतात. आठवणींची झाडं बहरतात. सावली देत देत जगणं सुगंधी करतात.
समुद्र काठावरची वाळू जशी मुठीतून अलगद निसटावी तसे ते सुटूनही जातात.पाठी राहतो तो दरवळ. वेलीवरून फूल खुडून झाल्यावर हातांवर रेंगाळणारा परिमळ.
असे हे क्षण शोधायला फार दूर जायची गरज नाही.
आपल्या अवतीभवतीच ते सापडतील. रोजच्या रस्त्यावरून चालताना कडेकडेने खुणावतील. पारखी नजरेच्या चष्म्यातून त्यांना बघितले पाहिजे. त्यांच्यातला अर्क घेता आला पाहिजे. ते तर असतातच, तुमच्या जगण्याच्या प्रत्येक आयामाला चिकटलेले, कळीतून फूल फुलण्याच्या नव्या उभरत्या जाणिवाना नकळत बिलगलेले, नवथर प्रेमाच्या ओठांतून हळुवार विलगलेले.
त्यांना शोधता आलं पाहिजे.
क्षणांचे हे असेच नाते असावे. जगण्याशी. फुलण्याशी. रुजण्याशी. सजण्याशी. मोहरण्याशी.
कधी हसून हसून डोळ्यात पाणी येण्याशी.
कधी रडू रडू येता आवंढा गिळण्याशी.
आयुष्य क्षणिक असू शकतं, किंवा एकच क्षण आयुष्याचं मर्म असू शकतं.
शेवटी जगतो कसं न केवढं हाच सवाल आहे.

Group content visibility: 
Use group defaults