एका ड्यू आयडीचे मनोगत ! - ऋन्मेष

Submitted by भन्नाट भास्कर on 11 June, 2018 - 04:12

जवळपास ४ वर्षे होत आली ......

माझ्या ऋन्मेऽऽष या आयडीला !

गेले तीन महिने हळू हळू करत हळू हळू ईथे येण्याचा वेळ कमी होत गेला. धाग्यांचा रतीब केव्हाच आटला, पण प्रतिसाद द्यायला आणि मुख्यत्वे त्यातून पुढे होणारी चर्चा, वाद यांचा पाठपुरावा करायलाही हवे तेव्हा वेळ मिळणे अवघड झाले तेव्हा ऋन्मेऽऽषला कायमचे थांबवून आपल्या वर्जिनल आयडीने जे काही थोडेबहुत शक्य होईल तसे वावरावे असे ठरवले आहे.

ऋन्मेषचा पासवर्ड विस्मरणात टाकला आहे. त्याबद्दल केलेल्या विचारपूशीला आता ईथूनच उत्तरे दिली जातील. म्हटलं तर फक्त नाव बदलले आहे, म्हटले तर काही संदर्भ बदलले आहेत. ईच्छा तर खूप होतेय की या तीनचार वर्षांतील प्रवास कागदावर उतरवून काढावा. पण ईतके प्रवासवर्णन लिहावे ईतका वेळ हाताशी मिळणे अवघड झालेय. पण तरीही थोडक्यात आणि एका स्वतंत्र धाग्यात मनोगत लिहायचा मोह आवरत नाहीयेच. काय करणार, शेवटी मी ऋन्मेषच आहे Happy

जेव्हा मी ऑर्कुटच्या निमित्ताने सोशलसाईटवर अवतरलो तेव्हा ऋन्मेषपेक्षाही छोटा होतो. साधी गर्लफ्रेंडही नव्हती. ती ऑर्कुटवरच मिळाली. पण त्या आधी मी एक शॉर्टटेंपर, शीघ्रकोपी, थोडासा हट्टी आणि थोडासा चिडका व्यक्तीमत्व होतो. जेव्हा ऑर्कुटवर कॉलेजच्या सळसळत्या उत्साहात बागडायचो तेव्हा अगदी तसाच वागायचो. ठोश्याला ठोसा, एखादा डोक्यात गेला की त्याला अद्दल घडवायला मग काय पण.. वाद, भांडण, ऑनलाईन शाब्दिक मारामारया. अर्थात माझ्यामते मी अन्यायाविरुद्ध भांडणारा रॉबीनहूड होतो. पुढे कधीतरी याच विचारांनी एका समूहाच्या संचालकांविरुद्ध बंडखोरी केली आणि समूहातून बॅन झालो. तेव्हा पहिल्यांदा ड्यूआयडी काढले, आणि पुन्हा आत प्रवेश मिळवला. बरेच दंगेधोपे झाले, आत्मा शांत झाला. मजाही आली, पण दुसर्‍याला त्रास देताना आपल्यालाही त्रास होतो हे जाणवले. हा त्रास टाळणे आपल्याच हातात असते हे समजले. सोशलसाईटवर आपले उपद्रवमूल्य फार आहे हा माज हळूहळू मीच स्वहस्ते गाळून टाकला. आणि आपले मनोरंजनमूल्य जपायला सुरुवात केली. याच बदलाच्या काळात माझे एक फेक प्रोफाईल फार फेमस आणि बरेच जणांचे लाडके झाले. पुढे तो मीच आहे हे समजूनही त्या प्रेमात काही फरक पडला नाही. वाल्या आणि वाल्मिकी दोन्ही कमीजास्त प्रमाणात आपल्याच आत असतात. कोणाला गोंजारायचे हे आपल्यालाच ठरवायचे असते हे मला समजले. आणि माझ्यापुरते मी ते ठरवायला सुरुवात केली.

पुढे कॉलेज झाले. जॉबला लागलो. गर्लफ्रेंडशीच लग्नही झाले. ऑर्कुट केव्हाच आटोपले होते. पण ऑर्कुटसमूहांवर काढलेले धागे आणि त्यात केलेली धमालमस्ती फार मिस करत होतो. मायबोली पाहिली आणि ईथे पुन्हा तीच धमाल त्याच रुपात करायचा मोह झाला आणि ऋन्मेषचा जन्म झाला.

अर्थात हे रूप माझेच होते. म्हटलं तर फक्त एक नाव बदलले होते, दुसरे रिलेशनशिप स्टेटस. तसेच त्याला अनुसरून वय पाच सहा वर्षे कमी केले होते ईतकेच. बाकी सारे संदर्भ तेच, आवडीनिवडी त्याच, आचारविचार अगदी ओरीजिनलच. शाळाकॉलेजचे किस्से माझ्याच शाळाकॉलेजचे होते. ऑफिसचे किस्सेही माझ्याच ऑफिसचे होते. गर्लफ्रेंड म्हटले की आताची बायको आणि आधीची गर्लफ्रेंडच डोळ्यासमोर यायची, शेजारचा पिंट्याही आपला खासच आहे. सई-स्वप्निल आणि आपला शाहरूख तर अगदी लहानपणापासून आवडीचा. कोकणातले गाव असो, मुंबईतली घरे असो. राजकारणावरची मते असोत, वा नास्तिक वृत्ती असो. दारूला विरोध असो, वा मांसाहाराला समर्थन असो. ईंग्रजी भाषेचे अज्ञान असो वा स्वत:वरचे प्रचंड प्रेम असो Happy यात कुठलाही मुखवटा नसल्याने कुठेही वेगळ्या रुपात वावरतोय असे कधीच वाटले नाही, वा कुठे बेअरींग सुटत तर नाही ना याची काळजी घ्यावी लागली नाही.

पण सोशलसाईटने मला एक फार मोठी गोष्ट शिकवली, जी मायबोलीने आणखी पुढे नेली. ते म्हणजे संयम आणि समजूतदारपणा.
कोणाशीही वाद घालताना संयम आणि पातळी सोडू नये हे ऑर्कुटकाळातच शिकलो होतो. मायबोलीवर एक पाऊल पुढे जात, समोरची व्यक्ती आपल्याशी भांडते म्हणून ती व्यक्तीच वाईट असते असे जरूरी नाही असा विचार करू लागलो. काळ्यापांढरय़ा गुणदोषांसह प्रत्येक व्यक्तीला माझे निकष न लावता स्वतंत्रपणे स्विकारू लागलो आणि त्यानंतर कोणाबद्दलही रागलोभद्वेषमत्सर वगैरे काही उरले नाही. सोशलसाईटवरची हीच शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात घेऊन गेलो. आणि आयुष्य आणखी सुखी समाधानी झाले. स्वत:तील या बदलासाठी जसे ऑर्कुटवरील फेक प्रोफाईल्सनी मला मदत केली तसेच मायबोलीवरील ऋन्मेष या ड्यूआयडीनेही मदत केली. याबद्दल मी ऋन्मेष आणि त्याला सांभाळून घेतलेल्या सर्वांचा, तसेच मायबोली संकेतस्थळाचाही आभारी आहे _/\_

ता.क. - ऋन्मेष तर ईथून थांबेल ते त्या बिचार्‍याला गरजेचा वेळ देऊ शकत नाही म्हणून, पण तोच पाच सहा वर्षांनी मोठा होत आता भन्नाट भास्कर या ओरीजिनल (कोई शक?) आयडीने जमेल तितका आपला प्रपंच सांभाळत वावरेल. काय करणार, मायबोलीचे व्यसन सहजी सुटत नाही Happy

धन्यवाद,
आपलाच भन्नाट
आडनाव नका विचारू, त्याने जात कळते !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच जे मोदींच्या चाहत्यांचे,
प्रतिमेच्या प्रेमात पडल्यावर काय होणार Proud
>>>>>>
सिंबा "भ" चा "म" केलात की हो Happy

फार पूर्वी एकदा बेफिकीर यांनी माझ्या लिखाणाची तुलना पुलंशी केली होती. तेव्हा गहिवरून आले होते. आज आपण माझ्या येथील वावराची तुलना मोदींशी केलीत. मला बोलायला शब्द उरले नाहीत ... स्पीसलेच !

च्रप्स, नॅक्स, सोनाली, किल्ली, आदिसिद्धी, अजब, द्वादशांगुला ..... धन्यवाद Happy

तब्येत सध्या बरी आहे. नुकताच ऑफिस रेग्युलर जॉईन झालोय. पण तब्येत हे एकच कारण नव्हते. किंबहुना तब्येतीसाठी आराम करायला घरी असूनही जेव्हा माबोवर डोकवायला वेळ मिळत नव्हता तेव्हाच समजले आता आपण आपली ऋगिरी नाही करू शकत.

धन्य आहेत लोक.
मी म्हटलेले मानदुबाचे लॉयल प्रेक्षक.
>>>>>
हे मानदुबा काय आहे?
डीडीएलजे सारखा वर्ल्डफेमस शॉर्टफॉर्म असल्यासारखे लिहू नका सर, फुलफॉर्म येऊद्या Happy

भन्नाट आहेस मित्रा! शाखा कसा आहे? Proud
>>>>>
अजब, शाखा मजेत आहे. मै सिर्फ फॅन नही हू उसका, दुनिया है वो मेरी. मी जगाच्या पाठीवर जिथे ज्या रुपात जेव्हा उपलब्ध असेन तेव्हा शाखा माझ्या सोबतच असेन Happy

माझ्या आवडत्या शाहरूखचा तो डीपी मिसणार Sad
>>>>>>>
आदिसिद्धी, छान आठवण केलीत, लौकरच शाहरूखचा डीपी या ओरीजिनल प्रोफाईललाही लावण्यात येईल.

आयडी नवीन आले तरी वृत्ती बदलत नसते.
>>>>>
सायो, पण मुळात आपली चांगली वृत्ती का बदलावी? Happy
तसेही वृत्ती बदलण्यासाठी हा आयडी बदल केलेला नाहीये हे लेखात स्पष्ट लिहिले आहेच..

गेले तीन महिने हळू हळू करत हळू हळू ईथे येण्याचा वेळ कमी होत गेला. धाग्यांचा रतीब केव्हाच आटला >>>> आमच्यासारख्यांना साम्गितले नसते तर हे लक्षातही आले नसते हो.
>>>>>>
>>>>>>
प्रतिसाद ऑफ द डे ! ऑफ द धागा !! मैत्रेयी.... जिंकलत Happy

आजवर मी ईथे एक आरोप सातत्याने ऐकत आलो होतो की मी इथे धाग्यांवर धागे काढून वीट आणतो. मायबोली उघडले की पहिल्या पानावर चार धागे माझेच दिसतात. ईतर धाग्यांवरही मी नुसता उच्छाद मांडतो.
पण आपला प्रतिसाद हे दर्शवतो की तशी परिस्थिती नव्हती. माझी उपस्थिती जास्त तर सोडा, लक्षणीयही नव्हती, आणि म्हणूनच आपल्यासारख्या सक्रिय सभासदांना माझी अनुपस्थिती जाणवलीही नाही.
यापुढे कोणी माझ्या ऋन्मेष आयडीवर तो आरोप केला तर आपलाच वरचा प्रतिसाद त्याच्या तोंडावर कॉपीपेस्ट करून मारतो बघा Happy

पण फॅन क्लब? शेम ऑन यू!! नोबडी मिस्ड ऋन्मेष ?
>>>>>>
माझे येथील बरेच हिंतचिंतक तसेच मित्रपरीवार मेल, मेसेज, फेसबूक, अगदी व्हॉटसपमार्फतही मला कनेक्ट आहेत.
उद्द्या समजा दोनेक वर्ष शाहरूखचा चित्रपट आला नाही तर त्याचे जवळचे मित्र आणि हितचिंतक फोन, फेसबूक, ट्विटरच्या माध्यमातून त्याची चौकशी करतील की स्टुडिओच्या वा थिएटरच्या बाहेर मिस यू शाहरूख, कसा आहेस, म्हणून बोर्ड घेऊन उभे राहतील? तुम्हीच सांगा.

नवीन आयडी का ते कळले नाही.
>>>>>
अदिती, बॅंग ऑन !
यामागचे नेमके कारण मुद्दाम सांगितलेही नाही. वेळ आल्यावर कदाचित समजेलही. न समजल्यास कोणाचे काही नुकसान नाही Happy

मनोरंजनात्मक धागे काढून मला/आम्हाला काही करमणूकीचे क्षण दिलेत याबद्दल धन्यवाद ! Happy
पुढील वाटचालीस शुभेच्छा !

डोंबल!!!! ऋन्मेष आयडी सोडून भन्नाट भास्कर काढ किंवा आणखी काहीतरी नवीन आयडी घे, आयडी मागची व्यक्ती तीच. तेच तेच मी मी करणारं लिखाण आणि तोच अ‍ॅटिट्युड, फक्त स्वतःच्या तोंडून गर्लफ्रेंड मागे टाकून लग्न झालेला संसारी गृहस्थ झाला आहेस हे सांगणं हाच फरक.

आणि हो भन्नाटदादा ती प्रत्येक धाग्याखाली असणारी " गरीबांचा शाहरूख मध्यमवर्गीयांचा स्वप्नील .." सारखी एखादी साॅलीड लाईनपण राहिलीये इथे...ते पण आवडायचं.. कि मुद्दाम लिहीली नाहीस दादा.... Happy

आरारारा.... !!!
तोच तोच मी मी पणा घेउन यायचं होतं तर कशाला आलात परत? लांब होतात तेव्हा ही वरच्या सारखी कडबोळी कोणीही न घातल्याने मजेत दिवस जात होते.
असो! आलिया भोगासी... दुसरं काय!

नवीन आयडी का ते कळले नाही. रुन्मेष ह्या आयडीनेच (किंवा अभिषेक ह्या सुद्धा) जमेल तेव्हा माबो वर आला असतास तरी चालल असत की. माबो वर असे कितीतरी आयडीज आहेत जे जमत असेल तस माबो वर येत राहातात... >> + १

>> ड्युआयडी म्हणजे काय असतं ?

माझ्या समजुतीप्रमाणे "डुप्लिकेट आयडी". हि समजूत खरी असेल तर "ड्युआयडी" हा तसा थोडासा चुकीचाच उच्चार म्हणावा लागेल. कारण इंग्लिशमध्ये "ड्यू" चा अर्थ वेगळा आहे. त्यामुळे "येणे असलेला आयडी" असा काहीसा अर्थ होतो Biggrin

>> तेव्हा ऋन्मेऽऽषला कायमचे थांबवून आपल्या वर्जिनल आयडीने जे काही थोडेबहुत शक्य होईल तसे वावरावे असे ठरवले आहे.
>> अतुलभाऊ ते मीच आहे. पण कधीच वापरले नाही.

नेट है मायाजाल Happy

काय बोलू तेच कळत नाहीये पण ऋन्मेष ह्या आयडीचा मी फॅन होतो म्हणजे अजुनही आहे...तुम्ही तोच आयडी कंटीन्यू करावा असं मला वाटतं...आता तुमच खरं नाव ऐकून थोडासा धक्का बसला मला..

म्हणजे तुमचं ऋन्मेष हे टोपणनाव आहे हे माहीत होत..मला वाटत होत तुमच खरं नाव कदाचित समीर, सागर, फार फार तर रूपेश असेल असं वाटतं होत..पण डायरेक्ट भास्कर ...strange..

अच्छा अभिषेक आहे होय....मग इथे काय लिहलय ह्यांनी..

" भन्नाट भास्कर या ओरीजिनल (कोई शक?) आयडीने जमेल तितका आपला प्रपंच सांभाळत वावरेल. काय करणार, मायबोलीचे व्यसन सहजी सुटत नाही"

चला, नव्या ब्रँडचं मार्केटिंग व्यवस्थित होतंय. जुन्या ब्रँडच्या बांधलेल्या गिर्‍हाईकांना संदेश मिळाला.
हाच संदेश एकदा जुन्या ब्रँडच्या नावानेही देऊन ठेवा. सहजासहजी नाअ ब्रँड ट्राय न करणार्‍यांना कळलं नसेल अजून.
नव्या ब्रँडला अजून फक्त ३ चाहते आहेत. जुन्या सगळ्यांना इकडे यायला सांगा. त्यातल्या काहींचा विरस झाला असेल, तर त्याच धमाल मनोरंजनाची खात्री प्रात्यक्षिकातून द्या.

No! Runmesh was being loved or hated. But, BB is being ignored.
पण लवकरच तो आपली ओळख निर्माण करे अशी अपेक्षा आहे.........

>>>माझ्या समजुतीप्रमाणे "डुप्लिकेट आयडी". हि समजूत खरी असेल तर "ड्युआयडी" हा तसा थोडासा चुकीचाच उच्चार म्हणावा लागेल. कारण इंग्लिशमध्ये "ड्यू" चा अर्थ वेगळा आहे. त्यामुळे "येणे असलेला आयडी" असा काहीसा अर्थ होतो>>>>
Lol
अतुलदा, दुसऱ्याकडे थकित असलेले 'येणे' वसूल करण्यासाठीही 'ड्यू'प्लिकेट आयडी घेतले जातात ! कसं ते 'अकाऊंट'वाले समजावतील.. Proud

अहो "डूआयडी"च म्हणायचे आधी मग कुण्या विद्वानाने कुठेतरी "ड्यूआयडी" लिहले असावे.... मग एकाचे बघून दुसरा, त्याचे बघून तिसरा असे ते पसरत गेले असावे!
परत भाषा शुद्धीबद्दल बोलायची सोय नाही! लगेच तुम्ही पेठी लोक असे काय शहाणे लागून गेलात असा निशाणा साधला जातो!
"बोलीभाषे"त सगळे माफ असते..... आणि जे सर्वसामान्य लोक बोलतात तेच त्यांनी लिहले तर तुमचे काय गेले? असा मुद्दा फेकून मारला की विषय संपला!
जे मराठीचे तेच इंग्रजीचे!

असो!...... इथे याहून जास्त विषयांतर नको!

तब्येतीची काळजी बर्‍याच आयडींना आहे हे प्रोफाईल चेक केले तेव्हा समजले. हेच प्रेम इथे पण दिसतेय.
पण तो जर ड्युआयडी असेल तर दोन्ही आयडी आज्जारी पडतील ना?
आणि ड्युआयडी आजारी पडल्याची बातमी ओरिजिनल सोडून इतरांना कशी काय समजते? आय मीन पहिल्यांदा ज्याला समजले असेल त्याला..

उत्तर नकोच. सहज शंका विचारली.

सायो ताकाला जाऊन भाण्डे लपवू नका. गरज असल्याशिवाय आपण हा धागा फॉलो करत आहात का.. माझी पोस्ट पडल्यापडल्या आपला रिप्लाय आला. वचन देतो. विकांताला ईतर कोणाला रिप्लाय देईन न देईन आपल्या एकूण एक पोस्टना जरूर देईन. शुभरात्री Happy

Pages