एका ड्यू आयडीचे मनोगत ! - ऋन्मेष

Submitted by भन्नाट भास्कर on 11 June, 2018 - 04:12

जवळपास ४ वर्षे होत आली ......

माझ्या ऋन्मेऽऽष या आयडीला !

गेले तीन महिने हळू हळू करत हळू हळू ईथे येण्याचा वेळ कमी होत गेला. धाग्यांचा रतीब केव्हाच आटला, पण प्रतिसाद द्यायला आणि मुख्यत्वे त्यातून पुढे होणारी चर्चा, वाद यांचा पाठपुरावा करायलाही हवे तेव्हा वेळ मिळणे अवघड झाले तेव्हा ऋन्मेऽऽषला कायमचे थांबवून आपल्या वर्जिनल आयडीने जे काही थोडेबहुत शक्य होईल तसे वावरावे असे ठरवले आहे.

ऋन्मेषचा पासवर्ड विस्मरणात टाकला आहे. त्याबद्दल केलेल्या विचारपूशीला आता ईथूनच उत्तरे दिली जातील. म्हटलं तर फक्त नाव बदलले आहे, म्हटले तर काही संदर्भ बदलले आहेत. ईच्छा तर खूप होतेय की या तीनचार वर्षांतील प्रवास कागदावर उतरवून काढावा. पण ईतके प्रवासवर्णन लिहावे ईतका वेळ हाताशी मिळणे अवघड झालेय. पण तरीही थोडक्यात आणि एका स्वतंत्र धाग्यात मनोगत लिहायचा मोह आवरत नाहीयेच. काय करणार, शेवटी मी ऋन्मेषच आहे Happy

जेव्हा मी ऑर्कुटच्या निमित्ताने सोशलसाईटवर अवतरलो तेव्हा ऋन्मेषपेक्षाही छोटा होतो. साधी गर्लफ्रेंडही नव्हती. ती ऑर्कुटवरच मिळाली. पण त्या आधी मी एक शॉर्टटेंपर, शीघ्रकोपी, थोडासा हट्टी आणि थोडासा चिडका व्यक्तीमत्व होतो. जेव्हा ऑर्कुटवर कॉलेजच्या सळसळत्या उत्साहात बागडायचो तेव्हा अगदी तसाच वागायचो. ठोश्याला ठोसा, एखादा डोक्यात गेला की त्याला अद्दल घडवायला मग काय पण.. वाद, भांडण, ऑनलाईन शाब्दिक मारामारया. अर्थात माझ्यामते मी अन्यायाविरुद्ध भांडणारा रॉबीनहूड होतो. पुढे कधीतरी याच विचारांनी एका समूहाच्या संचालकांविरुद्ध बंडखोरी केली आणि समूहातून बॅन झालो. तेव्हा पहिल्यांदा ड्यूआयडी काढले, आणि पुन्हा आत प्रवेश मिळवला. बरेच दंगेधोपे झाले, आत्मा शांत झाला. मजाही आली, पण दुसर्‍याला त्रास देताना आपल्यालाही त्रास होतो हे जाणवले. हा त्रास टाळणे आपल्याच हातात असते हे समजले. सोशलसाईटवर आपले उपद्रवमूल्य फार आहे हा माज हळूहळू मीच स्वहस्ते गाळून टाकला. आणि आपले मनोरंजनमूल्य जपायला सुरुवात केली. याच बदलाच्या काळात माझे एक फेक प्रोफाईल फार फेमस आणि बरेच जणांचे लाडके झाले. पुढे तो मीच आहे हे समजूनही त्या प्रेमात काही फरक पडला नाही. वाल्या आणि वाल्मिकी दोन्ही कमीजास्त प्रमाणात आपल्याच आत असतात. कोणाला गोंजारायचे हे आपल्यालाच ठरवायचे असते हे मला समजले. आणि माझ्यापुरते मी ते ठरवायला सुरुवात केली.

पुढे कॉलेज झाले. जॉबला लागलो. गर्लफ्रेंडशीच लग्नही झाले. ऑर्कुट केव्हाच आटोपले होते. पण ऑर्कुटसमूहांवर काढलेले धागे आणि त्यात केलेली धमालमस्ती फार मिस करत होतो. मायबोली पाहिली आणि ईथे पुन्हा तीच धमाल त्याच रुपात करायचा मोह झाला आणि ऋन्मेषचा जन्म झाला.

अर्थात हे रूप माझेच होते. म्हटलं तर फक्त एक नाव बदलले होते, दुसरे रिलेशनशिप स्टेटस. तसेच त्याला अनुसरून वय पाच सहा वर्षे कमी केले होते ईतकेच. बाकी सारे संदर्भ तेच, आवडीनिवडी त्याच, आचारविचार अगदी ओरीजिनलच. शाळाकॉलेजचे किस्से माझ्याच शाळाकॉलेजचे होते. ऑफिसचे किस्सेही माझ्याच ऑफिसचे होते. गर्लफ्रेंड म्हटले की आताची बायको आणि आधीची गर्लफ्रेंडच डोळ्यासमोर यायची, शेजारचा पिंट्याही आपला खासच आहे. सई-स्वप्निल आणि आपला शाहरूख तर अगदी लहानपणापासून आवडीचा. कोकणातले गाव असो, मुंबईतली घरे असो. राजकारणावरची मते असोत, वा नास्तिक वृत्ती असो. दारूला विरोध असो, वा मांसाहाराला समर्थन असो. ईंग्रजी भाषेचे अज्ञान असो वा स्वत:वरचे प्रचंड प्रेम असो Happy यात कुठलाही मुखवटा नसल्याने कुठेही वेगळ्या रुपात वावरतोय असे कधीच वाटले नाही, वा कुठे बेअरींग सुटत तर नाही ना याची काळजी घ्यावी लागली नाही.

पण सोशलसाईटने मला एक फार मोठी गोष्ट शिकवली, जी मायबोलीने आणखी पुढे नेली. ते म्हणजे संयम आणि समजूतदारपणा.
कोणाशीही वाद घालताना संयम आणि पातळी सोडू नये हे ऑर्कुटकाळातच शिकलो होतो. मायबोलीवर एक पाऊल पुढे जात, समोरची व्यक्ती आपल्याशी भांडते म्हणून ती व्यक्तीच वाईट असते असे जरूरी नाही असा विचार करू लागलो. काळ्यापांढरय़ा गुणदोषांसह प्रत्येक व्यक्तीला माझे निकष न लावता स्वतंत्रपणे स्विकारू लागलो आणि त्यानंतर कोणाबद्दलही रागलोभद्वेषमत्सर वगैरे काही उरले नाही. सोशलसाईटवरची हीच शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात घेऊन गेलो. आणि आयुष्य आणखी सुखी समाधानी झाले. स्वत:तील या बदलासाठी जसे ऑर्कुटवरील फेक प्रोफाईल्सनी मला मदत केली तसेच मायबोलीवरील ऋन्मेष या ड्यूआयडीनेही मदत केली. याबद्दल मी ऋन्मेष आणि त्याला सांभाळून घेतलेल्या सर्वांचा, तसेच मायबोली संकेतस्थळाचाही आभारी आहे _/\_

ता.क. - ऋन्मेष तर ईथून थांबेल ते त्या बिचार्‍याला गरजेचा वेळ देऊ शकत नाही म्हणून, पण तोच पाच सहा वर्षांनी मोठा होत आता भन्नाट भास्कर या ओरीजिनल (कोई शक?) आयडीने जमेल तितका आपला प्रपंच सांभाळत वावरेल. काय करणार, मायबोलीचे व्यसन सहजी सुटत नाही Happy

धन्यवाद,
आपलाच भन्नाट
आडनाव नका विचारू, त्याने जात कळते !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ithla

वत्सला, आपण अभिषेक समजून भास्करला दाखवलेल्या काळजीबद्दल धन्यवाद.
पोरंबाळं असणारा आणि ऑफिसला जाणारा असा या मायबोलीवर मी एकटाच नक्कीच नाहीये.

ट्रेनचा येताजातानाचा प्रवास, बाथरूम मध्ये असताना , पोरं झोपल्यावर रात्री उशीरापर्यंत, ईतरवेळीही पोरं त्यांचे जेवणखाणे खेळ वैयक्तिक छंद करत असताना, ऑफिसमधील लंच वा टी टाईम, ऑफिसमधील वॉशरूम, वर्क अगदीच स्लो डाऊन झालेले असताना... मायबोलीवर आपण येऊ शकतो.
म्हटले तर आयुष्याचा टाईमटेबल कंपनी आणि बायकापोरं अश्या दोनच तक्त्यात मांडला जात नाही. फक्त प्रायोरीटी क्लीअर असाव्यात.

आणि त्या प्रायोरीटीज जपायलाच ऋन्मेषचा अवतार समाप्त होत भास्कर ओरीजिनल आला आहे Happy

मुळात माणूस छंदासाठी कसाही वेळ काढतो.
मायबोली वा सोशलसाईटवर बागडणे हा माझा एक छंद आहे.
पण माझ्यासाठी त्यापेक्षा मोठा छंद माझी पोरे आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला वेळ त्यांच्यासोबतच जातो.
जर मी कुठल्या कारणांनी कधीही त्यांना वेळ द्यायला कमी पडलो तर तो त्यांच्यावर नाही माझ्यावरच अन्याय ठरेल Happy

हा, ऑफिसचे म्हणाल तर मी करीअरबाबत महत्वाकांक्षी व्यक्ती नाहीये. कुठल्याही स्पर्धेत धावत नाही. गरजेपेक्षा जास्त कमाईची अपेक्षा धरत नाही. त्यामुळे तिथून माझ्याकडे बर्राच वेळ शिल्लक राहतो, माझे हे वर उल्लेखलेले दोन्ही छंद जोपासायला Happy

खरं तर यावर वेगळा धागा यायला हवा जिथे सारेच लिहू शकतील. मी नंतर वेळ मिळताच काढतो नक्की !

घरी आल्यावर जर डू आय चा खेळ खेळत असशील तर तो तुझ्या गोड परीवर अन्याय आहे! >>>> मुलांकडे लक्ष दिलं पाहीजे हा अतिशय चांगला मुद्दा आहे. पण केवळ ड्युआयचा चा खेळ खेळला तर अन्याय आणि मूळ आयडीने दुर्लक्ष केले तर क्षम्य हे अपेक्षित नसावे. इतकेच काय वाचनाचे व्यसन, घरी आल्यावर मित्रमंडळीत जास्त रमणे, एकट्यानेच पत्ते खेळत बसणे हे सुद्धा अक्षम्य असायला हवे. अगदी चित्र, गायन, वादन इ. छंदांपायी मुलांकडे दुर्लक्ष होणे देखील याच सदरात मोडत असावे.

एका चांगल्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.

अर्ध्याहून अधिक ऑफीस मधूनच माबो वर असतात. त्यामुळे हि कमेंट कशाला?
मागे ह्याच आयडीच्या धाग्यावर इतका व्यक्तीगत हल्ला केला एका आयडीने की, कामात लक्ष द्या मग असे होणार नाही वगैरे.
आणि हा असा सल्ला काय त्या आयडीने घरून दिला काय?

आणि व्यक्तिगत हल्ले/सल्ले/भाषणं कशाला देताहेत लोकं.
हि आयडी वा इतर काय कोणी डोक्यावर बंदूक ठेवून माझे धागे वाच असे तर सांगत नाहीये ना..

इतका राग वा त्रास होतो आयडीचा तर धागा ओपन करायचे कष्ट घेणार नाहीत पण लिहायची खोडी आणि खाज सुटत नाही ते हि खरेच.

जिथून अर्चना सरकार आल्या Happy

एकदा तुम्ही लोकांना ड्यू आय डी ओळखा खेळ खेळायची सहूलियत दिली की ते काहीही नाव घेऊ शकतात

सहूलियत???
तुला 'सवलत' म्हणायचं आहे का???

दक्षिण मुंबईतील कोणत्या शाळेत होतास???

बेफिकीर यांचे लिखाण वाचायला सुरूवात केली आहे. त्या आधी यादी पाहिली. एव्हढे प्रचंड लिखाण करणा-या माणसाला हे धंदे करायला वेळ असेल असे वाट्त नाही.

सहूलियत???
तुला 'सवलत' म्हणायचं आहे का???
>>>
हो, मराठी बोलताना मला अध्येमध्ये काही हिंदी अल्फाज सर्रास वापरायची सवय आहे.

दक्षिण मुंबईतील कोणत्या शाळेत होतास???
>>>
शाळेत नाही शिकलो हे. मित्रांमध्ये शिकलो. दोन हिंदीभाषिक गर्लफ्रेंडही होत्या... एके काळी Happy

हे धंदे करायला वेळ असेल असे वाट्त नाही.
>>>
धंदा त्याला बोलतात जो पैसे कमवायला केला जातो.
याला छंद बोलतात.
छंदासाठी माणूस कसाही वेळ काढतो.

बाकीच्या धाग्यांवर अवांतर नको, म्हणून इथे लिहितोय.

१. या अवतारात स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांना सोडचिठ्ठी दिली आहे का? आधीच बिचार्‍यांना कोणी बघणारं नाही, तुम्हीही वार्‍यावर सोडलंत, तर कुठे जातील बिचारे.
२. अ. मुंबईच्या सीमारेषांबद्दल : मुंबई उपनगर हा जिल्हा प्रशासनाच्या सोयीसाठी १९९० साली अस्तित्त्वात आला. पण या दोन्ही जिल्ह्यांच्या बाहेर राहणार्‍यांसाठी इथल्या कुठल्याही भागात राहणारा हा मुंबईकरच. अगदी ठाणे -कल्याण- टिटवाळा, नालासोपारा इथे राहणाराही चंद्रपूर किंवा सिंधुदुर्गातल्यासाठी मुंबईकरच. इतकंच काय लोकसभा मतदारसंघाची नावंही मुंबई उत्तर, मुंबई ईशान्य, अशीच आहेत.
.ब. शाळकरी मुलांनासुद्धा पत्ता सांगताना घर, गल्ली, गाव (म्हणजे मुंबईतला तो विभाग) हे सांगता येतं. माझ्या लहानपणी आम्ही घाटकोपरहून बोरिवलीला स्थलांतरित झालो होतो. आता दक्षिण मुंबईतल्या आपल्या भागाचं नाव सांगता येत नसेल, तर ते सांगता न येण्यासारखं आहे, की सामान्यज्ञान कमी पडतंय?
त्या पोस्ट्सचा उद्देश त्या धाग्यावर आलेल्या पुण्याच्या अभिमानावर (ज्याचा उल्लेखही वक्रोक्तिपूर्ण असण्याची शक्यता वाटतेय) तिरकस टिप्पण्णी करण्याचा असला, तरी हे लिहायचंय.

धंदा त्याला बोलतात जो पैसे कमवायला केला जातो.
याला छंद बोलतात

छंद बोलतात नाही, म्हणतात!!!

१. या अवतारात स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांना सोडचिठ्ठी दिली आहे का?
>>>>
नाही हं, कालच मी एका धाग्यावर माझ्या गेले चारपाच वर्षे असलेल्या टिकटिक वाजते डोक्यात या दुनियादारी रिंगटोनचा उल्लेख करताना स्वप्निल सईची आठवण काढून माझा दिवस गोड केला होता.
मुळात माझ्या आवडीनिवडी खरोखर माझ्याच आहेत. तुम्ही अवतार बोलत आहात, पण फक्त नावच बदलले आहे. माणूस तोच आहे, तसाच आहे Happy

आता दक्षिण मुंबईतल्या आपल्या भागाचं नाव सांगता येत नसेल >>>>
का नाही सांगता येत? येते की सांगता. ते सुद्धा इंग्लिशमध्येही सांगता येते. स्पेलिंग काना मात्रा अचूक वगैरे
बाकी मुंबई कुठवर धरायची हा वाद आस्तिक नास्तिक, शाकाहारी मांसाहारी सारखा चालतच राहील. उद्या बिल्डर लोकं ईगतपुरीलाही मुंबई घोषित करतील आणि तिथला जागेचा भाव वाढवून ठेवतील.

विमु, बोलतात हा शब्द हिंदीवरून उचलला आहे. बोल उसको भाई ने बुलाया है वगैरे

Pages