फ्री...? : भाग १५

Submitted by पायस on 8 June, 2018 - 13:38

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66350

ऑक्टोबर १९११
अलाहाबाद

डेव्हिडला झोप येत नव्हती. त्याच्यात येरझार्‍या घालण्याचे सुद्धा त्राण राहिले नव्हते. उजव्या हाताची मूठ कपाळावर टेकवून तो फतकल मारून बसला होता. ही इमारत अलाहाबादेत नक्की कुठे होती, आत्ता इमारतीत आणखी किती लोक आहेत, त्यांच्या पोझिशन्स काय आहेत असे असंख्य प्रश्न त्याच्या समोर होते. कितीही म्हणले तरी जोसेफशी झालेल्या संभाषणानंतर त्याचे धैर्य बरेचसे खच्ची झाले होते. आयुष्यात प्रथमच त्याला हेर पॅपींशिवाय विचार करावा लागत होता. प्रथमच? आपण लहान असताना तर नक्की आपण पॅपीशिवाय विचार करत असू? बरोबर? डेव्हिडला फार काही आठवत नव्हते. त्याला लहानपण म्हणजे आपले वडील आणि त्यांचा मूर्ती बनवण्याचा कारखाना आठवत असे. अनेकदा शाळेत त्याला मित्र मिळत नसल्याची बोच तो वडलांना बोलून दाखवत असे. एके दिवशी त्याच्या वडलांनी त्याला पॅपी बनवून दिला होता. आणि चक्क पॅपी त्याच्याशी बोलला होता. तो जे काही सांगत होता ते सगळं पॅपी ऐकून घेत होता. जसा डेव्हिड मोठा होत गेला तसा पॅपीही मोठा होत गेला होता. त्याला समजू शकणारा तो एकच होता. आणि जोसेफने एकदा सोडून दोनदा पॅपीचे तुकडे तुकडे केले होते. जर डेव्हिडला शक्य झाले असते तर त्याने तत्क्षणी जोसेफचा जीव घेतला असता. पण आत्ता जोसेफचे पारडे जड होते. डेव्हिडला हात चोळत बसण्याखेरीज गत्यंतर नव्हते.
"हाय डेव्हिड"
डेव्हिड चमकला. त्याला पुन्हा एकदा तीच दडपल्याची, ओझ्याखाली गुदमरल्याची जाणीव झाली. त्याने इकडेतिकडे पाहिले. त्या खोलीत काही म्हणजे काही सामान नव्हते. डेव्हिडला दिलेले जेवणाचे ताट वगळता कोणतीही वस्तु नव्हती. ते ताटही थोड्या वेळाने कोणीतरी येऊन घेऊन जाईल यात डेव्हिडला काडीची शंका नव्हती. खोलीत जाण्या येण्यासाठी एकच दरवाजा होता. तो दरवाजा बाहेरून बंद करता येई पण आतून त्याला बंद करण्याची कोणतीही सोय नव्हती. आल्या आल्या त्याने खोलीला असलेली एकमेव खिडकी बघितली. ती फारच उंचावर होती. डेव्हिडच्या नजरेने हेही हेरले होते की अगदी ती खिडकी उंचावर नसती तरीसुद्धा तिचे मजबूत गज सहजासहजी वाकवणे शक्य नाही. त्यासाठी कोणी शक्तिशाली आणि कसबी मनुष्य हवा. त्या खिडकीतून डोकावणारा फणींद्र असाच एक मनुष्य होता.
"फणींद्र तू इथे? का? नाही त्याही आधी कसा?"
"ते प्रश्न गौण आहेत. मला एक सांग तुझी इथेच सडायची इच्छा आहे का इथून बाहेर पडायचं आहे?"
"ते शक्य आहे?"
"अगदी सहज शक्य आहे. शहरभर कडक पहारा असेलही पण इथला पहारा त्यामानाने फारच गलथान आहे."
"पण आपण शहरातून कसे बाहेर पडणार?"
"त्याची चिंता तू नको करूस. मी जर शहरात प्रवेश करू शकतो तर बाहेरही जाऊ शकतो."
डेव्हिडने काही क्षण विचार केला. "ओके. लॅस एस उन्स सो माखेन. बोल काय करायचं."
फणींद्रने उत्तरादाखल आपली बत्तिशी दाखवली.

*****

थोड्या वेळाने डेव्हिडचे ताट परत न्यायला दोन हत्यारबंद शिपाई आत आले. त्यांना दिसलेले दृश्य मोठे भयंकर होते. डेव्हिड जमिनीवर उताणा पडला होता. त्याच्या तोंडाला पांढरा फेस आल्यासारखा वाटत होता. त्याच्या तोंडातून गळणारी लाळ जमिनीवर पडत होती. त्याच्या शर्टाच्या कॉलरजवळचा भाग विशेष विस्कटलेला होता. त्या दोघांना सक्त ताकीद दिलेली होती. डेव्हिडला काहीही होता कामा नये. दोघेही पूर्ण आत शिरले आणि त्याच्या डोळ्यांसमोर तारे चमकले. ते दार खोलीच्या काहीसे आत आलेले होते. त्यामुळे दरवाजाच्या जाड चौकटीचा उंचवटा निर्माण झाला होता. फणींद्र आपले शरीर सावरून त्यावर उभा होता. त्याने खाली उडी मारता मारता दोघांना लाथ घातली. एकजण डेव्हिडच्या अगदी जवळ पडला. डेव्हिडने लगेच आपले सोंग सोडून त्याला बगलेत दाबला. दुसर्‍याला सावरायला अवधी न देता फणींद्रने एका पाठोपाठ एक बुक्के लगावले. जेव्हा फणींद्र थांबला तेव्हा त्या शिपायाचे नाक फुटले होते, ओठ सुजला होता, डोळा काळानिळा झाला होता आणि चेहरा बघून त्याच्या जन्मदात्रीनेही त्याला ओळखले नसते. फणींद्र थांबल्यानंतर डेव्हिडने आपल्या बगलेत दाबलेला शिपाई सोडला. डेव्हिडने त्याच्या नाकापाशी आपली बोटे धरले. फणींद्रकडे वळून बघून त्याने आपल्या गळ्यावरून हात फिरवून इशारा केला.
"आता?"
"आता काय? यांच्या बंदूकी उचला. तुम्ही लोकांनी बनवलेली ती विशेष बंदूक शोधली पाहिजे. त्याशिवाय ती योजना यशस्वी होणार नाही."
थोड्याच वेळात त्यांनी ती इमारत पालथी घातली आणि त्यांना ती बंदूक सापडली. तिच्यावर लक्ष ठेवायला आणखी दोनजन तैनात होते. बंदूकीच्या प्रत्येकी दोन फैरीत ते गारद झाले.
"टोलं! पण तुला कसं कळलं की ही बंदूक याच इमारतीत असेल? आणि ते शिपाई आधी माझ्या खोलीत येतील, तुझ्या खोलीत नाही?"
"सोप्पं आहे. आपली योजना त्यांना कधी कळली हे नक्की सांगता येत नाही पण माझ्या मागावर ते पुण्यात आणि कलकत्त्यात आले होते. दोन्ही ठिकाणी त्यांनी कडक पहारा बसवला असला आणि शक्य तितके पोलिस कामाला जुंपले असले तरी त्यात सहज बारीकसारीक फटी दिसत होत्या. थोडक्यात त्यांच्या योजना खूप विचारपूर्वक आखलेल्या नाहीत. त्यात त्यांना ही सगळी भानगड गोपनीय राखायची असावी. जर तसे असेल तर त्यांना उगाचच्या उगाच बंदूकीसाठी वेगळी जागा, कैद्यांसाठी वेगळी जागा असले उपद्व्याप परवडणारे नाहीत. खासकरून ते आपल्याला उद्याच कुठे हलवणार असतील तर मुळीच नाही. ही शक्यता खूप जास्त असल्याने मी अंदाज बांधला की त्यांचे कागदकाम पूर्ण होईस्तोवर ते आपल्याला आणि त्या बंदूकीला इथे ठेवणार असावेत."
"टोलं! आईन्फाख टोलं! आणि माझा दुसरा प्रश्न?"
"ते माझ्या खोलीत कधीच आले नसते."
"का?"
"कारण माझ्यासाठी जेवणाचे ताट आलेच नव्हते. ख्रिस किंवा जोसेफ दोघेही असले बालीश उपाय योजणार नाहीत. ही नक्की त्यांच्या कोणा वरिष्ठाची आज्ञा असणार. त्याचा असा समज असावा की मला उपाशी ठेवलं तर मी मोडेन. देव त्याला सद्गती देवो. मला काळजी असलीच तर याची होती की त्यांनी तुला ठार तर केलं नाही."
"हाहाहाहा. नाही नाही. त्यांच्या दृष्टीने माझं पटावरचं महत्त्व अजून पुष्कळ आहे. ते मला ठार करणं शक्य नाही. त्यांचा मला युरोपात न्यायचा निर्णय झाला असावा."
फणींद्रचे डोळे आणखीनच काळवंडले. "म्हणजे तू जर मेलास तर त्यांचं काहीतरी नुकसान आहे?"
डेव्हिडच्या अंतर्मनाने त्याला धोक्याचा इशारा दिला. त्याने तातडीने बंदूक फणींद्रवर रोखली पण तोवर उशीर झाला होता. डेव्हिडकडे अजूनही त्या शिपायाकडून घेतलेली मस्केट होती तर फणींद्रने मस्केट सोबत एक पिस्तुल उचलले होते. मस्केटपेक्षा पिस्तुलाचा रिलोड टाईम खूप कमी असल्याने फणींद्र तोवर गोळी झाडून मोकळा झाला होता. पहिली गोळी डेव्हिडच्या छातीत घुसली आणि फुफ्फुसात जाऊन रुतून बसली. दुसरी गोळी त्याचा गळा फोडून गेली. फणींद्रने शांतपणे त्या विशेष बंदुकीची पेटी उचलली आणि तो बिनदिक्कत मागच्या दरवाजाने इमारतीच्या बाहेर पडला. तिथल्या पहारेकर्‍याला बेशुद्ध करायला त्याला फार वेळ लागला नाही. त्याची नजर तिथल्याच तबेल्यावर पडली. तो घोड्यावर दौडत होता आणि त्यानंतर जवळ जवळ वीस मिनिटांनी गोळ्यांचा आवाज ऐकून शेजारच्या इमारतींमधल्या रहिवाशांनी बोलावणे पाठवल्यामुळे पोलिस तिथे पोहोचले होते. सर मॅक्सवेल, ख्रिस आणि जोसेफही मागोमाग आलेच. मॅक्सवेल यांनी पुढच्या तासाभरात तिथल्या पोलिस प्रमुखाच्या बडतर्फीचे फर्मान फाडले. ख्रिस आणि जोसेफ रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावले.

******

"फणींद्र बोटीने जाण्याचा धोका पत्करणार नाही."
"का?"
"कारण त्याला बोटीने किंवा नदीने जायला वेळ लागेल. एवढा वेळ त्याच्याकडे नाही. अलाहाबादेतून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर ट्रेन हाच त्याच्यापुढचा सर्वोत्तम पर्याय आहे. वर्स ही हॅज अ हेडस्टार्ट!"
बग्गीतून शब्दशः उडी घेऊन ख्रिस वेड्यासारखा धावत सुटला. कीप द चेंज, म्हणत काही पौंड गाडीवानाच्या अंगावर भिरकावून जोसेफ त्याच्या मागेच होता. स्टेशनमास्तर दिसताच ख्रिस अचानक ब्रेक लागल्यासारखा थांबला. जोसेफही अचानक ब्रेक लावल्यामुळे ख्रिसच्या अंगावर कोसळला.
"अ‍ॅट इझ जंटलमेन. श्वास घ्या. हे रेल्वे स्टेशन आहे, घोडाबाजार नाही."
"हातात माणूस घेतलेला पेटी पाहिला का?"
"व्हॉट?"
"एक मिनिट." जोसेफने ख्रिसचा खांदा हलकेच दाबला. दोघांनी दीर्घ श्वास घेतला.
"हातात अंदाजे दीड फूट बाय अडीच फूट अशी पेटी घेतलेला माणूस तुम्ही पाहिलात का?"
"हो हो. तोही तुमच्याच प्रमाणे घाईगडबडीत होता. हे बघा तिकिट शब्दशः अंगावर फेकून ट्रेनमध्ये चढला. व्हेअर हॅव द एटिकेट्स गोन दीज डेज ....."
"एटिकेट्स माय फूट. तो कुठल्या ट्रेनमध्ये चढला?"
"ती काय हावड्याला जाणारी ट्रेन. ही चालली बघा."
ख्रिसने त्या स्टेशनमास्टर संपूर्ण जोर लावून बाजूला ढकलले आणि तो जीव खाऊन ट्रेनच्या मागे पळत सुटला. हा गोंधळ बहुधा प्रवाशांच्या सुद्धा कानी गेला असावा कारण काही डोकी खिडकीतून डोकावली. एका बोगीच्या दारातून एक इसम किंचित बाहेर वाकला.
"सॉरी ख्रिस. आजही नशीब माझ्या बाजूने आहे. बट यू आर गेटिंग देअर. मी तुझी वाट बघेन."
फणींद्रच्या हात हलवणार्‍या आकृतीकडे ख्रिस बघतच राहिला. ट्रेनचा वेग वाढत गेला अणि ख्रिस हात हलवत मागे फिरला.

******

"पण तो दिल्लीच्या ट्रेनमध्ये का नाही बसला?"
"आय डोन्ट नो. कदाचित महिनाभर दिल्लीत राहणे त्याला अवघड वाटले असावे. किंवा ऐनवेळी हावड्याला जाणारी ट्रेनच काय ती उपलब्ध होती."
"हावड्याला तार पाठवली?"
"हो."
"तेवढे पुरेसे नाही. तो महाधूर्त प्राणी पुढच्याच कोणत्या तरी स्टेशनवर उतरून दिल्लीची ट्रेन पकडेल."
"गुड पॉईंट. अजून ट्रेन जेमतेम पंधरा वीस मैल गेली असेल. मी लगेच तार पाठवून व्यवस्था करतो."
ख्रिसचे अंतर्मन सांगत होते की तो अजूनही एक पाऊल कुठे तरी मागे आहे. त्याला फक्त कुठे ते लवकर समजत नव्हते. पुढच्या स्टेशनवरून तार आली की असा कोणी मनुष्य ट्रेनमध्ये नाही. थिंक ख्रिस, थिंक! असं कोणतं चुकीचे गृहीतक आहे ज्यामुळे आपण कोणतीतरी शक्यता विचारात घेण्यात अपयशी ठरलो आहोत. फणींद्र ट्रेनमध्ये चढला हे नक्की. पण तो स्टेशनवर उतरला नाही. एक मिनिट, हेच ते गृहीतक. फणींद्र ट्रेनमधून स्टेशनवरच का उतरेल?

हे समजेपर्यंत उशीर झाला होता. अलाहाबादपासून जेमतेम तीस मैल अंतरावर एक वळण आहे. तिथे ट्रेनचा वेग ताशी दहा मैलांपेक्षा कमी होतो. तिथे फणींद्रसाठी एक ताज्या दमाचा घोडा तयार होता. फणींद्रने अजिबात न कचरता चालत्या ट्रेनमधून उडी घेतली. किरकोळ खरचटले, त्या जखमा थोड्याच अंतरावर असलेल्या ओढ्याच्या पाण्याने धुतल्या. पोटभरून पाणी पिऊन घेऊन त्याची सवारी वारा पित दिल्लीच्या दिशेने दौडत सुटली.

~*~*~*~*~*~

गंगादास आपल्या पडवीच्या अंगणात एकटाच बसला होता. त्याच्या आत्ताच्या अवतारावरून तो सधन असावा असे कोणाला वाटले नसते. वर्ष होऊन गेलं का? का दीड वर्ष? कधी का असेना त्याला त्या सर्कस विषयी माहिती मिळाली. अलाहाबादेत सर्कस आणावी का? आणायची तर कोणती? हा प्रश्न सोडवायला शहरातले काही उच्चपदस्थ एकत्र जमले. आता अलाहाबादला कोणी संस्थानिक नसल्याने ब्रिटिशांनी हा प्रश्न या उच्चपदस्थांकडे सोपवला. ग्रेट रॉयल सर्कसचे नाव यात आघाडीवर होते. केरळमधून पुढे आलेल्या अनेक सर्कशींपैकी सध्या ही सर्कस जोरात होती. तेव्हा कोणीतरी नटराजा सर्कसचे नाव सुचवले. बॉम्बे इलाख्यात ही सर्कस म्हणे खूप प्रसिद्धीस आली होती. तिचे एक पोस्टरही कुठून तरी यांच्या हाती आले होते. त्यावरच्या मालकिणीला ओळखायला गंगादासला अजिबात वेळ लागला नाही. शेवटी ग्रेट रॉयल सर्कसचेच नाव पक्के केले गेले. त्यानंतर गंगादास जाऊन नटराजा सर्कस पाहिलेल्या माणसाला जाऊन भेटला. त्याची शंका खरी होती. मलिकाच्या खांद्यावर काहीतरी गोंदण होते. ते काय होते याच्यात त्याला काहीही शंका नव्हती. त्याने लगेच अलाहाबाद सोडले आणि जवळच्या एका छोट्याशा खेड्यात राहायला त्याने सुरुवात केली. याने कंठा कोणालाच सापडणार नव्हता पण दुसरा काही उपाय नव्हता. तो हे ज्ञान पुढच्या पिढीला देणार नव्हता. त्याच्यासोबतच या कंठ्याचे रहस्य काळाच्या पडद्याआड जाणार होते. तसेही या पंथाची जगाला गरज नव्हती. त्याची मुले कुठे होती हे आता त्याला स्वतःला सुद्धा माहित नव्हते. तो आता एकटा होता. त्याला शोधत कोणी आलेच तरी धमकावायचे साधनच नसेल तर ते नराधम काय करू शकतील.

"जय रामजी की" तंद्री भंगल्यानंतर गंगादासने समोर पाहिले. दोन स्त्रिया डोक्यावरून पदर घेऊन उभ्या होत्या. त्यातली एक मध्यम चणीची होती पण दुसरी चांगलीच उंच होती. गंगादासही तिच्यासमोर खुजा वाटला असता. यांना आपल्याकडून काय हवे असेल?
"जय रामजी की. इस गरीबसे का चाही माई?" गंगादासने सावधपणे चाचपडायला सुरुवात केली.
"भाईजी, हम दो बहनें यात्रा कर रहे है. अब प्रयाग जाकर गंगामाई के दर्शन की इच्छा हैं. बडी प्यास लगी तो सोचा कहीं पानी मिल जाए ..."
गंगादास आतून पाण्याचा गडवा घेऊन आला. त्या स्त्रीने पाणी ओंजळीत घेतले आणि प्रथम चेहर्‍यावर त्याचा हबका मारला. ओंजळभर पाणी पिऊन तिने आपला पदर बाजूला केला आणि गंगादासच्या हातातला गडवा खाली पडला.
"गंगादास. आत जाऊन बोलूयात?"

******

"मी पुन्हा सांगतो सुलक्षणा, तुला मी त्या कंठ्याविषयी काहीही सांगणार नाही. तसेही तो एक दागिना आहे. त्याने काही साध्य होणार नाही. त्या प्रकारे जगण्याचे दिवस आता काळाआड गेले आहेत. तुझ्या पापांची घागर आधीच ओसंडून वाहत आहे. आता पुरे!"
"पहिली गोष्ट, मी आता मलिका नावाने ओळखली जाते. दुसरी गोष्ट, काहीही कालबाह्य झालेले नाही. गेली दोन शतके आपल्यात वेगवेगळ्या भविष्यवाण्या, दंतकथा पसरल्या आहेत. त्या सगळ्या प्रत्यक्षात आणल्या नाहीत तर त्यांना मुक्ती कशी मिळणार? तुम्ही कोणीही माझ्या आणि माझ्या बहिणीच्या मदतीला आले नाहीत. या इंग्रज लोकांच्या भीतिने एकाएकी सगळं बंद कसं पडू शकतं? असो, तुला आमच्यासोबत यायचं नाही हा तुझा प्रश्न आहे. पण गंगादास जर तू आमच्या सोबत राहणार नसशील तर आमची रहस्ये सुद्धा तुझ्यासोबत राहू शकत नाही. ही काली, जी आपल्या पंथाची भावी प्रमुख ठरेल, आणि जे योग्यच आहे, तिच्या प्रमुखपदावर शिक्कामोर्तब होण्यासाठी तो कंठा मला हवा."
"काली, पोरी तू का तुझं आयुष्य वाया घालवत आहेस?" कालीने त्याला सणसणीत लाथ घातली. तिने आपला पदर बाजूला केला आणि चेहर्‍यावरचा मुखवटा बाजूला केला.
"गंगादास, तुला प्रमुखाचा, म्होरक्याचा, सरदाराचा चेहरा दिसण्याचा अर्थ माहित आहे. आता तू या पंथाचा नाहीस. त्यामुळे तुझ्यासाठी हा मृत्युलेख आहे. तुझी मतं काय आहेत याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. तू आमच्या प्रश्नांची उत्तरे देशील. आत्ताच्या आत्ता!"
गंगादास हादरला. मलिकाने नक्की हिला काय पढवून मोठं केलं ते कळायला काही मार्ग नव्हता. त्याने क्षणभर विचार केला. मग मन घट्ट करून तो म्हणाला,
"नाही."
"काय?"
"नाही. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मी कधीच तुम्हाला हवं ते उत्तर देणार नाही. मी संपूर्ण जगाशी नातं तोडूनही आता खूप दिवस झाले आहेत. आणि मला माझ्या जीवाची पर्वा नाही. माझा मृत्युलेख वाचला गेला आहे तर मी मरणाला सामोरे जायला तयार आहे. पण मी तुमच्या वाईट आकांक्षांना पूर्ण होऊ देणार नाही."
त्याचा तो आवेश पाहून मलिका आणि काली काही क्षण स्तब्ध राहिल्या. दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि त्या जोरजोरात हसू लागल्या.
"गंगादास. तू हे विसरतो आहेस की आम्ही सिंहपंथीय आहोत. आमच्यासोबत एक सिंह असणं सामान्य बाब आहे. तसेच तू शहरापासून दूर राहत असलास तरी तू एका बर्‍यापैकी मोठ्या खेड्यात राहत आहेस. तिथल्या गावकर्‍यांशी तुझी खूप नसली तरी थोडकी ओळख आहे. त्यांचे कोणतेही अहित झालेले तुला नको आहे. पण आता जर तू आडमुठेपणा करणार असशील तर ..."
"काली!" गंगादास संतापाने थरथर कापत होता. त्याने हात उगारलाही पण कालीने तो उगारलेला हात हवेतच पकडला आणि एक जोरदार झटका दिला. गंगादासचा हात सांध्यातून उखडला गेला.
"वेडेपणा करू नको गंगादास. मी तुला वचन देते की जर तू आम्हाला कंठ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगितलास तर आम्ही गाववाल्यांच्या केसालाही धक्का लावणार नाही. तुला माहित असेलच की सिंहपंथीय वचन नक्की पाळतात."
गंगादासचा आता निरुपाय झाला. त्याच्या पडवीतच एका छोट्याशा कोनाड्याचे फडताळात रुपांतर केले होते. त्यातून कसलेसे चोपडे त्याने बाहेर काढले. त्यातून एक रेशमी कापड काढून त्याने मलिकाच्या हातात दिले. त्यावर एका बाजूला काही भरतकाम केलेले होते.
"हा दिल्लीचा नकाशा आहे. किमान दिल्लीच्या त्या भागाचा जिथे कंठा लपवलेला आहे. माझ्याजवळचा हा नकाशाच कंठा मिळवण्याचा मार्ग आहे."
"पण यात तर काहीच खाणा खुणा दिसत नाहीत. हा नकाशा वाचायचा कसा?"
"असे म्हणतात जो व्याघ्र आणि सिंह दोन्ही पद्धतीने आपली लिपी वाचू शकतो तो हा नकाशाही वाचू शकतो. मला खात्री आहे की तुम्हा दोघींना हा नकाशा वाचता येईल. आता कृपया इथून जा. मला यात गावकर्‍यांना गोवायची इच्छा नाही."
"अर्थात गंगादास. पण अभय गावकर्‍यांना आहे, तुला नाही. तू कालीचा चेहरा पाहिला आहेस. तू जिवंत राहू शकत नाहीस." कालीने कंबरेचा खंजीर काढून गंगादासच्या छातीत खुपसला. बाहेरचा गलका ऐकून त्या दोघींनी अधिक काही न करता काढता पाय घेतला. त्यांचे गंतव्यस्थानही दिल्लीच होते. पुन्हा एकदा वाघ आणि सिंह एकाच शहरात असणार होते.

~*~*~*~*~*~

ख्रिसचा मूड गेले काही दिवस चांगलाच बिनसलेला होता. त्याने इतकी मेहनत करून फणींद्र व डेव्हिड दोघांना पकडण्यात यश मिळवले होते आणि अलाहाबादवाल्यांच्या हलगर्जीपणामुळे फणींद्र पुन्हा एकदा निसटला होता. नोव्हेंबर सोबत हवेत गारवा घेऊन आला होता. इतकी वर्षे भारतात राहून ख्रिस हळू हळू इंग्लंडच्या गारठ्याला विसरत चालला होता. रश्मीने शेकोटीत थोडे आणखी सरपण वाढवले. ख्रिसने तिने आणलेला कप घेतला आणि पहिल्याच घोटाला त्याचे तोंड वाकडे झाले.
"कोको? रश्मी मी कॅमोमाईल टी मागितला होता."
"सॉरी सर. तुमच्या तब्येतीच्या पूर्व नोंदी मला मिळाल्या आहेत. मिस्टर पॅक्स्टननी स्वतः कोको देण्याची शिफारस केली होती. तुम्ही अशा गारठ्यात जास्त चहा पिता कामा नये."
जोसेफ, दॅट व्रेच!! देव करो आणि त्याचं बिस्किट रोज चहात बुडो. ख्रिसने गपचुप कोको शेकोटीत ओतून देण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. रश्मी तिथेच उभी होती. तिच्या हातात आता काही फायली होत्या आणि डोळे मोठे झाले होते.
"अरे मालक कोण आहे? तू का मी? अ‍ॅलेक्सीने सुद्धा असं कधी केलं नाही."
"त्या जुन्या नोंदी अ‍ॅलेक्सीच्याच आहेत. हिवाळ्याचा हमखास पित्ताचा त्रास होत असल्याचे ठळक अक्षरात लिहिले आहे. चहा सोडून इतर गरम पेये शेकोटीत ओतून देण्याच्या सवयीविषयी सुद्धा त्याने लिहिले आहे."
चेकमेट! ख्रिसला आता तो तपकिरी द्राव घशाखाली ढकलणे भाग होते. "रश्मी?"
"सर?"
"पुढच्या वेळेस कोकोमध्ये किमान साखर घालशील?"
"पण अ‍ॅलेक्सीच्या नोंदीत तर लिहिलं आहे की तुम्हाला कोकोमध्ये साखर आवडत नाही."
जोसेफ माय फ्रेंड. माफ कर मी तुला शाप देत होतो. आपलंच नाणं खोटं असेल तर काय करणार? अ‍ॅलेक्सी, अ‍ॅलेक्सी तुझी रवानगी नक्कीच नरकात झाली असणार. हे तू जे केलं आहेस ना ते बरं नाही केलं. अ‍ॅलेक्सी....
"सर?"
"काय अ‍ॅले .... हे आपलं रश्मी, काय हवं आहे?"
"या फाईल्स. मला या फाईल्स तुम्हाला दाखवायच्या होत्या."
"या फाईल्स? काय आहे याच्यात?"
"जेव्हा फणींद्र आणि डेव्हिडवर नजर ठेवली जात होती त्या दिवसांत मला काहीच काम नव्हते. मग मी बहुतांश वेळ थॉर्नहिल ग्रंथालयात घालवला."
"वेट. म्हणजे तुला आपण जे शोधत होतो त्या संदर्भात ...."
"हो. त्या संदर्भातच मला काही गोष्टी सापडल्या आहेत. प्रथम ही बातमी वाचा"
ख्रिसने ते जुने वर्तमानपत्र काळजीपूर्वक टेबलावर पसरवले आणि त्याने रश्मीला अपेक्षित ती बातमी वाचली.
"शक्तीपुरचा राजवाडा जळून खाक, समस्त राजघराण्याचा र्‍हास." बातमी इंटरेस्टिंग होती. ख्रिसने सावकाश त्या बातमीचा मसुदा वाचला. त्यासोबत रश्मीने आणखी बरीच कात्रणे गोळा केली होती. त्या सगळ्यातून ख्रिसने काढलेली टिपणे पुढीलप्रमाणे - अलाहाबादपासून जवळपास शंभर कोस दूर एक अगदी छोटे संस्थान होते. त्याचे नाव शक्तीपुर. शक्तीपुरच्या लोकांचा असा समज होता की सतीच्या शरीराच्या भारतभर विखुरलेल्या अंशापैकी एक अंश शक्तीपुरात आहे. शक्तीपुर संस्थानचा राजा स्वभावाने दिलदार होता. त्याच्या तीन राण्यांपासून त्याला दोन मुली आणि एक मुलगा झाला होता. शक्तीपुर विषयी अनेक दंतकथा पसरल्या आहेत. त्यामध्ये एक दंतकथा अशी होती की या संस्थानच्या राजाला कायम मुलीच होतात. स्वतः राजा हा त्याच्या सासर्‍याच्या वारसदार असलेल्या थोरल्या मुलीचा नवरा होता. थोडक्यात तो स्वतः जावई या नात्याने गादीवर बसला होता. त्याच्या पहिल्या दोन राण्यांना अनुक्रमे दोन मुली झाल्या होत्या. मग त्याने तिसरे लग्न केले. या तिसर्‍या राणीपासून त्याला पुत्रप्राप्ती झाली. या मुलाला त्यामुळे अतिशय गुप्ततेत वाढवण्यात आले. अर्थात काही लोक म्हणत की तिसरे अपत्यही मुलगा नसून मुलगीच आहे. बातमीत लिहिल्याप्रमाणे शक्तीपुरच्या राजवाड्याला कधी काळी प्रचंड मोठी आग लागली. त्यामध्ये राजवाड्यातले सर्वजण जळून मेले, त्या राजवाड्याची राखरांगोळी झाली. शक्तीपुर संस्थान ब्रिटिशांनी मग खालसा करून आपल्या थेट अधिपत्याखाली आणले. म्हणा अधिपत्याखाली आणायला तिथे फारसे कोणी उरलेच नव्हते. राजा नाही म्हटल्यावर प्रजाही सर्व दिशांना पांगली.
"सो तुझं म्हणणं आहे की शक्तीपुर हेच आपल्याला हवे असलेले संस्थान आहे?"
"मला तरी असं वाटतं. त्यासाठी आणखी एक कारण आहे."
रश्मीने आणखी एक फाईल ख्रिसला वाचायला दिली. ती फाईल एका माणसाचा जीवनालेख होता. पहिल्याच कागदावर त्याचे नाव ठळकपणे लिहिले होते. गंगादास! गंगादास पूर्वी शक्तीपुरात राहत होता. रश्मीने गोळा केलेली सगळी माहिती बघून ख्रिसचे डोळे लकाकले.
"तू किमान वॉटसन आहेस रश्मी"
वॉटसन म्हणजे काय हे समजवायला ख्रिसचे पुढचे दोन तास खर्ची पडले.

~*~*~*~*~*~

नोव्हेंबरचे दोन आठवडे आधीच उलटून गेले होते आणि जसं जसे पंचम जॉर्ज यांच्या आगमनाची तारीख जवळ येत होती तसं तसे सर मॅक्सवेल बेचैन होत होते. लॉर्ड हार्डिंग्जने त्यांना सक्त ताकीद दिली होती की फणींद्रविषयी चकार शब्द जॉर्जपुढे काढायचा नाही. हार्डिंग्ज फारसे खुष नसले तरी डेव्हिड मारला गेला हे ऐकून त्यांना थोडे हायसे वाटले होते. ते सर्व जरी बाजूला ठेवले तरी हेन्री थोडे खट्टू होतेच. बॉम्बे इलाख्याच्या बजेटमध्ये गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक उभारण्याचा खर्च बसवता आला नव्हता. लाखो पौंड एकाएकी बाजूला काढणे नाही म्हटले तरी थोडे कठीणच होते. त्याची कागदी प्रतिकृती सम्राटांना दाखवण्याचा निर्णय नाईलाजाने घेण्यात आला होता.
मुंबईला परत जाण्यापूर्वी हेन्री ख्रिस आणि जोसेफला भेटले होते. ख्रिसने मांडलेली योजना त्यांना पटली होती. किंबहुना दुसरा उपायच नव्हता. त्या बंदूकीच्या तंत्राचा अभ्यास करणे. ती बंदूक चोरीला जाण्यापूर्वी तिची स्केचेस बनवण्यात आली होती. ख्रिस आणि जोसेफ दोघांनी ती हाताळून पाहिली होती. त्या अंदाजाने या बंदूकीत विशेष काय आहे हे जर समजले तर फणींद्र कुठून गोळी चालवण्याचा प्रयत्न करेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्या त्या ठिकाणी फणींद्रसाठी सापळा रचला तर फणींद्रला पकडता येऊ शकते. या योजनेत धोका असा होता की जर त्या बंदुकीची विशेषता वेळेत समजली नाही तर राज्यारोहण सोहळ्याची जागा इतकी विस्तीर्ण होती की फणींद्रला पकडणे अशक्यप्राय होते. पण आता हा धोका पत्करण्याखेरीज दुसरा मार्ग दिसत नव्हता.
हेन्रींनी आपला चिरुट विझवला. त्यांच्या नावे आज आलेली तार खूप महत्त्वाची होती. सम्राट आणि सम्राज्ञी लंडनहून मुंबईकडे जाणार्‍या जहाजात बसले होते. त्यांचे जहाज ताशी पंचवीस नॉटिकल मैल एवढा कमाल वेग गाठू शकत होते. पण सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता बहुतांश प्रवास ताशी वीस नॉट्सने होणार होता. सुवेझमध्ये त्यांचा एक दिवसाचा थांबा होता. सगळे मिळून सम्राट सोळा ते सतरा दिवसात मुंबईत दाखल होणार होते आणि त्यातले दोन दिवस पार पडलेही होते. आता दिल्ली दरबार होईपर्यंत दुसरे काहीही सुचायला हेन्रींना वेळ नव्हता.

पंचम जॉर्ज यांच्या भारतातील आगमनाला दोन आठवडे बाकी.

~*~*~*~*~*~

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66383

Group content visibility: 
Use group defaults

छान ...

त्या दोन मुली मलिका व काली, मुलगा रुद्र?

खूप इंटरेस्टिंग चाललीय गोष्ट. आता सोमवारची वाट पाहणे आले.