फ्री...? : भाग १४

Submitted by पायस on 7 June, 2018 - 12:30

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66341

ऑक्टोबर १९११
अलाहाबाद, ब्रिटिश इंडिया

ऑक्टोबर आता संपत आला होता. ख्रिसने नवीन मेणबत्ती पेटवली. अ‍ॅलेक्सीची एक सवय त्याच्या कामी येत होती. अ‍ॅलेक्सीला काल्डवेल घराण्याच्या महत्त्वाच्या तारखांच्या नोंदी ठेवायची सवय होती. ख्रिसने प्रोत्साहन दिल्यानंतर त्याने काल्डवेलच्या भूतकाळातील काही तारखांच्या नोंदीसुद्धा केल्या होत्या. यामध्ये एक गोष्ट ख्रिसच्या दृष्टीने रोचक होती. त्याच्या जन्माच्या काळातल्या नोंदींमध्ये काही गोष्टींचा एकमेकांशी मेळ बसत नव्हता.
ख्रिसचा जन्म १८८० मध्ये झाला. त्याचा जन्म झाला तेव्हा चार्ल्स डार्टमूरमध्ये नव्हते. त्या काळात ब्रिटन आणि इजिप्तचे सौहार्दपूर्ण संबंध होते. १८७९ मध्ये कर्नल अहमद उराबीच्या नेतृत्वाखाली काही इजिप्शियनांनी इजिप्तच्या पाशाविरुद्ध बंड पुकारले. त्यांचा हेतु इजिप्तच्या राजकारणात होणारा ब्रिटिश आणि फ्रेंच हस्तक्षेप थांबवणे हा होता. या उठावाला उराबीचे बंड म्हणले जाते. फ्रान्सने या प्रकरणात सबुरीची भूमिका घेतली. पण ब्रिटनला मात्र हे रुचले नाही. त्यांनी सैनिकी हस्तक्षेप करून हे बंड चिरडले. सुरुवातीचे काही महिने दुर्लक्ष केल्यानंतर जेव्हा अतिरिक्त सेना पाठवण्याची वेळ आली तेव्हा चार्ल्स यांची तिथे नेमणूक करण्यात आली. चार्ल्स यांचे लग्न झाल्यानंतर त्यांनी काही काळ सुट्टी घेतली होती. त्यांना आपल्या पत्नीला त्यांची जिथे पोस्टिंग होईल तिथे घेऊन जायची इच्छा तर होती पण त्यांना बोलावणे आले तेव्हा ती गर्भार होती.
चार्ल्स यांनी गणित केले की ख्रिसचा जन्म एप्रिल १८८० मध्ये होईल, बहुधा एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात. त्यांना युद्धाच्या धामधुमीत ख्रिसच्या जन्माची बातमी मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी पत्र पाठवून मुलाचे नाव ख्रिस्तोफर ठेवण्याचा आपला मानस कळवला होता. त्यानुसार त्याचे पुन्हा नामकरणही करण्यात आले. जेव्हा चार्ल्स घरी परतले तेव्हा त्यांच्या स्वागताला त्यांची पत्नी आणि दोन वर्षांचा लहान मुलगा हजर होते. तो दिवस चार्ल्ससाठी आनंदाची परमावधी होती. नंतर मात्र कळले की ख्रिस्तोफरचा जन्म मार्च १८८० मध्ये झाला होता. पण चार्ल्स यांच्या गणितानुसार तेव्हा ख्रिसचा जन्म होऊच शकत नव्हता. जर इतर काही घडले नाही असे गृहीत धरावे तर ख्रिसचा जन्म आठ महिन्यातच झाला. नाहीतर ..... चार्ल्सच्या लक्षात दुसरी शक्यता येताच त्यांच्या वागण्यात कमालीचा फरक पडला. त्यांची पुन्हा तिबेट आणि सिक्कीममध्ये नेमणूक होईपर्यंत पुढची दोन वर्षे चार्ल्सच्या रागाचा सामना सर्वांनाच करावा लागला. ख्रिसची आई लवकरच लहानशा आजाराचे निमित्त होऊन वारली. त्यानंतर चार्ल्सही आपला पाय गमावून परतले. तेव्हापासून ख्रिसला त्यांचा रोषाचा सामना करावा लागला होता. अ‍ॅलेक्सीच्या नोंदींनुसार ती दुसरी शक्यता खोटी होती. बहुतेक चार्ल्सनाही ते नंतर लक्षात आले असावे.
ख्रिसने ती वही मिटली. त्याचा मेंदू आता वेगाने काम करू लागला. जर तसे घडले असेल तर माझ्या आईची प्रसूती आठ महिन्यातच झाली होती. इन विच केस इट मेक्स मोअर सेन्स नाऊ. खासकरून या सर्कसमध्ये असलेले लोक आणि घडत असलेल्या घटना यांचा आता मेळ बसतो आहे. त्या अर्धनारीश्वर पूजकांना ज्या व्यक्तीचा शोध आहे तो जर सापडला तर कालीचे रहस्य उलगडता येईल. आणि अखेरीस "फ्री ..." चा अर्थही लागेल.

~*~*~*~*~*~*

डेव्हिडला सूर्याच्या पहिल्या किरणांनी उठवले. डोळे उघडल्या उघडल्या त्याची नजर पॅपीवर गेली. त्याने हलकेच त्याची मान कुरवाळली. क्षणभर त्याला पॅपी आनंदाने आपले डोके हलवत आहे असे वाटले. भास, तो मनाशी म्हणाला. यांत्रिक पोपट आपल्या इशाराखेरीज हालचाल कशी करेल? बहुधा इतक्या दिवस संयमाने फणींद्रची वाट पाहिल्याचा थकवा त्याला जाणवत होता. त्याला गेले दोन दिवस आपल्यावर कोणी पाळत ठेवून आहे असे वाटत होते. तोही भास असेल का? त्याने खांदे झटकले. आजही पॅपीला सोबत घेऊन जायला नको. त्याच्या मदतीने ब्रिटिश आपल्याला सहज शोधून काढतील. पण त्यांना आपला चेहरा माहित नसावा. किमान तितकासा ओळखीचा नसावा. त्याने विचारांच्या ओघातच दोन तांबे डोक्यावर ओतले. कपडे करून त्याने ती पेटी बरोबर घेतली. अदमासे अडीच फूट लांब आणि दीड फूट रूंद अशी ती पेटी बरीच जड होती. कोणालाही तिच्यात एक वाद्य आहे असे वाटले असते. बरोबरच होते म्हणा. त्यातले वाद्य मृत्युचे स्वर आळवण्यासाठीच तयार केले होते.

डेव्हिड मुक्कामाच्या ठिकाणामधून बाहेर पडला आणि नदीच्या दिशेने चालू लागला. त्याला कोणीतरी आपल्या मागावर असल्याचे जाणवले. सावधगिरीने त्याने वेडीवाकडी वळणे घेतली. त्याला इतक्या दिवसात अलाहाबादच्या गल्ल्यांची थोडकी ओळख झाली होती. पण त्याच्या मागोमाग हॉटेलमधून बाहेर पडलेला पोलिस अलाहाबादेतच वाढला होता. त्याच्या दृष्टीने डेव्हिडचे हे प्रयत्न पोरखेळ होते. डेव्हिडचे मात्र समाधान झाले होते. तो झपाझप पावले उचलत नदीघाटावर पोहोचला. त्याने त्रिवेणी संगमाच्या इथे चक्कर मारायचे ठरवले. चालत चालत तिथे पोहोचेपर्यंत सूर्य पुरेसा वर आला होता. भारतीय माणसासाठी ते कडक उन नसले तरी जर्मन डेव्हिडसाठी सूर्य आग ओकत होता. त्याने सवयीने पॅपीचा आवाज काढला पण लोक त्याच्याकडे अधिकच विचित्र नजरेने बघू लागले.
"हिया कोनो तोता है का?"
"अरी ई तो ससुरा अंग्रेज लागत है. पर जाको पास तो कोनो तोता है नाही"
डेव्हिडला त्यांची भाषा कळत नसली तरी मतितार्थ लक्षात आला. आज त्याच्या खांद्यावर पोपट नव्हता. त्याची अस्वस्थता अधिकच वाढली. सोबत पॅपी ठेवायला हवा होता. गेले काही दिवस इंग्रज हेरांच्या भीतिने पॅपीला तो नेत नव्हता. त्याचा विपरीत परिणाम होऊन त्याची चुळबूळ अधिकच वाढली होती. त्याला पुन्हा कोणीतरी आपल्या मागावर आहे असे वाटले. घाबरून तो अधिकच वेगाने नदी किनार्‍याने जवळपास धावू लागला. उकाडा असह्य होत होता. त्यात तहानेने तो व्याकुळ झाला. लवकरच तो धापा टाकत होता. मागे वळून पाहतो तर एक साधू त्याच्याच दिशेने येताना दिसला. का कोण जाणे त्या साधूची त्याला क्षणभर भीति वाटली. त्या साधूच्या प्रत्येक पावलाबरोबर आपल्या डोक्यावर कोणीतरी एक मण ओझे लादत आहे असे त्याला वाटले. त्या साधूची आणि त्याची नजरा नजर झाली. त्याच्या नजरेत काहीतरी खास होते. भर उन्हात सुद्धा डेव्हिडला अंधारून आल्याचा भास झाला. त्या साधूचे डोळे काळे होते, नव्हे त्याची बुबुळे काळी होती. निरखून पाहिल्याशिवाय तो काळसर रंग लक्षात येत नव्हता. डेव्हिडपासून एक हात अंतरावर येऊन तो साधू उभा राहिला. डेव्हिडचा शर्ट घामाने भिजला होता.
"डेव्हिड वोल्फ?"
डेव्हिडने येस म्हणण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. महत्प्रयासानेच त्याने मान डोलाविली.
"फणींद्रनाथ दत्त. ती पेटी बहुतेक माझ्यासाठी आणलेली आहे, राईट?"

*****

डेव्हिडची आता ओळख पटली होती. फणींद्रने लावलेल्या खोटा दाढीमिशांमुळे तो वेगळाच भासत होता. पुण्यात फणींद्रपासून जे दडपण जाणवले होते तेच त्याला आत्ता जाणवले होते. हा मनुष्य आपल्या बाजूला असल्याचा त्याला प्रथमच एवढा आनंद झाला होता. नव्हे, त्याचा जीव भांड्यात पडला होता. ते जमावापासून थोडे दूर आले होते. फणींद्र काही होम हवन करत असल्याचे नाटक करत होता. मंत्र म्हणता म्हणता तो डेव्हिडशी बोलत होता.
"त्या पेटीतच हत्यार आहे."
"हो. हत्याराची जुळणी कशी करायची त्याच्या सूचना अशा ..."
फणींद्रने डेव्हिडने सांगितलेल्या सूचना नीट ऐकून घेतल्या. त्याला ढोबळ मानाने पायर्‍या लक्षात आल्या. त्याने मान डोलाविली.
"मी ते कागदावर लिहूनही ठेवले आहे."
"त्याची जरूर नाही. पण तरीही पाहू ते कागद." फणींद्रने ते कागद घेतले आणि होमात टाकले.
"अशा गोष्टी जितक्या कमी लोकांना माहित तितके चांगले. उद्याचा भरवसा कोणी द्यावा. जर हे कागद कोणा ब्रिटिशाच्या हाती लागले तर?"
डेव्हिडला ते पटले. त्याने दक्षिणा दिल्याचा बहाणा करून ती पेटी फणींद्रच्या स्वाधीन केली. फणींद्रने समजावल्याप्रमाने हात जोडून नमस्कार केला. पाहणार्‍याला असेच वाटले असते की कोणा भोळ्या युरोपीय व्यक्तीला एका साधूने कसलासा होम करून त्याचे पैसे उकळले. ट्रान्सफर सक्सेसफुल! आता डेव्हिडला या देशात थांबण्याची गरज नव्हती. मुंबईची ट्रेन पकडून जहाजाने सुवेझ. मग तिथून इस्तंबूल आणि मग ट्रेनने बर्लिन. या आनंदात त्याचे फणींद्रकडे लक्ष गेले नाही.
"जर इथून बाहेर पडणार असशील तर ट्रेन नको घेऊस. आणि एकंदरीत सावध राहा. इंग्रजांची तुझ्यावर नजर आहे."

*****

डेव्हिड आपले सामान आवरून बाहेर पडला. त्याने रेल्वे स्टेशनकडे जायला बग्गी घेतली. आता मोरोक्कोत काय घडते आहे याची खबरबात पुन्हा घ्यायची होती. ट्रेनमध्ये बसताच हेर पॅपींशी बोलायचे होते. प्रशियन साम्राज्याची मान उंचावली जाणार यात त्याला शंका नव्हती. एल्साचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याचीही त्याला आता खात्री वाटत होती. आता एल्सा नक्की त्याला माफ करेल असा विश्वास त्याला वाटत होता. गाडीवानाच्या हाकेने त्याची तंद्री भंगली. बग्गीतून खाली उतरला आणि त्याला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. ख्रिस आणि जोसेफ प्रसन्न चेहर्‍याने उभे होते.
"विल्कॉमेन हेर डेव्हिड. हेर पॅपी कुठे दिसत नाहीत?"
डेव्हिडला आपल्या पायातले त्राण नाहीसे झाल्याची जाणीव झाली. त्याच्या हातातली बॅग गळून पडली. त्याच्या समोरच्या इमारतीत एका खोलीत बसलेला फणींद्र मनोमन डेव्हिडला शिव्या घालत होता.

~*~*~*~*~*~

ख्रिस आणि जोसेफ त्या पेटीतल्या बंदूकीची तपासणी करत होते. तिचे तंत्र त्यांना नीट समजले नसले तरी बंदूकीची नळी, दस्ता, खटका वगैरे ओळखू येत होते. ही बंदूक खांद्यावर वागवणे शक्य नव्हते. एका ठिकाणी बसून नेम धरण्याची ही बंदूक होती. बंदूकी सोबत एक दुर्बिण होती. बहुधा पंचम जॉर्ज ओळखू यावेत म्हणून ती सोबत असावी. तिचे जुळणी तंत्र मात्र त्यांच्या अजून लक्षात आले नव्हते. बंदूक कोणत्यातरी वजनाला हलक्या मिश्र धातूने बनवलेली होती. दस्त्याला सोनेरी मुलामा दिला होता तर उर्वरित बंदूकीला मातकट रंग चढवला होता. त्यासोबत चंदेरी रंगाची चार काडतुसे होती. रंग चंदेरी असला तरी ती चांदीची नव्हती. ज्याने कोणी ही बंदूक बनवली होती तो नक्कीच बंदूक बनवण्यात तरबेज होता. त्यांनी आता उलट तपासणी घेण्याचे ठरवले. जोसेफला डेव्हिड तर ख्रिसला फणींद्र अशी वाटणी झाली.

डेव्हिडच्या चेहर्‍याकडे बघूनच तो भयंकर चिडलेला आहे हे कळून येत होते. जोसेफने खुर्चीत बसून एक फाईल डेव्हिडच्या पुढ्यात टाकली. त्यावर डेव्हिडचे नाव स्पष्ट वाचता येत होते. डेव्हिडचा पॅपी सोबतचा फोटोही त्यावर चिकटवलेला होता.
"तुझा सर्व पूर्वेतिहास आम्हाला माहित आहे डेव्हिड. तुझ्या हेही लक्षात आले असेल की आमचे हेर बर्लिनमध्ये सुद्धा आहेत. तू भारतात येत आहेस याची बातमी आम्हाला फार उशीर होण्याआधीच लागली होती."
"त्याने काही फरक पडला होता का ...."
"जोसेफ. यू कॅन कॉल मी जोसेफ."
"फार आनंदी होण्याची गरज नाही जोसेफ. आम्ही जवळपास यशस्वी झालो होतो. माझी छोटीशी चूक नडली. हेर पॅपींमुळे मी सहज ओळखू येत असलो तरी हेर पॅपींच्या सल्ल्यामुळे मी आजवर पकडलो गेलो नाही. आज, आजच ...."
"हेर पॅपी म्हणजे तो पोपट?"
डेव्हिडच्या डोळ्यात हिंस्त्र भाव तरळले. "तोच पोपट ज्याच्या पुण्याच्या जंगलात तुझ्या गोळीने ठिकर्‍या ठिकर्‍या केल्या होत्या. कधी ना कधी तुला त्याची शिक्षा मी नक्की देईन."
जोसेफला हसू आवरत नव्हते. हा माणूस खरंच वेडा आहे. त्याने सोबत आणलेल्या पिशवीत हात घालून एक वस्तु काढून टेबलावर ठेवली.
"हाच हेर पॅपी?"
टेबलावर हेर पॅपीला बघून डेव्हिडच्या डोळ्यात लगेच पाणी आले. त्याने परत पॅपीला बघण्याची आशाच सोडली होती. त्याने चटकन पॅपीला जवळ घेऊन कुरवाळले. जोसेफने शांतपणे पिशवीतून एक दंडुका काढला आणि त्याचा रट्टा डेव्हिडच्या हातांवर मारला. पॅपी जमिनीवर पडला. डेव्हिडने त्याला उचलून टेबलावर ठेवले. डेव्हिडला काय होतंय याची कल्पना येईपर्यंत जोसेफने दंडुक्याचे असंख्य फटके त्या पोपटावर मारले. पॅपीचा पुरता चक्काचूर झाला होता. डेव्हिड कावराबावरा झाला.
"तुझ्या परतीचे सर्व दोर कापले गेले आहेत डेव्हिड. मोरोक्कोतली तुमची बोलणी फसली आहेत. कीदरलेन तहाच्या कलमांसाठी वाटाघाटी करतो आहे. इतकेच काय आमच्या बर्लिनमधल्या सूत्रानुसार ते तुला अतिरेकी ठरवून हात झटकणार आहेत."
"खोटं, साफ खोटं."
"मी कशाला खोटं बोलेन? डेव्हिड हेच सत्य आहे. तुझी सहकारी एल्सा ती सुद्धा आता या जगात नाही. फणींद्रही पकडला गेला. तुझ्याकडे एकही कामगिरी नाही. तू संपूर्णपणे अपयशी ठरला आहेस डेव्हिड."
"एल्सा? एल्सा मेली म्हणून मी अपयशी कसा? ती माझ्यावर नजर ठेवून होती. ती सुद्धा त्या कीदरलेनच्या बाजूनेच होती. तिला सुद्धा तह करण्यात रस होता. मी तिला कसा काय जिवंत सोडणार होतो?"
जोसेफला जे ऐकायचे होते ते त्याने ऐकले. एल्सा जर्मन हेर होती याचा आणखी काय पुरावा असणार? डेव्हिडला जिवंत ठेवणे एवढेच काम बाकी होते. मॅक्सवेल म्हणत आहेत ते खरे असेल तर डेव्हिड कोणी अतिरेकी, स्वतःच्या लहरीनुसार हिंसक कार्ये करणारा व्यक्ती नसून जर्मन हेर आहे हे सिद्ध करणे अँग्लो-फ्रेंच युतीच्या फायद्याचे होते. आता त्याल युरोपात कसे पाठवायचे हा प्रश्न बाकी होता. पण तो सोडवणे जोसेफची जबाबदारी नव्हती. मागून डेव्हिड मात्र बेंबीच्या देठापासून पॅपीचा बदला घ्यायच्या घोषणा करत होता.

*****

"वेलकम मिस्टर काल्डवेल. मी तुम्हाला भेटायला उत्सुक होतो. तुमचा नोकर, ओह सॉरी, तुमचा वॅलेट आता कसा आहे?"
ख्रिसने आपला संताप मुश्किलीने आवरला. त्याच्या डोळ्यातला अंगार मात्र फणींद्रच्या नजरेतून सुटला नाही. कुत्सित हसत फणींद्रने दीर्घ श्वास घेतला. त्याचे नजर काही क्षण आढ्यावर खिळली.
"कुर्सिआंगची पाने, मध आणि किंचित वेलची." फणींद्रने चहा बरोबर ओळखला होता. ख्रिसचा शेवटाचा कप हाच होता. पुन्हा एकदा फणींद्रने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बरोबर वाचले.
"मी बंगाली आहे ख्रिस. आम्हाला आमचा चहा नाही ओळखू येणार तर आणखी कोणाला येणार?"
"मस्ट से आय अ‍ॅम इंप्रेस्ड! मग तू कोणता चहा पितोस?"
"मी? मला वैयक्तिक दार्जिलिंग चहा आवडतो."
........................
दार्जिलिंगची चव जीभेवर खेळवून पहिला घोट फणींद्रने घशाखाली उतरवला. ख्रिस संपूर्णवेळ त्याच्या डोळ्यांचे निरीक्षण करत होता. त्याच्या बुबुळांमध्ये ख्रिसला विशेष असे काही जाणवले नाही. त्यांच्यात मध्ये मध्ये काळे ठिपके होते.
"अल्काप्टोन्युरिआ"
"सॉरी?"
"तू आजारी आहेस फणींद्र. तुला सांधेदुखीचा त्रास होत असला पाहिजे."
"तुला कसं माहित?"
"१९०८ मध्ये सर आर्चीबाल्ड गॅरोड यांनी आपले संशोधन रॉयल कॉलेज ऑफ फिझिशियन्स समोर मांडले होते. त्यांनी अल्काप्टोन्युरिआ या आजाराविषयी भाष्य केले होते. माझं भाग्य की मला नंतर त्या भाषणाची प्रत मिळाली. शरीरातल्या काही तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो आणि त्यामुळे शरीरावर वेगवेगळ्याप्रकारच्या दृश्य खुणा उमटतात. काळे डोळे ही त्यापैकी एक आहे."
फणींद्र खदाखदा हसू लागला. ख्रिस काही बोलणार त्याआधी त्याने ख्रिसला थांबवले आणि आपला चहा आधी संपवला.
"मला खरंतर हायसं वाटत आहे. आधी मी अशा समजूतीत होतो की मीही त्या सर्कसमध्ये शोभून दिसेन. पण या स्पष्टीकरणानंतर मला थोडं बरं वाटतं आहे. यू नो ख्रिस, वी माईट हॅव बीन फ्रेंड्स. मी हेही बघू शकतो की तू पुण्यात ज्या स्तरावर होतास त्याच्या थोडा वर सरकला आहेस."
"फॅक्ट रिमेन्स, आपण दोघे एकमेकांच्या विरोधात उभे आहोत. तुमची सगळी योजना स्पष्ट झाली आहे फणींद्र. पंचम जॉर्जना लक्ष्य करण्याची धाडसी योजना आखणे येरागबाळ्याचे काम नाही. त्याबद्दल मी नक्कीच तुझं कौतुक करेन. पण धाडस पुरेसे नाही फणींद्र. डेव्हिडला जिवंत ठेवण्यात आमचा काही फायदा तरी आहे. तुझ्याबाबतीत सध्या तरी आमच्या पुढे काही सबळ कारण नाही."
"ओह्ह. म्हणजे मी युगांतर आणि माझ्या संपर्कात असलेले इतर क्रांतिकारक यांची माहिती दिली तर मी जिवंत राहू शकतो तर."
"तू हुशार आहेस फणींद्र. तुला अधिक काही सांगायची गरज नसावी."
"तुही हुशार आहेस ख्रिस. तुला माझं उत्तर सांगायची गरज नसावी."
ख्रिसला ही प्रतिक्रिया अपेक्षितच होती. त्याने सुस्कारा सोडला. जाता जाता तो काही आठवून मागे वळला,
"तू पुण्यात असताना काहीतरी म्हणाला होतास. त्या तिसर्‍या तरूणाला, येस्स त्याला काहीतरी म्हणाला होता."
"मी? मी काय म्हणालो होतो?"
"जंगलचा राजा कोण? सिंह का वाघ? मला माहित नाही पण तिसरा कोणी नाही हे तर नक्की ना? राईट तू पण हाच प्रश्न विचारला होता. जंगलचा राजा कोण? सिंह का वाघ?"
फणींद्रच्या काळोखाने दाटलेल्या डोळ्यात पहिल्यांदाच ख्रिसला काहीतरी जाणवले. जणू एखाद्या गुप्त खजिन्याच्या गुहेवर बसवलेला दगड किलकिला होऊन आत लपलेल्या गुपिताचे पहिले दर्शन व्हावे तसे काहीतरी. फणींद्राचे ओठ विलग झाले पण तो लगेच काही बोलला नाही.
"अं, देखून, आमी .. मी असं काही म्हणालो होतो? उगाच काहीतरी बरळलो असेन मी. कुठे ती बडबड सीरिअसली घेता सर?"
"सिंह का वाघ फणींद्र. मला माहित आहे सर्कसवाले सिंह आहेत. तू कोण?"
फणींद्रचा चेहरा क्षणार्धात कठोर झाला. "तुला माहित नाही तो कशात नाक खुपसतो आहेस."
"मला पूर्ण कल्पना आहे मी काय करतो आहे. तू बहुतेक वाघ आहेस. तुला बहुधा हे माहित नसावं की ते सिंह आणि व्याघ्र अशा दोन्ही पद्धतीने तुमची लिपि वाचू शकतात. त्यांना थांबवण्यात मला रस आहे."
फणींद्र हसला. "सर, शोत्ती आमी चाय आमार बोंधू छिलो. पण आपण खरंच एकमेकांच्या विरोधात आहोत. मला त्या सिंह आणि वाघ प्रकरणात तुला वाटतो तेवढा काही रस नाही. पण जर मी गोळा केलेली माहिती बरोबर असेल तर त्यांना गंगादास हवा आहे. मला पकडण्याचे बक्षीस म्हणून एवढीच माहिती तुला देऊ शकतो."
ख्रिसच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू होते. फणींद्रही मिश्किल हसत होता. या इंग्रजांना खरंच वाटतं की ते मला बांधून ठेवू शकतात?

~*~*~*~*~*~

रुद्रने साधारण अंदाज घेतला. अलाहाबादेत प्रवेश करणे, तेही संग्रामला घेऊन तितके सोपे नव्हते. त्यात त्याला हेही लक्षात आले की काही कारणास्तव या शहरात कडक पहारा आहे. त्यांना अलाहाबादेत येऊन दोनच दिवस झाले होते. एक दिवस तर विश्रांती घेण्यातच गेले होते. त्याची आज चौकशी करायचे त्याने ठरवले. त्या सांकेतिक संदेशानुसार तो गंगादासच्या हवेलीवर पोहोचला. हवेलीला टाळे होते.
"आता रुद्र? आता गंगादासला कुठे शोधायचे?" कालीने विचारले.
"माहित नाही काली. त्याला शोधावं तर लागेल. मला खात्री आहे की आजूबाजूच्या घरांमध्ये चौकशी केली तर नक्की तो कुठे ना कुठे सापडेल."
"अरे भय्या, यहां क्या कर रहे हो?" कोणी एकजण त्यांच्याच दिशेने येत होता. बहुधा आसपास राहणारा असावा.
"जय रामजी की."
"जय रामजी की."
"कोणाशी गप्पा मारत होतात श्रीमान?"
"ते मी ..." काली गायब झाल्याचे रुद्रला लक्षात आले. तिचा चेहरा कोणाला दिसता कामा नये. जवळच असेल कुठेतरी. येईल परत हा गेला की.
"ते मी गंगादासजींना भेटायला आलो होतो. तुम्ही ओळखता त्यांना?"
"नाही जी. हे घर कित्येक दिवसांपासून बंदच आहे. इथे पूर्वी कोणी गंगादास म्हणून राहायचे हे खरं, पण ते आता कुठे राहतात ... अरे हो की. या शहरात दिवोदास म्हणून आहेत. ते इथे कितीतरी वर्षांपासून राहत आहेत. मोठे प्रस्थ! त्यांना नक्की माहित असेल."
रुद्रने स्मित केले. त्याला हवा असलेला दुवा सापडला होता.

*****

नोव्हेंबर १९११
फेज, मोरोक्को

फ्रेंच प्रतिनिधी अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होता. यापेक्षा जास्त वाटाघाटी लांबवणे कठीण होते. मोरोक्कोचा सुलतान तर हातघाईवर आला होता. जोवर हा तह होत नाही तोवर त्याला फ्रेंचाची सैनिकी मदत हव्या त्या प्रमाणात मिळणार नव्हती आणि बंडाळी मोडून काढणे कठीण जाणार होते. फ्रेंच प्रतिनिधीला फक्त एकाच बातमीची आवश्यकता होती. भारतात नक्की काय घडले आहे? आणि अगदी वेळेत त्याला हवी असलेली तार मिळाली.

"जर्मन हेर मारला गेला. त्याला मारणार्‍या भारतीय क्रांतिकारकाचा शोध सुरू."

त्याला पुढचा संदेश वाचण्याची गरज नव्हती. आता जर्मनीवर आणखी दडपण आणणे शक्य नव्हते. कीदरलेनसोबत शेवटचा एकदा अटींचा आढावा घेतला गेला. जर्मनीने मोरोक्कोमधले फ्रेंच प्रभुत्व आणि त्यांचा अधिकार यांना मान्यता दिली आणि मोरोक्कोतून काढता पाय घेतला. त्याखेरीज चाडमधील काही प्रदेश फ्रेंचांना मोकळा करून दिला गेला. जर्मन पाणबुडी मोरोक्कोच्या आखातात असताना गरज पडल्यास आपले आरमार सुसज्ज ठेवून आणि फ्रान्सला पाठिंबा देऊन स्पेनने मोलाची मदत केली होती. त्या बदल्यात उत्तर मोरोक्कोचा काही हिस्सा स्पेनच्या प्रभाव क्षेत्रात आला जो पुढे मोरोक्को स्वतंत्र होईपर्यंत स्पॅनिश मोरोक्को म्हणून ओळखला गेला.
प्रशियाला, म्हणजेच पर्यायाने जर्मनीला, फ्रेंच कांगो मधला विस्तीर्ण भूभाग मोकळा करून देण्यात आला. जर्मनीच्या कॅमेरूनमधल्या वसाहतीला हा भूभाग जोडून असल्याने पश्चिम आफ्रिकेत निरंकुश वावर करण्यास त्यांना मुभा मिळाली. इतर युरोपीय राष्ट्रांनीही या तहाचे पडसाद बघून विविध करार केले. ४ नोव्हेंबर १९११ रोजी या अटींना मंजुरी मिळाली. तर प्रत्यक्ष करारावर सह्या ३० मार्च १९१२ रोजी करण्यात आल्या.

मोरोक्कोतली परिस्थिती मात्र पुढची कित्येक वर्षे सुधारली नाही. फेजमध्ये पुढच्याच वर्षी पुन्हा बंडाळी माजली. मोरोक्कन क्रांतिकारकांनी महायुद्धानंतर १९२१ मध्ये स्पेनविरुद्ध बंड पुकारले जे जवळ जवळ सहा वर्षे चालले. त्यांनी सुलतानाला पदच्युत करून अल्पकाळ आपले गणतंत्र स्थापन करण्यात यश मिळवले. पण लवकरच फ्रेंच आणि स्पॅनिश सैनिकांनी पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मोरोक्कोला पूर्ण स्वातंत्र्य मिळण्याकरिता १९६१ साल उजाडावे लागले.

मोरोक्कन क्रायसिस, आणि पर्यायाने एक मोठे युद्ध, टाळण्यात यश आले होते. पण ब्रिटनच्या चिंता अजून मिटल्या नव्हत्या. डेव्हिड ठार झाला पण फणींद्र निसटला होता.

पंचम जॉर्ज यांच्या भारतातील आगमनाला तीन आठवडे बाकी.

~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66361

Group content visibility: 
Use group defaults

एकदम मस्त!!!
किती वेगवान कथानक आणि सर्व दुवे जोड्लेले...

एकदम भारीच !

मस्त मस्त मस्त !!!
पायसा.... मित्रा, काय सुरेख आणि वेगवान कथानक आहे हे... एकदम नाट्यपुर्ण! मुळात जर्मन भाषा करियर म्हणुन निवडताना आम्हाला केवळ भाषा च नाहि, तर त्या अनुषंगाने ऐतिहासिक, भौगोलिक, राजकिय घडामोडि ह्या सगळ्यांचा हि अभ्यास करणे अपेक्षित असते, त्या मुळे तुझ्या ह्या कथानकातल्या ह्या सगळ्या बाबीं शी छान को-रिलेट करता येते आहे.

-प्रसन्न

हा ही भाग छान.

बंगाली वाक्य लिहिताना कंसात त्याचा मराठी अर्थ पण लिहा ना. मला तरी बंगालीचा काहीच गंध नाही त्यामुळे काहीतरी मिस होतंय असं वाटत राहतं.

प्रसन्न प्रतिसाद आवडला Happy काही जर्मनच्या चुका झाल्या असतील तर जरूर सांगा.

तर त्या अनुषंगाने ऐतिहासिक, भौगोलिक, राजकिय घडामोडि ह्या सगळ्यांचा हि अभ्यास करणे अपेक्षित असते >> +१ तुम्ही केवळ एक नवीन भाषा शिकत नाही तर एक नवीन संस्कृती समजून घेत असता.

बंगाली वाक्य लिहिताना कंसात त्याचा मराठी अर्थ पण लिहा ना. >> निधि आता बदल करणे सयुक्तिक वाटत नाही आहे. पण तुम्हाला कोणते वाक्य समजले नसेल तर कळवा. मी प्रतिसादांत त्याचे अपेक्षित भाषांतर देईन.