चिरुमाला (भाग ६)

Submitted by मिरिंडा on 8 June, 2018 - 06:46

मी घरात शिरलो. साडेसहा झाले होते. सूर्य मावळतीला चालला होता. जुडेकरने बॅग ठेवली आणि तो निघाला. तो परत आठ वाजेपर्यंत डबा घेऊन येणार होता. तो गेला आणि मी उघड्या दिसणाऱ्या संधिप्रकाशाकडे पाहत राहिलो. कपडे बदलून फ्रेश होऊन मी परत दिवाणावर बसलो. प्रथम मी थंडपेयाची एक बाटली उघडली. शांतपणे पेय्य रिचवीत राहिलो. मला परत एकदा संध्याकाळच प्रसंग आठवला. कोण हा शितोडीकर. माझ्या पहिलयाच दिवशी भांडण करून जाणारा. खरंतर ते एकतर्फी भांडण होतं. मी फारसा प्रतिसाद न दिल्याने ते वाढले नाही आणि म्हणूनच त्याला जास्त राग आला असावा. माझ्या डोक्यातून तो जाईना. मग मी सकाळचे राहिलेले काम पुरे करण्याचे ठरवून लाकडी जिन्याने वर निघालो. सर्व जोर एकवटून मी जिन्यावरच्या दरवाज्याची कडी काढली आणि दरवाजा उघडला. थोडासा कुबट वास आणि धूळ मिश्रीत मातीचा भपका आला. मी डाव्या बाजूला वळलो. बाजूच्याच भिंतीमध्ये एक अर्धवट खिडकी उघडी होती. ती बहुतेक बाजूच्या भागातील कॉरिडॉर मध्ये उघडत होती. मी ती ढकलून पाहिली. पण ती उघडेना मग लक्षात आलं तिला तार खिळवून ती बांधली होती. असो. अर्धवट पडलेल्या मंद संधिप्र्काशात पलिकडचा भाग दिसत होता. तिथेही जिना असावा पण तो लहान आणि पायाखाली बसवलेल्या दरवाज्यापुरता मर्यादित असावा. नक्कीच तिथे दरवाजा होता. पण खालच्या खोल्यांमध्ये जाणारा की आणखीन कुठे .......? मला अंदाज येईना मी डोळे फाडून पाहत होतो. तो तो काळोखाच्या भरण्यामुळे कमीत कमी दिसत होते. मग पुन्हा एकदा सुट्टीच्या दिवशी वर येऊन पाहण्याचे मी ठरवले. वाड्यात कोठेच काही आवाज नव्हता........... माझ्या पायांचा आवाज सोडून . माझ्या बरोबर आणलेले दूध मी एका थंडपेयाची बाटली विसळून त्यात भरले. आणि किचनमधल्या ओट्यावर ठेवून आलो. लाईट लावला. आणि दिवाणावर पडून राहिलो. आता काय करायचं ? रोजचं जेवण जुडेकरला सांगणं योग्य नव्हतं. एखादा तरी स्टोव्ह आणि केरोसिनचा डबा आणावा लागणार होता. .......बाहेर पुन्हा पावसाने झिम्मा खेळायला सुरुवात केली . जुडेकरला उगाचंच आपण हो म्हंटलं. असं वाटलं. पण मग मी जेवणाची काय व्यवस्था करणार होतो .......? काही नाही . हेच उत्तर पुन्हा पुन्हा आदळतराहिलं. तरीही मला कोणत्याही दृष्टीने , आपण ही बदली उगाच स्वीकारली असे वाटले नाही. अजून तरी मला आशा होती. आजपर्यंतच्या बदल्यांमध्ये सुद्धा प्रतिकूल परिस्थिती होती. पण अगदी जेवणाची पंचायत व्हावी असं कधी घडले नाही. माझा तेवढ्यात डोळा लागला. फक्त पंधरा वीस मिनिटंच झाली असतील . मी जागा झालो तो मुख्य दरवाज्याची कडी वाजल्याने . धपडत उठून मी दरवाजा उघडला. जुडेकरच आला असणार याची खात्री असल्याने मी परत दिवाणाकडे वळलो. जुडेकरचा आवाज न आल्याने मी पुन्हा वळलो. पाहतो तर काय, बाहेर एक खेडूत माणूस उभा होता. रात्रीच्या अंधारात त्याचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. डोक्यावर तरटाच्या पिशवीसारखं काहीतरी ओढलेलं. अर्धी चड्डी घातलेला तो माणूस , त्याच्या हातात विळा होता. म्हणजे मासे सोलायचा. माझ्या कडे पाहून तो विचित्र हसला. प्रथम माझी प्रतिक्रिया दरवाज्या बंद करण्याची झाली. " सायेब, हितं राह्य्ला आला जनू तुमी . मच्छी गावली नाय म्ह्नूनशान हितं शिरलो. म्हंनलं वाईचं थांबावं. तसा मी हितं येत न्हाई. " आता मी भानावर आलो. त्याला आत यायला सांगावं का याच विचार करीत राहिलो. तो आत न येताच म्हणाला, " काय हाय ना , हा भुताटकीचा वाडा हाय. तुमी कसं काय ऱ्हाताय काय कळना मला. ........." तो थांबला आणि म्हणाला, " हितं बसू का ? ...... " मी काही बोलायच्या आतच त्याने बाहेरच बसकण मारली. तो सारखा आत बघत होता. माझं न बोलणं आणि सतत त्याच्याकडे पाहत राहणं यांने तो थोडा घाबरल्यासारखा दिसला. त्याने मग विडी काढली आणि ती शिलगावून तो झुरके घेत बसला. तेवढ्यात पोर्चमध्ये शिरणारा जुडेकर दिसला. त्याच्या हातात डबा होता. त्याने खेडुताला बसल्याचे पाहिले आणि तो एकदम रागाने त्याला म्हणाला, " ए चल , चल नीघ इथून " मग माझ्याकडे वळून म्हणाला, "अवो , साहेब असं कोणालावी घेऊ नका घरात. " त्या माणसाने धडपडत डोक्यावर तरट टाकलं आणि तो गेटामधून बाहेर पडला.

तीन चार दिवस असेच गेले. यथावकाश स्टोव्ह आणि केरोसिनचा डबा आला. एक दोन चादरी
आणल्या. सध्या पावसामुळे म्हणा किंवा अतिशय खुलं वातावर्ण असल्यामुळे म्हणा , जबरदस्त वारा वाहायचा , थंडीही वाजायची. मी थोडा
वाड्याला रुळल्यासारखा झालो. आणि कदचित वाडा मला. पण वाडा तटस्थ होता. अजूनही घरातल्या भिंती काहीही प्रतिक्रिया देत नव्हत्या. म्हणजे कसं आहे . आपल्याला घराच्या भिंतींची कधी जाणीव होते का ? नाही ना ? इथे तसं होत नव्हतं घरात शिरल्यावर कुणातरी अज्ञात आणि परक्या वातावरणात आपण जगत असल्याची भावना मला येत होती. अर्थात मला अजून आठवडा होत होता. .......मी बँकेत जात होतो. लीनाचे सारखे फोन आणि सूचना येत होत्या. मी न कंटाळता त्याना प्रतिसाद देत होतो. माझ्या इच्छेप्रमाणे मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना नवीन माती टाकून काही झाडं , तुळस वगैरे लावली गेली . लीना यायच्या आत तिला आवडेल असं वातावरण मला तयार करायचं होतं. वाड्याचं शक्यतोवर जुनाट रूप घालवून सहन होईल इतपत तरी रुप बदलायचं होतं. फक्त मी अजून वाड्याच्या मागच्या बाजूला गेलो नव्हतो. मी जुडेकरला शनिवारी रात्री राहाय्ला बोलावले. तो आधी नाही म्हणत होता. पण माझा फार आग्रह दिसल्याने तो तयार झाला. अजून तरी गाडी मिळण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे रोज जुडेकर येत जात असे. हळूहळू जुडेकर शिवाय मला चैन पडेनासे झाले. त्याच्या बायकोचा डबा चालूच होता. मी जुडेकरला काहीतरी भेटवस्तू देण्याचे ठरवले. गॅसचं काम अजून चार दिवस तरी होणार नव्हतं. ते पुढल्या आठवड्यावर गेलं. शनिवार उजडला. मी बँकेत गेलो. तशी बँकेत फार गर्दी कधी नसायचीच. त्यामुळे फार कॅश जमत नसे. आज बाथरूम संडास नीट करून घ्यायचे असल्याने प्लंबरला घेऊन येण्यास जुडेकरला सांगितलं. जुडेकर डबा घेऊन येणार होता. आज प्रथमच मी स्वतः चालत घरी आलो. मला माझ्या कपडे धुण्याची आठवण झाली. मी त्याप्रमाणे कपडे भिजवले. मग माझी पँट जी मी इकडे येताना घातली होती. सवयीप्रमाणे मी सगळे खिशांमध्ये हात घालून पाहिलं. एका खिशात मला कागदाच बोळा लागला. मला स्वतःची लाज वाटली. शाळकरी पोराप्रमाणे मी खिशात कागदाचा बोळा घुसडला होता. मला येऊन आता जवळ जवळ चार पाच दिवस झाले होते. मी कुतुहल म्हणून बोळावजा कागद बाहेर काढले. ते एक बंद पाकीट निघाले. मग मला एकदम आठवले. मी आधी त्या पाकीटाच्या मागचे पुढचे भाग पाहिले. पण ते कोणी पाठवल होत हे कळत नव्हतं. मी ते उघडल. त्यात अर्ध्या वहीच्या पानाचा घडी घातलेला कागद निघाला . आत फक्त एकच वाक्य लिहिलेले आढळले. "का जातोयस तू वाड्यात............? खाली सही नाही काही नाही. मागची बाजू पाहिली . तिथेही काही लिहिलेल नव्हतं. मी त्याचा वास घेऊन पाहिला. पण तसा काही वास वगैरे आला नाही. मी पुन्हा पुन्हा विचार करू लागलो. कोणी लिहिले असेल ? गोळेनी तर नाही ? (गोळे मांत्रिक होता ) पण इथे यायच्या आधीची ती चिठ्ठी होती . मी सध्या चिठठी दिवाणावर ठेवली . कपडे भिजवले. जेवणाचा डबा यायला अजून बराच उशीर होता. अजून दिवस नीट मावळला नव्हता. आता मला नदीबद्दल कुतुहल नव्हतं की वाड्याच्या वातावरणाबद्दल. मी दिवाणावर पडून राहिलो. मग मी उठून खालच्या दोन खोल्या उघडून पाहायच ठरवल.

पहिल्या कमानीखालून गेल्यावर लागणाऱ्या पहिल्या खोलीचे कुलुप लवकरच उघडले. दरवाज्या
नेहेमीप्रमाणे बराच जोर केल्यावर उघडला. माझ्या डाव्या बाजूला असलेली खिडकी बंद असून मोठी होती. इथे प्रत्येक खिडकी मोठी होती.
बंगल्याचे डिझाइन करणाऱ्याला खिडक्यांबद्दल विशेष प्रेम असाव अस दिसल. फक्त या काचा साध्या म्हणजे पारदर्शक होत्या. कदाचित नंतर
लावलेल्या असाव्यात. तिथून येणाऱ्या संधिप्रकशात आत एक मोठा म्हणजे प्रचंड आकाराचा बेड दिसला. ज्याचं नक्षिकाम वेगळंच होतं. त्यावर
टाकलेल्या गाद्या मात्र बऱ्याच जुन्या होत्या. बेडच्या एका बाजूला एक भला मोठा आरसा होता. सगळं फर्निचर कसं चॉकलेटी काळया रंगाचं असावं. बेडवर मच्छरदाणी लावण्याही सोय होती . त्याच्या दुसऱ्या बाजूला एक विचित्र तोंडाचा पक्षी होता‍. ज्याच तोंड घुबडासारखे होत आणि त्याचा एक पाय वर उचलेल्या आणि मारण्याच्या पवित्र्यात होता. त्याच्या चोचीच्या आत दात असावेत. पक्षाचे पंख पसरलेले होते. तो जवळ जवळ दीड ते दोन फूट उंचीचा होता. मी त्याचे निरिक्षण करणयात गुंतलो होतो. हळूहळू संधिप्रकाश कमी होत होत लालसर पिवळा झाला. आतल्या सगळ्याच वस्तूंवर एक प्रकारची गूढ छाया पसरली. गाद्या नक्की किती जुन्या होत्या कुणास ठाऊक त्याही मला नवीन करून घ्याव्या लागणार होत्या. मी खोलीतून बाहेर आलो. येताना सहज लक्ष गेले . बेड समोरच्या भिंतीवर एक दरवाज्या होता. तो कुठे जात होता कुणास ठाऊंक . मी तो सध्या न उघडण्याचं ठरवलं. ............. खोलीतून बाहेर आल्यावर मी परत दिवाणावर बसून एक थंडपेय्याची बाटली उघडली. आजकाल मी थंड पेय्यच्या बाटल्या आणि बिसलेरी पण आणित होतो. पुन्हा इकडे तिकडे वेळ घालवून मी सरदारांच्या चित्राकडे पाहिले. त्यांच्या नजरेतला क्रुद्धपणा तसाच होता. मी तिकडे दुर्लक्ष करून कीचनमध्ये गेलो. मंद होत जाणाऱ्या संधिप्रकाशात मला विहिरीवरच वड वाऱ्यामुळे गदागदा हलत असल्याचे दिसत होते. अर्धवट उघड्या खिडकीतून वारा वेगान आत घुसत होत. मी लाइट लावला. पुन्हा भिंतींकडे पाहिले . त्यांचा रंग जसाच्या तसाच बुरसटलेला काळसर होता. इथे झोपेपर्यंत वेळ घालवणं कठीण होतं. कीचनमधला लाइट तसाच ठेवून मी हॉलमध्ये आलो. समोरच्या एक दोन खुर्च्यापण मी साफ केल्या होत्या. त्यावर बसून मी माझ्या बॅगेतली डायरी काढली. मला डायरी ठेवायची जुनी सवय होती. मी दिवाणावर पडलेली चिठ्ठी उचलून डायरीत ठेवली आणि डायरी लिहायला घेतली. मोबाईलच्या सहाय्याने काही फोटो पण काढले. बाहेर चांगलाच काळोख पडला होता. घरात बसण्या पेक्षा बाहेर फेरी मारून यावं असा विचार करून मी छत्री (नवीन घेतली होती बरं का )घेऊन दार उघडले. पाऊस दमल्यासारखा थांबला होता. समोरचं काहीच दिसत नव्हतं. तरीही मी तसाच बाहेर पडलो. पोर्चच्या उजव्या बाजूने बाहेर पडलो. अंगावर थंडगार वारा आला. ओलसरपणामुळे तो सुखावह वाटला. मग मी शिवमंदिरापर्यंत गेलो. आतल्या पिंडीवर काहीही परिणाम दिसला नाही. ती जशी होती तशीच दिसली . किती वर्षांपासुन ती तिथे होती कुणास ठाऊक. माझी नजर सहज वाड्याकडे गेली. जो भाग मला भाड्याने दिला नव्हता. तिथल्या बाहेरच्या बाल्कनीसारख्या भागात बांबूचे जुनाट फर्निचर भरून ठेवले होते. तिथे असणारे दोन दरवाजे आणि खिडक्या जेमतेमच दिसत होत्या. त्या मजल्यावर मात्र कळसासारखा भाग होता. त्यावर ध्वज लावण्याची काठी असावी असे वाटले. सर्वच वातावरणात एक प्रकारची तटस्थता आणि निर्जिव पणा भरून राहिला होता. या सर्व वातावरणात जिवंतपणाची माझीच हालचाल असावी असे दिसले. मी माघारी वळलो. घरात परत आलो. आणि कीचन मध्ये गेलो. तिथला लाइट मी तसाच ठवला होता. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्याने मी डायरी लिहायला घेतली. अर्धा तास तसाच गेला. तेवढ्यात कडी वाजली.. घाईघाईने मी दरवाज्या उघडला. बाहेर जुडेकर उभा होता. तो आत आला.

त्याने आणलेला डबा मी उघडला. तो दोघांसाठी होता. अर्ध्यातासात आमची जेवणं झाली. मग त्याने बाहेर जाऊन सिगारेट ओढली. मला सवय नसल्याने म्हणा किंवा माझा मान राखण्यासाठी म्हणा त्याने तसे केले असावे. तेवढ्यात माझा मोबाइल
वाजला. लीनाचा फोन होता. औपचारिक बोलणे झाल्यावर तिने मला एक घटना सांगितली. आजच संध्याकाळी एक भिकारी आला होता.त्याच्या अंगावर अक्षरशः चिंध्या होत्या. हातात सापाच्या आकाराची काठी होती. आणि त्याचे डोळे खूप खोल गेलेले दिसत होते. जिवंतपणाची थोडीशी खूण दाखवणारे डोळे मात्र अमानवी वाटत होते. त्याच्या हातात झोळी होती. त्याला भिक्षा घातल्यावर त्याने झोळीमधून तांदुळाचे दाणे आपल्या घरावर टाकले आणि काहीतरी पुटपुटत तो निघून गेला. तिला भीती वाटल्याचे ती म्हणाली. फोन बंद झाल्यावर माझ्या विचलित झालेल्या मुद्रेकडे पाहत जुडेकर म्हणाला, " काय झालं सर ? काही गंभीर आहे का ? " मी उडवून लावत त्याला म्हणालो, " जुडेकर उद्या बरीचशी कामं व्हायला हवीत. मग आम्ही दोघांनी मिळून उरलेल्या दोन्ही खोल्या उघडल्या. पण त्याही पहिल्या खोलीसारख्याच होत्या. दोन्ही कडे तोच प्रकार होता. उद्या त्याही साफ करवून घेण्याचे ठरवले . लीनाचा अनुभव जर त्याला सांगितला असता तर त्याने त्याचा कदाचित वेगळाच अर्थ काढला असता. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आम्ही दोघेही उशिरा उठलो. आमचा चहा वगैरे होईपर्यंत प्लंबर आणि सुतार येऊन उभे राहिले. ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. तसे मी जुडेकरला सांगितलेही . पण त्याने लक्ष न देण्यचे सुचवले. मध्यंतरी जुडेकरची बायको आली. ती स्कर्ट घातलेली एक टिपिकल ख्रिश्चन महिला होती. मध्यम वयाची ती स्त्री आल्याबरोबर तिने आवरा आवरीला सुरुवात केली. तासाभराच्या आत हॉलला आणि एकंदर जागेलाच राहण्यासारख्या जागेचे स्वरूप प्राप्त झाले. जुडेकरने आजच्या दिवसात बऱ्याच गोष्टी साधल्या होत्या. कीचन मध्ये ही एक दोन लाकडाच्या मांडण्या तयार करून घेतल्या. आता फक्त गॅसची सोय
व्हायला हवी होती. जुडेकरच्या बायकोने स्वैपाक केला होता. पुष्कळसा आपल्या घरच्यासारखा केला असल्याने जेवणाने समाधान मिळाले.
गावातली शाळा मिशनरी असल्याने जुडेकरच्या मदतीने शाळा प्रवेशाचे कामही सोपे झाले. जुडेकर देवासारखा धावून आला होता हेच खरे.
असो, संध्याकाळच्या सुमारास एक विचित्र घटना घडली. कामगार गेलेले होते. जुडेकरही जाण्याच्या तयारीत होता. त्याचे व त्याच्या बायकोचे मी परत परत आभार मानले. ते निघणार तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. आणि एक कुठूनसे ,काळी टोपी आणि काळी कफनी घातलेले ,फकीर बाबा "अल्ला ..... असे मोठयाने ओरडत , हातातली चमत्कारीक आकाराची काठी आपटत थेट पोर्चमध्ये घुसले. जुडेकरलाही ते आवडले नाही. ते मला पाहून म्हणाले, " बच्चा , तू यहां रहने आया, सम्हलके रहना, ये जगा रहनेलायक नही है. फिर भी मै तुम्हे ये उदी देता हूं , जो शाम इसी वक्त आगमे डालना फिर करिश्मा देखना. सारी तकलिफे दूर होगी. तेरे बाल बच्चे और बिवी छे महिनेके बाद दुखी होंगे. समझे ? " असे ओरडून जाऊ लागले. मी त्यांना आणखी काही विचारणार होतो. पण ते " अभी कुछ नही बताउंगा , अभी कुछ नही बताउंगा असे मोठ मोठ्याने ओरडत नदीच्या दिशेने निघून गेले. मग जुडेकर मला म्हणाला, " सायबानू, ह्ये मनावर घेऊ नका हां. असलं कायपन होत नाय. आनी ती उदी वापरू नकासा उगा तकाटा कशापायी. " असे म्ह्णून ते गेले. मी त्यांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिलो. ते गेले आणि अचानक मला एकटे वाटू लागले.

(क्र म शः )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

खुपच लेट करता तुम्ही लवकर भाग टाका पूढचा.

टंकलेखन करायला बसलं की वीज मंडळ माझ्यावर मेहेरबानी करीत आहे. त्याला मी काय करणार ? असं गेले पाच सहा दिवस होत आहे. तर कधी संगणक संप पुकारतात.

खरे आहे. महाराष्ट्रात वी.कपात आहेच.. असो..

वी.मं. मे.बान होवो अन पुढचे वाचायला मिळो... मस्त चाललीये कथा.. अजून काही अंदाज येईना..