जेंव्हा माझे लेख चोरीला जातात

Submitted by हरिहर. on 8 June, 2018 - 06:05

देहूतील ब्रम्हवृंदातील 'सालोमालो' हे बऱ्यापैकी बडे प्रस्थ. छान वाडा-हुडा, पैसा-अडका असलेली व्यक्ती. साहित्याची ऊत्तम जाण. आवडही. पण या सालोमालोंना काही सरस्वती प्रसन्न होईना. त्यांना फार वाटे की संस्कृतात श्लोक रचना करावी, प्राकृतात काव्यरचना करावी. पण त्यांना काही ते साधेना. हजार प्रयत्न करुनही सालोमालोंच्या काव्यात ओढाताण केलेली जाणवे. सफाईदारपणा, सहजता काही येईना. कालांतराने सालोमालोंच्या लक्षात आले की आपल्या नशिबी काही काव्यलेखन नाही. आपल्याला फक्त लक्ष्मीच प्रसन्न करुन घेता येते, सरस्वती नाही. पण सालोमालोंचा अंतरात्मा काही त्यांना चैन पडू देईना. मग त्यांनी 'लक्ष्मीच्या' मदतीने 'सरस्वतीला' वश करायचीच असे ठरवले. त्याच काळात देहूगावात तुकाराम आंबिले नावाचे गृहस्थ विठ्ठल भक्ती करीत. विठ्ठलाचे गुणगान गाताना त्याच्या तोंडातुन अभंगा मागून अभंग बाहेर पडत. समाजातील दांभीकता पाहून त्यांचा अभंग आसुड होई, नाठाळाला पाहून त्यांचा अभंग काठी होई. फार रसाळ, गोड, अर्थपुर्ण अभंग असत त्यांचे. पण हे तुकोबा फार भोळे. अभंग लिहून मोकळे होत. मग सालोमालोंना छान कल्पना सुचली. तुकोबांनी एखादा अभंग रचला की तो येनकेन मार्गाने सालोमालो मिळवायचे. आणि जेथे 'तुका म्हणे' असे ते खोडून 'सालो म्हणे' लिहित व हा अभंग आपलाच आहे असे सांगत. आपल्या चोपडीत सुवाच्च अक्षरात लिहून ठेवीत. लोकांना काय खरे व काय खोटे हे कळे. पण सालोमालोबरोबर वैर कोण घेणार? तुकोबा तर अशा बाबतीत फार ऊदासीन. असे होता होता सालोमालो महाशयांनी तुकोबांचे असंख्य अभंग चोरले. मध्यंतरीच्या काळात तुकोबांना रामेश्वरभट्टांच्या आदेशावरुन 'गाथा' ईंद्रायणीत बुडवायची आज्ञा झाली. सालोमालोला प्रचंड आनंद झाला. यथावकाश 'गाथा' ईंद्रायणीला अर्पण झाली. तुकोबाही काही काळाने वैकुंठाला गेले. अनेक वर्षे ऊलटली. आणि मग तुकोबांच्या गाथेचे संकलन करायची कल्पना पुढे आली. काम सुरु झाले. पण तुकोबांचे अनेक अभंग काही मिळेनात. अनेक गहाळ झालेले. अनेक विस्मृतीत गेलेले. काय करावे हा प्रश्न संकलनकर्त्यांना पडला. ईतक्यात 'सालोमालोंची चोपडी' प्रकाशात आली. आणि तुकोबांचे असंख्य अभंग क्रमवारीने सापडले. जर सालोमालो नसते, त्यांनी ते अभंग चोरले नसते तर आज आपण तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांना मुकलो असतो. धन्य ते सालोमालो आणि धन्य त्यांची वाङगमयचोरी.(पहा, या त्रासातुन तुकोबा सुद्धा सुटले नाहीत. असो.)
पण आजकाल 'सालोमालो’चे नाव जरी माझ्या कानावर पडले तरी मला तुकोबांची पुढील ओळ आठवते
तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा॥

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीलंय.
तुकारामांनी कॉपी राईट टाकायला हवा होता. त्या काळी कॉपी पेस्ट आणि व्हॉटसप शेअर नव्हतं. सालोमालो ने इतके अभंग उतरवून घेईपर्यंत कळलं असतं.
तसेच त्याकाळी वॅक्स कोटेड कमलपत्रांवर लिहीण्याची पद्धत असती तर अभंग बुडून पण डाटा रिकव्हरी जमली असती Happy

तसेच त्याकाळी वॅक्स कोटेड कमलपत्रांवर लिहीण्याची पद्धत असती तर अभंग बुडून पण डाटा रिकव्हरी जमली असती Happy >>+१११११११११ Happy Happy

छान लेखप्रपंच. Happy
संत तुकारामांच्या बाबतीतही साहित्यचोरी झाली होते, हे नवलच आहे. माझ्यासाठी नवीन माहिती आहे ही. Happy

स्वतःची तुलना संत तुकारामांशी करणे इज अ बिट मच। >>>

माबोवर एक वाक्य सुद्धा पूर्ण मराठीत न लिहिणे हे सुद्धा फारच होतंय हं !

लेखनचोरी बद्दल लिहिलंय ते ठीक आहे. पण सालोमालो, तुकारामांचे अभंग हे सगळं खरं आहे? >>>

हो हे खरे आहे. तो अभंगातले 'तुका म्हणे' काढून तिथे 'सालो म्हणे' लिहित असे. "तुकोबांनी केलेले अभंग त्यांचे नसुन माझेच आहेत" असेही सालोमालो म्हणत असे. तुकोबांनी याचा ऊल्लेख आपल्या अभंगात केला आहे.

सालोमालो हरिचे दास।म्हणऊन केला अवघा नास।।
अवघें बचमंगळ केलें। म्हणती एकाचे आपुलें।
मोडूनि संतांची वचनें। करिती आपणां भूषणें॥

छान लिहिलेय. जिथे तुकोबाही साहित्यचोरांपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत तिथे सामान्य लोकांचे काय...

प्रभातच्या संत तुकाराम चित्रपटातही सालोमालो आहे व तो तुकारामाच्या तुका म्हणे ला खोडुन सालो म्हणे लिहिताना दाखवलंय.

त्यातला सालोमालो असलेला एक प्रसंग तर तुफान विनोदी आहे. तुकारामाची बायको जिजा ताप आलेल्या मुलाला घेऊन देवळात जाते. देवळात सालोमालो कीर्तन करत असतो.
प्रचंड आवेशात एका हातात मुलाला धरून ती देवळाच्या दाराच्या आत पाऊल टाकते आणि त्याच वेळी सालोमालो आवेशात कीर्तन करत मागे सरकत येतो. भल्या भक्कम जिजेचा आवेश बारकुंड्या सालोमालोपेक्षा इतका जास्त असतो की तो जिजेवर आपटून rebound होऊन उलट उडतो. जिजा इतक्या आवेशात की तिला तशीच आत जाते. हा प्रसंग आठवला की कायम तुफ्फान हसू कोसळते.

…आणि आवली (जिजा) विसरलेला जोडा न्यायला परत फिरते तेंव्हा सालो कसला दचकला आहे!! सालोमालोचे सगळेच प्रसंग फार विनोदी घेतले आहेत. तो लेखणीकाला अभंग ऊतरवून घ्यायला सांगतो तेंव्हा चुकून 'तुका म्हणे' म्हणून जातो पण लेखणीक मात्र बरोबर 'सालो म्हणे' लिहितो, सालोमालो नायकिणीच्या वाड्यात बसलेला असताना त्याचा मुलगा त्याला बोलवायला येतो तो प्रसंग "बाबा आई..." येवढे म्हटल्यावर सालोमालोची कसली तंतरली आहे! आठवून सुध्दा हसू आवरत नाहीए. सालोमालोची भुमिका केली त्यांचे नाव बहूधा भागवत होते आणि जिजाची भुमीका केली त्यांचे नाव गौरी.

म्हणजे सालोमालोने अभंग चोरल्याने आताच्या पिढीत तुकोबांचे अभंग पोहोचले.

पण बाय एनी चान्स त्यात सालोमालोचा स्वत:चा अभंग नसू शकतो का?
मला वाटते यावर संशोधन व्हायला हवे. भले सालोमालो चोर असेल, पण एखादा जरी अभंग त्याचा असेल तर त्याला त्याचे श्रेय मिळायला हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

सालोमालो व्यतिरिक्त तुकारामांचे अभंग इतरांना देखील मुखोद्गत होते .
गाथेत इतरांचे अभंग देखिल तुकारामांच्या नावाने घुसडण्यात आले असाही एक प्रवाद आहे .

@भन्नाट भास्कर आणि दत्तात्रय साळुंके,
खरं तर येथे मी सालोमालो रुपक म्हणून वापरलाय. पण सालोमालोचे अभंग गाथेत आलेच नसतील असे नाही. काही जनांनी तर जाणीवपुर्वक आपले अभंग 'तुकारामांचे' अभंग म्हणून गाथेत घुसवले आहेत. तसे अनेक प्रक्षेप गाथेत दिसले आहेत. अर्थात अनेकदा चाळणी लावून असे अभंग वेगळे केले गेले आहेत पण शंभर टक्के शुध्दतेची खात्री कशी देणार?
तुकाराम महाराजांचे अभंग दुसऱ्याच्या नावावर टाकणे काय किंवा दुसऱ्यांचे अभंग तुकोबांच्या नावावर खपवने काय, दोन्ही गोष्टीत तुकोबांवर अन्यायच होतो. ज्ञानेश्वरीबद्दलही असाच वाद आहे. (मी येथे लिहायचा विचार करतोय त्यावर) ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर आणि अभंग रचणारे ज्ञानदेव या दोन भिन्न व्यक्ती होत्या असा एक मतप्रवाह आहे. असो. तुम्ही म्हणता तसा संशोधनला भरपुर वाव आहे. तसे ते होतेही आहे.
प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद!

म्हणजे सालोमालोने अभंग चोरल्याने आताच्या पिढीत तुकोबांचे अभंग पोहोचले.
<<
लोकहो,
यालेच चिमित्कार म्हंतेत.
पाण्यात बुडवलेली तुकारामाची गाथा स्वतःहून वर कशी तरून आली?
तर अशी.

याच नियमाने,
सदेह स्वर्गात जायासाठी इमान कसे आले?
तर...

असो.

पाण्यात बुडवलेली तुकारामाची गाथा स्वतःहून वर कशी तरून आली?
तर अशी.
>>>>>
ओके. तसेही मला त्या भाकडकथांचा रागच येतो. संताच्या नावावर चमत्कार खपवणे आणि बळेच दैवत्व लादणे. हा त्यांच्या विद्वत्तेचा वा सामाजिक कार्याचा अपमानच आहे आणि त्याचे श्रेय दैवी चमत्कारांना देणे अन्यायकारक आहे.

शाली, ज्ञानेश्वरांबद्दलही शक्य झाल्यास लिहा. त्यानिमित्ताने ईतरही भर टाकतील. आमच्याही माहीतीत भर पडेल

गाथा गंगेने (ईंद्रायणी) तारली म्हणजे लोकगंगेने तारली या अर्थाचे “तुका म्हणे आता” नावाचे नाटक पुलंनी लिहिले होते. फक्त तिन प्रयोग झाले त्याचे. लोकांनी दुर्लक्ष केले नाटकाकडे.

@आ.रा.रा.
फक्त सालोमालोमुळे सगळी गाथा लोकांपर्यत पोहचली असे नाही. बरेचसे अभंग त्यांच्यामुळे मिळाले. अनेक अभंग लोकांनी मुखोद्गत केल्यामुळे मिळाले. तुकोबांची गाथा बुडविली पण ईतर बरेच हस्तलिखित होतेच की शिल्लक त्यांचे.

>> सालोमोलो असे जॅपनिज नाव कसे काय ठेवले त्याकाळात
+११११ नाव भारतीय वाटत नाही. मराठी तर नाहीच नाही. असे नाव ते सुद्धा चारशे वर्षापूर्वी ते ही देहू मध्ये?

पूर्वी मुलं जगत नसली की अतरंगी नावं ठेवायचे ना
सालोमालो हे त्या काळचं भिकू किंवा दगडू असेल.

Pages