जेंव्हा माझे लेख चोरीला जातात

Submitted by हरिहर. on 8 June, 2018 - 06:05

देहूतील ब्रम्हवृंदातील 'सालोमालो' हे बऱ्यापैकी बडे प्रस्थ. छान वाडा-हुडा, पैसा-अडका असलेली व्यक्ती. साहित्याची ऊत्तम जाण. आवडही. पण या सालोमालोंना काही सरस्वती प्रसन्न होईना. त्यांना फार वाटे की संस्कृतात श्लोक रचना करावी, प्राकृतात काव्यरचना करावी. पण त्यांना काही ते साधेना. हजार प्रयत्न करुनही सालोमालोंच्या काव्यात ओढाताण केलेली जाणवे. सफाईदारपणा, सहजता काही येईना. कालांतराने सालोमालोंच्या लक्षात आले की आपल्या नशिबी काही काव्यलेखन नाही. आपल्याला फक्त लक्ष्मीच प्रसन्न करुन घेता येते, सरस्वती नाही. पण सालोमालोंचा अंतरात्मा काही त्यांना चैन पडू देईना. मग त्यांनी 'लक्ष्मीच्या' मदतीने 'सरस्वतीला' वश करायचीच असे ठरवले. त्याच काळात देहूगावात तुकाराम आंबिले नावाचे गृहस्थ विठ्ठल भक्ती करीत. विठ्ठलाचे गुणगान गाताना त्याच्या तोंडातुन अभंगा मागून अभंग बाहेर पडत. समाजातील दांभीकता पाहून त्यांचा अभंग आसुड होई, नाठाळाला पाहून त्यांचा अभंग काठी होई. फार रसाळ, गोड, अर्थपुर्ण अभंग असत त्यांचे. पण हे तुकोबा फार भोळे. अभंग लिहून मोकळे होत. मग सालोमालोंना छान कल्पना सुचली. तुकोबांनी एखादा अभंग रचला की तो येनकेन मार्गाने सालोमालो मिळवायचे. आणि जेथे 'तुका म्हणे' असे ते खोडून 'सालो म्हणे' लिहित व हा अभंग आपलाच आहे असे सांगत. आपल्या चोपडीत सुवाच्च अक्षरात लिहून ठेवीत. लोकांना काय खरे व काय खोटे हे कळे. पण सालोमालोबरोबर वैर कोण घेणार? तुकोबा तर अशा बाबतीत फार ऊदासीन. असे होता होता सालोमालो महाशयांनी तुकोबांचे असंख्य अभंग चोरले. मध्यंतरीच्या काळात तुकोबांना रामेश्वरभट्टांच्या आदेशावरुन 'गाथा' ईंद्रायणीत बुडवायची आज्ञा झाली. सालोमालोला प्रचंड आनंद झाला. यथावकाश 'गाथा' ईंद्रायणीला अर्पण झाली. तुकोबाही काही काळाने वैकुंठाला गेले. अनेक वर्षे ऊलटली. आणि मग तुकोबांच्या गाथेचे संकलन करायची कल्पना पुढे आली. काम सुरु झाले. पण तुकोबांचे अनेक अभंग काही मिळेनात. अनेक गहाळ झालेले. अनेक विस्मृतीत गेलेले. काय करावे हा प्रश्न संकलनकर्त्यांना पडला. ईतक्यात 'सालोमालोंची चोपडी' प्रकाशात आली. आणि तुकोबांचे असंख्य अभंग क्रमवारीने सापडले. जर सालोमालो नसते, त्यांनी ते अभंग चोरले नसते तर आज आपण तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांना मुकलो असतो. धन्य ते सालोमालो आणि धन्य त्यांची वाङगमयचोरी.(पहा, या त्रासातुन तुकोबा सुद्धा सुटले नाहीत. असो.)
पण आजकाल 'सालोमालो’चे नाव जरी माझ्या कानावर पडले तरी मला तुकोबांची पुढील ओळ आठवते
तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा॥

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालवणी भाषेत या शब्दावरून वाक्प्रचार आहे. करून सवरून सालोमालो झालो असा काहीतरी आहे त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीतुन कुठल्याही मार्गाने स्वतःचा फायदा काढून घेऊन मग आपण त्या गावचेच नाही असे दाखवणे. पण हा वाक्प्रचार फारसा प्रचलित नाही. मी स्वतःच खूप कमी वेळा ऐकलाय.

त्या व्यक्तीचे नाव सालोमालो का होते माहीत नाही पण तुकाराम महाराजांनी अभंगात त्याच्या नावाचा स्पष्ट ऊल्लेख केला आहे. आणि या सालोमालोचे ऊपद्रवमुल्यही दुर्लक्ष करण्याजोगे नव्हते. तो अभंग चोरून थांबला नाही तर ‘तुकारामांनीच माझे अभंग चोरले’ अशी तक्रार घेऊन तो शिवरायांच्याही दरबारात गेला होता.

>> सालोमालो आता असता तर आमच्या कंपनीत खूप मोठ्या पदावर पोहचला असता
हा हा हा... अहो पदावर काय, संतांमधला बिल गेट्स झाला असता Lol

सालोमलो आज नाहीय असे का वाटले? तसे असते तर ह्या लेखाचे प्रयोजन राहिलेच नसते.

भराभर वर चढलेल्या लोकांमध्ये शोधून पहा, किती तुकाराम व किती सालोमलो ते!!!

सालोमलो आज नाहीय असे का वाटले? तसे असते तर ह्या लेखाचे प्रयोजन राहिलेच नसते.

भराभर वर चढलेल्या लोकांमध्ये शोधून पहा, किती तुकाराम व किती सालोमलो ते!!!

पण आजकाल 'सालोमालो’चे नाव जरी माझ्या कानावर पडले तरी मला तुकोबांची पुढील ओळ आठवते
तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा॥ >> तुम्हाला झालेला त्रास नक्कीच समजू शकतो. आपल्या टॅलेंट आणि मेहनतीचे श्रेय आपल्याला न मिळणे अन्यायकारक तर असतेच आणि मानसिक त्रासही होतोच होतो.

तुम्ही आजवर एकही पायरेटेड सिनेमा बघितलेला नाही , एकदाही अ‍ॅकेडेमिक, साहित्यिक पुस्तकांचे पीडीएफ नेटवरून डाऊनलोड केले नाहीत, नाटके, गाणी वेबसाईटवर पाहिली नाहीत असे गृहित धरून तुमचे अभिनंदनही करून घेतो.

तुम्ही आजवर एकही पायरेटेड सिनेमा बघितलेला नाही , एकदाही अ‍ॅकेडेमिक, साहित्यिक पुस्तकांचे पीडीएफ नेटवरून डाऊनलोड केले नाहीत, नाटके, गाणी वेबसाईटवर पाहिली नाहीत असे गृहित धरून तुमचे अभिनंदनही करून घेतो.>>> हे काही मला समजले नाही. नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला? मला खरोखर काहीही समजले नाही.

<<< नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला? >>> तुमचे अभिनंदन केले कारण नाहीतर हे मगरीचे अश्रू आहेत.

हायझेनबर्ग, तुझ्या प्रतिसादातला शेवटचा पॅरा लेखकाकरता अगदीच अस्थानी वाटतोय.

plagiarism आणि piracy एकमेकांची भावंडच आहेत. दोघांच्या मुळाशी एकच भावना आहे साहित्य कलाकृती वापराप्रती/निर्मितीप्रती dishonesty.
कोणीतरी अप्रामाणिकता दाखवत आपल्यावर अन्याय केला असे आपण अधिकारवाणीने म्हणतो तेव्हा आपण अजाणतेपणे त्याच प्रकारचा अन्याय दुसर्‍यावर केला तर नाही हे बघणंही आपलं कर्तव्यच आहे ना? (मग त्या दुसर्‍याला त्या अन्यायाची माहिती असो वा नसो)
In a perfect world वगैरे म्हणण्याची गरज नाही आपल्यापुरती आपले वागणे संधीसाधू/ दुटप्पी नाही ह्याची खातरजमा... ईतकेच.

plagiarism आणि piracy एकमेकांची भावंडच आहेत>>> नाही. या दोन गोष्टी पुर्णपणे भिन्न आहेत. या दोन्ही वृत्तींचे हेतू अगदी वेगवेगळे आहेत.
दोघांच्या मुळाशी एकच भावना आहे साहित्य कलाकृती वापराप्रती/निर्मितीप्रती dishonesty.>>>हे तर अजिबात नाही पटले. पहा थोडा विचार करून.

मी विचार करूनच लिहिले आहे Happy
दोघांच्या technical definitions मध्ये अडकून पडू नका.

मी पायरेटेड सिनेमा (दुसर्‍या कुणाची कलाकृती) डाऊनलोड करून चवीने बघितला तर ठीक पण माझे स्वनिर्मित साहित्य दुसरा त्याचे स्वतःचे नाव घालून मिरवतोय म्हणून मी त्याविरूद्धं आवाज ऊठवणार ... कसा जस्टीफाय करणार हा स्टँड मी?

मी जिथे क्रेडिट/मोबदला ड्यू होता तिथे तो न देता अप्रामाणिकपणा दाखवला हे खरे ना? की त्या अप्रामाणिकपणातही डावं ऊजवं असतं ?

हाब, हे स्ट्रॉमॅन आर्ग्युमेन्ट झालं. लेखकाचा त्रागा श्रेय अव्हेरलं गेल्याबद्दल आहे. पायरसीचा संबंध त्याच्याशी जोडण्याचा अट्टाहास आणि तो व्यक्त करण्याच्या पद्धतीतला उपरोध - दोन्ही अस्थानी आहे.

शाली, तुमचा वैताग पोचतो आहे.

सहज शंका - 'सालोमालो' हे खरोखरच कुणी गृहस्थ होते की ते चित्रपटासाठी लिहिलं गेलेलं फिक्शनल कॅरेक्टर होतं?

>>लेखकाचा त्रागा श्रेय अव्हेरलं गेल्याबद्दल आहे>>+१
हाब, आपण डाऊनलोड करुन, ह्या त्या वेबसाईटवर पिक्चर बघतो म्हणून उद्या माझा लेख चोरीला गेल्यास मी तोंड दाबून गप्प बसावं हे सुचवणं म्हणजे काहीच्याकाही आहे.

स्ट्रॉमॅन आर्ग्युमेन्ट झालं - तेवढंच स्ट्रॉमॅन आहे जेवढा लेखचोरीबद्दल तुकोबा आणि सालोमालो चा रेफरंस. मी काही तुम्ही ट्राफिक चे नियम पाळत नाहीत म्हणून लेखचोरीबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं म्हंटलं नाही. साहित्याच्याच श्रेय/ मोबदला (Credit) अव्हेराबद्दलच आपण बोलत आहोत.

आणि अस्थानी कसं ? साहित्याबद्दलचा तात्विक मुद्दा पुढे करणारी व्यक्ती एकच आहे. हे एक तत्वं झाकून ते तेवढेच एक बघा असे 'माझ्या विक्टिमाझेशनच्या मुद्द्याचंच बोला' असं सोयीस्करपणे म्हणून कसं चालेल? ही hypocrisy होणार नाही का?

मला वाटतं वरील लेखात मी जे मांडू पाहतोय आणि तुम्ही जो मुद्दा मांडत आहात यात गल्लत होतेय. >> माझी तरी होत नाहीये. ईश्यू moral आहे की technical हे ठरवले तर तुमची ही होणार नाही.

"लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण" म्हणजे लोकांना एखाद्या गोष्टीबाबत उपदेश/तक्रार करणारा स्वत: मात्र त्या गोष्टी करत नाही असे हायझेनबर्ग यांना म्हणायचे आहे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे.

Pages