फ्री...? : भाग १३

Submitted by पायस on 6 June, 2018 - 12:15

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66334

जेव्हा जोसेफने ख्रिसची तार वाचली तेव्हा त्याचा मूड थोडा सुधारला. जर फणींद्रला तो पकडू शकला नव्हता तर ख्रिसही डेव्हिडला पकडू शकला नव्हता. त्याला आज लॉर्ड हार्डिंग्जपुढे हजेरी लावायची होती. त्यांना उत्तर देताना ख्रिसच्या तारेतली माहिती अत्यंत महत्त्वाची होती. जेव्हा तो व्हाईसरॉय रेसिडन्समध्ये पोहोचला तेव्हा आश्चर्यजनकरित्या सर मॅक्सवेल तिथे हजर होते. त्यांचा लाडका अर्ल ग्रे टेबल व्यापून होता. कप भरले गेले. पहिला घोट घेऊन हेन्रींनी पसंती दर्शवली आणि जोसेफला बोलायची परवानगी मिळाली.
"सर, प्रथम कोलकात्यात जे अपयश आले त्याबद्दल मी तुमची माफी मागतो."
"लूक जोसेफ" हार्डिंग्जनी आपला कप खाली ठेवला. "आय अंडरस्टँड आपल्याला हवा असलेला माणूस पकडणं सोपं काम नाही आहे. व्हॉट डिसअपॉईंटेड मी वॉज समथिंग एल्स."
"ते काय सर?"
"तू सोबत हत्यारबंद शिपाई घेऊन गेला होतास आणि त्यात झालेल्या गोळीबारात काही बंगाली ठार झाले."
"होय सर. आपलेही काही शिपाई कामी आले. त्या हानीची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे."
"अगेन, दॅट इज फाईन. तुझी चूक ही झाली की तू त्या बंगाल्यांच्या मृत्युची बातमी संपूर्ण कोलकात्यात पसरू दिलीस."
"आय डोन्ट गेट इट सर."
"लॉर्ड हार्डिंग्ज अलाऊ मी" हेन्रींनी हस्तक्षेप केला.
"जोसेफ तुला ठाऊकच आहे की सध्या आपल्या सरकारचे हिंदुस्थानाबाबतचे धोरण नरमाईचे आहे. स्वतः लॉर्ड हार्डिंग्जना हिंदुस्थानी ब्रिटिश साम्राज्याच्या नागरिकांपैकी अत्यंत महत्त्वाचे वाटतात. त्यातल्या त्यात असंतुष्ट प्रांतांच्या बाबतीत पण आपण तोडगा काढत आहोत. जसे त्यांनी बंगालची फाळणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ते लोक काहीसे शांत होतील. अशावेळी तू बंगाल्यांवर गोळीबार केल्याचे चव्हाट्यावर आले तर कसे चालेल?"
जोसेफच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. एवढे सगळे घडल्यानंतरही राजकारणाची खेकटी कोणा वेगळ्याच प्रतलात नाचवली जात होती. क्रांतिकारकांकडून मारले गेलेले त्यांचे शिपाई आणि त्या सर्कसमार्फत मारले गेलेले ते तरूण यांच्या जीवांना त्या प्रतलात फारशी किंमत नव्हती.
"एनी वे, प्रोसीड"
"सर, माझे सहकारी ख्रिस्तोफर काल्डवेल यांनी तीन रशियनांना अटक केली. त्यांच्यामार्फत हिंदुस्थानात शस्त्रे येत होती. या शस्त्रांमध्ये एक बंदूक खास बनवून घेतली गेली. मुंबईत राहणारे बर्थोल्ट होनेस, जर्मन, यांनी ती बंदूक मागवली होती. आपला संशयित डेव्हिड वोल्फ याने ती इंदूरात ताब्यात घेतल्याचेही समजते."
"अधिक विस्ताराने स्पष्ट करा, मिस्टर पॅक्स्टन."
"बर्थोल्ट होनेस हा एक जर्मन ज्यू होता. बर्थोल्ट संस्कृत शिकायला या देशात आला. सुरुवातीला तो खरंच संस्कृत शिकायला आलाही असेल. पण नंतर त्याच्याशी डेव्हिड वोल्फ आणि एल्सा फ्रिट्झ यांनी संपर्क साधला. ते जर्मन हेर असावेत असा दाट संशय आहे. त्यांनी युगांतरच्या एका विशिष्ट गटासोबत दिल्ली दरबारात सम्राटांची हत्या करण्याची योजना आखली. या कटाच्या सफलतेसाठी ही बंदूक महत्त्वाची असावी असा आमचा कयास आहे."
"गो ऑन."
"बर्थोल्ट याकरिता नटराजा सर्कसमध्ये जाऊन ओल्गा नावाच्या तरुणीला भेटला. या सर्कसमध्ये ओल्गा, मीर आणि येलेना हे तिघे कसरतपटू होते. हेच तिघे शस्त्रांची तस्करीही करत असत. त्यांची संपूर्ण यंत्रणा अजून स्पष्ट झाली नसली तरी लवकरच आपण त्याच्या मूळाशी पोहोचू. असो, तर बर्थोल्टने ओल्गाकडे विशिष्ट बनावटीची बंदूक बनवण्याची ऑर्डर दिली. मीरने ती आपल्या सूत्रांद्वारे भारतात आणली. बर्थोल्टच्या दुर्दैवाने तो या सर्कशीत घडत असलेल्या एका वेगळ्याच प्रकरणात अडकला आणि त्याचा खून झाला. तत्पूर्वी बर्थोल्टने कधीतरी डेव्हिडला यांचा संपर्क मिळवून दिला. त्यांनी अखेर इंदूरात ती बंदूक डेव्हिडच्या ताब्यात दिली."
"आता हे दोघे कुठे आहेत?"
"एल्सा फ्रिट्झ आता या जगात नाही. प्राथमिक तपासाअंती असा निष्कर्ष निघतो की डेव्हिडनेच तिची हत्या केली असावी. डेव्हिडच्या मागावर मी आता अलाहाबादला जात आहे. तिथेच फणींद्रही हाती लागण्याची शक्यता आहे."
हार्डिंग्जची आणखी एक मीटिंग असल्याने ते जायला निघाले. त्यांनी मॅक्सवेलना काय समजावायचे ते समजावले. मग हेन्रींनी जोसेफला वाटेत गोष्टी उलगडून सांगितल्या.
"मोरोक्कन क्रायसिस, ज्यामुळे हे सर्व चक्र सुरू झाले, आता मिटत आला आहे. जर्मन मुत्सद्दी मोरोक्कोवर फ्रेंच कांगोतल्या भूभागाच्या बदल्यात पाणी सोडायला तयार झाले आहेत. आता प्रश्न इतकाच आहे की या वाटाघाटी किती ताणायच्या. त्यासाठी एक बार्गेनिंग चिप असू शकते एक असा ठोस पुरावा जो सिद्ध करेल की जर्मन हेर हिंदुस्थानात आले होते. एल्सा आणि बर्थोल्ट या जगात नाहीत. तर डेव्हिड एक अतिरेकी विचारांचा मनुष्य आहे असे बर्लिन भासवू बघत आहे. जर डेव्हिड जिवंत पकडला गेला तर आपण जर्मनीवर आणखी दबाव आणू शकतो. नाहीतर आत्ता जशा अटी आहेत तसा तह होईल."

~*~*~*~*~*~

ख्रिस आणि रश्मीने त्या छोट्याशा खोलीत प्रवेश केला. त्या खोलीत फक्त एक टेबल आणि तीन खुर्च्या होत्या. टेबलाच्या बरोबर मध्यभागी प्रकाश पडेल अशा बेताने एक दिवा टांगला होता. एका खुर्चीत नागराज आधीच येऊन बसला होता. ख्रिसने प्रश्नोत्तरांना सुरुवात केली.
"नागराज, तू आम्हाला मलिकाविषयी काही सांगणार होतास."
"सर, तुमच्या पासून मला काहीही लपवायचे नाही. जसे मी म्हणत होतो की ही एक मोठी गोष्ट आहे. कित्येक वर्षांपूर्वी सुरू झालेली. पण त्या आधी एक प्रश्न विचारू शकतो का?"
"जरूर."
"सर, तुमच्या मते जंगलचा राजा कोण? वाघ का सिंह?"
ते दोघेही चमकले. हा काय प्रश्न झाला? आणि याचा इथे काय संबंध आला? खासकरून मलिकाशी याचा काय संबंध?
"संबंध आहे सर. मी तुमच्याकडून या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा करत नाही. किंबहुना मी करूच शकत नाही कारण या प्रश्नामागचा इतिहास तुम्हाला ठाऊक नाही. तुम्ही दोघे तरूण दिसत असलात तरी ठग या शब्दामागे काय अर्थ दडला आहे हे तुम्हाला समजत असेलच."
"अर्थात. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतात दळवळणाचे मार्ग सुकर करण्यात हे ठग मोठाच अडथळा होते. पण त्यांचा इथे काय संबंध?"
"संबंध आहे. तुम्ही लोकांनी ठगांचा बंदोबस्त केलात. पण एक छोटा गट तुमच्या नजरेतून निसटला. यात तुम्हा लोकांचा काही दोष नाही. त्याला कारणच तसे आहे. या गटाला ठग म्हणणे त्या गटाच्या कार्यपद्धतीला न्याय देणार नाही. किंबहुना त्याला पंथ म्हणणेच योग्य ठरेल. ठगांचा मुख्य उद्देश हा धन असे. या पंथाचाही उद्देश धन होता. ठग कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून लुटलेल्या प्रवाशांना ठार करीत. हा पंथ पुढच्या लुटीस यश मिळावे म्हणून लुटलेल्या लोकांचा बळी देत."
"व्हॉट?" ही माहिती ख्रिससाठी नवीन होती. तो आज ज्या इंटेलिजन्स संघटनेसाठी काम करत होता त्याची बीजे या ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थापन झालेल्या विभागात होती हे त्याला माहित होते. त्यांनी किती सखोल अभ्यास करून काम केले होते हेही त्याला ठाऊक होते. मग असा कोणता पंथ सुटूच कसा शकतो?
"याचे एक सोपे कारण आहे. हा पंथ इतर ठगांच्या कार्यपद्धतीपासून हळू हळू फारकत घेत गेला. या पंथात कोणालाही प्रवेश देणे नंतर बंद झाले. किंबहुना पूर्ण वेळ हेच त्यांचे काम झाले. त्यामुळे इतर ठगांना शोधण्यासाठी वापरलेल्या पद्धती यांच्यावर उपयोगी पडल्या नाहीत."
"पण मग या पंथाविषयी कोणालाच का माहिती नाही?"
"कारण यांचे लूट सत्र कधीच प्रमाणाबाहेर गेले नाही. कोणाच्या डोळ्यावर आले नाही. हे कट्टर शाक्त पूजक असल्याने अनेकदा यांना तांत्रिक मांत्रिक समजून दुर्लक्ष केले गेले. दुसरे एक कारण असे की या पंथाने स्वतःच स्वतःचा विनाश ओढवून घेतला."
"तो कसा?"
"या पंथाचे दैवत अर्धनारी स्वरुपातला काळभैरव. भैरव आणि काली यांचे मिलन होईन बनलेले एक अघोरी दैवत! कधीतरी पूर्वी या पंथामध्ये कोणीतरी असे भविष्य वर्तवले होते की अर्धनारीश्वर स्वतः या पंथात अवतार घेईल. प्रश्न असा निर्माण झाला की या अवताराने कोणाची स्वारी करावी? हे लोक वाघ आणि सिंह पाळत असत. या दैवताचे वाहन वाघ आणि सिंह असा एक मिश्र प्राणी आहे असे ते मानत."
ख्रिसला यावर त्याने पाहिलेल्या मूर्तीची आठवण झाली. निश्चितच ती या दैवतेची मूर्ती होती.
"या प्रश्नावरून त्यांच्यात फूट पडली. एका गटाचे म्हणणे होते वाघ तर दुसर्‍या गटाचे म्हणणे होते सिंह! गेल्या दोनशे वर्षात एकदाच त्या दोन्ही गटांना एकत्र आणण्यात कोणाला तरी यश आले होते. काली, जिला मलिकाचा पाठिंबा आहे, ती त्या सरदाराच्या वंशातली आहे. त्या सरदाराने या लोकांना आपल्या बळाचा वापर करून म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. त्यानेच एक अशी लिपि बनवली जी व्याघ्रपंथीय डावीकडून उजवीकडे वाचतात आणि त्या शब्दांचे उच्चार वेगळ्या पद्धतीने करतात. तर सिंहपंथीय उजवीकडून डावीकडे वाचतात आणि त्यांचे उच्चार अजून वेगळेच आहेत."
ख्रिस आणि रश्मीने एकमेकांकडे पाहिले. रश्मीकडचे कागद त्या लिपित लिहिले असले पाहिजेत. नक्कीच त्यांचे या पंथाच्या दृष्टीने काही महत्त्व होते.
"आता तुम्ही विचाराल, हे सर्व मला कसे माहित आहे? मी स्वतः यातल्या व्याघ्र म्हणजेच वाघाच्या बाजूचा होतो. मला जेवढे माहित आहे त्यानुसार या सरदाराने बरीच धनदौलत जमा केली होती. पण त्यात विशेष असा एक हिर्‍याचा कंठा होता. तो कंठा म्हणजे जणू या दोन्ही पंथांना एकत्र आणण्याचे प्रतीक आहे, साधन आहे. त्याने एक सांकेतिक भाषेत संदेश तयार केला. त्या संदेशानुसार एका अशा व्यक्तीची माहिती मिळते जी हा कंठा कुठे आहे ते सांगू शकते. हा संदेश असलेले कागद जया नावाच्या बाईकडे होते. ते आता तिच्या मुलीकडे आहेत. जया व्याघ्रपंथाची होती. तर मलिका सिंहपंथाची आहे."
"मलिकाला ते कागद का हवे आहेत ते कळले पण या सगळ्यात ती काली कुठून आली? आणि हे सगळे बळी का दिले गेले?"
"सांगतो. सगळं ओळीने सांगतो. आधी मी यात कुठून आलो ते सांगतो. ते कागद वाचायचे तर तुम्हाला व्याघ्र आणि सिंह या दोन्ही पद्धतींनी ती लिपि वाचता आली पाहिजे. तरच तुम्हाला पूर्ण संदेश समजेल. मलिकाला सिंह पद्धत येते पण व्याघ्र येत नाही. मी पैशाच्या हव्यासापोटी फितूर झालो आणि तिला व्याघ्र पद्धत शिकवली. बाहेर एकटा राहिलो असतो तर आज ना उद्या कोणा व्याघ्र पंथीयाने माझा जीव घेतला असता. मग या सर्कसबरोबर राहण्याचा निर्णय घेतला."
"हं, आता सांग ही काली कोण?"
"मलिकाने तुम्हाला हे सांगितले असेल की काली कोणा संस्थानिकाची अनौरस वंशज आहे. ते नक्की संस्थान कोणते ते मला माहित नाही. मलिकाशी मी जेवढो बोललो त्यावरून हे कळले की ते संस्थान अलाहाबादजवल कुठेशी आहे. आणि मला हे माहित आहे की ज्या व्यक्तीला कंठ्याची जागा माहिती आहे ती त्या संस्थानाच्या आसपासच कुठेतरी आहे. हे मलिकालाही माहित होते. म्हणूनच तिने तिच्या बहिणीचा त्या संस्थानिकाच्या राणीवशात प्रवेश करवला. स्वतः ती तिची दासी म्हणून तिथे राहिली. काली त्या नात्याने हिची भाची लागते."
"मग मलिकाला आपल्या भाचीला या पंथाचा म्होरक्या बनवायचे आहे?"
"फक्त तेवढेच नाहे. जर मलिका जे म्हणत असेल ते खरे असेल, तर काली ही अर्धनारीश्वर भैरवाचा अवतार आहे. ते बळी कालीचे अवताराचे तेज टिकावे म्हणून दिले जात होते. माझ्या आठवते त्यानुसार कालीकडून मुंबईत काही घोळ झाला, अन्यथा त्या गोर्‍याला सुद्धा एखाद्या निर्जन ठिकाणी नेऊन त्याचा भैरवकालीसमोर बळी दिला असता."
"आणखी एक प्रश्न, हे रुद्र आणि भद्र कोण आहेत?"
"नक्की नाही सांगता येणार. पण ते माझ्याही आधीपासून मलिकासोबत आहेत.
"तुझ्या हे लक्षात येत असेलच की तू आम्हाला जे सांगतो आहेस, त्याच्यावर आधारित तुला फासावर लटकावले जाऊ शकते."
"माझी हीच इच्छा आहे, सर. किंबहुना आता मला जगायचा कंटाळा आला आहे. माझ्या पापांचे ओझे मी पुष्कळ दिवस वाहिले. सर, मला एखाद्या सापाकडून चावून घेऊन मरू देतील का?
ख्रिस आणि रश्मी दोघेही त्या खोलीतून बाहेर पडले.
"नागराज प्रत्यक्षात असा पोखरलेला माणूस असेल असे वाटले नव्हते."
"त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. नागराज सर्कशीतल्या सर्वात अबोल व्यक्तींपैकी होता. सहसा अशा व्यक्तींकडे बोलण्यासारखे खूप काही असते. ते जाणून बुजून मनातल्या गोष्टी उघड करत नाहीत. मला वाटतं नागराजने अनेकदा हे जोखड झुगारून द्यायचा प्रयत्न केला असेलही पण मलिकाने त्याने स्वतःवर घालून घेतलेली बंधने अधिक घट्ट आवळली असतील."
"हं. एकंदरीत माझी आई सुद्धा या लोकांपैकी एक व्याघ्रपंथीय दिसते."
"दॅट इज अ बिट ऑफ अ प्रॉब्लेम! तुझी ही पार्श्वभूमि लपवावी लागणार. बहुधा तुझी आई सुद्धा नागराज ज्या अवस्थेतून जात आहे त्यातून गेली असावी. फनीली एनफ, तुझ्यातली चोराची कौशल्ये कुठून आली हे आता समजतंय. वेल.." रश्मीचा चेहरा बघून लगेच त्याने विषय बदलला
".. मुद्दा असा आहे की हे संस्थान कोणते आहे हे कळायला काही मार्ग नाही. एक धागा हाती आहे की हे ठिकाण अलाहाबाद जवळ असले पाहिजे."
"मग अलाहाबादसाठी मी माझं तिकिट आरक्षित करते."
"दोन तिकिटे काढ."
"का?"
"विसरलीस? डेव्हिड सुद्धा अलाहाबादलाच गेला आहे. फणींद्रही त्याच्या मागेमागे अलाहाबादलाच येणार आहे. जर नशीबाने साथ दिली तर अलाहाबादलाच या सगळ्याचा निकाल लागेल. मला उत्तरे हवी असलीत तरी त्यासाठी आणखी उत्तरेकडे सरकायची माझी इच्छा नाही."

~*~*~*~*~*~

ऑक्टोबर १९११
अलाहाबाद

अलाहाबाद - अल्लाहचे शहर, देवाचे शहर. कधीकाळी प्रयाग नावाने प्रसिद्ध असलेले हे शहर भारतातील दुसरे सर्वात जुने शहर आहे. वाराणसी वगळता कुठल्याही शहराचा इतिहास इतका समृद्ध नाही. एकेकाळी वत्सराज उदयनाने कौशांबी नावाने वसवलेल्या राजधानीचा काही भाग पुढे प्रयाग - (भगवंताला) अर्पण करण्याची जागा - नावे प्रसिद्ध झाला. अकबराने सोळाव्या शतकात याचे पुनर्वसन इलाहाबाद नावाने केले. त्याच्याच आदेशावरून एक किल्ला उभारण्यात आला आणि शहराच्या वेशीची डागडुजी करून त्याचे एका महत्त्वाच्या ठाण्यात रुपांतर करण्यात आले. शाहजहानने त्याच्या राजवटीत इलाहाबादचे नाव बदलून अलाहाबाद असे ठेवले.
अलाहाबाद ब्रिटिशांच्या ताब्यात येण्यापूर्वी अवधच्या नवाबाच्या अधिपत्याखाली होते. ब्रिटिशांनी ते ठाणे जिंकून घेतले आणि आग्रा प्रांताला जोडले. १८५७ मध्ये काही काळ अलाहाबाद बंडखोरांच्या ताब्यात होते. त्यानंतर मात्र ते पूर्ण काळ ब्रिटिशांच्या मालकीचे होते. तिथे कोणीही संस्थानिक नव्हते. अलाहाबादच्या जवळचे मोठे संस्थान अवध होते. त्याखेरीज अनेक छोटी मोठी संस्थाने आसपास विखुरलेली होती. मग नागराज कोणत्या संस्थानाबद्दल बोलत होता?
"मलिका जिवंत असूच शकत नाही. तिची जखम खोल होती. जरी ती जिवंत राहिली तरी ती इतका मोठा प्रवास सहन करण्याच्या अवस्थेत नसावी."
"रश्मी, आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नये. तसेही मलिका आणि त्या कालीपेक्षाही मला रुद्र हा चिंतेचे कारण वाटतो. रुद्रसुद्धा नक्कीच या सिंहपंथीयांपैकी असावा. तो सिंह त्याचा पाळीव सिंह आहे. जर तसे असेल तर आपला प्रतिस्पर्धी तगडा आहे."
"पण एक जमेची बाब आहे."
"ती कोणती?"
"आपण ट्रेनने प्रवास करून अलाहाबादला पोहोचलो. ते सिंह सोबत घेऊन ट्रेनने प्रवास करू शकत नाहीत. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त वेळ आहे."
ख्रिसच्या चेहर्‍यावरची स्मिताची लकेर आज अधिकच रुंदावली. हे बोलणे चालू असतानाच बग्गी थांबली. भाडे चुकते करून ते त्या बंगलीच्या दिशेने जाऊ लागले. जोसेफ आणि सर हेन्री त्यांचीच वाट बघत होते.

******

ख्रिसने थोडक्यात सर्व घटनाक्रम हेन्रींना सांगितला. जोसेफनेही पुन्हा एकदा कलकत्त्यात घडलेल्या गोष्टी सांगितल्या. हेन्रींनी हातातला चहाचा कप खाली ठेवला.
"रश मी, चहा ब्रू करायला तुला कोणी शिकवलं?"
"मी घाई न करता चहा बनवला त्यामुळे चांगला झाला असावा सर."
"ओह्ह राईट, रश्मी नाही का? माय बॅड, माय बॅड. यू सी, एज इज कॅचिंग अप मी नाऊ. पण आता माझा अर्ल ग्रे इथे असल्यावर मला इतर कोणत्याच गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही."
ख्रिसने वरकरणी स्मित केले. म्हातार्‍याचे डोके अजूनही तेवढ्याच वेगात चालू आहे. त्याने विषय बदलला,
"माझ्यामते फणींद्रसाठी आपण काय योजना बनवणार आहोत त्याचा विचार केला पाहिजे."
हेन्रींनी एक दीर्घ श्वास घेतला. ख्रिस आल्यानंतर त्यांचा पहिला विरोध रश्मीच्या तिथल्या उपस्थितीत होता. ख्रिस मोठ्या मुश्किलीने त्यांची समजूत घातली. त्याचा एक साधा मुद्दा होता, जर तुम्हाला या देशावर राज्य करायचे असेल तर तुम्हाला इथल्या लोकांना ते ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक आहेत आणि त्यांना ब्रिटिशांप्रमाणेच काही अधिकार आहेत अशी जाणीव करून द्यावी लागेल. तरच ते साम्राज्याची काही जबाबदारी उचलतील. यावर सर हेन्रींनी "तू आतून अजूनही खूप भोळा आहेस ख्रिस." इतकीच प्रतिक्रिया दिली होती. रश्मीचा किमान युगांतरशी काही संबंध नाही हे निश्चित केल्यावर त्यांनी ख्रिसला पुन्हा सर्वाधिकार बहाल केले.
"मी डेव्हिडला शोधून काढलं आहे." जोसेफने आपला अहवाल दिला.
"दॅट्स ग्रेट! तो डेव्हिडच आहे हे नक्की?"
"मला नाही वाटत जर्मन धाटणीचा चेहरा असणारा आणि सतत खांद्यावर पोपट वागवणारा दुसरा कोणी मनुष्य आत्ता भारतात आहे."
"शंकाच नको डेव्हिडच तो. त्याला काही संशय तर नाही ना आला?"
"मला नाही वाटत. इथल्याच एका हॉटेलात त्याने मुक्काम ठोकला आहे. मी त्या हॉटेल चालकाशी बोलून आलो. अर्थातच डेव्हिड जेव्हा काही कामासाठी बाहेर पडला होता तेव्हाच. त्याने मला नक्कीच पाहिलेले नाही. इथल्या साधूंचा अभ्यास करायला आलेला एक पर्यटक अशी डेव्हिडने स्वतःची ओळख सांगितली आहे. तो जितक्या लवकर तिथून जाईल तेवढं त्या चालकाला हवंच आहे. मी त्याच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष राहिल अशी सोय केली आहे."
"ओके. आता फणींद्रची वाट पाहणे एवढेच आपल्या हातात उरते." ख्रिसने सूचकपणे हेन्रींकडे पाहिले.
"मी रेल्वे स्टेशनवर कडक पहारा बसवण्याची व्यवस्था केली आहे."
"तेवढ्याने काम होणार नाही सर. आत्तापर्यंत आपण दोन वेळा हाच उपाय वापरून फसलो आहोत. तो ट्रेनने येणार नाही."
"पण मग कुठून येईल? शहराच्या वेशीवर कायमच पहारा दिला जातो. नदीवाटे यायचा विचार जरी त्याने केला तरी त्याला किनार्‍यावर तर यावेच लागेल. तिथेही पहार्‍याची व्यवस्था करता येईल. आणखी काय काळजी घेतली पाहिजे?"
ख्रिसचे अंतर्मन सांगत होते की या सगळ्यानंतरही त्याच्यासाठी काही मार्ग बाकी आहे.

~*~*~*~*~*~

ऑक्टोबर १९११
थॉर्नहिल मेन मेमोरियल
(thornhill mayne memorial)
अलाहाबाद

"आपण इथे का आलो आहोत सर?"
"रश्मी तुला थॉर्नहिल मेमोरिअल काय आहे याची कल्पना आहे का?"
"मला एवढं कळलं की हे एक ग्रंथालय आहे. पण आपण इथे कोणते पुस्तक वाचायला आलो आहोत?"
"जेव्हा अलाहाबाद संयुक्त प्रांताची राजधानी होते तेव्हा शासकीय कामांसाठी ही वास्तु शासकीय कामांसाठी वापरली जायची. १८७९ मध्ये मात्र हिचे कायमस्वरुपी ग्रंथालयात रुपांतर करण्यात आले. आज भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रंथालयांत याची गणना होते. इथे लाखो पुस्तके असावीत. पण आपण इथे पुस्तके वाचण्यासाठी नाही आलो आहोत." ख्रिस जिने उतरता उतरत म्हणाला.
"मग? या ग्रंथालयाच्या तळघराला भेट द्यायला तर नाही आलेलो."
"एका अर्थी हो. या ग्रंथालयात जशी विविध पुस्तके आहेत तसेच अनेक जुनी कागदपत्रे, दस्तावेज जतन करण्यात आले आहेत. त्यामध्ये बरीचशी सरकारी कागदपत्रे, पत्रव्यवहार आहेत. यातले काही कागद सामान्य जनतेसाठी नाहीत. पण आपण ते कागद अभ्यासू शकतो. नागराजच्या म्हणण्यानुसार मलिकाचा उगम कोणा अज्ञात ठगांच्या टोळीतून झालेला आहे. तसेच ते कोणा संस्थानिकाशी संलग्न होते. जर तसे असेल तर आपल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे येथे मिळू शकतात."
"त्यांच्या इतिहासाविषयी इथे काही लिहून ठेवले असेल?"
"तेच आपल्याला शोधायचं आहे." जुन्या कागदांचा ढीग टेबलावर आदळत ख्रिस म्हणाला.
"सी, ब्रिटिशांना ठगांचा बंदोबस्त करण्यात यश आले कारण त्यांनी ठगांच्या सर्व बातम्यांची काटेकोरपणे केलेली नोंद! या नोंदींमधूनच त्यांना समान धागे सापडत गेले आणि त्यांचे गूढ उकलण्यात यश आले. या नोंदींमध्ये नक्कीच आपल्या कामाचेही काही ना काही असेलच."
"आणि ते संस्थान?"
"त्यासाठी आपल्याला जुन्या वृत्तपत्रांची गरज पडेल."
"काय?"
"अर्थात. जर एखादे संस्थान खालसा झाले असेल आणि ते कलकत्त्यापासून एवढं जवळ अंतरावर असेल तर कलकत्ता गॅझेटमध्ये त्याच्याविषयी काही ना काही लिहून आले असेलच. ते वृत्तपत्र शंभर वर्षांपेक्षाही अधिक वर्षांपासून चालू आहे, गेल्या पन्नास वर्षांतल्या घटना त्यांच्या नजरेतून सुटल्या नसणार."
"ओके." रश्मीने सोबत आणलेला थर्मास टेबलवर ठेवला. दोन कप काढले गेले. कीमुनचा सुवास त्या तळघरात दरवळला आणि ती दोन डोकी कागदांच्या ढिगार्‍यात गायब झाली.

******

अलाहाबादची गजबज पाहून डेव्हिड आधी काहीसा वैतागला होता. मुंबईतही माणसांची गर्दी होतीच. पण तुलनेने ती गर्दी विखुरलेली होती. दुसरे म्हणजे मुंबईतला बहुतांश समाज पांढरपेशा होता. एल्सा सोबत राहताना त्याचा संपर्क मर्यादित तर होताच पण तो युरोपीय प्रभावाखाली आलेल्या व्यक्तींशी होता. इथे मात्र अतिशय धार्मिक वातावरण आणि ब्रिटिश मुख्यालय असूनही प्रचंड भारतीय प्रभाव पाहून तो चक्रावला. त्यात युगांतरने त्याला पाठवलेल्या संदेशानुसार त्याला नदीघाटांची चक्कर मारायची होती. तिथे फणींद्र कुठून येणार होता हे त्याच्या आकलनापलीकडचे होते. त्या घाटांवरचे वातावरण त्याच्या मनःशांतिची परिसीमा पाहणारे होते.
तो कुंभमेळ्याच्या कालावधीत आलेला नसला तरी अलाहाबादच्या त्रिवेणी संगमाचे महत्त्व लक्षात घेता तिथे कायमच साधूंची गर्दी असते. त्याचे महत्त्व विशद करण्यासाठी एकच घटना पुरेशी आहे. या वर्षीच्या कुंभमेळ्यात पहिलीवाहिली एअर मेल सर्व्हिस सुरू करण्यात आली होती. अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी भक्तमंडळींची गर्दी कधी ओसरली तरच नवल! डेव्हिडला भुकेची जाणीव झाल्यावर तो परत फिरला. त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्याला रोजच इथे चक्कर मारणे गरजेचे होते कारण फणींद्र नक्की कोणत्या तारखेला इथे हजर होईल हे सांगणे कठीण होते. त्याची त्याबद्दल काही तक्रार नव्हती. पण रोज रोज ती पेटी घेऊन हिंडणे त्याच्या जीवावर येत होते.

*****

डेझर्ट म्हणून रश्मीने फ्रुट सलाड आणले. ख्रिस आज केलेल्या सर्व नोंदी पुन्हा एकदा तपासून बघत होता. त्यांना थॉर्नहिल मेमोरिअल मध्ये जायला सुरुवात करून आता आठवडा होत आला होता. इतके प्रयत्न करूनही त्यांच्या हाती काहीच गवसत नव्हते. मनोमन ख्रिसची खात्री पटली होती की काहीतरी अगदी बारीकसा धागा त्याच्या नजरेस पडत नाही आहे. किंबहुना त्याच्या नजरेस तो पडला आहे पण त्याला त्याचा अर्थ लावता येत नाही आहे. रश्मीला आता त्याच्या कार्यपद्धतीचा अंदाज येऊ लागला होता. हा विचार करत असताना त्याला बाकी कशाचे भान राहणार नाही. त्यामुळे इथे त्याचं खाऊन व्हायची वाट बघायचे काही कारण नाही. ती झोपायला जायला उठली.
"एक मिनिट रश्मी."
"काय, सर?"
ख्रिसने काही सेकंद पॉज घेतला. "अं, तू मला कधी कधी झोपेत अ‍ॅलेक्सी विषयी बडबड करताना ऐकलं होतंस ना?"
"येस, सर. त्याचं काय?"
"मी .. मी मध्ये मध्ये 'फ्री' असं म्हणतो. राईट?"
"हो."
"त्याच्या आधी काय मी काय म्हणतो?"
"म्हणजे?"
"मी फ्री हा शब्द वारंवार म्हणण्याआधी काय बोलत असतो? काही शब्द तर तुला कळत असतील ना?"
रश्मी विचारात पडली. तिची स्मरणशक्ती बरी असली तरी खूप चांगली नव्हती. त्यात तिने ख्रिसची बडबड तितकी लक्ष देऊन ऐकलीही नव्हती. शक्य तितका ताण दिल्यानंतर तिला अंधुक शब्द आठवले.
"अ‍ॅलेक्सी तुम्हाला काहीतरी सांगत असतो. त्यानंतर तुम्ही फ्री म्हणायला सुरुवात करता. अ‍ॅलेक्सीच्या बोलण्यात तुमच्या वडिलांचा उल्लेख असतो. तो तुमच्या वडिलांविषयी काहीतरी सांगत असतो. कधी कधी तुम्ही विचारता ... ओह आठवलं, तुमचे वडीलही 'फ्री' म्हणायचे बहुतेक. कारण ते काहीतरी म्हणत असत आणि तुम्ही आणि अ‍ॅलेक्सी त्याविषयी बोलता आणि मग तुमच्या तोंडी 'फ्री' येतं."
रश्मी झोपायला गेल्यानंतरसुद्धा ख्रिस बराच वेळ जागा होता. त्याच्या डोक्यात विविध शक्यता नाचत होत्या. पण जर त्याचा अंदाज बरोबर असेल तर त्याला फ्री मागच्या रहस्याची किल्ली आज सापडली होती. त्याला पुष्टी देण्यासाठी कुठे शोधायचं हे त्याला कळलं होतं. आता लवकर हालचाली करण्याची आवश्यकता होती. फणींद्र यायच्या आत त्याला हे काम उरकणे भाग होते.

पंचम जॉर्ज यांच्या भारतातील आगमनाला आता एका महिन्याहून थोडाच अधिक कालावधी बाकी होता.

~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66350

Group content visibility: 
Use group defaults

मस्त चाललीय कथा.

ठगांचा इतिहास आधी मायबोलीवरच वाचलेला असल्याने हा भाग बराच पटकन समजला. Happy परत परत वाचावं लागलं नाही आणि प्रश्नही पडले नाहीत. Happy

ठगांचा इतिहास आधी मायबोलीवरच वाचलेला असल्याने >> ओह्ह, मायबोलीवर ठगांविषयी लेख आहे हे मला आधी माहित नव्हते. तुम्ही उल्लेख केल्यावर तो लेख सापडला. आधी मी ठगांविषयक एक्स्ट्रा फीचर देणार होतो पण सोन्याबापूंचा तो लेख अधिक माहितीपूर्ण आहे तसेच वाचनीयही आहे - https://www.maayboli.com/node/60289

हो. तो लेख सोन्याबापूंचा आहे असं वाटत होतं पण मी कन्फर्म नव्हते. आणि काल शोधाशोध करायला वेळही नव्हता. Happy

आणि एक. हे काल विचारायचं राहून गेलं पण सतत डोक्यात घोळत बसलंय.
बाहेर एकटा राहिलो असतो तर आज ना उद्या कोणा व्याघ्र पंथीयाने माझा जीव घेतला असता. मग या सर्कसबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.>> नागराज स्वतः व्याघ्रपंथीय आहे ना मग दुसऱ्या व्याघ्रपंथीयाकडूनच त्याच्या जीवाला धोका कसा?? की तिथे सिंहपंथीय म्हणायचेय??

नागराज स्वतः व्याघ्रपंथीय आहे ना मग दुसऱ्या व्याघ्रपंथीयाकडूनच त्याच्या जीवाला धोका कसा?? >> इथे नागराज लॉजिकली विचार करत नाही आहे. त्याच्या डोक्यातली शक्यता अशी - नागराजने व्याघ्रपंथी पद्धत/लिपि शिकवून त्याच्या साथीदारांसोबत गद्दारी केली. त्याचा सल त्याच्या मनात बसला आहे. जर कोणा व्याघ्रपंथीयाला त्याच्या गद्दारीविषयी कळले तर तो/ती नागराजला निश्चित ठार करेल.
प्रत्यक्षात असे होण्याची शक्यता नगण्य आहे. दुसर्‍या व्याघ्रपंथीयाला हे सर्व कळणार कसे? मलिका गावभर सर्वांना सांगत तर फिरणार नाही. पण तरीही नागराज त्या शक्यतेचा निव्वळ विचारच करत नाही आहे तर त्याच्या दृष्टीने असे घडणारच आहे. तो किती तणावाखाली असेल याची कल्पना यावी. आणि ...
मलिकाने त्याने स्वतःवर घालून घेतलेली बंधने अधिक घट्ट आवळली असतील. >> मलिका वरच्या शक्यतेचा त्याच्या विरोधात वापर करून घेत असावी.

एक नम्बर !!
पण हा भाग थोडा छोटा झाला का पायस? Wink
वेगवान होते आहे कथा आता !! निधि वर म्हणाल्यात त्या प्रमाणे ठगांविषयी उल्लेख झाल्यावर मला हि सोन्याबापूंचा तो लेख च आठवला Happy