फ्री...? : भाग १२

Submitted by पायस on 5 June, 2018 - 12:32

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66324

जोसेफ अंधुक उजेडात फणींद्रची बोट दिसते का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता. तो खबरी मात्र अतिशय मख्ख चेहर्‍याने विडी पेटवायचा प्रयत्न करत होता. फार काही वारा सुटला नव्हता पण तरी त्याची विडी काही पेटत नव्हती. जोसेफ काहीशा वैतागानेच म्हणाला,
"या विडीचा लालसर ठिपका त्यांना सावध नाही करणार वाटतं?"
"एवढं खोचून विचारायची गरज नाही सर. अजून फणींद्र यायला वेळ आहे. आणि तसेपण तो माझ्या होडीतल्या मशालीचा प्रकाश आधी बघेल का या विडीचा ठिपका?"
"पण तू यायची गरज होती का?"
"हो सर. तुमच्याकडे बंगाली बोलू शकणारी माणसे असतील पण त्यांना अपेक्षित बंगाली बोलणारी माणसे निश्चित नाहीत. या लोकांना त्या लहेजात तयार करण्याइतका वेळ ना तुमच्याकडे होता ना माझ्याकडे. त्यामुळे मलाच जाणे भाग आहे. नाहीतर मला हा धोका पत्करायची कुठे हौस आहे?"
"सर, ते बघा" जोसेफ काही बोलणार त्याच्या आत जोसेफच्या शेजारी उभ्या असलेल्या हवालदाराने त्याचे लक्ष एका दिशेला वेधले. अजून उजाडायचे असले तरी सरावलेल्या डोळ्यांना ती एक बोट आहे हे लक्षात येत होते. जोसेफने सर्वांना सावधान केले. खबर्‍यानेही ती विडी नदीत फेकली आणि वल्ही पकडून तो तयार झाला. त्याच्या पासून काही हात अंतरावर एक मशाल येऊन पडली आणि पाण्याला पिवळी झळाळी आली. हाच परवलीचा शब्द समजून तो झपाझप होडी वल्हवत बोटीपाशी घेऊन गेला. जोसेफला बंगाली समजत नसले तरी त्याला काहीतरी गडबड आहे हे जाणवले. पण तोवर खूप उशीर झाला होता. ठो असा आवाज झाला आणि बिंग फुटले असल्याचे जोसेफच्या लक्षात आले. त्यानेही तातडीने आपल्यासोबत आलेल्या सर्व माणसांना या बोटीला घेराव घालण्याचा आदेश दिला.
या सर्व होड्या जशा जशा पुढे सरकू लागल्या तसा अचानक पाण्याचा एकच लोट उसळला. जोसेफ केवळ ऐकून होता की बंगाली क्रांतिकारक हातबाँब वापरतात. पण आज ते हातबाँब घेऊन येतील ही शक्यता त्याच्या मनाला शिवली नव्हती. यातून सावरतो ना सावरतो तोवर त्याचा कान वेदनांनी ठणकू लागला. नदीघाटावर लपून बसलेल्या क्रांतिकारकांपैकी एकाची गोळी त्याच्या कानाला चाटून गेली होती. जोसेफला कळून चुकले, घेरा त्याने घातला नव्हता. त्याला घेराव घातला होता. तीन बाजूंनी त्याला क्रांतिकारकांनी वेढले होते आणि त्यांच्या पाठीमागे कोणी नसले तरी थोड्याच वेळात तो मार्गही बंद केला जाऊ शकत होता.
"डाईव्ह!!" जोसेफ बेंबीच्या देठापासून ओरडला. त्याच्या सोबत आलेल्या सर्व पोलिसांनी पाण्यात उड्या घेतल्या. सुदैवाने त्यांच्या विरोधकांची नेमबाजी फारशी चांगली नव्हती. तसेच अंधुक उजेडात नेम साधणे कठीण होते. यावर एकच रामबाण इलाज होता. हातबाँबने पाण्यात आणखी एक स्फोट घडवून आणणे. इथे जोसेफचा धाडसी निर्णय कामी आला. जरी युगांतरचे कार्यकर्ते हातबाँब घेऊन आले असले तरी त्यांच्याकडे केवळ एकच हातबाँब होता. त्या स्फोटाचा फायदा घेऊन शक्य तितके सोल्जर्स टिपून काढायचे असा विचार त्यामागे होता. आता काय करायचे? कौशिकने काहीसा विचार करून पाण्यात मशाली फेकायला सुरुवात केली. मशाली विझण्याआधी त्यांनी नदीत घुसलेल्या शिपायांच्या जागा उघड केल्या. गोळीबारात बरेच शिपाई कामी आले पण काही जण किनार्‍याला लागले होते. इथे संख्याबळ कामी आले. घाटाच्या आडोशाने लपलेले नऊ-दहाजण फार काळ टिकले नाहीत. हे लक्षात येताच कौशिकनेही नदीत उडी घेऊन पळण्याचा प्रयत्न करायचा निर्णय घेतला. तो स्वतः उत्तम पोहू शके. नदीच्या आतल्या अंगाला पात्र खोल होते. तिथे डुबी मारल्यानंतर माणसाचा शोध घेणे सोपे काम नव्हते. त्याने मागे वळून पाहिले तर त्याचे उर्वरित सर्व साथीदार मरून पडले होते. जोसेफ पोहत पोहत त्या बोटीवर आला होता.
"मला त्या दिवशी दफनभूमित भेटलेला तूच होतास ना?"
"तुमची स्मरणशक्ती चांगली आहे सर. होय, तो मीच होतो. युगांतरमधल्या काही गटांना पूर्वीच संशय आला होता की कोणी बंगाली इंग्रजांना मदत करतो आहे. तो कोण हे शोधण्यात आम्ही असमर्थ ठरलो होतो. त्यदिवशी जेव्हा तुम्ही हेडस्टोनखाली लिफाफा ठेवला त्या दिवसापासून आम्ही तिथे नजर ठेवून होतो. ज्या दिवशी तो संदेश घेण्यासाठी तुमचा खबरी आला त्या दिवसानंतर आम्ही त्याच्यावर नजर ठेवली. आम्हाला तुमच्या योजनेची इत्थंभूत माहिती होती. जर फणीदाला इथून निसटायची घाई नसती तर मला अधिक लोक जमवता आले असते. मनुष्यबळातल्या फरकाने दगा दिलाच."
"फणींद्र कुठे आहे?"
"सर, या नदीत पोहू शकणारे तुम्ही एकटेच आहात का?"
"व्हॉट? यू मीन ..."
"फणीदा निसटला सर. हातबाँब फेकण्यामागचा उद्देश दुहेरी होता. एक म्हणजे त्या गोंधळात आम्हाला गोळीबार करून तुमचे मनुष्यबळ कमी करता यावे. दोन फणीदा नदीत उडी मारताना कोणाला कळू नये. तुम्ही लोकांनी आपल्या होड्या सोडून त्याचे काम सोपे केले. एव्हाना तो कुठे आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. असो, माझी जबाबदारी मी पार पाडली. यापेक्षा अधिक तुम्ही माझ्याकडून काहीही वदवून घेऊ शकणार नाही. वंदे मातरम्!"
कौशिकच्या अचेतन देहाकडे जोसेफ बघतच राहिला. त्याच्या पक्षाची विशेष जीवितहानी अशी झाली नव्हती. नंतर सकाळी कलकत्त्याच्या पोलिस प्रमुखांनी त्याचे आभार मानले. त्यांना सतावणार्‍या चेहर्‍यांपैकी बहुतेक चेहरे या चौदाजणांमध्ये त्यांना दिसत होते. पण जोसेफ खिन्न होता. कौशिकच्या चेहर्‍यावरचा तुच्छ कटाक्ष जोसेफला सतत आठवण करून देत होता की फणींद्र त्याच्या हातावर तुरी देऊन निसटला.

~*~*~*~*~*~

१ ऑक्टोबर १९११ ची रात्र
इंदूर, ब्रिटिश इंडिया

ख्रिस शक्य तितका श्रीरंगसारखा दिसावा यासाठी रश्मीने आटोकाट प्रयत्न केले. तिच्याकडे असलेले रंगरंगोटीचे सर्व सामान तिने वापरले पण मूळचा गोरटेला ख्रिस सावळ्या श्रीरंगासारखा दिसणे शक्य नव्हते. ख्रिसच्या या तक्रारीवर "सर रात्रीच्या अंधारात तुम्ही कसे दिसता ते कोण बघत बसणार आहे?" असे रश्मीचे वैतागलेले उत्तर तयार होते. तिच्या मते ख्रिस आणि श्रीरंगची शरीरयष्टी मिळतीजुळती असल्यावर इतर कोणी शोधत बसण्याची गरज नव्हती. एवढ्या घाईघाईत दुसरा कोणी तयार करणे सुद्धा कठीण होते. ख्रिसला कोणतीच भारतीय भाषा अस्खलित बोलता येत नाही ही अडचण होती पण तेवढा धोका पत्करणे गरजेचे होते. अशी संधी पुन्हा मिळणे अशक्यप्राय होते.
ख्रिसला डोक्यावर हॅटच्या जागी मुंडासे बांधायची सवय नव्हती. त्यात त्याला तोंड झाकून घ्यायला जे कांबळे दिले होते त्याला कसलासा वास येत होता. बरं शिंकायची सोय नव्हती कारण न चुकता त्यानंतर "एक्सक्युज मी" बोललंच पाहिजे. भले आजूबाजूला एक्सक्युज करायला कोणी नसेना का! त्याला रश्मीची ही धोकादायक योजना खरं तर फारशी पटली नव्हती पण निव्वळ संशय आला म्हणून पोलिस त्याला सोबत त्यांचा कोणी माणूस द्यायला तयार नव्हते. दशमीच्या चंद्राचे चांदणे अभ्राच्छादित आकाशाच्या पडद्यामागे लपले होते. अशा अंधारात वेळेचा अंदाजही येत नव्हता. त्याने घड्याळात वेळ बघायला सवयीने खिशात हात घातला आणि त्याचे त्यालाच हसु फुटले. त्याच्या अंगावर कोट नसून बंडी होती. बंडीच्या खिशात कुठून येणार त्याचे रिपीटर घड्याळ?
"असा हसत का आहेस? कोणी आहे का तिकडे?"
ख्रिसने मागे वळून पाहिले आणि तो दचकलाच! मांजराच्या पावलांनी ती कधी आली ते कळलेच नाही. त्याच्या अगदी पाठीला खेटून ती किती वेळ उभी होती कोणास ठाऊक?! त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. त्याने मानेनेच नकार दिला. अजूनही तिचा चेहरा पदराखाली झाकलेला होता. ती कोण होती काही कळायला मार्ग नव्हता. इतक्या जवळून तिला पाहिल्यावर त्याच्या लक्षात येत होते की साधारण स्त्रियांपेक्षा हिचे हाडपेर मजबूत आहे. तिचा आवाजही नाजूक असला तरी मंजूळ नव्हता. त्याला एक प्रकारची खर होती. तिने कंबरेला खोचलेला कसा उघडला आणि त्यातून एक छोटी कुपी बाहेर काढली. तिचे झाकण उघडून तिने त्यातला द्राव ख्रिसवर शिंपडला. ते एकप्रकारचे सुगंधी द्रव्य होते. ख्रिसच्या नाकाला तो उग्र वास कांबळ्यातूनही जाणवला. त्याची कांबळ्यावरची पकड सैल झाली. त्याला आपली नजर काहीशी धूसर होत आहे असे भासले.
"चल. आपल्याकडे वेळ कमी आहे."
तो आवाज अजूनही नाजूक होता. पण आता तो बर्फासारखा थंड भासत होता. ख्रिस तिच्या मागोमाग मुकाट चालू लागला.

*****

उमा आणि रश्मी चोरपावलांनी मलिकाच्या तंबूकडे जाऊ लागल्या. त्यांनी कानोसा घेतल्यावर लक्षात आले की मलिकाचा तंबू रिकामा आहे. छोटू अजूनही तिथेच असला तरी इतर कोणीही आत नाही. उमाने हातातल्या दिव्याची वात थोडी मोठी केली आणि दोघे आत शिरल्या. छोटू शुद्धीवर आलेला होता. त्याचे तोंड बांधले असल्याने त्याचा आवाज फुटत नव्हता पण त्याची जरूरही नव्हती. उमाने दोराच्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न केला. गाठ चांगलीच करकचून मारली होती. रश्मीने मिनिटभर वाट पाहिली. मग सरळ तिने चाकू घेऊन दोर कापून काढले.
"छोटू मलिका कुठे आहे?"
"उमाताई, मलिका थोड्या वेळापूर्वी काळ्या रंगाचा पोशाख करून एकटीच बाहेर पडली. तिने सोबत एक भीतिदायक असा मुखवटा घेतला होता."
रश्मी आणि उमा काय ते समजल्या. आता घाई करणे गरजेचे होते. त्यांना सर्कसच्या तळातून बाहेर पडताना एक गोष्ट मात्र लक्षात आली नाही. संग्राम सर्कशीत नव्हता.

*****

१८९९, काल्डवेल मॅनॉर

अ‍ॅलेक्सीने ख्रिसला बाकड्यावर बसवले. आता ख्रिस १९ वर्षांचा होता. त्याची शरीरयष्टी भक्कम नाही तरी हडकुळी सुद्धा नव्हती. श्मश्रू हळूहळू दर्शन देत होती. तर कपाळावर हलकी खोक आणि त्यातून वाहणारी रक्ताची धार त्याचा आधीच लालसर गाल भिजवत होती. चार्ल्सनी चिडून आपला अ‍ॅशट्रे ख्रिसला फेकून मारला होता. अ‍ॅलेक्सीने फडताळातून प्रथमोपचार पेटी काढली. त्यातून कापूस काढून हलक्या हाताने तो रक्ताचा ओघळ पुसून घेतला. लाल गुंजेसारखा दिसणारा तो कापसाचा बोळा बाजूला ठेवला.
"किती विलक्षण आहे ना ही पेटी! तुला माहिती आहे अ‍ॅलेक्सी, १८८८ म्हणजे केवळ ११ वर्षांपूर्वी ही वस्तु अस्तित्वात नव्हती. रॉबर्ट वूड जॉन्सन नावाच्या व्यक्तीने प्रथम अशी एक पेटी असावी हा विचार केला. नव्हे तो विचार प्रत्यक्षात आणला. आता ही जंतुनाशक क्रीमची ट्यूब."
"मास्टर ख्रिस, तिला जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन ट्यूबही म्हणू शकतो" त्यातले थोडे क्रीम जखमेवर लावत अ‍ॅलेक्सी म्हणाला.
"ते नावही जॉन्सन वरूनच आले. आज अशी पेटी फक्त लॉर्ड्सच्या घरांंमध्ये किंवा रेल्वे कामगारांकडे दिसते. खरेतर ही पेटी घरोघरी आणि सर्व इस्पितळात दिसायला हवी."
"मास्टर ख्रिस, या पेटीची किंमत त्यांना परवडण्यासारखी नाही." अ‍ॅलेक्सीचे स्पॉट बँडेज बांधून झाले होते.
"एक सांगू मास्टर ख्रिस, तुम्ही सरांशी उगाच भांडण उकरून काढत जाऊ नका. ते तुमच्या प्रमाणे बहुश्रुत नाहीत. त्यांना आधुनिक जगात राहायचे नाही आणि त्यांना आधुनिक लंडनशी जुळवून घ्यायची गरजही नाही."
"अर्थात! पण मला तर तशी गरज आहे."
"नि:संशय मास्टर. पण यंग मास्टर ख्रिसचे सर ख्रिस्तोफर काल्डवेल मध्ये परिवर्तन होण्यासाठी अजून काही वेळ आहे. तसेच तुम्हाला योग्य असा वॅलेट बनण्यासाठी मला सुद्धा अजून काही वर्षे आहेत. तुमच्या डोक्यात भरलेली ही सर्व माहिती तुम्ही मला सांगत जा. त्याने तुम्ही सर चार्ल्सना अजूनच अनाकलनीय बनता."
ख्रिस उदासपणे हसला. "म्हणून ते मला त्या नावाने संबोधतात का?"
"नाही यंग मास्टर" अ‍ॅलेक्सी जवळ जवळ ओरडलाच. काही वेळ गप्प राहिल्यावर तो म्हणाला,
"यंग मास्टर, त्या संबोधनात नक्की कोणाकोणाचा समावेश होतो हे मी ठामपणे नाही सांगू शकत पण सर चार्ल्सच्या व्याख्येनुसार जस्ट बिकॉज ऑफ युअर प्रिमॅच्युअर बर्थ, यू इन फॅक्ट आर अ फ्री....."

******

ख्रिस भूत पाहिल्याप्रमाणे जागा झाला. त्याचे हातपाय जखडले होते आणि मुसक्या आवळल्या होत्या. एका अर्थाने ते चांगलेच होते. त्याच्या तोंडावर बांधलेल्या फडक्यामुळे तो कोण आहे हे ओळखणे कठीण होते. त्याने मान शक्य तितकी उंचावून बघितले तर त्याला तीन आकृत्या दिसल्या. एक तर ती स्त्री होती. उरलेल्या दोन्ही व्यक्तींनी काळी वस्त्री घातली होती. ते एका काळभैरवाच्या मूर्तीची पूजा करत होते. अर्थात ख्रिसला ती एखाद्या देवतेची मूर्ती आहे एवढेच समजले. मूर्तीच्या चेहर्‍यावर मोठे भयानक भाव होते. जर निरखून पाहिले तर लक्षात येत होते की मूर्तीचे डावे वक्षस्थळ किंचित उंचावलेले होते. उजव्या हाताने व्याघ्र मुद्रा केली होती. तर डाव्या हातांनी, होय हातांनीच कारण तिला चार डावे हात होते, सिंहमुखी मुद्रा केली होती. त्या मूर्तीतला अर्धनारीश्वर दोन डोक्यांच्या भयावह प्राण्यावर विराजमान होता. अर्थातच त्यातले उजवे डोके वाघाचे तर डावे डोके सिंहाचे होते. त्याच्या कपाळाच्या मधोमध गंधाच्या ऐवजी तेच निशाण होते. ख्रिसचे लक्ष दुसर्‍या दिशेला वेधले गेले. रश्मीने आपले काम चोख बजावले होते. तिच्यासोबत कोणी पोलिसही दिसत होता. हवा असलेला ठाम पुरावा त्यांना मिळाला होता.
त्यांची पूजा एव्हाना संपली होती. तिघांनी त्या निशाणातल्या राक्षसासारखे मुखवटे घातले होते. यानंतरही ख्रिसला एवढे कळले की उरलेल्या दोघांमध्ये एकजण पुरुष तर दुसरी स्त्री आहे. ती स्त्री तर मलिका असली पाहिजे. मग हा पुरुष कोण? रुद्र? भद्र? नागराज?
"काली, तू त्याला द्रव नीट हुंगवला नाहीस असे दिसते. हा शुद्धीवर कसा काय आला?"
मलिका त्याच्या जवळ आली आणि तिचा चेहरा वेडा वाकडा झाला. तिने आपला मुखवटा काढून फेकला. तिच्या डोळ्यात हिंस्त्र भाव तरळत होते.
"मूर्ख! कोणाला घेऊन आली आहेस?"
"कोणाला म्हणजे? आपण ठरवलेला बळी, त्यालाच घेऊन आले आहे."
"मुंबईतही हाच हलगर्जीपणा नडला होता. आपल्या बळीचे डोळे निळे आहेत का?"
घोळ झाला होता. रश्मीला ख्रिसने हातानेच खुणावले. त्याला का कोणास ठाऊक आत्ता फणींद्रचे शब्द आठवत होते.
"तुझी आत्ताची क्षमता बघता तू कधीच माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही."
अ‍ॅलेक्सी आणि बर्थोल्टचे शब्दही त्याच्या कानात घुमत होते.
"फ्री.. फ्री.. फ्री.. फ्री.."
या क्षमतांच्या बंधनातून फ्री होणे हीच माझी परीक्षा आहे का?
"वेलकम ऑफिसर. एवढा धोका पत्करायला तुम्ही तयार होत असाल तर आय ओ यू सम आन्सर्स." मलिकाने त्याच्या तोंडावरचे कापड सोडले. त्या दुसर्‍या पुरुषानेही आपला मुखवटा दूर केला. तो भद्र होता. तिने मात्र आपला चेहरा उघड केला नाही.
"तिचा चेहरा तू बघू शकणार नाहीस. आमच्या म्होरक्याचा चेहरा त्याच्या कोणी बाह्य व्यक्ती कधीच बघू शकत नाही. आम्ही कोण आहोत हे सांगणे थोडे कठीण आहे. इतके सांगेन की माझे खरे नाव मलिका नाही. माझे खरे नाव आहे सुलक्षणा! ही सुद्धा कोणी साधीसुधी असामी नाही. एका संस्थानिकाची ही अनौरस वंशवेल आहे. हां आता त्या संस्थानिकांच्या वंशजांनाही ठाऊक नसेल की असे कोणी अस्तित्वात आहे. मोठा अजब दैवयोग आहे."
"पण हे सर्व का? आणि जर ही कोणी राजकुमारी असेल तर या सर्वांची, इव्हन या सर्कशीची तरी काय जरूर?"
"हाहाहाहा. ते तुझ्या समजूतीच्या पलीकडचे आहे. आम्हाला एका विशिष्ट व्यक्तीची, किंबहुना मुलीची, जरूर आहे. जर ती मुलगी आपल्या आईवर गेली असेल तर हे हत्याकांड थांबवायला पुढे आल्याखेरीज राहणार नाही. म्हणून आम्ही मुद्दामून प्रत्येक बळीवर आमची मोहोर लावतो. या बळीसत्रामागे इतरही हेतु आहेत पण ते तुला कळून काही उपयोग नाही. एनीवे आम्हाला जयाची मुलगी सापडेलच. तिला शोधण्याचे इतरही मार्ग आहेत."
उमाला लक्षात आले की रश्मी संतापाने थर थर कापत आहे. रश्मीच्या डोक्यातली साखळी पूर्ण झाली होती. तिच्या आईचे नाव जया होते. त्या दिवशी तिच्या घरात आलेल्या बाईचे नाव सुलक्षणा होते. सुलक्षणाच मलिका होती. मलिका काही कारणाने रश्मीला शोधत होती. का ते तिला माहित नव्हते, पण तिचा राग अनावर व्हायला एवढे पुरेसे होते.
"सुलक्षणा!!" रश्मी अचानक त्यांच्या समोर प्रकट झाल्यामुळे काही क्षण ते तिघे गोंधळले. ख्रिसचे हात बांधले होते म्हणून अन्यथा त्याने निश्चित कपाळावर हात मारून घेतला असता.
"मी, मी आहे जयाची मुलगी. माझ्या आईचे काय झाले हे मला कधीच समजले नाही. पण तुला इथे बघून मी अंदाज लावू शकते. तुझ्या इष्टदेवतेस आठव. आज मी तुला सोडणार नाही."
"हाहाहाहाहाहाहाहा." मलिकाला अचानक हसू फुटले. "सर, तुम्ही तर कमालच केलीत. आम्ही जिला शोधत होतो, तिला गिफ्ट व्रॅप करून आम्हाला आणून दिलंत की. थॅंक यू सर! काली, याला फार यातना देऊ नकोस. एका फटक्यात संपव. एवढं तर आपण याच्यासाठी करूच शकतो. भद्रा, पकड तिला!"
आता अ‍ॅक्शन घेणे जरूरी होते. त्या पोलिसाने आपली बंदूक काढून भद्रावर गोळी झाडली. भद्र खाली कोसळला. उमाने कालीचा कट्यारीचा हात धरून तिला दूर ढकलले. रश्मी जाऊन मलिकाला भिडली. त्या पोलिसाने मग कालीशी दोन हात करायला सुरुवात केली. तिचे कट्यारीचे वार चुकवून नेम धरणे सोप्पे काम नव्हते. त्याने संधी बघून तिच्या हातावर पिस्तुलाच्या दस्त्याचा फटका मारला. तिची कट्यार खाली पडली. लगेच त्याने पिस्तुल रोखले. पण दैवाला काही वेगळेच मंजूर होते. त्याचे डोके दरडीतले दगड कोसळतात तसे त्याचे शरीर जमिनीवर कोसळले. भद्र जखमी नक्की झाला होता. पण तो जिवंत होता.
"भद्रा ....."
"काली, माझी अखेर इथेच होणार असे दिसते. तू इथून निसटायला हवंस."
"कोणी कुठे जाणार नाही आहे." उमाने ख्रिसची बंधने तोडली होती.
"काली तू इथून जा."
"पण भद्रा...."
"माझ्यात अजून इतकी शक्ती बाकी आहे की मी याला थोपवून धरू शकतो. तू इथून जा. मलिकाला सोबत घेऊन इथून जा"
भद्राच्या हातात खड्ग होते तर ख्रिस नि:शस्त्र होता. भद्र थोड्याच वेळाचा सोबती होता तर ख्रिसला कसलीच शारिरिक इजा झालेली नव्हती. सामन्यातल्या दोन विषमता एकमेकांना समान करून जात होत्या. भद्राने दात ओठ खाऊन तलवार चालवली. ख्रिसने शिताफीने तो वार चुकवला आणि दगडावर लोखंड आपटून टण्ण असा आवाज झाला. दोघांपैकी एकजण नक्की मरणार होता, प्रश्न हा होता की एकजण जिवंत वाचणार का?

*****

मलिका रश्मीपेक्षा अधिक अनुभवी होती. थोड्याच वेळात रश्मीच्या अंगावर हलक्या जखमांचे जाळे विणले गेले. पण रश्मीकडे तरुणपणासोबत येणारे चापल्य होते. ती मलिकाच्या काहीशा शिथिल हालचालींचा फायदा घेऊन खोल जखम होऊ देत नव्हती. हे सर्व होत असताना मलिका एका दगडाला ठेचकाळली आणि रश्मीने जोर लावून चाकू मलिकाच्या पोटात खुपसला. रश्मी आणखी एक वार करणार इतक्यात ती एका बाजूला फेकली गेली. कालीने तिच्या कंबरेत सणसणीत लाथ घातली होती. मलिकाला आधार देऊन तिने उठवले आणि तिथून निघायला सुरुवात केली. तिला थांबवण्यासाठी उमा धावली पण उलट्या हाताची एकच बसली व उमा जमिनीवर कोलमडली. कालीने मलिकाला पाठुंगळीवर घेतले आणि भरधाव वेगाने सर्कसकडे जायला सुरुवात केली.
"काली तुला हे लोक कुठे थांबले आहेत ते लक्षात आहे ना?"
"हो. छोटूला ते विचारून तू चांगले काम केलेस. अर्थात तेव्हा आपला हेतु वेगळा होता. पण आता याचा मोठाच फायदा होईल."
"हो आपल्याला या मुलीच्या सामानाची झडती घ्यायलाच हवी."
रश्मीने कालीचा पाठलाग करायचा प्रयत्न केला. पण तिची पाऊले जागच्या जागीच थांबली. तिचा रस्ता अडवून संग्राम उभा होता. त्याची गर्जना कोणालाही गर्भगळित करण्यासाठी पुरेशी होती.

******

ख्रिसचे शरीर लवचिक असले तरी तो काही योद्धा नव्हता. त्याने फेन्सिंगचे धडे गिरवले असले तरी तो ड्युअलिस्ट नव्हता. भद्र मात्र निष्णात तलवारबाज वाटत होता. त्याची जखम प्राणांतक स्वरुपाची नसती तर ख्रिस बहुधा दोन मिनिट सुद्धा टिकला नसता. आज मात्र ख्रिसने त्याचे सर्व वार चुकवले. मोठ्या धैर्याने तो भद्राचा सामना करत होता. एवढ्यात दोन स्त्रियांच्या किंकाळीने त्यांचे लक्ष विचलित झाले. रश्मी आणि उमा धावतच तिथे आल्या. संग्राम त्यांच्या मागावर होता. पाठोपाठ ख्रिस किंचाळला. क्षणभराचा गलथानपणा त्याला महागात पडला होता. भद्राला ग्लानी आली होती म्हणून ख्रिसचा केवळ खांदा सोलवटला गेला. इतर दिवशी त्याचा हात खांद्यापासून वेगळा झाला असता. ख्रिसला आपल्या हाडाचा पांढरा तुकडा दिसू शकत होता. त्याचे मासकड लोंबत होते.
"तुम्हा दोघींकडे तर मी नंतर बघतो. आधी याची पाळी. तसेही संग्राम तुम्हाला जिवंत सोडेल का शंकाच आहे. संग्राम ...."
संग्राम त्या दोघांच्या दिशेने येत होता. त्या सिंहाला ख्रिसने आधी पाहिलेले असले तरी इतक्या जवळून त्याचा सामना प्रथमच होत होता. संग्रामने अचानक जांभई दिली. त्याचा कराल जबडा आणि त्यातून डोकावणारे सुळे कोणाचाही थरकाप उडवण्यासाठी पुरेसे होते.
"ओह्ह. तुला हा पाहिजे? दिला. हा बळी तुझा." भद्र आपला मोर्चा त्या दोघींकडे वळवणार इतक्यात त्याला काहीतरी चुकत असल्याची जाणीव झाली. संग्राम कसला तरी वास घेण्याचा प्रयत्न करत होता. ख्रिसला काही कळेना, हा प्राणी नक्की काय करण्याचा प्रयत्न करत आहे. भद्रही क्षणभर आश्चर्यचकित झाला. मग त्यातल्या रिंगमास्टरला काय घडते आहे ते लक्षात आले.
"हे काळभैरवा! त्याला तुझ्यापासून तो वास येत असणार. संग्राम, संग्राम माझं ऐक. तो कोणी वेगळा आहे...."
संग्राम भद्राच्या दिशेने वळला. संग्रामने उत्तरादाखल गर्जना केली. भद्राच्या हातून तलवार गळून पडली. संग्रामने त्याच्यावर झेप घेतली आणि भद्राच्या नरडीचा घोट घेतला. त्याची आवश्यकता नव्हती. भद्राची हृदयक्रिया त्या आधीच बंद पडली होती. यानंतर संग्राम रश्मी आणि उमाकडे वळला. ख्रिसप्रमाणेच त्याही पुरत्या गोंधळल्या होत्या. ख्रिसने कसेबसे स्वतःला सावरले आणि जमिनीवर पडलेली बंदूक उचलली. त्याचा खांदा आता ठणकत होता. त्याने नेम धरून चाप ओढला. जखमी हाताने नेम बसणे कठीणच होते. दोघांमध्ये फारसे अंतर नसतानाही नेम चुकला आणि गोळी जमिनीत घुसली. संग्राम आता पुरता बिथरला. त्याने आणखी मोठ्याने गर्जना केली. ती जेवढ्या त्वेषाने केली तेवढ्याचे वेगाने तो शांतही झाला. एखादे शिंग फुंकल्यासारखा आवाज आसमंतात घुमला. संग्रामच्या मालकाने त्याला परत बोलावले होते. संग्राम तसाच परत फिरला. तो गेल्यानंतरही ते तिघे कितीतरी वेळ स्तब्ध होते. आधी ख्रिसच्या हातातून पिस्तुल खाली पडले आणि मग तो मटकन जमिनीवर बसला. आजची रात्र सरली होती. इतर पोलिस त्या तिघांच्या मागे येत होते. भद्राचे शव, ती मूर्ती अशा अनेक गोष्टी तिथे पुराव्यादाखल होत्या. तर शुद्धीवर येणारा जखमी पोलिस त्यांचा साक्षीदार होता.

~*~*~*~*~*~

२ ऑक्टोबर १९११

दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे सर्कशीवर छापा पडला. शक्य तितक्या गोपनीय पद्धतीने सर्वांना नजरबंद करण्यात आले. त्यांचा मुक्काम मुद्दामून शहरापासून आणखी दूर हलवण्यात आला. शहरातल्या कोणालाही काय झाले ते कळू दिले गेले नाही. श्रीरंगची ख्रिसने नंतर भेट घेतली आणि त्याला जरूर तपशील सांगितले. त्याच्या सर्व परिवाराने ख्रिसचे आभार मानले पण ते ऐकून घ्यायला ख्रिसकडे वेळ नव्हता. म्हणा उशीर झाल्यावर वेळ कुठचा असायला?
संपूर्ण तळ पिंजून काढल्यानंतरही मलिका, रुद्र, त्याचा सिंह संग्राम आणि ती रहस्यमय स्त्री काली यांचा पत्ता लागू शकला नाही. त्यांचे सामान असे काही गायब झाले होते की जणू अशा व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हत्या. ख्रिसने एकीकडे सर्कशीतल्या इतर व्यक्तींची चौकशी करायला सुरुवात केली.
"तुझे नाव नागराज नाही का?"
"हो सर."
"नागराज, मी जेवढे शोज पाहिले त्यात फक्त तुझ्या शोमध्ये विशेष सुगंधी द्रव्यांचा वापर केला जात होता."
"सर, मी नाग सापांचे खेळ करतो. या खेळात लोक भारले गेले तर ते सापांना दचकवत नाहीत. मग खेळ दाखवणे सुकर होते."
"बरोबर. पण नागराज, ही सुगंधी द्रव्ये कशी वापरायची ते माहिती असलेला तू एकटाच नाहीस."
"म्हणजे?"
"म्हणजे मला एक बाई माहिती आहे. ती सुद्धा अशी द्रव्ये वापरते. तू तिला ओळखतोस का ते मात्र मला माहित नाही."
नागराजने एकवर खोल श्वास घेतला. "सर, मी काय ते समजलो. मी तुमची काही प्रमाणात मदत करू शकतो. ही एक मोठी गोष्ट आहे."
"माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे."
"ठीक आहे. तर ..."
".. सॉरी टू डिस्टर्ब यू सर." एक हवालदार आत येत म्हणाला. तो ख्रिसच्या कानात काही कुजबुजला.
"ओह्ह. इंटरेस्टिंग! त्यांना आत घेऊन ये. नागराज, आजची रात्र आमचा पाहुणचार स्वीकार. उद्या तुझी गोष्ट आपण बसून ऐकू."

******

आता ख्रिस समोर ओल्गा, मीर आणि येलेना बसले होते. ओल्गाच्या डोळ्यात तिरस्काराचे भाव स्पष्ट दिसत होते. येलेना काहीशी घाबरलेली होती. तर मीर वरकरणी तरी शांत दिसत होता.
"काही विचारण्या आधी मला काही सांगायचे आहे. तुम्ही तिघे मूळचे रशियन वंशाचे नाही का? सध्या रशियात मोठी धांदल आहे. तिथले अनेक नागरिक झारच्या जुलूमशाहीला कंटाळून स्थलांतर करत आहेत. आणि हे आजचे नाही बरं का? हे सर्व गेल्या दशकभरापासून सुरू आहे."
"आम्ही त्यापैकीच एक आहोत." मीर इंग्रजीत उत्तरला. त्याचा इंग्रजीला तीव्र रशियन झाक होती.
"ऑर प्रिसाईजली, त्यांचे वंशज आहात. गेल्या दशकभरात भारतातही काही इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत. मोर्ले-मिंटो सुधारणांमार्फत व्हाईसरॉय हार्डिंग्जला अनुकूल मत तयार झाले असले आणि बंगालची फाळणी रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्यांची लोकप्रियता वाढवण्यात ते यशस्वी झाले असले तरी एक गट त्यांच्या आणि एकंदरीत राजे पंचम जॉर्जच्या विरोधात आहे."
"त्याच्याशी आमचा काय संबंध?" येलेना काहीशी घाबरून म्हणाली.
"कसं आहे या गटाला सशस्त्र उठाव करायचा आहे. एक परदेशी या नात्याने मी भारतीयांनी काय करावे आणि काय करू नये याविषयी काही भाष्य करणार नाही. पण ब्रिटिश साम्राज्याचा नोकर या नात्याने त्यांना थोपवणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना शस्त्रे आणि शस्त्रे बनवण्याचा कच्चामाल कुठून मिळतो यावरही मी लक्ष ठेवून असतो. मी आधी फक्त ऐकले होते की अफगाणिस्तानात वसलेल्या रशियन्स मार्फत या सगळ्याचा एक हिस्सा भारतात येतो. पण ते जिथे हवे ते पोहोचवण्याचा मार्ग एका सर्कशीतून जातो हे माझ्या डोक्यात कधीच आले नसते."
ओल्गा उत्तरादाखल ख्रिसवर थुंकली. ख्रिसने रुमाल काढून आपला चेहरा पुसला.
"मी तुला मदत केली त्याचे हेच फळ मला मिळणार आहे का?"
"वेल, तू ज्यांच्या विरोधात मदत केलीस त्यांनी त्यांचा कार्यभाग साधल्यावर तुम्हा सर्वांना तसेही ठार केले असते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मी तुझा जीव वाचवला आहे. आणि जर एवढं सगळं म्हणतच आहेत तर सर्कशीत उरलेल्या हत्यारांची विल्हेवाट लावायची काय गरज होती?"
"सर" मीरने आवाज थोडा उंचावला. ख्रिसने हातातला दंडुका खाली ठेवला. तो मीरच्या जवळ येऊन उभा राहिला.
"सर मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. या दोघींना इजा करायची काहीच गरज नाही. आम्ही इथून कुठेच पळू शकणार नाही हे मला माहिती आहे. त्यापेक्षा तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली तर .."
"तर किमान शिक्षा कमी तरी होईल. यू हॅव द राईट आयडिया. मी तुमच्यासाठी शिफारस करेन. वेल, अर्थातच मला तुमच्या सर्व यंत्रणेची माहिती हवी आहेच पण इन द शॉर्ट टर्म, आन्सर धिस वन क्वेश्चन. गेल्या काही महिन्यात युगांतरने एखादी विशेष ऑर्डर दिली होती का?"
मीरने डोके खाजवले. येलेना आणि ओल्गालाही अशी कोणती ऑर्डर आल्याचे आठवेना. ख्रिस काहीसा खट्टू झाला.
"एक मिनिट सर. एक विशेष ऑर्डर होती खरी पण ती युगांतर कडून नव्हती."
"मग?"
"ओल्गा, तूच सांग"
"मुंबईत जो माणूस मारला गेला, त्याने ही ऑर्डर दिली होती. त्याने पैसे पूर्ण दिले होते आणि कलेक्ट इंदूरात कोणी वेगळाच इसम करणार होता. त्यामुळे आमचा नंतर काही संपर्क झालाच नाही. आणि तुम्ही तो मरण पावला हे सांगितल्यानंतर आम्हा तिघांनाही धक्का बसला होता."
"बर्थोल्टने ऑर्डर दिली होती? मग ती कलेक्ट कोणी केली?"
"कोणी जर्मन होता सर." मीर म्हणाला. " मी कालच त्याला डिलीव्हरी देऊन आलो. जरा विचित्रच होता. त्याच्या खांद्यावर एक यांत्रिक पोपट होता आणि तो पूर्ण वेळ त्या पोपटामार्फत बोलत होता."
ख्रिसला या मागचा भयंकर अर्थ लगेच लक्षात आला. त्याने त्वरित रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली.

*****

ख्रिसला स्टेशन मास्टर गाठायला फार सायास पडले नाहीत. पण त्या स्टेशन मास्टरच्या इंग्रजीला जबरदस्त इंदूरी लहेजा होता. ख्रिसला त्याचे उच्चार काही केल्या कळेनात. अखेर एक दुभाषा आल्यानंतर त्यांचा संवाद होऊ शकला.
"पण मी तुमचे का ऐकू?"
"आय हॅव स्पेशल परमिशन! मी तुम्हाला सर्च ऑर्डर्स देऊ शकतो हे लक्षात घ्या. आणि जर त्या पाळल्या नाहीत तर थेट व्हाईसरॉय ऑफिसमधून तुमचं टर्मिनेशन लेटर टाईप करवून घेण्याची सोयही मी करू शकतो."
"धमकी देताय?"
"माझी इच्छा तर नाही आहे. उगाच आडमुठेपणा करणार असाल तर मात्र नाईलाज आहे."
"प्रश्न असा आहे सर की या ऑर्डरमध्ये काही अर्थ नाही आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे तुम्हाला एक असा माणूस पाहिजे जो खांद्यावर यांत्रिक पोपट घेऊन हिंडतो. बरोबर?"
"हो."
"तो माणूस कालच ट्रेनने अलाहाबादकडे रवाना झाला."
ख्रिसचा चेहरा आत्ता पाहण्यासारखा होता.

~*~*~*~*~*~

आज रात्री ख्रिसला होळकरांकडून खास आमंत्रण होते. ख्रिसचा खरं तर मूड नव्हता पण संस्थानिकांचे आमंत्रण नाकारणे ब्रिटिश साम्राज्याच्या इभ्रतीला शोभून दिसले नसते. त्यात होळकर तर मोठीच असामी होते. या संस्थानाला १९ तोफांची सलामी दिली जात असे जी सर्वाधिक २१ तोफांच्या सलामीच्या खालोखाल होती. त्यांचे आमंत्रण नाकारण्याचा प्रश्नच येत नव्हता. ख्रिस रश्मीला सोबत घेऊन गेला. रश्मीने यथेच्छ भोजन केले तर ख्रिस त्या पंचपक्वान्नांनी भरलेल्या थाळीतले जिन्नस मोजूनच दमला. रात्री ते दोघे चालत आपल्या निवासस्थानी परत जाऊ लागले. होळकरांनी त्यांना घोडागाडीतून सोडण्याची व्यवस्था केली होती पण ते थोडे आधीच उतरले. जेवण पचवण्यासाठी शतपावली करणे गरजेचे होते.
"आता काय करणार आहेस?"
"जोसेफ आणि सर मॅक्सवेलना कळवण्याची व्यवस्था केली. सर मॅक्सवेल तर मुंबईतून हलू शकणार नाहीत. मी शक्यतो अलाहाबादला जाईन. तिथून जोसेफ सोबत तपास पुढे नेता आला तर डेव्हिड आणि फणींद्र दोघे हातात पडू शकतील. प्रश्न हा आहे की तू काय करणार?"
"मी ? ..."
"जर तुला काही सुचत नसेल तर माझ्याकडे अजूनही मेडची जागा रिकामी आहे. अ‍ॅक्चुअली, मोअर ऑफ अ वॅलेट लाईक जॉब! "
रश्मी यावर मनापासून हसली. "पण मी अ‍ॅलेक्सी इतकी चांगली वॅलेट होऊ शकणार नाही."
"वी विल सी"
आणि ते दोघे थबकले. त्यांच्या निवासस्थाना बाहेर एक सिंह होता. शंकाच नको, तो संग्राम होता. त्याच्यावर लाल साडी नेसलेली एक स्त्री होती. धप्प असा आवाज आला. पहिल्या मजल्यावरच्या खोलीतून रुद्रने खाली उडी मारली होती. त्याने ख्रिसला पाहिले. दोन बोटे कपाळाला टेकवून मग त्याने ती ख्रिसच्या दिशेने उंचावली. तो संग्रामवर स्वार झाला आणि ते तिघे हा हा म्हणता गायब झाले.
"सी यू लेटर .." ख्रिस स्वत:शीच पुटपुटला. त्याने आणि रश्मीने ती खोली गाठली. ती ख्रिसची खोली होती. ख्रिसच्या सामानाची उचकापाचक केलेली स्पष्ट दिसत होती. सगळी खोली अस्ताव्यस्त होती.
"ते इथे काय शोधत होते?"
"ते जे शोधत होते ते त्यांना मिळाले." ख्रिस म्हणाला.
"तुझी खोली सुद्धा अशाच अवस्थेत असणार. त्यानंतरच त्यांनी माझी खोली धुंडाळली असणार. तुझ्या आईने तुला दिलेली कागदपत्रे ते घेऊन गेले."

~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66341

Group content visibility: 
Use group defaults