सातूचं पीठ - कृती आणि करून खाण्याचे प्रकार

Submitted by योकु on 31 May, 2018 - 09:32
लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

सातूचं पीठ तयार करण्याकरता:
अर्धा किलो गहू
अर्धा किलो पंढरपुरी डाळवं (चिवड्यात वापरतो ते)
अर्धा चमचा (टी-स्पून) सुंठ पूड
पाव चमचा (टी-स्पून) वेलची पावडर

पुढील कृती करता:
तिखट प्रकार
- तयार सातूचं पीठ अर्धी ते एक वाटी
- पाव ते अर्धी वाटी जाडे पोहे
- २ काकड्या
- हवा असेल तर एक कांदा
- आवडत असेल तर एखादी हिरवी मिरची
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ, साखर आणि लाल तिखट (तिखट मसाला नको)
- मोसमात असेल तर अर्धी कैरी

गोड प्रकार:
१. गोड पीठ
- तयार सातूचं पीठ अर्धी ते एक वाटी
- आवडीनुसार गूळ
- दूध किंवा पाणी
- आवडत असेल तर थोडं खवणून घेतलेलं ओलं खोबरं किंवा जरासा सुक्या खोबर्‍याचा कीस

२. लाडू
- तयार सातूचं पीठ एक वाटी
- साखर आवडीप्रमाणे
- तूप

क्रमवार पाककृती: 

पीठ तयार करण्याची कृती:
- गहू धूवून जरावेळ (१०-१५ मिनिटं) भिजवून नंतर कपड्यावर काढून निथळावेत.
- जरा ओलसर असतांनाच खल-बत्याच्या मदतीनं हलक्या हातानी कांडून, फोलपटं काढावीत
- नंतर हे फोलपटं काढलेले गहू पूर्ण वाळवावेत
- वाळलेले गहू लोखंडी कढईत मंद आचेवर खमंग, लालसर भाजावेत
- आता भाजलेले गहू + पंढरपुरी डाळवं घरगुती चक्कीवरून दळून आणावेत
- डाळवं खुटखुटीत नसेल तर तेही जरा शेकवून घ्यावेत (हे भाजायचे नाहीत)
- तयार झालेल्या पिठात सुंठपूड आणि वेलचीची पूड घालून एकदा चांगलं मिसळावं आणि मग चाळून घ्यावं.
- ते पीठ तयार झालं
- कोरड्या बरणीत/डब्यात भरून ठेवावं आणि लागेल तसं वापरावं. पुष्कळ दिवस टिकतं हे.
या पिठापासून पुढे दिलेले प्रकार करता येतील.

तिखट प्रकार
- पोहे जरा तेलावर भाजून, कुरकुरीत करून घ्यावे
- काकडीची सालं काढून, कोचवून घ्यावी
- कांदा (वापरत असाल तर), हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
- कैरी असेल तर तीही अगदी बारीक चिरावी
- आता पिठात तळलेले पोहे, काकडी, कैरी, कांदा, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर आणि लाल तिखट घालून नीट मिसळून घ्यावं
- जरा सुटंसुटंच राहातं हे पण खायला भारी चविष्ट प्रकार. खातांना चमच्यात थोडासाच घेऊन खावा, नाहीतर पार चिकट तोंड होईल आणि तोठरा बसेल.
हा फोटो
Satoo.jpg

गोड प्रकार:
१. गोड पीठ
- तयार सातूच्या पिठामध्ये बारीक चिरलेला गूळ, दूध, मिठाची कणी आणि आवडत असेल तर ओलं/सुकं खोबरं घालून दाटसर पळीवाढी कन्सिटंसीचं करावं
- वाटीत घेऊन चमच्यानी किंवा थेट वाटीनीच प्यावं

२. लाडू
- सातूच्या पिठात चवीप्रमाणे पिठी साखर किंवा मिळाली तर बुरा साखर नीट मिसळून त्यात गरम तूप घालून लाडू वळावे.
- चविष्ट लाडू तयार

वाढणी/प्रमाण: 
खाल तसं
अधिक टिपा: 

- पीठ तयार करण्याचं प्रमाण १:१ आहे. सुंठ, वेलची गोड प्रकार करतांना आवडीप्रमाणे वाढवता येतील.
- तिखट प्रकारात कुठलीही भाजी किसून/ठेचा प्रकार करून घेऊ नका. पदार्थ नीट होत नाही. एक्स्पेक्टेड टेक्श्चर आणि पर्यायानी चवही साधणार नाही. फुप्रोतून एक ब्लिट्झ देऊन चालतील भाज्या.
- पोहे जरा तेलावरच करणं आवश्यक आहे. नुसते भाजून घेतले तर त्याला पीठ चिकटणार नाही.
- पीठ तयार करायलाच काय तो वेळ लागतो. नंतरच्या कृती फटाफट होतात.
- उन्हाळ्यात मोस्टली हा प्रकार शक्यतो केला आणि खाल्ला जातोच आमच्या घरी कारण सातूचं पीठ थंड असतं आणि एकदा खाल्लं की बराच वेळ भूक धरवते
- सकाळच्या नाश्त्याला गोड पीठ ५ मिनिटात होतं. यात गूळाऐवजी साखर वापरली तरीही चालेल.
- तान्ह्या बाळांनाही हे देता येतं; त्यांच्याकरता तयार करतांना चमचाभर पीठ, अर्धा चमचा साखर, कणीभर मीठ हे अर्धे दूध, अर्धे पाणी वापरून पातळ (कढी/पन्ह्यासारखं) करून मग भरवावं (आवश्यक वाटलं तर पेडीचा सल्ला नक्की घ्यावा)

माहितीचा स्रोत: 
आई, आज्जी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

चिकट तोंड होईल आणि तोठरा बसेलचा फोटो कुठंय?
---
मग भैये लोक खातात ते सत्तु कोणतं?
--
पुराणात सातु हे धान्य दिलय ते म्हणजे बार्ली?

सातूचे पीठ करायची कृती आणि त्याचे प्रकार सगळे कसे छान निगुतीने केल्यासारखे लिहिलेय!>>>> +1
भैये लोग जव किंवा चना सत्तु खातात.
सत्तु भरां परोठा आवडतो आणखी एक प्रकार त्याला पीठपोहे म्हणतात तो चिवडा त्याला सत्तु पीठ लावायचं. तो ही चांगला लागतो।

>> पुराणातील सातू हे धान्य = जव = बार्ली (माझ्या माहितीनुसार.)

योक्या, योकुसान खायला लागला वाटतं सातूची खीर. Happy

भय्ये लोक खातात ते फुटाण्याचं पीठ असतं (चने का सत्तू)
त्याचं सारण भरून बिहारात लिट्टीचोखा नामक दालबाटीचा पूर्वभारतीय चुलत भाऊ असलेला खाद्यपदार्थ बनतो (नीट जमला असेल तर महान लागतो). तसंच त्याचं सारण भरून बंगालात मैद्याच्या पुर्‍या करतात. मोहरीचं तेल, कांदा, मिरची, मीठ घालून कालवून खातात - विशेषतः बिहारी कष्टकर्‍यांचं दुपारचं स्ट्रीट फूड आहे हे आमच्या इथे. किंवा मग नुसतंच दूध किंवा पाणी घालून साखर घालून खायचं. ताक, मीठ घालूनही छान लागतं.

पहिल्यांदाच बघतेय ह्या पाकृत्या.
मला वाटलं होतं की गोड/ तिखट धिरडी / पोळे टाईप काही करायचं असेल पण हे तर नुसतंच कालवुन खायचंय Uhoh

गहू धूवून जरावेळ (१०-१५ मिनिटं) भिजवून नंतर कपड्यावर काढून निथळावेत.
- जरा ओलसर असतांनाच खल-बत्याच्या मदतीनं हलक्या हातानी कांडून, फोलपटं काढावीत >> मी सुध्दा दरवर्षी करते उन्हाळ्यात. फक्त या दोन स्टेपमधे थोडासा फरक .... गहू भिजवून घेत नाही. म्हणजे थेट पाण्यात बुडवत नाही. पाण्याचा हात लावून थोडावेळ झाकून ठेवते. मग फुड्प्रोसेसर मधे कणीक भिजवायचं ब्लेड लावून फोलपट काढून घेते. परत थोडा पाण्याचा हात लावणे, झाकणे.... अस ३ - ४ वेळा केल की सगळी साल सुटून येतात. आजी सुध्दा बत्ता वापरत नसे. लाकडाचा एक बत्त्या सारखा सोटा होता, त्याने गहू कांडत असे. बत्त्याने गहू फुटतात असं म्हणत असे

छान लिहिलंय, अगदी ओघवतं.

पीठ करणे थोडं कठीण वाटतंय. पण तो पोहे प्रकार आवडला मला. विकत मिळते इथे. ते आणेन आणि पोहे करून बघेन.

लहानपणीचं इन्स्टन्ट फूड. ते पण कार्ब्स अन प्रोटीन दोन्हीवालं, प्लस दूध का गुड्नेस. होस्टेलला असतानाही सोबत दिलं जायचं. मॅगी तोपर्यंत सुरू झालेली नव्हती.

आजकाल केलं जात नाही, अन त्यामुळे खूप दिवसांत खाल्लंही नाहिये. (मेतकुट हा बर्‍याच दिवसांत न खाल्लेला असाच एक दुसरा आयटम)

आमच्यात सातूच्या पिठात सुंठ वेलची घालत नाहीत. नुसतं पाण्यात भिजवून साखर घालून खाल्लं तरी छान लागतं. ते लापशीसारखं करण्याऐवजी चमच्याने खाता येईल असं घट्ट बनवले जाई.

आ रा रा, मेतकूट तर माझाही अशक्त बिंदू.
पोळीवर जरा तेलासोबत माखून, भातावर, कच्च्या पोह्यांत ई. कुठेही वापरायला फार आवडतं.
कालवलेलं मेतकूटही भारी असतं चवीला.