बब्या

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 May, 2018 - 14:15

बब्या
आज अचानक सामानाची आवराआवर करताना माझा एक लहानपणीचा जुना फाटका निळा शर्ट पत्नीच्या हाती लागला . काही जुन्या रोजनिश्या आणि हा शर्ट एका ट्रंकेत तिला मिळाला .

पत्नी म्हणाली " हे काय आठवणीत चिंध्या पण " .
मी म्हणालो " जीर्ण आठवणी सुध्दा मनाला तजेला देतात . "
जीर्ण वाडा किंवा किल्ला आपलीच कहाणी आपल्यालाच कथन करतो आणि हरवतो गत काळच्या भल्याबुर्या आठवात. मनाची भटकंती अगदी लहानपणी जत्रेत पाहिलेल्या जादुई सिनेमा पेटीसारखी .
आपलाच जीवनपट आपल्यासमोर उलगडू लागतो .

एखाद्या तुंबलेल्या पाण्याचा बांध फुटावा तसे आठवणीचा निचरा होइपर्यंत मन वहातच राहतं अन आपल्याला हे निचरा होणारं पाणी अडवावं असही वाटतं नाही .

मी सुध्दा वर्तमानाचे काटे उलटे फिरवित कधी भूतकाळात प्रवेश केला समजले नाही .

मंडळी म्या झेडपीच्या साळत व्हतो तवाची गोष्ट . आमच्या बाला वाटलं पॉरगं डोक्यानी बरं हायं . साळतं घातलं तर चार बूकं शिकल म्हून गावातल्या झेडपी च्या साळत घातलं. अब्यासात हुशार व्हतो अस बा ला वाटायचं .

" प्वारगं शरीरानी तंदुरुस्त असलं तर अब्यास नीट व्हैल" आसं आय म्हणायची .
बाला सुदिक हे पटायचं .

मग गाय इकत आणायचा ठराव झाला . आईचं कनवटीला लावल्याल थोडं पैकं अन एक शॅरडं इकून येतील त्या पैक्यात देशी गाय आणायच ठरलं .

बा बाजाराच्या दिशी शेरडी घेउन गेला . मला लै वाईट वाटलं शेरडी इकायची म्हणल्याव .
लहाण करडू असल्यापसनं म्या खेळायचो तिचाशी . टूण टूण उड्या मारायचं हरणावाणी . धरायला गेलं त दमछाक व्हयाची.

शेरडं इकलं आन एक देशी कालवड घेउन बा घरी आला .
घरी आल्या आल्या आय ताटलीत निरांजन आन हाळद कुकू घेउन गोठयात कालवडीला ववाळाय आली . आयेनं तिच्या चारी पायावं पाणी टाकलं तसं गायनी पुढचं पाय थोड तिथल्या तिथं हालावलं . तिला हाळद कूकू लावताना मान हालावली . डोक्याव वाइच तांदूळ टाकलं . आन मंग ववाळलं .

गाय खिल्लारी व्हती . शिंग अक्षी बाकदार आन टोकदार . वशिंड तर लै झोकदार . आन मानं खाली मांडवाच्या झालरी सारकी हालणारी कातडी झालर . अंगाव नवतीचा तजेला . रंग गव्हाळ , डोळ पाणीदार आन झुपकेदार लांब शेपूट .
आयनी बा ला तिच नाव इच्यारलं .
बा म्हणला " गव्हळी "

मोठं झाल्याव मला कळलं गाय , बैलाची नावं रंगावरून पण ठेवत्यात . कवाकवा गाय , शेळी , म्हशीची नावं बायकांच्या नावावरुनही ठेवत्यात . जस की रखमी , दगडी , सरु ( सरी ).

आमी समदी गव्हळीचं खूप लाड करायचो . तिला चारापाणी आगदी यळच्यायळी द्यायचो . गोठा यवस्तित साफ करायचो . सुट्टी आसली की म्या रानात चरायला न्यायचो . रोज आय नायतं बा न्यायचा . तिला भरपूर हिरवा चारा घालायचो . गव्हळीला आमचा लळा लागला .

आता गव्हळी तजेलदार दिसत व्हती . थोड्याच दिसात गव्हळी गाभण हाय आसं आय बा च्या ध्यानात आलं . गव्हळीची इशेष काळजी घ्याया लागलो. तिला बा नी डाक्दरला दावलं . आय वरचेवर धुवायची .

आसं करता करता एक दिस गव्हळीला एक सुंदर वासरु झालं . आयनी गव्हळी गरम पाण्यानी धुतली . वासरू बी धुतलं .

बानं त्याला पाय धराया शिकवला . आन थोड्याच यळात ते सावरत सावरत दुधबी प्याया लागलं . मला नवाल वाटलं .

म्या बा ला म्हणलं "बा म्या किती दिसात चालाया लागलो ? "
बा " आसल वरिसभर "
मी " किती मजा हाय ना माणसाचं प्वार चालाया एक वरीस लागतय आन ही कसं लगीच चालाया लागलं " .
बा "लेकरा त्यांच आयुष्य इसिक वर्ष . म्हणूनशान समदं लवकर असतया ."

बानं मला इचारला "ह्याला काय नाव ठेवू ? "
म्या " बब्या " .
माझा एक दोस्त लै डोस्कबाज , गोरागोमटा . त्याच नाव बबन, पण आमचा बब्या . ही वासरु पण रुबाबदार व्हतं .
मंग आमी वासरालाबी बब्याच म्हणाय लागलो .

आयनी गव्हळीला बाजरीची खिचडी खाया दिली .
बब्या गव्हळीच दूध पीऊन फटाफट वाढत होता . रंगानी पांढरा बब्या खूप छान दिसायचा . लै चपाळ वासरु . नुसता वारा .

गव्हळीला आय चरायला रानात न्यायची . खूप हिरवा चारा खाऊ घालायची .

बब्या मात्र घरीच मेडीला बांधल्याला असायचा . मी दुपारच्या सुट्टीत बब्याला गवात , पाणी द्यायचो . परत साळा सुटल्याव गवात , पाणी द्यायचो . एकांद्या दिवशी चारा द्यायला उशीर झाला की बब्या हंबरायचा . बब्या लाडात यिउन मला ढुशी मारायचा .

संद्याकाळी गव्हळी आली की बब्याला चाटायची आल्या आल्या . मग बा गव्हळीला तिच्या जागव बांधायचा . कळशीत पाणी घिउन गव्हळीची कास धुयाचा . तवर बब्याला धीर नसायचा . दाव्याला नुस्त हिस्कं द्यायचा . मग बा बब्याचं दावं सोडायचा . बब्या धावत जावून गव्हळीची कास लुचायचा . गव्हळी बब्याला मागच्या बाजुनी चाटायची . बब्याचं पॉट भरलं की शेपूट वर करुन आजूबाजूला झ्याक उड्या मारायचा. मग बा त्याला खुटीला बांधायचा .

बा कळशीत पाणी घिउन गव्हळीची कास पुन्हा धुवायचा. गव्हळीचं मागच पाय बांधायचा . दोन पायाव बसून कळशी गुडघ्यात धरायचा आन धार काढायचा . कळशीत येगात धार पडायची तसा चर्र चर्र आवाज करत पांढरा फेस वर उसळायचा .

आता रोज सकाळ, संद्याकाळ धार काढल्याव मला ताजं निरसं दूध प्यायला मिळू लागलं . ते निरसं दुध कोमट असायचं . मोठ्या गलासात आय दूध वतायची आन घराच्या कोपऱ्यात जाऊन पी म्हणायची .
म्या इचारायचो "कोपऱ्यात का ?"
आय म्हणायची " कुणी पाहिलतं मन जातं आण ते आंगी लागत नाय . "
म्या कोपऱ्यात घटा घटा दूध प्यायचो . आंगड्याच्या बाहिनी तोंडावर्ची फेसाची मिशी पुसायचो . आन बाहेर उंडरायचो .

बा मला तालमीत न्याया लागला . जोर, बैठका काढाया लावायचा . बारकी मुद्गगल फिरव म्हणायचा . खुस्ती लावायचा . डाव शिकवायचा . ख्वाडा घालून इरोदी पैलवान झटक्यात कसा चीत करायचा ते सांगायचा .

बब्याची आणि माझी चांगली गट्टी झाली व्हती . म्या बब्यासंग लुटूपुटूची खुस्ती खेळायचो. पण बब्याच जिंकायचा माझ्या पेक्षा लहान असून सुध्दा .

बब्या पण रानातल्या साळत शिकाया जायचा आई बरं . आमच्या साळत आईला परवानगी नसायची . मास्तर रागावलं म्हंजी वाटायचं बब्यासारखी माझी आय बरुबर असती तर . ह्या असं वाटण्यान खूप रडाया यायच .

मी बब्याला शनिवार, रविवार असल्याव रानात इतर जनावरांच्या बरुबर चरायला घेऊन जात व्हतो .
रानात बब्या बरुबर शेलका चारा हेरायचा आन गपागपा खायाचा . सुरवातीला बब्या गव्हळीच्या आजूबाजूला चरायचा पण मोठा झाला तशी बब्याला लांब जाउन चरायची सवं लागली .

आजूबाजूच्या कळपात पण बब्याची दादागिरी सुरु झाली .
इतर खोंडं बब्याला टरकायची . कुणाशी जुपली की बब्या पुढच्या पायानी माती उकरायचा मग शिंगाणी पण माती उकरायचा . येव्हढ करुन दुसरं ख्वांड भेलं नाय तर डरकाळी फोडून सरळ शिंगाला शिंग भिडवायचा . पहाडासारखा चाल करायचा आन दुसरं ख्वांड पळल्याव शांत हुयाचा .

बब्या आता रुबाबदार दिसायचा. काळ्भोर डोळं , राग आल्याव फिसकारणार्या नाकपुड्या , काहिसं अंडाकृती उंच वशिंड , लांब झुपकेदार शेपूट , आन छोटी अर्धवर्तुळाकार शिंग , अंगाव वस्न्डणारं तेजं . रुबाबदार पावलं टाकत युवराज चालायचे .

दिवाळीच्या सुट्टीचं दिस व्हतं . गुरं चारायची पाळी आमची असायची . शेजारचा नाम्या आन म्या गुरं चारायला घेउन गेलतो .

नाम्यानी आन म्या वघळीत गुरं चराया सोडली . वघळीत मधोमध पाण्याचा ओहळ व्हता . दोन्ही काठाव छान ब्यांदाड वाढलं होतं . गुरं चरण्यात मग्न झालीं . त्यांच्या अंगाव पाखरं बसायची तरी गुरं खाण्यात गढून जायची . मधेच एखादी टिटवी टिटीव टिटीव करुन उडत होती . कावळं चिमण्या उन्हाचं काठावल्या पाण्यात पंख फडफडायची . म्या आन नाम्या एका झाडाखाली हिरवळीवर लंगडी खेळत व्हतो . डाव रंगात आला व्हता .

तेव्हड्यात बब्याची डरकाळी आली . आमी दोघं आवाजाच्या दिशेनं बघाया लागलो .

तर बब्या शिंग काढून नाम्याच्या खोंडाला भिडला . लै घोळावलं नाम्याच्या खोंडाला . मातीत रेंगासलं . नाम्याच्या खोंडाला बब्याची शिंग लागाय लागली .
तशी म्या आन नाम्यानं तिकडं धाव घित्ली .

" बब्या बब्या " म्हणत म्या हातातला दगड बब्याला मारला . त्यो त्याला जिव्हारी लागला .
तसा बब्याचा मोर्चा नाम्याचं वासरु सोडून माझ्यकं वळला . नाम्यानी त्याचं वासरु दूर नेलं .
बब्याची चाल बघून मला पळता भूई थोडी झाली . मी पुढं , बब्या मागं . बब्याची मान खाली तिरकी झाली . शिंग माझ्यावर रोखली . शेपूट वर केलं .

शेवट बब्यापुढं माझा टिकाव न्हाय लागला.
आत्ता बब्यानी शिंगं माझ्या आंगड्यात खुपासली आन मला बगलतून वर उचाललं . माझं निळं आंगडं खालपस्न वरपर्यंत टार टार फाटलं . बब्याच्या शिंगांनी मला खर्चाटलं . थोडं रघात वाह्या लागलं . नाम्यानी हे बघितल आन मला सोडवाया धावला काठी घिउन . दोन तीन काठ्या बब्याच्या तोंडाव हानल्या . तसा बब्या कळवळला . मार चुकवाया डोकं खाली केलं . तसा म्या शिंगातन सुटलो. नाम्यानं बब्याला लांब पिटाळलं .

मी खूप रडलो . जखमेव नाम्यानी चूना दाबला . मी बोंब ठोकली . पण नाम्या म्हणला थोडं दुखल मंग बरं वाटल. थोड्या टायमानी जरा बरं वाटलं . रघात पण थांबलं.

आन अचानक माझं आंगडं फाटल्याच ध्यानात आलं .
म्या पुन्हा भोकाड पसारलं . दिवस रडण्यातच ग्याला . नाम्यानं गुरं राखली .

सांच्याला घरी आलो आन आयच्या गळ्यात पडून रडाया लागलो .
आय म्हणली " उगी बाळा ! आता काय उपेग रडून "
मी म्हणलो आय तूच सांग " मला किती कापडं घालाया " ?
आय " म्हणली तीन आंगडी आन एक खाकी चड्डी "
मला पांढरी आंगडी खाकी चड्डी साळत जातानी घालाया व्हती.

निळं आंगड दिवाळीला घेतलं हुतं . मी ती सणावाराला घालाया ठिवणार व्हतो .

न्यामकं तीच आंगड बब्यानं फाडलं . मला लागलं त्याचं जेव्हडं वाइट वाटलं नाय तेवढं आंगड फाटल्याच .

लय हातपाय चोळलं तवा बा नी दानं इकलं आन आंगड आणलं मला दिवाळीला . माय आणि बा ला तर दिवाळीला पण नाय लागलं नवं आंगाला.

बा ला एकदा तेच्या दोस्तानं उसणं पैसं घिउन फसावला तवा बा लै रडला होता . म्हणला माणसाची जातचं सापाची . दूध पाजलं तरी डखायची .

मला बी तसचं वाटलं . बब्याला म्या किती जीव लावला . कधी कधी माझ्या ताटातली भाकर, बानं बाजारावनं मला आणलेल पाव, जिलबी त्याला भरवायचो . रानातली गाजरं, इलायती गवात बब्याला जास्ती घालायचो . खुस्ती खेळायचो .

सगळं एका दिसात मातीमोल केलं बब्यानं .

बब्यात मला बी साप दिसत व्हता .

आता बब्यानी थोड जरी आंग हालावलं तरी मी त्याला लै माराया लागलो . बब्या पण सोसलं नाय की डुरकायचा .

आमच्या दोघांची भाडणं मिटता मिटाना .

आय आन बा ला हे सगळं पाहावत नव्हतं .

एक दिस त्यांनी ठरवल बब्याला आता गव्हळीचं दुध लागत नाय . आपण बब्याला इकून टाकू . चार पैकं बी व्हत्याल गाठीला आन ह्यांची मारामारी थांबल . नाय तर कुणाचा तरी जीव जायचा .

बान हे मला सांगितलं . मला पण आनंद झाला . सुटीवाचून खोकला ग्याला .

एक दिस बा बब्याला बाजाराला घेऊन गेला आन कोणाला तरी वपून आला .

त्या दिसापसनं ज्या खुटीला बब्या बांधायचो ती खुटी रिकामी बघून मला रडू कोसळायचं . गव्हळी पण बिनसली व्हती . तिचं खाण्यावर लक्ष नव्हतं . आयला पण वाइट वाटलं .

रातचं मी मधीच रडत उठलो . मला सपान पडलं बब्याला नव्या घरी लय मारत्यात . आयनी समजावलं क्वान मारत नाही बब्याला . सपान कवा खरं व्हतं का ?

मला आता वाटाय लागलं ह्या सगळ्याला मीच कारणीभूत . माझं कश्यात लक्ष लागना .

अस दोन दिस गेलं असतील .

तिसऱ्या दिसी मी गोठा झाडाया गेलो . बघतो तर चिमित्कार . बब्या गोठ्यात त्याच्या जागव बसलेला .

मी न घाबरता बब्याच्या गळ्याला मिठी मारली . बब्यापण चूपचाप बसून होता . माझ्या डोळ्यातून पाणी आलं ते बब्याच्या आंगाव टिपाकलं . बब्याच्यापण डोळ्यात आसवं दिसली .

म्या ठरवलं आता बब्याला परत जावू द्यायचं नाय .

मी काय कागाळी केली की आय म्हणायची " पॉर मांडीव हागतं मग आय काय मांडी कापती व्हय " . "आन कवा कवा चुकून आगळीक झालीतं आपुन कुणाला घराच्या बाहेर काढतो का ? आरं माफीतच खरं बळ आसतया . "

त्याच दिसी बाला सांगितलं बब्याच्या नव्या मालकाचं पैकं परत कर .

थोड्या यळात बब्याचा नवा मालक बब्याचा माग काढीत आमच्या घरी आला, तसी मी त्याच्या पायाला मिठी मारली . रडाय लागलो .
म्हणलो "काका तुमचं पैकं घ्या पण आमचा बब्या परत करा ".

बब्याचा नवा मालक पण समजला जर रोजच दावं तोडून हे नवाट ख्वांड हिकडं आलं तर काय उपेग ? त्यापेक्षा पैकं परत मिळालं तर चांगलच . त्याने मग बा ला दिलेलं पैकं घितलं आन जेवून खावून वाटला लागला .

आम्ही समद्यानी सुटकचा सुस्कारा टाकला .

तिकडं गोठ्यात बब्या गव्हळी जवळ बसला होता . गव्हळी बब्याला चाटत व्हती . बब्या हळवा झाल्यागत दिसत व्हता .

आन मी फाटकं निळं आंगड ह्या समद्याची आठवण म्हणून लोखंडी ट्रंकेत ठिवत होतो .

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलंय
भूतकाळ रंगवतानाचा भाषेतील बदल सुरेख Happy

वाह! सुरेख लिहिले आहे. भाषा तर मस्तच.
पण मला वाटते सर्व लेखात पहिल्या पॅरामध्ये वापरलेली भाषा कंटिन्यू ठेवून संवाद ग्रामिण भाषेत घेतले असते तर आणखी छान वाटले असते. संवाद आणखी ऊठावदार वाटले असते. अर्थात हे माझे मत आणि आवड. लेख मात्र एकदम मस्त.

धनि , अंबज्ञ , आनंद , अधांतरी , शशांक , हर्पेन , नॅंक , अनघा, शाली

खूप धन्यवाद उत्साहवर्धक प्रतिसादासाठी....

शाली पुन्हा जेव्हा ग्रामीण कथा लिहील तेव्हा जरुर विचार करेल आपल्या सुचनेचा ... आपल्या सुचनांचा आदरच होइल . धन्यवाद....

मित, G. Anurag , निलुदा , द्वादशांगुला , स्वाती २ , राव पाटील , अश्विनी के

रसिक जाणकारांना खूप धन्यवाद .....

Pages