अंमल

Submitted by मॅगी on 20 May, 2018 - 12:04

तिच्या ग्लासातील गडद सोनसळी-तपकिरी द्रव हळूहळू घशातून खाली उतरला. ती नीट, कडवट चव ओसरल्यावर एक छान ऊब छातीखाली जाणवायला लागली. पसरत पसरत ऊब घशातून गालापर्यंत येऊन तिच्या गोबऱ्या गालांवर थबकली. डोके हलकेच तरंगल्याची जाणीव झाली आणि त्यात तिचे मन, विचार अलगद डुंबायला लागले. मागच्या गुबगुबीत सोफा कुशनवर मान टाकून ती तो क्षण रोजच्याप्रमाणे परत एकदा अनुभवू लागली. स्वतःशीच हसत तिने हात उंचावून हातातल्या ग्लासात नजर टाकली.

" ओss माझ्या लाडक्या म्हातारबाबा! Cheers!" उसासा सोडत ती म्हणाली. उरलेला ग्लास संपल्यावर वाकून एका हाताने टेबलवरची ती चौकोनी बाटली तिरकी करून तिने पुन्हा ग्लास भरला. बाटलीवरचा म्हातारबुवा नेहमीसारखाच हसत होता. बाटलीतील एक लांबट दालचिनीचा तुकडा ग्लासात घरंगळला, तो तिने चिमटीत उचलून पुन्हा बाटलीत टाकला. तिला नेहमी काही लवंगा आणि थोडी दालचिनी बाटलीत घालून ठेवायला आवडायच्या. तिचा पर्सनल क्लासिक अरोमा!

आजचा दिवस संपता संपत नव्हता. खरं तर तिचे रोजचेच एकांडे दिवस संपता संपत नव्हते. ती नेहमी रात्रीची वाट बघत असायची. दिवसभराचे काम, शीण, आयुष्यात उगीच डोकावणारे भोचक लोक यातून मुक्त होऊन ती हातात ग्लास धरून तोपर्यंत प्यायची जोपर्यंत मनातले सगळे विचार शांत होऊन, रात्र चढत तीला गुंगी येत नाही.

आजची रात्रही काही वेगळी नव्हती. नेहमी सारखेच आजही सोबतीला जगजीतच्या तोंडून तिच्या लाडक्या नज़्मचे सूर घरभर निथळत होते,

बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी..
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे..

दुसरा ग्लास संपता संपता तिला आतून काहीतरी धप्पकन पडल्यासारखा आवाज आला. खरंच काही पडलं की तिलाच भास झाला कुणास ठाऊक. स्वतःच्याच कपाळावर टपली मारून, "हल्ली जरा जास्तच क्राईम पट्रोल बघतेस हां!" म्हणत तिने पुन्हा ग्लास भरला. तिसरा ग्लास पाऊण होईतो आत पुन्हा काहीतरी बारीक खटखट वाजलं.

यावेळी नक्कीच हा भास नव्हता. ग्लास टेबलवर ठेऊन रिमोटने cd पॉझ करुन तिने कानोसा घेतला. काहीतरी वेगळं नक्कीच घडतंय.. तिच्या हृदयाचे ठोके टोल दिल्यासारखे ठणठणत होते. सगळीकडे दाट शांतता होती, अगदी खिडकीतून पानांची सळसळसुद्धा ऐकू येत नव्हती. सोफ्याच्या कडेला धरत पाय पटकन सपातांमध्ये सरकवले. आवाज न करता तिने किचनमध्ये जाऊन मोठी, धारदार शेफ्स नाईफ मुठीत घट्ट धरली मग भिंतीला धरत धरत हळूहळू किचन, गेस्टरूम आणि बाथरूममध्ये जाऊन तपासले. लपायच्या सगळ्या जागा चेक केल्या पण कुठेच काही वेगळे जाणवले नाही.

आता फक्त तिची बेडरूम शिल्लक होती. आत फक्त वॉर्डरोब आणि बेड! एकटीला लागतंच काय असं. तिने घाबरत घाबरत हलकेच नॉब फिरवला. कमीत कमी आवाज करत ती पलंगाच्या दिशेने पावले टाकू लागली. वाऱ्याने बेडखाली लोंबणारे चादरीचे टोक हलत होते. वारा? तिने घाबरून खिडकीकडे पाहिले. खिडकीची काच उघडी होती. तिला खिडकी उघडल्याचे काही करून आठवत नव्हते. तिची धडधड अजूनच तीव्र झाली. झिंग चढलेल्या पापण्या जडावल्या होत्या. त्या अर्धवट बंद डोळ्यांनीच ती बेडला धरून वाकायचा प्रयत्न करत खालीच बसली. बेडखाली नक्कीच कोणीतरी आहे या विचारानेच तिच्या अंगावर शहारे आले. तिने डोळे गप्पकन मिटून घेतले. खालचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. तेलकट मागे फिरवले केस, तांबारलेले डोळे, गरुडासारखे बाकदार नाक, आत गेलेले गाल, पातळ काळपट ओठ आणि ते विचकलेल्या तोंडातून दिसणारे तंबाखूचे डाग पडलेले पिवळे दात! नक्कीच, नक्कीच..

मान वाकवून आत बघत तिने हलकेच तिचे जड डोळे उघडले.. पण समोर काहीच नव्हते. नुसती रिकामी जागा आणि इकडेतिकडे काही जमलेल्या धुळीचे तुकडे. "हुश्श! काहीच नाही. मला एक ड्रिंक पाहिजे" जरा शांत होत ती उभी राहिली. पजामा झटकून पुन्हा बाहेर आली. जगजीत परत गाऊ लागला आणि एकाची दोन ड्रिंक्स झाली. शेवटी पापण्या अगदीच पडायला लागल्यावर तिने बाटली उचलून कपाटात ठेवली. ग्लास आत नेऊन सिंकमध्ये ठेवला आणि भिंतीचा आधार घेत घेत बेडरूममध्ये आली. दिवे बंद केल्यावर तिला जरा गरगरल्यासारखं वाटलं. मन, शरीर बधिर झालंच होतं. खुदकन हसून तिने स्वतःला गादीवर झोकून दिले. ब्लॅंकेट तोंडापर्यंत ओढून तिची नजर आता शेजारच्या खिडकीकडे गेली. काच बंद आणि पडदा नीट सरकवलेला होता. अरेच्चा! मी कधी बंद केला हा पडदा! तिला प्रश्न पडला. गप्पकन तिची भीती परत आली आणि तो खडखड आवाजसुद्धा!

जागी हो.. जागी हो.. ऊठss तिने स्वतःला हलवायचा खूप प्रयत्न केला. पण रात्रीचा अंमल तिच्यावर कधीच चढला होता. कपाटाचे दार किलकिले झाले आणि त्यातून एका हाताची सावली दिसू लागली. तिचा मेंदू तिला उठून पळायचा आदेश देत होता पण तिचे शरीर पूर्णपणे अमलाखाली होते. कपाटाकडून ती काळी सावली तिच्या दिशेने सरकू लागल्यावर तिने पापण्या मिटून घेतल्या. अचानक तिच्या मनात चमकले,

जिन ज़ख्मों को वक़्त भर चला है,
तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो..

आणि तिने स्वतःला एका अज्ञात गुंगीत झोकून दिले पुन्हा कधीही डोळे न उघडण्यासाठी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

वाचता वाचता त्या गडद सोनसळी-तपकिरी द्रवाचा, दु:खाचा, एकाकीपणाचा अंमल चढत जातोय. खूप अंमली झालीये कथा Happy

धन्यवाद Happy
शाली, का काढला हो प्रतिसाद?

किती चोर हंट डाऊन करणार हा प्रश्न आहेच.
तिथे प्रतिलिपी वर लोक सर्रास 'जिने कथा लिहिली ती माझी बायको' किंवा 'मीच बेफिकीर नावाने लिहितो' असं अगदी कूल मध्ये खोटं बोलतात तिथे हे असे ब्लॉग वरचे कॉपी पेस्ट ट्रॅक करणं अजूनच कठीण आहे.
मूळ लेखकांनी प्रकाशित तारीख व स्वतःचे नाव पुराव्यासह त्या त्या लेखावर कमेंट टाकाव्या.
ब्लॉग रिपोर्ट अज्जन कधी करून पाहिला नाही, त्यामुळे त्याचा उपयोग होतो का माहीत नाही.
मागे एकदा अशीच एक चर्चा झाली होती त्यात मध्ये मध्ये मूळ लेखकाने आपले नाव गोवावे असा काहीतरी उपायही कोणीतरी सुचवला होता.(कॉपी पेस्ट करण्या पेक्षा लेख एडिट करायचा कंटाळा येईल म्हणून.)
पूर्वीच्या काळी म्हणूनच 'तुका म्हणे' 'जना म्हणे' वगैरे लिहायचे की काय?