रिकामी खिडकी

Submitted by क्षास on 18 May, 2018 - 05:46

" रिकामी खिडकी"

मी लिफ्टचं दार लावणार इतक्यात एक स्कूल युनिफॉर्ममधला मुलगा पाठीवरची बॅग सावरत येताना दिसला.मी अर्धवट लोटलेला दरवाजा पुन्हा मागे केला. तो आत आला. त्याने तिसऱ्या मजल्याचं बटन दाबलं. मी नुकतेच या सोसायटीमध्ये शिफ्ट झाले होते,त्यामुळे इथले सगळेच अनोळखी होते.मी नवीन जागेशी आणि इथल्या माणसांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होते.मी सहज त्या लहान मुलाला विचारलं,
" तुझं नाव काय आहे?"
" आर्यन" दबक्या आवाजात तो म्हणाला.
" कोणत्या शाळेत जातोस?"
" न्यू इंग्लिश स्कुल"
" मी मागच्याच आठवड्यात इथे राहायला आले. तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये. 303 मध्ये."
तेवढ्यात तिसरा मजला आला. तो लिफ्टचं दार उघडून बाहेर गेला. त्याने 301 समोर शूज काढले. शू रॅकमध्ये व्यवस्थित ठेवले. मी एकीकडे दरवाजाचं कुलूप उघडत होते. तो शूज काढून बेल न वाजवता दरवाजासमोर तसाच उभा राहिला. मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मी त्याच्याकडे पाहत उभी आहे हे जाणवल्यावर त्याने बेल दाबली. आतून कोणीतरी दरवाजा उघडला. जसजसा दरवाजा उघडत होता तसतसा कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज वाढत होता. कोणीतरी काहीतरी तावातावाने बोलत होतं. कदाचित त्याचे बाबा असावेत.माझ्या कानावर पडलेल्या शब्दांवरून मला अंदाज आला, त्याच्या आईबाबांमध्ये कडाक्याचं भांडण सुरु असावं. मला त्या वाक्यांचा अर्थ लागण्याआधीच त्याच्या आईने घाईघाईने दरवाजा बंद केला. आर्यनच्या घरचं वातावरण तापलेलं दिसत होतं. त्या चिमुकल्याचा हतबल चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जाईना. आजकाल अनेक घरी हेच चित्र पाहायला मिळतं. नात्यांमुळे आलेल्या जबाबदाऱ्या पेलू न शकणारे, कामाच्या ओझ्याखाली दबलेले पालक स्वतःसोबत मुलांनाही भावनिक गुंत्यात अडकवतात. मुलांसमोर वाद घालून त्यांच्या छोट्याशा जगाला उध्वस्त करणारं विचारांचं वादळ निर्माण करतात.
त्या दिवसानंतर मला आर्यन अनेकदा दिसत राहिला. कधी बागेत एकटाच खेळताना, कधी स्कूलबसची वाट बघताना, कधी बिल्डिंगभोवती सायकल चालवताना तर कधी पायऱ्यांवर बसून काहीतरी वाचताना. त्याच्यासोबत सहसा कोणीही नसायचं. तो एकुलता एक असावा. तो इतरांमध्ये क्वचित मिसळायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांत आणि धीरगंभीर भाव असायचे. नाकावर चौकोनी चष्मा,नीट विंचरून बसवलेले केस,सावळा रंग,गोबरे गोबरे गाल त्याचं वेगळेपण अधोरेखित करत होते. मला लहान मुलं कधीच हवीहवीशी वाटली नाही, पण या मुलाला बघून मला त्याला तपशिलात जाणून घ्यायची उत्सुकता लागली. त्याच्याबद्दल , त्याच्या घरच्यांबद्दल माझ्याकडे भांडीकपड्यांसाठी येणाऱ्या मावशी नेहमी सांगायच्या. त्यांच्याकडूनच आर्यनच्या आईबाबांच्या भांडणाबद्दल कळलं. त्याच्या वडिलांच्या विचित्र स्वभावाबद्दलही कळलं. " तो तसा शिकलेला हाय, पैसापाणी समदं तसं चांगलं हाय. पन लई संशय मनात. पार नाकीनऊ आनतो बघा. जाम हाल व्हत्यात तिचं." मावशी मला रोज तिकडची एकतरी घटना हमखास सांगायच्या. त्या ऐकीव गोष्टींखेरीज त्या कुटुंबाशी माझा कधी संबंध आला नाही.
एके दिवशी आर्यन एकटाच खिडकीत बसला होता. रिमझिमणाऱ्या पावसाकडे एकटक बघत. तो अधूनमधून हात लांब करून ओंजळीत सरी झेलत होता. तो मोबाईल आणि गेमिंगच्या मायाबाजारापासून लांब आहे याचं मला समाधान वाटलं. थोड्या वेळाने मी पुन्हा डोकावून पाहिलं तेव्हा तो कसलंतरी चित्र रंगवत होता. मी त्याला हाक मारली," आर्यन ..."
त्याने चित्रातून डोकं वर काढून माझ्याकडे बघितलं.
"कसलं चित्र काढतोयस? "
" पावसात भिजणाऱ्या मुलाचं"
" दाखव मला, ये इकडे मी दरवाजा उघडते."
तो कडी लावून दार लोटून माझ्या घरात आला.
" वा,छान काढलंय चित्र, हा तू आहेस का?"
" हो, त्याला भिजायचं नाहीये तरीही तो उभा आहे."
मला तो नक्की काय बोलतोय हे कळत नव्हतं.
"का बरं त्याला का भिजायचं नाहीये? त्याला पाऊस आवडत नाही का? मग तो घरात का निघून जात नाही?" मी त्याच भाषेत बोलायचा प्रयत्न केला.
"कारण तेच त्याचं घर आहे ना! त्याला वाटतंय की पाऊस थांबेल.. थोड्या वेळात पाऊस नक्की थांबेल"
मी निशब्द झाले. त्याच्या त्या चित्रातून मला त्याची असामान्य प्रतिभा दिसली. त्याला चित्रातून व्यक्त होण्याची कल्पना कशी काय सुचली असावी. वरवर बघितलं तर ते चित्र अतिशय साधं सोप्प दिसत होतं, पण आर्यन त्यातून त्याची व्यथा सांगू पाहत होता, मन मोकळं करत होता. त्याच्या आयुष्यातल्या वेदनांचा पाऊस थांबवा अशी आशा करत होता.
" तुला माहितीये आर्यन मला सुद्धा चित्र काढायचा छंद आहे." मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला.
" मला दाखव ना तुझी चित्रं"
"हो , पण हसायचं नाही हा माझ्या चित्रांना"
" नाही हसणार" तो हसत हसत म्हणाला.
मी त्याला माझी पेंटिंग्स दाखवली.त्याने सगळी निरखून पहिली. मग तो त्याच्या चित्राकडे वळला.आम्ही गप्पा मारत मारत ते चित्र रंगवून पूर्ण केलं. चित्र पूर्ण झाल्या झाल्या तो घरी पळाला. त्याने ते चित्र त्याच्या रुममधल्या भिंतीवर चिकटवलं आणि खाली लिहिलं ... i love rainy season . त्या एका वाक्यामागे चित्राचा खरा अर्थ सहज झाकला गेला.
दिवसांमागून दिवस गेले. आर्यन आणि माझ्यात छान मैत्री झाली.तो माझ्याशी चित्रांमधून बोलू लागला.मनातली बंद कपाटं उघडू लागला. तिथली घुसमट आणि तगमग नावाची धूळ हळूहळू साफ होऊ लागली.
अचानक एके दिवशी तो मला जोरजोरात हाक मारत आला, त्याच्या पाठीवर मोठी बॅग होती. त्याने माझ्या हातात एका चित्राचा कागद दिला आणि काही न बोलताच तो धावत खाली गेला. त्यादिवशी आर्यन मला शेवटचा दिसला. पाठीवरची बॅग सावरत आईच्या मागोमाग चालणारा आर्यन माझ्या अजूनही डोळ्यासमोर येतो. त्याने वर बघून माझ्या दिशेने हात हलवून दिलेला निरोप मला अजूनही आठवतो. आर्यन आता त्याच्या आईकडेच राहतो. त्याच्या आईबाबांचा घटस्फोट झाला. माझ्या घरासमोरची खिडकी कायमची रिकामी झाली. जेव्हा जेव्हा मला त्याची आठवण येते तेव्हा मी त्याने दिलेलं चित्र उघडून बघते. आर्यनच्या चित्रातला पाऊस आता थांबला होता आणि दुःखाचं मळभ जाऊन लख्ख सोनेरी ऊन पडलं होतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिलं आहे. हा विषय अजुनही खुप सुरेख खुलवता आला असता. तुम्ही फारच आवरते घेतले. पुढे लिहा की. आवडेल वाचायला.

शाली जी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ही माझी पहिलीच कथा असल्यामुळे थोडक्यात संपवली. पहिलाच प्रयत्न होता म्हणून कथा छोटीच ठेवली.या कथेचा पुढचा भाग लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. Happy