चाळीतील गमती-जमती (८)

Submitted by राजेश्री on 9 May, 2018 - 11:38

चाळीतल्या गमती-जमती (८)
राणीच्या आईना दोन मुले राजा,पक्या आणि एक मुलगी राणी.पक्या माझ्यापेक्षा मोठाच मग चाळीत आपल्यापेक्षा मोठं कोण असेल तर त्याला दादा म्हणायचा प्रघात पण माघारी मात्र त्याला पक्याच म्हणायचं.राजा माझ्यापेक्षा एक,दोन वर्षांनी लहान आणि राणी माझ्यापेक्षा दोन एक वर्षांनी मोठी.या तिघांच्या तीन तऱ्हा असायच्या.राणी घरातली कामे करणार ,तिने बाहेर खेळायला जाण तिच्या वडिलांना आवडायचं नाही.पक्या आणि राज्या हे दोघेही आपल्या वडिलांच्या धाकात होते.सकाळी राणीचे आई आणि पप्पा सगळं आवरून रानात जायचे.आम्ही एक दोनदा त्यांच्या रानात गेलो होतो लहानपणापासून रान,शेत,डोंगर याच मला फार आकर्षण मग मी घरात न सांगताच परस्पर निघून जाणार कारण काय तर नको असं मला कधी ऐकायला आवडायचं नाही.आल्यावर का,कुठे गेलीस आणि न सांगता का गेलीस या कारणासाठी मार खावा लागेल ही शक्यता असून मी जायला मिळावच या कारणासाठी ही रिस्क घ्यायचे.
राजा बद्दल मला एका गोष्टीच अप्रूप हे वाटायचे की तो दिवाळीला घेतलेला ड्रेस दिवाळीच्या पहिल्या पाण्याला केवळ एक तासभर घालणार आणि इतका व्यवस्थित घडी घालून ठेवणार की दुसरी दिवाळी जवळ आली आणि राजा तुला दिवाळीला घेतलेला ड्रेस दाखव म्हंटल तर तो नवा करकरीत असायचा.यामध्ये राग येण्याजोग काही नसताना आणि माझा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ड्रेस एक तर शेणाचा नाहीतर फटाक्यांची ठिणगी उडून थोडा तरी जळायचा आणि मला राजाचा विलक्षण राग येत राहायचा.त्यात आणि तो मला "राजूबाई बिडी तपकीर वडी " म्हणून चिडवयाचा. मला त्याला चिडवण्याजोग योग्य वाक्य कधी सापडलं नाहीच.पक्या मोठा असल्याने आमच्यात खेळायला आणि भांडायला नसायचा पण तो उठसुठ ये मायडे "जा घरला" म्हणून हुसकवायचा.
आणि एक राणीच्या आईच्या घरी दिवाळीचे पदार्थ खूप वेळ राहायचे.म्हणजे जेंव्हा आमच्या घरातील अगदी शेवटचा गाऱ्याचा लाडू संपला असेल तेंव्हा त्यांच्या घरी चकलीही अजून शिल्लक असायची.हे पण त्या वेळी एक अप्रूप असायचं.कारण आमच्या घरी अनारसे,चकली,चिवडा,शंकरपाळी,बेसन लाडू,बुंदीचा लाडू,गाऱ्याचा लाडू या क्रमाने फराळाचे पदार्थ संपायचे.करंजा दोन वेळा केल्या तरी रोज चहा बरोबर खाऊन संपायच्या.राणी कधी कधी आम्हाला दिवाळी नंतर एक महिन्यांनी पण करंजी आहे देऊ का म्हणायची तेंव्हा कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं.पण आता कळत की कठीण का व्हायची. आतलं सारण चिटकून बसलेलं असायचं.आणि खाताना ती कुरूमकुरुंम लागायची.लहानपणी शिळेपाक हा शब्द आमच्या मनाला शिवत नव्हता हे बाकी खर आहे.
नंतर नंतर अकरावी ,बारावीत असताना मी अभ्यासाकडे जास्त ओढली गेले.मग ज्या पोरांबरोबर मी खेळायचे त्यांचा दंगा करू नका म्हणून त्यांचे खेळ बंद करणे,त्यांच्या मला हे सगळे अभ्यास करून देत नाहीत अशा मोठ्यकडे तक्रारी करणे.अश्या गोष्टी मी करायचे.सगळे मला घाबरून असायचे तेंव्हापासून मला दादागिरी करण्याची सवय लागली ती आजतागायत टिकून आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे म्हणजे अजून दादागिरी करता का तुम्ही ☺️
मस्त आहे तुमचं बालपण... छान वाटतंय किस्से वाचून. हा भाग खूपच लहान झालाय पण.

अरे म्हणजे अजून दादागिरी करता का तुम्ही ☺️
मस्त आहे तुमचं बालपण... छान वाटतंय किस्से वाचून. हा भाग खूपच लहान झालाय पण.

Chramps विषयांतर होतेय म्हणून हा भाग थोडा लहान झालाय.एक सलग लिहीत गेलं की ते वाचल जात नाही असा अनुभव आहे.एक एक एक किस्से आठवणी स्वतंत्र लिहायच ठरवल.
दादागिरी नाही पण ताईगिरी मात्र करतेच