सोनेरी केस

Submitted by राजेश्री on 9 May, 2018 - 05:42

सोनेरी केस

तोंडातील घासातून ...
आईचा केस सरसर काढताना ...
काळ सरसर मागे सरकत गेला..
आणि आठवलं..
कितीच्या काही मोठा होता हा..
शाळेत दिलेल्या ...
डब्यातील घासातून..
तोंडात गेल्यावर ..
काढताना जिद्दी वाटायचा..
रागच यायचा आईचा..
आणि तिच्या केसाचाही..
दाताला वेढा घातला असेल तर..
ओढताना दात पडेल की काय..
इतका तो मजबूत..
तोंडातील घास हातात पकडून ..
चटकन..
वर्गातून बाहेर..
धावत पळत येऊन ...
तो केस टाकून द्यायचो..
त्या घासासाहित..
मग घरी जाऊन...
डब्यातल्या तिच्या केसाबद्दल..
आईला घृणास्पद बोलत राहायचो..
मग ..दिवस..वर्षे जातील तस..
हळूहळू घासात केस दिसणं...
तुरळक होऊ लागल..
किती निगुतीने ती ...
जेवणात केस ..
पडणारच नाही याची काळजी घेत राहीली...
तरी सापडायचा अधेमधे एखादा ...
पण वय वाढेल तशी..
समज वाढत गेली..
होत असे कधी म्हणत ..
तोंडातील केस अडकलेला घास ..
हळुवार काढून..
तो केसासाहित बाहेर फेकला जायचा..
तेंव्हा तो ...
दहा बारा वर्षापूर्वी वाटला तसा...
जिद्दी नव्हताच वाटला ...
तो थोडा लवचिक झाला होता ..
आईच्या स्वभावासारखा ...
आधी कस ना आपणही हट्टी आणि आईचा केसही..
आपण जिद्दी आणि आईचा केसही..
आपण थोडे समजूतदार झालो ...
मग केसही थोडा आखूड झाला...
की मग ..
आपला हट्टीपणा सहन करता करता..
तो आखडत गेला..
तेंव्हा तो तोंडातून काढला तर सहजच लवला...
खाली मान घालून शरणागत होतो तसा...
मग आज..
जेंव्हा हा केस घासात दिसला..
तेंव्हा मी..
तोंडातील घास हळुवारपणे काढून ..
तळहातावर ठेवला..
आणि ...केसही तितक्याच हळुवारपणे बाहेर काढला
बाहेर येताना सर्रकन आला बाहेर..
लहान मुलं कुशीत झेपावतात ना तसा..
मी हातातील घास पुन्हा तोंडात टाकून ..
त्या केसाकडे ..
बारकाईने न्याहाळताना लक्षात आलं..
किती विरळ झाला हा केस..
आम्हाला वाढविता वाढविता ..
किती खुंटत गेला
आमची सोनेरी स्वप्ने विणता विणता..
स्वतःच सोनेरी झाला..
आज घरी जाऊन ..
काय सांगू आईला ...
घासात सापडलेल्या तिच्या केसाबद्दल...

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०९/०५/२०१८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users