चाळीतील गमती-जमती (२)

Submitted by राजेश्री on 6 May, 2018 - 10:47

चाळीतल्या गमती-जमती(२)

लहानपणी पप्पांची खूप म्हणजे खूप भीती वाटायची आम्हाला.आताही वाटते,पण लहानपणी जाम घाबरायचो आम्ही पप्पांना.त्यामुळे पप्पा माजघरात असले की आम्ही स्वयंपाकघरात आणि पप्पा माजघरात असले की आम्ही स्वयंपाकघरात असायचो.त्यांच्या समोर उभा राहायची देखील आमची बिशाद नसायची.रात्रीचे जेवण एकत्र या शिरस्त्यामुळे मात्र त्यांच्या सोबत जेवावे लागायचेच.जेवताना ताट बसणे, एक घास बत्तीस वेळा चावून खाणे,ताटात काही न राखणे,जेवताना मचाक मचाक आवाज न करणे हे त्या त्या वेळी त्या चुकांसरशी मांडीवर चापटी खाऊन आमच्या अंगवळणी पडलं होतं.त्यामुळे जेवण करीत असताना जेवण वाढताना भांड्यांचा जो काही आवाज होईल तोच.इतरवेळी एकदम निरव शांतता असायची आमच्या स्वयंपाकघरात.
एकदा अशीच आमची पंगत पडली असताना आमच्या घराच्या पलीकडच्या खोलीत एक नवीन कुळ राहायला आलं होतं.म्हणजे अगदी तीन चार दिवस झाले असतील.नवरा बायको आणि वय वर्ष 2 पासून, चार,सहा आणि आठ वर्षे वय असलेल्या चार लहान मुली होत्या त्यांना.त्यातल्या मधल्या मुलीला काही हवं असल की एकसारखा त्याचाच घोषा लावत,सुरात रडत राहण्याची तिची सवय होती.आम्ही अलीकडे जेवत होतो.आणि पलीकडे तिच्या घरात ती बहुदा डॉली नाव असावं,आठवत नाही..माझं स्वेटर मला दे...माझं स्वेटर मला दे..म्हणून सुरात रडत होती.कधी अंगाई सारखा आवाज,कधी राग मल्हारी..कधी वर चढत जाणारा आलाप,तर मग कधी अ... अ...अ... अ.. असा सूर लावून त्याच सुरात माझा स्वेटर मला दे..अशी तिची फर्माईश होती.इकडे आम्हा पामराना पप्पांच्या धाकापूढे काही बोलायचं तर मारमार.. मग हसणं दूरच.आम्ही डोळ्याने खुणावून खाली मान घालत आपलं माझा स्वेटर मला दे...च्या तालात जेवत होतो..इतक्यात पप्पांना भाकरी हवी होती.ते भाकरीच्या बुट्टीकडे हात करत मला म्हणाले, राजा,तो स्वेटर तेवढा दे इकडं..अतिरिक्त हवा भरून अचानक फुगा फुटतो तसा हास्याचा स्फोट आमच्या घरात झाला.बिट्या ,तायडी पोट धरून हासू लागले.मी अजूनही भानावर आले नव्हते मी पप्पांना जास्तच घाबरत असल्याने आणि बिट्या आणि तायडी हसले तेंव्हाच मी हसून न घेतल्याने माझी अत्यंत दयनीय अवस्था झाली.जेवण झालं..पप्पा शतपावली करायला बाहेर पडले.तस तायडी राजा स्वेटर दे इकडं म्हणून हासू लागली.आमच्या तिघांचेही रोखलेले हासू सारख दिवाळीत फटाके वाजतात ,शांत होतात तस उसळत होत..निवत होत.आजही कधी स्वेटर हातात घेतला की भाकरी आठवते आणि पप्पा भाकरी दे इकडं म्हंटले की स्वेटर आठवत राहतो...(क्रमशः...)

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०२/०४/२०१८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्यात पप्पांना भाकरी हवी होती.ते भाकरीच्या बुट्टीकडे हात करत मला म्हणाले, राजा,तो स्वेटर तेवढा दे इकडं.. >>> Rofl मस्तं!!!

जमलंय.
<<<<<<पप्पा माजघरात असले की आम्ही स्वयंपाकघरात आणि पप्पा माजघरात असले की आम्ही स्वयंपाकघरात असायचो.>>>>>>> इथे बघा जरा. तेच रीपीट झालंय. Happy

अयाई ग ! "राजा,तो स्वेटर तेवढा दे इकडं.." ला मी Rofl
कडक शिस्तीत वागणाऱ्या माणसाकडून असं काही झालं कि मग अजूनच गमतीशीर !!

हा हा हा Lol Lol Lol
हे भारिय!

कडक शिस्तीत वागणाऱ्या माणसाकडून असं काही झालं कि मग अजूनच गमतीशीर. >> +1

काही मुलं अगदी फारच सुरात तालात रडत असतात. मलापण एकजण आठवतोय. " आई pause बाबा pause मला खेळणं आणा" म्हणत रडत होता Proud Proud