जीव

Submitted by द्वादशांगुला on 6 May, 2018 - 01:34

" अरे राजा, असं नसतं रे! तू असा, तरी तुला त्यांनी जिवापाड जपलं बघ. तुझी आईच करंटी, माझ्या पोराचा केसानं गळा कापेल वाटलं नव्हतं. तिनेच काहीतरी केलं असणार. पण तुझ्याबद्दल तुझ्या आई-बाबांच्या मनात खूप जीव होता! रुसू नको असा... खा बघू! मला म्हातारीला छळू नको हां! हा एक घास .... हां!
म्हातारपणात काय मेलं ध्यान नशिबी आलंय"

सविताआजी त्यांच्या नातवाला समजावत होत्या. राजा - त्यांचा नातू. वयाच्या दुसर्‍या वर्षापासून पांगळा. पोलिओने हाता-पायातली, मेंदूतली शक्ती, नि त्याच्या आईवडिलांच्या मनातली त्याच्या भवितव्याबाबतची आशेची ज्योत, दोन्ही मावलली. सविताआजी तशा धोरणी, जगण्याच्या नादात आयुष्यानं शिकवलेला स्वार्थ स्वभावात पूर्णपणे भिनलेला. आधी 'नातू- नातू' म्हणून राजाला डोक्यावर मिरवून फिरणार्‍या सविताआजींनी आता मात्र सफाईदारपणे जबाबदारीतून हात झटकले; मुलगा नि सूनेच्या नोकरीच्या नादात हे पांगळं पोर या म्हातारपणी आपल्या गळ्यात पडणार, हे समजून. मग सावकाश छोट्यामोठ्या कुरबुरी करून त्यांनी आपलं बस्तान गावाकडच्या घरी हलवलं. मुलाने तसे जिव्हाळ्याचे संबंध तोडून टाकले, तरी यांना पर्वा नव्हती. गावातली मालकीची वाडी त्यांना यांना ऐषारामात म्हातारपण व मोकळा वेळ घालवायला समर्थ होती.

आता राजा सतरा वर्षांचा असताना अचानक काही आक्रित घडलं, नि राजाचे आईवडील वारले. काही ध्यानी-मनी नसताना. दोघांचेही खून झाले होते. पोलिस केस झाली. त्यांनी खूनाच्या अंदाजे वर्तवलेल्या वेळेआधी शेजार्‍यांनी घरातून या दोघांचे मोठमोठे भांडण्याचे आवाज ऐकले होते. राजाच्या आईवडिलांचं पटत नव्हतं, हे प्रत्येक शेजार-पाजारचा सांगत होता. वर त्यांच्या खूनाच्या वेळी घरी कोणीही आलं नव्हतं. अखेर तपासाअंती 'पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या' या निकषाखाली या केसची फाईल क्लोज करण्यात आली नि राजाला त्याच्या आजीकडे पाठवण्यात आलं.

आज या घटनेला तीन आठवडे होत आले होते. नशीबाचेही काय एकेक खेळ असतात. बिचार्‍या पांगळ्या पोराकडून त्याचे आईबाप हिरावून घेतले. सविताआजी गेल्या चौदा वर्षांपासून जी जबाबदारी टाळत होत्या, तीच त्यांच्या एकटीच्या पदरात पडली होती, कायमसाठी. राजा काचरत, ततपप करत बोलणारा. तसा अजूनही बालबुद्धीच. बरेच दिवस आईबाबा दिसत नाहीत, म्हणून आज राजा जेवत नव्हता. त्याच्या व्हिलचेअरच्या दांड्याला एक हात टेकून दुसर्‍या हाताने राजाच्या तोंडापुढे हातातला घास नाचवत सविताआजी वैतागून त्याला समजावत होत्या. सोबत त्यांचं स्वतःच्या नशीबालाही कोसणं चालूच होतं. राजाने शेवटी बळेबळेच एक घास खाल्ला. घास तोंडात चिवडतच तो पुटपुटू लागला,

" ज.. ज.. जीव.....क..क..कसा..... "

यावर सविताआजी म्हणाल्या," जीव काळजात असतो. "
तरीही राजाच्या कपाळावर आठी बघून त्या जरा रुष्टपणेनच राजाच्या ह्रदयावर बोट ठेवून म्हणाल्या, "इथे, इथे असतो जीव. कळलं?"

हे ऐकून राजा पुटपुटला, " तु..तुज्यापन? म..म..मला दाकव ना! "

याची प्रश्नांची सरबत्ती ऐकून रागावलेल्या सविताआजी म्हणाल्या, " हो प्रत्येकात असतो जीव. ह्रदयात. ह्रदय बंद पडलं की मरतो माणूस. जीव जातो त्याचा. आता कळलं? सारखं तोंड सुरू मेल्याचं! गिळ निमुटपणे! "

मात्र राजाला पडलेल्या ओरड्याचं काही वाटलं नव्हतं. 'जीव ह्रदयात असतो.... जीव ह्रदयात असतो. ' हे मनात पुटपुटत त्याने पटापट पुढचे घास संपवले. रिकामं ताट घेऊन सविताआजी त्या खोलीतून बाहेर पडू लागल्या, तसे आईबाबांसोबतचे जुने दिवस त्याला झरझर आठवू लागले.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

राजा. तसा एकलकोंडा पडलेला. सुरुवातीला असलेल्या आईबाबांच्या मुलाबद्दलच्या जिव्हाळ्याची जागा आपसूकच कर्तव्य या रुष्ट शब्दाने घेतलेली. राजा तसा आपल्याच विश्वात रमणारा. मेंदूही तसा वाकडाच चालणारा. चौकटीबाहेर. नीट बोलता येत नसलं, तरी प्रश्नं विचारण्याची नि त्याची उत्तरं शोधण्याची भारी हौस. एक तो लहानपणी आजार झाला नसता, तर मोठेपणी हा शास्त्रज्ञ नक्कीच बनला असता. हे माझं नाही, त्याच्या आई- बाबांचं मत. पण आजाराने धीम्या पडलेल्या मेंदूच्या राजाला अशा स्पेशल मुलांच्या शाळेतून शिक्षणही जेमतेमच दिलेलं. कारण त्याची नाजूक तब्येत. नि आता तीन आठवड्यांपूर्वी घडलेली ती घटना.

राजाची आई ऑफिसमधून आल्या- आल्याच कपाळाला हात लावून बसलेली. कसला ताण होता कोण जाणो. रात्री उशीरा राजाचे बाबा परतले. पाय लडखळत होते. ऑफिसमधून निघून थेट प्यायलाच बसले असावेत. राजाच्या बाबांना परिस्थितीने पार नमवलं होतं. पोटचं एकुलतं पोर असं पांगळं. जगायचं, कमवायचं, सुखी म्हातारपणाची स्वप्नं बघायची तर कोणाच्या जिवावर! नि त्यामुळे अपयश रिचवण्याकरता ते मदिरेचा आधार घेत होते. आल्यावर राजाच्या आईला असंच बसलेलं पाहून डाफरले, " ज्जेवण कुठ्ठाय? क्काय भुके ने मारणार आ..आहेस का?"
आधीच कसल्याशा तणावात असलेली राजाची आई आता मात्र रागावली. सगळ्या जबाबदार्‍या तिनेच का म्हणून पार पाडाव्यात? तिचंही खरंच होतं म्हणा, राजाचं जेवण, अंघोळ, औषधं सारं काही हल्ली तीच बघायची.

फणकार्‍याने ती म्हणाली, " सगळं काय मीच एकटीने बघायचं का? तुमची काही जबाबदारी नाही?"

हे ऐकून आधीच टुन्न झालेल्या राजाच्या बाबांचा पारा चढला नि त्यांनी राजाच्या आईवर हात उगारला.

मग त्यानंतर घरातून मोठ्यामोठ्याने भांडण्याचे, आदळाआपट करण्याचे आवाज येतच राहिले. राजा घाबरून हे सारं बघत होता. काही वेळाने यथावकाश भांडण थांबलं. राजाच्या आईच्या हुंदक्यांचे आवाज विरले अन् थोड्यावेळाने राजाला भेदरलेलं पाहून ती राजाजवळ आली. राजाशेजारी गुडघ्यांवर बसली, नि त्याच्या केसांमधून हात फिरवू लागली. ती म्हणाली,
" राजा, बाळा, तुझ्यासाठी माझा जीव तीळतीळ तुटतो रे! काय होणार रे तुझं आमच्या पश्चात? म्हणून टेन्शन येतं हल्ली. म्हणून कधी टेन्शन जास्तच वाढलं की ही अशी भांडणं होतात रे! जिवाला घोर लागलाय रे!"

राजाच्या चेहर्‍यावरच्या भीतीची जागा आता कुतूहलाने घेतली. 'जीव'. कुठे असतं हे? काय असतं हे? राजाने हे आईला विचारलं, त्याच्या काचरणार्‍या स्वरात. यावर आई म्हणाली, " अरे सोन्या, जीव शरीरात असतो. भिनलेला. चला, आता झोप हं बाळा. बराच उशीर झालाय. "
पण हे राजाला ऐकूच आलं नव्हतं. तो मनातल्या मनात पुटपुटत होता, 'जीव शरीरात असतो. जीव शरीरात असतो.'

असे काही डोक्यात प्रश्न पडले ना, की राजा असं अस्वस्थ व्हायचा. आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत त्याचं चित्त थार्‍यावर नसायचं. तो सैरभैर व्हायचा. दहाव्या वर्षापर्यंत त्याला धड अक्षरही बोलता येत नव्हतं. त्याच्या बोलण्याची आशाही सगळ्यांनी सोडली होती. पण जेव्हा आजुबाजूच्या इतरांना सराईतपणे बोलताना पाहून राजाला प्रश्न पडला, की आपल्याला इतरांसारखा घशातून आवाज का काढता येत नाही; तेव्हा तो इच्छाशक्तीच्या बळावर नि सतत प्रयत्न करून महिन्याभरातच काचरत का होईना, बोलू लागला होता. त्याला अचानक वाचा आलेली पाहून त्याच्या आईबाबांनी तोंडात बोटं घातली होती.

हे राजाला आठवलं. आपण प्रश्नाची उत्तरं शोधून काहीतरी नक्कीच करू शकतो, यावर एव्हाना त्याचा विश्वास बसलेला. 'जीव' बघायच्या ध्यासाने त्याला आता पछाडलं होतं. त्यानं चित्त स्थिर केलं. पायांच्या स्नायूंत आपली सारी शक्ती जमवली. नि काही वेळाने गहजबच घडला. राजा त्याचे पाय किंचीत हलवू शकत होता. तो खूश झाला. आणखी थोडा प्रयत्न करून तो हळुवारपणे खुर्चीतून उठला. त्याला आता हुरूप आला होता. आयुष्यात पहिल्यांदाच तो स्वतःच्या दोन पायांवर उभा होता. तो उठून चालू लागला. चालायची सवय नसलेले त्याचे पाय किंचीत अडखळत होते. पण आलेल्या आत्मविश्वासाने तो स्वतःवरच प्रचंड खूश होता. आता आपल्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल, या आशेची पालवी त्याच्या मनात फुटली. त्याचा हातही आता अचेतावस्थेतून बाहेर आलेला. त्याने डायनिंग टेबलवरचा चाकू उचलला, हा विचार करत की जसा डबा उघडल्याशिवाय खाऊ खाता येत नाही, तसा जीव शरीर उघडल्याशिवाय दिसतच नसेल. नाकतोंड तर आतून बंदच असावेत. नाहीतर जखमेसारखं रक्त नसतं का बाहेर पडलं?

आपल्या हुशारीवर, विचारांवर तो मनोमनच खूश झाला. तो चालतच आईबाबांच्या खोलीत गेला. दार उघडंच होतं. ते त्याने हलकेच लोटलं. तो आता आईजवळ गेला. आईचं वाक्य त्याला परत आठवलं, 'जीव शरीरात असतो'. त्याने अजिबात वेळ न दवडता चाकू धरलेल्या हाताच्या स्नायूंत पूर्ण जोर आणला, नि सपकन त्याच्या आईच्या गळ्यावर वार केला. रक्ताची धार त्याला दिसली, मात्र जीव नाही. दबलेल्या आवाजात किंकाळी फोडत त्याच्या आईचा 'जीव' गेला होता. एव्हाना आवाजाने त्याचे बाबा जागे झालेले. त्यांनी पटकन टेबल लॅम्पचं बटन सुरू केलं, तर त्यांना हार्ट अॅटॅक येणंच बाकी होतं. राजाची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली नि राजा बाजूला हातात चाकू घेऊन उभा. राजाचे बाबा जागीच थिजले. हे दुःस्वप्न आहे, असं मनोमन मानून त्यांनी स्वतःला चिमटा घेऊन पाहिला, नि हे घडतंय ते सत्यच असल्याची त्यांची खात्री पटली. काही क्षण तसेच गेले. राजाला अजूनही तसंच उभं पाहून त्यांची भीड चेपली.

आता राजाच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत ते रागाच्या भरात म्हणाले, " राजा! काय चालू आहे हे! काय केलंस हे तू! का जीव घेतलास हिचा? "
तरीही राजाला ढिम्म उभं पाहून ते म्हणाले," घे! माझाही जीव घे! मारून टाक! "
हे ऐकून मात्र राजाच्या डोळ्यांत चमक आली. तो पुटपुटला, " ज..ज.. जीव..... तु.. तुमच्यात प..पण"
राजाचे वडील डोक्याला हात लावून बसलेले असताना राजाच्या हातातल्या सुरीचा वार त्यांच्या मानेवर होणार, इतक्यात बाबांनी हात मध्ये आणला नि त्यांच्या मनगटाच्या नसेवर वार बसला होता. भळाभळा रक्त वाहत होतं. काहीच वेळात त्यांचा श्वास धीमा झाला, नि त्यांना भोवळ आली. काहीच वेळात त्यांचाही जीव गेला होता, राजाला न दिसता.

राजाच्या पायातला तोल, हातातली शक्ती एव्हाना गळून पडली होती. एवढा खटाटोप करूनही अपयश आलं होतं त्याला. 'जीव' काही त्याला दिसलाच नव्हता. तो तिथेच पडून राहिला, दुसर्‍या दिवशी शेजारच्या काकींनी या सर्वांना या अवस्थेत बघितल्यावर पोलिस येईपर्यंत.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

आज तीन आठवड्यांनी राजाची 'जीव' पहायची इच्छा चाळवली गेली होती. 'आई खोटं बोलली होती तर. जीव शरीरात नसतो, ह्रदयात असतो.' परत तेव्हासारखंच घडलं. राजा आपल्या इच्छाशक्तीने परत चालू लागला. त्याने फडताळातली सुरी घेतली, आजीच्या खोलीकडे मोर्चा वळवला. आजी दुपारची झोप घ्यायला जरा पडली होती. काही क्षणातच तिच्या ह्रदयावर वार झाला नि किंकाळी फोडून तिचाही जीव गेला, यावेळीही राजाला न दिसता. राजा प्रचंड निराश झाला. इतक्यात त्याला आठवलं, आजीचं बोलणं. 'आपल्यातही जीव आहे... आपल्यातही जीव आहे.' त्याच्या हातातल्या सुरीला पुन्हा एकदा रक्त लागलं, दुसरा जीव घेत. पण यावेळी राजाला 'जीव' दिसला की नाही, हे त्यालाच माहीत होतं, मरता- मरता.

दुसर्‍या दिवशी पेपरात बातमी होती-

आजी व नातवाचा खून. खूनी पसार. खूनामागचे कारण अज्ञात. पोलिसांचा तपास सुरू.

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
---------------------------------------------------------------------

या कथेचे सर्व अधिकार लेखकास्वाधीन आहेत.

- द्वादशांगुला
जुई

Group content visibility: 
Use group defaults

Finger prints?>>>>> हा मुद्दा राहिलाच नाही का! हे स्पष्ट करावं लागेल. लवकर करेन. आणि सुचवल्याबद्दल तुम्हाला खास धन्यवाद हं.

घरातल्या चाकूवर घरातल्या लोकांचे फिंगर प्रिंट्स असतातच. Thats कॉमन.>>>> हेही खरंच आहे! पण राजा पांगळा होता ना! मी विचार करतेय अजून . Happy

धन्यवाद अंकु जी Happy

काटा आला अंगावर वाचताना.
इट्स लाईक सायलेन्स ऑफ द लांब्स... मानवी स्वभावाद्वारे भयनिर्मिती.
असं काही बऱ्याच दिवसानंतर वाचायला मिळालं. खूप खूप थँक्स.

काटा आला अंगावर वाचताना.
इट्स लाईक सायलेन्स ऑफ द लांब्स... मानवी स्वभावाद्वारे भयनिर्मिती. >>>>>> खूप खूप धन्यवाद Happy

असं काही बऱ्याच दिवसानंतर वाचायला मिळालं. खूप खूप थँक्स. >>>>> अहो थॅन्कस् कशाला! उलट मीच थॅन्कस म्हणते ! वाचल्याबद्दल नि प्रतिसादाबद्दल. लेखनावरचे प्रतिसाद लिहिण्याचा हुरूप वाढवतात. Happy

छान लिहलेय...कथा वाचून काटे येऊन टोचतयत...असा काही लिहल्या जाईल विचार पण नाही केला कधी...मस्त...>>>>>>> धन्यवाद अधरा जी Happy थोडा चाकोरीबाहेरचा विचार केला, म्हणून लिहिता आली, बस्स !

च्रप्स जी +1111
आणि त्यासाठी मुळात राजवर संशय यायला हवा ना! त्याच्या पांगळेपणामुळे कुणालाही तो दोषी आहे असं वाटणार नाही.

Mala nahi avadali >>>> का नाही आवडली कृपया सांगाल का?
मी पुढचा भाग लिहायच्या विचारात आहे, काही धागे यात स्पष्ट न झाल्याने. Happy

जीव , हा शब्द पहिल्यांदा राजाच्या कानावर आला का? >>>>> काहीअंशी हो. राजा हा आधीपासून एक कमी बौद्धिक पातळीचा मुलगा होता. पण काही प्रमाणात विकृतीही त्याच्याअंगी होती. आधी जरी त्याच्या कानावर हा शब्द पडला असेल, तरी तो त्यावेळी इतर गोष्टींचा विचार करत असल्याने दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. किंवा त्याने आधी याबद्दल कुतूहल व्यक्त केलं असेल, तरी दुसर्यांकडून टाळाटाळ झाल्याचीही एक शक्यता आपण धरू शकतो. यावेळी मात्र त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या आकलनाबाहेरचं मिळाल्याने तो अधिक जिज्ञासू झाला याबाबत. त्यामुळेच तो स्वतः पडताळा घ्यायला लागला.

धन्यवाद Happy

-जुई

आई. हे शरीर त्याचं शरीर शरीर नाही का? >>>> तुम्हाला असं म्हणायचं आहे का की त्याची आई जेव्हा सांगते, की जीव शरीरात असतो; तेव्हा तो आईबाबांना मारल्यावर स्वतःच्या शरीरातला जीव शोधण्यासाठी पाऊल का नाही उचलत? तुम्ही नीट स्पष्ट कराल, तर तुम्हाला पडलेले प्रश्न मला माझ्यापरीने सोडवून सांगता येतील. Happy

ज्यांना ही कथा आवडली त्यांनी बारा वाक्य असी लिहावी ज्यात जीव हा शब्द आई आपल्या मुला साठी वेगवेगळ्या प्रकारात बोलते

नाही आवडली मला पण

ही कथा खुप आधी कुथे तरी वाचल्याचे आठवते पन कुथे वाचलीये ते आठवत नाहीये

कथा खुप आधी कुथे तरी वाचल्याचे आठवते पन कुथे वाचलीये ते आठवत नाहीये>>>>>>>> मॅम ती ही कथा नसेल..अशा आशयाची असू शकेल.... ही कथा नवीन आहे कारण ती एका ठिकाणी स्पर्धेला पाठवल्यावर मग इथे टाकलीये...कदाचित तुम्ही आधी प्रतिलीपीवर वाचली असावी.... मी सुद्धा माझी "आभास" कथा आधी तिथे स्पर्धेत दिली मग इथे टाकली...आम्ही दोघींनीही एकाच वेळी टाकलीये ... सो तसं असावं...

Pages