भरली कार्ली

Submitted by मेधा on 22 March, 2009 - 11:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सात आठ मध्यम आकाराची कोवळी कार्ली
२-३ टेस्पून घट्ट दही
एक मध्यम बटाटा उकडून
धणे, जिरं , बडीशेप १ टे स्पून प्रत्येकी
थोडीशी मेथी
आमचूर, हळद, तिखट, मीठ, तेल

क्रमवार पाककृती: 

कार्ली धुऊन, थोडी साल खरवडून , मधून चिर देऊन आतून साफ करून घ्यावीत.
आतून अन बाहेरून थोडे मीठ व हळद चोळून लावून दहा मिनिटे ठेवा. मग अर्धा कप पाणी घालून दोन दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करून घ्यावे. कार्ली मऊ झाली पाहिजेत. साधारण ४ ते ५ वेळा मायक्रोवेव्ह करावे लागेल. मग पाणी ओतून देउन , स्वच्छ धुऊन, पिळून घ्यावीत.

धणे , जिरं, बडिशेप, मेथी कोरडी जराशी भाजून भरड पूड करावी.
बटाटा, दही, मीठ, आमचूर, तिखट अन वरची पूड एकत्र कालवून कार्ल्यात भरावं.
पसरट जाड बुडाच्या किंवा नॉन स्टिक पातेल्यात तेल घालून कार्ली सर्व बाजूंनी खरपूस भाजावीत.
गरम गरम नुस्तीच खायला मस्त लागतात

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

कार्ली फार जाड असू नयेत. गरज वाटल्यास दोर्‍याने बान्धावीत परतायच्या आधी म्हणजे मसाला बाहेर पडणार नाही. मंद आचेवर परतावीत.

माहितीचा स्रोत: 
बनारस रेसिपीज चं पुस्तक अन माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोनू, तु एकदम सुगरण आहेस असं वाटतं Happy

माझी पद्धत :
जिन्नस - कार्ली, शेंगदाण्याचं कुट, हळद, चिंच, मीठ, गुळ, धणे-जिरे पावडर, कांदा, गोडा मसाला, तिखट इ.

कार्ल्याचे दंड गोलाकार तुकडे करून आतलं सगळं साफ करून ते पोकळ तुकडे, हळदीच्या पाण्यात घालून १० मिनिटं उकळायचे. एकिकडे मसाला करायचा, कांदा बारिक चिरून, त्यात, मीठ, गुळ किसून, थोडं तेल, धणे जिरे पुड घालायची. चिंचेचा कोळ वेगळा करून घ्यायचा आणि तो मसाल्यात मिक्स करायचा थोडा दाट असायला हवा, खूप पातळ झाला तर मसाला कार्ल्याच्या तुकड्यात स्टफ करता येत नाही. साधारण मसाल्याचा गोळा करायचा... आणि तो सगळा मसाला कार्ल्यांमध्ये भरायचा. तत्पुर्वी कार्ली ज्यात उकडली ते पाणी फेकून द्यायचं. नेहमीप्रमाणे फोडणी करून, त्यात थोडा लसूण, कांदा घालून परतायचा आणि थेट ही स्टफ केलेली कार्ली टाकायची. वाफ द्यायची, शिजली की उतरवायची.

हिच भाजी थोडी रसदार करायची असेल तर मसाला कार्ल्यात स्टफ न करता, फोडणीत परतून त्यात उकडलेली कार्ली घालून पाणी घालून उकळवायची. मसाला कार्ल्यात आतपर्यंत जातो.
वरून कोथिंबिर, खोबरं घातलं तर अजून चांगली लागते.