तमाशा -एक भयकथा

Submitted by अजय चव्हाण on 4 May, 2018 - 13:37

किर्र.. किर्र..त्या भयाण काळोखात रातकिड्यांचाच काय तो आवाज ..बाकी सारी शांतता...अमावस्या असल्याने रातीला थोड्या ज्यादा अंधाराने घेरललं..दुर कुठेतरी आकाशात एखादीच चांदणी टिमटिमयाची...रानातले ते अवाढव्य डोंगर अंधारात भयंकर अशा राक्षसाने आ वासलेल्या जबडयासारखे भासत होते... अशातच गण्या पाटील हातात कंदील घेऊन रानवाटा तुडवत लगबगीने " त्या " वाड्याकडे चालला होता
वाडा चारहीबाजुने एका जुनाट वेलने वेढलेला होता...कंदीलच्या प्रकशात त्या वेली अक्राळविक्राळ स्वरूपात पसरलेल्या जटासारख्याच वाटत होत्या...कित्येक दशके तो वाडा बंदच होता...गण्याने सावकाश कंदील बाजुच्या धक्क्यावर ठेवला आणि कपाळावर आलेला घाम शर्टाच्या बाहीने पुसत तो त्या धकक्याला रेलून बसला... त्याने एकवार दुर नजर फिरवली पण बहुतेक ज्याची त्याला आस होती ते तिथ अजुन आलं नव्हतं...
थोडसं खिन्न होत त्याने खिशातली तंबाखू बाहेर काढली आणि नेहमीच्याच स्टाईलने बारं बनवून डाव्या जबड्यात सरकवली...
तंबाखुतलं निकोटीनची एक झिणझीण मेंदूला लागली तसा आपल्याच धुंदीत गण्या गाऊ लागला...." एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग...आज ********* भेटणार मला की, जीव माझा फुलला ग" त्याच्या गाण्याची शैली थोडी वेगळी होतो..जेव्हा तो एकटा असे तेव्हा तेव्हा तो असाच स्वतःच एक वाक्य टाकत गात असे...तो स्वतःशीच तंबाखु चघळत गुणगुणत होता इतक्यातच त्याच्या जोडीला तुणतुण आणि घुंगरू वाजत असल्याचा त्याला भास झाला...मंडळी आली वाटत असं स्वतःशीच पुटपुटत त्याने एक लांब जोरदार पिचकारी मारली...कपाळावर हात ठेवत तो दुरूनच कुठपर्यंत पोहचले ते ह्याचा अंदाज बांधु लागला...पण ह्याही वेळी ते लोक येण्याची कसलीच चिन्हे दिसत नव्हती....तो वैतागून परत आपला गुणगुण लागला....गूणगुणत असताना घुंगराचा छणछण आवाज बारीकसा येत होता...त्याच आवाजाबरोबर कुणाच्या तरी लाडीक हसण्याचा आवाज आणि अशातच " आत या ना ओ.." अशी लाडीक साद कुणीतरी घातली...त्या आवाजात नक्कीच जादु होती...त्या आवाजात साखरेची माधुरी होती, लावण्य उधळण्याच ध्येय होते...मर्दांगनीला केलेल आव्हान होतं...आवाजाच्या दिशेने गण्या भारल्यागत निघाला...वाड्याच दार आपोआप उघडलं गेलं...दुर कुठेतरी तबल्याची नाजुक साद.." ताक धिक ना ना ताक धिक ना ना..ताक धिक ताक.." अशी ऐकु येत होती...कमाल गारवा पुर्ण अंगाला झोंबत होता...गण्या इकडे तिकडे पाहु लागतो..
कुठेच कोण दिसत नव्हतं...अमावस्याची रात असूनही वाड्यात
वरती असलेल्या कौलारू फटीतुन चांदण्याचा मंद प्रकाश का (कृत्रिम) पसरला होता....इतक्यात वरच्या जिन्यात त्याला एक नऊवारी नेसलेली आकृती दिसते..." माझ्या रूपातला ऐवज लाखाची नाणी...चंद्र तारकाच्या जगात मी ग राणी" आपल्या लांब केशसंभारातुन हात फिरवत सावकाश एक एक जिना चढत ती गात असते...गाण्याची धुन आणि गाण्यातले शब्द कुठेतरी त्याला ऐकलेले वाटतात..सुरात होणारे चढउतार, एक विशिष्ट मादक लकब...हे सगळं त्याला ओळखीचं होतं...इतक्यात त्याची ट्यूब पेटते...सगळी गुंगी नाहीशी होते...डोळ्यात भितीचे, पश्चातापाचे भाव स्पष्ट उमटतात...भितीने सारं अंग थरथर कापत जात...जिन्यावरची ती पाठमोरी आकृती जागीच थबकते...मोकळ्या केसांवरून फिरत असलेला हात संथ थांबतो..
सो सा वारा सुटतो..दरवाजा हलकेच बंद होतो...आणि हलकेच ती मान तिरकी करून एक कटाक्ष त्याच्याकडे टाकते... तिला पाहताच त्याच्या छातीत एक जोराची कळ येते...छातीवर हात..आणि तिच्यावर रोखलेली नजर ठेऊन गण्या धाडकन जमीनीवर कोसळतो...

"लाईट्स ऑन होतात.... एक्सलेंट शाॅट.....गुड जाॅब ऑल गाईज..दिगदिर्शक टाळ्या पिटत सगळ्यांचच अभिनंदन करतात आणि आजच्या दिवशी पॅकअप झाल्याच्या घोषणा करतात..."

गण्या अजुनही जमिनीवर तसाच पडलेला असतो...दिगदिर्शक साहेब..." ओ साहेब झाल की, काय अॅक्टींग केलीत तुम्ही...एकदम नॅचरल...हॅटस अप यु मॅन...चला आता उठा...
असे बोलून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात ..पण तो मात्र ढिम्म. .... नजर तशीच त्या दिशेला रोखलेली...

" दिगदिर्शक वैतागतात...ओ चला उठा..निघायचंय आपल्याला...मस्करी पुरे...असं म्हणत दिगदिर्शक त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात....पण तो नाही उठत..आणि कधीच तो आता उठणारा नसतो....

....पाउलाचे आवाज, दुर कुठुनतरी येणार्या गाडीचे आवाज, भरधाव वाहण्यार्या वार्याचा आवाज....खटखट पटपट...मोठी सामुग्री हलवण्याचे किंवा उचलण्याचे आवाज, खटखट सगळी बटणे दाबल्याचा आवाज, नाजूक बांगड्याचा किणकिण आवाज, काहीतरी झटकल्याचा आवाज, रातकिड्याचा किर किर आवाज, कुणीतरी आपआपसात कुजबुजल्याचे आवाज...अस्पष्ट हुंदक्याचा आवाज, कुणीतरी खाकरल्याचा आवाज, जांभई देत असताना होणारा बारीक आवाज...टिन्...एखादी लोखंडी वस्तू जमीनीवर पडल्याचा आवाज...चर्....जमीनीवर घासून तीच वस्तू परत उचलण्याचा आवाज...ह्या सगळ्या आवाजातला त्याला एकही आवाज ऐकू येत नाही..पण त्याला दिसतयं ..धुसर..धुसरं. अनोळखी वाटेवरून जात असताना वाटसरू जसे पाठीमागे वळून पाहतात...तसचं त्याचा आत्मा देह सोडून एखाद्या विशिष्ट अवस्थेत प्रवेश करत असताना, नक्की आपल्या सोबत काय घडलय...आपण काय आहोत?? कुठे चाललोय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना तो पाठी मागून वळून पाहतो...
अंधारल्या काळकोठडीत जशी एक एक खिडकी उघडली जावी तसं तसं त्याला दिसतयं भोवतालच्या गलिच्छ अंधारातून, एका संथ मोठ्या थांबलेल्या क्षणात त्याला दिसतयं.....जणू काही हेच पाहण्याची संधी सृष्टीच्या विधात्याने अनंतात विलीन होण्याअगोदर दिली आहे......

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users