तू मने गमे छे !

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 3 May, 2018 - 03:28

म्हणजे तिला मी पहिल्यांदा पाहिलेले तेव्हाच आतून काहीतरी हललेले. पण सांगतोय कोणाला. सारेच हसले असते.

मी अगदीच पोरसवदा भासत होतो तिच्यासमोर. ती अगदीच गोलमटोल नव्हती, पण पुरेशी धष्टपुष्ट होती. अगदीच गोरी नसली, तरी गव्हाळ उजळ कांतीची होती. अगदीच मराठी नाही, पण मराठी बोलता येणारी होती. आयुष्यात पहिल्यांदा मी एका गुजराती मुलीच्या प्रेमात पडलो होतो, अगदी पहिल्याच नजरेत पडलो होतो.

तिलाही माझ्यात नक्कीच काहीतरी आवडले होते, ते ही पहिल्याच नजरेत. तिची नजरच तसे सांगत होती. पण माझा तो पहिल्या जॉबचा पहिलाच दिवस होता. आणि ती तिथे आधीच सरावलेली खेळाडू होती. मागाहून समजले की तिलाही जॉईन करून चारच महिने झाले होते. तिचाही तो पहिलाच जॉब होता. पण तरीही तिच्यामानाने मी नवखाच होतो.

कोणीतरी मग दुसर्‍याच दिवशी चिडवाचिडवीत माझी तिच्याशी जोडी जमवली. आणि पुढे त्या चिडवण्याला आणखी कोणी खतपाणी घालू नये म्हणून उगाचच, अगदी उगाचच मी तिच्याशी एकदा तुसडेपणाने वागलो. फक्त एकदाच..

बस्स ! मग ज्या मुलांनी मला तिच्यावरून चिडवायला घेतले होते, तेच आता आमच्यातील खुन्नसचे किस्से रंगवू लागले. आमच्यात तसे काहीही नसताना आमच्यातील शीतयुद्धाच्या कहाण्या रचू लागले. मी देखील वेड्यासारखा, कसेही का होईना, तिच्यासोबत आपले नाव जोडले जातेय यातच आनंद मानू लागलो. कधीतरी फटक्यात या सर्व अफवांतील फोलपणा जगासमोर येईल आणि आमच्यातील तथाकथित शत्रुत्व प्रेमात बदलेल या विचारांत रमू लागलो. हळूहळू मला जाणवत होते, की मी तिच्यात आता गुंतू लागलो होतो.

जेव्हा ती माझ्याकडे बघायची, रागानेच बघायची. मी सुद्धा माझी नजर कोरडीच ठेवायचो. पण नेहमी माझ्या नजरेला नजर मिळेल, अश्याच जागी ती बसायची.
माझ्या अगदी शेजारून जायची. तिच्यासाठी मी अस्तित्वातच नाही असे दर्शवून जायची. पण ज्या दिवशी मी ऑफिसला यायचो नाही, तेव्हा हलकेच माझी चौकशीही करायची.
मी कधी तिची खोडी काढल्यास, थेट माझ्याशी भांडायलाही लाजायची. पण तिच्यावरून मला चिडवणार्‍या, माझ्या मित्रांशी लाजत लाजत बोलायची.
एक वेगळीच केमिस्ट्री होती आमच्यात. तिचे नाव घेताच लोकांना मी आठवायचो, माझे नाव घेताच ती आठवायची..

वर्ष गेले अश्यातच..
आणि मग ठरवले आता बोलायचे..

निमित्त होते दिवाळीनिमित्त ऑफिसमधील एका कार्यक्रमाचे. प्रत्येकाला दहाबारा कागदांचे चिटोरे वाटण्यात आले होते. आणि ठरले असे होते की प्रत्येकाने आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तींबद्दल त्या कागदावर लिहून तो चिटोरा त्यांच्यात्यांच्या डेस्कवर लावायचा. स्वत:चे नाव मात्र लिहायचे नाही. आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात याचा थेट फिडबॅक..

मला फक्त एकाच कागदात ईंटरेस्ट होता. काय लिहू, आणि काय नको...
अशी संधी पुन्हा येणार नव्हती... थेट भिडायचेच ठरवले !

ठरलं ! लिहून यायचे, तू मला आवडतेस !

पण भावना नेहमी मातृभाषेतच पोहोचतात. मराठी लिहिता बोलता येणारी असली तरी होती मात्र ती गुजरातीच.. मग मेहुलची मदत घेतली.. आणि गुजराती भाषेतील सर्वात गोड वाक्य त्या कागदावर अवतरले,

"तू मने गमे छे ! "

दुपारच्या सत्रात बाहेर सारे कार्यक्रमात मग्न असताना मी हळूच तो कागद तिच्या डेस्कवर डकवून आलो. जणू काळजाचा छोटासा तुकडाच तिथे ठेवून आलो. आता प्रतीक्षा होती ते तिने माझे काळीज वाचण्याची.

प्रतीक्षा संपली. ती जागेवर आली. आम्ही टोळके करून जवळपासच उभे होतो. तिने तो डकवलेला कागद काढला. तो तसाच हातात घेऊन मुद्दामच आमच्या ग्रूपसमोर आली. आणि आम्हाला स्पष्ट दिसेल असे दोन्ही हातांत धरून तो टर्राटरा फाडला..

जरा धक्का लागल्यास खळ्ळकन फुटावे अश्या काचेच्या हृदयावर कोणीतरी तीक्ष्ण खिळ्याने कर्रकचून ओरखडा ओढावा असे झाले..

पण ते शेवटचेच ...
त्यानंतर मन कोडगे करून घेतले. पुन्हा त्याला नजरांचे चुकीचे अर्थ काढण्यापासून परावृत्त केले. साधारण दिडदोन महिन्यातच मला नवीन जॉब लागला आणि मी तिथून बाहेर पडलो. तेथील काही मित्र नंतरही संपर्कात होते. पण पुन्हा कधी तिचा विषय निघाला नाही. पुढे तिचे लग्न झाले हे मात्र उडत ऊडत कानावर आले. पण फारसे काही वाटले नाही. कारण एव्हाना माझेही झाले होते.

पण जगही किती छोटे असते ना..
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेत अखेर आमची पुन्हा एकदा एकाच कंपनीत गाठ पडली.
बावरलेली नजर आम्हा दोघांची. काय बोलावे, कसे बोलावे. कि बोलूच नये. एक अवघडलेपण.
तरी सहा वर्षे झाली.. पण फरक असा काहीच नाही..
शेवटी मीच ठरवले, दोघांचीही लग्ने झाली आहेत. जे होते ते माझे एकतर्फी होते. उत्तरही तेव्हाच मिळाले होते. म्हणून संकोच सोडून हसतच तो विषय काढला, आणि जे झाले ते विसरून जाऊया म्हणालो..

चेंडू मी तिच्या कोर्टात ढकलला होता. आता अवघडून जायची वेळ तिची होती.
पण तिच्या डोळ्यात अविश्वास होता !
ते.. ते.. तू लिहिलं होतंस?? पण असं कसं.. तू मने गमे छे.. ते अक्षर तर मेहुलचे होते ना ....

थोडसं गरगरलं मला.. आणि ते तर होणारच होते.
क्षणात जे एवढ्या वर्षांची कॅसेट रिवाईंड होत माझ्याच डोक्यावर आदळली होती...

- भन्नाट भास्कर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ता. क. : त्या शाळकरी मुली कुठे गायब झाल्या?
>> त्या कट्ट्यावर असतात हो.. त्या नक्कीच रु नाहीत.

नसतील तर बरेच आहे.
पण विविध अवतार तरी कश्यासाठी? प्रतिसाद मिळविण्यासाठी, प्रसिद्धीसाठी?... 'थत्ते' होत चाललाय त्यांचा Proud

ता. क. : त्या शाळकरी मुली कुठे गायब झाल्या?
>> त्या कट्ट्यावर असतात हो.. त्या नक्कीच रु नाहीत.

>>>>>

कश्यावरून ??

अवांतर - माझ्याबद्दल कुठे चर्चा सुरू असेल तर तेवढे कोणीतरी मला एक विपु करत जा.. मला वाचायला आवडते Happy

माझ्याबद्दल कुठे चर्चा सुरू असेल तर तेवढे कोणीतरी मला एक विपु करत जा
>>> चर्चा शाळकरी मुलींबद्धल होती, अशा वेळी पण तुम्हाला विपु करायला सांगताय?

च्रप्स, आपणच माझे नाव वर घेतलेत बघा
आणि तसेही मला कल्पना आहे, हल्ली मायबोलीवर येणारया प्रत्येक नवीन आयडीला ऋन्मेष टेस्ट पास करावी लागते. म्हणजे आपण ऋन्मेष नाही हे पटवून द्यावे लागते.
पर्सनली मला याचे वाईट वाटते.

हो, आणि प्रेमाने मला ऋन्मेष बोलतात Happy
असो, धागाकर्ता क्षमस्व, उगाच माझी अवांतराची भर नको. लास्ट पोस्ट !

आज शाळेतल्या मित्रांना हा किस्सा सांगताना त्यांना लिंक द्यायला हा धागा शोधला Happy

इथे प्रतिसादात लिहिले आहे की नाही कल्पना नाही..
पण ती मुलगी आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. व्हाट्सअप वर बोलणे होते.
तिचेही लग्न झाले आहे. तिलाही पोरंबाळे आहेत
रोज आम्ही एकमेकांचे व्हाट्सअप स्टेटस बघतो
आणि आवडला की एकमेकांना प्रेमाने आणि आपुलकीने रिप्लाय देतो. तेव्हाची नोक झोंक आम्ही दोघांनीही पॉझिटिव्हली घेतली होती.. किंवा आहे..

थोडक्यात तिला हा लेख आता शेअर केला तरी तिला वाचायला मजा वाटेल Happy
फक्त तिला मराठी वाचायची कितपत आवड आहे आणि कळते हा प्रश्न आहे !

*... मित्रांना हा किस्सा सांगताना त्यांना लिंक द्यायला हा धागा शोधला * - बरं झालं, त्यामुळे मला आता तरी वाचता आला व आवडला पण ! ( फार फार पूर्वी मी पण एकदा यंग होतोच ना, म्हणून किस्सा छान कळला, पटला व डंसला ! Wink )

Pages