आंब्याची सांदणं

Submitted by मनीमोहोर on 2 May, 2018 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मे महिना आला की मन कोकणात धाव घेतं. सारख्या तिकडच्या आठवणी यायला लागतात.. कामांची धांदल, पाव्हणे, त्यांच्यासाठी म्हणून मुद्दाम केलेले आंब्या फणसाचे वेगवेगळे पदार्थ... कोकणची खासियत असणारा असाच एक पदार्थ म्हणजे सांदण. ह्याला गोड इडली म्हणून ह्याच डीमोशन नका करू. कारण सांदण म्हटलं की मनात उठणारे तरंग, त्या भोवती असणाऱ्या मधुर आठवणी, त्या शब्दालाच असलेलं वलय, लगेच खाण्याची होणारी तीव्र इच्छा हे सगळं आमरसाची गोड इडली म्हणून नाही होणार. एकदा आमच्या ऑफिस मधल्या एका सहकाऱ्याच्या पत्नीने चैत्र महिन्यात चांगला मोठा डबा भरून आंब्याची डाळ पाठवली होती. खाल्ली सगळ्यानी मिटक्या मारत पण नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी तिची “ दाल की चटनी ” करून पार चटणी करून टाकली होती . तसंच हे जरी इडली सारख दिसत असलं तरी ह्याला म्हणायचं सांदणच.

पूर्वीच्या काळी असे पदार्थ करण खरंच खूप जिकिरीचं होतं. सगळी काम सांभाळून एवढया माणसांसाठी काही करायचा घाट घालणं कष्टाचंच असे. तेव्हा गोडधोड सटीसामाशीच मिळे खायला त्यामुळे त्याच अप्रूप ही होत आणि लोक खात ही भरपूर असत त्यामुळे करावं ही खूप लागत असे.

आमच्या कडेही सांदणाची तयारी दोन तीन दिवस सुरू होते. ह्यासाठी लागणाऱ्या तांदळाच्या कण्या पूर्वी जातिणीवर घरीच काढत असू आम्ही . आता घरगुती चक्कीवर काढतो. मग चांगला रसाळ फणस तयार आहे का याची चाचपणी होते आणि सगळं जुळून आलं की मग एके दिवशी सांदणांचा बेत फिक्स केला जातो. आमच्या कडे फणसाची आणि आंब्याची अशी दोन्ही सांदण करतात गावाला. ह्या साठी लागणारा फणसाचा रस त्यात गुठळी चालत नाही म्हणून चाळणीने चाळून घ्यावा लागतो. त्यासाठी मोठया मोठया बांबूच्या चाळण्या ही आहेत आमच्याकडे. एकदा सांदण वाफवायला मोदकपात्रात ठेवली की त्याचा एक विशिष्ट सुगंध अख्ख्या घरभर दरवळतो आणि त्या वासाने भूक चांगलीच खवळते.

ह्या वर्षी मी गावाला नाही जाऊ शकलेय मे महिन्यात . पण कोकणातल्या मे महिन्यातल्या आठवणी मनात भरून राहिल्या आहेत. त्यामुळे आज इथेच सांदण केली. अर्थात तिकडे सगळ्यांबरोबर करण्याची आणि खाण्याची मजा औरच पण त्यातल्या त्यात दुधाची तहान ताकावर ... इथे फणसाची सांदण करणं अशक्य आहे कारण बरक्या फणसाचा रस काढणं शक्यच नाही. म्हणून फक्त आंब्याचीच केली. चला आता कृती कडे वळू या.

साहित्य

एक वाटी इडली रवा ( मिक्सर मध्ये थोडा बारीक करून आणि कोरडाच थोडा भाजून घेणे )
दीड वाटी आंब्याचा रस मिक्सरमध्ये एकजीव करणे( गुठळ्या नकोत )
अर्धी वाटी दूध
गरजे प्रमाणे साखर,
एक चमचा तूप
अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, किंचित मीठ .

क्रमवार पाककृती: 

इडली रवा, आंब्याचा रस, दूध, साखर मीठ आणि तूप सगळं एकत्र करून आणि जरुरी प्रमाणे पाणी घालून इडली सारखं सरसरीत भिजवून एक तासभर ठेवून द्यावे म्हणजे रवा चांगला भिजतो. नंतर पीठ घट्ट वाटले तर त्यात थोडं दूध घालावं. बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करावे आणि इडली पात्रात हे मिश्रण घालून इडली सारखं १२ ते १५ मिनिटं वाफवून घ्यावे. पाच मिनटांनी बाहेर काढून थोडं थंड झालं की साच्यातून सांदण काढावीत आणि गट्टम करावीत.
हा फोटो
IMG_20180502_104846901~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3 ते 4
अधिक टिपा: 

खाताना दूध ( नारळाचे असेल तर धावेल) किंवा तूप जे आवडते त्या बरोबर खावे.

आंब्याचं लोणचं मात्र पाहिजेच बरोबर.

उरली तर दुसऱ्या दिवशी ही छानच लागतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी प्रमाण तेच घेतलं आहे. काही बदल केलेले नाहीत. थोडं नारळ दूध घातलं.
भगरीचा रवा असल्याने 2/3 तास भिजवलं तर अजून छान होतील अस वाटतंय.
मिलेट डाएट वाल्यांसाठी उत्तम आहे हा प्रकार.
फक्त पहिल्या घाण्याला सोडा घालायचा राहिला. नंतर घातला, त्या जास्त स्पॉंजी झाल्या पण आम्हाला ह्याच टेक्सचर जास्त आवडलं.
रस मागच्या वर्षीचा फ्रोजन होता. छान टिकला होता.
1 वाटी रस 1 चमचा साखर असे लेअर देऊन फ्रीज केला होता. मस्त राहिला होता.

स्वाती, तुझी पण रेसिपी छान आहे. म्हणजे आता नेहमी करायला हरकत नाही हा प्रकार. तांदूळ रवा / साधा रवा किंवा भगरीचा रवा. सगळंच चालेल.

थँक्यु आभा इथे कृती लिहिलीस म्हणून.
स्वाती, तुझी साधा रवा वापरून मस्तच झाली आहेत सांदण
तांदूळ रवा / साधा रवा किंवा भगरीचा रवा. सगळंच चालेल. >> आभा, +१११

Pages