पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १२. ये रास्ते है प्यारके (१९६३)

Submitted by स्वप्ना_राज on 26 April, 2018 - 12:39

Will the jury foreperson please stand? Has the jury reached a unanimous verdict?

Yes, Your Honor, we have.

Members Of The Jury, on the Case of Mr. X vs The United States Of America, what say you?

Your Honor, the members of this Jury find the defendant Not Guilty

हॉलीवूडच्या चित्रपटांत कोर्टरूममधल्या प्रसंगांत तुम्ही अनेक वेळा हे डायलॉग्ज ऐकले असतील. पण आपल्याकडच्या चित्रपटांत मात्र ही ज्युरी सिस्टीम कधीच दिसून येत नाही. असं का? खरं तर ५० च्या दशकाच्या जवळपास अखेरपर्यंत ही सिस्टीम आपल्या न्यायव्यवस्थेचा भाग होती. पण एका सनसनाटी खटल्याने ही सिस्टीम बरखास्त केली. हा खटला होता प्रेम आहुजा विरुध्द कमांडर नानावटी खटला. नेटवर ह्या खटल्याची इत्यंभूत माहिती मिळते त्यामुळे इथे त्याबद्दल विस्ताराने लिहायची आवश्यकता नाही. सांगायचा मुद्दा हा की कमांडर नानावटीला गुन्ह्याच्या मानाने जी सौम्य शिक्षा झाली त्यावरून बराच गदारोळ झाला आणि भारतीय न्यायदानाच्या प्रक्रियेतून ज्युरी सिस्टीम काढून टाकण्यात आली.

ह्या खटल्यावर बेतलेले एकूण ३ चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण झाले. १९६३ सालचा 'ये रास्ते है प्यारके' हा माझ्या माहितीनुसार त्यावरचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर आला १९७३ सालचा विनोद खन्नाचा 'अचानक' आणि शेवटी २०१६ मध्ये अक्षयकुमारचा 'रुस्तम'. 'ये रास्ते है प्यारके' हा सुनील दत्तचा निर्माता म्हणून पहिला चित्रपटसुध्दा होता.

चित्रपटाची कथा नानावटी खटल्यावर आधारित असली तरी ती loosely based होती असंच म्हणता येईल. In fact, चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेल्या डिस्क्लेमरमध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे. चित्रपट सुरु होतो तेव्हा नायक अनिल सहानी गजाआड असतो. त्याला आठवत असते ती पत्नी नीनासोबतची परदेशातली पहिली भेट. इतक्यात एक पोलीस कॉन्स्टेबल येऊन त्याला त्याचे वडिल भेटायला आल्याचं सांगतो. वडिल अनिलला सांगतात की त्यांनी त्याला सोडवण्यासाठी एका नामी वकिलाला कोलकत्त्याहून बोलावलं आहे त्यामुळे त्याने काळजी करायचं काहीच कारण नाही. अनिलची पत्नी नीना जवळच बसलेली असते. तो तिच्याकडे पाहून वडिलांकडे बघतो तेव्हा ते म्हणतात की मी नीनाचा सून म्हणून कधीच स्वीकार केला नाही पण तुझी सुटका होईस्तोवर ती माझ्या घरात माझ्या मुलीच्या हक्काने राहील.

यथावकाश आपल्याला हे कळतं की अनिल हा एक कमर्शिअल पायलट आहे. कामाच्या निमित्ताने पॅरीसला गेला असताना त्याची ओळख नीनाशी झालेली असते. ओळखीचं रुपांतर प्रेमात होतं. वडिलांच्या विरोधाला न जुमानता अनिलने तिच्याशी लग्न केलेलं असतं. ७ वर्ष उलटतात. दोघांना पवन आणि गीता नावाची दोन मुलं होतात. मग ४ महिन्यांसाठी अनिलला परदेशी जावं लागतं. विमानतळावर त्याला निरोप द्यायला नीना आणि मुलांसोबत अनिलचा अशोक श्रीवास्तव नावाचा मित्रही आलेला असतो. अनेक वर्षं अमेरिकेत असलेला अशोक एक वर्षांपूर्वीच भारतात परतलेला असतो. अनिल त्याला आपल्या बायकोमुलांची काळजी घ्यायला सांगतो. अनिलच्या मागे नीनाला आणि मुलांना शॉपिंगला नेण्यासाठी, नीनाला हॉटेलात किंवा क्लबमध्ये घेऊन जायच्या निमित्ताने त्याच्या घरी अशोकचं येणं-जाणं वाढू लागतं. अशोकची मैत्रिणीला, आशाला, हे सगळं खटकत असलं तरी अशोककडे निषेध नोंदवण्यापलीकडे ती फारसं काही करू शकत नाही.

अनिल परत यायच्या काही दिवस आधी अनिल-नीनाच्या लग्नाचा वाढदिवस आणि अनिलचा वाढदिवस अश्या दुहेरी celebrations साठी नीना अशोकच्या मदतीने तिच्या घरी एक पार्टी आयोजित करते. अशोक पार्टीत तिला ड्रिंक्स घेण्याचा खूप आग्रह करतो आणि तिच्या मद्यात गुंगीच्या गोळ्या मिसळतो. पार्टीला आलेले सगळे लोक निघून गेल्यावर नको तो अनर्थ होतो.

अनिल परत येतो तेव्हा आपल्या पत्नीत बदल झाल्याचं त्याला जाणवतं. पण नेमकं कारण कळत नाही. तश्यात एक दिवस तिला आलेला अशोकचा फोन तो चुकून उचलतो. आणि नीनाचे अशोकशी विवाहबाह्य संबंध असल्याची त्याची खात्री पटते. त्याचे वडील मुलांच्या भविष्याचा विचार करता त्याला नीनाला घटस्फोट न देण्याचा सल्ला देतात. पती-पत्नी म्हणून नातं संपुष्टात आलं असतानाही दोघं एकत्र राहण्याचा निर्णय घेतात पण ते फार कठीण असतं. शेवटी एके दिवशी अनिलला खरं काय घडलंय ते समजतं (मी युट्युबबरून डाउनलोड केलेला चित्रपट एडीटेड होता त्यामुळे त्याला नक्की काय आणि कसं समजतं ते मला कळलं नाही) तेव्हा तो संतापतो. अशोकच्या घरी त्याला जाब विचारायला जाताना आपला मित्र केवल कपूर ह्याच्या घरातून तो त्याचं पिस्तुल घेतो. अशोक आणि त्याची बाचाबाची होते. झटापटीत गोळी सुटते. अशोकचा मृत्यू होतो. अनिलला त्याच्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक होते. आणि तो जीव तोडून सांगत राहतो की मी अशोकला मारलं नाही, तो एक अपघात होता........

अनिलच्या हातून अशोकचा खून झालेला असतो? का तो एक अपघात असतो? अनिलला कोर्ट आणि ज्युरी काय शिक्षा देतात? त्याचं आणि नीनाचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होतं का खर्या प्रेमाला असलेला चिरंतन शाप त्यांना भोवतो? प्रेमाच्या गावाला जाणारी वाट त्या दोघांना शेवटी कुठे घेऊन जाते?

कुठल्याही चित्रपटात नायक-नायिकेच्या जोडीतली केमिस्ट्री फार महत्त्वाची असते. हा चित्रपट त्या बाबतीत सपशेल आपटलाय असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल. नीनाच्या भूमिकेसाठी अनेक प्रथितयश अभिनेत्रींना विचारणा होऊनही त्यांनी ती नाकारली आणि म्हणून सुनील दत्तला ती लीला नायडूला द्यावी लागली असं नेटवर वाचलं. काही ठिकाणी असंही म्हटलं होतं की पॅरीसमध्ये जन्माला येऊन तिथेच २० वर्षं राहिलेल्या नायिकेत एक प्रकारचं exotic appeal हवं होतं ते लीला नायडूमध्ये होतं म्हणून ही भूमिका तिला मिळाली (ही १९५४ सालची मिस इंडिया होती). कारण काहीही असलं तरी नीना म्हणून मला तरी ती अजिबात भावली नाही. तिच्या चेहेर्यावरचा भाव (किंवा कसल्याही भावाचा अभाव) थेट तिच्या 'अनुराधा' ह्या चित्रपटातल्यासारखाच आहे. नवर्यावर, कुटुंबावर असोशीने प्रेम करणार्या नीनाचं नको ते घडून गेल्यावर उन्मळून पडणं, सैरभैर होणं तिच्यापर्यंत बहुतेक पोचलेलंच नाही असं जाणवावं इतपत तिचा अभिनय बेगडी वाटतो. कदाचित ह्याला नीनाच्या व्यक्तिरेखेतले कच्चे दुवे थोडेफार कारणीभूत असतील. नेटवर काही लोकांनी असंही म्हटलंय की हा चित्रपट आला तेव्हा नर्गिस आणि सुनील दत्तचं लग्न झालं होतं आणि नर्गिसने चित्रपटसंन्यास घेतला होता म्हणून नाहीतर ती नीनाच्या भूमिकेत शोभली असती. पण मला नर्गिस सुनील दत्तच्या मानाने नेहमीच थोराड वाटत आली आहे. त्यामुळे तिची अभिनयक्षमता असूनही केवळ ह्या मुद्द्याचा विचार करता ती नीना म्हणून शोभली नसती असं आपलं मला वाटतं.

सुनील दत्तने अनिलचा आधीचा मोकळाढाकळा स्वभाव, बायकोच्या वागण्यात झालेल्या बदलाचं नेमकं कारण न समजल्याने आलेलं गोंधळलेपण, तिचं आपल्या मित्रासोबत अफेअर आहे अशी शंका आल्यावरचं दुखावलेपण, अविश्वास, तिच्याबद्दलची चीड आणि शेवटी अशोकच्या कृत्याबद्दलचा संताप हे सर्व भाव आपल्या अभिनयातून चांगले दाखवलेत. पण आधी म्हटल्याप्रमाणे केमिस्ट्रीच्या अभावापायी हा प्रयत्न एकतर्फी झालाय. अशोक श्रीवास्तव ही खलनायकी भूमिका रेहमानने नेहमीच्या sophistication ने वठवली आहे. अनिलच्या बाजूने लढणारा वकील ब्योमकेश मुकर्जी म्हणून अशोककुमार तर त्याच्या विरोधातले वकील अलीखान म्हणून मोतीलाल आहेत. राजेंद्र नाथ (अनिलचा मित्र केवल कपूर), शशिकला (आशा), इफ्तखार (ब्योमकेशचा सहाय्यक वकील) आणि हरी शिवदासानी म्हणजे नायिका बबिताचे वडिल (अनिलचे वडिल) हे इतर सहाय्यक भूमिकांत दिसतात.

कुठल्याही हिंदी चित्रपटाचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यातली गाणी. ह्या चित्रपटात पहिल्या १०-१५ मिनिटांतच ३ गाणी आहेत.पैकी टायटल सॉंग - जे चित्रपटाच्या नायिकेवर चित्रित न होता शशिकलावर चित्रित झालेलं आहे - श्रवणीय आहेच. पण माझं अधिक लाडकं गाणं आहे 'ये खामोशीया ये तनहाईया'. बाकी गाण्यांपैकी ‘आज ये मेरी जिंदगी' आणि 'गुनाहोंका दिया था' आवडली.

तुम्ही हा चित्रपट पहाणार असाल तर अपना साथ यहीतक.........अब इस मोडसे मूड जाईये.........

आधी म्हटल्याप्रमाणे चित्रपट मागे बरेच प्रश्न ठेवून गेला. एडीटेड व्हर्जन असल्याने पार्टीच्या रात्री नक्की काय झालं ह्याचा नेमका अंदाज मला आला नाही. म्हणजे अशोक नीनावर अतिप्रसंग करतो का जे काही होतं ते मद्याच्या नशेखाली तरी राजीखुशीने? ह्यानंतर त्यांचे संबंध चालू राहतात का? तसं नसावं कारण त्यानंतर लगेच काही दिवसांत अनिल परत येतो. आणि नीनाचं अनिलवर प्रेम असतं. ती अशोककडे आकृष्ट झाल्याचं चित्रपट कधीच सुचवत नाही. अशोकचा नीनासाठी आलेला फोन अनिल उचलतो तेव्हा तो नेमकं काय ऐकतो? नीनावर अतिप्रसंग झाला असेल तर त्यात तिची चूक कशी? कदाचित एवढीच की तिने अशोकवर विश्वास टाकला. पण अनिलनेच तर आपल्या मित्राची तिच्याशी ओळख करून दिलेली असते आणि आधी झालेल्या एका पार्टीत अशोकच्या आग्रहावरून तिला ड्रिंक्स घ्यायला सांगितलेलं असतं. आपला मित्र बाहेरख्याली आहे हे त्याला माहित असणारच. मग तो बायकोला सावध का करत नाही? मग त्याचं नंतर तिचा राग करणं चुकीचंच नाही का? जर इथे नीना एक victim आहे तर तेव्हाच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी ही भूमिका का नाकारली हेही अनाकलनीय आहे. मुलांकडे पाहून नीनासोबत रहायचं अनिलने ठरवलेलं असतं मग तो अचानक अशोकला जाब विचारायला का निघतो? नीना आणि अशोकचं अफेअर नसून नीनावर अत्याचार झालाय हे त्याला कळतं का? मला हा सगळा गुंता काही सुटला नाही.

नीनाचं वागणंसुध्दा पटत नाही. वयाची २० वर्षं पॅरीससारख्या ठिकाणी काढलेली ही स्त्री भारतात आल्यावर पती आणि मुलांत रमलेली दिसते. लग्नाला ७ वर्ष झालेली. नवर्यावर नितांत प्रेम. पार्ट्या, ड्रिंक्स, मौज ह्यांची अतिशय आवड आहे असं कुठे जाणवत नाही. मग ती चार महिने अशोकसोबत का फिरते? त्याला नेमकं काय हवंय हे २७ वर्षाच्या ह्या स्त्रीला कळत नाही का?

नेटवर बर्याच लोकांनी अशोककुमार आणि मोतीलाल ह्यांच्या कोर्टातल्या जुगलबंदीबद्दल लिहिलंय. पण मला मात्र त्यांचे कोर्टमधले सीन्स खास वाटले नाहीत. केसबद्दल वादावादी करण्याऐवजी आपसात वाद घालण्यात त्यांचा वेळ खर्ची पडलाय. कोर्टात फॉरेन्सिक एक्स्पर्टची साक्ष काढली आहे. पण ह्या एक्स्पर्टला हे कळत नाही का की ज्या गोळीने अशोकचा मृत्यू झाला ती अनिलच्या पिस्तुलातून झाडली गेली नव्हती? फोटोच्या मागे भिंतीत असलेली गोळी जी पोलिसांना तपासात मिळाली नाही ती वकिलांना कशी सापडते? गुन्ह्याच्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे वकील असे मिळून जाऊ शकतात? तो प्लॅन्चेट करण्याचा प्रकार तर अत्यंत बालिश आणि लेखकाच्या कल्पनादारिद्र्याचं द्योतक वाटला. त्याऐवजी वकिली डावपेच वापरून आशाला कोर्टात बोलतं केलं असतं तर अधिक मजा आली असती. ‘नीना अशोकला युरोपमध्ये असताना ओळखत होती' असं खोटंच तिच्याकडून वदवून घेण्यामागे ब्योमकेश मुकर्जीचा काय हेतू असतो? त्याने अनिलला सोडवायला कशी मदत होणार?

एक प्रेक्षक म्हणून तर सोडाच पण एक स्त्री म्हणूनही मला चित्रपटाचा शेवट अजिबात पटला नाही. अतिताणाने नीनाचा कोर्टातच मृत्यू झालेला दाखवलाय. ‘चितेच्या निखार्यात माझा गुन्हा जळून जाऊ देत' असं काहीतरी बोलते ती. चित्रपटाच्या सुरुवातीच्या गाण्यात 'एक गुनाह हुआ है' असे शब्द आहेत. म्हणजे एक तर तिच्यावर बळजबरी झाली आहे किंवा क्षणिक मोहापायी तिच्या हातून नको ते झालंय. पण तिचा गुन्हा असो वा नसो. एक पत्नी म्हणून, आई म्हणून तिची फक्त संसारात परतायची वाटच बंद झाली आहे असं नाही. तर तिला आता स्त्री म्हणून, माणूस म्हणून जगायचाही हक्क नाही. तिने मरूनच प्रायश्चित्त घ्यायला हवं ही मानसिकता ह्यात दिसते. एक तर नानावटी खटल्यावर आधारित चित्रपट काढायचाय पण कथा तंतोतंत जुळायला नको ह्या दुग्ध्यात पडल्याने कथेचं कडबोळ होऊन हा शेवट करायला लागला असावा. किंवा हा चित्रपट अर्ध्या शतकापूर्वीचा असल्याने तेव्हाच्या काळाला अनुसरून असा शेवट अपरिहार्य असावा.

प्रश्न हा आहे की अर्धं शतक उलटून गेल्यावरसुध्दा ह्या देशातल्या अश्या एखाद्या नीनाच्या कथेचा शेवट काही वेगळा होणार आहे का? ह्या प्रश्नातच उत्तर दडलंय. आणि ते उत्तर कुठल्याच संवेदनशील व्यक्तीला आवडण्यासारखं नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटाच माहीत नाही, लेख मस्त जमलाय.
रुस्तम मध्ये अक्षयकुमार आहे. खन्ना नव्हे.
त्या चित्रपटावरच्या माबोवरच्या धाग्यावर भरपूर आणि रोचक माहिती मिळालेली.
आणि इत्थंभूत. इत्यंभूत नाही..

स्वप्ना, खूप सुरेख परीक्षण लिहिलंस. हा एक चित्रपट जो मी न पाहिला न यातली गाणी कधी छायागीतात परत परत पाहिली गेली. ये रास्ते है प्यारके हे गाणे एकदाच दूरदर्शनवर पाहिल्याचे मला आठवतंय.

सगळ्याच जुन्या चित्रपटात स्त्री योनीशुचिता सगळ्यात महत्वाची आहे हे दाखवलेले आहे. स्त्रीचे पाऊल एकदा वाकडे पडले की तिला मृत्युशिवाय पर्याय नाही ह्या एका ओळीच्या कथानकावर आलेले कित्येक चित्रपट मी पाहिलेत आजवर. हल्लीच श्रीदेवीचा विनोदी सिन म्हणून युट्युबने तिचा व पद्मिनी कोल्हापूरेचा एक सिन दाखवला. उत्सुकता वाटून मी चित्रपट शोधून कथा वाचली व यु ट्यूबवर पुढे ढकलत पाहिला. शहरातून शिकून आलेली श्रीदेवी लग्नानंतर दुसऱ्या पुरुषाच्या मोहात पडून पळून जाते, पश्चताप होऊन परतल्यावर नवऱ्याचे लग्न बहिणीशी झाल्याचे पाहते. इथवर ठीक आहे, आयुष्यात होऊ शकते असे. पण एक शिक्षित स्त्री एकदा चूक झाली तर परत आयुष्य उभे करायचा प्रयत्न न करता नवऱ्याच्या नावाने झुरत, डोळे गाळत व त्याच्यासाठी प्राण देण्यात धन्यता मानते हे बघून तिडीक गेली डोक्यात.

शिकलेली स्त्री संसार करायला व नाती टिकवायला किती नालायक हे दाखवणारे कित्येक चित्रपट पाहिलेत. स्त्री अगदी कलेक्टर झाली तरी नवर्यापूढे ती दुय्यमच आहे हे दाखवणारे चित्रपट मी किमान दोन भाषेत पाहिलेत. शिकून घराला वर काढणा-या स्त्रीची कथा असलेले चित्रपट आता पटकन आठवतही नाहीयेत इतकी त्यांची संख्या कमी आहे.

चोपरांच्या गुमराहमध्ये सुरवातीलाच सीताहरणाचा प्रसंग दाखवून सीता मर्यादेत राहिली असती तर रावण तिचे अपहरण करुच शकला नसता हे सुचवलेय. एकूण काय, दोष चोराचा नाहीच, स्त्रीत्व हीच खुली तिजोरी व ऐसी खुली तिजोरी मौका मिलतेही लूट जायेगी ही मानसिकता समाजाची होती/आहे/राहणार. तिला खतपाणी घालायचे काम आधी साहित्य व कलेतून होत राहिले, नंतर चित्रपटातून तेच होत राहिले.

स्वप्ना, मालिका उत्तम चालू आहे. हा लेखही आवडला.
साधना, प्रतिसाद आवडला. शिकलेली, कमावणारी, आधुनिक बाई म्हणजे घर सांभाळणारी नसणारचं, हे जनरलायझेशन डोक्यात जातं.
स्वतंत्र स्त्री ही बेजबाबदार असणार असं ग्रृहीत धरलं जातं.
अवांतर झालं इथे. सॉरी

चित्रपट परीक्षण तुम्ही नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलेत, रुस्तम आला तेंव्हा नानावटी खटल्याची आजच्या पिढीतल्या लोकांना माहिती झाली (मी सुद्धा त्यातलाच एक). त्याकाळात देशभर अत्यंत गाजलेला खटला. या विषयवार तीन चित्रपट निघालेत हे रुस्तम रिलीज झाला तेंव्हा जे लेख आले त्यातून कळले. पैकी हा चित्रपट loosely based असला तरी फार चालला नाही बकवास आहे असे वाचले होते. या परीक्षणामुळे खात्री पटली. नंतरचा विनोद खन्नाला घेऊन काढलेला चित्रपट (अचानक) सुद्धा इतका अपिलिंग नाही जितका रुस्तम आहे. वास्तववादी आणि method acting चा ट्रेंड नसलेला तो काळ होता. शिवाय भावनावश गरीब बिचारी हतबल हिरॉईन भाव खावून जात असे. त्या काळात स्त्रीचा त्याग (ती दोषी असो किंवा नसो) पडद्यावर पाहायला लोकांना खूपच अपिलिंग वाटत असे.

आता काळ खूप बदलला आहे. अर्थातच आताच्या काळात अश्या एखाद्या नीनाच्या कथेचा शेवट नक्कीच वेगळा असेल.

सर्वांचे प्रतिसादांबद्द्ल आभार! भरत, चुका दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

साधना, अनया, तुम्ही अगदी बरोबर लिहिलं आहे. काल 'अल्लारखां' नावाच्या एका भीषण चित्रपटाचा थोडा भाग पोटभर हसून घ्यावं म्हणून पाहिला. त्यातही मीनाक्षी शेषाद्री वेश्या असते म्हणून ती मेलेली दाखवली आहे. 'इस शरीरपर वासनाओंके अनेक दाग है' असं काहीतरी भयानक वाक्य उच्चारते ती. कोण असले भयानक संवाद लिहायचं काय माहित. Uhoh

आजकाल पूर्वीची 'मै धरती तुम आसमान' छाप गाणीसुध्दा ऐकायला नको वाटतात.....कदाचित ही एक्स्ट्रीम रिअ‍ॅक्शन असावी.

गुमराहची स्टोरी माहित असून आणि पटलेली नसूनही तो पिक्चर बघायचा आहे.

अतुल, 'अचानक' 'ये रास्ते है प्यारके' च्या मानाने बराच उजवा आहे. रुस्तम मी पाहिला नाही आणि पाहणारही नाहिये.

चांगली चित्रपट ओळख स्वप्ना.
अशी स्टोरी अस्लेल्या पिच्चरचं नाव ये रास्ते है प्यार के??
नावावरुन अग्दी रोमँटीक खेळकर सिनेमा असेल असंं वाटलं मला.

रुस्तम मी पाहिला नाही आणि पाहणारही नाहिये.
>> बघा ओ.. अक्षय ला उगाच नॅशनल अवॉर्ड मिळालाय का. चांगला आहे. इललिन दकरुज मस्त अकटिंग केलीय.

दहा वर्षांपूर्वी मिडनाईट चिल्ड्रेन वाचलेलं त्यामुळे नानावटी खटल्याबद्दल माहित होतं.
भारतात ज्युरी पद्धत नाही ते योग्यच आहे.

ये रास्ते आणि रुस्तम दोन्ही पाहिलेत. देशभक्ती आणि ड्रामेबाझीचा भाग वगळता रुस्तमचे कथानक(आणि त्याचा शेवट) मूळ खटल्याशी जवळचे आहे.

गुमराहचा शेवट फारच डोक्यात गेलेला. करीना, अनिल, अक्षयच्या बेवफामधेपण तेच आहे का?

अ‍ॅमी, तुम्ही अनएडिटेड चित्रपट पाहिलाय का? त्या रात्री नेमकं काय होतं पार्टी संपल्यावर? अशोकचा फोन येतो तेव्हा अनिल काय ऐकतो? मला दोन्ही कळलं नाही. प्लीज सांगता का?

च्रप्स......देशभक्तीचा डोस देणारे चित्रपट मला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे त्यातल्या नायक किंवा नायिकेसाठी मी चित्रपट बघण्याचा प्रश्नच येत नाही. देशात दिल्या जाणार्या अ‍ॅवॉर्डसबद्दल न बोललेलंच बरं.

सस्मित....नीना आणि अनिल दोघांचं एकमेकांवर प्रेम असूनही त्यांची शोकांतिका होते म्हणून हे नाव दिलं असेल असा आपला माझा कयास.

युटयूबवर पाहिला. अनएडिटेड वगैरे माहित नाही. पाहून बरेच दिवस झाल्याने आता डिटेल आठवत नाहीय.

पार्टी संपल्यावर intoxicated (कंसेंट देऊ शकणार नाही) अवस्थेत केलेली प्रतारणा. कायद्याच्या भाषेत बलात्कारच.

अशोकचा फोन येतो तेव्हा अनिल काय ऐकतो? >> हे मला आठवत नाहीय अजिबात.

===
माझ्या मते रुस्तममधे 7 year itch, बोअर झालेल्या गृहिणी, मुलांच्या प्रेमात गुरफटल्याने बायकोकडे दुर्लक्ष झालेला नवरा, प्रेमराधन काळात मिळणारे undivided attention दुसऱ्या कोणाकडून मिळणे, आपण अजूनही विरुद्ध लिंगाला आकर्षक वाटत आहोत याची खात्री करून घेण्याची गरज, नवरा जास्त काळ दूर असल्याने झालेली शारीरिक उपासमार आणि त्यातच दुसऱ्या एका आकर्षक पुरुषाकडून मिळणारे लाड हे सगळे जरा व्यवस्थित दाखवले आहेे

स्वप्ना लेख नेहमीप्रमाणेच जोरदार. अतिशय आवडला मला.

या तीन्हीपैकी मी फक्त रूस्तम पाहिला आहे. आणि तो पण मला प्रचंड लूज आणि अ‍ॅम्बिग्युअस वाटला. हिरॉईन मख्ख दिसावी ही बहुधा कथेचीच गरज असावी, कारण इलियाना डिक्रुज पण मला मख्खांची राणी वाटली होती सिनेमात. आता बदललेल्या काळानुसार जर रूस्तम (या तीन चित्रपटापैकी) जर बरा होता तर ये रास्ते.. किती लूज आणि बोअर असेल याची कल्पना आली. सुनील दत्त ताकदीचा अभिनेता असल्याने तो खरंच खूप निभावून नेतो.. हमराज हा सिनेमा पण त्यानेच तोलून धरला आहे.
या सिनेमात जर नर्गिस असती तर सिनेमाचा बाज नक्की उठून दिसला असता, ती होती सुनील पेक्षा मोठीच पण त्याने काही फरक पडला असता असं मला नाही वाटत.

पुन्हा एकदा लेख आवडल्याची नोंद देते. लिहित रहा. Happy