एक पत्र - अमिताभला

Submitted by बेफ़िकीर on 26 April, 2018 - 02:35

तुझी तीच तीच उदयाची स्टोरी इथे रिपिट होणार नाही. कसा राजेश खन्ना अस्ताला गेला आणि कसा दीवार आणि जंजीरमुळे तू महानायकपदाच्या मार्गाला लागलास ते अख्ख्या भारताला आणि जगालाही माहीत आहे.

मी ज्या पिढीत जन्मलो ती संपूर्ण पिढी निव्वळ तुझ्या प्रभावात वाढलेली आहे. तेव्हा चित्रपट हे जीवनातील प्रमुख आकर्षणांपैकी एक होते. त्यातच एकदा तर अशी अवस्था होती की एकाचवेळी अनेक थिएटर्समध्ये तुझे एकामागोमाग एक पिक्चर्स येऊन सुपरहिट्ट जात होते. तुझ्या यशाच्या आलेखाची चढती कमान होती. सुवर्णकाळ होता तो तुझ्या कारकीर्दीचा! लहानपणी घडलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या घटनेचा अनेक वर्षांनी सूड घेणे अशा प्रकारचा प्रवासही अनेक चित्रपटांमध्ये आला. संजीवकुमार, दिलीपकुमार, प्राण ह्या असामान्य आणि तुझ्या पिढीतील इतर सामान्य अभिनेत्यांना तू पडद्यावर तुझ्या भव्यदिव्य प्रतिमेने खाऊन टाकायचास.

राजकारणातही उतरलास. चक्क बहुगुणांनाच हरवलेस. अलाहाबादच्या तरुणी तुझी प्रचाराची गाडी जाणार असेल त्या रस्त्यावर स्वतःचे दुपट्टे अंथरून ठेवायच्या. बोफोर्समध्येही नांव आले.

तुला अपघात झाला तेव्हा भारत हळहळला. लाखो लोकांनी तुझ्यासाठी प्रार्थना केल्या.

तुझी एबीसी कंपनी जोरात सुरू झाली आणि त्यापेक्षा जोरात कोसळली.

मग त्या कंपनीचे कर्ज डोक्यावर असताना तू कौन बनेगा करोडपतीने घराघरात पोचलास ते एक नवीनच रुपडे घेऊन! प्रौढ वयाचा महानायक, पांढरी दाढी, चष्मा वगैरे! वयामुळे जादू कमी होण्याऐवजी तुझी जादू दसपटीने वाढली. तुझे सगळे कर्ज तर फिटलेच, वर तू पुन्हा अब्जाधीशही झालास. एका टीव्ही मालिकेचा टी आर पी इतका झाला की त्या काळात सुपरस्टार समजले जाणारे यच्चयावत हिरो पुन्हा सामान्य वाटू लागले.

अरे हो, मनातले एक सांगायचे राहिलेच! तुझे नव्वदच्या सुमारास आलेले दोन चार टुकार सिनेमे आणि तुझे दिसू लागलेले वय जेव्हा चित्रपटसृष्टीने निरखले तेव्हा उतरती कळा लागल्याचे सर्वांनी मान्य केले. तर मनातील गोष्ट अशी, की केवळ तुझ्या कारकीर्दीला उतरती कळा लागली म्हणून सगळे अनिल कपूर्स, जॅकी श्रॉफ्स, सनी देवल्स, संजय दत्त्स, खानावळ, कपूर्स, कुमार्स, शेट्टीज, देवगण्स, ऋत्विक्स हे सहन करून घ्यावे लागत होते. नंतर नंतर तेच फक्त उपलब्ध असल्यामुळे आपोआपच ते केव्हा गोड वाटू लागले कळलेच नाही. तुझे चिरंजीवही शेवटी कारकीर्द आटोपून शांत झाले.

पण केबीसीने इतिहास घडवला व ती तो घडवत राहिलीही! आजही घडवत आहे. पण आजकाल केबीसीमध्ये येणारे सामान्य नागरीक तुझी खुषमस्करी थोडी कृत्रिम व अतीच करत आहेत. पूर्वी तुझी होत असलेली स्तुती पाहून आमच्याच अंगावर मुठभर मांस चढायचे. हल्ली त्यांनी केबीसीमध्ये तुझी स्तुती करणे हे जणू यू एस पी झालेले आहे.

तर ते असो! मुद्दा असा..... की....

आता तुझा उबग आला आहे. कधी वाटले नव्हते तुझाही उबग येईल असे! पण नवरत्न तेल काय, मोबाईल काय, स्कूटर काय, न्हावी काय होतोस, लीकेज प्रूफ मटेरिअल काय, अक्षरशः वाट्टेल त्या जाहिराती करत सुटला आहेस. इतके करून प्रत्येक जाहिरातीतील तुझी बोलण्याची शैली तीच, जी वर्षानुवर्षे केबीसीमध्ये आम्ही पाहत आलेलो आहोत. एक ठरवून बनवलेली मिश्कील शैली, डोळे बारीक करून मिश्कील हसत काहीतरी उद्बोधक विधाने करणे, हलकासा उपहास वगैरे!

नटवरलाल, डॉन, दिवार, जंजीर, त्रिशुल, शराबी व तत्सम चित्रपटांमधील तू अजूनही डोक्यात रुतून बसलेला आहेस. तसे परत होणे शक्य नाहीच कारण आता वय झाले, पण निदान भलतेच काहीतरी तरी होऊ नकोस.

========

तुझा एक निस्सीम, निस्सीम चाहता

Group content visibility: 
Use group defaults

जादूगार, लाल बादशाह आणि सुर्यवंशम चांगले चित्रपट आहेत की.. मला आवडतात. बॉक्स ऑफिस वर फ्लॉप झाले म्हणून काय होतंय.
तसे तर rhtdm, जाने भी दो यरो आणि अंदाज अपना पण बॉक्स ऑफिस फ्लॉप आहेत.
उद्या म्हणाल गुरुदत्त ने कागझ के फूल करायला नको होता☺️

>>उद्या म्हणाल गुरुदत्त ने कागझ के फूल करायला नको होता☺️
अमिताभ ला पत्र लिहीणे ईतपत ठीक आहे... पण काय करायचे ते त्याला ठरवू दे ना.. Happy

बुम, तुफान, जादुगर, लाल बादशाह, गंगा जमना सरस्वती,सुर्यवंशम, रामुचा शोले बरीच मोठी लिस्ट आहे त्याने करायला नको होते
>>>>>>

सुर्यवंशम् .... आर यु सिरीअस ??? Happy

योग - माझा प्रतिसाद हा mandard यांच्या प्रतिसदाबद्धल होता..

हा तो प्रतिसाद.
बुम, तुफान, जादुगर, लाल बादशाह, गंगा जमना सरस्वती,सुर्यवंशम, रामुचा शोले बरीच मोठी लिस्ट आहे त्याने करायला नको होते याची... पण एखाद्या पिंक, पीकू साठी हि लिस्ट माफ........

Submitted by mandard on 1 May, 2018 - 06:12

>>बुम, तुफान, जादुगर, लाल बादशाह, गंगा जमना सरस्वती,सुर्यवंशम, रामुचा शोले बरीच मोठी लिस्ट आहे त्याने करायला नको होते
का म्हणे?>> काही नाही. हे माझे मत. हे असायला आपली हरकत नसावी. अमिताभ थोडेच माझे मत विचारुन चित्रपट करतो Happy

साजिरा,

तुमचा प्रतिसाद वाचला. होय, मी वर एका प्रतिसादात लिहिले आहे तसे, की पत्रात एक मुद्दा असायला नको होता हे मला मागाहून पटले. तो मुद्दा म्हणजे कोणत्या उत्पादनांच्या जाहिराती त्याने कराव्यात.

जाहिराती सतत डोळ्यांसमोर येणे ह्याला अमिताभ स्वतः काही करू शकत नाही हेही मान्य! मात्र त्याने केबीसीमध्ये अंगिकारलेली एक शैली, जी कदाचित मी पत्रात थोडी घाईघाईत शब्दबद्ध केली आहे ती आजही तशीच आहे. मग उत्पादन कोणतेही असो!

त्या शैलीत 'आपण खूप स्पेशल आहोत'ह्याचे सदैव भान असणे, बाळबोध पद्धतीने मिश्कीलता आणणे, खूप मोठा विनोद केल्यासारखी वाक्ये उच्चारणे, डोळे बारीक करणे, इतर अनेक लकबी वगैरे असे काही काही येत राहते. ते नकोसे होते. विशिष्ट उत्पादने त्याने एन्डॉर्स करणेही खरे तर मला नकोसे होते पण तो त्याचा उदरनिर्वाह असल्याने त्याबद्दल चाहत्यांनी काही म्हणू नये हे पटले आहे हे वर लिहिलेच आहे.

थोडे विषयांतर - राजेश खन्नाही शेवटी शेवटी त्याच त्या लकबींमुळे नकोसा झालेला होता. मान उडवणे, विशिष्ट कोनातून स्मितहास्य व इतर काही.

मला वाटते की अमिताभला निदान ह्या शैलींमध्ये प्रायोगिक बदल करून पाहण्याइतपत मोकळेपणा आता असेलच. Happy

आणखी एक - त्याचे चित्रपट अजूनही अफाट आहेत ह्याबद्दल दुमत ठेवायचा मला अधिकारच नाही कारण मी ते पाहिलेलेही नाहीत आणि पाहिले नसले तरी ते अफाट गाजले हे मला माहीत आहे. विषय फक्त जाहिरातींचाच! Happy

धन्यवाद!

भरत,

तुम्ही दिलेला लेख परवाच वाचला होता. लेख उत्तम आहे. मात्र त्या लेखात जाहिरातदारांच्या दृष्टीने अमिताभ आजही कसा अत्यंत उपयुक्त आहे ह्याचे प्रामुख्याने वर्णन आहे. चाहत्यांना तो कसा वाटत असेल ह्याबाबत हे पत्र आहे.

धन्यवाद! Happy

उदाहरणार्थ, 'जाहिरातदार' आणि 'चाहता' अशी नावं असलेल्या दोन व्यक्तींनी एकमेकांभोवती ('घाशीराम'मध्ये नाना फडणवीस आणि बाई एकमेकांभोवती फिरतात तसे) प्रकाशाच्या वेगाने गिरक्या घेतल्यास दोन्ही ठिकाणी दोन्ही व्यक्ती दिसतील, किंबहुना दोन्हींमिळून एकच व्यक्ती दिसेल. Proud

असो. अहो, जाहिरातदार पैसे खर्च करतात. ते घरचे कितीही बच्चन असले तरी पैशाची काळजी असतेच. त्यामुळे (मेजॉरिटी) चाहत्यांचा विचार त्यांना करावाच लागणार..

चला शंभरी भरवू धाग्याची

एकूण अनेक प्रतिसादांनी साजिरा म्हणतात तशी एकमेकांसोबत विजेच्या गतीने पण संयत फुगडी घातली

प्रत्येकाचे अमिताभप्रेम आजही तितकेच आहे हे पाहून एक चाहता म्हणून फार आनंद झाला

तसेच, इथे (मायनोरिटीलाही :डोमा:) पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ह्याचाही आनंदच झाला

मागे कुणीतरी लिंक दिलेला अमोल पालेकर चा लेख आज वाचला. त्यावर आलेल्या प्रतिसादांशी पुष्कळ प्रमाणात सहमत आहे. तो लेख म्हणजे अमोल पालेकर ने अमिताभ च्या माध्यमातून स्वतःविषयी लिहीलेला लेख आहे. अमोल पालेकर च्या त्या उधार सिनेमात अमिताभ ने निकोल किडमन बरोबर काम केलं असतं, तर कदाचित हा लेख घडला नसता.

बाकी अमिताभ मला आवडतो. पण मी हा मुद्दा समजू शकतो की टीव्ही वर ज्या पद्धतीनं जाहिरातींचा भडिमार होतो, त्यामुळे त्याचा उबग येऊ शकतो आणी समोर जे दिसतं (ह्या केसमधे जाहीरातीतला अ‍ॅक्टर -अमिताभ) त्याचं प्रेझेंटेशन हा त्या इरिटेशन चं पहिलं टारगेट ठरतं.

अमिताभ ह्यांचा उब ग सार्वत्रिक दिसतो. ट्विटर फॉलोइंग कमी कमी होत आहे. किंवा किती उट पटांग पोस्टी केल्या तरी ते वर जात नाही. ह्याचा ठपका त्यांनी ट्विटर कंपनीवरच ठेवला आहे. हे जरा विनोदी आहे. ट्विटर असे एखाद्याचे फॉलोअर कमी जास्त कशाला करेल काही फायदा असल्या शिवाय? मॅनिप्युलेट करता येते हे मला माहीत आहे. पण ह्या केस मध्ये तसे नसावे.

Pages