एक पत्र - अमिताभला

Submitted by बेफ़िकीर on 26 April, 2018 - 02:35

तुझी तीच तीच उदयाची स्टोरी इथे रिपिट होणार नाही. कसा राजेश खन्ना अस्ताला गेला आणि कसा दीवार आणि जंजीरमुळे तू महानायकपदाच्या मार्गाला लागलास ते अख्ख्या भारताला आणि जगालाही माहीत आहे.

मी ज्या पिढीत जन्मलो ती संपूर्ण पिढी निव्वळ तुझ्या प्रभावात वाढलेली आहे. तेव्हा चित्रपट हे जीवनातील प्रमुख आकर्षणांपैकी एक होते. त्यातच एकदा तर अशी अवस्था होती की एकाचवेळी अनेक थिएटर्समध्ये तुझे एकामागोमाग एक पिक्चर्स येऊन सुपरहिट्ट जात होते. तुझ्या यशाच्या आलेखाची चढती कमान होती. सुवर्णकाळ होता तो तुझ्या कारकीर्दीचा! लहानपणी घडलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या घटनेचा अनेक वर्षांनी सूड घेणे अशा प्रकारचा प्रवासही अनेक चित्रपटांमध्ये आला. संजीवकुमार, दिलीपकुमार, प्राण ह्या असामान्य आणि तुझ्या पिढीतील इतर सामान्य अभिनेत्यांना तू पडद्यावर तुझ्या भव्यदिव्य प्रतिमेने खाऊन टाकायचास.

राजकारणातही उतरलास. चक्क बहुगुणांनाच हरवलेस. अलाहाबादच्या तरुणी तुझी प्रचाराची गाडी जाणार असेल त्या रस्त्यावर स्वतःचे दुपट्टे अंथरून ठेवायच्या. बोफोर्समध्येही नांव आले.

तुला अपघात झाला तेव्हा भारत हळहळला. लाखो लोकांनी तुझ्यासाठी प्रार्थना केल्या.

तुझी एबीसी कंपनी जोरात सुरू झाली आणि त्यापेक्षा जोरात कोसळली.

मग त्या कंपनीचे कर्ज डोक्यावर असताना तू कौन बनेगा करोडपतीने घराघरात पोचलास ते एक नवीनच रुपडे घेऊन! प्रौढ वयाचा महानायक, पांढरी दाढी, चष्मा वगैरे! वयामुळे जादू कमी होण्याऐवजी तुझी जादू दसपटीने वाढली. तुझे सगळे कर्ज तर फिटलेच, वर तू पुन्हा अब्जाधीशही झालास. एका टीव्ही मालिकेचा टी आर पी इतका झाला की त्या काळात सुपरस्टार समजले जाणारे यच्चयावत हिरो पुन्हा सामान्य वाटू लागले.

अरे हो, मनातले एक सांगायचे राहिलेच! तुझे नव्वदच्या सुमारास आलेले दोन चार टुकार सिनेमे आणि तुझे दिसू लागलेले वय जेव्हा चित्रपटसृष्टीने निरखले तेव्हा उतरती कळा लागल्याचे सर्वांनी मान्य केले. तर मनातील गोष्ट अशी, की केवळ तुझ्या कारकीर्दीला उतरती कळा लागली म्हणून सगळे अनिल कपूर्स, जॅकी श्रॉफ्स, सनी देवल्स, संजय दत्त्स, खानावळ, कपूर्स, कुमार्स, शेट्टीज, देवगण्स, ऋत्विक्स हे सहन करून घ्यावे लागत होते. नंतर नंतर तेच फक्त उपलब्ध असल्यामुळे आपोआपच ते केव्हा गोड वाटू लागले कळलेच नाही. तुझे चिरंजीवही शेवटी कारकीर्द आटोपून शांत झाले.

पण केबीसीने इतिहास घडवला व ती तो घडवत राहिलीही! आजही घडवत आहे. पण आजकाल केबीसीमध्ये येणारे सामान्य नागरीक तुझी खुषमस्करी थोडी कृत्रिम व अतीच करत आहेत. पूर्वी तुझी होत असलेली स्तुती पाहून आमच्याच अंगावर मुठभर मांस चढायचे. हल्ली त्यांनी केबीसीमध्ये तुझी स्तुती करणे हे जणू यू एस पी झालेले आहे.

तर ते असो! मुद्दा असा..... की....

आता तुझा उबग आला आहे. कधी वाटले नव्हते तुझाही उबग येईल असे! पण नवरत्न तेल काय, मोबाईल काय, स्कूटर काय, न्हावी काय होतोस, लीकेज प्रूफ मटेरिअल काय, अक्षरशः वाट्टेल त्या जाहिराती करत सुटला आहेस. इतके करून प्रत्येक जाहिरातीतील तुझी बोलण्याची शैली तीच, जी वर्षानुवर्षे केबीसीमध्ये आम्ही पाहत आलेलो आहोत. एक ठरवून बनवलेली मिश्कील शैली, डोळे बारीक करून मिश्कील हसत काहीतरी उद्बोधक विधाने करणे, हलकासा उपहास वगैरे!

नटवरलाल, डॉन, दिवार, जंजीर, त्रिशुल, शराबी व तत्सम चित्रपटांमधील तू अजूनही डोक्यात रुतून बसलेला आहेस. तसे परत होणे शक्य नाहीच कारण आता वय झाले, पण निदान भलतेच काहीतरी तरी होऊ नकोस.

========

तुझा एक निस्सीम, निस्सीम चाहता

Group content visibility: 
Use group defaults

दत्तू,
नाही चुकीची माहिती. संदर्भ सापडल्यास देइन इथे. पण तेव्हा अमिताभ यश चोप्रांकडे काम मागायला गेला होता.

लोकसत्तेच्या त्या लेखात पालेकर तक्रारीच्या सूरात म्हणतात कि बच्चनसाहेब सामाजिक/राजकिय प्रश्नांवर काहि ठाम भुमिका घेत नाहित, जाहिर वक्तव्य करत नाहित. तर माझ्या माहितीप्रमाणे बच्चनसाहेबांनी योग्य वेळी, योग्य विषयावर, योग्य माध्यमातुन योग्य तो संदेश दिलेला आहे. आता पालेकरांना एखाद्या राजकिय पक्षाविरुद्ध बच्चनसाहेबांनी बोलावं, रियॅक्ट व्हावं (इतर सुडो-सेकुलरांसारखं अ‍ॅवॉर्ड वापसी वगैरे) असं वाटत असेल तर पालेकरांनी बच्चनसाहेबांची राजकिय कारकिर्द तपासावी आणि त्यानंतरचा बच्चन साहेबांनी अंगिकारलेला आलिप्तपणा अभासावा...

आता ४ मे ला '१०२ नॉट आऊट' येतोय... तेव्हा पुन्हा एकदा बिग बी ला मोठ्या पडद्यावर पहायला उत्सूक आहे.

रच्याकने: अमर अकबर एंथनी -२ का नाही बनवत? अनुक्रमे अक्षय खन्ना, रणबीर, व अभिषेक ला घ्या.. Happy असेही तीघांचे दुकान सध्य बंद आहे.

प्रस्तुत खुले पत्र आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया वाचून अमीतजींनी कमी जाहिराती करण्याचे ठरवले आहे असे आमचा (दै. फेकू) वार्ताहार कळवतो.

दोन्ही बाह्जुंचे प्रतिसाद चांगले आहेत. तरी एक फॅन म्हणुन बेफींचा लेख मला पटतोच आहे.
काय लोक सारखे सुर्यवंशम बद्दल बोलत असतात.
माझ्या घरी एकदम आवड्ता पिच्चर आहे तो. Happy
दिल मेरे तु दिवाना है...... Happy

रच्याकने: अमर अकबर एंथनी -२ का नाही बनवत? अनुक्रमे अक्षय खन्ना, रणबीर, व अभिषेक ला घ्या.. >>

बिग नो नो Sad

का अत्याचार करताय??? अमर अकबर अ‍ॅन्थनी माझा ऑल टाईम फेव्हरेट Happy

त्यातल्या गाण्यांसाठी, कव्वाली साठी.....प्राणसाहेब व हॅन्डसम, मितभाषी विनोद खन्नासाठी
आणि सुरेख चित्रीकरणासाठी Happy

स्वाती२ आणि अंजलीची पोस्ट पटली . मी अमिताभ फॅन वगैरे नसले तरीही त्याचा कंटाळा आलाय असं वाटत नाही.
शरीर थकत नाही तोपर्यत कार्यक्षम आहे , एनर्जीने , विनम्रतेने काम करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे .

{{{ शौचालय किंवा पोलिओ ची जाहिरात ही सामाजिक जागृती म्हणून तो करतो आणि त्यासाठी पैसे घेत नाही. }}}

दक्षिणा यांचे हे विधान पूर्ण सत्य नव्हे.

१९९४ साली सुश्मिता आणि ऐश्वर्या या दोघी विश्वसुंदरी आणि जगतसुंदरी बनल्या. त्यानंतर या स्पर्धेत भारतीयांना रस वाटू लागला. त्यामुळे आपण जर ह्या स्पर्धेचे आयोजन केले तर आपल्याला नफा होईल या आशेने बच्चन साहेबांनी १९९६ एबीसीएल कंपनी तर्फे हा इव्हेंट बंगळूरु येथे घडवून आणला. त्याकरिता त्यांनी दूरदर्शनकडून जाहीर प्रसारणाची वेळ घेतली. या वेळेत जाहिराती प्रदर्शित होतील त्यांच्याकडून सेकंदानुसार एबीसीएलने पैसे घ्यावे आणि दूरदर्शनला मात्र पूर्ण कार्यक्रमाच्या वेळेनुसार ठोक रक्कम द्यावी असा हा सौदा होता. प्रत्यक्षात एबीसीएलला अपेक्षेइतक्या जाहिराती मिळाल्या नाहीत आणि प्रचंड तोटा झाला. एबीसीएलने दूरदर्शनचे ठरलेले पैसे दिले नाहीत. इतकेच नव्हे तर बंगळुरू पोलिसांनी जी सशुल्क सुरक्षा पुरविली तिचीही ठरलेली रक्कम दिली नाही. बंगळुरु पोलिसांनी आपली थकीत रक्कम कशी वसूल केली त्याचा तपशील ठाऊक नाही पण दूरदर्शन बच्चनजींकडून ती रक्कम वसूल करण्याकरिता त्यांच्याकडून शौचालय, पोलिओ अशा सामाजिक जाहिराती विनामोबदला करुन घेत आहे पण आजतागायत दूरदर्शनची ती थकीत रक्कम पूर्णतः वसूल झालेली नाहीये. ही रक्कम वसूल होत नाही तोवर बच्चंजी सरकारी जाहिरातीत दिसतच राहणार.

शौचालय बद्दल खरे असेल. पण पोलिओ आणि हेपिटायटिस-बी करता वर्ल्ड हेल्थ ऑर्ग करता तो काम करतोय, जे पैसे घेउन नाही.

बच्चन साहेबांनी १९९६ एबीसीएल कंपनी तर्फे हा इव्हेंट बंगळूरु येथे घडवून आणला. त्याकरिता त्यांनी दूरदर्शनकडून जाहीर प्रसारणाची वेळ घेतली.
नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 28 April, 2018 - 15:15
---

तुमची काहितरी चूक होतेय असे दिसते बिपिनजी,
१९९६ च्या, बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या मिस वर्ल्ड सोहळ्याच्या, मिडीया प्रसारणाचे सर्व हक्क त्यावेळी भारतात झी टिव्हीकडे व जगभरात E! ह्या टिव्ही नेटवर्ककडे होते, दूरदर्शनकडे ह्या सोहळा प्रसारणाचे कोणतेही ऑफिशीयल हक्क असल्याचे तरी ऐकिवात नाही.

त्यामुळे साधना यांनी लिहिलेले बरोबर असावे. शिवाय "Rendezvous with Simi Garewal Amitabh Bachchan & Family" ह्या मुलाखतीत देखील त्याने हे स्वत: सांगितले आहे की सरकारी जाहिरातीसाठी तो कधीही मानधन घेत नाही. गुजरात टुरिझमच्या सर्व जाहिराती अमिताभ निशुल्क करतो हे स्वत: श्री नरेंद मोदी यानी, रजत शर्मांच्या आप की अदालत मध्ये सांगितले होते.

अनिरुद्ध..

तुम्ही म्हणता तसे वि़कीपीडियावर लिहिलेले आहे. अर्थात मी वृत्तपत्रामध्ये वाचलेय तसे लिहिलेय. त्या बातमीत लिहिल्याप्रमाणे अमिताभ ह्या जाहिराती फुकट करीत नसून दूरदर्शनच्या थकित रकमेच्या परफेडीकरिता करीत आहे असे लिहिले होते. वृत्तपत्राच्या त्या बातमीव्यतिरिक्त माझ्यापाशी इतर पुरावा नाही.

बिपिनजी तुम्ही लिहिले आहे ते खरे असेल तर,
एबीसीएल बुडाल्यानंतर अमिताभ ह्यांच्या हितचिंतकानी त्यांना दिवाळे घोषीत करायचा सल्ला दिला होता, त्याला ठाम नकार देत कर्जदारांची पै नी पै त्यांनी परत केली, मग दूरदर्शनची थकित रक्कम त्यांनी का ठेवली असावी, असा प्रश्न ह्या निमित्ताने पडतो.
---
असो.

गुजरात टुरिझमच्या सर्व जाहिराती अमिताभ निशुल्क करतो हे स्वत: श्री नरेंद मोदी यानी, रजत शर्मांच्या आप की अदालत मध्ये सांगितले होते.
>>>>>

हो, तो एपिसोड मी सुद्धा पाहिला होता.
पण तेव्हाही ते मला चुकीचे वाटलेले. अमिताभने गुजरात सरकारवरच का ही मेहेरबानी करावी हे पटले नव्हते. उत्तर प्रदेश वा महाराष्ट्र समजू शकले असते. एक जन्मभूमी आहे एक कर्मभूमी आहे. किंवा मग भारत सरकार..
पण गुजरातने स्पेशली अमिताभसाठी काय केले आहे जे त्याने आपल्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना करून द्यावा.
अर्थात यामागे पैश्याऐवजी ईतर कुठल्या बाबीत छुपी मदत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकं संकटग्रस्तांना आणि गरजूंना नि:शुल्क मदत करतात. ती माणुसकी असते. पुण्य कमावणे असते. पण उगाच ज्यांचे बरे चालू आहे त्यांना का फुकट काही देतील हे पटत नाही..

पण तेव्हाही ते मला चुकीचे वाटलेले. अमिताभने गुजरात सरकारवरच का ही मेहेरबानी करावी हे पटले नव्हते. उत्तर प्रदेश वा महाराष्ट्र समजू शकले असते. एक जन्मभूमी आहे एक कर्मभूमी आहे. किंवा मग भारत सरकार..
पण गुजरातने स्पेशली अमिताभसाठी काय केले आहे जे त्याने आपल्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना करून द्यावा.
<<

श्री ऋन्मेऽऽष ,
तुम्हाला,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वत: अमिताभ बच्चन यांनी, रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीतून मिळून जाईल

नक्की काय उत्तर?
पा टॅक्स फ्री केला त्या बदल्यात काम केले का?

आणि हे पनामा काय आहे? सिगारेट?

<< आता तुझा उबग आला आहे. कधी वाटले नव्हते तुझाही उबग येईल असे! >>
-------- उबग येणे नैसर्गिक आहे.... सहमत.>>१११११११११११

भरत, मस्त लेख शेअर केलात, धन्यवाद.

गुलाबजाम मधे एक डायलॉग आहे सिद्धार्थ चांदेकर सोनाली कुलकर्णीचे दार ठोठावत असतो तेव्हा शेजारची स्त्री त्याला म्हणते,"नाही उघडायची ती दार, स्वतःला फार बच्चन समजते ती बया"

पियुष मिश्रा एका मुलाखतीत म्हटला होता, " अमिताभ बच्चन इज नॉट अ स्टार, ही इज अ Phenomenon"

मला बच्चनचा कंटाळा अजून तरी आलेला नाही.

विजय, अजून ते मनोज वाजपेयीचे व्हेरी फेमस "बच्चन साला!".

अमिताभच्या असण्यातून 'अमिताभ असणे' ही फ्रेज किंवा फिनॉमिनॉन कधी झाला हे चाहत्यांनाही कळलं नाही. मनोज वाजपेयीच्या त्या वरच्या डॉयलॉगमध्ये रामूने ते एका सेकंदात मांडून दाखवलं.
पण हे झालं एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणं. घायल मधला सनी देवल मुंबईत येऊन अमिताभच्या दर्शनासाठी बंगल्यासमोर येतो, त्या सीनला आता झाली २५-३० वर्षे (आणि हो, हे नव्वदचंच दशक होतं). आणि आताच २-३ वर्षांपुर्वी एक, तीन-चार कथा एकत्र बांधलेल्या एका सिनेम्यातली (बाँबे टॉकीज) एक संपूर्ण कथाच बच्चनला भेटायला कथानायक मुंबईत येऊन बंगल्यासमोर कसा किती दिवस ताटकळतो आणि शेवटी कसा आत जाऊन भेटतो- यावर होती.

पण तेही असो. महत्त्वाचं हे आहे, की हा फिनॉमिनॉन सहज बनला नसावा. ऐशी-नव्वदच्या दशकांच्या आधीच्या भाबड्या काळात तो बनला होता खरा, पण तो करिश्मा अजून तसाच राहिला नसता तर 'मेरे फॅन्सको मुझसे कोई छीन नही सकता' असं शेवटी केविलवाणं होऊन म्हणणार्या आपल्याच आणखी एका सुपरस्टारसारखी त्याची गत झाली असती. अंगातल्या कलेला प्रॉफिट सेंटर बनवण्यापासून ते अवगत असलेल्या कलेमध्ये विविध प्रयोग करण्याचं धाडस दाखवणं, त्यासाठी धोके पत्करणं; अतिशय उच्च दर्जाची मॉडेस्टी, सतत जमिनीवर पाय ठेऊन वावरणं, 'डिलिव्हर द बेस्ट'चा सततचा ध्यास- यासारख्या अनेक गोष्टींचं मिश्रण आज तयार झालेल्या या फिनॉमिनॉन मध्ये दिसत असेल.
---

मुख्य मुद्द्याबद्दल : तुम्हाला त्याच्या फिल्मोग्राफीबद्दल आक्षेप दिसत नाही. फक्त जाहिरातींवर दिसतो आहे. (मी पुन्हा वाचून पाहिलं). तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीवर आक्षेप आहे / कंटाळा येतो? अमिताभने वाटेल त्या जाहिराती करण्याबद्दल की त्या जाहिराती पुन्हा पुन्हा कानीकपाळी आदळत असल्याबद्दल? उत्तर नं.२ असेल तर साहजिक आहे. कुणालाही कंटाळा येईल. इतकंच काय, पण त्या प्रॉडक्ट, मॉडेल, अ‍ॅक्टरबद्दल नॉशियाही तयार होईल. पण हे तितकंच साहजिक आहे जितकं- अमिताभसारखा महागडा स्टार घेतल्यानंतर आणखी भरमसाठ खर्च करून जाहिरातींचे पर डे स्लॉट्स ५ ऐवजी १०, २०, ३० असे वाढवणे आणि तेही सगळ्याच चॅनेल्सवर! आणि एक्झॅक्टली हेच त्याच्या हातात नाही. समजा तुमचं स्वतःचं एक प्रॉडक्ट आहे, अमिताभ्सारखे मॉडेल हाताशी आहे, जाहिरातीसाठी भरपूर बजेट आहे म्हटल्यावर तुम्ही काय करणार?

बाकी डोक्याचं तेल, संसारोपयोगी वस्तू आणी लक्झरी ब्रँड्स यातल्या कोणत्या जाहिराती करायला हव्यात आणि नकोत? अनेक उत्तरं येतील. यातलंच एक उत्तर- एकदा (जाहिरातीत काम करायचा) व्यवसाय आहे म्हणल्यावर कोणतं प्रॉडक्ट आहे- की फर्क पैंदा. बरीच उत्तरं वरच्या प्रतिसादांत येऊन गेलीत..
---

आणखी एक म्हणजे सामाजिक, राजकीय वगैरे भुमिका घेत नाही- हा लाडका आक्षेप (हे तुम्ही नाही लिहिलेलं). हे नेहेमीचंच. भुमिका घेतली तर 'नाना, तुला त्यातलं काय कळतं?' आणि नाही घेतली तर 'तमाम साहित्यिक बैल आहेत, आणि साहित्यसंमेलन बैलबाजार आहे!'
मुळात कुठच्याही कलावंताने अशी भुमिका का घ्यावी? 'समाजाचं भलं व्हावं' अशा ध्येयानं वगैरे प्रेरित वगैरे का व्हावं? ते त्यांचं काम आहे का? (यातूनच हे येतं मग- यानं ही जाहिरात करू नये, तिनं सिनेम्यात असं वाईट वळण लावणारे सीन्स करू नयेत- वगैरे). आय मीन,, कमॉन यार..
---

पुन्हा वाचल्यावर असं लक्षात आलं की तुम्ही शैलीचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण मग हेही आठवलं की फार पुर्वी इथंच कुठेतरी तुम्ही त्याच्या टाटास्कायच्या जाहिरातींवरही असंच काहीतरी बोलला होतात. याउलट त्या जाहिराती मला अत्यंत क्रिएटिव्ह आणि शिवाय 'टोटल बच्चन' 'ओनली बच्चन' अशा वाटल्या होत्या. अर्थात मतांतरं असणारच. पण शैलीच्या पुनरावृत्तीचा मुद्दा निघाला आहे, तर या माणसाचे गेल्या ४-५ वर्षांत आलेले शमिताभ, पिंक, वझीर, तीन, भूतनाथ इ. सिनेमे बघायला हरकत नाही. ('पा' फार पुर्वी आलेला, आणि रामूचा नवीन शोले बघायची हिंमत झाली नाही) बघूनही तुमचं तेच मत असेल तर अर्थातच पुन्हा- मतांतरांचा आदर..

(गंमत म्हणजे तुमच्या शेवटच्या वाक्यात त्याच्या त्याच त्या शैलीच्या पुनरावृत्तीची यादीच तुम्ही लिहिली आहे! पण तरी असो. चाहते येडे होते है. त्या कलेक्टिव्ह भाबडेपणात मीही सामील आहेच. Proud )

बुम, तुफान, जादुगर, लाल बादशाह, गंगा जमना सरस्वती,सुर्यवंशम, रामुचा शोले बरीच मोठी लिस्ट आहे त्याने करायला नको होते याची... पण एखाद्या पिंक, पीकू साठी हि लिस्ट माफ........

मयेकरांना धन्यवाद, फार छान लेख आहे. शेवटी अमिताभ तो अमिताभच! लहानपणापासुन हाच फेव्हरीट होता, आणी राहील.

साजिराने पण छान विश्लेषण केलयं. अगदी पर्फेक्ट! अंजलीशी पूर्णपणे सहमत. अंजली ने पण अचूक लिहीलयं. मिळवतोय पैसा असल्या जाहीराती करुन तर मिळवु दे! त्याचं नाणं चालतयं ना! उलट पूर्वीच्या कित्येक गाजलेल्या नट नट्यांचे उतारवय हलाखीत गेले. मा. भगवान दादा हे त्यातलेच एक उदाहरण. बाकी उदाहरणे म्हणजे अचला सचदेव, ललिता पवार वगैरे! मग अमिताभ ने उतारवयात पुंजी साठवली तर बिघडले काय? मान्य आहे की काही जाहीराती या फुटकळ आहेत, पण निदान त्याला लोक विचारतायत तोपर्यंत त्याची सद्दी. आता त्याच्या सम वयस्कांचे कुठे जास्त नाव पण नसते. धर्मेंद्रचेच बघा ना! तो चालतो, पण त्याच्या मुलांना सनी, बॉबीला वाव नाहीये.

>>बुम, तुफान, जादुगर, लाल बादशाह, गंगा जमना सरस्वती,सुर्यवंशम, रामुचा शोले बरीच मोठी लिस्ट आहे त्याने करायला नको होते
का म्हणे?

Pages