तुझी तीच तीच उदयाची स्टोरी इथे रिपिट होणार नाही. कसा राजेश खन्ना अस्ताला गेला आणि कसा दीवार आणि जंजीरमुळे तू महानायकपदाच्या मार्गाला लागलास ते अख्ख्या भारताला आणि जगालाही माहीत आहे.
मी ज्या पिढीत जन्मलो ती संपूर्ण पिढी निव्वळ तुझ्या प्रभावात वाढलेली आहे. तेव्हा चित्रपट हे जीवनातील प्रमुख आकर्षणांपैकी एक होते. त्यातच एकदा तर अशी अवस्था होती की एकाचवेळी अनेक थिएटर्समध्ये तुझे एकामागोमाग एक पिक्चर्स येऊन सुपरहिट्ट जात होते. तुझ्या यशाच्या आलेखाची चढती कमान होती. सुवर्णकाळ होता तो तुझ्या कारकीर्दीचा! लहानपणी घडलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या घटनेचा अनेक वर्षांनी सूड घेणे अशा प्रकारचा प्रवासही अनेक चित्रपटांमध्ये आला. संजीवकुमार, दिलीपकुमार, प्राण ह्या असामान्य आणि तुझ्या पिढीतील इतर सामान्य अभिनेत्यांना तू पडद्यावर तुझ्या भव्यदिव्य प्रतिमेने खाऊन टाकायचास.
राजकारणातही उतरलास. चक्क बहुगुणांनाच हरवलेस. अलाहाबादच्या तरुणी तुझी प्रचाराची गाडी जाणार असेल त्या रस्त्यावर स्वतःचे दुपट्टे अंथरून ठेवायच्या. बोफोर्समध्येही नांव आले.
तुला अपघात झाला तेव्हा भारत हळहळला. लाखो लोकांनी तुझ्यासाठी प्रार्थना केल्या.
तुझी एबीसी कंपनी जोरात सुरू झाली आणि त्यापेक्षा जोरात कोसळली.
मग त्या कंपनीचे कर्ज डोक्यावर असताना तू कौन बनेगा करोडपतीने घराघरात पोचलास ते एक नवीनच रुपडे घेऊन! प्रौढ वयाचा महानायक, पांढरी दाढी, चष्मा वगैरे! वयामुळे जादू कमी होण्याऐवजी तुझी जादू दसपटीने वाढली. तुझे सगळे कर्ज तर फिटलेच, वर तू पुन्हा अब्जाधीशही झालास. एका टीव्ही मालिकेचा टी आर पी इतका झाला की त्या काळात सुपरस्टार समजले जाणारे यच्चयावत हिरो पुन्हा सामान्य वाटू लागले.
अरे हो, मनातले एक सांगायचे राहिलेच! तुझे नव्वदच्या सुमारास आलेले दोन चार टुकार सिनेमे आणि तुझे दिसू लागलेले वय जेव्हा चित्रपटसृष्टीने निरखले तेव्हा उतरती कळा लागल्याचे सर्वांनी मान्य केले. तर मनातील गोष्ट अशी, की केवळ तुझ्या कारकीर्दीला उतरती कळा लागली म्हणून सगळे अनिल कपूर्स, जॅकी श्रॉफ्स, सनी देवल्स, संजय दत्त्स, खानावळ, कपूर्स, कुमार्स, शेट्टीज, देवगण्स, ऋत्विक्स हे सहन करून घ्यावे लागत होते. नंतर नंतर तेच फक्त उपलब्ध असल्यामुळे आपोआपच ते केव्हा गोड वाटू लागले कळलेच नाही. तुझे चिरंजीवही शेवटी कारकीर्द आटोपून शांत झाले.
पण केबीसीने इतिहास घडवला व ती तो घडवत राहिलीही! आजही घडवत आहे. पण आजकाल केबीसीमध्ये येणारे सामान्य नागरीक तुझी खुषमस्करी थोडी कृत्रिम व अतीच करत आहेत. पूर्वी तुझी होत असलेली स्तुती पाहून आमच्याच अंगावर मुठभर मांस चढायचे. हल्ली त्यांनी केबीसीमध्ये तुझी स्तुती करणे हे जणू यू एस पी झालेले आहे.
तर ते असो! मुद्दा असा..... की....
आता तुझा उबग आला आहे. कधी वाटले नव्हते तुझाही उबग येईल असे! पण नवरत्न तेल काय, मोबाईल काय, स्कूटर काय, न्हावी काय होतोस, लीकेज प्रूफ मटेरिअल काय, अक्षरशः वाट्टेल त्या जाहिराती करत सुटला आहेस. इतके करून प्रत्येक जाहिरातीतील तुझी बोलण्याची शैली तीच, जी वर्षानुवर्षे केबीसीमध्ये आम्ही पाहत आलेलो आहोत. एक ठरवून बनवलेली मिश्कील शैली, डोळे बारीक करून मिश्कील हसत काहीतरी उद्बोधक विधाने करणे, हलकासा उपहास वगैरे!
नटवरलाल, डॉन, दिवार, जंजीर, त्रिशुल, शराबी व तत्सम चित्रपटांमधील तू अजूनही डोक्यात रुतून बसलेला आहेस. तसे परत होणे शक्य नाहीच कारण आता वय झाले, पण निदान भलतेच काहीतरी तरी होऊ नकोस.
========
तुझा एक निस्सीम, निस्सीम चाहता
मग आता अमिताभने काय कराव ?
मग आता अमिताभने काय कराव ?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=qrks9Zu0f1w
हे येत आहेत
बकवास जाहिराती करणे हे एक
बकवास जाहिराती करणे हे एक सोडलं तर बच्चन साहेबांचं काही वाईट चाललंय असं वाटत नाही.
उलट वयाला सूट होतील अश्या चांगल्याच भूमिका गेल्या काही वर्षांतल्या सिनेमातून दिसताहेत.. त्यामुळे अजून तरी उबग आला नाही मला..
.. मी ही एक बच्चन फॅन
लेखाशी अगदी सहमत
लेखाशी अगदी सहमत
काय गैर आहे जाहीरातीत काम
काय गैर आहे जाहीरातीत काम करणे! एक चाहता म्हणून खटकणे ठीक आहे पण शेवटी एवढा महानायकाचा डोलारा सांभाळणे खर्चिक असणार तेव्हा चालायचेच आणि सध्या अमिताभच्या भुमिका खरंच छान आणि हटके असतात. मला त्याचे कौतुक वाटते. ऋषी कपूरचे देखिल याच कारणासाठी कौतुक आहे.
लीकेज प्रूफ मटेरिअल >>>>> ती
लीकेज प्रूफ मटेरिअल >>>>> ती जाहीरात डो़क्यात जाते. घुसड्म घुसड...फालतु.
आमच्या बोरिवली अग्निश्मन
आमच्या बोरिवली अग्निश्मन द्लाच्या सिग्नल फेसिन्ग साइडला पहिले फायर ब्रिगेड ची जाहिरात होति, मस्त रणदिप हूडा होता आता तिथे आपले अमिताभ आजोबा टान्गलेत. फायर ब्रिगेड ला पण नव्या दमाच्या लोकान्वर विश्वास नाहिये.
छान लिहिला आहे लेख. नवरत्न
छान लिहिला आहे लेख. नवरत्न तेल, मोबाईल, स्कूटर, लीकेज प्रूफ मटेरिअल अशा जाहिराती बघाव्या लागत असतील तर उबग येणे स्वाभाविक आहे.
मी टीव्ही बघत नाही. जाहिराती आणि केबीसी दोन्ही पाहिले जात नाही. त्यामुळे मला अजूनतरी बिग बीचा उबग आलेला नाही.
छान लेख.
छान लेख.

आपला तर ऑल टाईम फेवरेट सिनेमा एकच.
तसे परत होणे शक्य नाहीच कारण
तसे परत होणे शक्य नाहीच कारण आता वय झाले, पण निदान भलतेच काहीतरी तरी होऊ नकोस. >> हे सर्वच क्षेत्रातील कलावंतांच्या बाबतीत लागु होतं. कुठे थांबावं हे कळत नाही, लोकांसमोर राहण्याची उर्मी स्वस्थ बसु देत नाही.. मग निस्सिम चाहत्यांच्या अशा प्रतिक्रीया येऊ लागतात.
वरत्न तेल काय, मोबाईल काय,
वरत्न तेल काय, मोबाईल काय, स्कूटर काय, न्हावी काय होतोस, लीकेज प्रूफ मटेरिअल काय, अक्षरशः वाट्टेल त्या जाहिराती >>>>>>अगदी खरं.
अमिताभची कुठलीही जाहिरात लागली की मी हेच बोलते. एकही जाहिरात सोडत नाही ह्या वयातही.
खरे आहे, अमिताभला बघणे नकोसे
खरे आहे, अमिताभला बघणे नकोसे वाटतेय
ज्याचा प्रत्येक सिनेमा, सीन मन लावून पाहिला, त्याला अशा कुठल्याही भूमिकेत बघणे असह्य आहे.
बेफिकीर, एकदम पटलं.
बेफिकीर, एकदम पटलं.
म्हातारपण आणि बालपण ह्यात
म्हातारपण आणि बालपण ह्यात साम्य आहे असं म्हणतात, बच्चनच्या जाहिरातीतही त्याच्या डोळ्यात खट्याळपणा दिसतो, and I enjoy it
ज्याचा प्रत्येक सिनेमा, सीन
ज्याचा प्रत्येक सिनेमा, सीन मन लावून पाहिला, त्याला अशा कुठल्याही भूमिकेत बघणे असह्य आहे. >>> + १
मला वाटते कोणीही प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर असतानाच, अचूक वेळ साधून निवृत्ती घेतली पाहिजे. इतिहास सांगतो की ज्यांनी ती वेळ ओळखली नाही, ते प्रसिद्धीच्या शिखरावरून घरंगळत खाली आले.
प्रसिद्धीच्या शिखरावरून
प्रसिद्धीच्या शिखरावरून घरंगळत खाली आले.> अमिताभसोबत हे आधीच झालंय.
लेख आणि त्याच्याशी सहमत
लेख आणि त्याच्याशी सहमत असणारयांनो, तुम्हाला जाहीरातींचे गणित समजलेच नाही.
आजच्या तारखेला या देशात दोन मोठे ब्रांड आहेत. एक शाहरूख आणि एक अमिताभ.
ज्या जाहीरातीत शाहरूख आहे वा असतो त्या प्रॉडक्टला ग्राहकांच्या नजरेत आपसूक एक क्लास दर्जा येतो.ऊंचे लोग ऊंची पसंद असा एक फिल येतो.
तसेच ज्या जाहीरातीत अमिताभ असतो ते प्रॉडक्ट सर्वसामान्यांच्या दृष्टीने किफायतशीर असणार अशी ग्राहकांची खात्री पटते. त्यामुळे त्या पठडीतील उत्पादनांच्या जाहीरातीत अमिताभ दिसणारच. तसेच त्याच्या ईमेजला अनुसरून शौचालय किंवा पोलिओ डोस वगैरे सरकारी जाहीरातीतही तो दिसणारच. आणि ते योग्यच आहे. मध्यंतरी मॅगी नूडल्स आणि चॉकलेट यांनी आपली विश्वासार्हता गमावली तेव्हा त्यांना पुन्हा विश्वास कमावतानाही जाहीरातीत अमिताभच्या ईमेजचीच साथ लागली.
@ केबीसी, ते अजूनही चालू आहे हे मला आजच समजले. मी त्याचा पहिलाच सीजन पाहिला होता. त्यानंतर थेट शाहरूखचा. त्यानंतर कधीच नाही.
जर तुम्हाला केबीसी मध्ये अमिताभला बघून वैताग आला असेल तर हे जाणून घ्या की केबीसीने अमिताभला अगदी कठिण काळात हात दिला. मग आता अमिताभने गरज सरो वैद्य मरो करत त्यांना सोडणे हे मला ऊचित वाटत नाही. जर अजूनही तो कार्यक्रम चालत असेल तर नफा नक्कीच होत असेल.
जर सुर्यवंशम पाहून वैतागला असाल तर त्याचा राग सेटमॅक्सवर काढा, अमिताभवर कश्याला काढत आहात...
मुळात तुम्ही अमिताभच्या अतिदर्शनाने वैतागला असाल तर स्वत:ला त्याचे चाहते नका म्हणू.. हितचिंतक म्हणा फार तर.
किंवा मग अमिताभ तितका मोठा सुपर्रस्टार तरी नाहीये, त्याची अवीट अशी क्रेझ नाहीये..
कारण मला स्वत:ला दर दुसरया जाहीरातीत शाहरूख दिसला तरी त्याचा वीट येत नाही. त्याची स्टाईल सदैव हवीहवीशी, पुन्हा पुन्हा बघावीशी वाटते. त्याचे कित्येक चित्रपटांची पारायणे झाली असतील. आजही चॅनेल सर्फ करताना ते चित्रपट दिसले की पुर्ण बघूनच पुढच्या चॅनेलकडे वळतो. तो फिल्म एवार्डस एंकरींग करताना दिसतो, ज्यात तो दिसतो तेच अवार्ड शो मी बघतो. विकेंडच्या रात्री टाईमपासला यूट्यूब विडिओ बघताना निम्मे तर मी त्याचेच काय काय विडिओ शोधून बघतो. त्याचे एकेक ईण्टरव्यू बघायलाही मजा येते. अगदी त्याचे आयपीएल दर्शनही सुखावते... त्याने चित्रपट योग्य निवडावेत असे एक हितचिंतक म्हणून मलाही वाटते. पण तो दिसतच राहिला पाहिजे, त्याचे दर्शन दुर्लभ व्हावे असे कॉम्प्रोमाईज मी करू शकत नाही.
ईथे कोणी अमिताभचा असा एकतरी चाहता असेल तर त्याने हात वर करा
नसेल तर अमिताभला सुपर्रस्टार बोलणे मला आजपासून बंद करावे लागेल !
आजकाल ते जस्ट डायल, वॉईड टिवी
आजकाल ते जस्ट डायल, वॉईड टिवी, आणि ओ कुठलातरी एसी हे पन थेटरात जाम पकवतात..
सेकंड इनिंग मधे छान हटके रोल
सेकंड इनिंग मधे छान हटके रोल करणारे आणि सुपरस्टारची इमेज,इगो वगैरेत अडकून न पडता खर्चाचे गणित जुळवत जाहीराती करणारे अमिताभ बच्चन मलाअजिबात खटकत नाहीत उलट डाऊन टू अर्थ वाटतात.
शेवटी नुसत्या प्रसिद्धीवर बीलं भरली जात नाहीत. एक विशिष्ठ लाईफस्टाईल मेंटेन करायची तर पैसे हवेत. महानायक झाला तरी माणूसच. एकेकाळचा गाजलेला अभिनेता आता हालाखीत, मदतीसाठी याचना असे काही बघायला लागण्यापेक्षा बदलत्या काळाशी जमवून घेतलेले जाहीरात करणारे , मि .बच्चन बघणे केव्हाही चांगले.
एकदम पटले स्वाती२.
एकदम पटले स्वाती२.
स्वाती२>>+१
स्वाती२>>+१
एकेकाळचा गाजलेला अभिनेता आता
एकेकाळचा गाजलेला अभिनेता आता हालाखीत, मदतीसाठी याचना असे काही बघायला लागण्यापेक्षा बदलत्या काळाशी जमवून घेतलेले जाहीरात करणारे , मि .बच्चन बघणे केव्हाही चांगले. >>> असा विचार केला नव्हता. पटले.
मला अस वाटत की आपल्याला कधी
मला अस वाटत की आपल्याला कधी ना कधी तरी काम बंद करून आहे त्या पुंजीवर जगायला लागणार आहे याचा विचार जर तरुण पणात केला असता तर अमिताभ यांना अशा जाहिराती करून पोट भरायची वेळ आली नसती. किंवा येतात जाहिरात वाले माझ्याकडे तर मी कशाला नाही म्हणू ? पब्लिकने नाकारे पर्यन्त दिसणारच हा ही विचार असेल , जो मला पटत नाहीये
मनीमोहोर,
मनीमोहोर,
चित्रपट सृष्टी बेभरवशाचा व्यवसाय. इथे इमेज महत्वाची. जितका स्टार मोठा तेवढा ही इमेज राखायचा खर्च मोठा. त्यात सुरक्षेचा खर्च! कंपनी बुडीत गेल्यावर झालेले कर्ज निस्तरणे, पुन्हा जम बसवणे सोपे नाही. ९ ते ५ जॉब, पेन्शन-फंड-रिटायरमेंट सेविंग या चौकटीतले यांचे आयुष्य नाही .सुरु केलेली कंपनी यशस्वी झाली असती तर कदाचित चित्र वेगळे असते. पण तसे झाले नाही. आज ते काम करुन सन्मानाने जगत आहेत त्याबद्दल मला तरी आनंदच वाटतो.
माझी नातेवाईक इवेंट क्षेत्रात आहे. साहाजिकच जाहिरात क्ष्रेत्राशी संबंध येतो. तिने अनुभवेले ते - इतरांचे मुजोर वर्तन आणि त्याविरुद्ध मि. बच्चन यांचे सर्वांना सन्मानाने वागवणे . जाहीरातीच्या शुटिंगला येतात तर दिलेली वेळ अचूक पाळणार, कसले नखरे नाहीत, हॉटेलच्या स्टाफशी मुजोर वर्तन नाही, अवाजवी मागण्या, टॅट्रम्स नाहीत. पाय कायम जमिनीवर! अतिशय प्रोफेशनल वर्तन!
<< तुला अपघात झाला तेव्हा
<< तुला अपघात झाला तेव्हा भारत हळहळला. लाखो लोकांनी तुझ्यासाठी प्रार्थना केल्या. >>
---------- अपघाताचे वृत्त कळताच राजिव अमेरिका दौरा मधेच सोडुन परतले.... विमानतळावरुन सरळ रूग्णालयात भेटायला. तत्कालिन पन्तप्रधान इन्दिरा गान्धी दौरा पुर्ण करुन परतल्यावर सर्वप्रथम त्याला भेटायला गेल्या.
सम्पुर्ण देशाला त्याच्या अपघाताने चटका लावला होता, एकत्र आणले होते.
शोले, दिवार, जन्जिर, मुक्कद्दर का सिकन्दर... या सर्वात शोलेने इतिहास घडवला आहे...
<< आता तुझा उबग आला आहे. कधी वाटले नव्हते तुझाही उबग येईल असे! >>
-------- उबग येणे नैसर्गिक आहे.... सहमत.
>>शेवटी नुसत्या प्रसिद्धीवर
>>शेवटी नुसत्या प्रसिद्धीवर बीलं भरली जात नाहीत.<<
बिलं भरण्याकरता जाहिराती कराव्या लागाव्यात इतकि वाईट परिस्थिती बच्चनसाहेबांची नसावी. लेखाशी अंशतः सहमत...
पोट भरण्यासाठी, बीले
पोट भरण्यासाठी, बीले भरण्यासाठी नसतील करत जाहिरात, पण हवा असेल जास्तीचा पैसा तर बिघडले कुठे?
लोक फक्त पोटासाठीच जास्तीचे काम करतात का? वेळ जात नसेल किंवा काम केल्याशिवाय राहवत नसेल, स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवायला आवडत असेल तर काय हरकत आहे.
जसजसे लोकांना त्यांना बघण्याचा कंटाळा यायला लागेल तसतसे त्यांना जाहिरातीचे काम मिळणे बंद होईल. त्यातल्या त्यात ते स्वतः थांबले तर बरे होईल. मला मिळाले नाही म्हणण्यापेक्षा मीच घेतले नाही म्हणता येईल.
पोराला कोणी काम देत नाही,
पोराला कोणी काम देत नाही, बायको काम करत नाही, सुनेला काम कर म्हणता येत नाही मग घर चालणार कसे?
जरा गरीब माणसाचा विचार करा.. असेल चिक्कार पैसा पण तो "चिक्कार" तुमच्यासाठी आहे त्यांच्यासाठी नाही..
एखाद्याला 60हजार पगार असेल त्याला तो भागतो, पण काहींसाठी तो वर्षभराचा पगार असतो त्याला चिक्कार वाटेल तर कुणाच्या टिशर्टची किंमत असते त्याला तुटपुंजा वाटेल..
कोणी किती कसा खर्च करावा हे एक फॅन कसा ठरवणार?
अमिताभ म्हणजे तोच ना जो
अमिताभ म्हणजे तोच ना जो अमेरिकेत येऊन पैसे खर्च करून अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारणार होता?
त्यानेच का अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारली? तरी अजून भारताच्या मानाने अमेरिकन लोकांजवळ पैसे नाहीयेत. अजून येऊ दे त्याला.
<<<<कारण मला स्वत:ला दर दुसरया जाहीरातीत शाहरूख दिसला तरी त्याचा ......... मी करू शकत नाही.>>>>
हा शहारुख की शहामृग कोण? तोच का ज्याला अमेरिकेत अतिरेकी म्हणून येउ देत नाहीत? मग त्याचे सिनेमे कशाला बघता?
अम्मीजान कहती थी,
अम्मीजान कहती थी,
कोई धंदा छोटा नही होता..
और धंदे से बडा कोई धरम नही होता..
या देशात सुपर्रस्टार होण्याची किंमत मोजावी लागते..
ईथे आपल्या आवडत्या कलाकाराने उपजिविकेसाठी काय करावे आणि काय नाही हे सुद्धा चाहते ठरवतात
फार आधी शाहरूख लग्नात नाचतो म्हणून त्यावर हास्यास्पद टिका व्हायची.
त्यावर शेखर सुमनच्या एका शो मध्ये त्याने छान उत्तर दिले होते,
शादी मे ही तो नाचते है. नही तो क्या मैयत मे नाचते है. आप बुलाओ, आप के शादी मे भी नाचूंगा. लेकीन मै पैसे लूंगा. और वो मै काफी लेता हू.. परवडत असेल तरच बोलवा
हेच अमिताभलाही लागू,
भले तो कुठल्याही का जाहीरातीत दिसत असेना. त्याची एक तगडी किंमत असणार. जे ती मोजू शकतात त्यांच्यासोबत तो काम करतो. अन्यथा एखादे दंतमंजन वा तेलवाले त्याच्याकडे जाहीरातीसाठी आले तर त्याने काय बोलावे? माझा एक स्टॅण्डर्ड आहे, मी फक्त पेप्सी, कोक अश्या सो कॉलड हाय क्लास सॉफ्टड्रिंक्सच्या जाहीराती करणार, किंवा उंची मद्याच्या करणार (भले ते आरोग्याला घातक का असेना) पण या मंजन फंजनच्या जाहीराती माझ्या स्टॅन्डर्डला साजेश्या नाहीत. चला पुढे जा...
एक कलाकार आहे. या वयातही पेन्शनर कट्ट्यावर चकाट्या न पिटता काम करतोय. कामातून नुसतेच पैसे नाही तर आनंदही मिळवतोय. शक्य तिथे जनहितही साधतोय. फक्त आपल्याला त्याला बघून बोअर होते म्हणून त्याला ते काम बंद करायचा सल्ला.. का, तर आपण त्याचे चाहते आहोत.. चांगले पिक्चर, चांगल्या भुमिका निवड रे बाबा ही एका चाहत्याची ईच्छा समजू शकतो. पण खूप दर्शन देतोयस, बोअर होतेय, कमी कर.. हे अनाकलनीय आहे !
अरे हो...
अजून काही वेळाने त्याचा मुलगा सून यांना कसे काम नाही, त्यांनाही पोसावे लागते वगैरे मुद्दे सुद्धा येतील चर्चेत. याआधी सुद्धा हे ऐकले आहेत
मला तर अमिताभच्या अफाट एनर्जीचे तितकेच अफाट कौतुक आहे.
एखाद्या भुमिकेचा सखोल अभ्यास करत ती निभावणे यालाच फक्त मेहनत म्हणत नाही. तर आपल्या लिमिटेशनमध्ये राहून प्रामाणिकपणे जास्तीत जास्त काम करणे ही सुद्धा एका कलाकाराची मेहनतच.
Pages