जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_8

Submitted by अन्नू on 25 April, 2018 - 22:11

छे! ही पोरगी म्हणजे फार टीपिकल गोष्ट झालेय. काही कळायलाच मार्ग नाही. तीच्या वागण्या बोलण्याचा काहीच संदर्भ लागत नव्हता.
हक्क गाजवत ही माझ्याशी अशी का वागतेय? ना ही माझी गर्लफ्रेंड, ना हीच्यात आणि माझ्यात काही होण्याची सुतराम शक्यता. मग प्रत्येक गोष्टीत तिचा- असं अधिकाराने बोलण्याचा अर्थ तरी काय?
म्हणजे हीनं तासनं तास तीच्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारलेल्या चालतात. पण मी कोणाशी बोलायचं म्हटलं तरी तीचं डोकं तापलं पाहिजे!

वसईला आम्हाला कंप्युटरची एग्झाम द्यायला जायचं होतं तेव्हाही असंच. आमच्याबरोबर एग्झामसाठी क्लासमधल्या तीघी मुली आल्या होत्या. आता यात एकटा मीच मुलगा म्हटल्यावर, तिकीट वगैरे काढणे, परिक्षा सेंटरवर जायला रिक्षा ठरवणं, त्याचं भाडं कमीजास्त करुन पाचजणांना एकाच रिक्षात नेण्यासाठी धडपड करणं- हे सगळं माझ्याकडेच आलं होतं. त्याप्रमाणे मीही जाताना तिकीट वगैरे काढलं. रिक्षा ठरवून सगळ्यांचे पैसे जमा करुन भाडं दिलं. तर रस्त्याने चालताना तीनं मला मागेच थांबवलं-

“ट्रेनचं तिकीट तू काढलंस ना?” माझ्याकडे रोखून बघत तीनं विचारलं

“हो”

“कोणीच पैसे दिले नाहीत?” समोर चालणार्‍या मुलींकडे नजर रोखत तीने विचारलं

“नाही”

“का?”

“का? अगं- माझ्याकडे शंभर रुपये होते. असं- एक-एक नोट जमा करत बसण्यापेक्षा मीच सगळ्यांची तिकीट काढली”

“पण तुला गरज काय पडली होती सगळ्यांची तिकीट काढायची?”

मी तोंडाचा आ वासून नुसताच तिच्या तोंडाकडे बघत राहीलो. याच्यात रागावण्यासारखं काय आहे?

“घे पैसे सगळ्यांकडून”

“जाऊ दे. रिक्षाचं त्यांनी दिलं ना”

“का- का जाऊ दे? तू रिक्षाचं दिलं नाहीस का? पैसे काय वर आलेत तुझे- की जास्त झालेत!!”
का ही माझ्यावर उगीच डाफरायला लागलीय?

“ओके घेतो”

“कधी?”

“नंतर” मी पुढे चालायला लागलो. तीनं तसाच माझा शर्ट खेचत मला मागे ओढलं-

“आत्ता माग!”

“अगं घेतो ना नंतर- आत्ता नको”

तीनं जळळीत नजरेनं माझ्याकडे बघितलं. तशीच फणकार्‍याने ताडताड् पावलं टाकत पुढे निघून गेली!
झालं!
तिकडे जातानाही तसंच. रिक्षात म्हणा, रस्त्यावरुन चालताना म्हणा- त्या मुलींशी काहीही बोलायचं नाही. त्यांच्या बोलण्यात भाग घ्यायचा नाही. साधं हसलं तरी हीची नजर माझ्यावर टिकलेली!
एग्झाम देऊन आम्ही संध्याकाळी घरी परतलो. पण या गोष्टीमुळे बिचारी शेवटपर्यंत(!) माझ्याशी नीट बोलली नाही.

म्हणजे हीला जे आवडत नाही ते आंम्ही काहीच करायचं नाही. केलं तर, तो सगळ्यात मोठा गुन्हा! पण ज्यावेळी तीचं म्हणणं असेल किंवा तीला आवडेल- त्यावेळी मात्र सगळं काही क्षम्य!
असंच एकदा अचानक तीने मला सकाळचा कॉल केला.

“कुठे आहेस?”

“घरी आहे- का?”

“अरे मला एक पत्ता शोधायचा होता. तू ये ना”

“मी कशाला?”

“ये ना- मला पत्ता सापडणार नाही” शोधायच्या अगोदरच? आणि पत्ता कुठला तर गोल्डन जीमच्या मागचाच!

“बरं थांब आलो” म्हणत पटापट उरकून मी तीने सांगितलेल्या जागेवर पोहोचलो, तीला पत्ता शोधून दिला, तर म्हणे-

“शी! जाऊ दे- असल्या खंडर जागी मी नाही येत कामाला. कसली भयानक जागा वाटते ही! त्यापेक्षा मी दुसरीकडे काम बघते!” अगं मग मला कशाला बोंबलायला इतकी घाई करुन बोलावलंस?

दुसर्‍या वेळीही असंच. संध्याकाळी चार- साडे चारला फोन!
“झोपलायस का?”

“हो”

“का?”

“काही नाही गं, सकाळपासून पाणी नव्हतं, आत्ता टँकर मागवला. पाणी वगैरे भरलं. थोडं रिलॅक्स झालो. अजून अंघोळपण केलेली नाही, म्हणून आळस आला होता”

“ह्म्म..” ती हसली “शी! अज्जून अंघोळ केली नाहीस? किती घाणेरडा आहेस?”

“अगं करणार आहे आत्ता. बरं, तू कशाला फोन केला होतास?”

“काही नाही रे असंच-”

“काय काम होतं का?”

“वेस्टला येतोस?” ती अडखळत बोलली

“कशाला?”

“माझी एक मैत्रीण आहे, मला आणि तीला टेकडीवर मंदीरात जायचं होतं” (नक्की टेकडीवर की काय ते आठवत नाही, पण तीनं ‘टेकडी’ असंच काहीसं नाव घेतलं होतं)

“मग?”

“अरे, आम्ही एकट्याच आहोत (दोन मुली एकट्या कशा असतील? कमालच आहे!) आम्हाला सोबत कोणीतरी पाहिजे, म्हणून बोललं तू येतोस का!”

“आता??”

“का?- ये ना प्लीज. कोणच बरोबर नाही, तिथं सगळी जोडपीच असतात, कसलीकसली मुलं पण असतात, त्यामुळे जायला खूप ऑक्वर्ड वाटतं”

तीची अडचण समजून मी शक्य होईल तितक्या लवकर अंघोळ- तयारी आटोपून वेस्टच्या रिक्षास्टँडपाशी पोहोचलो. पण तिथे पोहोचेपर्यंतही तीचा सतराशे साठ वेळा फोन!
‘कुठे आहेस? काय करतोयस? इतका का उशीर? कुठे पोहोचलास? येतोस कि नाही? आत्ताच ये. लवकर ये..’
कसाबसा कुत्र्यासारखा धावत(!)- वीस- पंचवीस मिनिटांत ठिकाणावर पोहोचलो. तर म्हणे-

“माझी मैत्रीण म्हणाली आत्ता नको जायला. सकाळचं कधीतरी गलेलं परवडेल!”

“काय??” मी जवळजवळ किंचाळतच अविश्वासानं तिच्याकडे बघितलं.

“हो- म्हणजे तिथे आत्ता संध्याकाळचा, मुलांचा ग्रुप जास्त असतो. त्यामुळे ती म्हणतेय कशाला उगीच जायचं?”

अक्षरश: तिथेच मला अनंत खोल दरीत (-ती जवळपास कुठे असती तर!) उडी मारुन (आणि तीही हातात दगड घेऊन त्यावर डोकं आपटत-आपटत) घ्यावीशी वाटली!
म्हणजे कुत्र्यासारखं धावत पळत यासाठी बोलावलंस का मला?

आयुष्यात कधी कुठल्या मुलीचा राग आला नसेल तितका या दोघी महामायांचा आला.
पुर्वीच्या काळी लोकांना छळायला दैत्य असायचे. तसेच या- आधुनिक जगात, देवाने मला- ‘मुली’ नामक मॉडर्न दैत्य छळण्यासाठी गिफ्ट म्हणून दिले होते!

मनातला राग कसाबसा दाबत मी रिक्षा थांबवली. दोघींना घेऊन स्टेशनला आलो. मैत्रीणीने तिच्या गाडीभाड्याचे पैसे दिले. मी आमच्या दोघांचे पैसे दिले. अर्थात इथे तीच्यातली ‘कलमवाली बाई’ कुठे जागी झाली नाही!
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

एकदाचा आमच्या कंप्युटर बेसिकचा कोर्स पूर्ण झाला. ठरल्याप्रमाणे ट्युटोरिअलवाल्यांनी चिंगूसपणा करत सहा महिन्यांचा कोर्स पाच महिन्यात संपवला आणि आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. ती टॅलीच्या क्लासमध्ये गेली आणि माझं कंप्युटर स्टेशनला येणं बंद झालं. या काळात तीचं भेटणं जवळजवळ बंद झालं. मध्ये बरेच दिवस गेले.
दरम्यान व्हि.एफ.एक्स घ्यावं असं माझ्या मनात होतं. त्यासाठी खूप फिरलो. पण जवळपास कुठे त्याचा चांगला क्लास सापडला नाही. भाईंदरबाहेरची मला जास्त माहिती नव्हती. जी होती, तिथे अव्वाच्या सव्वा फिज् होती. शेवटी कंप्युटर स्टेशनलाच एखादा हार्डवेअरचा कोर्स करावा असं ठरलं. आणि नेमकं दुसर्‍याच दिवशी ठरवल्याप्रमाणे क्लासच्या मॅडमचा फोन आला!

‘येतोस का संध्याकाळी? गव्हर्नमेंट कोर्सबद्दल जरा माहिती द्यायची आहे. तीन महिन्याचा कोर्स आहे, फिज-बिज नाही, गव्हर्नमेंट सर्टीफिकेट मिळेल, पुढे उपयोगाला येईल..’ वगैरे वगैरे! तब्बल दहा मिनिटं बया माझ्या डोक्याला कलई करत होती! (या बायका किती पकवत असतात, नै?)

पण मला तर हार्डवेअरचा कोर्स घ्यायचा होता, मी कशाला हा कोर्स करु?
मी जरा आढेवेढे घ्यायला लागलो आणि मॅडमनी बॉम्ब फोडला-
‘तुझी मैत्रीणपण घेणार आहे!!!’ च्यायला, माझी कुठली मैत्रीण आली?? क्लासमध्ये तर मी कोणाशी खास मैत्री ठेवली नव्हती. हा! एकटा कृष्णा तेवढा होता. ज्याच्याशी मी क्लासमध्ये सतत गप्पा मारायचो. पण मुलगी अशी कोणच नव्हती, मग ही कोणाबद्दल बोलतेय?
हार्डवेअर शिकवणार्‍या सरांची माहीती विचारत मी फोन कट केला.

संध्याकाळी बरोबर पावणे सातला कंप्युटर स्टेशनला टच झालो. मॅडम नी गव्हर्नमेंट कोर्सची माहीती वगैरे समजावून सांगितली. मी होकार दिला आणि तीच्याकडून हार्डवेअर शिकवणार्‍या सरांना भेटण्याची परमिशन घेत मी आतल्या खोलीत गेलो तर-
समोर ती!
तीच्याकडे बघूनच माझी पावले दारात थबकली!

समोर काहीतरी क्लास चालला होता. पुढे सर शिकवत होते आणि मागे मुला मुलींचा घोळका बसला होता, त्यातच तीही होती. मी अचानक दरवाजा खोलताच सगळ्यांबरोबर तीचंही लक्ष दरवाजाकडे गेलं आणि एकाचवेळी आमची समोरासमोर नजरानजर झाली!
क्षणात तीच्या चेहर्‍यावर ओळखीचं हसू उमटलं. हसून तीने मला हात केला. मीही तीला ओळखीचा हात करत पुढे सरांकडे गेलो. पाच मिनिटं त्यांच्याशी चर्चा करुन झाल्यावर मी जायला वळलो. तीच्याजवळून जाताना सहज विचारलं-

“येतेस?”

“हो येते थांब-” म्हणत तीनं सरळ बॅग भरली. मैत्रीणींचा निरोप घेत लगेच माझ्याबरोबर बाहेर आली.
चक्क!!
आज इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच ती माझ्या बोलण्यावर अशी आली होती. नाहीतर मीच आपला सारखा तीच्यामागे पळत असायचो!

चालताना ती जरा खुश असल्यासारखी वाटली.
ब्रीजच्या दिशेने चालताना ती नि:शब्दपणे माझ्याबरोबर पावलं टाकत होती.
रात्रीचा अंधार पडला होता. काळोख घालवण्यासाठी रस्त्याकडेला पेटलेले महानगरपालिकेच्या खांबावरचे पिवळेधमक दिवे एक वेगळेच विचित्र वातावरण निर्माण करत होते. एकदम ‘सो गयाs ये जहाँs’ च्या गाण्यातल्या सुनसान रस्त्याची आठवण येत होती. माझ्या मनात विचारांची उलथापालथ कमी हलकीशी धडधड होत होती. काय बोलावं सुचत नव्हतं. मी शांतपणे ते क्षण साठवण्याचा प्रयत्न करत होतो.

“मी सगळा होप् सोडून दिला होता” मध्येच शांततेचा भंग करत ती उद्गरली.

“काय?”

“होप्स रे. म्हणजे, मला वाटलं आता आपण भेटणारच नाही”

“आता भेटलो ना”

“ह्म्म” तीने मान डोलावली. मग या दिवसांत काय-काय झालं ते- ती मला ऐकवू लागली. मी ऐकत होतो. यावेळी तिने एकदाही फोन हातात घेतला नाही, हे विशेष!
इतक्या दिवसानंतर भेटलो म्हणून असेल कदाचित, पण मलाही तिच्या संगतीने चालताना एक वेगळीच अनुभुती येत होती. मनात आनंद दाटल्यासारखा झाला होता. त्यातच तिचं असणं अचानक हवं हवंसं वाटू लागलं होतं. वाटत होतं, हा प्रवास, हे चालणं, तिचं बोलणं, तिच्या अस्तित्त्वाचा प्रत्येक क्षण, असाच रहावा. कधी संपूच नये. मन एका सुखाच्या तरंग लहरीवर तरंगत होतं.

चालता चालता सहजच डोक्यात विचार आला.
म्हटलं, ‘चल- जाताना खाडीवरुन जाऊया’
आज मुड छान होता. घरी जाण्याचीही कसली घाई नव्हती. तर तीने सरळ नकारच दिला. 'घरी सांगितलं नाही, उशीर झाला तर?'- वगैरे कारणं देऊ लागली. पण मी जरा मनवळवणी करताच ती तयार झाली. खाडीच्या रस्त्यावरुन चालताना मात्र तीने मध्येच थांबत उजव्या बाजुच्या गल्लीतून जाऊया म्हणून सुचवलं.
म्हटलं, का गं? तर बोलली, इथं देऊळ आहे.

“देऊळ? तू देवाला मानतेस?”

“हो. का? तू मानत नाहीस?”

“चॅक्! असल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही आणि ठेवणारही नाही”

“माझ्याबरोबरतरी चल!” म्हणून तिने मला देवळाकडे आणलं. बोळाच्या वाटेरवर, जरा अलिकडे चप्पल काढून ती पुढे मंदीरच्या आवारात प्रवेशली. सहज मागे वळून पाहिलं तर-
बोळात मी हाताची घडी घालून उभा!

मला तसं लांब उभं राहिलेलं बघताच मात्र तिने मला आत बोलावलं-
‘ये ना’ म्हणत तिनं आपली ओढणी पदर टाईप डोक्यावर ओढून घेतली. एक टोक तसंच डाव्या बाजुनं खांद्यावरुन मागे टाकलं. मग कोणा अवताराला वाईट वाटू नये म्हणून, बाजुला लावलेल्या झाडून सगळ्या तस्वीरीच्या अवतारातल्या देवांना एक एक करत नमस्कार केला. इतक्यात मी तिच्या बाजुला येऊन उभा राहिलो. उंच दोराला बांधलेली घंटी तिने जोरात वाजवली.

टण्ण.. करत एक दिर्घ ध्वनी उमटला. वातावरण भारुन टाकत कानात घुमत राहीला. पुढच्या देवाला मनोभावे हात जोडत ती काही क्षण डोळे मिटून तशीच शांतपणे उभी राहीली.
अगदी सहजच मी तिच्याकडे पाहिलं आणि..
का कुणास ठाऊक पण.. तिच्या त्या शांत, ध्यानमग्न चेहर्‍याकडे मला तसंच खुळ्यासारखं बघत रहावंसं वाटलं. हे असं का व्हावं?
आज तिची भेटही काहीतरी स्पेशल असल्यासारखी वाटत होती. हवीहवीशी वाटत होती. मनाला तिची ओढ लागल्यासारखं झालं होतं.
मी गुंतत चाललोय की काय तिच्यात?..

माझ्या मनात गोंधळ माजला असताना इकडे तिनं डोळे उघडले. मी मख्खासारखं तिच्याकडेच बघत उभा आहेसं बघून तीनं विचारलं-

“काय झालं? पड ना पाया”

“मी सांगितलं ना- मी त्याच्या पाया पडणार नाही. असंपण ज्याच्याकडे मागून मी सदैव काही ना काही हरत आलोय त्याला मी आयुष्यात मानणारही नाही!”

“कसा हायेस रे!” ती उद्गरली.

पुढे होत तिने घरच्यांसाठी- ओट्यावरचा अंगारा कागदात भरुन घेतला. एक बोट स्वत:च्या कपाळावर लावलं. पुजार्‍याने प्रसाद नामक दिलेली खडीसाखर आणि गोड तिळ घेत ती माझ्याजवळ आली.

“हम्म” करत तिने मला प्रसाद ऑफर केला.

“नाही- नको!” सवयीप्रमाणे मी तो घेतला नाही. तीने जरा आग्रह केला. मी घेतच नाहीसं पाहून तीने तो नाद सोडला.

“वेडाच आहेस!” ती नुसतीच पुटपुटली. देवळातून घेतलेली अंगार्‍याची पुडी खोलत तिने तो मला लावायला घेतला-

“हे काय आहे?”

“अंगारा”

“हॅ!! मी नाही लावत”

“ए मंद- याला काय होतंय? अंगाराच आहे ना, घे!” म्हणत तिने शेवटी तो माझ्या कपाळावर लावलाच.
देवळाच्या बोळातून बाहेर पडत मग आंम्ही संथपणे खाडीच्या दिशेनं गप्पा मारत चालत राहिलो...

त्या दिवसानंतर नित्यनियमाने तिचे मॅसेजेस् चालू झाले. ती फोनवर बोलू लागली. अध्येमध्ये आमची भेटही होऊ लागली...
कळत नकळत...
ती पुन्हा, नव्याने माझ्या आयुष्यात दाखल झाली होती!
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

गव्हर्नमेंट कोर्सच्या वेळी मला वाटतं ती माझ्या जास्त जवळ आली. मैत्रीणीपेक्षाही वर ती काहीतरी वाटू लागली होती. पण ते कळायलाही मला खूप उशीर लागला..

हल्ली रोजचंच सोबतीने जाऊन मला तीची सवय झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. म्हणजे ती ज्या वेळी क्लासला नसेल- सोबत नसेल- त्यावेळी एकटं पडल्यासारखं वाटायचं. ती बरोबर असावी म्हणून मीच आता पटापट प्रॅक्टीकल पुर्ण करुन तिच्याबरोबर निघायला लागलो होतो.
कदाचित हे अट्रॅक्शन आसावं नाहीतर तीच्या जास्त सवयीचा परिणाम, पण तीचं माझ्याबरोबर असणं मला खुप महत्त्वाचं वाटू लागलं होतं. तीची साथ हवीहवीशी वाटू लागली होती. ती ज्या एसव्ही रोडवरुन जात होती तिथून माझं घर जेमतेम पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी आता नवघर रोडवरुन तीच्यासोबत जाऊ लागलो होतो.

एकदा सहज सुचवलं- “आपण असेही क्लासला एकटेच जातो, त्यापेक्षा संगतीनेच गेलं तर?”

तीला ती कल्पना आवडली. तीने लगेच होकार दिला. दुसर्‍या दिवशी मी न चुकता वेळेवर ठरलेल्या ठीकाणावर तीची वाट पाहात थांबलो. अर्धा तास झाला. एक तास झाला. दीड तास झाला! संध्याकाळची उन्हं कलायला लागली. हीचा काही पत्ता नाही!
शेवटी वैतागून मीच फोन केला तर कळलं, ही क्लासला जाण्याचं वगैरे सगळं विसरुन आपल्या मैत्रिणीबरोबर घरात खेळत बसलेय! मी क्लासचा विषय काढताच तीने पहिल्यांदा नकार दिला. पण मी फोर्स करताच ती यायला तयार झाली.

इकडे वाट पाहून माझे पाय दुखायला लागले होते. अस्वस्थपणे मी, ती येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. इतक्यात ती समोरच्या रस्त्यावर प्रकटली! गर्दीत ओळखीच्या चेहर्‍याने चटकन लक्ष वेधून घ्यावं अशी माझी नजर तिने वेधून घेतली. फोन केल्यानंतर बरोबर पंधराव्या मिनिटाला ती आली होती.
तिच्या येण्याने मला उगीच आनंद वगैरे वाटला. छातीत धडधड वाढली. तिच्या चेहर्‍याने माझा सगळा थकवा क्षणात गायब झाला!
इतक्या महिन्यांत आज पहिल्यांदाच तीच्याबद्दल प्रकर्षाने जाणवलेले हे माझे पहिलेच फिलिंग!

नक्की हे फ्रेंड म्हणून फिलिंग होतं की तिच्याबद्दल नकळत निर्माण झालेले आकर्षण होते??
नाही माहीत!
पण आज मला तीचे माझ्या मनातले स्थान जाणवले होते आणि..
ते मैत्रीपुरते मर्यादित नक्कीच नव्हते.. ते त्याच्यापुढेही काहीतरी होते!

“काय करत होतीस?” मी जरा वैतागतच विचारले

“माझी वाट बघत कशाला थांबलास उगीच? जायचंस ना क्लासला”

“का तुला यायचं नाही?”

“आज यायचा मुड नव्हता. खुप कंटाळा आला होता. मग मैत्रीणींबरोबर खेळत बसले” खेळाचा विषय निघताच तीचे डोळे चमकले. (काय कुक्कुलं बाळ आहे की काय ही!)

“तुला माहीती आहे, मी आणि माझ्या तीन मैत्रीणीं मस्तपैकी एकमेकींना उशा फेकून मारत होतो. सगळ्यांची केसं बिसं विस्कटली होती. खुप मजा येत होती. पण मग तुझा फोन आला आणि सगळेच मला ओरडायला लागले!” मध्येच ऑफ होत ती उद्गरली.

“का?”

“का- काय? एवढा वेळ कोण थांबतं का कोणासाठी! तुला इथं थांबवलं म्हणून सगळ्याजणी मला बडबड करायला लागल्या, किती बोल खावा लागला मला तुझ्यामुळे माहीतीय?” ती म्हणाली मग माझ्याकडे बघत पुन्हा एकदा अविश्वासानं तीनं विचारलं-

“तू खरंच दोन तास थांबला होतास माझ्यासाठी?!!!”

“दोन तास पस्तीस मिनिटं! तेही इतक्या उन्हात, आणि तुला त्याचं काहीच नाही!”

“मंद आहेस नुसता!” ती लटक्या रागाने म्हणाली. “चल आता!!”

उशीरा गेल्याने त्या दिवशी फक्त प्रॅक्टीकलच तेवढं होऊ शकलं. परत येताना तीचा फोन बंद होता. यावेळी ती फोनवर नाही तर माझ्याशी गप्पा मारत होती...
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

योगायोग अर्थात कोइन्सिडंट!
कितीजणांचा यावर विश्वास आहे? या गोष्टी खरंच असतात?
आणि असल्या तरी एका माणसाच्या बाबतीत किती वेळा घडू शकतात? एकदा? दोनदा? तीनदा? चारदा? की पाचदा?

विचित्र आहे नाही, सगळं?
माझ्या आयुष्यात कित्येक वेळा या योगायोगाचा प्रसंग आलेला आहे. आणि तो प्रत्येक योगायोग हा तीच्याशी जोडलेला आहे!
पहिल्यांदा मीही अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो. दैववाद, लक, योगायोग. हे फक्त माझ्यासाठी शब्द होते. पण ती आयुष्यात आली आणि हे योगयोग विचित्रपणे माझ्यासोबत होऊ लागले.

कंप्युटर क्लास संपल्यानंतर मी काही दिवसांकरिता गावाला गेलो होतो. दोन एक महिने तरी असेन तिथे.
यावेळी तीच्याशी कसल्याच प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. कामाच्या गोंधळात मला वेळ भेटला नाही. तीचाही काही मॅसेज आला नाही. नाहीतर मुंबईत असताना हफ्ता दोन हफ्त्याला तीचे सारखे मॅसेजेस असायचे. हटकून एखाद दिवशी मी तीला फोन करायचो. पण यावेळी आमच्यात असं काहीच कम्युनिकेशन झालं नव्हतं.

त्या संध्याकाळी मात्र अचानक हुरहुर वाढली. तीची खूप आठवण यायला लागली. अचानकच एकटं- अस्वस्थ वाटायला लागलं. तीला भेटण्याची ओढ प्रकर्षाने जाणवू लागली. पण ते शक्य नव्हतं. मी बंगलीच्या मागच्या दाराकडे बसलो होतो. साधारण साडे चार वाजले असतील. तीच्या सोबतचे प्रसंग आठवत मी तीचे जुने मॅसेजेस वाचण्यासाठी फोन हातात घेतला. बटन प्रेस करणार तोच, अचानक मिच्च काळोख्या जागी, लख्ख प्रकाश पडावा तसा फोन उजळला. वायब्रेट झाला. शांत वातावरणात कानठीळ्या बसवत मॅसेज ट्युन वाजली. मी फोन अनलॉक केला. सहज पाहिलं तर तीचाच मॅसेज होता. घाईघाईत मॅसेज ओपन केला आणि..
पुढचा कितीतरी वेळ मी अक्षरश: वेड्यासारखा स्वत:शीच हसत सुटलो होतो...

मॅसेज होता..

‘बिछडने के बाद कभी मिलें जिंदगी में कहीं,
देखकर नजर यार ना झुका लेना,
‘देखा है आपको शायद’,
बस
यह कह कर ही सही हाथ मिला लेना!....’
==================================================================
क्रमश:

भाग=>> 9

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या संध्याकाळी मात्र अचानक हुरहुर वाढली. तीची खूप आठवण यायला लागली. अचानकच एकटं- अस्वस्थ वाटायला लागलं. तीला भेटण्याची ओढ प्रकर्षाने जाणवू लागली...............सहज पाहिलं तर तीचाच मॅसेज होता.>>>>.असं होतं खरं.
एखाद्याची अचानकच खुपच आठवण येत राहते. ३-४ दिवस रिजच. मग कळतं की तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्वाचं घडत होतं. किंवा नेमकं त्या व्यक्तीलाही आपली आठवण येत होती. Happy

छान सुरु आहे ही सिरीज.

Chhan