ब्युटी पार्लर- भाग 4

Submitted by द्वादशांगुला on 11 April, 2018 - 16:44

आधीचे भाग वाचले नसल्यास पुढील लिंकवर टिचकी मारा.

ब्युटी पार्लर भाग 1
https://www.maayboli.com/node/65626

ब्युटी पार्लर भाग 2
https://www.maayboli.com/node/65681

ब्युटी पार्लर भाग 3
https://www.maayboli.com/node/65731

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

पूर्वभाग-

इन्स्पेक्टर नाईकांना काही सुचेनासं झालं होतं. भूतकाळाच्या रिकाम्या राहिलेल्या खाचा बहुतेक परत भविष्यकाळाने भरल्या जाणार होत्या. या केसचा शोधपत्ता एका इन्स्पेक्टरच्या नात्याने करणं अशक्य झालं होतं. काहीतरी होतं जे शोधावं लागणार होतं, आपल्या भूतकाळाला धरून.

आता पुढे-

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

पूजाचा मृत्यू तिच्याच घरी झाला होता. घरात कोणी नसताना. आज सकाळीच इन्सपेक्टर नाईक पूजाचा मृत्यू झाला तिथे जाऊन आले होते. तिच्या आणि मीनाच्या मृत्यूत कमालीचं साम्य होतं. पूजाचेही केस कैचीने कापल्यासारखे बाजूला पडले होते. तिच्या डोळ्यांत मरतेवेळी प्रचंड भीती होती. आसपास खुन्याच्या कोणत्याच खुणा दिसत नव्हत्या. इन्स्पेक्टर नाईक हताशपणे पोलिस चौकीत आले. आपण पूजाला वाचवू शकलो नाही, याचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यांना वाटत होतं, की ही केस आपल्याकडे येणं, हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही. आपणच आहोत ते साधन, ज्यामुळे या दुष्ट शक्तींचा नाश होणार आहे. आणि एक जबाबदार इन्स्पेक्टरच्या आणि सुजाण नागरिकाच्या नात्याने हे दुष्टचक्र थांबवायलाच हवं होतं. काहीतरी करून हे रोखायलाच हवं होतं. सामान्य माणसं उगाच यात ओढली जात होती. हे साफ चुकीचं होतं.

नाईकांनी पूजाच्या शेजार्यांना विचारून पाहिलं , पण अपेक्षेप्रमाणेच त्यांनाही काही विचित्र वाटलं नव्हतं आणि त्यांना ती मरतेवेळी कसलेच आवाज आले नव्हते. इन्स्पेक्टर नाईकांना काहीच सुचेनासं झालं होतं. शिंदेंना अस्वस्थपणे चालताना पाहून त्यांनी शिंदेंना जवळ बोलावलं. शिंदे म्हणाले, " साहेब, ही केस तर डोक्यावरून चाललीय. काय सुरू आहे काहीच कळत नाही. आधी पूजा दोषी वाटत होती, पण तिचाच खून झाला. तिचा खून झाला त्या वेळी तिच्या घरचे बाहेर गेले होते, पण ही मात्र पुढच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी घरीच राहिली होती. तिला बहुतेक घरी जास्त सेफ वाटत असावं. तिच्या खूनाच्या वेळी तिच्या चेहर्यावर भूत पाहिल्यासारखी प्रचंड भीती होती. घरात संशयास्पद काहीच आढळलं नाही. आता किती खून होणार आहेत काय माहीत. "
थोडावेळ थांबून त्यांनी चाचरतच हळू आवाजात इन्स्पेक्टर नाईकांना विचारलं, " साहेब एक सांगू का.... नाही म्हणजे रागवू नका... मी मला वाटतंय ते सांगतोय. पण मला हे काही एखाद्या साध्या माणसाने किंवा गॅन्गने केलेलं वाटत नाहीये. हे नक्कीच काहीतरी अमानवीय प्रकरण आहे. मला वाटतं की आपण जर त्या दिशेने प्रयत्न सुरू केला तर....."

इन्स्पेक्टर नाईक शिंदेंचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले," हे बघा शिंदे... आपल्याला या बहुमुल्य वर्दीत हे असलं बिनबुडाचं, अमान्य असं बोलणं शोभत नाही. वर्दीत हे बोलणं म्हणजे केसपासून भरकटत जाणं, पिछेहाट करण्यासारखं झालं. पण वर्दीत नसताना एक सामान्य माणूस म्हणून आपण याही दिशेने विचार करू शकतो. आता यावर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण काही सत्यं अर्धसत्य असतात ; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपलेली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे. "

शिंदेंनी यावर मान डोलावली. ते म्हणाले," साहेब, ही वर्दी मुळात लोकसेवेसाठी चढवलीय. मग ती अंगावर असो वा नसो, पण साध्या लोकांना होणारा त्रास निदान कमी तरी करण्यासाठी मला प्रयत्न करायला आवडेल..." यावर नाईक पुसटसे हसले आणि त्यांनी शिंदेंच्या खांद्यावर गर्वाने थाप मारली. ते म्हणाले, " हो तर मग तयार रहा. आपण नक्कीच गुन्हेगार शोधून काढू." यावर शिंदेंनी आनंदाने त्यांना सॅल्युट ठोकला.

●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज इन्स्पेक्टर नाईकांना ते स्वप्न पडलं. एक तेजस्वी पुरुष एका काहीशा गूढ जागी उभा आहे. जटा, दाढी राखलेला, भगव्या वस्त्रातला, चेहर्यावर सकारात्मक तेज असलेला.
इन्स्पेक्टर नाईक त्याच्यासमोर जातात नि नम्रपणे गुडघ्यावर बसून हात जोडून त्या व्यक्तीला आज्ञा द्यायला सांगतात. तेव्हा ती व्यक्ती त्यांना खांद्याला पकडून उठवते नि चेहर्यावर स्मित खेळवत धीरगंभीर आवाजात म्हणते, " या घटनांचा कर्ता दुसरा कोणी नसून तोच तुझ्या पूर्वायुष्याशी निगडित बाबा, जो स्वतःला अघोरस्वामी म्हणवून घेतो. त्याच्या शक्ती तुला आता कळण्यापलिकडे वाढल्या आहेत. त्याला विश्वावर आपलं काळं साम्राज्य प्रस्थापित करायचं आहे. आता तर तो निष्पाप जीवांचे बळीही द्यायला लागलाय, हे तुला दिसतंच आहे. हे सारं तुलाच थांबवावं लागेल. कसं, कशाने, कुठे अशा प्रश्नांची उत्तरं तुला तिथेच मिळतील, जिथे तुझा या क्रूर शक्तीशी परिचय झाला. तुला यापुढील मार्गदर्शन मी करेन. लवकरच तू मला भेटशील. " असं म्हणून तो माणूस लुप्त झाला नि इन्स्पेक्टर नाईक झोपेतून जागे झाले. त्यांनी ऐकलं होतं , की आपण आधी पाहिलेले चेहरेच आपल्याला स्वप्नात दिसू शकतात. त्यामुळे त्यांनी खूप आठवून पाहिलं, पण स्वप्नात आलेला तो माणूस कधीच भेटला नव्हता आपल्याला. आता त्याचं ऐकण्याखेरीज काहीच मार्ग नाहीय. त्याच्या बोलण्यात तथ्य तर होतंच.

●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज नाईकांनी चौकीत शिंदेना काल पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितलं. शिंदेंना त्यांनी परवा आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगितलं होतंच. ते म्हणाले, " शिंदे, मला कळत नाहीये की आता काय करावं. माझ्या आयुष्यात या सगळ्याची सुरूवात माझ्या गावीच झाली होती. या सगळ्या लोकांचे प्राण माझ्यामुळे जाताहेत, की आणखी काही, ते मला समजत नाहीय."
यावर शिंदे म्हणाले," साहेब, जर हे तुमच्यामुळे होत असतं तर त्या कापलिकाने पहिले तुम्हाला टार्गेट बनवलं असतं. पण माझ्या माहितीवरून तरी त्याला आपली शक्ती वाढवायची आहे; जग काबूत ठेवायला, सगळी नकारात्मक शक्ती आपल्या हातात सामवून घ्यायला. तुम्ही पण जपून रहा. त्याला तुमचे प्राण त्याची शक्तीच वाढवायला हवे असतील , पण तुम्हाला तो त्याची नकारात्मकता वाढवायचं साधन मानत असावा. पण तुम्ही तर त्याच्या अंताचं साधन बनून त्याला संपवायला चालला आहात. इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्हाला त्याच्यावर विजय नक्कीच मिळेल. आणि तुमची मदत मीच का करतोय, तर यालाही माझ्या पूर्वायुष्याची कहाणी आहे. माझे वडील एक कापलिक होते...-"

यावर इन्स्पेक्टर नाईक चरकले. त्यांच्या चेहर्यावरचे बदलते भाव बघून हसत शिंदे म्हणाले, " अहो , तुम्ही समजता तसं काही नाहीय. या अघोरस्वामीसारख्या लोकांमुळे हा पंथ बदनाम होत आहे. माझ्या वडिलांनी उत्तरप्रदेशातल्या अघोर मठातून दीक्षा घेतली होती. पण ते आयुष्यभर चांगले सुवर्तनी कापलिक म्हणूनच जगले. त्यांना मोठा मान होता. आपल्या शक्तींचा त्यांनी दुरूपयोग कधीच केला नाही. त्यांना फक्त जगात सुख शांती पसरवायची होती. पण अजाणतेवेळी कोण्या दुष्ट कापलिकाने त्यांना स्वार्थासाठी ठार मारलं. त्यांच्या मारेकर्याला मला जन्माची अद्दल घडवायचीय. पण आधी हे प्रकरण मिटवावं लागेल.
हां मी काय म्हणत होतो, माझ्या वडिलांनी मरतेवेळी मला सांगितलं होतं, की नेहमीच कोणत्याही दुष्ट शक्तीचा नायनाट करण्याचा प्रयत्न कर. म्हणूनच तर मी या खात्यात आलो. माझ्याकडे गावी वडिलांची या कापलिक शक्तीबाबतची जुनी पुस्तकं आहेत. त्यातून आपल्याला ही केस सोडवण्यासाठी काहीतरी नक्कीच मिळेल. मी उद्या रात्री निघतो. पहाटेपर्यंत इथे पोहोचेन. तुम्ही काळजी घ्या." हे ऐकून नाईक कनकुसं हसले.

●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज इन्सपेक्टर नाईक लवकर तयार झाले. आज त्यांनी काहीतरी करायचं ठरवलंच होतं. ते चौकीत गेले, आणि त्यांनी कितीतरी मिनतवार्या करून, शेवटी वडील आजारी असल्याचं खोटं कारण सांगून दोन दिवसांची रजा मागून घेतली. त्यांना या केसची तपासणी सुरू असताना सोडायला वरिष्ठ राजी नव्हतेच, पण कसंतरी त्यांना नाईकांनी मनवलं. जाता जाता शिंदेंना त्यांच्या गैरहजेरीत घडणारी प्रत्येक खबर देण्याचं आणि वर्दीविना केस सोडवण्यासाठी तयार राहण्याचं सांगितलं. लवकरच त्यांनी रामगडला जाणारी बस पकडली. तिथूनच तर त्यांचा या वाईट शक्तीशी परिचय झाला होता. ते मजल दरमजल करीत शेवटी रामगडच्या बसस्टाॅपवर पोहोचले. आठ- नऊ वर्षांनी ते गावी जात होते. कितीतरी आठवणी इथल्या चांगल्या-वाईट. नऊ वर्षात गाव बरंच बदललं होतं. गाव गाव राहिलं नव्हतंच. सगळीकडे शहरीकरणाच्या खुणा. जुनी ओळखच पटत नव्हती. लोकंही चटकन ओळखली जात नव्हती. त्यांनाही कोणी ओळखलं नाही. विचारातच ते आपल्या गावच्या घरी गेले. आयत्यावर ठरल्याने त्यांनी आई-बाबांना फोन करून सांगितलं नव्हतंच. त्यांनी समोरचं फाटक ढकलल्यावर ते करकर आवाज करत उघडलं.

त्यांना दिसलं, आई नेहमीप्रमाणेच स्वयंपाकाला लागली होती. बाबा पडवीत बसून पेपर वाचत होते. गेट उघडल्याच्या आवाजाने नाईकांच्या वडिलांनी मान वर करून पाहिलं . नाईकांना अचानक इथे बघून ते खूश झाले होते. इन्स्पेक्टर नाईकांची आईही बाहेर आली. त्या माऊलीच्या चेहर्यावर पुत्रभेटीचं हास्य होतं. नाईकांनी त्या दोघांना रोजच्या कामातून विश्रांतीसाठी आल्याचं खोटं कारण सांगितलं. खरं कारण सांगणं कटाक्षाने टाळलं. थोडावेळ त्यांनी गप्पा मारल्या, जेवण केलं. नंतर त्यांनी आईला सांगितलं , की ते गावाच्या देवळात जात आहेत. आई 'हो' बोलल्यावर ते घराच्या चौकटीबाहेर पडले. पायात चप्पल अडकवली नि झटकन त्यांना काहीतरी आठवल्यासारखं ते चप्पल उतरवून घरात परत आले. बाजूला पडलेल्या पेपरचा कागदाचा कपटा फाडला आणि देव्हार्यातली उदी त्यात घेतली, नि नीट घडी घालून खिशात कोंबली. आणि ते निघाले; देवळात नाही, तर वेशीजवळच्या स्मशानात. ती जागा अजिबात बदलली नव्हती. हीच ती जागा, जिथूनच इन्स्पेक्टर नाईकांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली होती. वारा अवचितपणे जोरात वाहू लागला होता. ती अजस्र पिंपळ, वड, चिंचेची झाडं अजूनच जुनाट , भयंकर वाटत होती. त्यांच्या दरम्यान खोडाशी मात्र अजस्र काटेरी झुडपं उगवली होती. त्या दाट झाडीतून रातकिड्यांचा आवाज येत होता. पूर्वीची जुनी अवकळा मात्र तशीच होती.

मग इन्स्पेक्टर नाईक स्मशानाच्या सीमेच्या आत शिरले. डाव्या बाजूला पन्नास हातांच्या अंतरावर एका जळलेल्या प्रेताची राख धुमसत होती. त्याचाच वास सगळीकडे भरून राहिला होता. संध्याकाळची वेळ असल्याने मात्र त्यांना जास्त भीती वाटली नाही. ते थोडं पुढे गेले, ती काठी पूर्वी त्यांनी जिथे रोवली होती, तिथे. त्यांनी बघितलं, तर चक्क त्या काठीभोवती मातीलगत जाड्या , टपोर्या, लाल मुंग्यांचं मोठं वारूळ लागलं होतं. त्या मुंग्या नेहमीच्या मुंग्यांपेक्षा फारच वेगळ्या नि विचित्र होत्या. त्या जवळपास दीड सेमी लांबीच्या, टपोर्या , पाहणार्याला किळस वाटावा अशा होत्या. त्यांनी वारूळ केल्याने घट्ट माती थोडी मऊ झाल्याने ती काठी आपसूकच वर आली होती. ती वार्यावर हेलकावे खात होती. ती काठी कधीही उन्मळून पडेल,असं वाटत होतं. आणि हे झालं असतं तर बहुधा गावावर ते अरिष्ट पुन्हा आलं असतं, कारण तीच काठी गावाचं रक्षणकवच होती.

त्यामुळे इन्स्पेक्टर नाईकांनी काठीच्या वरच्या टोकाला हात लावला, नि विजेचा झटका बसल्यासारखे ते मागे फिरले. ते बघतात , तर एक मोठी मुंगी त्यांना चावली होती. भयंकर दंश होता तिचा. इंगळी चावल्यासारखं वाटत होतं. ती हाताला जिथे चावली होती , तिथे लाल पुरळ उठलं होतं. तरीही हार न मानता त्यांनी घरातल्या देव्हार्यातून आणलेली उदी खिशातून बाहेर काढली आणि थोडी हाताला लावून उरलेली त्या काठीवर व काठीजवळच्या मातीच्या वारूळावर टाकली. नि काय आश्चर्य, त्या मुंग्या सैरावैरा पळू लागल्या व अचानक नाहीशा झाल्या. आता इन्स्पेक्टर नाईकांनी त्या काठीच्या टोकाला हात लावला व ती मातीत खोलवर खुपसली. पूर्वी त्यांच्या काकाने त्यांच्या दंडाला बांधलेला दोरा काढला नी त्या काठीभोवती गुंडाळून करकचून बांधून टाकला. आतातरी गावाला यापासून धोका नव्हता.

त्यांनी त्यांच्या काकाने त्यांच्या हाताला बांधलेलं रक्षणकवच त्यांनी गावाच्या भल्यासाठी अर्पण केलं होतं. कारण गावात त्याची शक्ती एकवटल्याने गावाला आता याचा जास्त धोका होता. त्यामुळे गावाला वाचवणं गरजेचं होतं. या त्यांच्या कृतीमुळे गाव तर वाचलं होतं, पण आपल्यावर येणार्या अरिष्टापासून ते अनभिज्ञ होते.

निश्चिंत मनाने ते या स्मशानापासून दूर जाऊ लागले, तेव्हा अचानक त्यांना खूप अशक्त वाटू लागलं . अंगातली ताकद नाहीशी होत असल्यासारखं वाटू लागलं, नि काही कळायच्या आत ते चक्कर येऊन तिथेच खाली पडले. शुद्ध हरपताना त्यांना एक खंबीर, दुष्ट हसण्याचा आवाज ऐकू आला, नि त्यांचं भान हरपलं.

●●●●●●●●●●●●●●●●●●●

(क्रमशः)

द्वादशांगुला
जुई

तळटीप :

1) हा भाग उशिरा टाकल्याबद्दल मी समस्त माबोकरांची माफी मागते. कृपया मला मोठ्या मनाने माफ करून हा भाग कसा वाटला ते सांगावं. Happy

2)ही कथा पूर्णपणे लेखिकेच्या (पक्षी : माझ्याच) मेंदूवरच्या सुरकुत्यांतून बाहेर पडली असून याचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नाही ... नसावा. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा पसरवण्याचा दूरदूरपर्यंत हेतू नाही. (चुकून) सत्यता आढळल्यास डोळे चोळून परत नीट तपासून पहावे नि येथे नमूद करावे कारण-
काही सत्यं अर्धसत्यं असतात; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे................

-द्वादशांगुला

Group content visibility: 
Use group defaults

जुई छान लिहीते आहेस.. प्रसंग आणखी चांगल्या प्रकारे खुलवता येतील ! Happy

चांगले कापालिक आणि वाईट कापालिक यांच्यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. उद्या सांगेन.
पुलेशु !

धन्यवाद आनंदजी. Happy

प्रसंग आणखी चांगल्या प्रकारे खुलवता येतील ! >>>>>> हो पुढच्या भागापासून प्रसंग खुलवण्याचे नक्की प्रयत्न करेन. Happy

चांगले कापालिक आणि वाईट कापालिक यांच्यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. उद्या सांगेन.>>>>>> हो नक्की सांगा हं... पुढच्या भागांसाठी मदत होईल. आणि धन्यवाद Happy

धन्यवाद पंडितजी, स्नेहनिलजी Happy

शीर्षक ब्युटीपार्लर का?
मीनाचं ब्युटीपार्लर होतं म्हणुन?>>>>>>>> प्रश्न मस्त आहे. याचं उत्तर पुढील भागांत मिळेल. Happy