टेडी

Submitted by मनवेली on 25 March, 2018 - 11:38

निर्जीव असूनही जिवंत वाटणारं, आपलं सगळं काही ऐकणारं, आपल्याशी गप्पा मारणारं, खेळणारं, गोंडस आणि गुबगुबीत दिसणारं, लहानपणी कायम आपल्या हातात असणारं ते खेळणं; नव्हे, जीवाभावाचं कोणी – Teddy Bear! आपण त्याला धरूनही त्यानेच आपलं बोट पकडलंय, आपण त्याच्याशी बोलतोय आणि ते सगळं ऐकतंय, आपण त्याला मिठीत घेतो तेंव्हा तेही आपल्याला बिलगतंय असं वाटण्याचा तों काळ, Teddy Bear शी असलेल्या घट्ट मैत्रीचा.

आपल्या आयुष्यात हे Teddy Bear असण्याची एक stage असते, लहानपणी केंव्हातरी येवून जाणारी. ते Teddy Bear आपल्याशी बोलत नसतं खरंतर, पण आपण त्याच्याशी भरभरुन बोलतो, ते आपल्याला मिठीत घेत नसतं, आपण त्याला घेतो. आपण त्याच्यावर मनापासून प्रेम करतो, त्याचे लाड करतो, त्याला आपलं मित्र करतो. कधी आपण त्याला कुशीत घेतो आणि कधी आपल्याही नकळत त्याच्या कुशीत शिरतो. आयुष्यातही अशी माणसं अवतीभवती असणं ही मानसिक गरज असते आपली. काही Big Teddy सारखी, ज्यांच्या कुशीत शिरता येतं केंव्हाही आणि काही Little Teddy सारखी, ज्यांना कवेत घेता येतं हवं तेंव्हा. हे Teddy हातातून सुटतं आणि काहीतरी हरवतं आपल्याकडचं, आपल्या आतलं.

पण ते Teddy-प्रेम पुन्हा अनुभवता येतं, निष्पाप पाळीव प्राण्याच्या रूपात. हे प्राणी किती प्रेम करतात आपल्यावर, त्यांच्या आयुष्यात असण्यानं आयुष्यालाच एक नवा अर्थ येतो, ते निरागस सजीव खूप जीव लावतात आपल्यावर, अन् त्यांच्याशी असलेलं आपलं नातं ते आपल्याही पेक्षा जास्तं इमानानं जपतात. त्यांचा तों लडीवाळ स्पर्ष, ती लोभसवाणी नजर, त्यांचं ते आपल्याकडे झेपावणं, आपल्या अंगावर खेळणं, त्यांचं रुसणं, रागावणं, अन् पुन्हा आपल्याच कुशीत निजणं, किती हवंहवंसं.

त्यांचं आपल्याला कधीच जज नं करणं आणि आपल्यावर अखंड प्रेम करत राहणं, अन् आपलं त्यांच्याशी मनमोकळं बोलणं, खेळणं, मला आठवण करून देतं आपल्या Teddy शी असलेल्या नात्याची.

हे Teddy निसटतं कधीतरी हातातून, मनातून ...पण पुन्हा भेटूही शकतं, एखाद्या प्राण्याच्या रूपात. मध्यंतरी, मी ते निसटलेलं प्रेम काही क्षणांसाठी पुन्हा अनुभवलं, जेंव्हा माझ्या मित्राने पाळलेलं कुत्र्याचं पिल्लू माझ्याजवळ येऊन बसलं अगदी आपणहून अन् अचानक. माझं नी त्याचं फारसं ‘संभाषण’ नव्हतं खरंतर, कारण मला प्राण्यांची फारशी आवड नाहीये अन् सवयही. पण त्याला हे माहीत नव्हतं, माहीत करूनही घ्यायचं नव्हतं. त्याला काहीच घ्यायचं नव्हतं खरंतर. त्याला फक्त ‘द्यायचं’ होतं, प्रेम, नि:स्वार्थी प्रेम!

मला आठवण झाली Teddy शी असलेल्या माझ्या नात्याची. त्याच्याशी मारलेल्या गप्पांची. अन् त्याच्याकडून कोणतीच अपेक्षा नं करता त्याच्यावर केलेल्या निरागस प्रेमाची. Teddy ने धरलेलं माझं बोट केव्हा सुटलं त्याच्या हातून, की मीच त्याच्या नकळत काढून घेतलं ते केंव्हातरी? ते आठवतं नाही. पण Teddy माझ्या बरोबर असतानाची मनाची श्रीमंती आज कमी पडतीय कुठेतरी एवढं मात्र जाणवलं.
प्रेम करण्याची अन् ते निभावण्याची क्षमता, जेवढी त्या मुक्या प्राण्यांत दिसते, तेवढी असते आपल्यासारख्या माणसांत? ते लहानापणचं Teddy आज समोर आलं तर त्याला कवटाळता येईल पुन्हा त्यावेळच्या मायेने? बहुदा नाहीच!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलंकारिक भाषेत लाडक्या गोंडुल्या टेडीचं रूपडं वाचून प्रसन्न वाटलं. टेडीचा मऊ छोटुकला हात सुटलाय केव्हाच हातातून, (सर्वांच्या टेडीवरून चिडवण्यामुळे Wink ) पण आसपासच्या इवल्याशा मुलींच्या हातात टेडी पाहिला, की टेडीचा मऊ गुबगुबीत स्पर्श आठवल्याशिवाय राहत नाही. आता हा लेख वाचूनही टेडीसोबत खेळलेले दिवस आठवताहेत.... टेडीच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद... Happy

लेखाबद्दल- शेवटचा पॅरा मनाला भिडला, पण...

पुलेशु Happy