झळाळलं गं वरून, अंधारलं आतमंदी...

Submitted by Anuja Mulay on 22 March, 2018 - 12:57

मीराचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. ऑस्ट्रेलियाला जाऊन MS केलं आणि तिकडेच पुढे PhD देखील करण्याची तिची इच्छा होती. पण आई-वडिलांच्या मते वय वाढत चालल्याने आता तिच्या लग्नाचं बघायला सुरुवात करणं आवश्यक होतं. 'तुझं कुठं काही आहे का? आत्ताच सांग बाई! नंतर अभ्रूचे धिंडवडे नकोत आमच्या.' असं तिच्या वडिलांनी विचारल्यावर तिचं कोणावरही प्रेम नाही किंवा तिच्या मनात देखील कोणी नाही असे सांगताच 'आम्ही आता तुझ्यासाठी स्थळ बघायला मोकळे, हो की नाही?' असे तिच्या वडिलांनी विचारले. जरा नाराज होऊनच तिने 'हो' म्हणून सांगितले. तिला पुढे अजून शिकायचं होतं. अगदी परदेशातच नाही तर भारतात सुद्धा तिला चाललं असतं. पण इतक्यात 'लग्न, कुटुंब या सगळ्या जबाबदाऱ्या पेलायला ती तयार होती का?' या प्रश्नाचं उत्तर मात्र तिलाही ठाऊक नव्हतं. लहान बहिणीमार्फत आईला, आईकडून बाबांना हे सगळं सांगण्याचा तिने खूपदा प्रयत्न केला, पण तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. 'वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत', नाहीतर मग आयुष्याचं सगळं गणित चुकत जातं' हे वाक्य हल्ली तिला थोड्याफार फरकाने सतत ऐकायला मिळत होतं.
असं सगळं चालू असतानाच तिच्यासाठी एका उच्चशिक्षित मुलाचं स्थळ चालून आलं. तिऱ्हाईत व्यक्तींमार्फत त्या मुलाची, त्याच्या कुटुंबाची चौकशी करून झाली. भेटी-गाठी झाल्या. 'आम्ही अगदी मॉडर्न विचारांचे' असं म्हणत मुलांना एकट्यात भेटायला दिलं. प्रश्न-उत्तरं झाली. लग्नाची तारीख ठरली. आम्हाला हुंडा काहीच नको, असं म्हणूनसुद्धा वडिलांनीच स्वखुशीने १० तोळे सोनं, एक चारचाकी आणि एक फ्लॅट भेट म्हणून दिला. आणि सासरच्यांनीही नको-नको म्हणत सगळ्या गोष्टींचा स्वीकार केलाच. सगळं अगदी सुरळीत पार पडलं.अगदी थाटामाटात लग्न लावून दिलं. मोठ्या संख्येने पाहुणे-मंडळी आशीर्वाद द्यायला उपस्थित होती.
मुलगा तसा दिसायला मीराहून उजवा. अर्थात तिच्या आई-बाबांच्या मताने. त्याचा कापडाचा चांगला व्यवसाय चालू होता. महिन्याकाठी २ लाखाचा नफा तर कुठेच जात नव्हता. पारंपारिक कौटुंबिक व्यवसायच चालवायला घेतल्याने त्याचा लहान वयातच चांगला जम बसला होता. 'गोरी गोरी पान' वहिनी आणली म्हणून घरातल्या चिमुकल्यांनी आल्या आल्या तिच्याभोवती फेरा घातला. घरातल्या आत्या, मावश्या, काकू यांना तर आपल्या एकुलत्या एक सुनेला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन गेलं होतं. आता लवकरच आपल्या घराचं गोकुळ होणार म्हणून मुलाचे आई-बाबा खूष होते. इकडे पोरीला चांगल्या घरी पाठवलं, आता आपल्याला काळजी करायचं कारण नाही, या विचाराने मीराचे आई-बाबा सुद्धा निश्चिन्त झाले.
या सगळ्यामध्ये मीराला काय वाटतंय, ती खूष आहे का हे कोणी विचारलंच नाही. नकार देण्यासारखं मुलामध्ये काहीच नव्हतं, म्हणून तिने लग्नाला होकार दिला. तिला सध्या लग्न करायचं नाहीये, हे तिने मुलालाही कॉफी शॉपमध्ये भेटल्यावर सांगून पाहिलं. त्यावर त्याने तो तिच्या आई-बाबांशी बोलणार असल्याचं वचनही दिलं. हा संवाद झाल्यानंतर मात्र 'आपण योग्य माणसाशी लग्न करतोय', हा विचार करून तिला जरा हायसं वाटलं. पण दोनच दिवसात दोघांच्या पालकांनी भेटून साखरपुडा, लग्नाची तारीख ठरवली सुद्धा, तीही अगदी १.५ महिन्यांतरची. 'तू लग्नानंतर काय शिकायचंय ते शिक गं. लागलं तर स्वतःचं काहीतरी सुरू करायला पण मी तुला मदत करतो', असं आश्वासन तिला होणाऱ्या नवऱ्याकडून मिळालं. पुढचे सगळे दिवस तयारी करण्यातच गेले. खरेदी, आमंत्रणं, पार्लरच्या चकरा आणि 'पोरीला अगदी दृष्ट लागण्यासारखं स्थळ मिळालं हो!' असं म्हणून कौतुक करून घेण्यात सगळं वेळ निघून गेला. आणि असं करत करत मीरा कधी सासरी येऊन पोहोचली हे तिचं तिलाही कळलं नाही. तिचं खूपसं बोलायचं राहूनच गेलं. खूप गोष्टी तिने लग्नाच्या आधी करायच्या ठरवलेल्या, त्याही तिला करता आल्या नाहीत. मुळात तिला घरच्यांसोबत आणखी काही दिवस राहायचं होतं. आधीच शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरीसाठी अशी ४ वर्षे तिने ऑस्ट्रेलियामध्ये घालवली होती. पण तिच्या आई-बाबांनाच तिच्या लग्नाची इतकी घाई झाली होती, की तिला त्यांच्यासोबत राहायची इच्छा देखील पूर्ण करता आली नाही.
बघता बघता लग्नाला २ महिने झाले सुद्धा. तिचा सगळा वेळ नवऱ्याला काय आवडतं काय नाही, हे सगळं शिकून घेण्यातच गेला. मग त्याच्या आवडीचे पदार्थ असोत किंवा परफ्युम. सगळं तिला अगदी उत्तम माहिती झालं. या काळात त्याचं मात्र लग्नानंतरचे पहिले १५ दिवस सोडले, तर काम अगदी पूर्वीसारखंच चालू होतं. सकाळी ८ वाजता घर सोडायचं आणि रात्री १० वाजता घरी यायचं. त्याची वाट पाहत मीरा कोमेजून जायची, कधी-कधी तर तिला कंटाळून झोप सुद्धा लागून जायची. आज तरी पुढच्या शिक्षणाचा विषय काढू, असं ती रोज सकाळी उठल्यावर ठरवायची. पण सकाळी त्याला जायची घाई असायची आणि रात्री त्याला शांतता लागायची. या सगळ्यात त्या दोघांनाच असा वेळच मिळत नव्हता. एका रविवारी तिने धीर करून त्याच्यासमोर विषय काढला. त्यावर ' आता काही शिका-बिकायचं नाही. नोकरी वगैरे करण्याचा विचार असेल, तर तोही वेळीच डोक्यातून काढून टाक. उगाच मग आई-बाबांनी परत काही बोलण्याआधी मीच तुला सांगतोय. ही नसती खुळ डोक्यातून काढून टाका. मी म्हणालो असेन आधी की तू शिक वगैरे. पण ते लग्न जमावण्यापुरतंच होतं. हे सगळं बाजूला ठेऊन जर घरकामात लक्ष द्या आता. आणि आपल्याला हे घराणं सुद्धा पुढे न्यायला हवं, त्याची सुद्धा तयारी करायला लागेलच.' असं उत्तर तिला मिळालं.
धरणी दुभंगून आत्ता या क्षणी पोटात घेईल तर बरं, असं तिला वाटत होतं. तिने अडून-अडून सासूबाईंशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनीही 'या घरातल्या बायका बाहेर जाऊन काम-बिम करत नसतात. तुला कशाची कमी असेल, तर सांग बाई. तसं सांगते तुझ्या नवऱ्याला. आणि करायचंच असेल काम अगदीच, तर त्यालाच त्याच्या कामात घरुन जमेल तितकी मदत कर. झालं. आणि आता तेवढं नातवाचं पाहा.' असं गोड शब्दात ऐकवलं.
तिने यावर तिच्या आई-बाबांशी सुद्धा बोलून पाहिलं, पण 'आता तुझा संसार तू सांभाळ बाई, आम्ही म्हातारे झालो. उगाच डोक्याला आणखी ताप नकोत.आणि नवऱ्याला आवडतं तसं वागलं तर फार काही बिघडत नाही. उलट चांगलाच संसार करशील', असं तिच्या आईने फोनवर तिला समजावलं.
मग हे सगळं रामायण झाल्यावर पळून जाणे, घटस्फोट घेणे, आत्महत्या करणे, या घरात क्रांती आणणे, घरून काम करण्याची एखादी नोकरी पाहणे या सगळ्यांचा विचार तिने केला पण थोड्याच दिवसात या सगळ्यातला फोलपणा तिच्या लक्षात आला. मग आई-बाबा यांना आपल्यामुळे त्रास नको, म्हणून तिने त्यांच्यासमोर विषय काढणं बंद केलं. नवऱ्यासोबत आयुष्य काढायचंय मग उगाच मतभेद नकोत म्हणून त्याच्याशी देखील या विषयावर बोलणे बंद केले. घटस्फोट घेऊनही आपण एकटे या जगात राहू शकतो का? एक लग्न स्वतःहून मोडलं म्हणून परत कोणी आपल्याला स्वीकारेल का? आपल्याकडे उच्च शिक्षण आहे, पण आयुष्यभर एकटे राहण्यासाठी जी मानसिक ताकद लागते, ती आपल्याकडे आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. म्हणून तिने 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशा काहीशा परिस्थितीत आपला संसार चालू ठेवला. बघणाऱ्यांच्या नजरेत तिचा गोड-गुलाबी संसार उत्तम चालू होता. पुढे १-२ महिन्यात तिने गोड बातमीसुद्धा दिली. सगळं अगदी नजर लागण्यासारखं चालू होतं. आणि आता आपल्याला झालेल्या मुलीलातरी मनासारखं जगू द्यायचं, असं ठरवून तिने मुकाटपणे संसार चालू ठेवला.

And they lived happily ever after!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात ज्या मुलीच्या अंगात स्वतःच्या आईवडिलांना सांगायची, कन्विन्स करायचीच धमक नाही तिने नवर्‍याकडून कसली अपेक्षा ठेवायची?

And they lived happily ever after!>> good. हसत हसत सगळे स्विकारले ते बरे केले नाहीतर रोज मेलं रडत लोकांना दुषणे देत त्यांच्या मनासारखे वागण्यात काहीच अर्थ नाही.
एकतर स्वता:च्या सुखासाठी धडपड करावी जर ते नसेल जमत तर दुसर्‍यांच्या सुखात आपले सुख मानावे.

तुम्हाला फसवणूक दिसली नाही का. अशा माणसाबरोबर तिचे मन रमणार आहे का.

लग्नाआधी-
तू लग्नानंतर काय शिकायचंय ते शिक गं. लागलं तर स्वतःचं काहीतरी सुरू करायला पण मी तुला मदत करतो', असं आश्वासन तिला होणाऱ्या नवऱ्याकडून मिळालं.

लग्नानंतर -
आता काही शिका-बिकायचं नाही. नोकरी वगैरे करण्याचा विचार असेल, तर तोही वेळीच डोक्यातून काढून टाक. उगाच मग आई-बाबांनी परत काही बोलण्याआधी मीच तुला सांगतोय. ही नसती खुळ डोक्यातून काढून टाका. मी म्हणालो असेन आधी की तू शिक वगैरे. पण ते लग्न जमावण्यापुरतंच होतं. हे सगळं बाजूला ठेऊन जर घरकामात लक्ष द्या आता.

तुम्हाला फसवणूक दिसली नाही का. अशा माणसाबरोबर तिचे मन रमणार आहे का. >>>उलट नवर्‍याला त्रास देण्याच्या नादात तिलाच जास्तच त्रास होईल. तसेच विबासं ठेवल्याने काय आनंद मिळणार आहे? आणि तेही कळल्यावर घरचे काय करतील? ते बोंबलणारच.
त्यापेक्षा सरळ नोकरी करावी. बसा बोंबलत म्हणावे. मूळात तिला तसे जमत नाही अशी स्टोरी आहे.